डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

भाजपचा एक कलमी कार्यक्रम : सत्ता

स्थिर सरकारची घोषणा करीत असताना भाजपने आपली दारे सर्वाना उघडी ठेवली आहेत आणि इतर पक्षांतले संधिसाधू भाजपकडे धाव घेत आहेत. पण या सर्वांची मोट बांधून आणि पक्षातील प्रामाणिक कार्यकर्त्यांना दूर ठेवून सत्ता हस्तगत होऊ शकली तरी स्थिर शासन देणे भाजपला शक्य होईल? कल्याणसिंगांनी दाखविलेल्या या रस्त्यावर ते स्वतः किंवा अटलबिहारी किती काळ चालत राहतील?

श्री. वाजपेयी यांनी 21 डिसेंबर रोजी जाहीर केले की आम्ही अयोध्येचा प्रश्न सोडलेला नाही. मात्र केन्द्रात 'सत्तेवर' आल्यावर आम्ही सामंजस्याने तो प्रश्न सोडवू. त्यांनी असेही म्हटले आहे की काशी व मधुरा है प्रश्न 'तूर्त' आमच्या कार्यक्रमपत्रिकेवर नाहीत, पण विहिप व बजरंग दल इत्यादी परिवारातील संघटना हे प्रश्न आक्रमकरीत्या धसाला लावीत आहेत. यात्रा काढत आहेत आणि हा ज्वलंत प्रश्न तेवत ठेवीत आहेत. म्हणजे अप्रत्यक्षपणे आणि मोठ्या खुबीने हे प्रश्न भाजपच्या कार्यक्रमात अंतर्भूत झाले आहेत. ही दुतोंडी व दुटप्पी भाषा आणि एकसारखे बदलते डावपेच ते करीत आहेत. खरे तर तो त्यांचा स्थायीभावच आहे. एकच निधीध्यास-सत्ता.

मधून मधून उदारमतवादी आणि रसाळ भाषेत सचोटी, प्रामाणिकपणा व स्वच्छ प्रशासन यांची मधुर पेरणी चालू आहेच. श्री. वाजपेयी सर्व परिवारात हुशार आणि आपली प्रतिमा उजळ ठेवण्यात बरेच वाकबगार आहेत. त्यांच्या शिष्यांनी व त्यांची सत्ता असलेल्या राज्य सरकारांनी काही 'चुका' केल्या तर त्याबद्दल श्री. वाजपेयी यांना जबाबदार धरणे अन्यायाचे होईल. महाराष्ट्रापुरते बोलायचे तर एन्रॉन प्रकरण, डाळ प्रकरण, सार्वजनिक बांधकाम खात्यातील भानगडी प्रकरण इत्यादी गोष्टींचा आपद्धर्म म्हणून स्वीकार करावा लागतो. पण त्याबद्दल वाजपेयींना बळीचा बकरा का म्हणून करायचा? 

काँग्रेसची अभूतपूर्व घसरण 

खरे तर पंडित नेहरूंच्या काळापासूनच काँग्रेस पक्षात धीरे धीरे भ्रष्टाचार चालू होता. त्याचा उत्कर्ष बिंदू राव सरकारच्या काळात गाठला गेला. स्वराज्याचे सुराज्य करण्याचा प्रयत्न नगण्यच म्हणावा लागेल. या पक्षाने कधी खऱ्या अर्थाने समाजवादाचा अंगीकार केला का? पंडित नेहरूंच्या प्रेरणेने उभे राहिलेले सार्वजनिक क्षेत्र जवळजवळ पूर्णपणे उखडून टाकण्यात आले आहे. भांडवली विकासाचा मार्गच त्या पक्षाने स्वीकारला. त्या पक्षाने अंगिकारलेले उदारीकरणाचे व मुक्त अर्थव्यवस्थेचे धोरण यांमुळे तो पक्ष डबघाईला येणे क्रमप्राप्तच होते. 

जैन आयोगाची गफलत 

काँग्रेसने प्रथम 30 मार्च 1997 रोजी काहीही कारण नसताना देवेगौडा सरकार पाडते. जैन आयोगाने 17 खंड, 1 निष्कर्ष खंड व परिशिष्टे असा 500 पानांचा प्रचंड अंतरिम अहवाल (केवळ घटनाक्रम दाखवणारा) तब्बल 6 वर्षांनी सादर केला. पण आयोगाने द्रमुकला मुळीच जबाबदार धरलेले नाही. एक तर त्या वेळी राष्ट्रपती राजवट होती. शिवाय एल.टी.टी.ई.ला काँग्रेससह सर्वच उजव्या पक्षांनी मदत केली होती. द्रमुकचा केवळ दुरान्वयाने उल्लेख केला. कुठलाही ठोस पुरावा नसताना त्या पक्षाच्या मंत्र्यांना वगळण्याची मागणी काँग्रेसने आततायीपणाने केली. अन्यथा आम्ही पाठिंबा काढून घेऊ अशी धमकी दिली आणि तरीही जैन अहवाल अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लोकसभेपुढे ठेवावा असा आग्रहही धरला. हा सर्व खटाटोप पुन्हा एकदा सहानुभूतीची लाट निर्माण करून सत्ता काबीज करण्यासाठी होता हे स्पष्ट आहे. पण कुठलीही लाट पुन्हा निर्माण करता येत नसते. हा विवेक त्यांना कुठून येणार ? 

काँग्रेसने आक्रस्ताळेपणा करून संसदेचे काम आरडाओरड्याने चालूच दिले नाही, अन्यथा जैन आयोगावर चर्चा होऊन त्यातील तथाकथित निष्कर्ष खोटे असल्याचे सिद्ध झाले असते. त्या व्यतिरिक्त उत्तर प्रदेशमध्ये भाजपने केलेला उच्छाद उघड्यावर येऊन त्या पक्षाचे पितळ उघडे पडले असते. परिणामी या भयानक नाट्याचा फायदा भाजपलाच मिळाला. काँग्रेसने या सर्व खटाटोपात काय साधले? स्वतःचा काला स्वतःच खणला आणि देशावर अवघ्या 1॥ वर्षात मध्यावधी निवडणुका लादल्या. 

यापूर्वी राजीव हत्या प्रकरणी 1990 साठी न्या. वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमला होता. (न्या. वर्मा म्हणजे सध्याचे भारताचे सरन्यायाधीश होत.) त्या आयोगाने सुरक्षा व्यवस्थेतील उणिवांवर टीका केली होती आणि विशेषकरून काँग्रेस पक्षाच्या गाफीलपणावर तीव्र टीका केली होती. हे सोयीस्कर नसल्याने काँग्रेस पक्षाने जैन आयोगाचा आश्रय घेतला.

राजीव हत्त्येचा खटला 

राजीव गांधी हत्त्या खटला चेन्नई येथे विशेष न्यायालयात नियमितपणे चालू आहे. या खटल्याचा निकाल जानेवारी 1998 मधे लागण्याची शक्यता आहे. निदान तोपर्यंत वाट पाहायला हरकत नव्हती. पण सर्व विवेक, मुत्सद्देगिरी आणि शहाणपणा यांना हा पक्ष जणू विन्मुख झाला आहे. त्या पक्षाला कुठलीही दिशा राहिलेली नाही. एका पाठोपाठ अपयश व फाटाफूट होत असल्याने काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते अगतिक, अविवेकी आणि अविचारी झालेले दिसतात. त्यांचे एकेक पाऊल बेदरकारपणे पडत असल्याचे दिसते. पण त्यामुळे एकूण देशावर काय भयानक परिणाम होऊ शकतील याची क्षिती त्यांनी बाळगली नाही. जनतेवर आणखी एक निवडणूक, एक हजार कोटींचा बोजा व उमेदवारांवर शेकडो कोटी रुपयांचा बोजा बिनदिक्कतपणे टाकण्यात आला. त्याहूनही गंभीर बाब म्हणजे भाजपसारख्या प्रतिगामी, संप्रदायवादी फुटीर पक्षांना खतपाणी घातले गेले आहे. 

इतिहासाची साक्ष 

यापूर्वीही अनेक राजकीय नेत्यांच्या खुनाये कट कधीच सिद्ध झाले नाहीत. लियाकत अली खान, जनरल ऑगसान, जॉन केनेडी, श्रीलंकेचे श्री. भंडारनायके, मार्टिन ल्यूथर किंग, अन्वर सादत, इंदिरा गांधी, झिया उल हक् इत्यादी नेत्यांचे खरे खुनी सापडले नाहीत. जॉन केनेडींचा खून झाल्याला 34 वर्षे झाली पण प्रत्यक्ष खुन्याचा तपास लागलेला नाही. राजीव गांधी खून खटल्याचा निकाल पुढील महिन्यात अपेक्षित आहे. न्यायालयाचा निर्णय काय असेल हे आज सांगता येणार नाही. 

भाजपची भंपक भूमिका 

काँग्रेसची अशी कल्पना होती की संयुक्त आघाडीचा पाठींबा काढून घेतला की आघाडी फुटेल आणि आपल्याला सत्ता काबीज करता येईल. पण काँग्रेसची दिवाळखोरी इतकी स्पष्ट झाली होती की त्या पक्षाचे सर्व अंदाज चुकीचे ठरले. त्या पक्षाच्या अवसानघातकी कृतीमुळे काँग्रेसजन अधिकच अडचणीत आले आहेत. काँग्रेसची सर्वत्र पडझड झाली आणि ही प्रक्रिया चालूच आहे. 

या परिस्थितीचा फायदा घेऊन भाजपने सर्वत्र ज्या ज्या पक्षातून माणसे फोडता येतील त्यांना सामावून घेण्याचा सपाटा चालवला आहे. उत्तर प्रदेशमध्ये ज्या हीन आणि लज्जास्पद मार्गाचा अवलंब करून भाजपने आपले 'बहुमत' सिद्ध केले. तोच प्रयोग त्यांना केंद्रामध्ये करायचा होता. उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी काँग्रेस, बसप व जनता दलातील व काही स्वतंत्र मिळून एकूण 70 आमदार खरेदी केले. त्या सर्वाना मंत्रिपदे बहाल केली आणि 93 मंत्र्यांचे एक जंबो मंत्रिमंडळ तयार केले. (हे  एक जागतिक रेकॉर्ड आहे.) त्यामध्ये सुमारे 15 मंत्री हे अट्टल गुन्हेगार आहेत. त्यांच्या संबंधी काय निर्णय घेतला या प्रश्नाला उत्तर देताना श्री. अडवानी म्हणाले, 'त्यांच्याबद्दल नंतर बघता येईल.'

केन्द्रातील त्याच प्रयोगाबद्दल त्यांनी स्पष्ट केले की, 'आम्ही काँग्रेसचे फक्त 40 खासदारच फोडू शकलो.' (केवढा नैतिक पवित्रा!) संयुक्त आघाडीत त्यांना फूट पाडता आली नाही. अखेर श्री. गुजराल यांनी राजीनामा दिला आणि नव्या निवडणुकीचा निर्णय घेतला गेला. भाजपचा डाव फसला आणि तूर्त तरी एक संकट टळले. 

भाजपचे चार चकार 

आपण इतर पक्षांहून वेगळे आहोत हे सतत सांगताना भाजप नेते चार चकारांचा उल्लेख करतात. चेहरा, चाल, चारित्र्य आणि चिंतन. उत्तर प्रदेशमध्ये त्यांचा चेहरा उत्तम दिसला. तो म्हणजे आत्यंतिक संधिसाधुपणा व नीतिमूल्यांचा संपूर्ण चुराडा. त्यांची चाल (वागणूक) केन्द्रात सत्ता मिळवण्यासाठी केलेल्या घृणास्पद (पण विफल) कारवायांमुळे सिद्ध झालेली आहे. चारित्र्याबद्दल बोलायचे तर जवळजवळ सर्व राज्यांमध्ये (जिथे त्यांचे अस्तित्व आहे) लाथाळ्या आणि मारामाऱ्या चालू आहेत. वैतागाने मध्यप्रदेशमध्ये खासदार उमा भारतींसह किमान पाच जणांनी राज्य कार्यकारिणीचा राजीनामा दिला. भूतपूर्व मुख्यमंत्री श्री. कैलास जोशी, पूर्वीचे मंत्री एल्. एन्. शर्मा (आमदार), करन वर्मा व खा. प्रल्हाद पटेल हे प्रमुख नेते त्यांत आहेत. 

भाजपच्या नेत्यांतील भ्रष्टाचार व त्यांची राज्य सरकारे असलेल्या सरकारांची बहुराष्ट्रीय कंपन्यांशी असलेली 'स्वदेशी' मैत्री या बाबी सर्वश्रुत आहेत. त्यांच्या चिंतन बद्दल (विचारसरणी) न बोललेलेच बरे. त्यांच्या एका चिटणिसानेच म्हटल्याप्रमाणे, 'वाजपेयी हा मुखवटा आहे, तो त्यांचे मुख दडवतो. त्यांचा मुखवटा इतर पक्षांचा पाठिंबा घेण्यासाठी भुरळ पाडतो.' त्यांचे खरे मुख म्हणजे फासिस्ट हिंदुराष्ट्र निर्मितीची भूमिका हे जाणकारांना स्पष्ट दिसते. हिटलरनेही असा मुखवटा धारण करून सत्ता (निवडणुकांतून) काबीज केली आणि मानवजातीच्या इतिहासात कधीही घडले नव्हते असे निर्घुण अत्याचार हत्याकांडे केली. 

वाजपेयी हे उदारमतवादी आणि कविमन असलेले नेते मानले जातात. त्यांच्याच भाषेत सांगायचे तर, 'तनमन हिंदू, जीवन हिंदू, रगरग हिंदू - मेरा परिचय.' ही त्यांची विचारधारा. पण हिटलरसारखे काही करतील असे मात्र कुणाला वाटत नाही. काही असले तरी त्यांना श्रेष्ठ प्राचीन वैदिक वारसा आहे. अकारण हिंसा है वैदिक तत्त्वज्ञानात अनुस्यूत नाही. त्यांना सत्ता मिळाली (खात्री नाहीच आहे) तरी लोकशाहीवाद्यांना घाबरण्याचे कारण नाही. भाजप आपल्या सर्व शक्तीनिशी आपल्या चकारांचा उपयोग करून सत्ता काबीज करण्याचा अवश्य प्रयत्न करणार हे स्पष्ट आहे. दुर्दैवाने त्या पक्षाने सर्व नैतिक मूल्ये भिरकावून दिल्याने त्या पक्षाची विश्वासार्हता संशयातीत नाही.

स्थिर सरकारची हाकाटी 

अनेक पक्षांची आघाडी स्थिर सरकार देऊ शकत नाही असा डांगोरा हा पक्ष सतत पिटत असे. पण याच लोकांनी आता आघाडी बनवण्याचा आटापिटा चालवला आहे. प्रादेशिक पक्षांसह 'कुणाशी ही युती करण्याची त्यांची तयारी आहे. अशी ही अजब आघाडी कसे काय स्थिर सरकार देणार? स्थैर्य कुणासाठी? प्रस्थापित वर्गासाठी की सर्वसामान्यांसाठी, याचे उत्तर देणे त्यांना सोयीस्कर नाही. दुटप्पीपणा आणि अतार्किक दुतोंडी भाषा यांत नवीन काहीच नाही. सत्तेच्या विवेकशून्य लालसेने राजकारणातील सर्व नीतितत्त्वे आणि सभ्यता त्यांनी मोठ्या धाडसाने भिरकावून दिली आहेत.

भारतीय जनता मूर्ख नाही.

काँग्रेसची दिवाळखोरी आणि मोडतोड व भाजपची दांभिक फुटिरतावादी भूमिका स्वच्छपणे प्रकाशात आली आहे. जनता गप्प किंवा उदासीन राहील असे वाटत नाही. धर्मनिरपेक्षता, लोकशाही आणि सामाजिक न्याय ही धोरणे राबवणारी संयुक्त आघाडीच दोन्ही प्रतिगामी पक्षांना हाणून पाडू शकेल असा विश्वास वाटतो.

Tags: वि. रा. देव राजीव गांधी अटलबिहारी वाजपेयी भाजप कॉंग्रेस निवडणूक राजकारण v. r. deo Atal Bihari Vajpayee rajiv Gandhi election congress bjp politics weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके