डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

सहा ऑगस्ट अठराशे सत्तर हा देशबंधू चित्तरंजन दास यांचा जन्मदिन. त्यानिमित्त हे पुण्यस्मरण...

या खटल्यानंतर निष्णात कायदेपंडित, सत्यासाठी स्वाभिमानाने, निरलसपणाने झगडणारा माणूस आणि प्रभावी वक्ता अशी चित्तरंजन बाबूंची देशभर ख्याती झाली. यांनी आपले वकीलपत्र घ्यावे म्हणून झिम्मड उडाली. 1917, 18, 19 या तीन वर्षांत त्यांची प्राप्ती दरसाल तीन लाख रुपये होती! 1920 मध्ये तर ती सहा लाखांवर गेली. खरे म्हणजे चित्तरंजनबाबू आणि त्यांचे वडील 1906 साली नादार ठरले होते. 1913 मध्ये हा कलंक त्यांनी धुवून टाकला. आणि 1924 मध्ये तर आपली जवळजवळ सर्व संपत्ती त्यांनी राष्ट्राला दान करून अत्युच्च स्वार्थ त्यागाचा एक आदर्शच घालून दिला.

स्वदेशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि अभ्युदयासाठी आपले आयुष्य सार्थकी लावणाऱ्या पूर्वजांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करणे हे एक राष्ट्रीय कर्तव्यच आहे.

भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात विनीवर लढलेल्या कर्तबगार सेनापतींमध्ये देशबंधू चित्तरंजन दास यांची अवश्य गणना केली पाहिजे. 

टिळकयुगाचा अस्त होतो आहे आणि गांधी युगाचा उदय होतो आहे अशा संधिकाळात चित्तरंजन दास तेजःपुंज सायंताऱ्यासारखे शोभतात.

त्यांचा जन्म 1870 साली झाला असला तरी त्यांचे राजकीय उपनयन तसे उशिरा म्हणजे वयाच्या छत्तिसाव्या वर्षी झाले. चित्तरंजन दास प्रत्यक्ष राजकीय रंगमंचावर अवतरले ते तर पुष्कळच उशीरा, 1917 साली, वयाच्या सत्तेचाळिसाव्या वर्षी. त्यानंतर अवघ्या आठ वर्षांनी त्यांनी देह ठेवला.

एकोणीसशे सतरा ते पंचवीस या लहानशा कालपटावर देशबंधूच्या कर्तृत्वाचा ठसा अगदी ठसठशीत उमटलेला आहे.

मुहूर्त ज्वलितं श्रेयो न च धूमायितं चिरम् - दीर्घकाळ धूमसत राहण्यापेक्षा क्षणार्ध पेटून उठणे बरे या सुभाषिताचा प्रत्यय देश बंधूंनी आपल्या कार्यकर्तृत्वाने दिला आहे.

कविमनाचा बॅरिस्टर

सन 1890 साली चित्तरंजन बाबू बी. ए. झाले. आणि लगेच त्याच वर्षी ते आय. सी. एस. होण्यासाठी इंग्लंडला गेले. आय. सी. एस्. च्या परीक्षेत त्यांना अपयश आले, पण नाउमेद न होता त्यांनी कायद्याचा अभ्यास केला. वर्षभरातच ते बॅरिस्टर झाले आणि 1893 साली 23 वर्षांचा हा तरणाबांड कायदेपंडित कलकत्ता हायकोर्टात वकिली करू लागला.

उमेदवारीच्या काळात जवळजवळ एक तप खर्ची पडले. वकिली म्हणावी तशी चालेना.

वास्तविक नित्याच्या कज्जेदलालीत त्यांना तसा रसच नव्हता. या काळात त्यांचे लक्ष तत्त्वज्ञान आणि साहित्य इकडे लागले होते.  ‘मालंच' म्हणजे 'उपवन’ या नावाचा त्यांच्या कवितांचा संग्रहही प्रकाशित झाला. मोठ्या माणसाच्या मोठेपणाची कधी कधी हीच गंमत असते : आव्हानाशिवाय ते प्रकट होत नाही.

"चाळवले तर इंधन जळते, नाग डिवचता काढि फणा । प्रक्षोभाविण उसळत नाही कोणाचाही चोरपणा ॥"
ज्वलति चलितेन्घतोऽग्निबींप्रकृत: पत्रग फर्णा कुरुते । प्रायः स्वं महिमानं क्षोभाद्धी प्रतिपद्यते जन्तु॥

हे कालिदासाचे वचन यथार्थच आहे.

1905 साली कर्झनशाहीचे थैमान सुरु झाले. बंगालची फाळणी झाली. बंगाल तर पेटून उठलाच, पण सारा भारतवर्ष संघर्षासाठी सिद्ध झाला.

विद्यापीठे ? गुलामखाने

कित्येक वर्ष जडावलेल्या आपल्या पापण्या चित्तरंजनबाबूंनी उघडल्या मात्र त्यांना समकालीन परिस्थितीचे विलक्षण दर्शन घडले. फाळणी होणार ही घोषणा झाली. 6 आणि 7 ऑगस्ट 1905 रोजी कलकत्याच्या विराट निषेधसभेत परदेशी मालावरील बहिष्काराचा पुकारा झाला. 16 ऑक्टोबरला बंगालच्या दोन्ही खंडांनी एकता दिन साजरा केला! सर्वत्र सभा होऊन ब्रिटिश कापडाची जिथे तिथे होळी पेटवण्यात आली. तरुणांनी शाळा-कॉलेजांवर बहिष्कार टाकला. विद्यापीठाला गुलामखाना अशी पदवी मिळाली. राष्ट्रीय शिक्षणाचे आराखडे प्रसिद्ध झाले. ही फाळणी रद्द करवून घेऊच अशी प्रतिज्ञा लक्षावधी लोकांनी घेतली. साहित्यातून देशभक्तांची जिवंत आणि ज्वलंत चित्रे प्रसिद्ध होऊ लागली. 

बंकिमचंद्रांनी ‘आनंदमठ' ही कादंबरी वास्तविक पुष्कळच आधी लिहिलेली होती.

पण आता तिचे महत्व पटले, तिचे अनुवाद होऊ लागले. आवृत्यांवर आवृत्या निघाल्या. कादंबरीतील 'वंदे मातरम्' या गीताला राष्ट्रगीताची प्रतिष्ठा मिळाली. 

ब्रिटिश सरकारच्या दडपशाहीचा वरवंटाही फिरू लागला. लॉर्ड कर्झनने, भारतीयांना सत्याची चाड नाही, ते खोटारडे असतात इत्यादी तारे तोडले या सर्व जुलमाविरुद्ध तीव्र प्रतिक्रिया व्हावी हे स्वाभाविकच होते. दडपशाही वाढली की भूमिगत कट सुरु होतात. बंगालमध्ये सशस्त्र क्रांतिकारक तरुणांचे जथे तयार होऊ लागले. यातून पुढे खुदीराम बोस यांनी मुझफ्फरपूरला बॉम्ब टाकल्याचे निमित्त होऊन प्रसिद्ध माणिकतोला बाँम्ब केस उभी राहिली. अरविंद घोष व त्यांचे  बंधू प्रभुति क्रांतीकारकांविरुद्ध राजद्रोहाचा खटला उभा राहिला.

कर्तुत्वाला प्रबळ आव्हान

चित्तरंजन दास यांच्या कर्तुत्वाला पहिले प्रबळ आव्हान मिळाले ते इथे! आपले सारे कौशल्य पणाला लावून, अरविदांचे वकील म्हणून ते काम पाहू लागले. अरविदांचा त्यांनी केलेला बचाव इतका प्रभावी ठरला की बीचक्रॉफ्टसारख्या इंग्रज न्यायाधीशाने त्यांना निर्दोषी ठरवले. त्यांच्या बंधूंना फाशीची शिक्षा झाली आणि इतरही आरोपींना कमी अधिक कडक शिक्षा झाल्या, परंतु चित्तरंजन बाबूंनी अपिलात याही शिक्षा सौम्य करून घेतल्याच.

अरविंदांचे चित्तरंजन यांनी केलेले वर्णन म्हणजे एक भविष्यवाणीच होती. ते म्हणाले : "संघर्षाची धूळ खाली बसेल, शांती आणि स्वस्थतेचे दिवस येतील. आंदोलने समाप्त होतील आणि बहुधा आपली जीवितयात्राही अरविदांनी संपवलेली असेल तेव्हा 'स्वदेश प्रेमाचा उद्गाता' म्हणून लोक त्यांचा जयजयकार करतील. राष्ट्रवादाचा द्रष्टा पुरुष आणि महान मानवताप्रेमी असा त्यांचा गौरव होईल त्यांची वाणी भारतातच नव्हे तर पंचखंडात दुमदुमत राहील. लक्षात ठेवा, हा पुरुषोत्तम केवळ या न्यायासनासमोर उभा नाही, हा इतिहासाच्या अत्युच्च पीठासमोर उभा आहे."

स्वार्थत्यागाचा आदर्श

या खटल्यानंतर निष्णात कायदेपंडित, सत्यासाठी स्वाभिमानाने, निरलसपणाने झगडणारा माणूस आणि प्रभावी वक्ता अशी चित्तरंजन बाबूंची देशभर ख्याती झाली. यांनी आपले वकीलपत्र घ्यावे म्हणून झिम्मड उडाली. 1917, 18, 19 या तीन वर्षांत त्यांची प्राप्ती दरसाल तीन लाख रुपये होती! 1920 मध्ये तर ती सहा लाखांवर गेली. खरे म्हणजे चित्तरंजनबाबू आणि त्यांचे वडील 1906 साली नादार ठरले होते. 1913 मध्ये हा कलंक त्यांनी धुवून टाकला. आणि 1924 मध्ये तर आपली जवळजवळ सर्व संपत्ती त्यांनी राष्ट्राला दान करून अत्युच्च स्वार्थ त्यागाचा एक आदर्शच घालून दिला.

1917 साली बंगालच्या प्रांतीय परिषदेच्या अध्यक्षाचे पद स्वीकारून देशबंधू दासांनी राजकारणाच्या मुख्य प्रवाहात उडी घेतली. परिस्थितीचे अचूक विश्लेषण, समर्थ भाषा आणि प्रभावी वक्तृत्व यांमुळे त्यांनी हे अधिवेशन जिंकून टाकले.
माँटेग्यू चेम्सफर्ड यांनी आणलेल्या सुधारणांच्या मसुद्यावर देशभर गरमनरम चर्चा सुरू होती. सुरेंद्रनाथ बॅनर्जीच्या मवाळ नेतृत्वावर बंगाली युवक नाराज होते. टिळक - चित्तरंजन दास ही जहाल जोडी त्यांना प्रिय होती. माँटेग्यू मिशनपुढे साक्ष देण्यासाठी बोलावले असता देशबंधू दासांनी इतकी खंबीर भूमिका घेतली आणि इतकी स्पष्ट भाषा वापरली की माँटेग्यू आणि त्यांचे सहकारी चक्क होऊन गेले! 

स्वराज्याची मागणी करताना सैन्य, आरमार आणि रेल्वे सोडून बाकी यच्चयावत क्षेत्रांत भारतीयांच्या हाती सर्व सत्ता सोपवावी असे त्यांनी सांगितले. प्रांतीय परिषदेचे बंगाली भाषण तयार झाल्यावर त्याचा इंग्रजी अनुवाद करण्यासाठी त्यांनी आपल्या एका मित्राकडे दिले. त्या मित्राला इंग्रज पोलिस कमिशनरने बोलावून नेले, पण देशबंधू गडबडले नाहीत. मात्र त्यांनी अत्यंत विधायक कार्यक्रम देशापुढे ठेवला. त्यांच्या या भाषणातील विचार पाहिले की पुढे गांधीजींच्या कार्यक्रमाबद्दल त्यांना कशी समरसता वाटली असेल ते लक्षात येते.

भारतीयांनी आपली विचारसरणी भारतीय परंपरेनुसार आणि भारतीय परिस्थितीला अनुलक्षून घडवली पाहिजे हे सांगून त्यांनी देशापुढ जो कार्यक्रम ठेवला त्यात पाश्चात्य पद्धतीचे औद्योगीकरण टाळणे, खेड्यांची उपासमार करून शहरातील गर्दी वाढवण्याचा मामला बंद करणे, ग्रामपुनर्रचना करणे, शेतकऱ्यांना हस्तव्यवसायाची जोड मिळवून देणे, छोट्या उद्योगधंद्यांना उत्तेजन देणे, विदेशी माल शक्य तो न वापरणे आणि देशी उद्योगांसाठी भांडवल पुरवठा करणे या गोष्टींचा समावेश होता. शिक्षण जीवनाभिमुख करण्याविषयी त्यांनी आग्रह धरला होताच, पण ते राष्ट्रीय अस्मितेला पोषक असावे आणि मातृभाषेतूनच दिले जावे याही सूचना त्यांनी दिल्या होत्या.

देशबंधू मैदानात उतरले. प्रत्येक काँग्रेस अधिवेशनात ते पुढाकाराने भाग घेऊ लागले. पूर्ण स्वातंत्र्याची मागणी करू लागले. इंग्लड आणि भारत या दोषांच्या कल्याणासाठी भारताला स्वराज्य हवे आहे हे स्पष्ट करताना ते म्हणाले :

"सुलतानशाही कितीही सदिच्छा बाळगणारी किंवा तोशीश सोसणारी असली तरी भीती हे तिचे अधिष्ठान असते. ती तशी असहाय, लहरी, बेजबाबदार आाणि दुबळी असते. ज्यांच्यावर सत्ता गाजवायची त्यांच्या पाठिंब्याची खात्री नसल्यामुळे ती जुलूम जबरदस्तीचा आश्रय घेते. नुसत्या कायदेबाजीवर राज्य चालत नसते. धाक दाखवून चारित्र्य निर्माण होत नाही. व्यक्तिमत्त्व आणि विविधता नष्ट करणाऱ्या सुराज्याहून स्वराज्य श्रेष्ठ आहे. स्वराज्यात चूक करण्याचाही अधिकार अभिप्रेत असतो. पण तरीही स्वाभाविक सामर्थ्यावर आधारलेले स्वराज्य केव्हाही अधिक स्वागतार्ह आहे."

व्याख्येपलिकडला शब्द

1921 च्या कांग्रेस अधिवेशनात स्वराज्याची व्याख्या करण्याचा आग्रह अध्यक्ष बिपिनचंद्र पाल यांनी धरला. तेव्हा देशबंधूनी ठणकावून सांगितले की हा शब्द व्याख्येच्या पलीकडे आहे! स्वराज्य म्हणजे स्वराज्य. स्वराज्य म्हणजे राष्ट्रीय मनाचा मुक्त आविष्कार. आजच्या सर्व भारतीय समस्यांची मूलभूत समस्या स्वराज्यप्राप्तीची आहे. 

याच अधिवेशनात त्यांनी गांधीजीसारखाच आणखी एक नवा विचार मांडला.

प्रांतिक स्वायत्तता किंवा केंद्र सरकारमध्ये स्थान मिळणे यांपेक्षाही आपल्याला अधिक महत्त्व वाटते ते ग्रामस्वराज्याचे असे त्यांनी सांगितले. 1917 ते 1925 या काळातील आठ वर्षांच्या प्रभावी राजकीय नेतृत्वात चित्तरंजनबाबूंची संपन्न गुणवत्ता सतत प्रकट होत राहिली. कलकत्याच्या टाउन हॉलमध्ये 1918 साली भारत संरक्षण कायद्याचा कडक निषेध करणारे भाषण त्यांनी केले. रौलेट कायद्याविरुद्ध झालेल्या प्रचंड उठावात ते मनोभावे सामील झाले. जालियनवाला बागेच्या हत्याकांडाची चौकशी करणाऱ्या बिनसरकारी चौकशी कमिटीचे सदस्य म्हणून त्यांनी बहुमोल कामगिरी केली. 1919 साली कलकत्याच्या मैदानात महात्मा गांधींनी सत्याग्रहाची कल्पना मांडली तिला त्यांनी पाठिंबा दिला.

...ते कापुरुषाचे लक्षण

प्रत्यक्ष असहकाराचा लढा 1920 च्या मार्च मध्ये सुरू झाला. 4. सप्टेंबरला लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या कांग्रेसच्या स्पेशल अधिवेशनात मात्र त्यांनी या असहकार मोहिमेला विरोध केला. त्यांच्या मनाची ही दोलायमान अवस्था दोन महिन्यांत संपली. इतकेच नव्हे तर लगोलग भरलेल्या नागपूर कांग्रेसमध्ये त्यांनीच असहकाराचा ठराव मांडला. आता त्यांना उसंत नव्हती. हातचे राखून राजकारण खेळणे त्यांना कापुरुषाचे लक्षण वाटे.

एकोणीसशे एकवीसच्या जानेवारीत आपल्या महिना 50,000 रुपयांच्या बॅरिस्टरीवर त्यांनी लाथ मारली. मग बंगाल-आसामचा झंझावाती दौरा केला. ढाक्क्याला राष्ट्रीय विद्यापीठाची स्थापना केली. मैमनसिंग जिल्ह्याच्या कलेक्टरने त्यांच्यावर प्रवेशबंदीचा हुकुम बजावला.

पुढे तर जुलूम दडपशाहीचे थैमान सुरू झाले. स्वयंसेवक संस्था आणि जाहीर सभा यांवर सरकारने बंदी घातली. काँग्रेसने या अन्यायाविरुद्ध दंड थोपटले. खिलाफत कमिटीने काँग्रेसशी हातमिळवणी केली. बंगालमधील चळवळीचे सर्वाधिकार देशबंधूंवर सोपवण्यात आले. त्यांनी जाहिरनाम्यांचा पाऊस पाडला. दहा लाख तरुणांचे स्वयंसेवक दल उभारण्याचा संकल्प सोडला.

सरकारने जाहीरनामे जप्त केले. स्वयंसेवक दले बेकायदा ठरवली. देशबंधू डगमगले नाहीत. त्यांच्या मुलालाच काय पण पत्नीला, बहिणीला, घरच्या आप्त स्त्रियांना अटक झाली. 25 डिसेंबर 1921 ला दिल्लीच्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती. पण 15 दिवस आधी सरकारने त्यांना अटक केली. म्हणून हकीम अजमलखान अध्यक्ष झाले.

तेवढ्यात ब्रिटनचे युवराज कलकत्त्यात अवतरले. कलकत्यात कडकडीत हरताळ पडला. 1922 च्या जानेवारीमध्ये देशबंधूंना 6 महिने कारावासाची सजा ठोठावण्यात आली. या शिक्षेतून ते सुटल्यावर त्या वर्षीच्या गया कांग्रेसच्या अध्यक्षपदी त्यांचीच निवड झाली. पुढे कौन्सिलप्रवेशाच्या राजकारणाचा प्रयोग करावयास गांधीजींनी संमती दिली तेव्हा भल्याभल्या मवाळांचा पराभव करून देशबंधु विजयी झाले. लॉर्ड लिटनने त्यांना मंत्रिमंडळ बनवायला पाचारण केले ते त्यांनी साफ धुडकावून लावले.

अशा झंझावाती आयुष्याला दीर्घतेचे वरदान कोठून असणार? चित्तरंजनबाबूंनी दार्जिलींगला कांचनगंगेच्या छायेत 'स्टेप असाइड’ नावाचे घर बांधले होते. 16 जून 1925 ला गर्दीपासून दूर असलेल्या या शांत स्थळी त्यांना मृत्यूने गाठले.

पण गर्दी त्यांना सोडणार नव्हती. अभूतपूर्व प्रचंड अंत्ययात्रेत लाखो लोकांच्या साधू डोळ्यांनी देशबंधूंना निरोप दिला. महात्मा गांधींचे देशबंधूंवर अपार प्रेम होते. विरोधी मतांचा कडवा आग्रह धरतानाही दोषांच्या स्नेहाला कधी तडा गेला नाही.

देशबंधूंनी आपली संपत्ती राष्ट्राला दान दिलीच होती त्यांत गांधीजींच्या प्रेरणेने दहा लाखांची भर जनतेने घातली आणि कलकत्यातील दीनदुबळ्यांसाठी एक मोठे इस्पितळ उभे राहिले. आपण आशा करूया की अशा थोर पुरुषाचे स्मरण आपल्याला सतत स्फुरण देईल. देशबंधू कधी देशाला विसरले नाहीत. देश देशबंधूना कधी विसरेल काय?

Tags: माँटेग्यू चेम्सफर्ड लॉर्ड कर्झन बंकिमचंद्र बंगाल चित्तरंजन दास टिळक कलकत्ता जालियानवाला बाग स्वातंत्र्य कॉंग्रेस गांधीजी रौलट कायदा Montague Chelmsford Lord Carsen Bankim Chandra Tilak Kolkata Bengal Chittranjan Das Jallianwala Bagh Freedom Congress Gandhiji Rowlett act weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके