डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

संवेदनशील कवी प्रा. दासू वैद्य आले. नेका नापास विद्यार्थ्याच्या मन:स्थितीचा मुद्दा त्यांनी आपल्या भाषणात उपस्थित केला. ‘‘आज गुणवंतांचा गौरव करताना मला आनंद होत आहेच. त्यांचे कष्ट, प्रामाणिकपणा यामुळे ते कौतुकास पात्र आहेत. पण जे कुणी नापास झाले असतील, त्यांच्याबद्दल माझ्या मनात किंचितही ‘घृणा’ नाही; उलट सहानुभूती आहे. कारण जे कधीच नापास झालेले नसतील; त्यांना नापास होण्याचं दु:ख, वेदना कधीच कळणार नाहीत. मला कळत्येय. कारण मी हे दु:ख भोगलंय...

      

जून महिना. शालांत परीक्षेचे निकाल नुकतेच जाहीर झालेले. गावातील चौका- चौकांत शाळांची, शिकवणी वर्गांची आपापल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या अभिनंदनाचे फलक लावण्याची स्पर्धा राजकारण्यांनाही लाजवणारी. हे सारे पाहताना मनात विचार आला- गुणवंतांच्या यशाचं श्रेय घेण्यासाठी आम्ही सारे किती आतूर झालेले असतो; पण त्याच वेळी याच मुलांच्या वर्गात, त्यांच्याच बाकावर बसणारे काही मात्र नापास झालेले असतील... त्यांच्या ‘अपयशात’ आमचाही काही वाटा आहेच ना? मग गुणवंतांच्या यशाचं कौतुक करताना उत्साहाचे स्वरूप ‘उन्मादा’पर्यंत जाताना एखाद्या शाळेतील एखाद्या तरी शिक्षकाने, मुख्याध्यापकाने आपल्याच शाळेतील नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्याला, त्याच्या पालकांना धीर दिला असेल का? त्याच्या अपयशाला आम्हीदेखील काही अंशी जबाबदार आहोत, अशी प्रांजळ कबुली देत कर्तव्य निभावले असेल का?

एखाद मूल नापास झालं की, सगळ्या घरादारावर ‘सुतक’ पडल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. नापास झालेल्यावर जणू सामाजिक गुन्हेगारीचा शिक्का मारला जातो. त्याला घरी-दारी उपेक्षा, अपमान, तिरस्कार सहन करावा लागतो. त्याच्याच घरचे लोक अगदी आई-वडीलसुद्धा जणू काही त्याने अगदी ठरवून खुनासारखा गंभीर गुन्हा केलाय, असा समज करून घेतात. त्याच्या नापासाचा संबंध स्वत:च्या सामाजिक प्रतिष्ठेशी जोडून स्वत:लाही अपराधी समजू लागतात. इतरांच्या मुलांशी त्याच्या अपयशाची तुलना करून त्याच्या नाजूक मनावर निर्मतेने शब्दांचे प्रहार करतात.

खरे तर या भावनिक आंदोलनांच्या अनवट वयात अशा खडतर प्रसंगी त्याला समजून घेऊन मानसिक आधार देण्याची गरज असते. सानेगुरुजी म्हणत, ‘‘घरातील एखादं मूल नापास झालंच तर त्याला जवळ घ्यावं, धीर द्यावा आणि सांगावं- बाळा, निराश नको होऊस. तू मुद्दाम नापास झालायस का? पुन्हा चांगला अभ्यास कर, मी तुला मदत करीन... तू नक्कीच पास होशील!’’ पण बहुतेकांच्या नशिबी ना असे सानेगुरुजी येतात, ना असे प्रगल्भ पालक. मग ही मुले नैराश्याच्या गर्तेत जाऊन आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय तरी घेतात किंवा अपमान-कुचेष्टा सहन करत कोडगी बनतात. एका विषयाचा राग आपल्या संपूर्ण आयुष्यावर काढत निराशेचं जिणं जगतात.

खरे तर नापास होणाऱ्याचा काय दोष असतो? कुणाला असं मनापासून वाटेल की, मी नापास व्हावं? त्याच्या नापासाचं एकमेव कारण त्याची कमी असलेली बौद्धिक पातळी- असं ठरवून आपण स्वत:ची सुटका करून घेतो. पण असा निर्णय देणारे ‘रामशास्त्री’ स्वत: कधीच कोणत्याच अर्थाने जीवनाच्या परीक्षेत ‘नापास’ झालेले नसतील का? अगदी एखाद्याने भरपूर तयारी केली आणि ऐन गणिताच्या पेपरच्या दिवशीच तो आजारी पडला असेल तर? एखाद्याच्या घरातील प्रिय व्यक्तीचा परीक्षेच्या काळात मृत्यू झालेला असेल तर? एखाद्याचे व्यसनी पालक पेपरच्या आधीच्या रात्री तुरुंगात टाकलेले असतील आणि त्यांना सोडवण्यासाठी साहेबांच्या विनवण्या करणाऱ्या असहाय आईला सोबत म्हणून त्या मुलाला पोलीस स्टेशनच्या आवारात रात्र काढावी लागली असेल, तर सकाळच्या पेपरला तो कोणती उत्तरे लिहिणार? एखाद्या अवघड विषयाचा अभ्यासक्रम शाळेत पूर्णच झालेला नाही (आणि परिस्थितीमुळे गाईड किंवा शिकवणीची ‘चैन’ही परवडत नाही), तर दोष मुलाचा की शाळेचा? की शिक्षकांचा? परीक्षेच्या केंद्रावरील ‘कॉपीमय’ वातावरण पाहून प्रामाणिकपणावरील विश्वास उडालेला विद्यार्थी दोषी, की प्रशासकीय यंत्रणा आणि शिक्षणव्यवस्था दोषी? गुणवंताबरोबरच स्वत:चे कौतुक, सत्कार  करून घेताना आमच्या मनात नापास झालेल्या आपल्याच वर्गातील विद्यार्थ्यांबद्दल अपराधी भावना का उमटत नाहीत?

अशा असंख्य प्रश्र्नांचं काहूर मनात माजलेलं असताना माझ्याच शाळेतील गुणवंत गौरव समारंभासाठी संवेदनशील कवी प्रा. दासू वैद्य आले. नेका नापास विद्यार्थ्याच्या मन:स्थितीचा मुद्दा त्यांनी आपल्या भाषणात उपस्थित केला. ‘‘आज गुणवंतांचा गौरव करताना मला आनंद होत आहेच. त्यांचे कष्ट, प्रामाणिकपणा यामुळे ते कौतुकास पात्र आहेत. पण जे कुणी नापास झाले असतील, त्यांच्याबद्दल माझ्या मनात किंचितही ‘घृणा’ नाही; उलट सहानुभूती आहे. कारण जे कधीच नापास झालेले नसतील; त्यांना नापास होण्याचं दु:ख, वेदना कधीच कळणार नाहीत. मला कळत्येय. कारण मी हे दु:ख भोगलंय... तो अपमान, तिरस्कार, अवहेलना... सारं सहन केलंय आणि तरीही मी आज तुच्यासमोर ‘प्रमुख अतिथी’ म्हणून उभा आहे. या चमत्काराला कारण ठरल्या त्या माझ्या मराठी विषयाच्या मातृहृदयी शिक्षिका देवबाई! त्यांनीच मला यातून सावरण्याचे बळ दिले; इतकेच नव्हे, माझ्यातील गुणांची जाणीव करून देत मला माझा खरा मार्ग दाखवला. सगळ्यांची बोलणी, मार खाऊन मी कोडगा बनत असताना एकदा मला त्यांनी वर्गात पुढे बोलावलं. नेहमी दुसऱ्या-तिसऱ्या बाकावर बसणारा मी शेवटच्या बाकावर बसलेला त्यांनी पाहिलं असावं. आता या बाईपण सर्वांसमक्ष आपल्याला बोलणार किंवा मारणार, अशी मनाची तयारी करतच मी त्यांच्या समोर बोलणी खाण्याची ‘पोझ’ घेऊन उभा राहिलो. पण त्यांनी मात्र माझ्या हातावर छडीऐवजी खाऊसाठी षटकोनी आकाराचे तीन पैसे ठेवले. माझ्या पाठीवर हात फिरवत त्या म्हणाल्या, ‘मला समजलंय ते. पण तू काळजी नको करूस हं. पास होण्यापुरतं गणित मी तुझं करून घेईन. पण तुला माहिती आहे का? तुझ्याइतक्या कविता आपल्या शाळेत कुणालाच पाठ नाहीत. म्हणजे तूसुद्धा गुणवंतच आहेस. बाळा, सगळ्यांना सगळंच येत नसतं. एखाद्या विषयात नापास होणं म्हणजे आयुष्य संपलं, असं नकोस समजू; जे तुला आवडतं ना, त्यात परिपूर्ण व्हायचा प्रयत्न कर!’

‘‘गेल्या कित्येक दिवसांत कुणी तरी प्रथमच माझ्याशी इतक्या प्रेमाने बोललं होतं. त्यांच्या त्या प्रेमळ शब्दांनी आणि स्पर्शानं माझ्या मनावरचं अपराधीपणाचं ओझं क्षणात हलकं झालं होतं. डोळ्यांतील आसवांतून मला बार्इंच्या जागी ‘आई’च दिसत होती. मला माझा मार्ग गवसला होता. पुढे मी मराठीचा प्राध्यापक झालो, कविता केल्या, सिनेामासाठी गीतलेखन केलं. त्यासाठी मिळालेली पुरस्काराची बाहुली घेऊन तडक देवबार्इंचं घर गाठलं. आशीर्वादासाठी नतमस्तक झालो, तेव्हा पाठीवरून सुरकुतलेले हात फिरवत त्या म्हणाल्या, ‘अरे, हे यश तर तुला मिळणार होतंच, कारण तू आहेसच गुणवंत!’ ‘‘विद्यार्थ्यांधील सर्जनशीलता ओळखून ती विकसित करणारे शिक्षक खरी पिढी घडवत असतात. शालेय उपक्रम ही आत्मशोधाची पहिली पायरी; म्हणून शाळा गुणवत्तेच्या क्रमवारीत असण्यापेक्षा उपक्रमांच्या क्रमवारीत प्रथम असावी!’’

प्रेक्षागृहात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होत असताना मंत्रमुग्ध होऊन सरांचे मनोगत ऐकणारा मी भानावर आलो... माझ्या मनातील नकारात्मकतेचं मळभ दूर झालेलं होतं. एक शिक्षक म्हणून मी आज अधिक प्रगल्भ झालेलो होतो. टाळ्या वाजवण्याबरोबरच माझ्या मनात शैक्षणिक उपक्रम आणि सकारात्मक विचारांचे तरंग उमटू लागले होते. या वर्षात त्यांना मूर्तरूप कसे देता येईल, याचा विचार करत मी प्रसन्न चित्ताने सभागृह सोडले!

Tags: उमेश घेवरीकर आता पास! Umesh Ghevarikar Now pass ! weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके