डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

स्त्री-मुक्ती, स्त्री-वाद या संकल्पना पाश्चात्य देशांकडून आपल्याकडे आलेल्या आहेत, हा आरोप इथल्या स्त्री-मुक्ती चळवळीवर सततच करण्यात आला. ‘बया’नं आपल्याच मातीतल्या स्त्रियांच्या रचना नाटक या माध्यमातून जनसामान्यांपुढे आणून या आरोपाला एक खणखणीत उत्तर दिलं आहे. जगभराचे इतिहास लिहिताना स्त्रियांचं लेखन, कर्तृत्व हेतूपुरस्सरच दुर्लक्षित ठेवण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर तर 13 व्या शतकापासून स्वत:च्या मुक्तीच्या कल्पना धाडसानं मांडणाऱ्या या सर्वसामान्य स्त्रियांची कामगिरी झळाळून उठते. विशेष म्हणजे या सर्व स्त्रिया निरक्षर होत्या. त्यामुळे काळाच्या उदरात यातल्या किती रचना आपण हरवून बसलो आहोत, याची तर मोजदादच नाही. 

आविष्कारनिर्मित ‘बया, दार उघड’नं अनेक गोष्टी साध्य आणि सिध्द केल्या. एकपात्रीच्या पलीकडे जाऊन, कलाकार म्हणून स्वत:ला नाटकातून पूर्णत: वगळून एक उत्तम संहिता लिहून एका ‘अनन्य’ नाटकाचं समर्थ दिग्दर्शन ती करू शकते, हे सुषमानं ‘बया’द्वारे सप्रमाणच सिध्द केलं. गंमत म्हणजे सुषमा या नाटकात कलाकार म्हणून जरी रंगमंचावर नसली तरी नाटकभर तिचं अस्तित्व आपल्याला जाणवत राहतं. मग ते तिनं बसवलेले नाथांचे खेळ असोत; कान्होपात्रेनं विठ्ठलचरणी अर्पण होण्यासाठी फोडलेला आर्त टाहो असो; किंवा स्वत:ला ‘दास‘ म्हणविणाऱ्या; गोदामाईसंदर्भात ‘‘गोदामाई जेंडर मानत नाही राजा’’ सारखं एखादं वाक्य असो! 

एकाच वेळी बहुविध सर्जनशील भूमिका तितक्याच ताकदीनं पेलणाऱ्या अनेक व्यक्ती आपण समाजात पाहतो. सुषमा देशपांडे ही त्यांतलीच एक. निर्भीड पत्रकार, कुशल अभिनेत्री, नाटककार, दिग्दर्शक ही तिची सगळी रूपं जेव्हा त्यांच्या अंतर्गत बळांसकट आपल्यासमोर येतात, तेव्हा आपल्याला थक्कच व्हायला होतं. पण समाजात तर अनेक बहुआयामी व्यक्तिमत्त्वं असतात; मग सुषमाचं वेगळेपण कशात आहे? कुठलंही काम मग ते कितीही छोटं वा मोठं असो, सुषमा ते काम झोकून देऊनच करणार. तिच्या व्यक्तिमत्त्वातच एक झपाटलेपण, एक सळसळणारी ऊर्जा आहे, जी तिच्या प्रत्येक निर्मितीमध्ये आपल्याला आढळते. कदाचित तिची ही अफाट ऊर्जाच तिच्यातलं वेगळेपण असेल. सुषमा जेव्हा कुठल्याही निर्मिती प्रक्रियेमध्ये गुंतलेली असते तेव्हा कुठलीच आर्थिक गणितं तिच्या जवळपास फिरकतही नसतात आणि म्हणूनच तिच्या सर्व कलाकृतींधल्या शुध्दतेला आणि दर्जाला बारीकसासुध्दा ओरखडा उमटलेला आपल्याला आढळत नाही आणि नेमक्या याच गोष्टीमुळे तिची नाटकं आपल्या हृदयाला भिडतात. 

पुण्यात पत्रकारितेचं शिक्षण घेत असतानाच सर्वोत्कृष्ट अभिनयाचं केशवराव दाते पारितोषिक पटकावून सुषमानं पुरुषोत्तम करंडक स्पर्धा गाजवली. याच काळात सुषमानं तिच्या आयुष्यातलं ललित लेखन - काही कथा - स्त्री मासिकात केलं आणि किर्लोस्कर मासिकामध्ये विविध विषयांवर अनेक लेख लिहिले. पत्रकारितेची पदवी मिळवल्यानंतर सुषमा काही काळ मुंबईत स्थिरावली. ‘शोधपत्रकारिता’ हा शब्दप्रयोगही ज्या काळात अस्तित्वात नव्हता (1979-1984) अशा काळी तिनं या सदरात मोडणारे अनेक लेख लिहिले. माळशिरसच्या शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याचं प्रकरण, भूविकास बँकेचे गैरव्यवहार, महाराष्ट्रातली रिमांड होम्स यांसारख्या अनेक प्रकरणांना तिनं तिच्या लेखांद्वारे प्रकाशझोतात आणलं. मुंबईतल्या साप्ताहिक दिनांक आणि पुण्यातल्या किर्लोस्कर या दोन नियतकालिकांत तिनं या प्रकारचं विपुल लेखन केलं. साप्ताहिक ‘दिनांक’मध्ये ती लिहीत असलेल्या ‘पुरुष’ नावाच्या स्तंभानं तर भल्याभल्यांचं लक्ष वेधून घेतलं. दिनकर साक्रीकर यांच्या ‘पूर्वा’ या मासिकाचंही ती काही काळ पूर्ण वेळ काम करत होती. पत्रकारितेचं क्षेत्र एकीकडे गाजवत असतानाच सुषमा ठाण्यामधल्या प्रायोगिक रंगभूीवरही चांगलीच रमली होती. तिनं सादर केलेल्या अनेक भूमिका गाजल्या. आय. एन. टी. चं ‘अबक दुबक तिबक’, कलासरगमचं ‘अंधारयात्रा’ वगैरे. ठाण्यातच तिला विश्वास कणेकरच्या रूपानं तिचा जीवनसाथी मिळाला. 

एक नाटककार म्हणून सुषमाची ओळख खरं तर ‘एक आवश्यक बंड’ या नाटकापासून होते. यानंतर ‘व्हय ! मी सावित्रीबाई’ या नाटकाचं लेखन झालं 1987 साली आणि पहिला प्रयोग झाला 1989 साली. या नाटकानं इतिहास घडवला. सावित्रीमुळे सुषमा जशी महाराष्ट्रात शहरोशहरी खेडोपाडी घराघरांत पोहोचली तशीच ती देश पातळीवरही माहीत झाली. सावित्रीच्या प्रयोगाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आणि सुषमाला अनेक जागतिक नाटय-चर्चासत्रं आणि स्त्री नाटककारांच्या परिषदांची आमंत्रणं आली. परदेशांत सावित्री सादर करताना सुषमाला एक वेगळंच समाधान मिळत होतं. या परदेश प्रवासात जमेल तिथं मराठी भाषिकांसाठी थोडे प्रयोगही तिनं केले. सावित्रीचे आजपर्यंत किती प्रयोग झाले या प्रश्नावर सुषमाचं उत्तर मोठं मजेशीर असतं. 2500 प्रयोगांनंतर तिनं प्रयोग मोजायचंच सोडून दिलं ! 

कालौघात जसजसं सुषमाला नाटक या माध्यमाच्या ताकदीचं पुरेपूर भान आलं, तेव्हापासून तिनं स्वत:च्या मनाशी एक खूणगाठ पक्की बांधली की मला जे जे महत्त्वाचं व्यक्त करावसं वाटतं ते मी नाटकाच्या माध्यमातून प्रभावीपणे करेन. तेव्हापासून ती स्वत:ची ओळख एक ‘नाट्यपत्रकार’ म्हणून अभिमानानं करून देते. याच दिशेनं वाटचाल करायची ठरवल्यानंतर नाटक या माध्यमावरची स्वत:ची हुकमत वाढविण्यासाठी सुषमानं थेट या क्षेत्रातले अध्वर्यू ब्राझिल देशाचे आगस्तो बोल यांचंच शिष्यत्व पत्करलं. ‘थिएटर ऑफ द ऑप्रेस्ड’ ही संकल्पना, ती वेगवेगळ्या सामाजिक घटकांबरोबर, चळवळींबरोबर कशी वापरायची याचं शास्त्रशुध्द शिक्षण तिनं आगस्तो बोल यांच्याकडून अमेरिकेत घेतलं. 

कामाच्या बाबतीत तडजोड हा शब्दच मुळी सुषमाच्या लेखी अस्तित्वात नसतो. म्हणूनच कसलेली अभिनेत्री असूनही तिनं अगदी मोजक्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या (उंबरठा, बलुतं, बनगरवाडी, दोन गणपतरावांची गोष्ट वगैरे) आणि टी.व्ही.कडे तर ती बिलकुलच फिरकली नाही ! कारणं तर अगदीच उघड आहेत. एखादी गोष्ट मनापासून पटलेली नसेल तर सुषमा ती करूच शकत नाही; मग भले त्या कामातून तिचा कितीही आर्थिक फायदा होणार असला तरीही.

‘तिच्या आईची गोष्ट अर्थात माझ्या आठवणींचा फड’ तमासगीर स्त्री कलावंतांच्या आयुष्याचा वेध घेणारं हे नाटक अंतिमत: 1993 साली लिहून पूर्ण झालं. हे नाटक  सादर करणं सर्वार्थानं एक आव्हान होतं. लेखन, दिग्दर्शन, अभिनय, नृत्य आणि संगीत या सर्वच आघाड्या सुषमाला या एकपात्री प्रयोगात सांभाळायच्या होत्या. ‘सावित्री’ सारखाच हा देखील प्रयोग एकपात्रीच होता. पण या नाटकाचा पोत आणि बाज ‘सावित्री’पेक्षा खूप वेगळा होता. यामध्ये लेखन, दिग्दर्शन आणि अभिनयाच्या जोडीला संगीत आणि माफक नृत्यही होतं. प्रयोगासाठी आवश्यक ते नृत्यही तिनं या दरम्यान शिकून घेतलं. या नाटकासाठी प्रत्यक्ष संगीत म्हणजे ढोलकीचा वापर प्रत्येक प्रयोगाच्या वेळी करण्याची सुषमाची खूप इच्छा होती. पण ढोलकीवादकांच्या बेशिस्तीच्या नाना तऱ्हा आणि सुषमाची वेळेची, तालमीची शिस्त यांचा अजिबात मेळ न बसल्यामुळे शेवटी, ध्वनिमुद्रित संगीत वापरून तिला या आघाडीवर मात्र तडजोड स्वीकारावी लागली. सावित्रीच्या तुलनेत हे नाटक लिहायला आणि सादर करायला खूपच  अवघड होतं आणि सुषमानं हे शिवधनुष्य समर्थपणे पेललंही. पण दुर्दैवानं या प्रयोगाची म्हणावी तशी दखल जाणकारांनीही घेतली नाही. 

सुषमाचं सर्वांत अलीकडंचं नाटक म्हणजे ‘बया, दार उघड’, संत स्त्रियांच्या साहित्यावर संशोधन करून लिहिलेलं. आपल्या बहुतेक संत स्त्रिया किती बंडखोर होत्या या आशयाचा लेख सुषमाच्या वाचनात कुठेतरी आला. विषयाबद्दल कुतूहल वाटल्यामुळे या संदर्भात तिनं अधिक वाचन/चौकशा सुरू केल्या. काही दिवसांतच ‘सकल संत गाथा’ या ग्रंथाचे दोन्ही ठोकळे घरात येऊन विराजमान झाले! त्यानंतर लगेचच प्राचीन मराठी शब्दांचे नेमके अर्थ सांगणाऱ्या शब्दकोशानं घरात मोक्याचं स्थान पटकावलं. सुरुवातीला काही अभंगांचे अर्थ पटकन न लक्षात आल्यामुळे सुषमा अभंग मोठ्यानं वाचायची. या पध्दतीनं वाचल्यास अर्थ समजायला सोपं जातं हे लक्षात आल्यावर याच पध्दतीनं सर्व अभंगांचं वाचन सुरू झालं. त्या काळात संत स्त्रियांनी किती धाडसानं बंडखोरीची भाषा वापरली आहे हे वाचून सुषमा तर चक्रावूनच गेली. मग सुरू झालं या क्षेत्रातल्या अभ्यासकांच्या पुस्तकांचं वाचन - रा. चिं. ढेरे, डॉ. रामचंद्र देखणे, अरुणा ढेरे, गं. बा. सरदार, श्री. वा. ल. मंजूळ आदी. 
जसजसं या संत स्त्रियांच्या रचनांचं सखोल वाचन सुरू झालं तसतसा ‘हे सर्व लोकांसमोर मांडलं पाहिजे’ हा विचार सुषमाच्या डोक्यामध्ये घुमायला लागला. सासरी अतीव दु:ख भोगलेली, चिदंबरस्वामींमध्ये पांडुरंगाचं रूप दिसलेली, जाचक नवऱ्याचा संसार शेवटपर्यंत निभावणारी विठाबाई, तिच्या नवऱ्याला मात्र ठासून सांगते : 

‘‘तुझी सत्ता आहे देहावरती समज, माझेवरी किंचितही नाही.’’ 

किंवा स्वत:ला नाथ संप्रदायातली ‘दास’ म्हणवणारी गोदा सहज बोलून जाते : 

‘‘झाले नि:संग भोग भोगाया हो 
परात्पर पुरुषासी रत झाले अर्पूनिया काया हो 
सांडिली लाज सारा लौकिक हो. 
परात्पर पुरुषासी निजसदनी दिधला थारा हो 
तयाविण न गमे लव पळहि जाता वाया हो 
दूर्लभ हे सूख नरदेहावाचूनी नाही हो.’’ 

स्त्रियांच्या बंडखोरीची अशी किती तरी उदाहरणं सुषमाला तिच्या संशोधनात सापडली. 13 व्या शतकापासून संत स्त्रिया अत्यंत परखडपणे स्वत:च्या आयुष्यावर भाष्य करताना आपल्याला दिसतात. कुठून आली असेल एवढी ताकद त्यांच्यामध्ये? कुठून गोळा केलं असेल बळ त्यांनी असं भाष्य करायला आणि ते सुध्दा ‘त्या’ काळात? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी सुषमानं अनेकांशी चर्चा केल्या. डॉ. रामचंद्र देखणे यांच्याबरोबर अशीच एक दिवस चर्चा करताना सुषमाला एकदम ‘क्लिक’ झालं की या स्त्रियांसाठी ‘विठ्ठल’ हे एक ‘माध्यम’ आहे, व्यक्त होण्याचं! या सर्वच स्त्रियांनी त्यांच्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी ‘विठ्ठल’ या प्रारूपाचा आधार घेतला. त्यांचा प्रश्न काहीही असो, उत्तर ‘विठ्ठल’च आहे! 

2006 - 2007 च्या दरम्यान सुषमाचं नाटक लिहिण्याचं काम पूर्ण झालं. मुंबईतील आविष्कार संस्थेच्या अरुण काकडे यांना ही संहिता इतकी आवडली की आविष्कारतर्फेच या नाटकाचे प्रयोग करायचं नक्की ठरलं. सुरुवातीला चेतन दातारनं या नाटकाचं दिग्दर्शन करायचं असंही ठरलं होतं. दरम्यान चेतनचं दु:खद निधन झालं. या धक्क्यातून सावरून परत या नाटकाकडे वळायला सुषमाकडूनच उशीर होत होता. शेवटी काकडेकाकांनी फर्मानच काढल्यामुळे सुषमा या नाटकाच्या दिग्दर्शनासाठी तयार झाली. चेतनच्या पहिल्या स्मृतीदिनी 2 ऑगस्ट 2010 रोजी नाटकाचा पहिला प्रयोग यशवंत नाटयगृह, मुंबई, येथे सादर झाला.

‘बया, दार उघड’ या नाटकाचे आजपर्यंत 75 प्रयोग झाले आहेत. या नाटकात नेमकं काय हवं हे सुषमाला तालमी सुरू करण्याच्या आधीपासूनच पक्कं माहीत होतं. नाटकाचं संगीत देवदत्त साबळे यांनीच करावं; तसंच प्रत्येक प्रयोगाला साथीदार संगीताची साथ करतील; नाटकातले सर्व कलाकार तरुणच असतील; मुली पंजाबी ड्रेस घालूनच रंगमंचावर वावरतील; त्यांच्याच काठपदराच्या ओढण्यांचा कल्पकतेनं वापर करून त्या जणू नऊवारी लुगडं नेसल्या आहेत असं भासवून, त्या संत स्त्रियांच्या आयुष्यातले प्रसंग सादर करतील, इत्यादी. टाळ मृदुंगाच्या तालावर वारकरी वारीत कसे ‘विठ्ठलमय’ होऊन जातात याचा कलाकारांना थेट अनुभव देण्यासाठी सुषमानं सर्वांना वारीला नेऊन आणलं. सर्वांनी वारकरी खेळत असलेले खेळ पाहिले, रिंगण पाहिलं, त्यांच्या ‘विठ्ठलभक्ती’ची झिंग अनुभवली. एवढंच नव्हे तर हे सर्वजणही हातांत टाळ घेऊन वारीमध्ये मुक्तपणे सहभागी झाले, वारकऱ्यांबरोबर नाचले, खेळले, त्यांच्याशी गप्पा मारल्या. हे सर्व अनुभवल्यामुळे प्रयोगात ‘वारी’ या संकल्पनेशी एकरूप व्हायला कलाकारांना मोठीच मदत झाली.

आविष्कारनिर्मित ‘बया, दार उघड’नं अनेक गोष्टी साध्य आणि सिध्द केल्या. एकपात्रीच्या पलीकडे जाऊन, कलाकार म्हणून स्वत:ला नाटकातून पूर्णत: वगळून एक उत्तम संहिता लिहून एका ‘अनन्य’ नाटकाचं समर्थ दिग्दर्शन ती करू शकते, हे सुषमानं ‘बया’द्वारे सप्रमाणच सिध्द केलं. गंत म्हणजे सुषमा या नाटकात कलाकार म्हणून जरी रंगमंचावर नसली तरी नाटकभर तिचं अस्तित्व आपल्याला जाणवत राहतं. मग ते तिनं बसवलेले नाथांचे खेळ असोत; कान्होपात्रेनं विठ्ठलचरणी अर्पण होण्यासाठी फोडलेला आर्त टाहो असो; किंवा स्वत:ला ‘दास‘ म्हणविणाऱ्या; गोदामाईसंदर्भात ‘‘गोदामाई जेंडर मानत नाही राजा’’ सारखं एखादं वाक्य असो! नाटकाच्या वाक्यावाक्यावर, आविष्काराच्या पावलापावलावर सुषमाची अमीट मुद्रा आपल्याला आढळते. म्हणूनच मुळातल्या बावनकशी संहितेला अफाट चैतन्याची जोड मिळाल्यामुळे वेगळ्याच उंचीवर गेलेला ‘बया’चा रंगमंचीय आविष्कार आपल्यापर्यंत एवढ्या ताकदीनं पोहोचतो. ‘बया’च्या एकूणच सादरीकरणामध्ये तेजस्विनी इंगळे या तरुण गायिकेचा मोठाच वाटा आहे. सर्व स्त्री संतांच्या रचनांमधले भावनिक हिंदोळे, त्यातले चढ-उतार तेजस्विनीनं खूप मेहनतीनं आणि बारकाईनं टिपले आहेत. 

स्त्री-मुक्ती, स्त्री-वाद या संकल्पना पाश्चात्य देशांकडून आपल्याकडे आलेल्या आहेत, हा आरोप इथल्या स्त्री-मुक्ती चळवळीवर सततच करण्यात आला. ‘बया’नं आपल्याच मातीतल्या स्त्रियांच्या रचना नाटक या माध्यमातून जनसामान्यांपुढे आणून या आरोपाला एक खणखणीत उत्तर दिलं आहे. जगभराचे इतिहास लिहिताना स्त्रियांचं लेखन, कर्तृत्व हेतूपुरस्सरच दुर्लक्षित ठेवण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर तर 13 व्या शतकापासून स्वत:च्या मुक्तीच्या कल्पना धाडसानं मांडणाऱ्या या सर्वसामान्य स्त्रियांची कामगिरी झळाळून उठते. विशेष म्हणजे या सर्व स्त्रिया निरक्षर होत्या. त्यामुळे काळाच्या उदरात यांतल्या किती रचना आपण हरवून बसलो आहोत, याची तर मोजदादच नाही. संत चोखोबा जातीनं महार. त्यांची बायको सोयरा त्या काळात स्त्रीची मासिक पाळी हा कसा विटाळ नाही, अपवित्र नाही, या विषयावर स्पष्ट भाष्य करताना आपल्याला आढळते ! 

म्हणजे सर्व जातीतल्या स्त्रिया स्वत:ला अभंगातून व्यक्त करत होत्या. विठ्ठलाच्या चरणी लीन होण्यासाठी यांतल्या काहींनी तर स्वत:ला ‘‘धांगडी’’, ‘‘वेसवा’’ असंही त्यांच्या रचनांमध्ये म्हणवून घेतलं आहे! केवढी ही बंडखोरी ! उगीच नाही मौखिक परंपरेद्वारे का होईना, पण या रचना आपल्या स्त्रियांनी जिवंत ठेवल्या. कारण त्यांतून जीवनाला सामोरं जाण्याचं बळ त्यांनी मिळवलं, ऊर्जा मिळवली. आजच्या काळाचाही विचार करता ‘बया’ची हीच खरी ताकद आहे याचं आत्मभान आल्यामुळेच सुषमाने या रचना नाट्यरूपात आपल्यासमोर आणल्या. कारण तिला ठाम विश्वास वाटतो की आजच्या ‘स्त्री’ला देखील या संत रचना प्रेरणादायी ठरू शकतात. जगण्याची उमेद आणि बळ देऊन ‘स्त्री-मुक्तीचा’ मार्ग दाखवू शकतात. 

Tags: उत्तम दिग्दर्शक महाराष्ट्र फाऊंडेशन विठ्ठल उत्तर प्रश्न अनेक नाटक दिग्दर्शक विठ्ठल स्पष्ट दृष्टीकोन स्पष्ट मते स्त्री संत स्त्री वाद स्त्री मुक्ती ७५ प्रयोग बया दार उघड सुषमा देशपांडे त्या आरोपाला खणखणीत उत्तर लेख उज्वला मेहेंदळे ओळख Maharashtra Fondation Award One Answer Vitthal Drama Writer Director Vitthal Clear Opinion Clear vision Women Saint Women freedom 75 shows Baya Dar Ughad Sushama Deshpande Tya Aropala Ek Khankhanit Uttar Article Ujjwala mehendale Olakh weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके