डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

दळी जमिनीचा लढा उभा राहतानाच इतर अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागले. त्यांतून संघटनेची व्यापक मुद्यांना हात घालण्याची ताकद वाढत गेली. हे प्रश्न होते वाढत्या औद्योगिकीकरणाचे, तथाकथित विकासामुळे होणाऱ्या गरिबांवरील आक्रमणाचे, जातिभेदाचे, स्त्रियांवर होणाऱ्या आक्रमणाचे व अत्याचाराचे, आदिवासींवर होणाऱ्या अन्यायाचे, मजुरांच्या शोषणाचे इत्यादी. त्या प्रश्नांतून कुठले उचलायचे हे आव्हान सततच समोर राहिले.

संघटना आता 10 वर्षांची होतेय. या 10 वर्षांत संघटनेने कुठली लक्षणं घेतली. कशी घडत गेली, याचा वेध माझ्या नजरेतून मी घेत जाणार आहे. हा वेध जसा संघटनेच्या घडण्याचा आहे. तसाच संघटनेची कार्यकर्ती म्हणून माझ्या घडण्याचाही आहे. तो वेगळा करता येणे कठीणच वाटते. म्हणून या दोहोंची सरमिसळ त्यात आहे. माझ्यासारख्या इतर कार्यकर्त्यांना, संघटनाबांधणी करणाऱ्या शोषितांच्या लक्षात उतरणाऱ्या अनेकांना माझ्याकडे सांगण्यासारखे जे काही आहे ते सांगून टाकावे हा उद्देश त्यामध्ये आहे. या मांडणीमध्ये असामान्य काही नाही.

पण मला या क्षेत्रात उतरताना असे सामान्यदेखील काही या मातीतले वाचायला मिळाले नव्हते, ही उणीव आपल्याकडे जेव्हा काही सांगण्यासारखे साठेल तेव्हा भरून  काढायची असे ठरवले होते. तो निर्णय आता अमलात आणतेय. संघटनेचे काम खऱ्या अर्थाने सुरू झाले 1990 पासून, ‘सर्वहारा जन आंदोलन’ हे नाव त्या आधीपासूनच जन्माला आले होते. रायगड जिल्ह्यातला कातकरी समाज पाहता 'सर्वहारा' या नावाखेरीज योग्य नाव सुचेचना, ज्यांचे सर्व काही हिरावून घेतले गेले आहे असा हा समाज. अतिमागास जमात म्हणून यांना ओळखले जाते. कात पाडणे हा पारंपरिक व्यवसाय, जो जंगले संपत गेल्याने काही दशकांपूर्वीच संपला. त्यानंतर शेती, मासेमारी यांबरोबरच कोळसा पाडणे, वीटभट्ट्यांवर काम- इत्यादी व्यवसाय सुरू राहिले. परंतु शेतीचे कौशल्य नाही; अन्य कसलेही कौशल्य नाही, या कारणांनी मुख्य प्रवाहापासून खूप लांब, इतर समाजांच्या दृष्टीने अत्यंत मागासलेला असा हा समाज. स्थलांतर तर त्यांच्या पाचवीलाच पूजलेले. पावसाळा संपला की स्थानिक रोजगार नसल्याने रोजगाराच्या शोधात भटकंती करावीच लागते. मग सगळा संसार डोईवर घेऊन पोराबाळांसह कातकरी स्त्री-पुरुष कामासाठी निघून जातात. पण एकटेदुकटे नव्हेत तर संपूर्ण वाडी एका ठरावीक ठिकाणी जाते. कंत्राटदार वाडीवर येऊन त्यांना घेऊन जातात. कातकरी समाजाचा मोठा सण म्हणजे देवदिवाळी किंवा मोठी दिवाळी- जी साधारणतः नोव्हेंबरच्य अखेरीस येते. ही दिवाळी होते त्या सुमारास कापण्या आटोपल्या जातात. मग कातकरी कुटुंबे जायला मोकळी होतात. कुठल्या कंत्राटदाराबरोबर जायचे हे आधीच ठरलेले असते. श्रावणातच त्याच्याकडून लोकांनी आगाऊ पैसे घेतलेले असतात, सण साजरे करण्यासाठी. श्रावणात शेतीचे दुसरे कामही नसते. या बेकार काळात मग खायला वा सणासाही पैसे नसतात. कंत्राटदारांनी शोषणाची साखळी उभारताना या साऱ्या स्थानिक बाबींचा कातकऱ्यांच्या मानसिकतेचा विचार केलेला असतो.

त्यामुळे त्यांची शोषणाची साखळी वर्षानुवर्षे पक्की टिकून आहे. एवढा विचार आपले सरकार व विकासाचे नियोजक करते, तर ही साखळी तोडताही आली असती. कंत्राटदार आगाऊ पैसे देऊन वेठबिगारीची एक व्यवस्था उभी करून ठेवतात. दर वर्षी मग 6 महिने कातकरी कुटुंब अशा प्रकारे जगायला बाहेर पडते. मुलांचे शिक्षण असे जगताना जे काही व्यवहाराचे घडेल तेवढेच. शालेय शिक्षणाचा गंधही नाही. जगण्यासाठी अन्न- ते पण सुकट, भाकरी, भात, जमली तर डाळ, बारीक मासे एवढे पुरे. कधीमधी कोंबडी किंवा जंगलातली एखादी किरकोळ शिकार मिळाली तर चंगळ. झोपायला एखादी चिंधी आणि पेंड्याचा, कुडाचा निवारा एवढीच गरज. त्यापेक्षा सोयी-सुविधा यांची अपेक्षाच अगदी 4-5 दशकांपूर्वीपर्यंत नव्हती. मग स्वप्ने तरी कसली? स्वप्ने नसलेला हा समाज फक्त जिवंत राहणे, कसाबसा उदरनिर्वाह सांभाळणे याच पातळीवर किमान शतकभर तरी राहिला असावा. त्यापूर्वीचे पुरावेच उपलब्ध नाहीत. इंग्रजांच्या दप्तरांत कातकरी समाजाबाबत नोंदी या अशाच आढळतात. पूर्ण स्वतःच्या मूलभूत गरजा झाल्यावरच जिवंत राहण्यापलीकडच्या गरजांकडे माणूस जाऊ शकतो असे मानसशास्त्र, समाजशास्त्रही म्हणते. मग त्या गरजा पूर्ण होण्याची, आणखी पुढील टप्पा गाठण्याची स्वप्ने बघता येतात. पण या पातळीपर्यंतदेखील न पोहोचलेल्या या समाजाची मुळेही भटकंतीच्या कारणाने रुजू शकली नाहीत. जगण्याच्या या पद्धतीचा, अस्थिर वातावरणाचा परिणाम कातकरी समाजाच्या खोलवर रुजलेल्या मानसिकतेत आहे. सतत फसवणुकीला, शोषणाला सामोरे गेल्याने कुणावरही विश्वास ठेवणेदेखील कठीण होऊन गेले. समाजासाठी संघटनात्मक रचना फारशी इथे टिकू शकली नाही. राजकीय बांधणी होऊ शकली नाही. त्यामुळे या समाजाला स्वतःची नेमकी ओळख, स्वतःचा चेहरा, राजकीय अस्तित्व अजिबात मिळू शकले नाही. स्वतःच्या जगण्यावरचे संपूर्ण नियंत्रण घालवून बसलेला असा हा सर्वहारा समाज.

रायगड जिल्ह्यात सरकारी आकडेवारीनुसार 12% लोकसंख्या आदिवासींची आहे. हीदेखील वास्तवावर आधारित नसावी; कारण जनगणना सुरू होतेच पावसाळ्यानंतर, ज्या काळात आदिवासी जागेवर नसतात. मग त्यांच्या लोकसंख्येचा नेमका आकडा कसा मिळणार? सरकारी आकडेवारीनुसार कातकरी शेतकरीदेखील विरळाच. बहुसंख्य भूमिहीन. अशा समाजाची संघटना बांधायची; शोषणाविरुद्ध लढा उभारायचा आणि त्यांची राजकीय ओळख तयार करायची अशी स्वप्ने घेऊन कामात उतरलो. यापलीकडे वैचारिक स्पष्टता अधिक नव्हती. जे वाटते ते सगळेच शब्दांत उतरवताही येत नव्हते. फक्त फंडिंग घेऊन प्रकल्प राबवायचे नाहीत; सेवा पुरवायचे कंत्राट घ्यायचे नाही, हे डोक्याशी पक्के होते. बाहेरच्या पैशांवर अवलंबून न राहता संघटना बांधता, टिकवता आली पाहिजे असेही वाटत होते. ही संघटना या समाजाच्या लांब पल्ल्याच्या जडणघडणीत एक महत्त्वाचा टप्पा ठरवायला हवी, अशी आकांक्षा होती. या समाजाला लढ्याचा इतिहास नाही, त्यामुळे पुढील पिढीला प्रेरणा मिळू शकेल, असा हक्कासाठी लढा उभा करणे हे उद्दिष्ट ठरले. संघटना नोंदणीकृत करायची नाही असाही निर्णय जाणीवपूर्वक घेतला होता. कारण उभारणीच्या या काळात कुणीच बरोबर नव्हते. संघटना कशी आकार घेईल, हे काम कसे जमेल अथवा नाही, स्वतःमध्ये तशा क्षमता आहेत का, हे सारेच उलगडायचे होते. हे सारे चित्र स्पष्ट झाल्याशिवाय व नोंदणीही गरज वाटल्याशिवाय करायची नाही असे ठरवले. अन्यथा निव्वळ संख्या संघटनेचा डोलारा उभा केलाय तो ‘शो मस्ट गो ऑन’ म्हणत कसेतरी ढकलत चालवणारे बरेच जण अवतीभोवती होते. असा शो चालवायचा नाही, जेव्हा जमत नाही असे वाटेल, कामातले मन उडेल तेव्हा शांतपणे थांबवायचे, स्वतःची व इतरांची फसवणूक करायची नाही असे ठरवून टाकले.

संघटनेची भूमिका, घटना, तत्त्वे, कार्यक्रम, त्यांमागील विचार हे सारे मात्र तेव्हा सहकाऱ्यांशी चर्चा करून नोंदवून ठेवले. तेव्हाचे सहकारी म्हणजे सुमित्रा जोशी आणि सोपान सुतार. सुमित्रा आणि मी एकाच कॉलेजातून समाजसेवेचे शिक्षण घेऊन बाहेर पडलेलो. सोपान हा 17-18 वर्षांचा, तिथल्याच गावातला एक दहावी शिकलेला मुलगा. त्याची आधीपासून ओळख होती. त्याला विचारले, मदत करशील का? फक्त ऑफिसवर थांबून येणाऱ्या लोकांचे निरोप घ्यायचे व लिहून ठेवायचे, एवढेच सुरुवातीला काम होते. सोपान फारच लाजराबुजरा. मान वर करूनही बोलायचा नाही. पण फार प्रामाणिक.

कामाला सुरुवात करायची तर थोडेफार पैसे तर पाहिजेत. घरून पैसे ध्यायचे नाहीत असे दोघींनीही ठरवलेले. मी आधी एक वर्ष नोकरी केली होती. त्या पगारातून थोडेफार पैसे साठवले होते. सुमित्राचे स्कॉलरशिपचे पैसे होते. त्यावर भागवायचे ठरवले. मुंबईतल्या काही मित्र-मैत्रिणींना महिना 100 रुपये देण्याचे आवाहन केले. थोडेफार पैसे जमले. त्यातून सोपानला महिना 100 रुपये आणि प्रवासखर्च देऊ लागलो. राहायच्या जागेचे भाड़े 200 रुपये. याशिवाय दोघींचा महिन्याचा खर्च फक्त 500 रुपयांत भागवायचो. बहुतेक वेळा दिवसातून एक वेळचे जेवण. तेसुद्धा दुपारी चारच्या सुमारास घेतले की दोन्ही वेळेचे भागले. त्रास सहन करण्याची उमेद होती. जिद्दही होती. अडचणी आल्या तरी डगमगायचे नाही अशी दोघींचीही तयारी होती. या प्रकारच्या घडणीमध्ये आता तटस्थपणे वळून पाहताना जाणवते की हे सारे शाळेतल्या, घरातल्या संस्कारांतून, संवेदनशील मन घडवण्यातून तयार झाले होते. त्यामागे जीव ओतून इतिहास शिकवणाच्या एक बाई होत्या, प्रामाणिकपणाचे, कष्टाचे कौतुक करणारे मुख्याध्यापक होते; नेहमी सचोटीने व नितळ वागायला लावणारे आई-बाबा होते; बदलायला दुसरा फ्रॉकही नसलेल्या आर्थिकदृष्ट्या अत्यंत गरीब घरांतल्या मैत्रिणी होत्या.

साने गुरुजींच्या मनाला भिडणाऱ्या, मनाचा कोपरा नू कोपरा ओलावणाऱ्या गोष्टी होत्या. बाबा आमटेंच्या, मेधा पाटकरांच्या पुस्तकांतून, वर्तमानपत्रांतून वाचलेल्या कर्तबगारीच्या कहाण्या होत्या. हे सारे संचित असताना ठरवलेल्या ध्येयासाठी चिकाटीने उतरणे फारसे कठीण नव्हते. त्यासाठी काहीही ओढून-ताणून आणावे लागत नव्हते. तेव्हाच्या आमच्याकडे असलेल्या पुंजीत एक भरीव गोष्ट होती जी आमची जमेची बाजू होती- ती म्हणजे संघटनेशी जोडलेले सर्व सल्लागार. रा. वि. भुस्कुटे, प्रभू सर, अंजली कानिटकर, डॉ. प्रदीप पाटकर या साऱ्यांनी आमच्यातला उत्साह जागता ठेवला, वेळोवेळी ज्ञानाची भर घातली, सर्वतोपरी मदत केली. त्यांची घरे आमच्यासाठी सतत उघडी होती. असेच एक घर होते गिरीश व अमिता गोडबोलेंचं. सुरुवातीचे सहा महिनेच ते जवळपास होते. मग त्यांनी रायगड जिल्हा सोडला. परंतु सुरुवातीच्या काळात मजबूत आधार देणारे हे घर होते. आमच्याकड़चे पैसे संपत आल्यावर दोघींनीही एक रिसर्च करणाऱ्या संस्थेबरोबर महिनाभराचे असाइनमेंट घेऊन चंद्रपूरला काम केले. दोघींनाही 2000 रुपये प्रत्येकी मिळाले. पुढील 5-6 महिन्यांची चिंता मिटली होती. दरम्यान परदेशी फंडिंग नसणाऱ्या काही गटांना मदतीबाबत लिहिणे सुरू होते. सामाजिक कृतज्ञता निधी, श्रुती, क्राय यांच्याशी पत्रव्यवहार सुरू होता. थोडा काळ विधायक संसदकडून फेलोशिप मिळाली. पैशांसाठी कुठे यांबून राहावे लागले नाही. अडचणी येत गेल्या तशी त्यांवर उत्तरेही मिळत गेली. त्यामागे प्रयत्न होते. काम सुरू करण्याच्या काळात वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना भेटलो. पत्रकार, अभ्यासकांना भेटलो. पुस्तके वाचली, रायगडचे गॅझेट, जनगणना अहवाल अभ्यासला. रायगडमधले ज्येष्ठ राजकीय कार्यकर्ते, शिक्षक, वकील यांच्याशी भेटून चर्चा केली. प्रत्यक्ष कामात त्यांची काही मदत होईल का, याचा अंदाज घेतला. खेदाची गोष्ट अशी, की यांपैकी कुणाचीही प्रत्यक्ष मदत करण्याची तयारी नव्हती. सर्वांना आम्ही काय करतो हे लांबून पाहायचे होते. त्यांच्याकडील वाचनीय साहित्यदेखील द्यायला त्यांची तयारी नव्हती. सामाजिक न्यायासाठी संघर्षाचे काम सुरू करावे अशा प्रकारचे कसलेही वातावरण, वारे नव्हते. त्यामुळे मदत करणाऱ्यांनाही प्रेरणा कसलीच नव्हती. आमच्यावर आंधळा विश्वास तरी कसा ठेवणार? त्यांच्या कसोट्यांतून आम्हांला पार व्हायला हवे होते. पहिलीत प्रवेश घेणाऱ्या मुलाला परीक्षा पास झालास तरच प्रवेश मिळेल असे सांगण्यासारखे हे होते. निराशा मात्र आमच्याकडे पासंगलाही नव्हती. त्यामुळे या साऱ्याकडे आम्हांला हसून पाहता येई आणि संपूर्ण निराशा वा संपूर्ण आशादायी चित्र असे कधी प्रत्यक्ष जीवनाचे नसतेच.

आशा-निराशा हातात हात घालूनच तुकड्यातुकड्यांत येत असतात. कुणाकडे पाहून मार्ग काढायचा हे तर आपल्याच हातात असते आणि उमेदीच्या वयात जगणे हिरवेगारही असते. त्यामुळे आमच्या उत्साहापुढे सारे प्रश्न गौण होते. जीवनाला तीव्रतेने भिडणे आणि समरसून जगणे हे दोघींकडेही होते. त्यामुळे उन्हातान्हात फिरणे असो, मुसळधार पावसात भिजत लांबलचक वाटा तुडवणे असो वा उपाशी राहिल्यावर एखाद्या टपरीतला चिवडा वा चणे खाणे असो, आम्ही मनमुराद जगत होतो. सुरुवातीच्या काळात आदिवासी वाड्यावर गेलो की लोक बोलायलाही उभे राहायचे नाहीत. बायका-मुले तर पळून जायची किंवा काही बायका भांडायच्या आवेशातच यायच्या. त्यांना वाटायचं, दारू पकडायला बाई-पोलीस आल्यात! अन्य समाजांचे लोक वाड्यावर येऊन बसणे, आदिवासी घरात पाणी पिणे हे घडतच नसे. त्यामुळे आम्हांला पाणीदेखील अनेक वेळा लोक देतच नसत. रायगड जिल्ह्याची थोडीफार माहिती गॅझेटमधून, काही पुस्तकांतून मिळविली होती. कॉलेजमध्ये असताना फील्डवर्कसाठीही इथेच आल्यामुळे प्रश्नांची थोडीफार जाणीव होती. एक वर्षाचा एका संस्थेवरोबरच्या कामाचा अनुभव व अन्य स्थानिक संघटनांच्या अनुभवातून थोडेफार शिकलो होतो. त्या वेळी सर्व स्थानिक संघटनांशी दळी जमिनीच्या प्रश्नावर सामूहिकपणे काम करायचे व ताकद एकवटायची असे ठरवले होते. आमची जी काही समज तयार झाली होती त्यातून शोषणाचे विविध मुद्दे ओळखायचे व त्याला हात घालायचा, त्या प्रक्रियेत लोकांची शोषणाविरुद्ध लढ्याची ताकद वाढवायची यांवर अधिक भर होता.

मग शोषणाचे लोकांना जाणवणारे मुद्दे कोणते, तुमचे प्रश्न कोणते, असे विचारल्यावर लोक काय बोलतात, या बाबत आमचे अनुभव मजेशीर होते. लोकांना जाणिवेच्या पातळीवर भिडणारे व ज्या बाबत काही भावना ते व्यक्त करू शकत, ते प्रश्न होते.... लाईट नाही, पाण्याची सोय नाही, रस्ता नाही, बालवाडी हवी, घरकुल बांधून पाहिजे, कौले पाहिजेत, स्मशानभूमी पाहिजे, या प्रकारचे प्रश्न ते मांडत असत. सरकारने आम्हांला काय दिले पाहिजे; ते देणे याच्याशीच हे प्रश्न निगडित होते. त्यामुळे सरकारच्या कर्तव्याबाबत ही जागरूकता होती. या प्रकारची जागरूकता बिगर आदिवासी समाज व नेते यांनी तयार केलेली होती. वाडीचा सुधार म्हणजे वरील सर्व सोयी मिळणे असे चित्र या साऱ्यांनी मिळून तयार केले होते. क्वचित कुठेतरी आम्हांला कसायला जमीन नाही व दळीभाग नावावर करून हवा अशी मागणी मांडली जायची. कमी मजुरी हा प्रश्न लोकांनी स्वतःहून कधीच मांडला नाही. आमच्या जमिनी काढून घेतल्या किंवा मराठ्यांनी अत्याचार केला, मारहाण केली, स्त्रीवर बलात्काराचा प्रयत्न झाला, यांसारखे प्रश्नही कधी मांडले गेले नाहीत. हे सारं होणं हा जणू सगळ्या जीवनाचाच भाग होता, त्यामध्ये प्रश्न असा नव्हताच. आम्हांला मानाने वागवले जात नाही, आम्ही दुय्यम प्रतीचे जिणे जगतो या बाबत संवेदना तर जागवल्याच नव्हत्या. हे असे वाटायची सुरुवात व्हायलादेखील मूलभूत गरजांची पायरी ओलांडावी लागते. त्या पु-या व्हाव्या लागतात. तसेच स्वतःची ओळख माणूस म्हणून होण्याबरोबरच मजूर व 'शोषित' ही ओळखही जागी व्हावी लागते.

मार्क्सवादी भाषेत या वर्गीय जाणिवा जागृत करणे हेच एक स्वतंत्र आव्हान होते. त्याशिवाय माणूस म्हणून 'मानवी' पातळीवर जगता येण्याच्या आकांक्षा, भावना जाग्या होणे, या जागवलेल्या भावनांना आदिवासी संस्कृतीत तसेच भोवतालच्या समाजात स्थान मिळणे, त्यांचा स्वतंत्रपणे विचार करण्याच्या क्षमता वाढवणे, हे काम होणे आवश्यक होते.  मग पहिल्यांदा प्रश्न कोणते उचलायचे? आम्हांला भिडलेला व तीव्र वाटलेला पण लोकांनी स्वतःहून न मांडलेला प्रश्न होता कमी मजुरीचा. आमच्या दृष्टीने वर उल्लेखलेल्या अनेक उद्दिष्टांपर्यंत मार्ग नेणारा हा प्रश्न होता. आम्ही आदिवासी वाड्यांवर या बाबत चर्चा सुरू केली. वाडीवरच्या चर्चेत लोक भाग घेत. मजुरी कमी असल्याबाबत बोलत. पण प्रत्यक्ष कारवाई काय यामध्ये त्यांचा फारसा सहभाग नसे. मजुरीच्या प्रश्नावर परिषद घेण्याचे ठरले. सर्वांच्या सोयीने तारीख व ठिकाण ठरले. प्रत्यक्षात या परिषदेला जेमतेम 15-20 लोक आले. ही परिषद सपशेल आपटली. हा आम्हांला एक मोठा धडा होता. लोक का आले नसतील, याची अधिक खोलात जाऊन माहिती घ्यायला लागलो व लक्षात आले की मजुरीची देवाणघेवाण हा मजूर-मालक संबंधातला समोर येणारा उघड आर्थिक व्यवहार असला तरी तो व्यवहार अन्य सामाजिक/आर्थिक आधारांवर असलेला आहे. म्हणजे मजूर कुटुंबातील लग्न लावून देण्यापासून अडीअडचणीला पैसे देणे; शेताच्या बांधावरून येण्याजाण्याचा रस्ता देणे; शेतात साचलेल्या पाण्यात मासेमारी करू देणे; सरकारी योजना पोहोचवणे; पोलिसाने पकडून नेल्यास जामीन राहणे, या साऱ्या गोष्टींतून आदिवासी शेतमजुरांचे मालकावरचे अवलंबित्व वाढलेले असते. मालकाला विरोध करणे याचा अर्थ वरील सर्व आधार धुडकावणे, थोडक्यात स्वत:च्याच पायावर दगड मारून घेणे. शोषणाविरुद्धच्या लढाईतला पहिला धडा आम्ही शिकलो. शोषक जितक्या मूर्त स्वरूपात, जितका जवळ व जितका जगण्याशी जोडलेला, तितकी लढाई कठीण. या लढाईतला पहिलाच मुद्दा हा असा असून चालणार नाही, ज्याने आदिवासीचे सर्व आधारच तुटतील, विशेषतः अशा वेळी जेव्हा नवीन आधार नाही, वा मजुराला आत्मविश्वास नाही. म्हणजे मजुरीचा प्रश्न काही काळानंतर उठवणे आवश्यक होते. त्याचबरोबर आम्ही आणखी एक गोष्ट शिकलो की लोक एखाद्या गोष्टीबद्दल बोलतात वा एखाद्या गोष्टीबद्दल बोलत नाहीत, या दोहोंच्या मागे खूप छुपी कारणे असतात. ही कारणे म्हणजे त्यांचा रसरशीत जीवनानुभव असतो. लोक फक्त शब्दांत बोलत नसतात. त्यांची कृती दैनंदिन व्यवहार तपासून पाहत त्यांच्या शब्दांचा अर्थ लावायचा असतो. शिवाय आमच्यावर विश्वास ठेवण्याइतके आमचे कर्तृत्व सिद्ध झालेले नव्हते. त्यामुळे या शहरी तरुण मुली काय आज येतील, उद्या नसतील त्यांना तर तिथेच जगायचे होते, या विचारामुळेही आमच्याबद्दल भरवसा नव्हता.

(क्रमशः)
 

Tags: रायगड जिल्हा दळी जमीन प्रश्न आदिवासी कातकरी सामाजिक raygad district dali land problems trible communities social weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके