डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

गावशिबिरे, संघटना बांधणीतील महत्त्वाचा टप्पा

लोकसंघटना बांधणे व त्यातून व्यवस्था परिवर्तनाची वाट चोखाळणे हे सामाजिक क्षेत्रात विविध त-हांनी काम करणाऱ्या तरुणांसाठी आव्हान आहे. त्यासाठी लागणारी कौशल्ये, व्यवस्थेची समज, त्यातील व्यक्तींच्या मानसिकतेचे भान मिळविणे हे सातत्याने करत राहावे लागते. रायगड जिल्ह्यात असे काम करताना संघटनेच्या बांधणीतला एक पेच कसा सुटला, या बाबतचा हा अनुभव.

रायगड जिल्ह्यातील माणगाव-रोहा तालुक्यात संघटना उभी राहून 3 वर्षे झाली होती. संघटनेचे नाव ठरवले होते 'सर्वहारा जन-आंदोलन'. खऱ्या अर्थाने 'सर्वहारा' असलेल्या कातकरी समाजाचे संघटन करायचे हा मुख्य उद्देश होता. सर्वांत तळाच्या माणसाला 'माणसासारखा सन्मान व न्याय मिळायला हवा, तर त्यांना तळाशीच ठेवणारी सामाजिक, राजकीय व आर्थिक व्यवस्था बदलायला हवी. ही व्यवस्था बदलायची ताकद आणि इच्छा कुणाकडे असणार? ज्याच्याकडे ती ताकद आहे त्यांना इच्छा नाही आणि ज्यांच्याकडे ताकद नाही त्यांच्या इच्छाही मारलेल्याच असतात. तरीही ही व्यवस्था बदलायची शक्यता व संभाव्य जबाबदारी आतापर्यंतच्या इतिहासाने, समाज व राज्यशास्त्राने आणि विविध विचारधारांनी तळाच्याच समाजाकडे, सर्वहारांकडे सोपवली आहे. हीच मांडणी व विचार घेऊन आम्ही समाजाच्या तळातल्या वर्गाला संघटित करायला उतरलो.

लोकसंघटना उभारायची तर लोकांच्या निकडीच्या प्रश्नावर त्यांना संघटित करायला हवे. हे प्रश्न नेमकेपणाने समाज व त्यातले राजकीय आर्थिक वास्तव लक्षात घेऊन कसे उचलायचे ही तर कळीची बाब. या प्रश्नांना सामूहिक स्वरूप असले तर संघटना बांधण्यास अधिक अनुकूलता. पण सामूहिक प्रश्न व व्यापक प्रश्न उचलण्यातही अडचण अशी असते की, त्यामुळे जनसमूहातील व्यक्तींपर्यंत त्यांतल्या सामाजिक भेदांसारख्या गुंत्यापर्यंत व अत्यंत स्थानिक व वरवर किरकोळ वाटणाऱ्या प्रश्नांपर्यंत पोहोचणे कठीण होत जाते. लोकांशी पहिलं नातं जोडण्यासाठी जो व्यापक प्रश्न उचलला जातो तो सुटणं याची एक स्वतंत्र गुंतागुंत असते. त्या गुंत्यातून सुटतासुटता वर्षे निघून जातात. ते प्रश्न सुटण्यासाठी आपली संघटनात्मक ताकद 1-2 गावे वा तालुक्यापर्यंत मर्यादित राहून चालत नाही. मग पसारा वाढत जातो, जनसंपर्क वाढतो. कार्यकर्ते अपुरे पडू लागतात, वेळ अपुरा पडतो आणि नवा भाग जोडता जोडता जुन्या कार्यक्षेत्रातील लोक संघटनेपासून काही काळ तुटल्यासारखे होतात. अलिप्तपणे वागू लागतात. कातकरी समाजासारख्या गटाचे तर आणखी अनेक कंगोरे आहेत. या साऱ्यांतून वाट काढत संपर्क टिकवायचा, लोकांच्या वैयक्तिक प्रश्नांना हात घालायचा पण व्यापक प्रश्नावरची पकड सुटू द्यायची नाही, ताकद वाढवत जायची व त्यातून व्यवस्था बदलाचे भान कायम ठेवायचे ही एकाच वेळी अनेक तारांवर उड्या मारायची कसरत असते. 

प्रत्येक लोकसंघटनेतील कार्यकर्ता याला सामोरा जात असतो. आम्हीदेखील पहिल्या 3-4 वर्षांनंतर या साऱ्या कसरती अनुभवू लागलो. त्यातून वाट कशी काढायची हा मोठा प्रश्न होता. गावागावांत, कातकरी वाड्‌यांवर, गावकमिट्‌या केल्या होत्या. या कमिट्यांच्या बैठका घ्यायच्या, त्यांच्याशी संपर्क ठेवायचा अशी पद्धत तर आम्ही अवलंबली होतीच. पण ते पुरेसं नव्हतं! एका बाजूला आम्ही पूर्णवेळ कार्यकर्त्यांची व संघटनेच्या प्रमुख फळीतील कार्यकर्त्यांची शिबिरे घ्यायचो. त्यामध्ये व्यवस्थेची समज, उपलब्ध कायदे, सामाजिक प्रश्न, राजकीय परिस्थिती यांसारख्या मुद्यांवर तयारी होते. त्याचबरोबर गावकमिट्‌यांचीही शिबिर घ्यायचे ठरविले. या शिबिरामधून स्थानिक प्रश्न हाताळायचे व गावकमिटी मजबूत करायची असा उद्देश होता. लोकांचा प्रतिसाद सुरुवातीला सर्व गावकमिट्‌या काही यायच्या नाहीत. त्यांतील एखादा प्रतिनिधी यायचा; कारण ही शिबिरे आम्ही तालुक्याच्या ठिकाणी किंवा कार्यक्षेत्राच्या थोडे बाहेर निवांतपणा मिळेल अशा जागी घ्यायचो.

एकदा असे शिबिर एखाद्या वाडीवरच घ्यायचे आणि आजूबाजूच्या सात-आठ वाड्यांवरील कमिट्यांचे लोक एकत्र बोलवायचे असे ठरवले. रोहा तालुक्यातल्या शेणवई वाड़ीवर शिबिर ठरले. आमचा अंदाज होता 40/ 50 लोक येतील. त्यानुसारच सर्व तयारी होती. प्रत्यक्षात शिबिराच्या दिवशी सकाळी 10/11 पासून लोक येऊ लागले. आणि पाहता पाहता शिबिरार्थींची संख्या 200 पर्यंत गेली. ही तर छोटी जाहीर सभाच झाली. शिबिराचे आमचे सारे नियोजन बदलावे लागले. कारण आलेली मंडळी ही फक्त गावकमिटीचे प्रतिनिधित्व करणारी नव्हती, तर संघटना म्हणजे काय, शिबिर म्हणजे काय हे समजून घ्यायला, चार चांगल्या गोष्टी कानांवर पडतील म्हणून ऐकायला आलेली गावातील सारीच मंडळी होती. यात बिगर आदिवासीही मोठ्या प्रमाणात होते. या शिबिराची सांगताही मोठ्या नाट्यपूर्ण रीतीने झाली. त्या शिबिरात शेणवईपासून 6 किलोमीटर अंतरावरील यशवंतनगर वाडीतले आदिवासी पहिल्यांदाच आले होते. ही वाडी तेथील आगरी गावाच्या संपूर्ण दबावाखाली होती. अनेक अन्याय, अत्याचार झाले तरी 'ब्र' कादायची ताकद नव्हती.

हे लोक संघटनेकडे आले, अशी बातमी गावात पसरली आणि त्याच रात्री आगरी समाजाच्या प्रमुख मंडळींनी वाडीतून आदिवासी पुरुषांना जमावाने जाऊन जबरदस्तीने पंचायतीच्या ऑफिसमध्ये आणले. चोरीच्या खोट्या आरोपाखाली त्यांना बेदम मारहाण करण्यात आली... मारहाण चालू असतानाच त्यापैकी काही आदिवासी पळून शेणवईत पोहोचले. रात्री अकराच्या सुमारास दोघे जण आले. त्यांच्या पाठोपाठ आणखी काही जण, असे मध्यरात्री उशिरापर्यंत लोक पळून येत होते. तालुक्याचे पोलीस स्टेशन ताबडतोब गाठले. पण पोलीसकुमक येईपर्यंत पहाट झाली. पहाटेच गावात जाऊन मारहाण करणाऱ्या साऱ्या प्रमुख लोकांना अटक करण्यास संघटनेने पोलिसांना भाग पाडले. अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आणि वाडीवरील लोकांना आणखी ताकद व पाठिंबा देण्याकरिता शिबिर संपतानाच आलेल्या साऱ्या लोकांनी मोर्चाने यशवंतखार गावात जाऊन जाहीर सभा घेतली. गावात वातावरण तंग होते. मारहाणीच्या, दगडफेकीच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. पण संघटनेने हिंमत दाखविली. शिबिराचा हा सर्वांत मोठा धडा होता.

संघटनेने शिकवलेला कायदा प्रत्यक्षात उतरवण्याची ताकद व संधी लगेच मिळाली होती. या शिबिरानंतर तर मजाच झाली. गावागावांतून विविध भागांतून संघटनेकडे शिबिराची मागणी येऊ लागली. नंतरच्या एका वाडीवरील शिबिरात त्या गावातले सगळे सालगडी सोडवले. ‘मजुरी व शोषण’ हा शिबिरातला विषय घेता घेता तेथील हा तीव्र प्रश्न समोर आला. सगळ्या गड्‌यांचे हिशेब मांडले आणि तिथेच जाहीर निर्णय झाला, गड्‌यांना सोडवण्याचा आणि उर्वरित वाडीने त्यांना ताकद देण्याचा. शिबिर हे निव्वळ पुस्तकी कायदा शिकविणारे नव्हते तर प्रत्यक्ष कृतीत कायदा उतरवणारे, ताकद बांधणारे ठरू लागले. इतकेच नाही, तर एखाद्या आदिवासी वाडीवर शिबिर संघटनेने भरवणे ही त्या वाडीची आजूबाजूच्या पंचक्रोशीत प्रतिष्ठा वाढवणारे ठरू लागले. संघटना आता त्या भागात खऱ्या अर्थाने पोहोचल्याचे ते द्योतक होते. आम्ही मग कुठल्या विभागातल्या वाडीवर शिबिर घ्यायचे याचे नियोजन करू लागलो. जेणेकरून प्रत्येक कानाकोपऱ्याचा त्यात समावेश होईल. हळूहळू जाणवू लागले अशा शिबिराचे महत्त्व आणि परिणाम. शिबिर झाले की तेथील मजुरी आपसूक वाढायची. कारण हे निर्णय तिथेच होत आणि जाहीरही केले जात. संघटनेशी भांडण वाढवायचे नाही असा संदेशही बिगर आदिवासी गावात पोचायचा. संघटनेच्या यशाच्या कथा या शिबिरांमधून मांडल्या जात. यशवंतखारसारख्या सत्तेने उन्मत्त झालेल्या गावांना शिकवलेला धडा या संघटनेची ख्याती गावोगाव पोचवायला पुरेसा तर होताच. 

स्थानिक प्रश्नांना प्राधान्य

वेगवेगळ्या वाड्यांमधील संघटनेचे प्रतिनिधी येऊन तेथील संघर्षाच्या ते जिंकण्याच्या कहाण्या सांगत, त्यातून नव्या विभागात लोकांना जोर येऊ लागला. सभाधीटपणा वाढू लागला. अनेक स्थानिक प्रश्न या शिबिरांमधून हाताळले जाऊ लागले, जे इतर कामाच्या रेट्यात दुर्लक्षित राहिले होते. लोकांबद्दल, त्यांच्या मानसिकतेबद्दलची आमची समज वाढू लागली. संघटनेची सभासदसंख्या वाढू लागली. या शिबिरांचा संपूर्ण खर्च तर ती वाडीच उचलू लागली. बहुतेकदा शिबिराची सांगता मिरवणूक वा मोर्चाने झाल्याने स्थानिक परिसरात संघटनेला दृश्य स्वरूप आले.

एखादा समारंभ करावा अशा थाटात आता वाडीतील लोक नियोजन करून शिबिर पार पाडतात. त्या दिवशी तेथे जणू सणाचेच वातावरण असते. सकाळी वाडी एकत्र जेवते, एकत्र रांधते, संघटनेचे विचार पटणारी बिगर आदिवासी मंडळीही आता वाढू लागली आहेत, जी या शिबिरात सामील होती. त्यामध्ये त्यांच्यातील निरंकारी आहेत, स्वाध्यायी आहेत. धार्मिक लोक आहेत, माणुसकी हा मोठा धर्म मानणारे आहेत. अनेक ठिकाणी बिगर आदिवासींनीही आदिवासीचे नेतृत्व स्वीकारले आहे. काही गावांत तर हे नेतृत्व आदिवासी स्त्रियांकडे आहे. या शिबिरांमध्ये बोलावणे धाडल्यास गावातील अन्याय करणारे, शोषण करणारे पाटील, शेतमालकही येतात, जमीन लुबाडणारे येतात, असा संघटनेचा दबदबा आहे. कुठलीही केस कोर्ट वा पोलिसांपर्यंत नेण्याआधी विरोधी व्यक्तीला चूक सुधारण्याची संधी देण्याचा यामागे उद्देश असतो. तो सफल झाला नाही तर पुढचे पाऊल उचलायचे आणि कायद्याचे साधन वापरायचे असे संघटनेचे धोरण आहे. व्यवस्था बदलाच्या लक्ष्याची व्यापकता आणि दीर्घ काळ लक्षात घेता रायगडमधील अल्पसंख्य आदिवासी समाजाची संघटना अपुरी पडेल याचेही भान त्यामागे आहे.

तर अशी ही गावशिबिरे संघटनेच्या बांधणीतला एक महत्त्वाचा टप्पा ठरली. अशा शिबिरांद्वारे आम्ही अधिक लोकांपर्यंत पोचतो आहोत. तेथील ताकद बांधीत आहोत. लोकसंघटनेची कसरत या प्रक्रियेमुळे आम्हांला खूपच सोपी झाली आहे, व्यवस्था बदलाची व्याप्ती वाडी ते गाव यातील तोल सुधारण्यातून तर झाली आहेच; पण आव्हान अधिक व्यापक प्रश्नांचे आहे. रायगड म्हणजे बिहार नव्हे हे वास्तवही आतापर्यंतच्या संघटनेच्या वाटचालीला पूरक ठरले आहे याची नोंद घेऊन पुढील आव्हानांना तोंड द्यायचे आहे. आपली परिस्थिती बदलायला हवी अशी इच्छा येथील सर्वहारांमध्ये जागी झाली आहे.

Tags: गावशिबिरे कातकरी समाज संघटनेची ताकद शेणवई शिबिर सर्वहारा जन आंदोलन संस्था परिचय सामाजिक village camps farmers power of institution shenvai camp sarvhara jan aandolan institution intro social weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके