डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

सफाई कामगारांचे राज्यव्यापी शिबीर

दि. 25 व 26 डिसेंबर 1993 या काळात पुण्याला सफाई कामगारांमध्ये कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचे एक शिबीर सफाई कामगार संघर्ष समितीतर्फे भरविण्यात आले होते. या शिबिरात सफाई कामगारांपुढील प्रश्न, सरकारची निष्क्रियता आणि पुढील वाटचाल यांसंबंधी चर्चा झाली.

समाजव्यवस्थेतील सर्वात तळचा घटक म्हणजे भंगी समाज, मेहतर समाज! समाजाचे मलमूत्र स्वतःच्या डोक्यावरून वाहून मेहेतर समाजाने संपूर्ण समाजाचे आरोग्य कायम राखण्यात महत्त्वाचा वाटा उचलला आहे. तरीही हा समाज कायमच उपेक्षित राहिला आहे. सरकारने या समाजाच्या मागण्या व पाहणीसाठी नेमलेल्या मलकांनी, बर्वे तथा लाड समित्यांनी अनेक शिफारशी करूनही या समाजाच्या न्याय्य मागण्या अद्यापी मान्य झालेल्या नाहीत.

दि. 18 ऑक्टो. 92 रोजी ठाण्यात ‘समता आंदोलन' या संघटनेतर्फे राज्यव्यापी मेहेतर परिषदेत या समाजाच्या न्याय्य मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी 'सफाई कामगार संघर्ष समिती’ची स्थापना करण्यात आली. समाजाची सद्यस्थिती, समाजातील रूढी-परंपरा, आरोग्य, शिक्षण आदी प्रश्नांचे गंभीर स्वरूप व समाजाचा इतिहास इत्यादीविषयी समजून घेऊन प्रबोधन व संघर्ष या माध्यमांतून परिवर्तनाची चळवळ, संघटित करण्याचा प्रयत्नांचा एक भाग म्हणून 'सफाई कामगार संघर्ष समिती’तर्फे राज्यातील कार्यकर्त्यांसाठी एका अभ्यास शिबिराचे आयोजन केले होते. हे अभ्यास शिबीर नुकतेच पुणे येथील रावसाहेब पटवर्धन विद्यालयात संपन्न झाले. मुंबई, पुणे, वसई, पनवेल, पुणे, नाशिक संगमनेर, औरंगाबाद, उस्मानाबाद, धुळे, नागपूर आदी महाराष्ट्रातील प्रत्येक भागातून सुमारे 80 कार्यकर्ते यात सहभागी झाले होते. शिबिराचे उद्घाटन मुंबईचे म्युनिसिपल कामगार नेते श्री. दिगंबर सातव यांनी केले, तर समारोप पुण्याचे कामगार नेते कॉ. भास्कर जाधव यांनी केला. शिबिरातील वेगवेगळ्या सत्रांत साथी श्री. प्रभाकर आडेलकर, पुण्याचे समाजकल्याण अधिकारी श्री. शिरसाम, 'नरकसफाईची गोष्ट' या पुस्तकाचे सहलेखक श्री. अरुण ठाकूर, 'आंदोलन' मासिकाचे संपादक श्री. संजय में. गो. परित्यक्ता महिलांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या श्रीमती लता भिसे, व सुनीती सु. र. यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

सर्व समित्यांच्या अहवालांना सरकारने कचऱ्याची टोपली दाखवली आहे.

'सफाई कामगारांच्या मागण्यांसाठी सरकारने अनेक समित्या नेमल्या, पण समित्यांनी देखील जुजबी सूचना करण्यापलीकडे काही केले नाही आणि सरकारने देखील या अहवालांना कचऱ्याची टोपली दाखवली,' असा गंभीर आरोप उद्घाटनाच्या भाषणात श्री. दिगंबर सातव यांनी केला. तरीही छोट्या शहरांतील सफाई कामगारांना व असंघटित सफाई कामगारांना न्याय मिळवून देण्याकरिता या अहवालांची मदत होईल व व सफाई कामगार संघर्ष समितीच्या व्यासपीठाचा आपण यासाठी वापर करावा, असे आवाहन श्री. सातव यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.

सफाई कामगारांमध्ये काम करणाऱ्या कामगार संघटनांचा कामगारांशी संबंध केवळ साडेसहा तासांतून येणाऱ्या समस्या सोडवण्यापुरता असल्याने आपला, संघर्ष समितिचा प्रयत्न अत्यंत महत्त्वाचा आहे, असेही श्री सातव म्हणाले. सफाई कामगारांच्या मुक्तीसाठी योजिलेले उपाय, यांत्रिकीकरण व म्युनिसिपालिटीच्या खोल्या जमीनदोस्त करणे हे फसवे उपाय आहेत, असेही महत्त्वाचे प्रतिपादन त्यांनी केले.

उद्घाटनाच्या सत्रात साथी श्री. प्रभाकर आडेलकर यांनीदेखील स्वतःच्या मागण्यांसाठी सर्व समाजाने एकत्र येऊन संघर्ष करण्याची गरज प्रतिपादन केली. सवलतींची खिरापत पण हात बांधलेले-समाजकल्याण अधिकाऱ्यांसमोर कार्यकर्त्यांची कैफिय!

शिबिराच्या दुसऱ्या सत्रात पुण्याच्या समाजकल्याण अधिकाऱ्यांना चर्चेसाठी निमंत्रित केले होते. सफाई कामगार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी सरकार राबवत असलेल्या योजनांची माहिती त्यांनी कार्यकर्त्यांना दिली. शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती व शिक्षण-सहाय्य, (वा विद्यावेतन), प्रकल्पांसाठी आर्थिक अनुदान, अत्याचार-विरोधी साहाय्य, गृहनिर्माण सहाय्य, वस्ती सुधारणा इत्यादी अनेक योजनांची माहिती त्यांनी यावेळी नमूद केली. पण त्यानंतर त्यांना कार्यकर्त्यांच्या टीकेला सामोरे जावे लागले. योजना राबविण्यात होत असलेला भ्रष्टाचार, मंत्री व आमदार-खासदार यांचा हस्तक्षेप यांमुळे गरजू लोकांना त्याचा लाभ मिळत नाही. ही तक्रार सर्वच कार्यकर्त्यांनी सोदाहरण मांडली. सवलतीच्या या योजनांमुळे समाजात व नोकरशाहीत नवीन दलालांचा एक वर्ग तयार झाला आहे, याची थोडी चीडही व्यक्त झाली. 'आम्हाला सवलतींची खिरापत वाटलीय खरी, पण त्याच वेळी आमचे हात बांधले आहेत-' हे सत्राच्या शेवटी परमारचे शब्द! या सगळ्या सवलती मिळण्यासाठी आवश्यक असे जातीचे प्रमाणपत्र मिळणार केव्हा, हा प्रश्नदेखील सत्रात आला. 

मुक्त मोर्चा 

तिसरे महत्त्वाचे सत्र म्हणजे कार्यकत्यांच्या व्यथांना मोकळे होण्याची खुली संधी, वाल्मीकी, काठियावाडी मेघवाड, लालबेगी, रुखी, मुस्लिम मेहेतर व बौद्ध अशा विविध समाजातील लोकांच्या या मेहेतर समाजाची सद्यस्थिती, इतिहास, सांस्कृतिक परंपरा व समस्या स्पष्ट करणारी टिपणं तीन कार्यकर्त्यांनी मांडली. मुस्लिम बेग समाजासंदर्भातील टिपण धुळ्याचे गफ्फार सुभान बेग, वाल्मीकी समाजासंदर्भातील टिपण पुण्याचे श्री. ओमप्रकार सारसर तर एकूण समाजाच्या संदर्भातील इतिहास आणि सद्यःस्थिती मांडणारे टिपण ठाण्याचे श्री. सुरेश बर्नवाल यांनी मांडले. त्यानंतर कैलाश चव्हाण, (अहमदनगर) राकेश सोदे, मीना घलोड व गीता सारसर, (सर्व पुणे), रमेश बिडलान, दीपक साळवे (सर्व मुंबई) जीवन जाधव, रामा गोहिल (वसई) देवीदयाल कुंड, राजपाल मरोठिया नरसी मकवाना, सौमेश परमार, मुकेश गेहलोत (ठाणे), सुरेश जाधव (पनवेल), भूपाल चंडोल (हैद्राबाद) अशा अनेक कार्यकत्यांनी खुलेपणाने मते व्यक्त केली.

व्यवसाय बदलण्यासाठी शिक्षण, तसेच प्रोत्साहन हवे, असा मुद्दा राकेश सोदे यांनी मांडला, ज्याला जवळपास सर्वच जणांनी पाठिंबा दिला. मुस्लिम मेहेतर व अन्य सर्व समाजाला आपल्या मागण्यांसाठी एक रहावं लागणार आहे, असे मत शेख अमजद यांनी व्यक्त केले. जवळपास सर्व वकत्यांनी 'सफाई कामगार संघर्ष समिती 'कडून योग्य मार्गदर्शन मिळावे व जाती प्रमाणपत्राची समस्या समितीने सोडवावी अशी अपेक्षा व्यक्त केली. 'आपल्या समाजातील युवा वर्ग भरकटला आहे. नवीन खोट्या व भ्रामक अशा आकर्षणात अडकला आहे व  एकंदर समाज भंगीच राहण्याच्या मानसिक गुलामीत दबला आहे.’ ही खंत व्यक्त करून हैद्राबादच्या भूपाल चंडालिया यांनी 'आंबेडकरी विचारधारेशिवाय' समाजात पर्याय नाही, असे ठासून सांगितले. समाज कर्जाच्या विळख्यात सापडला असून समाजातील लोकांमध्ये बचतीची सवय लावणे गरजेचे झाले आहे व त्यासाठी क्रेडिट सोसायटी किंवा एखादी बँंक समितीने पुढाकार घेऊन उभारावी, अशी सूचना ठाण्याचे सुरेश बर्नवाल यांनी केली. सफाई मुक्तीची सुरवात आपल्या घरापासून, स्वतःपासून करा, असे आवाहन ठाण्याचे श्री. देवीदयाल कुंड यांनी आपल्या मनोगतात केले. आपल्या समाजात विनाकारण छत्तीस जाती तयार झाल्या आहेत व म्हणून आपल्या समस्या अधिक गंभीर झाल्या आहेत, हे दुःख औरंगाबादच्या अजगर शेख यांनी बोलून दाखविले. ‘मुसलमान मेहेतर' नावाची जात अस्तित्वात असल्याची कागदोपत्री नोंद नसल्याने अशा मोठया वर्गाला सर्व सवलतीपासून वंचित राहावं लागलंय. आमच्या एकीपुढे सरकारची बहाणेबाजी आता चालणार नाही, असा विश्वास धुळ्याच्या गफार सुभान बेग यांनी व्यक्त केला. जातीजातीच्या बंधनामुळे समाज एक होत नाही, आपला इतिहास आता आम्हांला घडवायचा आहे, असे आवाहन वयोवृद्ध कार्यकर्ते श्री. पंडित तेजसिंह चटोले यांनी या सर्व उपस्थित कार्यकर्त्यांना केले.

संघर्ष समितीचे सहनिमंत्रक श्री. अमरनाथ चंडालिया यांनी या खुल्या सत्रात कार्यकर्त्यांच्या विचाराला दिशा देण्यासाठी काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की, लढाऊ समाज ही प्रतिमा निर्माण करणे गरजेचे आहे व ते कसे होईल याचे आत्मविश्लेषण  करावे, समाजमनातील स्वत:च्या हीनपणाची भावना कशी दूर करावी. समाजातील जुन्या कालबाह्य रूढी, परंपरा दूर करून नैतिकतेची प्रेरणा कशी द्यावी, समाजासाठी निरंतर लढणाऱ्या कार्यकर्त्यांची फौज कशी उभारावी, या प्रश्नांनी उपस्थित कार्यकर्त्यांना अधिक अंतर्मुख केले. समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी संघर्ष समितीचे माध्यम सक्षम आहे व गावोगाव निष्ठेने कार्य करणाच्या कार्यकर्त्यांची उभारणी आम्हांला करायंची आहे, असा निर्धार शेवटी श्री. अमरनाथ चंडालिया यांनी व्यक्त केला. या समाजाची गावोगाव जाऊन पाहणी करन 'नरकरसफाईची गोष्ट' हे पुस्तक लिहिणारे श्री. अरुण ठाकूर खुल्या सत्रात उपस्थित होते. कार्यकर्त्यांच्या भावनांची दखल घेऊन समाजाबाबतचे आपले मत मांडताना जातिव्यवस्थेच्या घृणास्पद वास्तवाची जाणीव त्यांनी कार्यकर्त्यांना करून दिली. एका वेळी अनेक स्तरांवर लढाई उभारावी लागेल. स्वत:च्या जातीतील लोकांची उन्नती करता करता जातिव्यवस्था अंताची लढाई करायची आहे, नोकरशाहीशी टक्कर घ्यायची आहे. शोषित घटक साऱ्या  भारतभर जागरूक होत आहेत, त्यांच्या परिवर्तनाच्या प्रवाहात सामील व्हायचे आहे, याची जाणीव त्यांनी कार्यकर्त्यांना करून दिली.

मोठा वाटा स्त्रियांना उचलायचा आहे - भारती चंडालिया 

स्त्रियांच्या सत्रात भारती चंडालिया, सुनीती सु.र. व लता भिसे या कार्यकर्त्यांनी अनुभव कथन केले. नोकरीत सफाई काम, घरी घरकाम व दैनंदिन व कौटुंबिक वातावरणातील रुढी परंपरा अशा तिहेरी बोज्यातून स्त्री आता वावरत आहे- आता महिलांमध्येही ठिणगी पेटवावी लागेल असे प्रतिपादन भारती चंडालिया यांनी केले. परित्यक्ता स्त्रियांच्या दुःख-दैन्याची जाणीव श्रीमती लता भिसे यांनी कार्यकर्त्यांना करून दिली. यानंतरच्या सत्रात 'कार्यकर्ता कसा असावा' यावर प्रा. संजय मं. गो. यांनी मार्गदर्शन केले.

समारोपाच्या सत्रात समितीचे ध्येय-धोरण व आगामी कार्यक्रम उपक्रमाबाबत सविस्तर चर्चा झाली. ठाण्याचे सुरेश बर्नवाल यानी जाति-प्रमाणपत्र, कायम स्वरूपी घरे, अंधश्रद्धा निर्मूलन, महिला-जागृती व समाज मंदिर निर्माण असा पाच-कलमी कार्यक्रम सुचविला. मुंबईचे श्री. रमेश बिडलान यांनी संघर्ष समितीच्या विस्ताराचा कार्यक्रम मांडला. ठिकठिकाणी शाखा स्थापना लाड समितीचा अहवाल प्रचार, संघर्ष समितीमध्ये व्यापक प्रतिनिधित्व, व स्त्रियांचा सहभाग हा सर्वांसाठी कार्यक्रमाबरोबर प्रयत्न व्हावा अशी त्यांनी मांडणी केली. ओमप्रकाश सारसर, पुणे यांनी येत्या सहा महिन्यांत ठिकठिकाणी मेळावे घेण्याची सूचना केली.

समारोपाच्या सत्रात कामगार नेते कॉ. भास्कर जाधव आवर्जून उपस्थित होते. सफाई कामगार वर्गात फुले-आंबेडकर विचारधारेची जोपासना करण्यासाठी शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाची आवश्यकता त्यांनी मांडली.

श्री. अमरनाथ चंडालिया व श्री. जगदिश खैरालिया यांनी शेवटी आढावा घेऊन आंदालनाची रूपरेखा मांडली. जातीच्या दाखल्यासाठी 1950 च्या वास्तव्याची अट रद्द करा, सफाई कर्मचाऱ्यांसाठी कायम घराची योजना राबवा, मलकानी, बर्वे व लाड समितींच्या शिफारशींना कायद्याचे स्वरूप दया व व्यवसाय बदलासाठी तरुणांकरता प्रशिक्षण व प्रोत्साहनाच्या योजना राबवा; अन्यथा 26 जानेवारीपासून मेहेतर समाज रस्त्यावर येईल असा इशारा जगदीश खैरालिया यांनी आपल्या भाषणात दिला.

शिबीर यशस्वी करण्यासाठी वीरपाल भाल, हिरजी गोहिल, प्रकाश चव्हाण, सोमेश परमार, यांनी खूप मेहनत घेतली.

Tags: भंगी समाज स्वच्छता कामगार सफाई कामगार मेहेतर समाज Casteism mehetar Community Cleaning Cleaning Workers Sanitation Workers #Weekly Sadhana weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके