डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

डॉ. अनिल अवचटांना 'डॉ. लाभसेटवार साहित्य सन्मान’ हा एक लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला आणि त्यांच्या व्यक्तित्यातील इतर सर्व बाजूला होऊन 'लेखक अनिल अवचट' ही प्रतिमा पुन्हा एकदा मनःचक्षूंपुढे उभी राहिली.

केव्हापासून ते आठवत नाही, पण अवचटांचे लेखन पहिल्यापासूनच मला प्रभावित करत होतं. दिवाळी अंकांमध्ये आलेले त्यांचे वेश्या, भंगी समाज, बिडी आणि हळद कामगार यांवरील लेख त्यातील रेखाचित्रांसह मला आजही आठवतात. त्यावेळी मला आवडलेलं मराठी लेखन विरपाक्षांना मी वाचून दाखवायची. त्यात या लेखांचाही समावेश असायचा. त्यांच्या 'माणसं च्या असंख्य चाहत्यांत मीही होते. ['माणसं साठी त्यांना केन्द्र साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे, अशी माझी परवा- परवापर्यंत समजूत होती.]

या लेखांमुळे माझ्यासारख्या गृहिणीचं क्षितिज रुंदावलं यात शंका नाही. उदाहरणार्थ, वेश्या जीवनावरील त्यांचा भेदक लेख वाचला आणि माझ्या दृष्टिकोनात आमूलाग्र बदल झाला. इतका की त्यावेळी मीही एका प्रौढ धंदेवाली- घरवालीची तिच्या घरी जाऊन मुलाखत घेतली होती.

उत्सुकतेपोटी आम्ही त्यांच्या दूरदर्शनवरच्या तुरळक मुलाखती आवर्जून पाहिल्या होत्या. 'स्वतःविषयी 'नं मलाही प्रभावित केलं होतं. त्यातही 'दहावीचं वर्ष " वाचून तर मी विस्मित झाले होते! कारण जीवनातल्या असल्या गोष्टी दडपून केवळ चांगलं तेवढंच सांगायची पद्धत मी भोवताली पहात होते! त्यांच्या 'धार्मिक या लेखानं आणि पुस्तकानंही मनातल्या श्रद्धेविषयीच्या गोंधळाला नीट दिशा यायला मदत केली होती.

त्यांची आणि आमची ओळख होण्यासाठी त्यांचा स्वभाव कारणीभूत आहे. 'कर्वालो' ही पूर्णचंद्र तेजस्वींची मी अनुवादित केलेली कादंबरी त्यांनी वाचली, त्यांना आवडली, त्यांनी आपण होऊन ओळख करून घेतली. एवढंच नव्हे, कमल देसाईंनाही पुस्तक आणि आमचा फोन नंबर दिला. त्यानंतर आम्हा सर्वांचा स्नेह जमला.

सुरुवातीला अवचटांची आठ-पंधरा दिवसांतून आमच्या घरी फेरी व्हायची. त्या आधीच विरपाक्षांनी स्वेच्छा-निवृत्ती घेतली असल्यामुळे त्या दोघांच्या - साहित्यबाह्य विषयांवर बऱ्याच गप्पा व्हायच्या. माझाही त्यात सहभाग असायचा, पण त्यात अनेकदा खंड पडत असे.

ओळख झाल्या झाल्या लवकरच अवचटांनी आम्हांला आपल्या लेखन क्षेत्रात मानाचे स्थान दिलं. त्यांनी जेव्हा पहिला लेख वाचून दाखवला, तेव्हा मी तर इतकी धन्य-धन्य होऊन गेले की मजकुराकडे माझं लक्षच नव्हतं! तो कुठला लेख होता तेही माझ्या लक्षात राहिलं नाही, यातच ते आलं!

त्यानंतरचा अभय बंगांवरील लेख ऐकल्याचं मात्र मला स्पष्ट आठवतं. प्रत्यक्ष लेखकाच्या तोंडून लेख ऐकतानाचा तो अनुभव विलक्षण होता. त्यांचा एड्सवरचा लेख ऐकताना कमलताईही होत्या. तो लेख ऐकताना सगळ्यांचीच घुसमट होत होती. त्यात कमलताईंना तर तो लेख ऐकवत नव्हता. इतक्या त्या अस्वस्थ होत होत्या. मध्ये मध्ये त्या अवचटांना थांबवत होत्या.

मला सुरुवातीपासूनच लेखनप्रक्रिया आणि लेखक यांच्याविषयी कुतुहल असायचं. एव्हाना कन्नडमधील शिवराम कारंत, भैरप्पा या लेखकांशी आमचा बऱ्यापैकी परिचय झाला होता. त्यांच्या लेखनाविषयीही प्रश्न विचारून मी माझी जिज्ञासा पुरी करून घेत होते. या वेळेपर्यंत मराठी लेखकाची मात्र ओळख झाली नव्हती. अवचटांनी कधीच लेखकपणाचं आवरण मिरवलं नसलं तरी मी त्यांच्याकडे लेखक म्हणूनच पहात आले. निदान ओळख झाल्यानंतर सुरुवातीची काही वर्षे तरी!

सुनंदाताई हयात असताना आम्हाला त्यांचे तयार लेख ऐकायला मिळाले, तरी लेख कसे तयार होतात याविषयी फारसं समजत नव्हतं. त्या वारल्यानंतर आम्ही तिघांनीही संध्याकाळी एकत्र फिरायला जायला सुरुवात केली. त्यावेळी होणाऱ्या गप्पांमध्ये अवचट नवं काय पाहिलं, काय ऐकलं, नवं वैशिष्ट्यपूर्ण कोण भेटलं कुठं काय वेगळ्या गप्पा झाल्या, यांविषयी सांगत. परगावचा प्रवास झाला तरी सगळं तपशिलानं सांगत. या गप्पांमधल्या अनेक विषयांपैकी एखादा विषय त्यांच्या बोलण्यात पुन्हा पुन्हा येऊ लागला की आम्ही आपसांत म्हणत होतो, या विषयावर लेख होणार! बऱ्याचदा आमचा कयास खरा ठरायचा. अनेकदा मात्र काही ना काही कारणानं तो विषय मार्ग रहायचा. तेव्हा मी मनातल्या मनात उगाचच खट्टू व्हायची! अशा प्रकारे त्यांचा एकेक लेख दोन-तीन वर्ष तयार होत असलेला आम्ही आजही पाहतो.

नसिमादीदींवरील लेख असाच तयार झाला आहे. अमूक विषयावर लेख होणार असं वाटलं की ते आवर्जून त्या भागात फिरून येतात. अशा प्रकारे जमलेला तपशील त्यांच्या डोक्यात कसा राहतो कोणजाणे! केवळ तांत्रिक तपशिलासाठी तेवढे ते कागदपत्र वापरतात. अशाप्रकारे तयार झालेला त्यांचा लेख दमदार नाही झाला तरच नवल! त्यांचा मच्छीमारीवरचा लेख अशाच प्रकारे तयार होत गेलेला आम्ही तपशिलानं पाहिला आहे. [यंदाचा सतारीवरचा लेख त्याचा उत्तम नमुना.]

त्यांचे काही लेख आठवणींना उजाळा देता देता साकार होतात. रोजच भेटत असल्यामुळे कधी-कधी जुन्या आठवणी निघायच्या. लोकमान्यनगरवरचा लेख असाच अक्षरशः आमच्यापुढे तयार झाला आहे. विद्यापीठात ग्राउंडवर फिरताना दीड-दोन तास त्याच विषयावर बोलत राहिले. आम्ही दोघं मधूनमधून त्यांना प्रश्न विचारायचो, ते पुन्हा उत्तर द्यायचे. फिरणं झाल्यावर ग्राउंडवर बसलो तरी तोच विषय सुरू होता. रात्री घरी गेल्या-गेल्या त्यांनी लेख लिहिला आणि सकाळी त्यांचा फोन आला, 'लेख लिहून झालाय! येऊ?"

पु. ल. देशपांडेंच्या घरावरील लेखाच्या वेळीही असंच घडलं. गप्पांचा विषय होता, एवढ्या प्रसिद्धी पावलेल्या माणसाच्या संदर्भात सगळ्यांना सगळे ठाऊक असतं. आपण काय नवं सांगणार? गप्पांना रंग चढू लागला तेव्हा त्यांना पु.लं.च्या घराविषयीच्या अनेक गोष्टी, घटना, प्रसंग आठवू लागले. त्यांची मस्त तंद्री लागली आणि बराच वेळ ते बोलत राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी 'पु.लं.चं घर' हा लेख तयार झाला.

त्यांचे काही लेख मात्र आजूबाजूला कुणालाही चाहूल न देता निर्माण होतात. दिवसभराच्या भ्रमंतीत एखादा प्रसंग मनाला भिडतो आणि त्याची प्रतिक्रिया थेट कागदावरच उमटते. 'गुजराथ', 'जाईचं घर' हे अशा प्रकारचे लेख. काही अनुभव संवेदनांना झंकारतात आणि त्यातून यमन किंवा 'वेताळ टेकडी’ सारखे लेख उमलतात. हल्ली त्यांना कविता सुचतात. त्यांचीही जातकुळी हीच आहे.

गेली काही वर्ष त्यांचा गोतावळा वाढल्यामुळे अनेकदा त्यांना लेख लिहिण्याइतका निवांतपणाच मिळत नाही. मग ते यशोच्या, त्यांच्या मुलीच्या घरी जातात. त्यांना एकांत मिळवा म्हणून मग यशो आपल्या घरातून बाहेर पडते. तिथल्या निवांत एकांतात, मोबाईलपासून दूर त्यांच्यातला 'लेखक' जागा होतो आणि त्यांचा लेख तयार होतो.

अलीकडचे त्यांचे लेख इथं भारतात बनतात आणि युरोप-अमेरिकेमध्ये गेल्यावर कागदावर साकार होतात. या लेखांचे विषय मात्र बहुतेक वेळा भारतातलेच असतात.

एका गोष्टीची मला गंमत वाटते. गेली सुमारे पस्तीस-छत्तीस वर्ष ज्यांनी दर्जेदार आणि दमदार लेखन मोठ्या आत्मविश्वासानं केलं आहे, त्यासाठी त्यांनी राजमान्यता, लोकमान्यता आणि विद्वन्मान्यता मिळवली आहे; आज ज्यांची महाराष्ट्रात सर्वाधिक आणि सर्व थरांतील वाचकवर्ग आहे अशी ख्याती आहे, ते अनिल अवचट अजूनही ‘बनचुके’ झालेले नाहीत. लिहून झालेला लेख जवळपासच्या काहीजणांना वाचून दाखवताना ते नवोदित लेखकाप्रमाणे अस्वस्थ असतात!

लेखाचे वाचन झाल्यानंतरच्या काही स्तब्ध क्षणी तर त्यांच्या चेहऱ्यावरची कातरता, उत्सुकता लपत नाही! काही क्षणांतच ऐकणाऱ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया विविध प्रकारे उमटतात. प्रतिक्रिया अनुकूल असल्या की अवचट लहान मुलासारखे खूष होतात! मग त्यांना चहा आठवतो, पोटात कोकलणारे कावळे आठवतात. एकदम सेलिब्रेशनचा माहोल तयार होतो!

काही वेळा अनुकूल प्रतिक्रियांमधूनही काही मुद्दे प्रतिकूल उमटतात. त्यावेळचा त्यांचा संयम वाखाणण्याजोगा असतो. ते त्याकडे वाचकाची फीडबॅक असं बघतात. कधीही त्या मुद्याचं समर्थन करत बसत नाहीत. समोर आलेल्या प्रतिकूल प्रतिक्रियेवर पुनर्विचार करण्यासाठी तो विशिष्ट लेख बाजूला ठेवतात आणि वाटल्यास नव्यानं मांडणीही करतात. आज लेखक म्हणून अवचट जिथं आहेत, तिथं त्यांचं हे वागणं मला विशेष महत्त्वाचं वाटतं.

प्रत्येक लेखाच्या जन्माच्या वेळी या मनःस्थितीतून जाणाऱ्या अवचटांना पुस्तक प्रकाशित झाल्याचा, त्यांच्या अनेक आवृत्त्या निघाल्याचा फारसा आनंद झालेला दिसत नाही. आप्तेष्टांना पुस्तकं मुबलक संख्येनं वाटण्यात त्यांना खरा आनंद मिळतो, असं दिसतं.

एवढी वर्ष लेखक म्हणून दमदार खेळी खेळलेल्या अवचटांना दरवर्षीचे लेख लिहून झाल्यावर एक 'अ‍ॅटॅक' येतो. तो म्हणजे आता माझ्याकडचे सगळे विषय संपले. पुढच्या वर्षी मी काय लिहिणार?' आम्ही अर्थातच तिकडे फारसं लक्ष देत नाही. कारण आम्हांला ठाऊक आहे, त्यांच्याकडचे कितीतरी विषय वेगवेगळ्या टप्यांवर आहेत. व्याख्यानासाठी फिरताना त्यात अजूनही सतत भर पडतच आहे. त्यांचं मन अनेक दृश्यांवर, प्रसंगांवर अजूनही प्रतिक्रिया देत असतं.

त्यांनी फार भुणभुण केली की आम्ही त्यांना सांगतो, काही काळजी करू नका. पावसाळ्याचे ढग जमायला लागले की तुमचे लेख आपोआप तयार व्हायला लागतील. पाऊस नाही आला तर आपण कृत्रिम पाऊस पाडायला लावू. तेही नाही झालं तर आम्ही दोघं तुमच्या खिडकीवर बसू आणि झारीनं पाणी ओतत राहू. कुठल्याही परिस्थितीत दिवाळी अंकांची तुमच्यासाठी वाट बघणाऱ्या मराठी वाचकाची निराशा होऊ देणार नाही!" 

असो!

Tags: मराठी साहित्य मराठी लेखक लाभसेटवार पुरस्कार अनिल अवचट Literature Award Marathi Writer Anil Awchar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके