डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

दारिद्र्याचा वसा घेतलेले थोर शिक्षक

समोरच्या एका तरी विद्यार्थ्याच्या जीवनाला आकार देण्याचं स्वप्न पाहताना त्यात रमून जाणे ही जर जातिवंत शिक्षकाची कसोटी असेल तर एन्.वाय सर या कसोटीवर उतरलेलं एक खणखणीत नाणं होते. असा अंतर्बाह्य शिक्षक अत्यंत आवशावादी असतो, त्याचा प्रचंड आशावाद ही त्याची एकट्याची ताकद नसते, ती एक प्रचंड शक्ती असते. एन्.वाय.कुळकर्णी सर अशा मावळत्या पिढीचे एक फार मोठे आश्वासक स्थान होते.

समोरच्या एका तरी विद्यार्थ्याच्या जीवनाला आकार देण्याचं स्वप्न पाहताना त्यात रमून जाणे ही जर जातिवंत शिक्षकाची कसोटी असेल तर एन्.वाय सर या कसोटीवर उतरलेलं एक खणखणीत नाणं होते. असा अंतर्बाह्य शिक्षक अत्यंत आवशावादी असतो, त्याचा प्रचंड आशावाद ही त्याची एकट्याची ताकद नसते, ती एक प्रचंड शक्ती असते.

एन्.वाय.कुळकर्णी सर अशा मावळत्या पिढीचे एक फार मोठे आश्वासक स्थान होते.

चोपड्यासारख्या, त्या काळी तर आणखीच आडवळणाच्या एका खेडेवजा पण संपन्न तालुक्यात, सर्वस्वाने वाहून घेण्याची प्रतिज्ञा करुन आलेल्या एन्.वाय सरांनी आपल्या आयुष्याला सुरुवात केली आणि त्यांनी शिक्षण हा आत्मशोधाचा जणू यज्ञ घडवावा तसे सर्वस्व आपल्या अंगीकारलेल्या व्यवसायात पाहिले, आणि या आत्मशोधाचा भाग म्हणूनच त्यांनी आपल्यातल्या शिक्षकाला अखेरपर्यंत घडवीत नेले.

सर्वसामान्य शिक्षकाच्या वाट्याला यावा तेवढा दारिद्र्याचा वसा त्यांनी अंगाखांद्यावर राजवस्त्रासारखा मिरवीत ठेवला! आयुष्याचे अर्थ शोधताना त्यांना कधी धाप लागली नाही. क्षुद्र मानापमानाचे प्रसंग शिक्षकाच्या आयुष्यात उभे करण्यासाठी सारी यंत्रणाच जणू सिद्ध असते. एन्.वाय सरांनी अशा अनेक प्रसंगांना वादळात उभे राहणाऱ्या पण सुकाणू हरवू न देणाऱ्या योद्ध्याची भूमिकाच पार पाडली. या अनेक उलथापालथींत जीवघेण्या क्षणांनाही चळचळा कापायला लावणारी शक्ती त्यांनी उभी केली, ती केवळ अविश्रांत शिक्षण-निष्ठेतून.

उणीपुरी चाळीस वर्षे एन्.वाय कुळकर्णी नावाचे एक वादळी शिक्षण-मूल्य तग धरून उभे राहिले ते केवळ 'विद्यार्थी' या आपल्या आयुष्यातल्या परम केंद्रबिंदुशी इमान राखल्यामुळेच.

त्यांचा माझा परिचय केव्हा घडून आला, हे आठवूनही आठवत नाही. पण जेव्हा केव्हा प्रथम भेट झाली असावी, त्या भेटीतही एन्.वाय. सर जणू युगांपासून परिचित असल्यासारखी घट्ट ओळख झाली. हाडाच्या शिक्षकाचे सर्व गुण सरांच्या प्रत्येक बारकाव्यातून व्यक्त होत असल्याचा भास मला त्या वेळीही झाला आणि तदनंतरच्या तीस पस्तीत बर्षांच्या वाटचालीत आमच्याच चढउतारांनी दमाक झाल्याने बहुधा आम्हीच आम्हाला बदलत्या रूपातून भेटण्याचा खुला खेळ सुरु झाला. 

मात्र एन.वाय सर पहिल्या भेटीतल्याइतकेच मनाने टणक टवटवीत दिसत राहिले. एन्.वाय सरांनी भोवती माणसं जमा केली, त्यांत त्यांनी त्या त्या माणसाला त्याचा चेहरा-मोहराच जणू प्राप्त करून दिला. घरात लहानपणापासूनच वागलेल्या एका मुलाला अक्षरशः अपत्यवत् प्रेम दिलं. इतकं की आपल्याला अर्घ्य द्यायची सूचना ही त्यांनी आपल्या मुलाला कळवून ठेवावी यातच या जगाच्या व्यावहारिक मुखवल्यापटीकडे पाहणारे फार कोवळे मनच दिसून येते.

एन्. वाय कुळकर्णी नुकतेच आपल्या वयाची 85 वर्षं पुरी करुन या जगाचा निरोप घेते झाले.

आपल्या एकुलत्या एका मुलाच्या संपन्न संसारात त्यांनी सुखाने प्राण सोडला. आयुष्याच्या शेवटच्या घटकेपर्यंत त्यांनी आपला भार कुणावर पडू नये याची ऋषितुल्य काळजी घेतली.

अगदी अलीकडे काही वर्षात एन्. वाय. सरांनी आपली कर्मभूमी चोपडा सोडली होती. आर्किटेक्ट म्हणून नावाजलेल्या आपल्या मुलाच्या संसारात ते येऊन राहिले होते. पण एन्. वाय सरांच्या आयुष्याचे पीळच असे जबरदस्त होते की सुखाच्या उबदार राशींतही त्यांना आपल्यातल्या शिक्षकाचे अखंड भान होते. नातवंडांबरोबरच काही विद्यार्थी भोवती जमा करून आपल्या ज्ञानाचे संचित थरथरल्या हातांनी पण मनाच्या पूर्ण उभारीनिशी जणू दोन्ही हातांनी ते उधळत राहिले.

थोडे ठेंगणे-ठुसके, पीळदार शरीराचे सर आत्मविश्वासाने सदैव भारलेल्या धारदार शब्दांनीच भेटीला येत. खादीचे धोतर, पांढरा स्वच्छ सदरा आणि गांधी टोपीला तिचे स्वत्व अबाधित राखण्याचे अभिवचन दिल्यासारखी तिची डोक्यावरची ठेवण, एवढेच त्यांच्या पोषाखाबद्दल सांगता येईल. त्यांच्या हातात काठी कधी आली, हे ठाऊक नाही. पण काठीचा आधार घेण्याची आवश्यकता त्यांना ज्या दिवशी भासली ती मला वाटते त्यांच्या मनाची उलघाल करणारी वेळ असावी. कुणाचा तरी आधार शोधावा लागण्याची ही वेळ आयुष्यात त्यांनी निकराने पुढे ढकलत आणली होती.

एन्. वाय सरांनी असंख्य विद्यार्थ्यांना घडवलं. प्रसंगी आपल्या तुटपुंज्या संसारातून वाढलंही. त्यांचेच विद्यार्थी वृद्ध होऊन आपली ओळख सांगताना सरांना थोडे आठवावे लागायचे. पण मग त्याच्या संपूर्ण नावानिशी त्याचा सत्कार व्हायचा. आज समोर उभा असलेला, वृद्धत्वाकडे झुकलेला विद्यार्थी त्यांना जणू कितीतरी वर्षांपूर्वी वर्गातल्या बाकावरचा चिमुरडा म्हणून आठवायला फारसे प्रयास घडत नसते जाणि ती क्षीण उगवलेली आठवण त्याच्या संपूर्ण नावानिशी अशी याही वयात सरांच्या ओठांवर जागी होई. दोन्ही मुलांची शिक्षणं करताना त्यांनी कधी कुणापुढे हात पसरले नाहीत. आपल्याच हातावर त्यांची श्रद्धा होती. फावल्या वेळात सर विम्याचे कामही करीत. पण ते करताना आपल्या विमेदाराची ते नितांत काळजी घेत.

पुण्याच्या अशा सभा-समारंभातून नित्य टवटवीत राहिलेले एन्.वाय सर भेटत. त्यांच्यासाठी मानचं खास स्थान राखून ठेवलं जायचं. निर्भीडपणे आपल्या सूचना योग्य त्या अधिकाऱ्यांपुढे मांडताना त्यांना कधी संकोच वाटला नाही, की व्यवसायात शिस्त पाहणाऱ्या गैरवृत्तींवर कडाडून टीका करताना ते कधी अडखळले नाहीत. 

आपल्या मुलांना त्यांनी फुलांसारखं वाढवलं. मुलीला डॉक्टर केलं तर मुलाला आर्किटेक्ट केलं. आगि मुलं त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात लौकिक मिळवून स्थिर झाली तरी त्यांचं कौतुक कधी चारचौघांत पराक्रम म्हणून मिरवलं नाही.

काही मूल्यांवर सरांची नितांत श्रद्धा होती. त्यांची श्रद्धास्थानं थोडीच होती, बहुधा पण ती कमालीची उत्कट होती. त्यांना साने गुरुजींबद्दल अत्यंत जिव्हाळा होता आणि त्यामुळेच ते 'साधना'चे पहिल्या अंकापासूनये नुसते ग्राहक नव्हते तर एक हितचिंतक, प्रसारक होते. मूल्यांसाठी झटणाऱ्या कोणत्याही विचार विद्यापीठाचे त्यांना कमालीचे आकर्षण होते. म्हणून 'साधना' ही त्यांच्या आयुष्यासाठी जणू मर्मबंधातली आठवण होती. 

ज्ञानेश्वरीची पारयणं करण्यातला आनंद त्यांनी आयुष्यभर घेतला पण दासबोधाचे वेगळे वैशिष्ट्य त्यांना नित्य नूतन वाटत राहिले. अनेया श्लोकांच्या अर्थांनी ते भारावून जात. पण आयुष्यभर त्यांच्या चिंतनाचा विषय राहिला तो 'शिक्षण' हाच. शिक्षणाच्या विविध रूपांच, थोरांनी केलेल्या अनेक विचारांचं त्यांनी केलेलं संकलन हे आजच्या काळात ग्रंथरुपाने प्रकाशित व्हायलाच हवं, इतक्या मोलाचं आहे.

एन्. वाय. सरांनी अनेकांना जगायला शिकवलं. आयुष्यात उभं केलं. हे करताना 'इदं न मम' ही अत्यंत निरपेक्ष वृत्ती त्यांनी आयुष्यभर व्रतासारखी राखली. मूत्यूला सामोरे जाण्याविषयी पुष्कळदा आपण काही कल्पना त्या त्या व्यक्तीवर लादत असतो. एन्.वाय. सरांनी मृत्यूला जणू त्यांच्याच एखाद्या विद्यार्थ्यासारखं पोटाशी घेतलं.

आयुष्यभर शिक्षकी व्यवसायात घालवणाऱ्या व्यक्तीला मृत्युपत्र करण्याची गरज पडत नसावी. पण एन्. वाय. सरांनी आपलं मृत्युपत्र म्हणण्यापेक्षा मृत्युचित्र आपल्याच सरळ साध्या भाषेत चितारुन ठेवलेलं आहे. ते वाचल्यानंतर या माणसाच्या मनाचा तळ अधिक स्वच्छ झालेला दिसतो.

कितीतरी दिवस आधी लिहून ठेवलेला हा मजकूर आपल्याच आयुष्याकडे तटस्थपणे पाहण्याची परमावधी किती मनोज्ञ असू शकते, याचा प्रत्यय देतो. ते लिहितात :

'माझा देह चैतन्यशून्य झाल्यावर परतभ पांढरे वस्त्र, (शक्यतो खादीची चादर - आपल्या घरात आहे) नेसवून सरळ तिरडीवर ठेवावा. बाहेर रस्त्यावर देह उभा करून त्यावर गरम पाणी घालून स्नान घालण्याचा ओंगळ कार्यक्रम मुळीच करू नये. तुम्ही, चि. राम किंवा माझ्या भावांनी डोकीवरील केस वगैरे काढू नयेत. प्रेतापुढे मडके हातात धरुन चालणे व नातेवाईकांनी डोक्यावरील केस काढणे या गोष्टी आता कालबाह्य व हास्यास्पद झाल्या आहेत.

चैतन्यशून्य देह घरात फार वेळ ठेवू नये. लहान मुलांवर त्याचा फार वाईट परिणाम होतो. कुणाचीही वाट बघून मृतदेह घराबाहेर काढण्यात विलंब होता कामा नये. काका मंडळी यायची आहेत, सौ.उषा यायची आहे म्हणून 'वाट' बघू नये. फक्त सौ.आईची मात्र वाट बघणे इष्ट ठरेल. योगायोग काय व कसा असेल त्याचा नेम नाही. सारांश 'विल्हेवाट' चटकन् लावली गेली पाहिजे.

मी फार मोठा माणूस नाही. नाशकाला वा अलाहाबादला मुळीचजाऊ नये. ज्या दोन नद्यांमध्ये (गिरणा व तापी) मी मनसोक्त डुंबलो त्या नद्या माझ्या अस्थी मोठ्या प्रेमाने स्वीकारतील.

रक्षा (ashes) नीट गोळा करून आपल्या येथील मळ्यात (विहिरीत व शेतात) पसरून द्यावी.

दहावा, अकरावा, बारावा वगैरे काही करू नये. माझ्या मृत्यूनंतर एक महिन्याने खालीलप्रमाणे 'दान' देण्यात (देणगी शब्द मुद्दाम वापरत नाही) देण्यास प्रारंभ करावा. मासिक श्राद्ध हे असे करावे.

1. 'साधना' साप्ताहिक पुणे ३0 - साधना ट्रस्ट या संस्थेस एक हजार रूपये द्यावेत. साधना ट्रस्ट समाज प्रबोधनाचे फार मोठे कार्य करीत आले आहे. पुढेही ते चालू राहणार आहे. महाराष्ट्रातील बुद्धिवंतांना वैचारिक खाद्य पुरविणारे माझ्या मते एकमेव साप्ताहिक आहे. पू. साने गुरुजींनी मला फार प्रेमाने वागविलेले आहे. त्या प्रेमाची मी जाहिरात केली नाही इतकेच. साने गुरुजींची जीवनगाथा, लेखक राजा मंगळवेढेवर यांनी लिहिलेल्या चरित्रात 98 पानावर गुरुजींनी मला केलेल्या मदतीचा उल्लेख आहे. त्यावरून सर्व कल्पना येईल. हे पुस्तक आपल्या घरात आहे. हे पुस्तक माझ्या नातवंडानी वाचावे. त्यांच्या मनाची मशागत फार चांगली होईल. गुरुजींचे साहित्य हे 'रडके-रडविणारे' साहित्य आहे  हा समज फार चुकीचा आहे. त्यांचे साहित्य 'बोलके' आहे, संस्कारित करणारे आहे. अशा साधना-ट्रस्टला द्यावे एक हजार रुपये. साधना साप्ताहिक मी गेल्यावर बंद करू नये. तुम्ही पण ते चालू ठेवावे.

2. चोपडे येथील कस्तुरबा माध्यमिक विद्यालयास (शिरपूर रोडवरील) पाचशे एक रुपये द्यावेत. सौ. आई कस्तुरबा महिला मंडळाची चिटणीस अनेक वर्षे होती. शिवाय कै.सौ.आक्का (शरचंद्रिकाबाई, माजी मंत्री) यांचाही आपल्या सर्वांवर लोभ होता. निजि प्रेम होते. म्हणूण कृतज्ञतापूर्वक हे दान.

३. निजमा महिला मंडळ (सौ. जमुनाबाई गोवर्धनदास यांच्या नेतृत्वाखाली चालवलेले) ह्या संस्थेस एकशे एक रुपये द्यावेत. सौ. आई त्या भगिनी मंडळाची चिटणीस होती. 

4. नगर वाचन मंदिर चोपडे या संस्थेस एकावन्न रुपये द्यावेत. सेवानिवृत्त झाल्यावर त्या संस्थेने माझी ज्ञानतृष्णा भागविली.

5. याज्ञवल्क्य मंडळ चोपडे ह्या संस्थेसाठी एकशे एक रूपये डॉ.टिल्लू यांजकडे सोपवावे.

हे, दान 'नावा करिता किंवा लौकिक मिळावा म्हणून नसून 'सामाजिक ऋण' फेडण्याचा हा एक मामुली मार्ग एका सामान्य शिक्षकाचा आहे, असे मानावे.

दरवर्षी आपण जे श्राद्ध करतो ते माझ्या बाबतीत करू नये. जुन्या पद्धतीने 'श्राद्ध'' करणे आता कालबाह्य झाले आहे.

मला माझ्या विद्यार्थी मित्रांनी व प्राथमिक शिक्षकांनी विशेषतः चोपडा तालुक्यातील शिक्षकांनी फार प्रेमाने वागविले आहे. त्यांचे ऋण कसे फेडू?

Tags: मृत्यूपत्र. साने गुरुजी चोपडा एन.वाय.कुलकर्णी विद्यार्थी वा.रा.सोनार महान शिक्षक Will. Sadhana Sane guruji Chopada N.Y.Kulkarni Students V.R.Sonar Great Teacher weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके