डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

सीड: समूहजीवनाचे मंगल दर्शन

सीड हे राजस्थानमधील ग्रामदानी गाव. एखाद्या द्रष्ट्या नेत्याचे निःस्वार्थी मार्गदर्शन लाभले म्हणजे गावातील समूहजीवन कसा सुदृढ आकार घेऊ शकते याचे चित्र पुढील लेखात दिसते.
 

मनुष्य सामाजिक प्राणी आहे. समाजालाही एक स्वभाव असतो आणि त्यानुरूप कालप्रवाहासोबत तो विकसित होत असतो. क्रांतीची बीजे चारित्र्यवान समाजातच पेरली जाऊ शकतात. क्रांतिपूरक समाजाची लक्षणे काय असू शकतात, याचा शोध आम्हांला उदयपूर (राजस्थान)पासून 90 कि.मी. दूर असलेल्या सीड गावाला घेऊन गेला.

संकल्पाची सिद्धी

1979 मध्ये गावातील पुरोहित श्री. रामेश्वरप्रसादजी यांच्या मार्गदर्शनाने गावाचा ग्रामदानाचा संकल्प साकार झाला. रावत समाजाचे हे गाव भिल्ल झाले, या अफवेने या संकल्पाला पहिले ग्रहण लागले. आसपासच्या रावत समाजाच्या लोकांनी सामाजिक बहिष्काराची धमकी दिली. ग्रामसभेने या बहिष्काराला आव्हान दिले. सुदैवाने गैरसमज दूर झाले आणि बहिष्काराची शक्यता टळली. ग्रामदान जाहीर झाले तरी मार्गात अडथळे होतेच. ग्रामदान कायद्यानुसार जल-जंगल-जमिनीबाबतचे अधिकार ग्रामसभेला आपोआपच मिळायला हवेत. परंतु ते मिळविण्यासाठी सीडला ग्रामदान बोर्डाच्या मदतीने उच्च न्यायालयापर्यंत जावे लागले.

स्थिती आणि व्यवस्था

सीड हे एक छोटेसे गाव आहे. अलग-अलग वस्त्यांमध्ये विखुरलेले. एकूण 1300 बिघे जमिनीत शेती होती. सरकार आणि ग्रामदान बोर्डाच्या विकास कार्यक्रमांतर्गत तीन उपसा सिंचन योजनांद्वारा 250 बिघे जमीन ओलिताखाली आणण्यात आली आहे. प्रत्येक कुटुंबाजवळ थोडीफार जमीन आहे- 5 बिघ्यांपासून 40 बिघ्यांपर्यंत. शेतीवर मजूर क्वचितच कोणी ठेवू शकतो. बव्हंशी शेती श्रमस्वावलंबनानेच होते. गावाला 800 एकरांचे जंगल आहे. ते अतिशय वाईट अवस्थेत होते. जळाऊ लाकूडफाटा आणि गुरांसाठी चारा, यांखेरीज त्यापासून विशेष प्राप्ती नाही. चाऱ्याची कमतरता असल्यामुळे दुधाचा व्यवसाय केला जाऊ शकत नाही. केवळ घराची गरज भागवण्यापुरत्या गाई म्हशी पाळल्या जातात. स्वावलंबनाच्या दृष्टीने शेती पर्याप्त नाही, जंगलाचा पुरेसा आधार नाही. अशा अवस्थेत रोख रकमेची गरज भागवण्यासाठी गहू-मका विकणे किंवा सावकाराकडून कर्ज घेणे, हे दोनच मार्ग आहेत. 

परिसरात काही उद्योग उभे राहतील या आशेत गावकरी आहेत. संपूर्ण जमिनीची मालकी ग्रामसभेची आहे. प्रत्येक कुटुंब आपापली जमीन कसू शकते, परंतु गावाबाहेर विकू शकत नाही. प्रत्येक कुटुंबाने थोडीफार जमीन ग्रामसभेला दान दिली आहे. ही जमीन शेतकरी स्वतः कसतो आणि त्यापासून मिळणारे उत्पन्न ग्रामकोषात जमा करण्यासाठी ग्रामसभेला सुपूर्द करतो. याशिवाय प्रत्येकजण ग्रामकोषात 2 किलो धान्य जमा करतो. त्या ग्रामकोषातून गरजूंना बिनव्याजी कर्ज मिळते. 

जवळपास पूर्ण गाव रावत समाजाचे आहे. प्रत्येक वस्तीतून (फला) एक प्रतिनिधी सर्वसंमतीने निवडला जातो. ग्रामसभेत सगळे प्रतिनिधी 'मनाव' पद्धतीने (योग्य व्यक्तीला राजी करून) सर्वसहमतीने मुखिया निवडतात. दर तीन वर्षांनी मुखियाची निवड होते. एकदा मुखिया राहिलेली व्यक्ती पुन्हा त्या पदावर येऊ शकत नाही. ग्राम-कार्यकारिणीत दोन महिलाही आहेत. सध्या एक शिक्षित तरुण मुखिया आहे. मुखियाजवळ जमिनीची कागदपत्रे असतात. निर्णय ग्रामसभेत घेतले जातात. न्यायदानही ग्रामसभा करते. ग्रामसभेचा निर्णय कोणी मानला नाही तर त्याविरुद्ध ग्रामसभा न्यायालयात जाते. कोणी सरळ न्यायालयात गेले तर कायद्यानुसार खटला ग्रामसभेकडे पाठवला जातो. 

सरकारकडून मिळालेल्या विकासनिधीतून ग्रामसभेने जंगलांच्या सुरक्षिततेसाठी दगडाचे कुंपण तयार केले आहे. त्यातून मोळी किंवा भारा डोक्यावर घेऊन यायला आडकाठी नाही, परंतु बैलगाडी भरून चारा किंवा लाकूड आणायचे असेल तर मुखियापाशी पैसे जमा करून त्याची परवानगी घ्यावी लागते. उपसा सिंचन योजनांद्वारा पाणी गावाच्या अगदी टोकापर्यंत पाइपने पोचवले जाते. पाण्याच्या वाटपाबद्दल नियम बनवण्यात आले आहेत. दोन व्यक्ती या वाटपाकडे लक्ष देतात. नियमांचे उल्लंघन करणाऱ्याला दंड होतो. 

मूर्तिपूजेचा प्रघात नाही. गोमातेलाच ईश्वर मानतात. बाकी ईश्वर तर आपल्या हृदयातच आहे, अशी श्रद्धा आहे. न्यायदानाच्या वेळी आरोपीला देवीकडे घेऊन जातात. त्याच्या हातात पाण्याने भरलेला घडा दिला जातो. पाणी सांडले तर व्यक्ती दोषी मानण्यात येते. 

गावाचा स्वभाव 

सीड गावाचा स्वभाव खालील तथ्यांवरून स्पष्ट होतो 

1. व्यसनमुक्त, कोर्टमुक्त, शीलवान गाव.

2. सामूहिक सिंचन आणि जंगलाचे दक्षतापूर्वक व्यवस्थापन. 

3. ग्रामकोषाची निर्मिती आणि गरजूंसाठी त्याचा उपयोग.

4. 'चुनाव' (निवडणूक) टाळून 'मनाव' (योग्य व्यक्तीला राजी करणे) पद्धतीने मुखियाची निवड. 

5. सज्जन व समर्थ व्यक्तींची निवड व त्यांच्याद्वारा गावाचा कारभार.

6. अनुभवी पिढीबद्दल आदर.

7. शिक्षित तरुणांवर कारभाराची जवाबदारी. 

8. ईश्वरावद्दल मनात धाक आणि हृदयस्थ ईश्वराची संकल्पना. 

कायद्यानुसार प्राप्त अधिकार 

या सगळ्याचा आधार आहे, ग्रामदान कायद्यानुसार सीडला प्राप्त झालेले अधिकार. 

1. नैसर्गिक साधनसंपत्ती (जल-जंगल-जमीन) वर ग्रामसभेचा अधिकार. 

2. न्यायदानाचा अधिकार.

3. सरकारकडून प्राप्त विकास -निधीचा खर्च आपण ठरवलेल्या अग्रक्रमानुसार करण्याचे स्वातंत्र्य 

4. व्यक्तिगत मालकीचे विसर्जन, जमीन विकण्याचा अधिकार समाप्त. परंतु जमीन कसण्याचे आणि त्यापासून मिळालेल्या उत्पादनाचा उपभोग करण्याचे स्वातंत्र्य अबाधित. परिणामी जमीन गावाबाहेर विकली जाऊन लोक कंगाल होण्याचे संकट टळले आणि पिढ्यानपिढ्या अन्न-स्वावलंबन साधले जाण्यासाठी स्थायी आधार मिळाला. 

काही अनुकूलता 

सामूहिकतेच्या दर्शनापाठीमागे असलेल्या काही अनुकूलतांकडेही डोळेझाक करता येणार नाही. 

1. लहान गाव- त्यामुळे गावकऱ्यांमध्ये नित्य दैनंदिन संपर्क 

2. एकाच जातीचे गाव (रावत समाज), त्यामुळे समान धारणा व रीतिरिवाज. 

3. प्रत्येक कुटुंब शेतकरी, म्हणून लाचार नाही. 

4. श्रमस्वावलंबनावर आधारित समाजाचे गुण- आर्थिक समता (बऱ्याच प्रमाणात) आणि परस्परावलंबन ही परिस्थितीचीच देणगी आहे. जमीन किमान 5 बिघे आणि जास्तीत जास्त 40 बिघे. म्हणजे फार विषमता नाही. त्यामुळे शोषण नाही; संघर्षही नाही.

5. जमीन आर्थिक स्वालंबनाच्या दृष्टीने कमी आणि निसर्गाचा लहरीपणा, या कारणांमुळे अन्न स्वावलंबन मुश्किलीने साधते. बाजारासाठी उत्पादन होत नाही, शेतीतून नाही किंवा दुग्धव्यवसायातूनही नाही. जंगलाचा ऱ्हास झालेला असल्यामुळे इंधन आणि चाऱ्याखेरीज त्यातून फारसे काही मिळत नाही. औद्योगिक विकासाच्या अभावी रोजगार उपलब्ध नाही. 

उच्च शिक्षणाच्या अभावी तरुण नोकरीचा विचारही करू शकत नाहीत. पैसा हातात खेळत नसल्यामुळे परिस्थितिजन्य बाजारमुक्ती साधली गेली आहे. त्यातून श्रमस्वावलंबन आणि काटकसरीला प्रोत्साहन मिळते आणि दुसरीकडे 'लफंगा' पैसा गावात प्रवेश करू शकत नाही. पैशाच्या प्रवेशामुळे शोषण, विषमता आणि त्यांतून संघर्ष निर्माण होण्याची शक्यता टळते. 

सुजाण नेतृत्व 

सीडमधील समाजाची एकसंधता त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण स्वभावाची देणगी आहे. श्री. रामेश्वरप्रसादजींसारख्या सुबुद्ध मार्गदर्शकाची भूमिका सामाजिक चारित्र्यनिर्मितीच्या या प्रक्रियेत महत्त्वाची आहे. गावकऱ्यासोबत त्यांच्याप्रमाणेच जीवन जगणारे, पुरोहिताच्या भूमिकेत लोकग्राह्य व्यक्तिमत्त्व असलेले, आपले नेतृत्व न लादता ग्रामसभेच्या सहभागी कर्तृत्वाला चालना देणारे आणि प्रसिद्धीपासून दूर राहणारे रामेश्वरप्रसादजी म्हणजे या गावाची एक अनोखी देणगीच आहे.

Tags: डॉ. उल्हास जाजू समूहजीवन ग्रामीण जनजीवन राजस्थान सीड rameshwarprasad Dr. ulhas jaju rajsthan sid weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके