डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

भक्तिमार्ग विरुद्ध कर्तव्यमार्ग

आपल्या देशातील बहुसंख्य लोक दैववादी, 'असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी' असे मानणारे, म्हणून पूजा, प्रार्थना आणि इतर कर्मकांड यांच्यावर दृढभाव ठेवणारे, आणि त्यांचा जमेल तसा उत्सवही करणारे. कर्माचे फल मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे हे त्यांना माहीत नाही. ज्या भक्तिसंप्रदायाची शिकवण ते मानतात तो त्यांना निवृत्ती मार्गावरच नेणारा आहे. अशा समाजाकडून देशापुढील आव्हाने कशी झेलली जाणार, या प्रश्नाचा ऊहापोह पुढील लेखात केला आहे. सदर लेखक डायरेक्टर जनरल, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स या पदावरून निवृत्त झाले आहेत.

हे एक ईश्वरभक्तीचे चित्र. आपले राष्ट्रपती तुळजापूरला भेट देतात व तेथील भवानी मंदिरात जाऊन देवीची सपत्नीक पूजा करतात. दर पावसाळ्यातत देहू व आळंदीहून पालख्या मोठ्या जनसमूहासह जेव्हा पुण्याला येतात तेव्हा शहराच्या हद्दीवर त्यांचे स्वागत करण्यास शहराचे महापौर व इतर क्षेत्रातील बडी मंडळी हजर राहतात. या पालख्या पुढे पंढरपूरला पायी जातात व रस्त्यावरील प्रत्येक मोठ्या गावाच्या सुरुतीला त्यांचे अशाच प्रकारे स्वागत होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किंवा एखादे मंत्री आपल्या पत्नीसह पंढरपूरला जाऊन जाहीरपणे तेथील देवालयात विठ्ठल-रखुमाईची आषाठी एकादशीला यथासांग पूजा करतात. 

पुण्यात दर वर्षी अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जनाच्या, हजारो माणसांनी गजबजलेल्या मिरवणुका वाजत गाजत दुपारी सुरू होतात त्या दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत म्हणजे जवळजवळ 24 तास चालू असतात. दर वर्षी यात भाग घेणाऱ्या गणपतींची संख्या वाढतच आहे. गेल्या वर्षी नाशिकला सिंहस्थपर्वणीत दोन-तीन लाख लोकांनी गोदावरी नदीत 'शाही' स्नानात भाग घेतला. एका पोलीस-चौकीच्या आवारातच दत्ताचे एक छोटे मंदिर बांधण्यात येते व दर वर्षी दत्तजयंती पताका लावून इतर ठिकाणी होते त्याचप्रमाणे लाउडस्पीकरवरील संगीतासह साजरी करण्यात येते. कोणतेही नवीन बांधकाम मग ते शहरातील गटारासंबंधी जरी असले तरी तेथे जाहीररीत्या भूमिपूजन करण्यात येते. 

वरील किंवा त्यासारख्या भक्तिप्रदर्शनाच्या घटना फक्त महाराष्ट्रातच होतात असे नाही इतर राज्यांतही होतात. उदाहरणार्थ -अलाहाबादला कुंभमेळ्यात लाखो लोक गंगानदीमध्ये एकाच वेळी स्नान करतात. या प्रचंड गर्दीमुळे नदीमध्ये व वाळूवर किती भयंकर घाण होत असली पाहिजे हा प्रश्न वेगळा आहे.

आता दुसरे चित्र कर्तव्यच्युतीचे - आपल्या संसदेत किंवा राज्यांच्या विधानसभेत अगर परिषदेत देशाची किंवा राज्यांची वार्षिक परिस्थिती, संरक्षण, परदेश नीती, पर्यावरण, लोकसंख्येतील व शहरांतील झोपडपट्ट्यांची सतत होणारी वाढ, साक्षरता, वाढती महागाई यांसारख्या महत्वाच्या विषयांवर क्वचितच अभ्यासपूर्ण अशी भाषणे ऐकू येतात. कानावर येते ती बहुधा आरडाओरड, एकमेकांविरुद्ध आरोप, गोंधळ, धक्काबुक्की व सभात्याग, इतकेच काय पण बजेटमधील कोटी-कोटी रुपयांच्या मागण्या कित्येक वेळा चटकन एकही भाषण न होता पास होतात; कारण पुरेसा वेळ तरी नसतो किंवा फारच थोडे सभासद त्यांच्यापुढे आलेले कागद काळजीपूर्वक वाचतात किंवा त्यांत उल्लेख केलेल्या विषयांचा अभ्यासपूर्ण विचार करतात. 

एखाद्या पक्षाच्या किंवा समूहाच्या मनाविरुद्ध काही घडले की लगेच रस्त्यागरील वाहतूक बंद करणारे मोर्चे, वाहने जाळून टाकणे, धरणे, हरताळ हे तर आता सगळ्यांच्या अंगवळणीच पडले आहे. असल्या भावनाप्रदर्शनांनी पोलिसयंत्रणेधर व इतर जनतेधर किती ताण पडतो व यातछन खरोखरच काय निष्पन्न होते याचा कुणी फारसा विचार करत नाही. सरकारी किंवा निमसरकारी संस्थांच्या जवळ जवळ प्रत्येक खात्यात इतकी लाचलुचपत वाढली आहे की सामान्य माणसाला ठिकठिकाणी तेथील लोकांचे हात ओले केल्याशिवाय पुढे जाताच येत नाही. आणि यामुळे विशेषतः गरीब लोकांचे नेहमीच किती हाल होत असतील हे सांगण्याची जरुरी नाही. चांगल्या नावाजलेल्या संस्थासुद्धा घोटाळे, वशिलेबाजी, हेवेदावे यांपासून मुक्त नाहीत. 

दिल्लीचे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, भोपाळचे भारत भवन, अशा अनेक संस्थांची उदाहरणे देता येतील. आपल्या येथील लोकशाहीचे तर आपण धिंडवडे काढायला सुरुवात केल्यासारखे दिसत आहे. खुर्ची किंवा सत्ता किंवा पैसे मिळवण्याकरता पक्षांतर करणाऱ्या खासदार किंवा आमदारांची संख्या वाढू लागली आहे व असल्या हीन कारवायांना प्रतिबंध करण्यासाठी 1985 साली जो कायदा मुद्दाम पास करण्यात आला होता तो आता निकामीच झाल्यासारखा दिसत आहे. मोठमोठ्या शहरांत घाण, कचरा उचलून नेणारी जी यंत्रणा आहे तिची क्षमता कमी कमी होत चालली आहे व घाणीच्या ढिगांची सर्वांना सवयच झाली आहे. या चित्रात शेवटी गोष्ट सांगायची ती म्हणजे गेल्या साठ एक वर्षात या विस्तीर्ण भारतात राहणाऱ्या एकाही भारतीय माणसाला नोबेल प्राईज मिळाले नाही.

आता पहिल्या चित्राकडे पुन्हा वळू या. त्यात ज्या मान्यवर व्यक्तींचा उल्लेख केला आहे त्यांच्या निस्सीम ईश्वरभक्तीविषयी कुणालाही संशय येण्याचे कारण नाही. पण प्रश्न पडतो तो असा, की हे सर्व भाविकतेचे प्रदर्शन जनतेच्याच खर्चाने होत नाही का? माझ्या मोटारगाड्या, विमानाचा प्रवास, प्रचंड पोलिस बंदोबस्त यासाठी यांना एक पैसाही द्यावा लागत नाही. या शिवाय असल्या बंदोबस्तावर किंवा मोठ्या धार्मिक मिरवणुकीकरता तैनात झालेल्या पोलिसांवर ताण पडतो व रस्त्यावरील रहदारी विस्कळित होऊन जनतेची गैरसोय होते, याची किती जण दखल घेतात? 

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा, की या आपल्या धर्मनिरपेक्ष राज्यात राजकारणी व्यक्ती असोत किंवा सरकारी नोकर असोत, त्यांनी जनतेच्या खर्चाने आपली भाविकता चालू ठेवणे हे कितपत योग्य आहे? दत्ताचे छोटे मंदिर असलेल्या एका पोलिस ठाण्याचा उल्लेख केलेलाच आहे. एकदा अशी सवलत आपल्या धर्मनिरपेक्ष राज्यात दिली गेली की दुसऱ्या एखाद्या पोलिस ठाण्यात किंवा कार्यालयाच्या आवारात मशीद किंवा चर्च किंवा गुरुद्वारा बांधण्यास कसे कोण मनाई करू शकणार? असल्या मंदिरावरून पुढे मागे पोलिसांतच मतभेद होऊन तेथे बाचाबाची व मारामाऱ्या होणारच नाहीत असे धरून चालता येईल का?

आपण लोक इतके भाविक कसे झालो, की आपण कर्तव्यापेक्षा भक्तिप्रदर्शनावरच जास्त जोर देतो आणि त्यामुळे आपली व आपल्या देशाची भरभराट होण्याऐवजी अवनतीच होत आहे, ही गोष्ट आपल्या ध्यानात येत नाही?

या संदर्भात आणखी एक प्रश्न विचारावासा वाटतो व तो म्हणजे आपण, 100 टक्के सोडून द्या पण 50 टक्के तरी शुद्ध भाविक आहोत का? सत्ता टिकविण्यासाठी किंवा मिळविण्यासाठी लांड्यालबाड्या, लाचलुचपत, एकमेकांचे पाय ओढणे, आपल्या वरिष्ठ लोकांची खुशामत करणे व लांगूलचालन करणे, व्यवहारात दुसऱ्यांना फसविणे, वाटेल त्या उपायांनी पैसे मिळविणे वगैरे प्रकारांना आता ऊत आला आहे. मग आपली देवभक्ती कितपत असली व कितपत नकली आहे? गंगेसारख्या पवित्र मानलेल्या नदीत अमुक दिवशी अमुक वेळी स्नान केले तर आपली सर्व पापे धुवून जातात (व मग नवीन पापे करायला मोकळीक!) किंवा ठराविक दिवशी नेहमीचे अन्न न खाता दुसरे पदार्थ खाणे किंवा अजिबात काही न खाणे व अशा कारणांमुळे काही चांगले फळ मिळते असे मानणे किंवा अमुक दिवशीच गणपतीचे दर्शन घेतले म्हणजे ते लाभदायक असते मग त्याच्यात 4/5 तास वाया गेले तरी हरकत नाही, यांसारख्या कल्पनांनी आपण आपल्या भाविकतेचे एक प्रकारे अवमूल्यनच करत नाही का?

माझ्या मते भक्तिमार्गाचा आपल्या मनायर एवढा प्रभाव पडला आहे त्याचे कारण आपली काही धार्मिक पुस्तके व ग्रंथ आणि त्यांना अनुसरून साधुसंतांनी आपल्या प्रवचनांत कर्तव्याऐवजी भक्तीवर दिलेला जोर हेच असावे. पहिले उदाहरण सत्यनारायण पूजेच्या वेळी ज्या कथा सांगितल्या जातात त्यांचे घेऊ या. कथेनुसार ही पूजा योग्य वेळी केली तर उत्तम परिणाम होतात पण जर पूजेत टाळाटाळ झाली तर अनिष्ट परिणाम भोगावे लागतात. अशा किती तरी गोष्टी आपण वरील पूजेत ऐकतो. त्यांचा निष्कर्ष एवढाच की पूजेनेच सुख, संपत्ती व शेवटी मोक्ष मिळतो, दुसरे काही करण्याची जरुरी नाही. पण ही पूजा करण्याबाबत जर दुर्लक्ष झाले तर मात्र संकटावर संकटे येतात.

आपल्या महाराष्ट्रात संत तुकाराम व संत ज्ञानदेव यांचा जनतेच्या मनावर जबरदस्त पगडा आहे. मी तुकारामांनी लिहिलेल्या काव्य, अभंग वगैरेचा अभ्यास केलेला नाही, अगोदरच कबूल करतो. पण जे काही थोडे वाचले व ऐकले आहे त्यावरून असे दिसते की त्यांच्या मते कितीही कष्ट सोसावे लागले तरी परमेश्वराची भक्ती करणे हेच इहलोकी प्रत्येकाचे मुख्य कर्तव्य आहे, मग त्यात कितीही वेळ गेला तरी हरकत नाही. या उलट असे म्हणता येईल की या जगात जी आतापर्यंत मानवाची प्रगती झाली आहे ती देवपूजेने झालेली नाही, तर गंभीर विचार, सृष्टीचा खोल अभ्यास, अविरत प्रयत्न, हुशार लोकांनी केलेला आपल्या तल्लख बुद्धीचा उपयोग वगैरे गोष्टींनी झाली आहे. जे लोक किंवा समाज आपल्यासारखे नुसतेच देव देव करत बसले व त्यामुळे निष्क्रिय झाले, त्यांची पीछेहाटच झाली आहे.

संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे व ती भगवद्गीतेवर आधारलेली आहे असे मानले जाते. मी गीतेविषयी माझी मते खाली मांडणारच आहे तेव्हा येथे त्यांचा पुनरुच्चार करण्याची जरुरी नाही.

साधुसंतांच्या विषयी लिहिताना एक गोष्ट दिसून येते ती म्हणजे ज्यांनी ज्यांनी चमत्कार केले आहेत किंवा ज्यांच्या नावावर असे चमत्कार दाखविले गेले आहेत (उदा. तुकारामांच्या गाथांचे बंडल इंद्रायणी नदीत टाकले तेव्हा ते पाण्यात न बुडता तसेच तरंगत राहिले. किंवा ज्ञानेश्वरांनी रेड्याकून वेद म्हणविले वगैरे) त्यांचा जनमतावर अतिशय प्रभाव पडला आहे. उलट ज्यांनी चमत्कार केले नाहीत (उदा. रामदास) ते लोकांना आकर्षित करण्याच्या शर्यतीत थोडे मागेच राहिले आहेत.

भगवद्गीतेसंबंधी माझे जे मत झाले आहे ते पुष्कळांना पटणार नाही हे मी जाणून आहे. माझा संस्कृतचा अभ्यास कॉलेजनंतर बंद झाला मागून मी गीतेचे मराठी व इंग्लीश भाषांतर एकदा नाही तर दोन तीनदा वाचले आहे आणि मला असे वाटते की श्रीकृष्णांनी एकूण कर्तव्यापेक्षा स्वतःच्या भक्तीलाच महत्व जास्त दिले आहे. आपल्या देवपणाचे ठिकठिकाणी वर्णन करून अर्जुनाला उपदेश केला तो असा-  मला एकट्यालाच शरण जा, माझा भक्त कधीही नाश पावत नाही, जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो तेव्हा तेव्हा मी मनुष्य अवतार घेऊन या पृथ्वीतलावर येतो वगैरे. असे कोठेही लिहिलेले नाही की मी या पृथ्वीवर असो की नसो, तू निश्चय करून बाहेर पड, धर्माची अवनती का होत आहे याचा विचार कर व माझ्या पूजाप्रार्थनेत फाजील वेळ न घालवता आपल्या लोकांना बरोबर घेऊन योग्य ती कारवाई कर. 

त्याचप्रमाणे साधुसंतांचा छळ जे करत असतील त्यांना तुम्ही तलवारीने किंवा गदेने योग्य तो धडा शिकवा. मी या पृथ्वीवर अवतरण्याची बिलकुल वाट बघू नका. चांगल्या कामात मी नेहमीच तुमच्या पाठीशी आहे असे धरून पुढे चला. हे खरे आतहे की गीतेच्या दुसऱ्या व तिसऱ्या अध्यायात अर्जुनाला श्रीकृष्णांनी, तू लढून आपले कर्तव्य कर म्हणून सांगितले आहे पण त्याला कारणे दिली आहेत ती एकदम पटण्याजोगी नाहीत. 

आत्मा अमर आहे म्हणून तू (म्हणजे अर्जुन) तुझ्या नातेवाईकांना व इतर आदरणीय माणसांना मारलेस तरी त्याचे काही वाईट वाटून घेऊ नकोस; कारण त्यांचे आत्मे न मरता दुसऱ्या शरीरात जातील. तुझा अधिकार फक्त कर्मे करण्याचा आहे, त्याचे फळ मिळेलच असे धरून चालू नकोस, सर्व कर्म अनासक्तीने कर इत्यादी. युद्धाकरता दोन सैन्ये समोरासमोर सज्ज होऊन उभी राहिली असता वरील प्रकारचा उपदेश, निश्चयाने लढण्यास मन तयार करण्याऐवजी त्याच्यात गोंधळच निर्माण करण्याची शक्यता जास्त वाटते.

आपल्या देशापुढे आज कोलमडणारी अर्थव्यवस्था, वेगाने वाढणारा काळा पैसा, ढासळलेली नीतिमत्ता, बोकाळलेली लाचलुचपत, पैशाकरता व सत्तेकरता वाटेल तो हीन मार्ग पत्करण्याची तपारी, तत्वशून्यता, भाषेमुळे किंवा धर्मामुळे वाढणारे कलह, फुटीरपणाचा व दहशतवादाचा भयप्रद विस्तार इत्यादी अनेक गंभीर प्रश्न उभे आहेत व ते सोडविण्यावर लक्ष पूर्ण केंद्रित केले नाही तर कुणालाही देशाच्या भवितव्याबद्दल चिंताच वाटू लागेल.

तेव्हा वेळ आली आहे ती विचारवंतानी व सत्तेवर असणाऱ्या व्यक्तींनी जनतेला पुढे जाण्यासाठी योग्य दिशा दाखविण्याची. परमेश्वरावर विश्वास ठेवणे व त्याची भक्ती किंवा पूजा करणे याविषयी कुणाचीच हरकत असणे शक्य नाही पण प्रश्न आहे तो या भक्तिपूजेमध्ये किती वेळ, पैसा व शक्ती घालवावी व त्याला किती सार्वजनिक स्वरूप द्यावे हा आहे. दुसऱ्या महायुद्धात जवळ जवळ पूर्ण उध्वस्त झालेली दोन राष्ट्रे जर्मनी व जपान यांनी गेल्या 45 वर्षात इतकी अचंबा वाटणारी प्रगती केली आहे की आर्थिक क्षेत्रांत ती अग्रेसर होऊन बसली आहेत. 

त्यांनी अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स इत्यादी विजेत्या राष्ट्रांनाही पार मागे टाकले आहे. विज्ञान क्षेत्रातही हे दोन देश सर्वात पुढे नसले तरी आघाडीवरच आहेत. त्यांचेच अनुकरण करून दक्षिण कोरिया, तैवान, सिंगापूर, हाँगकाँग आणि मलेशिया या लहान राष्ट्रानींसुद्धा किती तरी सर्वांगीण प्रगती केली आहे.

हे सगळे कशाच्या बळावर, तर कडक शिस्त, खूप कष्ट व देश वरती आला पाहिजे, त्याकरता काही स्वार्थत्याग करावा लागला तरी तो केला पाहिजे याची तयारी यांमुळेच. तेथील बहुतेक लोकांची धर्मावर व परमेश्वरावर श्रद्धा आहे पण ते तिचा फाजील देखावा करत नाहीत किंवा पूजाप्रार्थनेत फार वेळ घालवत नाहीत. टूंकू अब्दुल रहमान हे काही वर्षांपूर्वी मलेशियाचे प्रसिद्ध पंतप्रधान होते. त्यांना एकाने विचारले की तुमचे जीवनाविषयी काय विचार आहेत? त्यांनी उत्तर दिले की परमेश्वराचे देणे आहे ते मी त्याला देतो; माझ्या देशाला मी जे देणे आहे ते तर देतो व मला स्वतःला जे देणे आहे ते मी मला देतो. म्हणून मी देवाची प्रार्थना करतो, देशाकरता जेवढे करता येईल तेवढे करतो व मला ब्रँडीआवडते ती  पितो आणि पोकर व गोल्फ हे खेळ आवडतात ते खेळतो. तात्पर्य हे की इतर गोष्टींपेक्षा कर्तव्यालाच प्राधान्य दिले पाहिजे.

भारत सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे व तीतून यशस्वी रितीने बाहेर पडायचे असेल तर त्याला शिस्त, कष्ट, स्वार्थत्याग व निस्सीम देशभक्ती यांशिवाय तरणोपाय नाही व असले वातावरण तयार करण्याची जबाबदारी मुख्यत्वे सत्तेवर लोक आहेत त्यांची आहे. त्यांनी जर राज्यकारभार नि:पक्षपातीपणाने, सचोटीने, न्यायाच्या चौकटीत राहून, अनावश्यक गोष्टीत वेळ न दवडता, देशाचे हितच पुढे ठेवून केला तर जनता खात्रीने त्यांच्या पाठीमागे राहील व आपला भारत प्रगतिपथावर आगेकूच करील. नाहीतर त्याचे भवितव्य धोक्यात येण्याचीच शक्यता जास्त दिसते.

Tags: शिस्त भगवद्गीता जर्मनी जपान पोलीस यंत्रणा प्रशासन राजकीय पक्ष वि.गो.कानीटकर कर्तव्य भक्ती Discipline. Bhavadgita Germany Japan Police system Governance Political parties V.G.Kanetkar Duty Devotion weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके