वेगवेगळ्या वाङ्मय प्रकारांचा विचार करताना जुन्या-नव्याने संबंध आपण तपासून येथे एवढे कबूल केलेच पाहिजे की, हे नवे वाङ्मय बरेच नवीन आहे; त्याचे आशय नवीन आहेत, धाटणी व रचना नवी आहे आणि त्याच्या पाठीमागची मनोवृत्ती नवीन आहे. या पाच-दहा वर्षांतील वाक्याकडे नजर टाकली म्हणजे चटकन् एक गोष्ट माझ्या लक्षात येते, हे वाङ्मय प्रयोगशील आहे.
महाराष्ट्र व गुजरात एकमेकाचे शेजारी आहेत. आपण शेजारधर्म पाळला पाहिजे. आपल्या भाषाही एकमेकीस जवळच्या व जुळत्या आहेत. आम्ही एकमेकांच्या वाङ्मयाच्या द्वारे एकमेकांच्या हृदयाची जाणीव करून घेतली तर राजकारणाने कितीही प्रयत्न केला तरी आमच्यांत कटुता निर्माण करण्याचे त्याला सामर्थ्य राहणार नाही.
पूज्य साने गुरुजींनी याच आंतरप्रांतीय प्रेमाच्या देवघेवीसाठी आंतरभारतीची कल्पना काढली. महाराष्ट्राने गुरुजींचे हे स्वप्न साकार केले आहे. आपल्या भाषाभगिनींचा परिचय करून घेण्यास महाराष्ट्र बद्धपरिकर झाला आहे. माझे मित्र आचार्य भागवत या राष्ट्रीय महत्त्वाच्या कार्यासाठी अहर्निश झटत आहेत.
मी गुजरातला नम्रपणे सांगू इच्छितो गुजरातने भारताला एक अद्वितीय महात्मा दिला. महाराष्ट्रानही तितकाच अद्वितीय असा महात्मा भारताला दिला होता व या विसाव्या शतकातील महात्म्याप्रमाणे त्या महात्म्यानेही तीनशे वर्षापूर्वी भारताच्या इतिहासाला कलाटणी दिली. भूषण कवि कंगाल दख्खनला आला आणि आपल्या कमिटीने त्याने शिवरायाच्या विशाल कार्याचे स्वरूप त्यांच्या हयातीतच पारखले. हृदय उचंबळून येऊन तो म्हणाला,
“हिंदकी दिवाल भयो
दख्खनकी ढाल भयो”
महाराष्ट्रच्या दोन त्रिमूर्ती आहेत, एक जुनी व दुसरी नवी. श्री ज्ञानेश्वर, श्री तुकोबाराय व श्री शिवछत्रपती ही जुनी त्रिमूर्ती.. महात्मा फुले, आगरकर व लोकमान्य टिळक ही अधुनिक त्रिमूर्ती. या सहा विभूती म्हणजेच महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्र-धर्म, मऱ्हाटी संस्कृती.
भाषावार प्रांतरचना हा विषय आता विवाद्य राहिला नाही. परवा नागपुरास श्री. शंकरराव देव म्हणाले त्याप्रमाणे वाटाघाटी व अंमलबजावणी हेच काम आता राहिले आहे. तथापी अजून काही लोकांच्या मनात शंका आहेत. काहींना भाषावार प्रांत अस्वस्थ करतात. देशाच्या ऐक्यास विघातक अशी ही फाटाफुटीची चळवळ आहे, असे काहींना वाटते. आपण संयम ठेवून या सर्वांची समजून घातली पाहिजे. भावनेच्या आहारी न जाता हा प्रश्न बुद्धिवादाने हाताळला पाहिजे. संयुक्त महाराष्ट्र, महागुजरात व संयुक्त कर्नाटक आपण मागतो ते देशाची चिरफाड करण्यासाठी नाही हे आपण सर्वांना पटवून दिले पाहिजे. ही देशाची पुर्नरचना देशाच्या ऐक्यास व अभ्युदयास पोषकच आहे हे आपण सिद्ध केले पाहिजे.
भाषावार प्रांतरचनेने जणू काय देशाची या टोकापासून त्या टोकापर्यंत उलथापालथ होणार आहे, अशी काही लोकांनी समजूत करून घेतली आहे. या लोकांना आपण एवढेच सांगितले पाहिजे, भारतात आज अठ्ठावीस राज्ये आहेत; त्यापैकी चोवीस आजच एकभाषी आहेत. जे चोवीस राज्यात आहे तेच उरलेल्या चार राज्यात करा, एवढेच आमचे मागणे आहे. जगात जेथे-जेथे अनेक भाषा बोलणारे लोक एका राजसत्तेखाली आले तेथे तेथे त्या राज्यातील प्रदेशांची रचना भाषिक तत्त्वावरच करावी लागली आहे.
संयुक्त महाराष्ट्र हे आमचे आज साध्य आहे व उद्याचे साधन आहे. आमच्या काही मूलभूत गरजांसाठी आम्हाला संयुक्त महाराष्ट्र पाहिजे. त्या भागत असल्या तरच तो पाहिजे. आमच्या मराठी भाषेला महाराष्ट्राच्या सर्व प्रकारच्या व सर्व क्षेत्रातल्या सार्वजनिक जीवनात तिचे स्वाभाविक स्थान मिळावे म्हणूनच आम्हाला संयुक्त महाराष्ट्र पाहिजे. मराठीला तिचे योग्य स्थान द्यावयाचे ते महाराष्ट्रातील सर्व जनतेला ज्ञान मिळावे, योग्य शिक्षण मिळावे, योग्य संधी मिळावी, महाराष्ट्रातल्या सर्व थरातील समाज एकरूप व्हावा, एकजिनसी व्हावा, महाराष्ट्रातल्या कोणत्याही कोनाकोपऱ्यात जन्माला आलेली बुद्धिमत्ता वाया जाऊ नये याच हेतूसाठी! हीच आमची साध्यांची सोपान परंपरा आहे. आणि हे आमचे अंतिम ध्येय आहे.
महाराष्ट्राच्या साहित्यात महाराष्ट्राच्या जीवनाचे, आकांक्षाचे, सुखदुःखाचे प्रतिबिंब पडले पाहिजे. आजच्या साहित्यात उद्यांच्या महाराष्ट्राचे आम्हाला दर्शन घडले पाहिजे. आरामखुर्चीवर बसून चहाचे घुटके घेत घेत देशकार्य करणाऱ्या रावबहाद्दुरांचे जीवन रंगविणारे साहित्य आत नको; तुम्ही खुशाल, आम्ही खुशाल, असे खुशालीचे अफिमबाजी साहित्य आता चालणार नाही. रजपूत तरुणांच्या अद्भुत कथा आता आम्ही वाचणार नाही. भोंगळ गुळगुळीत स्वप्ने आता नकोत अन् ढिसूळ दुबळे आशावादही आता नकोत.
साहित्य असे समाजाभिमुख झाले पाहिजे आणि समाजही साहित्यभिमुख झाला पाहिजे. यासाठी समाजाच्या सर्व थरांची बौद्धिक पातळी वाढली पाहिजे सर्वांना सकस व पुरेसे शिक्षण मिळाले पाहिजे, आणि बुद्धिमंताना त्यांच्या बुद्धीस झेपल इतके उच्च शिक्षण मिळाले पाहिजे. बड्या लोकासाठी उच्च शिक्षण, मध्यम वर्गासाठी माध्यमिक शिक्षण आणि खालच्या वर्गासाठी प्राथमिक शिक्षण असाच प्रकार रूढ होऊ पहात आहे.
इंग्रजीत ज्याला Social mobility म्हणतात ती आमच्याकडे आली पाहिजे. तीच समाजाच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. समाजाचे कल्याण तिच्यांतच आहे. सामाजिक जीवन सारखे ढवळले गेले पाहिजे व खालचे बिंदू वर आणि वरचे खाली गेले पाहिजेत. समाज खूप-खूप ढवळला गेला पाहिजे.
हिंदीचा आम्ही संघभाषा म्हणून स्वीकार केला आहे. हिंदी आम्ही शिकू, लिहू, बोलू; पण हिंदी चांगले येण्यासाठी शिक्षणाचे माध्यम हिंदी झाले पाहिजे, ही समजून इंग्रजी माध्यमाइतकीच चुकीची आहे. आमच्या मुंबई सरकारने हिंदीची योग्य सोय केली आहे. माध्यमिक शाळात तीन-चार वर्षे सक्तीने हिंदी शिकवले आणि विद्यापीठात संस्कृत, इंग्रजी, प्रादेशिक भाषा यांच्याबरोबरच हिंदीचाही उच्च पण ऐच्छिक आभ्यासक्रम ठेवला म्हणजे हिंदीची अहिंदी प्रदेशात समाधानकारक तरतूद झाली, असे म्हणण्यास हरकत नाही. इंग्रजी किंवा हिंदी या भाषांनी आमच्या प्रादेशिक राष्ट्रभाषांवर आक्रमण करता कामा नये.
भाषावार प्रांतरचना झाली म्हणजे भाषिक राज्यात सर्वच एकभाषी राहतील असे नाही. प्रत्येक भाषिक राज्यात वेगळ्या भाषा बोलणारे कमी जास्ती प्रमाणात राहणारच. यात काळजी करण्यासारखे काहीच नाही. आम्ही एकमेकाचे भाऊ आहोत. वेगळी भाषा बोलणाऱ्या आमच्या देशबांधवांचा आम्ही अवश्य परामर्श घेऊ, त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊ व दूर करू.
मराठी दोन अडीच कोट लोकांची मातृभाषा आहे. एवढ्या लोकांच्या विचारांची व भावनाची ती वाहन आहे. तिच्या लेखनाबद्दल आपण खबरदारी घेतली पाहिजे. मराठी लेखनात आज अराजक माजले आहे. मुंबई सरकारच्या शाळाखात्याने काही वर्षापूर्वी अपल्या अधिकृत अभ्यासक्रमांत चौथ्या इयत्तेपर्यंत अनुच्चारित अनुस्वार वापरू नयेत असा निर्देश दिला होता; पण सरकारनेच तो पाळला नाही. अर्थात् सरकारने मंजूर केलेल्या अभ्यास पुस्तकात सरकारच्या निर्देशाची दखल घेण्यात आली नाही, यात काहीच आश्चर्य नाही. मुंबई विद्यापीठाने एक शुद्धलेखन समिती नेमून शुद्धलेखनाचे नियम निश्चित केले होते. पण त्यांची अंमलबजावणी झाली असेल असे वाटत नाही. आपल्या साहित्य परिषदेने शुद्धलेखनाचे नियम तयार केले. सरकारने दखल घेतल्याचे दिसत नाही. जनतेनेही या योजनांचा विचार केला नाही. आज मराठी लिहिताना शिकलेसवरलेले लोकसुद्धा कोणतेच नियम पाळीत नाहीत. मनास वाटेल तसे लिहितात. आमच्या शाळात तर गोंधळ माजला आहे. आमच्या शिक्षकांनाच शुद्ध मराठी लिहिता येत नाही. मग ते मुलांना काय शिकवणार?
कच्च्या पायावर आज माध्यमिक व उच्च शिक्षणाची इमारत उभारली जात आहे. मी ओरडून थकलो. पण ‘ऊर्ध्वबाहुर्विरौम्येष न च कश्चित् श्रुगोति मे’ अशी स्थिती आहे.
मद्रास सरकारने तंजावरच्या सरस्वती महालातील मराठी हस्तलिखिताची वर्णनात्मक सूची तीन पुस्तकात प्रसिद्ध केली आहे आणि आजपर्यंत नऊ मराठी ग्रंथ प्रसिद्ध केले आहेत. गेल्या महिन्यातच ‘श्रीरामामृनतरंग’ या मद्रास सरकारने प्रसद्ध केलेल्या पुस्तकाची प्रत परिषदेकडे आली आहे. मद्रास सरकारच्या मराठीविषयीच्या या पोटतिडिकेबद्दल आपण त्या सरकारचे अवश्य आभार मानले पाहिजेत. मुंबई सरकारला आपण सांगितले पाहिजे, मराठींचा मद्रास सरकारपेक्षा तुमच्यावर जास्त हक्क आहे. महाराष्ट्राच्या इतिहासाच्या संशोधनाला व वाङ्मय प्रकाशनाला भरपूर मदत करा.
महाराष्ट्र साहित्य परिषदेने मराठी वाङ्मयाच्या इतिहासाची एक विस्तृत व महत्त्वाकाक्षी अशी योजना प्रसिद्ध केली आहे. अशा योजनेबद्दल साहित्यिकाची निरनिराळी मते व विचार असणे स्वाभाविक आहे. योजना सुधारण्याच्या हेतूने व्यक्ती व संस्था यांजकडून सूचना मागवल्या आहेत. हे फार मोठे काम आहे. आपल्या सर्वांचा या कामास पाठिंबा पाहिजे. खर्च पन्नास हजारांच्या घरात जाईल. आलेल्या सर्व सूचनाचा योग्य विचार होऊन शिष्टसंमत अशीच योजना निश्चित होईल व कामास सुरुवात होईल.
आपल्या सरकारने ग्रंथकारांकडे व कलावंताकडेही पाहिले पाहिजे. त्यांच्या वृद्धापकाळची सोय झाली पाहिजे. मध्यवर्ती सरकारने नझरुल इस्लामना मदत केली. फार योग्य केले. आमचा लाडका बालगंधर्व सत्तरीच्या घरात गेला आहे. त्याची आज काय दशा आहे? सत्तरी उलटून गेलेल्या वरेरकर मामांनी पोटासाठी आणखी किती वर्षे लिखाण करावयाचे? पन्नास वर्षे मराठीची निस्सीम सेवा केलेल्या आजगावकरांपुढे अहमदाबादला कसे जावे हा प्रश्न होता. या अव्वल दर्जाच्या साहित्यिकाचा व कलावंताचा म्हातारपणी परामर्श घेतला पाहिजे. त्यांनी सरकारी नोकराप्रमाणेच समाजाची सेवा केली आहे.
गेल्या काही वर्षात बाहेर पडलेल्या मराठी साहित्याचा साकल्याने विचार केला असता मनाला समाधान वाटते. हे साहित्य विपुल आहे. ज्या क्षेत्रात ते विपुल नाही तेथे ते अव्वल दर्जाचे आहे. काही क्षेत्रात नुकतेच पदार्पण झाले आहे. सर्व शास्त्रात मराठीचा संचार अप्रतिहत आहे. त्याचप्रमाणे निरनिराळ्या कला व व्यवसाय या क्षेत्रात मराठी भाषा लीलेने प्रवेश करीत आहे. कोणा लेखकाचे परिभाषेवाचून अडले आहे असे दिसत नाही. तेराव्या शतकात अत्यंत सूक्ष्म भावना व कल्पना (आणि त्याही ज्ञानेश्वरांच्या) व्यक्त करण्यास जी भाषा समर्थ झाली ती विसाव्या शतकात दगा देईल, अशी भीती बाळगण्याचे काहीच कारण नाही. माझे मित्र श्री. शं.वा. जोशी यांनी भाषा, धर्मपंथ, दैवते, स्थलनामे यांच्या आधारे ‘मऱ्हाटी संस्कृती’ (1952) विषयी काही मूलभूत समस्या आपल्यापुढे मांडल्या आहेत व आपल्या पूर्वग्रहांना जबरदस्त धक्का दिला आहे. मराठी व कन्नड यांच संबंध जुने आहेत हे आपण मानीत आलो आहोत; परंतु ते किती जवळचे आहेत हे श्री. जोश्यांनी सप्रमाण दाखविले आहे. या मार्गाने जाणाऱ्या उद्याच्या संशोधकाला श्री. जोश्यांच्या समस्यांची दखल घेतल्यावाचून गत्यंतर नाही.
अलीकडे पाच-दहा वर्षांत बरेच नवीन प्रकारचे ललित वाङ्मय बाहेर पडले आहे. त्याचा विस्तार मोठा आहे व त्याने अनेक फाटे फुटले आहेत. हे वाय सर्वस्वी नव्या प्रकारचे आहे असे म्हणता येणार नाही. नवे एकदम एका ठराविक क्षणापासून सुरू होत नसते आणि जुने आपल्याला वाटते तेव्हा नाहीसे झालेले नसते. किंबहुना जुने कधीच नाहीसे होत नाही. ते नव्यात सामील झालेले असते. वेगवेगळ्या वाङ्मय प्रकारांचा विचार करताना जुन्या-नव्याने संबंध आपण तपासून येथे एवढे कबूल केलेच पाहिजे की, हे नवे वाङ्मय बरेच नवीन आहे; त्याचे आशय नवीन आहेत, धाटणी व रचना नवी आहे आणि त्याच्या पाठीमागची मनोवृत्ती नवीन आहे.
या पाच-दहा वर्षांतील वाक्याकडे नजर टाकली म्हणजे चटकन् एक गोष्ट माझ्या लक्षात येते, हे वाङ्मय प्रयोगशील आहे.
(अपूर्ण)
Tags: Nazrul Islam V.D. Ghate Acharya Bhagwat Ahmedabad Sahitya Samelan नझरुल इस्लाम वि.द. घाटे आचार्य भागवत अहमदाबाद साहित्य संमेलन weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या