डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं...!’

प्रेमाची स्वतःची अशी एक क्षमता आहे. ती क्षमता वाढत जाते. सतत प्रेम करत राहणारा माणूस निराश होऊच शकत नाही. माझ्यावर कोण किती प्रेम करतोय यावर जर एखाद्याचं समाधान अवलंबून असेल तर ते प्रेम फार तकलादू व प्लॅस्टिक प्रेम आहे असं समजावं. यापेक्षा मी किती प्रेम करू शकतो हे महत्त्वाचं आहे. याचबरोबर प्रेम जेव्हा अधिकारी बनायला लागतं तेव्हा समस्या सुरू होतात. प्रेम व्यक्त करायला योग्य माध्यम मिळालं तर ते समृद्ध होण्याची शक्यता अधिक.

13 फेब्रुवारी 1999, व्हॅलेंटाइन दिवसाच्या आधीची सोनेरी सायंकाळ. मराठवाडा मित्रमंडळ संस्थेच्या प्रसन्न परिसरात कार्यकर्त्यांची कार्यक्रमापूर्वीची लगबग, तयारी सुरू होती. व्यासपीठावरील निळ्या पडद्यावर 'सृष्टी' आणि 'साहिल' या दोन आयोजक संस्थांची नावं पांढऱ्याशुभ्र रंगात विराजमान झाली होती आणि बाजूला रंगीबेरंगी ओढण्या वापरून तयार केलेली फुलपाखरं आसमंतात झेपावत होती. या सगळ्या कल्पक सजावटीकडे बघत निरनिराळ्या कॉलेजांतील युवक-युवती चेहेऱ्यावर बेफिकिरी, कुतूहल, संशय, उत्साह यांच्या नानाविध छटा बाळगत घोळक्याघोळक्याने कार्यक्रमस्थळी जमा होत होती.

बघता बघता निरनिराळ्या रंगांची, पेहरावांची. वयांची, भावभावनांची उत्स्फूर्त कारंजी उसळायला लागली आणि साऱ्या आसमंतात तरुणाईची स्पंदनं उत्फुल्लपणे जाणवायला लागली. खास व्हॅलेंटाइन दिवसाच्या निमित्तानं आयोजिलेल्या ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं...' या विषयावरच्या दिलखुलास संवादात डॉ. मोहन आगाशे आणि श्री. सुधीर गाडगीळ यांसारख्या मान्यवरांचा विशेष सहभाग असल्यामुळे या कार्यक्रमास सर्वच वयाच्या पुणेकरांनी उदंड प्रतिसाद दिला.

'व्हॅलेंटाइन डे'च्या निमित्तानं आपण युवकांसाठी काही खास कार्यक्रम येऊ या, ही कल्पना मुळात टिळक रोडवरच्या साहिल शोरूमचे तरुण मालक श्री. नितिन नाईक यांची. गेल्या चार-पाच वर्षांत व्हॅलेंटाइन डे आणि तो साजरा करण्याच्या विविध पद्धर्तीचे तरुणांमधलं वाढतं महत्त्व आणि प्रभाव लक्षात घेता ही कल्पना 'सृष्टी'तल्या सर्वांनीच मनापासून उचलून धरती आणि तरुणांना सदैवच जवळच्या वाटणाऱ्या ‘प्रेम’ या सदाबहार विषयावरच एक मनमोकळा संवाद आयोजित करण्याचं ठरलं. सुरुवातीला मराठवाडा मित्रमंडळ संस्थेच्या वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. भाऊसाहेब जाधव यांच्या प्रास्ताविकानंतर डॉ. संज्योत देशपांडे यांनी हा कार्यक्रम आयोजिण्यामागची सृष्टीची भूमिका आणि संस्थेतर्फे लवकरच सुरू होणाऱ्या युवा संवाद केन्द्राची माहिती उपस्थितांना दिली. प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी 'मित्रांनो आणि डॉ. मोहन आगाशे यांच्या सर्व मैत्रिणींनो..’ अशी सुरुवात करून पत्रकारिता व प्रेम या विषयावर बोलताना प्रेयसी कशी स्तंभलेखनासारखी असते हे सांगितलं. 

ते म्हणाले की दोन्ही मिळवण्यासाठी खूप वाट पाहावी लागते. कधी मिळेल याची उत्सुकता असते. कोणाला मिळेल याच्यामध्ये चढाओढही असते. मिळाल्यावर आनंद वाटतो. रोजच्या रोज कॉलम काय किंवा प्रेयसी काय, तिच्याबरोबर नातं ताजंतवानं ठेवण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या काढल्या जातात. हळूहळू कंटाळा यायला लागतो. प्रतिपक्षाकडून 'नाही' म्हटलं गेलं तर बरं होईल असं मनात येऊन जातं म्हटल्यानंतर सुटल्यासारखं वाटतं! यानंतर ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज आणि मंगेश पाडगावकर यांच्या अनुक्रमे 'प्रेम कुणावर करावं?' आणि 'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं...' या दोन कविता सादर करून सुधीर गाडगीळ यांनी सर्वांना बरोबर घेऊन प्रेमाच्या दालनात प्रवेश केला.

प्रेमाच्या दालनात प्रवेश केला खरा! पण त्याबद्दल बोलताना जिथे भल्याभल्यांची भंबेरी उडते तिथे सतलज दिघे या महाविद्यालयीन युवतीनं मात्र तिच्या उत्स्फूर्त आणि नेमक्या मांडणीनं सर्वांचीच मनोमन दाद मिळवली. सतलज ही फर्ग्युसन कॉलेजात शिकणारी एक हरहुन्नरी तरुणी. ‘सृष्टी’चे संस्थापक श्री. प्रशांत कोठडिया यांच्या विनंतीवरून प्रेमाबद्दल तरुण पिढीचं मनोगत व्यक्त करायला माणून जेव्हा ही किरकोळ चणीची छोटीशी मुलगी बोलायला उठली तेव्हा तिच्या बोलण्याबद्दलच्या अपार कुतूहलामुळे असंख्य नजरा तिच्यावर रोखल्या गेल्या होत्या, 'पण ती आली... ती बोलली.. आणि तिनं जिंकलं.....’ असंच सतलजबद्दल म्हणायला पाहिजे. सध्याच्या तरुणाईची स्पंदनं तिनं इतकी अचूकपणे टिपली होती की उपस्थितांनी वेळोवेळी टाळ्यांच्या गजरात तिला दिलखुलास दाद दिली. सतलजनं सुरुवातच अशी केली की युवा पिढीच्या वतीनं मी बोलणार म्हणून मागच्या पिढीनं फार काही वेगळ्या अपेक्षेनं माझ्याकडे बघू नये. कारण 'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं आणि तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं!' तुम्हांला त्या वेळी जे वाटलं, जी ओढ, आकर्षण, विरह, व्यथा, वेदना तुम्ही सहन केल्यात त्याच सर्व आम्हीदेखील करतो. प्रेम ही एक अभिजात, शाश्चत संकल्पना असून काळानुसार, पिढीनुसार बदलत जातात त्या फक्त प्रेम करायच्या पद्धती.

आमची पिढी गतिमान आहे आणि सर्वच गोष्टी तिला ‘फास्ट’ हव्या असतात, आम्ही टेन्शन लवकर घेतो, परीक्षा लवकर देतो, तसंच प्रेमातही लवकर पडतो! आमच्या पिढीचे प्रेम उथळ, चिल्लर वगैरे अजिबात नाही. उत्तट ते अतिशय डोळस व नीट पारखून केलेलं असतं. भारतीय संस्कृतीचा प्रभाव आमच्यावरही आहे अशी मिस्कील कोपरखळी मारून सतलज पुढे म्हणाली की, त्यामुळेच नातेसंबंध जपण्याचा व टिकवण्याचा आमचा प्रयत्न असतो. 'लव्ह इज नॉट ब्लाइंड' हे आमच्या पिढीचं ब्रीदवाक्य आहे. प्रेमाचा प्रस्ताव ठेवणाऱ्या मुलाचे वय, जात, शिक्षण, आर्थिक स्थिती व घरातील व्यक्ती यांविषयीची संपूर्ण माहिती घेऊन त्यावर विचार करूनव माझी पिढी तो प्रस्ताव स्वीकारायचा किंवा कसे, याचा विचार करते. ‘लव्ह इज नॉट अवर लाइफटाइम कमिटमेंट’, ‘पुढे जाणं हे आमच्या पिढीसाठी फार महत्त्वाचं आहे’, ‘आमच्या ऐपतीप्रमाणे परवडेल आणि झेपेल असंच प्रेम आम्ही करतो’.

‘स्पर्धेच्या युगात मित्रमैत्रिणी कमी होत जातात’, ‘कॉलेजमध्ये आम्हांला बॉयफ्रेन्ड/गर्लफ्रेन्ड असणं अत्यंत मानाचं, गरजेचं समजलं जातं आणि ते जर नसेल तर आमच्यात काही कमी आहे असं आम्हांला वाटतं. 'कॉम्प्लेक्स' येतो’, ‘प्रेमात आम्हांला न आवडणारी एकच गोष्ट व ती म्हणजे बंधन,’ ‘आमची पिढी व्यक्तिस्वातंत्र्यावरच तर पोसली गेली आहे’. या आणि अशा इतर अनेक वाक्यांद्वारे सतलजनं सध्याच्या युवा पिढीच्या भावविश्वाचा बहुरंगी पोत सर्वांसमोर उलगडला. आमच्या पिढीची 'प्रेम' ही ‘डेस्परेट नीड’ आहे, असं सांगून सतलजने युवकांची दुखरी नस बरोबर पकडली. ती म्हणाली की, आमच्या पिढीला, सध्याच्या स्पर्धेनं वेढलेल्या वातावरणात एकटेपणानं ग्रासलं आहे.

दुर्दैवानं मुलं आणि पालक यांच्यामध्ये पूर्ण संवाद सगळीकडे असतोच असं नाही. आपल्या सर्व समस्या मुलं पालकांसमोर मांडू शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आपल्याला पाहिजे तसा, हवा तसा मानसिक आधार देणाऱ्या, हक्कानं सुखदुःखाच्या गोष्टी करू शकणाऱ्या, आपल्याला समजून घेऊ शकणाऱ्या मित्राची वा मैत्रिणीची गरज आम्हांला भासते. हक्काचा मित्र असण्याची गरज पूर्वीच्या मुलींना एवढी भासली नसेल कदाचित, पण आम्ही मुली अधिक मोठ्या प्रमाणावर घराबाहेर वावरतोय. बाहेरच्या जगाबरोबर 'डील' करायचा प्रयत्न करतोय. त्यामुळे आम्हांला ही गरज फार मोठ्या प्रमाणावर जाणवतेय. शेवटी आमच्या इतर नात्यांनी जर आमच्या भावनिक गरजा पूर्ण करून आम्हांला मानसिक आधार आणि पाठिंबा दिला तर आम्ही आमचं प्रेम-आयुष्य अधिक सुंदर आणि समृद्धपणे आम्ही जगू शकू; असा आशावादी विचार मांडून सतलजन तिचं मनोगत संपवलं. 

सतलजच्या प्रभावी मांडणीनंतर प्रमुख पाहुणे प्रसिद्ध अभिनेते आणि मनोविकारतज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे, प्रेम या विषयावर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. प्रेम ही केवळ विशिष्ट वयातील अवस्था नसून त्याकडे मर्यादित स्वरूपात न बघता थोडं व्यापक दृष्टीनं पाहिलं पाहिजे, हा मुद्दा त्यांनी मांडला. 'आमच्या पिढीला प्रेम ही चोरून करण्याची गोष्ट,’ हे वारंवार बजावलेलं किंबहुना ती करायचीच नसते हेच मनावर बिंबवलेलं असायचं. त्यामुळे प्रेम व्यक्त करण्याचे मार्गही सहजपणे उपलब्ध नव्हते, असं ते म्हणाले.

प्रेम ही अंतर्मनातली गोष्ट आहे. प्रेम आणि शरीरसंबंध या दोन अगदी वेगळ्या गोष्टी आहेत. खूपदा आपल्याकडे सर्व जगण्याचा अर्थ अगदी प्रेमासकट, शरीरापुरता मर्यादित केला जातो आणि त्याच्यामुळे बरेचसे घोटाळे होतात असं सांगून डॉ. आगाशे म्हणाले, ‘‘अलीकडे युवकांची या संदर्भात एक वेगळीच समस्या झाली आहे. संबंध ठेवण्याची नैसर्गिक गरज शरीरात निर्माण होण्याचा काळ आणि या संबंधांना सामाजिक मान्यता मिळण्याचा काळ, यांमध्ये प्रचंड मोठी दरी असते. हल्ली होतंय काय की एकीकडे ही नैसर्गिक गरज मान्य करायची आणि दुसरीकडे ही गरज भागवण्याचा समाजमान्य मार्ग म्हणजे लग्न आणि ते मात्र 25 नंतर करा म्हणायचं, मग तोपर्यंत करायचं काय?"

प्रेमाची स्वतःची अशी एक क्षमता आहे. ती क्षमता वाढत जाते. सतत प्रेम करत राहणारा माणूस निराश होऊच शकत नाही. माझ्यावर कोण किती प्रेम करतोय यावर जर एखाद्याचं समाधान अवलंबून असेल तर ते प्रेम फार तकलादू व प्लॅस्टिक प्रेम आहे असं समजावं. यापेक्षा मी किती प्रेम करू शकतो हे महत्त्वाचं आहे. याचबरोबर प्रेम जेव्हा अधिकारी बनायला लागतं तेव्हा समस्या सुरू होतात. प्रेम व्यक्त करायला योग्य माध्यम मिळालं तर ते समृद्ध होण्याची शक्यता अधिक असं सांगून डॉ. आगाशे यांनी मागची पिढी आणि सध्याची तरुण पिढी यांच्या विचार आणि अभिव्यक्तीतील फरकांकडे, बदललेल्या परिस्थितीकडे निर्देश केला.

'तरुण पिढी मोकळेपणानं, समजूतदारपणानं बोलते. खूप प्रगल्भ आहे. पूर्वी माहिती न देण्याचीच अथवा लपवण्याचीच आपली परंपरा होती. जाणिवा प्रगल्भ करायच्या असतील तर मुलांपासून गोष्टी लपवून ते होणार नाही. टी.ही. बंद करून पाहिजे ते संस्कार करताच येणार नाहीत. आजच्या तरुण पिढीनं प्रेम नावाची कल्पना केवळ भावनिक पातळीवर अजिबात ठेवलेली नाही. 'कॉग्नीटिव्ह फिल्टर्स' लावूनच ही मंडळी त्यांचं प्रेम बाहेर काढतात. ही भावनिक पातळीवरची वाटणारी गोष्ट त्यांच्या सर्व बौद्धिक गाळण्यांमधून सरकून खालती उरली तरच त्यांच्या दृष्टीनं करण्याची गोष्ट आहे. प्रसारमाध्यमांच्या गती आणि व्याप्तीमुळे तंत्रज्ञान, माहिती आणि ज्ञान विपुल प्रमाणावर युवकांपर्यंत पोचत असल्यामुळे या पिढीला आधीची पिढी मार्गदर्शन करू शकेल अशी क्षमताच आमच्या पिढीत नाही,’ असेही डॉ. आगाशे म्हणाले. शेवटी बोलण्याची नसली तरी प्रेम ही गंभीरपणे करण्याची गोष्ट आहे असं मी मानतो. वयाच्या मर्यादा ओलांडून प्रेम वाढू शकले तरच ते अधिक समृद्ध व खुलून दिसणारे होऊ शकते, असे सांगून डॉ. आगाशे यांनी त्यांच्या मनोगताचा समारोप केला.

Tags: प्रेम व्यक्त करण्याची पद्धत तरुण पिढी व्याख्या प्रेम मोहन आगाशे सुधीर गाडगीळ व्हॅलेंटाइन डे प्रासंगिक method to expose love young generation definition love mohan aagashe sudhir gadgil valentine day occasional weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके