डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

अमेरिका व युरोपच्या संरक्षण-सहकार्य योजना

युरोपातील संघराष्ट्रांनी नाटोबाहेर साठ हजार सैनिकांचे ‘जलद प्रतिकृती दल’ उभारण्याची योजना आखली आहे. त्याबद्दल अमेरिकेच्या शंका आहेत. दुसरीकडे अमेरिकेच्या महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय क्षेपणास्त्र संरक्षण कार्यक्रमाबाबत युरोपातील देशांच्या मनात चिंता आहे. परंतु अखेरीस एकमेकांवरील आक्षेप मागे घेतले जाऊन हातमिळवणी होईल असे दिसते.

अमेरिकेच्या अध्यक्षपदी रिपब्लिकन पक्षाचे नेते जॉर्ज डब्ल्यू. बुश यांची निवड झाल्यानंतर अमेरिकेचे संरक्षणमंत्री डोनाल्ड रम्सफेल्ड यांनी म्युनिकला प्रथमच भेट दिली आणि तेथे भरलेल्या संरक्षणविषयक परिषदेत अमेरिकेचे युरोपसंबंधी धोरण विशद केले. युरोपच्या संरक्षणासाठी नाटो करार संघटना स्थापन करण्यात आली असता आणि तिचा विस्तार करण्यात येत असता युरोपीय संघाने नाटोबाहेर साठ हजार सैनिकांचे दल उभारण्याची योजना आखली आहे. ‘रॅपिड रिअॅक्शन फोर्स’ (जलद प्रतिकृती दल) असे या दलाचे नाव आहे. त्याच्या उभारणीबाबत अमेरिकेच्या काही शंका असून त्यामुळे नाटो अस्थिर होईल, असा इशारा त्यांनी दिला. नाटोच्या अस्थिरतेबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आणि आपल्या काही अटी पुऱ्या झाल्यावरच अमेरिका या योजनेस पाठिंबा देण्याचा विचार करील असे सांगितले. या दलाच्या उभारणीने नाटोस अधिक बळकटी आली पाहिजे. नाटो जे कार्य करीत आहे तेच या दलाने करू नये आणि युरोपीय संघाबाहेरच्या देशांना त्यात प्रवेश असावा अशा अमेरिकेच्या अटी आहेत. नाटो संघटना अस्तित्वात असता युरोपीय संघाला वेगळे दल स्थापन करावेसे का वाटावे, असा प्रश्न अमेरिकन सिनेटर जॉन मॅकेन यांनी उपस्थित केला.

अमेरिका अलिप्ततेचे धोरण स्वीकारील अशी चिंता युरोपीय संघाला वाटते आणि ती चिंता दूर करण्यास प्रतिसाद म्हणून हे दल उभारण्यात येत आहे असे आपणांस वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. या बाबत अमेरिकेच्या शंका निराधार आहेत असे आश्वासन देऊन फ्रान्सचे संरक्षणमंत्री अॅलेन रिचर्ड म्हणाले. ‘‘युरोपीय संघ आणि नाटो एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत अशी मी कल्पनाच करू शकत नाही, आणि त्यांपैकी एक दुसऱ्याचा निर्णय आधीच कल्पून उपाय योजील असे घडणे शक्य नाही.’’ ब्रिटनचे सरंक्षणमंत्री जॉफहून यांनी सांगितले, ‘‘नाटोची भूमिका आपल्याकडे घेण्याचा युरोपीय संघाचा प्रयत्न नाही. युरोपीय संघ नाटोची साधनसामग्री दुसरीकडे वळविणार नाही किंवा ज्या कार्यासाठी नाटो खर्च करीत आहे त्याच कार्यासाठी खर्च करणार नाही. युरोपीय संघाचे धोरण खुले आणि सर्वसमावेशक राहील,’’ या आश्वासनानंतरही अमेरिकेच्या शंकांचे पूर्ण निवारण झाले नाही. युरोपीय संघ एक देश असता तर निर्णयप्रक्रिया सोपी झाली असती पण अनेक देश त्यात असल्याने निर्णयप्रक्रियेत घोळ निर्माण होईल अशी चिंता रम्सफेल्ड यांनी व्यक्त केली. तुर्कस्तान नाटोचा सभासद आहे, पण युरोपच्या सुरक्षिततेसंबंधीच्या निर्णयातून त्यास वगळण्यात येत आहे.

नाटो आणि युरोपीय संघ यांच्यातील दुवा त्यामुळे तोडला जात आहे, अशी तुर्कस्तानची तक्रार आहे. तिची दखल घेतली पाहिजे, असे अमेरिकेस वाटते. तर नाटोचा ज्या देशांशी संबंध येत नाही अशा देशांतील पेचप्रसंगासाठी हे दल उभारण्यात येत असल्याने त्या संबंधीच्या निर्णयात तुर्कस्तानला सहभागी करण्यात येत नाही, असे समर्थन युरोपीय संघातर्फे करण्यात येत आहे. तर नाटो आणि युरोपीय संघ यांच्या एकमतानेच या संबंधी निर्णय घेण्यात आले पाहिजेत, तसे न केल्यास नाटो सभासद आपला नकाराधिकार (व्हेटो) वापरू शकतात अशी तुर्कस्तानची भूमिका असून त्याचा उपयोग आपण करणार असल्याचे त्याच्यातर्फे सूचित करण्यात आले आणि त्याने त्याचा वापरही केला. 

तुर्कस्तानने हा नकाराधिकार मागे घ्यावा यासाठी अमेरिकेने त्याचे मन वळवावे; तसे त्याने केले नाही तर युरोपीय संघाला नाटो ज्या कार्यासाठी खर्च करते त्याच कार्यासाठी खर्च करणे भाग पडेल. दल उभारण्याची योजना युरोपीय संघ सोडून देणार नाही, असा इशारा पश्चिम जर्मनीचे परराष्ट्रमंत्री जोइका फिशर यांनी दिला. युरोपीय दल उभारण्याच्या बाबतीत युरोपीय संघ ठाम असल्याचे या परिषदेत दिसून आले; तर आपल्या राष्ट्रीय क्षेपणास्त्र संरक्षण कार्यक्रमाच्या बाबतीत अमेरिकाही ठाम असल्याचे अमेरिकेचे संरक्षणमंत्री रम्सफेल्ड यांनी सांगितले. या कार्यक्रमाबाबत युरोपातील देशांच्या काही शंका व चिंता असल्या तरी तो कार्यक्रम अमलात आणण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला, मात्र या कार्यक्रमास युरोपचे सहकार्य मिळविण्यासाठी युरोपातील देशांनीही त्यात सामील व्हावे, त्यांना त्याचे संरक्षण मिळेल असे रम्सफेल्ड यांनी सांगितले. अमेरिकेच्या या कार्यक्रमात रशियाचे अध्यक्ष पुतिन यांचे सचिव सर्जी इव्हॅनोद यांनी जोरदार विरोध केला; पण युरोपातील देशांनी मात्र त्यावर कडक टीका केली नाही. युरोपच्या देशांनीही या कार्यक्रमास पाठिंबा द्यावा असे त्यांना आवाहन करताना रम्सफेल्ड म्हणाले, ‘‘हा आपणांस विभागणारा प्रश्न नसून आपणां सर्वांची सुरक्षितता वाढविण्यासाठी सामुदायिक धोरण स्वीकारण्याची ही नवी संधी आपण घेणार आहोत.’’ क्लिंटन यांनी या कार्यक्रमाच्या समर्थनार्थ पूर्वी केलेली भाषणे आणि रम्सफेल्ड यांचे भाषण यांतील फरक म्हणजे उत्तर कोरिया, इराण आणि इराक विकसित करीत असलेल्या क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यांपासून संरक्षणासाठी क्लिंटन यांची योजना होती, तर आपला कार्यक्रम कोणत्या विशिष्ट देशाच्या धोक्याविरुद्ध असल्याचा उल्लेख रम्सफेल्ड यांनी केला नाही. क्लिंटन यांच्या योजनांपेक्षा हा कार्यक्रम अधिक दूरगामी आणि महत्त्वाकांक्षी असल्याचे रम्सफेल्ड यांनी सांगितले. हा कार्यक्रम अमलात आणण्याचा निर्धार हा बुश अध्यक्ष झाल्यानंतर अमेरिकेने हाती घेतलेला पहिला महत्त्वाचा पुढाकार आहे. ही अमेरिकेची जागतिक संरक्षण व्यवस्था असून अमेरिकेबरोबर दक्षिण कोरिया, इराणचे आखात यांसारख्या दूरच्या विभागात असलेल्या अमेरिकन लष्कराचे रक्षण करण्याचाही उद्देश त्यामागे आहे.

अमेरिकेने आता हा कार्यक्रम अमलात आणण्याचे ठरविल्यावर आता युरोपातील देश त्या बाबत अमेरिकेशी तातडीने विचारविनिमय करतील. युरोप किंवा आशियातील दोस्त राष्ट्रांच्या संरक्षणासाठी तेथेही ही अंतराळात हल्ला परतविणारी क्षेपणास्त्रे पाठविण्याची व्यवस्था करण्यात येईल. उत्तर कोरिया किंवा पश्चिम आशियातील देशांकडून क्षेपणास्त्र हल्ला झाला तर अशा हल्ल्यांपासून संरक्षणाची व्यवस्था या देशांजवळ सध्या नाही, याकडे रम्सफेल्ड यांनी लक्ष वेधले. अमेरिकेने केवळ स्वतःच्या संरक्षणासाठी हा क्षेपणास्त्र कार्यक्रम आखलेला नाही हे त्यांनी स्पष्ट केले. म्युनिकला ही परिषद झाली, त्याप्रमाणे संरक्षणविषयक धोरणाचा विचार करण्यासाठी दरवर्षी अशी परिषद भरत असते. तिला वीस देशांच्या संरक्षणमंत्र्याप्रमाणेच दोनशे संरक्षणतज्ज्ञ उपस्थित होते.

क्लिंटन यांनी आपल्या कार्यक्रमास नॅशनल मिसाइल डिफेन्स (एनएमडी) असे नाव दिले होते. पण बुश यांचा कार्यक्रम विशद करताना रम्सफेल्ड यांनी ‘संरक्षण’ शब्द वापरला नाही. तसेच अमेरिकेच्या या कार्यक्रमाबद्दल ज्यामुळे शंका उपस्थित होतील अशा कोणत्याही विशिष्ट परिस्थितीचा उल्लेख त्यांनी केला नाही. क्लिंटन यांच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाने रशियाशी अमेरिकेने केलेल्या क्षेपणास्त्र चाचणीबंदी कराराचा भंग होत आहे, अशी टीका त्या कार्यक्रमावर रशियाने केली होती आणि अमेरिकेने कार्यक्रम अमलात आणला तर आम्हीही नव्या शस्त्रांची चाचणी करू अशी धमकी रशिया व चीनने त्या वेळी दिली होती. रशिया व चीनने या कार्यक्रमावद्दल चिंता बाळगण्याचे कारण नाही असे सांगताना रम्सफेल्ड म्हणाले, ‘‘एखाद्या अण्वस्त्रधारी राष्ट्राच्या सबंध शस्त्रसाठ्याविरुद्ध हल्ला करण्याची ही योजना किंवा कार्यक्रम नसून देशावर टाकण्यात येणारी थोडी क्षेपणास्त्रे त्यांच्यावर आकाशातच मारा करून नष्ट करणे एवढाच या कार्यक्रमाचा उद्देश आहे.’’ क्षेपणास्त्र हल्ल्याचा धोका अमेरिकेस आहे तसाच युरोपातील देशांनाही आहे हे लक्षात घेऊन त्यांनी अमेरिकेच्या कार्यक्रमाशी सहकार्य करावे असे रम्सफेल्ड यांनी सांगितले. रम्सफेल्ड यांच्या या स्पष्टीकरणामुळे युरोपातील देशही अमेरिकेच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमास पाठिंबा देतील आणि त्याच्या बदल्यात युरोपीय संघाचे नाटोबाहेर वेगळे सैनिक दल उभारण्याच्या योजनेस अमेरिकेचाही विरोध राहणार नाही असे त्यांचे एकमेकांना सहकार्य चालू राहील असे दिसते.
 

Tags: क्षेपणास्त्र हल्ला नकाराधिकार तुर्कस्तान रम्सफेल्ड जॉर्ज बुश नाटो संघटना युरोपीय संघ अमेरिका राजकीय missile attack veto turkastan ramsfeld George bush nato European contries America political weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके