डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

एक दीपस्तंभ - गंगाप्रसाद अग्रवाल

प्रसादजींचेही तसेच आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात सशस्त्र क्रांतिकारक गटाचे त्यांनी पुढारीपण केले. स्वातंत्र्यानंतर दहा वर्षे राष्ट्र सेवादलाचे काम केले, त्यातून युवक संघटना, लोकशिक्षण व प्रबोधन झाले. नंतर ग्रामदान, भूदान चळवळीत ते होते. आणीबाणीत दीड वर्ष त्यांना राजकीय कैदी म्हणून कारागृहात राहावे लागले. नंतर त्यांनी पूर्णवेळ सर्वोदयाचे काम केले. आता ते 'ग्रामस्वराज्य' खऱ्या अर्थाने अस्तित्वात आणण्याकरिता झटत आहेत.

गंगाप्रसादजी अग्रवाल हे पंचाहत्तर वर्षाचे झाले आहेत हे खरेच वाटत नाही. आजही त्यांच्या कामाचा झपाटा इतका जबरदस्त आहे की पन्नास वर्षांपूर्वीच्या प्रसादजींना ज्यांनी पाहिले आहे, त्यांना त्यांत काहीही फरक जाणवणार नाही. कामाची व्याप्ती तर किती तरी वाढली आहे. पूर्वी त्यांचे काम परभरणी नांदेड जिल्ह्यापुरते मर्यादित होते, नंतर मराठवाडा महाराष्ट्र व आता अखिल भारतीय विचारवंतांमध्ये त्यांची गणना होते आहे.

ध्येयाची स्पष्टता, त्यावर अढळ निष्ठा, त्याकरिता करावे लागणारे अपार परिश्रम ही प्रसादजींची जमेची बाजू आहे. त्यामुळेच त्यांना संघटना बांधता आल्या, त्या विकसित करता आल्या व सतत तरुणांना आपल्यामध्ये समाविष्ट करता आले.

मला विन्स्टन चर्चिलची एक गोष्ट आठवते. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने आक्रमक धोरण स्वीकारून फ्रान्स बळकावला व इंग्लंडवर तोफा रोखल्या. त्या वेळचे पंतप्रधान चेंबरलेन ह्यांना त्याला तोंड देणे न जमल्यामुळे पार्लमेंटने चर्चिल ह्यांना पंतप्रधान म्हणून निवडून दिले. अधिकाऱ्यांनी त्यांना विचारले, 'सर, तुमच्या आवडी काय आहेत? वातावरणनिर्मितीकरिता काम करणाऱ्या माणसाच्या आवडी जपणे आवश्यक असते. प्रश्नाचा रोख, खाणे-पिणे, कापड पडद्यांचा रंग, मोटारचा मेक कोणता असावा, या गोष्टीकडे होता. चर्चिल म्हणाले, 'माझ्या आवडी अगदी साध्या आहेत. कोणतीही गोष्ट उत्कृष्ट झालेली मला आवडेल.'

प्रसादजींचेही तसेच आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात सशस्त्र क्रांतिकारक गटाचे त्यांनी पुढारीपण केले. स्वातंत्र्यानंतर दहा वर्षे राष्ट्र सेवादलाचे काम केले, त्यातून युवक संघटना, लोकशिक्षण व प्रबोधन झाले. नंतर ग्रामदान, भूदान चळवळीत ते होते. आणीबाणीत दीड वर्ष त्यांना राजकीय कैदी म्हणून कारागृहात राहावे लागले. नंतर त्यांनी पूर्णवेळ सर्वोदयाचे काम केले. आता ते 'ग्रामस्वराज्य' खऱ्या अर्थाने अस्तित्वात आणण्याकरिता झटत आहेत. 

ज्या ज्या क्षेत्रात त्यांनी काम केले तेथेत्यांनी अगदी मन लावून- तळमळीने काम केले. प्रत्येक कामावर त्यांचा ठसा ठळकपणे उमटला आहे. बहुतेक माणसे मोठी व्हायला लागली की त्यांचा अहंकारही वाढत जातो. प्रसादजींना अहंकाराचा स्पर्शही नाही. अगदी लहान कार्यकर्त्यांपासून मोठया पदावरील व्यक्तींपर्यंत सर्वांशी ते सारख्याच ममतेने वागतात. त्यांच्या चुका सौम्य शब्दांत दुरुस्त करतात व विकासाची दिशा दाखवितात. 

माझी नात दहा वर्षांची आहे. ती मला एकदा सांगत होती, 'आज मी प्रसाद आजोबांशी खूप गप्पा मारल्या.' श्रीमती शांता भाले यांच्या संस्थेतर्फे बालवाड्या व प्राथमिक शाळा चालते. चांगली शाळा म्हणून ती या भागात प्रसिद्ध आहे. चौथीतील एका शिक्षिकेने 'आजोबांचा एक तास' म्हणून प्रयोग केला व निरनिराळ्या विषयांवर, निरनिराळ्या व्यक्तींना बोलावून तो विषय चौथीच्या मुलांना सोपा करून सांगितला. प्रसादजींना या कार्यक्रमास बोलवावे ही त्यांची इच्छा. श्रीमती भाले ह्यांनी प्रथम ती मनावरच घेतली नाही पण शिक्षिकेचा आग्रह वाढल्यामुळे भीत भीत प्रसाद यांना पत्र लिहिले. 

प्रसादजींनी निमंत्रण स्वीकारले. ठरल्याप्रमाणे ते आले व इतक्या चांगल्या प्रकारे मुलांना शिकविले की, 'सर्वात चांगला तास' असा अभिप्राय त्या बालविद्यार्थ्यांनी व शिक्षिकेने दिला. 'करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे' असे साने गुरुजी मानत. ते प्रसादजींनी प्रत्यक्षात आणलेले आम्ही अनुभवले. प्रसादजी कोणाविषयी वाईट तर बोलणार नाहीतच पण त्यांच्यावर टीकाटिप्पणीही करणार नाहीत. त्यांच्या अंगी असलेल्या काही गुणांचा उपयोगच करून घेतील. 

मा. जयप्रकाशजी हजारीवागच्या तुरुंगात असताना त्यांच्या पत्नी प्रभावतीदेवी त्यांना भेटावयास गेल्या. मा. जयप्रकाशजी तेव्हा सशस्त्र क्रांतीचे प्रणेते होते, तर प्रभावती देवी म. गांधींच्या सहवासात वावरल्यामुळे अहिंसावादी (सत्य, अहिंसा अपरिग्रहवादी). जयप्रकाशजींनी त्यांच्या क्रांतिकारक मित्रांना काही गुप्त संदेश देण्यास प्रभावतीदेवींना सांगितले, तेव्हा त्यांनी ते स्पष्टपणे नाकारले. त्या म्हणाल्या, 'माझा हिंसेवर व गुप्ततेवर विश्वास नाही.' त्यांच्या मैत्रिणीला हे कळल्यावर तिने विचारले तुम्ही पती-पत्नी दोन ध्रुवावर उभे आहात, तुमचे पटते कसे ? प्रभावती देवी उत्तरल्या, 'मतभेद हो सकता है. मनभेद क्यों नहो ?' 

एवढे उदात्त तत्वज्ञान जीवनात उतरविणारे प्रसादजींव्यतिरिक्त कोणी आढळत नाहीत. प्रसादजींना सत्कारानिमित्त मिळालेली रकम 80 हजार (सत्कारसमिती 75000 + सुधाताई काळदाते 5000) त्यांनी ताबडतोब आपले एक हजार रुपये टाकून समाजकार्यास देऊन टाकली.  

प्रसादजीं! आम्ही भाग्यवान, आम्हांला तुमचा सहवास मिळू शकला. त्यामुळेच आमची जीवने समृद्ध झाली. चंगळवादाचा मोह आम्हांला पडला नाही. आमच्या अत्यल्प कार्यक्षेत्रात सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेने आम्ही सतत वागत राहिलो. मा. प्रसादजींचा आदर्श तरुण पिढीपुढे नेहमी करताच राहील व त्यांना स्फूर्ती देऊन कार्यप्रवण करीत राहील यात शंका नाही.

Tags: व. द. भाले गंगा प्रसाद अग्रवाल सामाजिक कार्यकर्ते social worker personality v. d. bhale ganga prasad Agrawal weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके