डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

परंपरा आणि नवता यांना जोडणारा सेतू

बापटांच्या मनात ज्यांच्याबद्दल पराकोटीचा आदर आहे, ज्यांनी ज्यांनी त्यांच्या अंतरंगात ‘ज्योतिर्दळे’ लावली, अशा थोर व्यक्तींच्या मानसचित्रांची गाथा म्हणजे ‘तेजसी’तल्या कविता. त्यात ज्ञानदेव, तुकाराम तर आहेतच, तसेच टिळक, जोतिबा, महात्माजी, विनोबा, पंडितजी, सुभाषबाबू, जयप्रकाशांखेरीज पटवर्धन बंधू हेही असणारच. एसेम तर त्यांच्या जिव्हाळ्याचेच. आणि त्या पहाडाएवढ्या काबुलीवाल्या म्हणजेच सरहद्द गांधींचेही एक चित्र आहे. शिवाय कुसुमाग्रज, बालगंधर्व, कुमार, सलिम अली, या विविध क्षेत्रांतल्या कर्तृत्ववान व्यक्तींची अत्यंत हृद्य अशी चित्रे आहेत. अब्राहम लिंकननासुद्धा, त्यांच्या हेडमास्तरांना लिहिलेल्या पत्राचा अनुवाद करून त्यांनी या गाथेत गुंफले आहे.

 

अस्तंगत कवींच्या काही कविता जन्मभर आपली सोबत करीत असतात. काळ मात्र इतका वेगानं धावत असतो, की पुन्हा पुन्हा त्यांचा आस्वाद घ्यायला पुरेसा वेळ मिळत नाही. त्याचा वेग कमी करणं आता अशक्यच, हेही क्षणाक्षणाला जाणवत असतं. पण तरीही या धावत्या काळालाही मनातल्या मनात तरी थोडं ब्रेक लावून थांबवणारं, कविवर्य वसंत बापट यांचं जन्मशताब्दी वर्ष आलं आणि पुन्हा त्यांच्या कविता त्यांच्याबरोबरच्या आठवणी घेऊन मनात ताज्या होऊन भेटायला येताहेत.

लहानपणी राष्ट्र सेवादलाच्या शाखेवर पहिल्यांदा, बापटांची कविता-गाणी भेटली होती. कॉलेजमधे शिरताशिरता कुसुमाग्रजांचा ‘विशाखा’ हाती पडला आणि चांगली कविता काय असते याची थरारक जाणीव झाली. आता वसंत बापट यांची कविताही पुस्तकरूपात भेटली. त्या पुस्तकात अत्यंत मनस्वी आणि आम्हीही तितक्याच मनस्वीपणे म्हटलेली ‘सदैव सैनिका, पुढेच जायचे’, ही एक कविता अजूनही ओठांवर येत असते.

वसंत वा शरद        तुला न ती क्षिती

नभात सूर्य वा       असो निशापती!

विशीर्ण वस्त्रही   विदीर्ण पावले

तरी न पावले कधी विसावले

न लोचना तुवां       कधी मिटायचे

सदैव सैनिका  पुढेच जायचे

यातील ‘क्षिती’ आणि ‘विशीर्ण’ या शब्दांचे अर्थ लहानपणीच अत्यंत आनंदानं कोशातून शोधून काढले होते!

जोवरी सुखाचा घास नसे सर्वांना

जोवरी न झाल्या उन्नत अवघ्या माना

जरि निघून गेले परके अपुल्या देशी

आम्हीच आमुचे गुलाम हिंदुस्थाना

याची प्रखर जाणीव या कवितांनी करून दिली.

तशीच ती दीर्घ कविता ‘झेलमचे अश्रू’.

फाळणीनंतर झालेल्या उद्रेकाचे शहारे आणणारे वर्णन बापट करतात आणि हताशपणे म्हणतात...

व्यर्थची गेली उपनिषदांची वाणी?

मानव शिकला नाही काही कुराणी?

व्यर्थ तयाच्या पुढती ठरली गीता

बुद्ध नि येशू सर्वांवरती पाणी

आणखी आता ही एक वेगळीच, आमच्याच ओठांवर नव्हे तर आमच्या पुढच्या पिढीच्याही मुखी खेळणारी ‘धावणारी दख्खनची राणी’! ती तर अगदी वेगळीच. कवितेत खंड्याळ्याच्या घाटाचं वर्णन करताना बापटांच्या शब्दांचा थाट तर काय वर्णावा!

निसर्ग नटला बाहेर घाटात

पर्वत गर्वात ठाकले थाटात

चालले गिरीशमस्तकांवरून

आकाशगंगांचे नर्तन गायन

झेलून तयांचे नुपूर घुंगूर

डोलती डौलात दूर्वांचे अंकुर

डेक्कन क्वीनचा पूर्वी होणारा तो घाटातला नेत्रसुखद प्रवास आज संपला असेल, पण या कवितेची मोहिनी मात्र ओसरत नाही.

नथुराम गोडसे या (विकृत) माणसाने राष्ट्रपित्याचा खून केला, तेव्हाचा आत्यंतिक शोक शब्दांमधून व्यक्त करणाऱ्या कविता बापटांनी लिहिल्या, त्यातली एक उपहासगर्भ कविता ‘चालू दे जयनाद’.

निर्मी धूलिमधून ‘मानव’ म्हणे - मोठाच हा विक्रम

आम्ही मानवता धुळीस मिळवू - थोडाच हा व्युत्क्रम

जो गेला उरलो आम्ही सहज झाला पराभूत तो!!

सूडाची जळताच चूड विझला की शांतीचा दूत तो

कामक्रोधही जिंकिले परि न त्या आम्हां कुठे जिंकिले?

त्याने मत्सर मारिला! परि आम्ही मारून त्या टाकिले!!

तो सर्वज्ञ, परी तया कुटिलता ना आमुची ठाउकी

मोठा बुद्ध असेल तो! परि आम्ही निर्बुद्ध होतोच की

अशा त्या कवितेतील एकेक ओळी!

‘बिजली’मधल्या ‘माझी कविता’ या पहिल्याच कवितेत बापटांनी वर्णन केलं आहे,

अंगी अग्निशिखा, शिरावर तिच्या विद्युल्लतेची फुले

‘केवळ सौंदर्य केवळ आनंद’ ही कविता फक्त निसर्गानुभवातून होणारं अमृतपानच आहे. त्या कवितेच्या शेवटी बापट म्हणतात,

पाच नद्यांतून मन:सागरात

आनंदजळाचे पूर भरतात

पंचरंगांच्या या इंद्रधनुष्यात

चित्तचंडोलही भरारी घेवोत

पाच राजहंस माझ्या पालखीला

उचलती उंच आनंदमयात

कशाचा बोध?

ताप्तर्य शोध?

जय शब्द-स्पर्श-रस-रूप-गंध

केवळ सौंदर्य केवळ आनंद!

या संग्रहात प्रेमकविता आहेतच, पण एकट्या ‘बिजली’वर किती लिहायचं? बिजलीतून बापटांचं निसर्गप्रेम, समाजाबद्दलचा कळवळा, प्रीतिभावनेबद्दलच्या छटा आणि आणखी काय काय व्यक्त होत राहते आणि त्यातूनच त्यांची जीवनदृष्टी स्पष्ट होत जाते.

बापटांच्या सर्वच कवितासंग्रहांचा वेध स्वतंत्रपणे तर नाहीच आणि इथे तो साकल्यानं घेणंही शक्य नाही. त्यांनी लिहिलेल्या कविता या किती बहुरूपिणी, जीवनाच्या परिचित, अपरिचित असंख्य दालनांशी निगडित आहेत, त्यांचे हृद्य दर्शन घडवणाऱ्या आहेत! ती एक कविता, ‘केवळ माझा सह्यकडा’, एका राजकीय परिस्थितीत तिचा जन्म झाला. आजच्या घडीला त्यातल्या काही ओळी अनाठायीही वाटतात. पण तिच्यातून व्यक्त होणारी महाराष्ट्राची अस्मिता, अभिमान, त्यामुळे ती कविता आजही आमच्या पाठीचा कणा ताठ ठेवते.

‘बिजली’ नंतर बापटांचे ‘सेतू (1957)’, ‘अकरावी दिशा’ (1962), ‘सकीना’ (1972), ‘राजसी’ (1991),  ‘तेजसी’ (1991), ‘रसिया’ (1993), ‘मानसी’ (1977), ‘प्रवासाच्या कविता’ (1962), ‘शिंग फुंकिले रणी’ (1982), ‘मेघहृदय’ (1988), ‘शूर मर्दाचा पोवाडा’ (1988), ‘शततारका’ असे संग्रह प्रकाशित होत गेले. ‘अनामिकाचे अभंग आणि इतर कविता’ त्यांच्या निधनानंतर म्हणजे (2008) मधे प्रसिद्ध झाला. बापटांनी विपुल गद्यलेखनही केलेलं आहे. शिवाय बालवाचकांसाठीही काही पुस्तकं लिहिलेली आहेतच! या सर्व साहित्यातून बापटांची देशाशी, महाराष्ट्राशी असलेली निष्ठा ठायी ठायी प्रकट झाली आहे. तसेच त्यांचा समाजवादी दृष्टिकोन आणि विज्ञाननिष्ठाही लक्षात येते. राजकारण त्यांना कधीच वर्ज्य नव्हतं. वेळोवेळी घडलेल्या वेगवेगळ्या घटनांवर त्यांच्या प्रतिक्रिया कधी काव्यरूपात तर कधी गद्यरूपात व्यक्त होत राहिल्या.

‘सेतू’ या संग्रहात आरंभीच बापटांनी आपली काव्यविषयक भूमिका मांडली आहे. त्यात ते म्हणतात, ‘‘मी कविता का लिहितो याचं एकच एक उत्तर मला देता येणार नाही. याचाच अर्थ असा की माझी काव्यविषयक भूमिका वारंवार बदलत आलेली आहे. इतकेच नव्हे तर एकाच वेळी एक भूमिका ठेवण्याचेही मला जमलेले नाही.’’

बापटांना लहानपणापासूनच संस्कृतचे स्कॉलर असलेल्या वडिलांकडून संस्कृत शिकण्याची गोडी लागली होती. पुढे शाळेतले शिक्षक श्री. फणसे यांच्यासारख्या शिक्षकाकडून त्यांना कालिदास, भवभूती यांच्या नाटकांची ओळख झाली. वडिलांबरोबर त्यांचे अमरकोश, गीता यांचे वाचन झाले. त्यानंतर कालिदासाच्या रघुवंशाचे वाचन सुरू झाले होते. बापट म्हणतात, ‘‘वडिलांमुळे संस्कृत वाङ्‌मयाची स्वर्गंगा त्यांच्या कानांवर सारखे गोड आघात करू लागली.’’ पण त्या आधी बापटांच्या मनात लयबद्ध रचनेचा चाळा सुरू झालाच होता.

बापटांनी लिहिलं आहे, ‘‘कवीला प्रतीत होणारी लयीची भिन्न रूपं म्हणजे छंद. लय म्हणजे मनाच्या अणुरेणूंत भरलेली आणि कानांनी नव्हे तर गूढ श्रवणेंद्रियांनी अनुभवलेली ती लय. छंद हा तिचा प्रकट उद्‌गार. छंदोमयी वाणीच्या वरदानाची जाणीव झाली त्या क्षणी मी कवी झालो. अर्थात छंद हे काव्याचे एक अंग आहे. प्रथम मला तेवढेच जाणवलेले होते, अगदी आपसूक जाणवलेले होते.’’

संस्कृत वाङ्‌मयाच्या अशा अभ्यासामुळे बहुधा प्रतिभावंत बापटांची शब्दकळा इतकी बहारदार खुलतच राहिली. उदा. ‘जय भारतवर्ष महान’! या कवितेतील या ओळी,

जय हिंद, हिंद आनंदभुवन, जय भारतवर्ष महान्‌

हा रजतशिखरधर गिरिवर सुंदर उत्तरेस हिमवान्‌

हे नीलगगनगत चक्र सुदर्शन तळपत वरि भास्वान्‌

हे चंद्रचलितजल ऊर्मिल सागर मन्द्र गाति जयगान

जय हिंद, हिंद आनंदभुवन, जय भारतवर्ष महान्‌

मात्र बापट संस्कृतच्या प्रेमात अडकून राहिले नाहीत. त्यांना इंग्रजी काव्याचीही गोडी लागली आणि भावकविता काय असते हे उमजले. मराठीतील काव्याचे संत-तंत-पंत कवींच्या काव्यानंतरच्या आधुनिक काव्याची ओळख झाली. त्याचबरोबर सभोवतालच्या वास्तवाचा, सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा जबरदस्त परिणाम त्यांच्या काव्यदृष्टीवरही झाला. बापटांनी म्हंटलं होतं की, जे समष्टीच्या भावनांचे प्रतिनिधित्व करते, लोककल्याणासाठी ज्याचा जन्म झाला आहे, हे निजलेल्यांना उठवते, उठलेल्यांना कार्यान्वित करते ते साहित्य- अशी समजूत मी करून घेतली. ‘स्वान्त:सुखाय’ हे तत्त्व ‘बहुजनहिताय’ या तत्त्वाने झाकून टाकले. त्यामुळे माझ्याही काव्याला एक प्रयोजन निर्माण झाले. पुढे बापट असेही म्हणतात, ‘‘काव्याला काव्यबाह्यप्रयोजन असल्याने काव्याची हानी होईलच असे नाही. पण रचनेची आशयावर कुरघोडी झाली म्हणजे जशी काव्याची हानी होते त्याचप्रमाणे पुष्कळ वेळा काव्याचे एखादे काव्यबाह्यप्रयोजन काव्यापेक्षा डोईजड होऊन बसते.’’ आजही याची असंख्य उदाहरणे उत्साही कविजनांच्या कवितांमधून आपल्याला दुखवतातच! पण बापटांच्या सप्रयोजन कविताही त्यांच्या समाजनिष्ठेच्या आणि व्यक्तिमत्त्वाच्या एकरूपतेतूनच निर्माण झाल्यामुळे त्यातील प्रयोजन खुपत नाही.

‘सेतू’च्या प्रस्तावनेतील स्वत:च्या काव्यनिर्मिती-बद्दलचे सखोल विवरण करीत शेवटी बापट म्हणतात, ‘‘रस, कल्पना, भावना या सर्वांच्या पलीकडे एकूण सर्वच मराठी कविता गेली आहे. जाणीव म्हणा किंवा वस्तुजालाविषयीची आत्मकेंद्रित अनुभूती, ज्या त्या कवीचे बाह्यजीवन, भावविश्व, जीवनदृष्टी, सौंदर्यकल्पना यांत फरक पडत असल्यामुळे मराठी कविता एखाद्या विचित्रवीणे-सारखी होईल आणि तिच्या शेकडो तारांत माझीही एक तार असेल, अशी मला आशा आहे.’’

आपणही याचं प्रत्यंतर घेतच आहोत.

‘सेतू’ ही कविता तिच्यामधील ताज्या टवटवीत प्रतिमांनी मनावर गारूड करते. कवीला शरद ऋतूतली पहाट म्हणजे आरस्पानी कांतीची रूपसुंदर तरुणीच भासते आहे.

तिचे राजविलासी स्नान नुकतेच झाले आहे. खुद्द अष्टदिशांनी दासी बनून तिला न्हाऊ घातले आहे. सोनेरी उन्हाचे मुलायम वस्त्र तिने ‘कर उंचावून’ ओढून घेतले आहे. निळ्या आकाशात ती क्षणभर ओठंगून उभी राहते आणि लगेचच ही अल्लड तरुणी आपलं लाल ओलसर पाऊल उचलून चालायला लागते आहे...

तिच्या फुलबागेचे वर्णनही बापट हरखून जावे असेच करतात.

झेंडु गेंदेबाज गळ्याशी बिलगून बसले

शेवंतीचे स्वप्न सुनहरे आजच हसले

निर्गंधांचे रंग पाहुनी गहिरे असले

गुलाब रुसले, ईर्षेने फिरूनी मुसमुसले

फुलाफुलांची हनु कुरवाळत अल्लड चाले

तृणातृणांशी ममतेने ही अस्फुट बोले

आणि पुढच्या दोन ओळींत येतो तो बापटांचा मिस्किलपणा

वात्सल्य न हे हेही यौवनविभ्रम सारे

सराइताला समजावे हे मुग्ध इशारे!

आणि शेवटी बापट अत्यंत नाट्यमयतेने म्हणतात,

ही शरदामधली पहाट... की ...ती तेव्हाची तू?

तुझियामाझ्यामधे पहाटच झाली सेतू?

‘ती’ त्या वेळेस भेटलेली ‘तू’ अगदी या पहाटेसारखीच भासली होतीस असं कवी म्हणतो आणि ही पहाट त्या दोघांमधला ‘सेतू’ झाली आहे असं (त्याला आणि आपल्यालाही) वाटतं!

बापटांनी प्रेमकविता तर विपुल म्हणाव्यात इतक्या लिहिल्या. त्यात मध्यमवर्गीय मानसिकतेला कुरवाळणाऱ्या बऱ्याच आहेत आणि काही कविता इतक्या (इंटेन्स) उत्कट, आर्त आहेत की त्या वाचून संवेदनशील मन गलबलून जावे. त्यांच्या ‘मानसी’ या लहानशा संग्रहातल्या कवितांमध्येे ही उत्कटता प्रकर्षाने जाणवते. ‘मानसी’त म्हटलं तर स्वतंत्र अशा छत्तीस कविता आहेत. पण खरं तर ती विकल प्रीतीच्या उद्‌गारांची एकच एक घायाळ करीत जाणारी मालिका आहे. त्यांच्या ‘राजसी’ या संग्रहातल्या कवितांचे त्यांनी तीन विभाग केले आहेत. त्यातला पहिला भाग म्हणजे ‘राजसच्या कविता’. या कविता व्यक्तिगत भावजीवनातून जन्म घेणाऱ्या आहेत, असं म्हटलं आहे. त्यातही या प्रकारचीच प्रेमकविता आहे. पण ‘मानसी’ची उत्कटता त्यातून जाणवत नाही.

पण त्यांची ‘प्रियंवदा’ ही दोन आश्रमकन्यांच्या संवादाची कविता. ही एक अशीच अत्यंत मनोरम, नाट्यमय म्हणावी अशी कविता आहे. प्रारंभीच बापट नाट्यसंहितेत असते तसे, ‘स्थळ : मालिनीतीर, काळ : वैशाखी दुपार, व्यक्ती : अनसूया, प्रियंवदा’ असं नमूद करतात. पुढे आपोआपच त्या कण्वमुनींच्या आश्रमातील वातावरणाची आपल्याला कल्पना येते. मग या दोन सख्यांच्या हितगुजाचा सुरुवातीचा संयत स्वर पुढे प्रियंवदेच्या गहिऱ्या वेदनेतून असा काही अनावर होत जातो, आणि शेवटच्या ओळींमध्येे तारुण्याच्या उंबरठ्यावरच्या प्रियवंदेची वेदना, हताशता व्याकूळ करीत राहते.

बापटांची वाणी अत्यंत स्पष्ट, स्वच्छ. साहित्याबरोबरच संगीत, नाटक, राजकारण, समाजकारण या अशा सर्वच विषयांबद्दलची त्यांची यथार्थ जाण, त्यांची उत्साही वृत्ती, कमालीचा हजरजबाबीपणा यांमुळे ते निवेदन करत तो काव्यवाचनाचा कार्यक्रम वा अन्य कार्यक्रम अगदी खुलतच राहायचा. त्यामुळे निवेदक म्हणून त्यांची ख्याती होतीच. पण कविता नुसतीच वाचायची नसते, ती ऐकायचीही असते याची जाणीव, बापट, करंदीकर, पाडगावकर यांनी करून दिली. छापील शब्दांना हे तिघंही जण आपल्या वाचिक अभिनयातून जिवंत करीत. कविता कानांतून शिरायची ती थेट मनापर्यंत पोचायची. समूहमन तर प्रभावित होत असेच; पण गर्दीतही काही कवितांमधल्या तरल अनुभूतींशी श्रोते एकेकट्यानं समरस होत असत.

‘सकीना’ ही कविता एकदा वाचली की विसरायलाच नको. कवितेतील विषयाला अनुकूल अशी शब्दकळा बापटांना कशी सुचत असते याचं उत्तम उदाहरण.

महिरपवासी ओठ मिजासी कट्यारकाबिल नाक तुझे

नैनांमधुनी ऐना तळपे... उमजावे ते मी उमजे

तुला नं ठेविल सदा सलामत जर या मालिक दुनियेचा

कसा सकीना, यकीन यावा कमाल त्याच्या किमयेचा!

बापटांच्या भूल घालणाऱ्या भाषेमुळे काही कविता नेहमीच जरा मोठ्याने गुणगुणत राहाव्यात अशा वाटतात. त्यातल्या काही म्हणजे ‘रात्र - झेलमच्या बागेत’, ‘तू गर्भालस’ आणि ती ‘फूलन’वरची कविता आणखी वेगळी.

थंड बदामी ऐषारामी मत्त मोगली रात्र

जिथल्या तेथे झिंगत झुलते अमली झेलमपात्र

अवघे अंबर झाले झुंबर अत्तरगंधित वारे

गीत इराणी गाती कोणी धुंद अफीमी वारे...

मूर्तिमती तू पहाटपूजा गाभाऱ्यातील तू समई

तूच फुलांची परडी झालीस फुले वेचिता स्वप्नमयी

दहिवरलेली उन्हे नेसुनी जाता हे दवबिंदुमुखी

मज पाप्याची नजर निवावी ही किमया घडते नवखी

देवालाही असेल आई ही पटते तेव्हा खात्री

तू गर्भालस गौर केतकी धुंद धुके भरले नेत्री...

भाषा विषयानुरूप कशी वाकवायची, फुलवायची ही कला वशच होती बापटांना.

लग्नाच्या दादल्याचा झिंजाडून दुखवटा

फूलनने फेकला ओरबाडून मुखवटा

सर्कन भिरकावला काडतुसी कमरबंद

चामड्याचे जाकीट... करकचणारा दुपट्टा

‘आदिरहस्य’सारख्या काही कवितांतून बापटांचा नव्या तंत्रज्ञानाबद्दलचं, विज्ञानाबद्दलचं कुतूहल, ज्ञान आणि आदर स्पष्ट होतात. एक पोलाद कारखाना पाहून आल्यावर त्यांना विश्वरचनेची रंगीत तालीम पाहिल्यासारखे वाटते. त्या कारखान्यात चालू असलेल्या निर्मितीचे विस्मयकारक वर्णन बापट करतात. मध्येेच, त्यांचा खापरपणतू पुढच्या काळात कोणते गणित सोडवेल याची मजेदार कल्पना त्यांच्या मनात येते आणि ते लिहितात,

‘प्लुटोपासून पृथ्वीपर्यंत सूर्य दिसला हजार वेळ तर दर सेकंदाला वेगमान काय हवे? त्यातले एक पोर मोठ्याने म्हणेल हे गणित की पोरखेळ?’

‘लावणी अखेरच्या विनवणीची’ यामध्ये बापट लिहितात,

हे एकच आता अखेरचे मागणे

रे मैफल तुमची अखंड चालो अशी

आम्ही जाणारच की पटदिशी

मृत्युविषयक अशी निर्भय जाणीव बापटांच्या स्वभावाचीच द्योतक आहे.

त्यांच्या कवितेत अभंग आहेत, पोवाडे आहेत, ‘प्रवासाच्या कविता’ आहेत, ‘देह मंदिर, चित्र मंदिर’ अशी प्रार्थनागीतं आहेत, पूर्वसंचिताचा अभिमान बाळगणारी गणेशगीतं आहेत, नृत्य-नाटिकागीतं आहेत, समूहांनी जोशात म्हणावीत अशी गीतं आहेत, भावकविता तर आहेतच आहेत, ‘जाणीव म्हणा किंवा वस्तुजाताविषयीची आत्मकेंद्रित अनुभूती म्हणा हीच काव्याची जननी आहे.’ असं मानणाऱ्या बापटांची कविता खरोखरीच बहुरूपिणी आहे. 

बापटांच्या मनात ज्यांच्याबद्दल पराकोटीचा आदर आहे, ज्यांनी ज्यांनी त्यांच्या अंतरंगात ‘ज्योतिर्दळे’ लावली, अशा थोर व्यक्तींच्या मानसचित्रांची गाथा म्हणजे ‘तेजसी’तल्या कविता. त्यात ज्ञानदेव, तुकाराम तर आहेतच, तसेच टिळक, जोतिबा, महात्माजी, विनोबा, पंडितजी, सुभाषबाबू, जयप्रकाशांखेरीज पटवर्धन बंधू हेही असणारच. एसेम तर त्यांच्या जिव्हाळ्याचेच. आणि त्या पहाडाएवढ्या काबुलीवाल्या म्हणजेच सरहद्द गांधींचेही एक चित्र आहे. शिवाय कुसुमाग्रज, बालगंधर्व, कुमार, सलिम अली, या विविध क्षेत्रांतल्या कर्तृत्ववान व्यक्तींची अत्यंत हृद्य अशी चित्रे आहेत. अब्राहम लिंकननासुद्धा, त्यांच्या हेडमास्तरांना लिहिलेल्या पत्राचा अनुवाद करून त्यांनी या गाथेत गुंफले आहे.

एस.एम.जोशींवर लिहिलेल्या एका कवितेतल्या काही ओळी अशा आहेत,

‘एस्सेम तुम्ही आमच्या अंतरंगी असंख्यात ज्योतिर्दळे लावली

जरी दाट अंधार आहे सभोती तरी आमची वाट तेजाळली

दिली ध्येयनिष्ठा दिली कार्यनिष्ठा

मनी रेखिली श्रमाची प्रतिष्ठा

समाजार्थ नि:स्वार्थ सेवा कराया तुम्ही त्यागदीक्षा आम्हांला दिली

एस्सेम तुम्ही आमच्या अंतरंगी कृतीने नवी प्रेरणा कोरली’

या मानसचित्रांच्या आरंभीच्या बापटांचं निवेदन असं आहे,

‘‘माणसाचा देह दुबळा. साडेतीन हातांचा नाशिवंत. पण त्या देहाच्या माध्यमातून व्यक्त होणारे चैतन्य केवढे प्रखर, कसे अमाप! अशा महान व्यक्तित्वांचा उत्कट प्रत्यय आला की त्यांचे अंतरंग दर्शन घडवण्याची प्रबळ इच्छा होते आणि ती मला मुखर करते. माणसाची थोरवी, मग माणूस कोणत्याही क्षेत्रातला असो, मुक्त मनाने गाताना उदात्ततेचे काही वेगळेच अनुभव येतात, त्यांची ही गाथा.’’

बापटांनी त्यांच्या कुसुमाग्रजांवरील कवितेत त्यांना ‘हे मुक्त विहंगम’ म्हणून संबोधले होतं. आज बापटांसाठीही तेच संबोधन अगदी समर्पक वाटतं. कितीही लिहिलं तरी या लेखाच्या अधुरेपणाची मला जाणीव आहे. ‘किती रे तुझे रंग, किती रे तुझ्या छाया’ अशा बापटांच्या कवितांच्या अफाट आकाशाचे चित्रण करणं किती कठीण!

Tags: जन्मशताब्दी विशेषांक वसंत बापट weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके