डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

निसर्गप्रेमी रवींद्रनाथ

“महान व्यक्तींचे कार्य केवळ सन्मानपूर्वक विस्मय निर्माण करण्यासाठी नसून जसजसा त्यांच्याबद्दल आपलेपणा निर्माण होईल तसतसे त्यांचे चरित्र आपणास जिवंत वाटू लागेल. त्यांच्याबद्दल नुसता भक्तिभाव न ठेवता ते आपलेच स्वजन आहेत ही भावना निर्माण होणे जरूर आहे. आपल्या निराश हृदयात एक चेतनेचा आविष्कार निर्माण करण्याची शक्ती त्यांच्याजवळ असते."

1941 सालच्या श्रावण महिन्यात 7. ऑगस्ट ह्या दिवशी शान्तम्. शिवम् - अद्वैतम् या तीन वृत्तींची जीवनभर उपासना करणाऱ्या एका पुण्यपुरुषाच्या अलौकिक जीवनाचा अंत झाला. समग्र निसर्ग ह्या वेळेस हळहळला असेल. वृक्षवेलींना तर अश्रू आवरले नसतील कारण रवींद्रनाथ टागोरांनी या दिवशी आपला देह ठेवला. प्रत्येक सहृदय व्यक्तीला स्वतःचे कोणीतरी हरवले असा आभास झाला असणार. बंगाल तर शोकग्रस्त झालाच परंतु अखिल विश्वात दुःखाची संवेदना पसरली. ऐंशी वर्षांचे समग्र जीवन एका महर्षीसारखे ते जगले आणि 'हे धरणी तुझ्या कुशीचंच हे धन तुझ्या कुशीत घे' असे म्हणून जणू काही त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

रवींद्रनाथांचे अखिल जीवन म्हणजे एक प्रकारचा यज्ञ होता. सर्व उपनिषदे, गीता आणि वेद यांचे सार त्यांच्या जीवनात ओतप्रोत भरलेले होते. ते वाल्मीकी आणि व्यासांसारखे महापुरुष होते.

'महान व्यक्तींचे कार्य केवळ सन्मानपूर्वक विस्मय निर्माण करण्यासाठी नसून जसजसा त्यांच्याबद्दल आपलेपणा निर्माण होईल तसतसे त्यांचे चरित्र आपणास जिवंत वाटू लागेल. त्यांच्याबद्दल नुसता भक्तिभाव न ठेवता ते आपलेच स्वजन आहेत ही भावना निर्माण होणे जरूर आहे. आपल्या निराश हृदयात एक चेतनेचा आविष्कार निर्माण करण्याची शक्ती त्यांच्याजवळ असते", असे त्यांच्याबद्दल म्हणता येईल. त्यांच्या 'द गार्डनर' ह्या काव्यसंग्रहात ते म्हणतात, शतकानंतर माझे कथन वाचणाऱ्या माझ्या मित्रांनो येथून मी वसंतवैभवात फुललेले एक पुष्य सुद्धा पाठवू शकत नाही. तुमच्याच निवासाचे द्वार उघडून बाहेर बघा. शतकापूर्वी वाळून गेलेल्या फुलांचा मादक गंध, तुमच्या बागेतील बहरलेल्या फुलांत तुम्हाला जाणवेल आणि तुमच्या पुलकित हृदयांत कोण्या एका वसंत ऋतूत गायिलेल्या गीतांचा सूर पुन्हा उमटेल."

पानाफुलांचा प्रत्यक्ष साक्षात्कार ह्या महाकवीस झाला होता. ह्या बाळस 'हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा" असे सांगण्यासारखेच नव्हते. लहानपणीच त्यांनी बाळपोथीत पहिला अध्याय वाचला तो होता, '"जल पडे पाता नडे' म्हणजे पाणी पडत आहे आणि पाने हलत आहेत' ह्या शब्दांचा त्यांच्यावर इतका परिणाम झाला की बाल रवींद्र दिवसभर पडणाऱ्या पावसाच्या टपटप आवाजात हरवून जात असे. जणू काही जगातील पहिली कविता म्हणजे हीच. लहानपणी दोन हातात भरभरून घेतलेल्या मोगऱ्याच्या फुलांची आठवण कवी जन्मभर विसरत नाही आणि ही घटना म्हणजे आपल्या आयुष्याचा परमोच्च आनंदाचा क्षण होता असे एका कवितेत म्हणतो. नित्यक्रमांचा उत्सव करणारा हा कविश्रेष्ठ, विराट वडाच्या झाडाला उद्देशून म्हणतो, "हे महाकाय वटवृक्षा, तळ्याशेजारी तुझ्या अंगाखांद्यावर खेळणाऱ्या त्या लहानग्या पक्ष्यांना तू विसरलास तर नाहीस हे तुझ्या अत्युच्य टोकावर सूर्याचे पहिले किरण पडत असत आणि सळसळणारा यारा तुझ्या अंगाशी झोंबत असे. तुला माहीत आहे ना हे सारे?

वृक्ष झऱ्यांचे गूढ मधुर गुज ज्यांनी प्रत्यक्ष निर्माण केले त्या रवींद्रनाथांची पुण्यतिथी शांतिनिकेतन मध्ये दर वर्षी एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी होते.

कृषिसंस्कृतीतील तपोवनाबद्दल रवींद्रनाथांना सदैव आकर्षण होते. शांतिनिकेतनची स्थापना म्हणजे प्राचीन आदर्श डोळ्यांसमोर ठेवून उभी केलेली वास्तू . "वृक्षवल्ली आम्हां सोयरी" हा भाव मनात ठेवून ही वास्तु उभी करण्यात आली. वृक्ष, झऱ्यांचे मधुर गूज सतत ऐकू यावे आणि ह्या वातावरणात विद्यार्थ्यांनी विद्यार्जन करावे असा हेतू मनाशी बाळगून त्यांनी निबिड अरण्यामध्ये हे मंगल कार्य आरंभले, आज शांतिनिकेतनची वास्तू एखाद्या तपस्वी ऋषीसारखी ध्यानस्थ बसली आहे.

आज साजऱ्या होणाऱ्या वनमहोत्सवाचा श्रीगणेशा रवींद्रनाथांनी 1908 मध्ये सुरू केला वृक्षारोपणाची मोहीम त्या वेळेपासून सुरू झाली आणि आज शेकडो वृक्षांचे जणू संमेलन भरले असावे, असे शांतिनिकेतनचे वातावरण आहे.

ह्या दिवशी येथे साजरा होणारा वृक्षारोपणाचा सोहळा. येथे जे इवलेसे रोप लाविवले त्याचा सन्मान तो काय ! त्याला गुरुदेवांच्याच कवितेत अतिथि, बालक, तरुदल असे म्हटले आहे. त्याचे रोप लावण्याआधी केवढे संस्कार केले जातात. आशीर्वचनांचा वर्षाव होत असताना हे अतिथि बालक मिरविण्यात येते. 
"तोदेर नवीन पल्लवे। मा चूक आलोक सवितार।"
["तुझ्या नवीन पल्लवात। सूर्य तेज नाचू दे। "] 
अशा शुभेच्छा रवींद्रांच्या कवितेत व्यक्त केल्या जातात.

आजच्या ह्या वृक्षारोपण समारंभाला किती मार्दव होते, किती ओलावा होता. तास दीड तासाचा सोहळा पण प्रत्येक क्षण कसा आनंददायक. मुलामुलींच्या तोंडी गुरुदेवांचे गीत होते-“श्रावणधारांचा आशीर्वाद तुला लाभू दे... तुझ्या मस्तकावर आणि पानापानांवर अमरावतीचे धाराजल पडू दे." अशा शुभेच्छा त्या गीतातून व्यक्त होत होत्या. मिरवणूक जवळ आली आणि पोरांच्या ओठांबरोबर थोरांचेही ओठ हळूहळू हलायला लागले. त्या समुदायाने त्यात आपले आवाज मिसळले. त्या सुरेल गजरात त्या पालखीतला तो बालतरू खरोखरीच एखाद्या चिमण्या राजपुत्रासारखा दिसायला लागला. पालखीबरोबरचे ते चिमुकले भालदार चोपदार आपल्या हातांतल्या तालपत्रांच्या छत्रांनी अशी काही सावली धरत होते की पालखी थांबल्यावर तो बालतरू आपण होऊन पाय उतार होईल असे वाटायला लागले.

आज ये अंगणा पाहुणा गोजिरा, 
ये घरा आमुच्या सोयरा साजिरा
वाजता नौबती 
ये सखा सोबती.
खेळवा संगती, हा जरा लाजरा. 

गुरुदेवांनी ह्या भूमीवर सदैव प्रेम केले. त्यांच्या 'A Poet's School' मध्ये त्यांनी म्हटले आहे, "माझ्या प्रिय विद्यार्थ्यांसाठी मी साहित्य, उत्सव, समारंभ आणि धार्मिक प्रबोधनातून त्यांच्या मनात निसर्गाबद्दल अपूर्व प्रेम निर्माण होण्यासाठी आणि मानवा मानवांमधील संवेदनशील संबंध बांधले जावेत ह्या उद्देशाने सदैव प्रयत्न केले आहेत.

टेनिसनने म्हटल्याप्रमाणे 'समग्र राष्ट्राच्या हृदयाला हलविणारे एक गीत हे प्रत्यक्ष महान कार्य आहे. भारत ह्या पुण्यपुरुषाचा सदैव ऋणी राहील. राष्ट्राचे नैतिक पुनरुत्थान आणि सामाजिक उन्नती साहित्याच्या माध्यमातून रवींद्रनाथांनी केली. नवजात बालकाच्या जन्म प्रसंगी त्यांचीच गाणी बंगालमघ्ये गायिली जातात. मासे पकडणारा कोळी असो किंवा शेतात नांगर घेऊन चालणारा शेतकरी असो, त्यांचीच गीते गुणगुणत असतो.

त्यांच्या कविता व इतर साहित्य हे कोठल्याही संकुचित दृष्टीतून निर्माण झालेले नाही , तर अखिल मानव समाजाला स्पर्श करणारे आहे. भारतच काय पण सर्व विश्वाला त्यांच्या साहित्याने वेड लावले. प्राचीन वेद आणि उपनिषदांचा गर्भित अर्थ त्यांच्या काव्यामधून प्रकट झाला आहे . निराकार ईश्वरावर त्यांची पूर्ण श्रद्धा होती. ह्या भूतलाचा हा प्रचंड व्यवहार कोणी एक अज्ञात व्यक्ती चालवीत आहे : तेव्हा धर्माधर्मांतील, जातीजातीतील भेदभाव विसरून माणसाने त्या शक्तीसमोर नतमस्तक व्हावे असा त्यांचा संदेश आहे.

जातिभेद , स्पृश्य-अस्पृश्य ह्या गोष्टी त्यांना कधीय मान्य नव्हत्या. ह्या भावनेमुळे समाज आणि पर्यायाने राष्ट्र अशक्त होत जाते असे त्यांचे ठाम मत. आपण ह्या भारत देशाचे सुपुत्र आहोत ह्याचा त्यांना सदैव अभिमान वाटत असे. एका कवितेत ते म्हणतात, "ह्या भारत देशात जन्म घेऊन मी धन्य झालो आणि भारतमाते तुझ्यावर नितांत प्रेम केल्याने माझे जीवन धन्य झाले. येथेच मनाला वेड लावणाऱ्या सुगंधित पुष्पराशी फुलून येतात. गोड स्मित घेऊन येणारा चंद्रमा ह्या आकाशातच शोभतो आणि त्याच्या प्रकाशात प्रथम माझे डोळे जसे उघडले तसे त्याच्याच प्रकाशात ते मिटतील.

श्रावण महिन्यात निसर्ग फुललेला असताना पाने फुले, झाडे, झुडपे नवी लेणी अंगावर मिरवीत असताना पावसाच्या सरींमध्ये तृणपत्रे न्हाताना हया महाकवीने अनंताकडे प्रयाण केले. मातीशी आपले अतूट नाते आहे हे सांगणारे वृक्षमित्र रवींद्रनाथ बहरलेल्या निसर्गाच्या कुशीत चिरंतन झोपी गेले . आदल्या दिवशीच पौर्णिमेच्या चंद्राचा त्यांनी निरोप घेतला होता. संध्या-छाया भिवविती हृदया" असे त्यांना कधीच वाटले नाही.

मृत्यूस आवाहन करताना ते म्हणतात, "दूरवरून मला तू फार क्रूर, अदृश्य वाटलास, समग्र विश्व जणू कापते आहे असा भास झाला आणि मी तुला सामोरा गेलो. मी विचारले, यापेक्षाही काही भयंकर तुझ्याजवळ आहे का?"

तुझी काळरूपी कट्यार जेव्हा उगारलीस तेव्हा तू मला माझ्यापेक्षाही महान वाटलास आणि ती जेव्हा खाली आली तेव्हा मात्र तू मला एक छोटासा क्षुद्र प्राणी वाटलास आणि माझी भीती पार नाहीशी झाली. 

माझी तेव्हा खात्री झाली की मी मृत्यूपेक्षा महान आहे आणि असे म्हणूनच ह्या जगाचा मी निरोप घेईन.'

Tags: निसर्गप्रेम टागोर रवींद्रनाथ टागोर रवींद्रनाथ कविता काव्य Poems Poetry Nature Lover Ravindranath #Ravindranath Tagore weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके