डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

तेंडुलकर महोत्सव: 3 ते 9 ऑक्टोबर 2005

"तेंडुलकरी महोत्सव' कानामनात, डोळ्यांत साठवून ठेवणारा असेल हे मात्र निश्चित! गेली साडेचार दशके (45 वर्षे) मी तेंडुलकरांचे व्यक्तित्व आणि कर्तृत्व कधी दुरून तर कधी जवळून न्याहाळतोय. तरीही ते पूर्णतः आकळलेय असे वाटत नाही. माझ्यासारखीच आणखीही काहींची स्थिती असेल. या महोत्सवाच्या काळात आणखी काही आकळले तर आनंद वाटेल. अशी संधी निर्माण करून दिल्याबद्दल आपण साऱ्यांनी अमोल पालेकरांचे ऋणाईत रहायला हवे."

विजय तेंडूलकर एक सर्वपरिचित नाव. पन्नास वर्षांहून अधिक काळ लेखन करीत असलेले, बहुमुखी, बहुआयामी व्यक्तित्व. कथा, कादंबरी, एकांकिका, बालनाटक, प्रौढ नाटक, पटकथा, स्तंभलेखन आणि अन्य ललित, वैचारिक लेखन केलेल्या तेंडुलकरांचे मराठी मातीशी, मराठी मनाशी दीर्घकालीन नाते आहे. मनःपूर्वक प्रेम आहे. त्याचबरोबर त्यांच्या कलाकृतींविषयी आपल्या मनात शंका आहेत, मतभेद आहेत, वाद आहेत, प्रेम आणि द्वेष (लव्ह-हेट) असे मजेशीर किंवा व्यामिश्र असे हे लेखक रूप आहे. विरोधाकरता, मतभेद व्यक्त करण्यासाठीही त्यांच्या लेखनकर्तृत्वाचा विचार समोर ठेवावाच लागतो. अशी अपरिहार्यता असलेला असा हा बहुप्रसवा लेखक. त्यांच्याशी असलेले हे नाते म्हणजे एका अर्थाने मराठी वाचकावर, प्रेक्षकांवर, कलाकारांवर असलेले सांस्कृतिक ऋण आहे. एखाद्या मोठ्या ऋणात राहणे आपण धन्य मानतो. हे जितके खरे आहे, तितकेच ते कारण काही प्रमाणात व्यक्त करणे हीही आपली सांस्कृतिक क्षेत्रातील नैतिक जबाबदारी आहे. त्याच भावनेतून अमोल पालेकर यांनी तेंडुलकर महोत्सवाचे आयोजन केले आहे.

हा महोत्सव म्हणजे केवळ गौरवसोहळा नाही, केवळ समारंभ, भाषणांचे फड झडवण्याचा कार्यक्रम नाही, तर तेंडुलकरांनी साहित्य, नाट्य, चित्रपट आदी जी क्षेत्रे हाताळली, त्यांतून जे विचारधन आणि जीवनविषयक दृष्टिकोन दिले, त्या गुणविशेषांचा धांडोळा घेतला जाणार आहे. निवडक चित्रपटांचे प्रदर्शन, पटकथांच्या काही भागांचे वाचन, त्यांच्या साहित्यातून व्यक्त झालेली स्त्रीप्रतिमा, नव्या पिढीने केलेले त्यांच्या एकांकिकांचे प्रयोग, नाटय, चित्रपट,

साहित्य क्षेत्रातील कलाकार, दिग्दर्शक, प्रेक्षक आदींना तेंडुलकरांबद्दल काय वाटते, ती मनोगते आणि मुख्य म्हणजे तेंडूलकरांशी संवाद, असे बहुविध स्वरूपाचे नावीन्यपूर्ण आणि चैतन्यदायी कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे.

विजय तेंडुलकर हे जसे मराठीजनांचे आहेत, तसेच आणि तितकेच ते भारतीय स्तरांवरील कलावंतांचेही सुहृद आहेत. त्यांच्या कलाजीवनाच्या वाटेतील एक महत्त्वाचे स्थान आहेत. तेंडुलकरांच्या 'शांतता कोर्ट चालू आहे’ नाटकाने मराठी नाटक भारतीय स्तरावर गेले.

त्याचप्रमाणे 'घाशीराम कोतवाल’ नाटकाच्या निमित्ताने तेंडूलकर आणि मराठी नाटक जागतिक रंगमंचाला परिचित झाले. एका सर्जनशील लेखणीने किती प्रचंड पल्ला गाठला ते आपण जाणतोच. हा पाच दशकांहून अधिक काळाचा प्रवास निर्वेध झाला नाही, याचीही आपल्याला जाणीव आहे.

‘गिधाडे', 'सखाराम बाईंडर', 'कमला', आदी नाटकांमुळे तेंडुलकर हे नाव भारतीय कलाक्षेत्राला जोडले आणि वादग्रस्तही ठरले. त्या वादांचे, खटल्यांचे स्वरूप कसे आणि काय होते याचाही ऊहापोह या महोत्सवात होणार आहे. मराठी व्यतिरिक्त अन्य भाषकांशी तेंडुलकरांचे नाते जुळले ते चित्रपट माध्यमामुळे. त्यामुळे तर त्यांची भारतीय स्तरावरची प्रतिमा अधिक अधोरेखित झाली. याचे भान ठेवूनच या महोत्सवात मराठी कलाकारांसमवेत भारतीय स्तरावरचे अनेक महनीय कलावंत सहभागी होणार आहेत. त्यामुळे साहजिकच हा महोत्सव म्हणजे केवळ कलावंतांची मांदियाळी निर्माण करणार नाही, तर तेंडुलकरप्रेमी वाचक, प्रेक्षक आणि रंगधर्मी कलाकार यांचे रंगसंमेलनच होणार आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये!

या महोत्सवाच्या निमित्ताने तेंडुलकरांच्या संदर्भातले पाहणे, ऐकणे, बोलणे, वाचणे ह्या गोष्टी होतीलच. त्याचबरोबर विजय तेंडुलकर नामक ‘जिवंतपणी दंतकथा' (लीजण्ड) झालेल्या अनेकाभिमुख व्यक्तित्वाच्या सर्जनाचे चित्रीकरण होईल, अनेक गोष्टींचा एकत्रित संग्रह होईल आणि ते सारे पुढील पिढ्यांना जतन करता येईल. गेल्या तीन ते चार पिढ्यांवर तेंडुलकरांच्या लेखणीचे, विचारसरणीचे गारूड आहे. त्यातल्या जुन्या पिढीतील मंडळींना अनेक गोष्टींचा आठवण निर्माण होईल, काहींना स्मरणरंजन होईल. कदाचित नव्या उत्साही पिढीला हे सारे एकत्रित पाहून, ऐकून आंश्चर्यही वाटेल. काहीजणांना तेंडुलकरी कार्यातून काही नवे करण्याचे स्फुरणही होईल. बघू या काय घडते ते!

या महोत्सवाच्या निमित्ताने पॉप्युलर प्रकाशन संस्थेच्या वतीने तेंडुलकरांच्या नाटकांच्या पुनर्मुद्रित आवृत्त्याही प्रकाशित होणार आहेत.

असा हा अपूर्व ठरणारा 'तेंडुलकरी महोत्सव' कानामनात, डोळ्यांत साठवून ठेवणारा असेल हे मात्र निश्चित! गेली साडेचार दशके (45 वर्षे) मी तेंडुलकरांचे व्यक्तित्व आणि कर्तृत्व कधी दुरून तर कधी जवळून न्याहाळतोय. तरीही ते पूर्णतः आकळलेय असे वाटत नाही. माझ्यासारखीच आणखीही काहींची स्थिती असेल. या महोत्सवाच्या काळात आणखी काही आकळले तर आनंद वाटेल, अशी संधी निर्माण करून दिल्याबद्दल आपण साऱ्यांनी अमोल पालेकरांचे ऋणाईत रहायला हवे.

Tags: विजय तेंडुलकर वि. भा. देशपांडे vijay tendulkar V.B. Deshpande #Weekly Sadhana weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके