डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

भ्रष्टाचारविरोधी आंदोलन व्यापक व्हायला हवे

भ्रष्टाचार विरोधातील लढाई वैयक्तिक पातळीवर ठेवून काहीच साध्य होणार नाही. ती व्यापक केली पाहिजे. भ्रष्टाचार निर्मूलन व स्वच्छ राजकारण यांची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून कार्यक्रम आखले पाहिजेत व जनतेच्या सर्व घटकांना अशा कार्यक्रमांत सामील करून घेतले पाहिजे.

गोपाळ कृष्ण गोखले आम्हा कार्यकर्त्यांना नेहमी सांगायचे, राजकीय सत्ता ही राष्ट्र व देशाची सेवा करण्यासाठी, या देशातील सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी वापरण्यात आली पाहिजे. त्यासाठी देशावर प्रेम असणारे, जनकल्याणाची आस असणारे असे स्वार्थत्यागी, सेवाभावी व अनुभवी कार्यकर्ते यांच्या हातात सत्ता असावयास हवी. परंतु तसे घडले नाही. स्वातंत्र्य आंदोलनातील नेत्यांचे हौतात्म्य, त्यांचे योगदान स्वार्थत्याग व स्वप्ने ही सर्व उद्दिष्टे आज काळाच्या पडद्याआड विस्मृतीत फेकली गेली आहेत. म्हणूनच आजची परिस्थिती ही अंधकारमय आहे. भ्रष्टाचाराने आज जीवनाची व व्यवहाराची सर्व अंगे व्यापली आहेत. तो सर्वदूर व सर्वव्यापी झाला आहे. शासन व्यवस्थेत भ्रष्टाचार हा अलिखित परंतु काटेकोरपणे ज्याची अंमलबजावणी होते असा नियम झाला आहे. राजकीय पक्षांनी आपली विश्वासार्हता गमावली आहे तर राजकीय नेते नीतिमत्तेला सोडचिट्ठी देऊन बसले आहेत. अशा नीतिमत्ता हरवलेल्या काळात देखील सामान्य माणूस नीतिमत्तेचा आदर करीत सत्याच्या बाजूने उभा आहे. म्हणून खैरनार हे एकटे नाही. भ्रष्टाचारविरोधी समाज-मन त्यांच्या सोबत आहे. सत्ता श्रेष्ठ नाही तर सत्य श्रेष्ठ आहे हे समीकरण लोकांनी उचलून धरले आहे, हे खैरनार यांच्या सभांना ठिकठिकाणी होणारी गर्दी सांगत आहे, ती खैरनार यांना भ्रष्टाचारविरोधाचे प्रतीक मानते. म्हणून खैरनार यांच्या सभांतून, निर्भीड व स्पष्ट भाषणांतून, सत्य परंतु कडव्या अनुभवकथनातून लोकांमध्ये, भ्रष्टाचाराच्या विरोधात चेतना निर्माण होत आहे. ही चेतना, हा उत्साह टिकवला पाहिजे, वाढवला पाहिजे यासाठी खैरनार यांनी आतापर्यंत केलेले सर्व आरोप सप्रमाण पुराव्यानिशी सिद्ध केले पाहिजेत.

आज सामान्य माणसाला इच्छा नसताना कधी कधी भ्रष्टाचारात सामील व्हावे लागते. भ्रष्टाचाराला सोबत करावी लागते म्हणून भ्रष्टाचाराशी सर्वांचाच कोठे ना कोठे संबंध आला आहे आणि त्यामुळे भ्रष्टाचारविरोधी आंदोलन यशस्वी होणारच नाही हा युक्तिवाद संपूर्णपणे खोटा आहे. कारण या समाजव्यवस्थेत लोक भ्रष्टाचाराचे साथीदार नसून नाईलाजाने ते भ्रष्टाचाराचे बळी ठरत आहेत. लोकांना स्वच्छ राजकारण हवे आहे, नव्हे ती त्यांची गरजच आहे. बिगर राजकीय चळवळीवर लोकांचा विश्वास वाढू लागला आहे. परंतु अशी चळवळ राजकीय बदल घडवण्यासाठी असली पाहिजे. अन्यथा त्या चळवळीला काही अर्थ राहणार नाही. ती प्रभावशून्य राहील. परंतु एक मात्र खरे की लोकांना जे हवे असते त्याची निर्मिती ते करतातच, हा इतिहास आहे. आज लोकांना स्वच्छ राजकारण हवे आहे आणि ते निर्माण करणे लोकशाहीत त्यांना अशक्य नाही. मात्र त्यासाठी मनाचा ठाम निर्धार असायला हवा.

जयप्रकाश नारायण यांचे नवनिर्माण आंदोलन, व्ही. पी. सिंग यांचे बोफोर्स खरेदी भ्रष्टाचार प्रकरण, अंतुलेंचा सिमेंट भ्रष्टाचार या सर्व आंदोलनांनी आरोपींना सत्तात्याग करण्यास भाग पाडले, आज खैरनारांच्या मागे भ्रष्टाचारविरोधी लढयात मोठया संख्येने लोक सामील होत आहेत. कदाचित खैरनार यांच्या आरोपांच्या भडिमारामुळे शरद पवार यांना सत्ता गमवावी लागणारही नाही आणि त्यांच्या सत्तेतून जाण्यानेही फारसा फरक पडणार नाही. कारण भ्रष्टाचार हा संपूर्ण व्यवस्थेचाच भाग बनला आहे. ही व्यवस्था बदलली पाहिजे, त्यासाठी एकूण राजकारण बदलले पाहिजे. एका नवीन निर्माणासाठी, कन्या राजकारणासाठी लोकांची मानसिकता घडवली पाहिजे. भ्रष्टाचार-विरोधातील ही लढाई खैरनार-पवार अशी वैयक्तिक पातळीवर ठेवून काहीच साध्य होणार नाही, ती व्यापक केली पाहिजे. भ्रष्टाचार निर्मूलन व स्वच्छ राजकारण यांची निर्मिती असे उद्दिष्ट ठरवून कार्यक्रम आखले पाहिजेत. जनतेच्या सर्व घटकांना अशा कार्यक्रमांत सामील करून घेतले पाहिजे. अन्यथा भ्रष्टाचारविरोधी मोहिमांचे यापूर्वी जे झाले तेच या वेळीही होईल. म्हणजे पूर्वी भ्रष्टाचारविरोधी आंदोलने यशस्वी ठरली नाहीत असे नाही. त्या आंदोलनांमध्ये भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन हा कार्यक्रमच नव्हता. असे नसेल तर लोकांमध्ये नैराश्य निर्माण होते. भ्रष्टाचार हा कायम आहे. तो निपटून काढणे शक्य नाही असा लोकांचा गैरसमज होतो आणि तसे होणे जास्त घातक आहे म्हणून ते व्यापक होणे गरजेचे आहे.

खैरनार हे कोणत्या तरी पक्षाचे राजकारण करत आहेत असा आरोप त्यांच्यावर केला जातो. तो वास्तवाला धरून नाही. कारण खैरनार जे बोलत आहेत ते त्यांच्या सेवाकाळात त्यांना आलेले अनुभव आहेत. ते करत असलेल्या आरोपांमध्ये मुख्य आरोप हे शरद पवार आहेत यांच्यावर जरी असले तरी त्यांनी फक्त काँग्रेस पक्षालाच लक्ष्य केलेले नाही. त्यांना आलेल्या अनुभवांवरून इतर पक्षांच्या नेत्यांवरही ते आरोप करत आहेत. परंतु एक मात्र खरे की, काही राजकीय शक्ती खैरनारांचा आपल्या राजकीय फायद्यासाठी वापर करून घेत आहेत. खैरनारांनी अशा शक्तीपासून सावध राहावयास पाहिजे. तसे न राहिल्यास ते या आंदोलनाला विनाशकारी दिशा देतील आणि हे आंदोलन दिशाहीन करत अद्यापपर्यंत या आंदोलनाची दिशा आणि विचार या वाबी ठरलेल्या नाहीत. त्या लवकरच निश्चित कराव्या लागतील. त्यांची उद्दिष्टे ठरवावी लागतील, तरच हे आंदोलन खैरनार यांचे आंदोलन न राहता लोकांचे भ्रष्टाचारविरोधी आंदोलन म्हणून आकारास येईल.

अलीकडील काळात राजकारणाचे गुन्हेगारीकरण मोठ्या झपाट्याने होत आहे. लोकशाहीचा आधार घेतघेतच गुंडशाही फोफावू लागली आहे. याला आळा घालण्यासाठी अशा व्यापक आंदोलनाची तर गरज आहेच पण काही कठोर आणि मूलभूत उयायही करण्याची गरज आहे. राजकीय गुन्हेगारीतून पुढे आलेल्या भ्रष्ट आणि जनविरोधी लोकप्रतिनिधींना परत बोलवण्याचा अधिकार मतदारांना दिला पाहिजे. आजच्या घडीला ही मागणी बाजूला ठेवावी लागेल. कारण अशा अधिकारांचा गैरफायदा उठवण्याची शक्यता अधिक आहे. परंतु युरोपीय देशांत प्रचलित असलेली यादीपद्धत अवलंबणे शक्य आहे. या पद्धतीनुसार प्रत्येक नोंदणीकृत आणि राष्ट्रीय पातळीवरील पक्षाने आपल्या उमेदवारांची क्रमवारीने एक यादी निवडणूक आयुक्तांना सादर करावी. आपल्या निवडणूक जाहीरनाम्याच्या आधारावर मतदारांकडे कौल मागावा, या मतदान पद्धतीनुसार जी मते त्या त्या पक्षांना मिळतील त्यांची संख्या व टक्केवारी काढून गुणानुक्रमे लोकप्रतिनिधींची निवड करता येते. या पद्धतीमध्ये निवडणुकीत होणाऱ्या पैशाच्या आणि गुंडगिरीच्या वापरास आळा घालणे शक्य आहे.

दुसरे असे की प्रत्येक राजकीय पक्षाने उमेदवार निवडताना गुन्हेगारांना तिकीट नाकारणे हा प्राथमिक आणि सक्तीचा नियम केला पाहिजे. प्रत्येक उमेदवाराने आपल्या स्वच्छ चारित्र्याचा व गुन्हेगार नसल्याचा दाखला उमेदवारी अर्ज भरताना निवडणूक अधिकाऱ्यांना सादर करावा असाही नियम करता येईल आणि महत्त्वाचे म्हणजे उमेदवाराने निवडणुकीपूर्वी आणि निवडून आल्यानंतर आपली स्थावर व जंगम मालमत्ता, मिळकतीची साधने जनतेसमोर उघड करणे आणि आपल्या कार्याचा अहवाल वर्षातून किमान एकदा सादर करणे गरजेचे आहे. कारण लोकप्रतिनिधी हा जनतेचा सेवक आहे. जनता ही मालक आहे . सेवकाने मालकासमोर हिशोब मांडणे व मालकाने जाब विचारणे हे तर्कसंगत आहे. असे झाल्यास स्वच्छ राजकारणाची निर्मिती शक्य आहे. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या राजकीय पक्षांची संख्या कमी करणे हे देखील गरजेचे आहे. कारण घरातील नोकर-चाकर आणि नातेवाईक एवढेच सदस्य असलेले काही नोंदणीकृत पक्ष आपल्या देशात आहेत. अशा पक्षांचा उद्देश काळा पैसा पांढरा करणे आणि निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना मिळणाऱ्या सोयी सुविधा घेणे एवढाच असतो. जाती जमातीवर आधारलेले अनेक छोटे छोटे पक्ष यांना तर निवडणूक म्हणजे पर्वणीच असते. अशा पक्षांची राजकीय सौदेबजी या काळात अगदी भरभराटीस येते. अशा काही प्रकारांमुळे लोकशाहीचा खेळखंडोबा होतो आणि भ्रष्टाचार बोकाळतो म्हणून काही नियम घालूनच राजकीय पंजीकरण झाले पाहिजे.

हे वर्ष महात्मा गांधी यांच्या 125 व्या जयंतीचे वर्ष आहे. महात्मा गांधीजींनी नीतिमत्ता या तत्त्वाचा सदासर्वकाळ पुरस्कार केला. याच वर्षी भ्रष्टाचारविरोधी आंदोलन आकार घेत आहे, हा एक सुवर्णयोग आहे असेच म्हणावे लागेल. हे निमित्त साधून नागरिकांनी ठिकठिकाणी दक्षता समित्यांची स्थापना करून त्यामार्फत भ्रष्टाचार निर्मूलनाचे काम केले पाहिजे. हे कार्य आता अविलंब सुरू करावयास हवे, तरच भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात जनतेचा सहभाग वाटेल आणि खऱ्या अर्थाने हा जनतेचा लढा ठरेल.

(सख्यांकन युनिक फीचर्स.)

Tags: भ्रष्टाचार निर्मुलन लोकशाही नैतिकता भ्रष्टाचार Mission Against Corruption Andolan Democracy Corrupt System #Corruption weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके