डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

कम्युनिस्ट चळवळीची आजची स्थिती

साम्यवादी चळवळीची उभारणी करताना सर्व प्रकारच्या शोषणातून मानवाची मुक्तता कार्ल मार्क्स यांना अभिप्रेत होती. मार्क्सचे विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी रशियात क्रांती झाली. पण भांडवलशाहीचा टप्पा अल्पावधीत ओलांडण्याच्य घाईमुळे काही दोष राहिले.लष्करी सामर्थ्यात अमेरिकेशी बरोबरी राखण्याच्या स्पर्धेत अर्थव्यवस्थेवर पडलेला ताण रशियास पेलला नाही. रशियाचा प्रयोग फसला म्हणून समाजवादाची आवश्यकता संपलेली नसून जगातील बहुसंख्य जनतेचे दारिद्र्‌य, उपासमार, निरक्षरता, अनारोग्याचे प्रश्न सोडविण्यासाठी, शोषणापासून मुक्तता करण्यासाठी साम्यवादी, समाजवादी, गांधीवादी सर्वांनी एकत्र येऊन समताधिष्ठित समाजाच्या उभारणीसाठी व्यापक आघाडी उभारायला हवी.

साम्यवादी विचारप्रणालीचे प्रणेते कार्ल मार्क्स यांचा स्मृतिदिन येत्या 14 मार्चला आहे. आपली विचारप्रणाली जगापुढे मांडणारा, त्यानुसार साम्यवादी चळवळीची उभारणी करण्यासाठी ‘जगातील कामगारांनो एक व्हा. तुम्हांला आपल्या बेड्यांशिवाय काहीच गमवायचे नाही,’ असे आवाहन करणारा कम्युनिस्ट जाहीरनामा त्यांनी 1848 मध्ये प्रसिद्ध केला त्याला आता दीडशे वर्षे झाली. आणखी एक वर्षाने विसावे शतक संपून आपण एकविसाव्या शतकातच नव्हे तर तिसऱ्या सहस्रकात प्रवेश करणार आहोत. या पार्श्वभूमीवर साम्यवादी चळवळीने जगाला काय दिले, जगात आणि भारतात आज या चळवळीची काय परिस्थिती आहे, ती नव्याने उभी राहत आहे का, या प्रश्नांसंबंधी वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून काही विचार येथे मांडीत आहे. 

साम्यवादी चळवळीची उभरणा करताना सर्व प्रकारच्या शोषणातून मानवाची मुक्तता कार्ल मार्क्स यांना अभिप्रेत होती. जेथे राज्यसत्तेची आवशक्यताच राहणार नाही अशा आदर्श मानव समाजाचे स्वप्न त्यांना साकार करायचे होते. हे जग आपणास बदलावयाचे आहे आणि ते आपण बदलणारच हा आत्मविश्वास त्यांना होता.

लष्करी स्पर्धा नडली

जग बदलण्याच्या आकांक्षेने व निर्धाराने लेनिन यांच्या नेतृत्वाखाली रशियात 1917 साली क्रांती झाली व त्यानंतर सत्तर-बहात्तर वर्षे साम्यवादी राष्ट्रगट अमेरिकेस तुल्यबळ महासत्ता बनला होता, पण लष्करी सामर्थ्यात अमेरिकेची बरोबरी राखण्याच्या स्पर्धेत अर्थव्यवस्थेवर पडलेला ताण रशियास पेलला नाही. ब्रेझनेव्ह यांच्या काळात विकासाचा वेग मंदावला एवढेच नव्हे तर काही क्षेत्रात उत्पादन घत झाली. साम्यवादी चळवळीच्या पुनर्घटनेची आवश्यकता नवनेतृत्वास वाटू लागली. ब्रेझनेव्ह यांच्यानंतर मिखाएल गोवचेव्ह यांच्याकडे सूत्रे आली. त्यांनी साम्यवादी चालवळीची  दिशाच बदलून टाकली. 'गल्सनोस्त' आणि 'पेरिस्रोइका' या दोन शब्दात त्यांनी नव्या भूमिकेची मांडणी केली.

अधिक मोकळेपणा, अधिक लोकशाही, अधिक समाजवाद असा त्रिसूत्री कार्यक्रम त्यांनी पक्षापुढे व देशापुढे ठेवला पण पक्षावर व नोकरशाहीवर पकड असलेल्या जुन्या पठडीतल्या नेत्यांचे सहकार्य न मिळाल्याने गोर्बाचेव्ह यांना त्यांचा कार्यक्रम यशस्वी करता आला नाही. कम्युनिस्टांशिवाय इतरांना उभे राहण्याची मोकळीक असलेल्या पहिल्याच निवडणुकीत मतदारांनी पक्षाविरुद्ध कौल दिला. कार्यक्रम अमलात आणता न आल्याने गोर्बाचेव्ह यांनी राजीनामा दिला. कम्युनिस्ट राजवट संपुष्टात आली. पूर्व युरोपीय राजवटी त्यापूर्वीच गडगडल्या होत्या.

पेरिसन यांच्या नेतृत्वाखाली रशियाचा विकास भांडवलशाही पद्धतीने आणण्यास अमेरिका व पाश्चात्त्य विकसित देशांनी तसेच जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांनी मोठी आर्थिक मदत केली. पण कम्युनिस्ट राजवटीपेक्षा काही आपली परिस्थिती सुधारली नाही, असा अनुभव सर्वसामान्य रशियन नागरिकास आला. प्रत्येकास रोजगाराची हमी कम्युनिस्ट पद्धतीत होती ती भांडवलशाही पद्धतीत राहिली नाही. बेकारी, दारिद्र्‌य, विषमता, गुन्हेगारी कमी होण्याऐवजी वाढतच गेली. लोकांचा कल पुन्हा कम्युनिस्ट पक्षाकडे झुकू लागला आणि ड्‌यूच्या (रशियन संसदेचे कनिष्ठ सभागृह) निवडणुकीत त्यांनी मोठे यश मिळविले. सध्याच्या रशियन घटनेत अध्यक्षास बरेच अधिकार आहेत. तेव्हा देशाची सत्ता मिळवायची तर अध्यक्षीय निवडणूक जिंकायला हवी. अध्यक्षीय निवडणूक लवकर घेण्यासाठी येल्त्सिन यांच्याविरुद्ध महाभियोगाचा ठराव आणून त्यांना अध्यक्षपदायरून हटविण्याच्या हालचाली कम्युनिस्ट पक्षाने केल्या. पण येल्सिन यांनी आपले पद टिकविण्यासाठी धडपड केली. अध्यक्षपदी मुदत संपेपर्यंत राहू देण्याच्या मोबदल्यात अध्यक्षाचे बरेच अधिकार पंतप्रधान व ड्‌यूकडे सोपविण्याचे त्यांनी मान्य केले; पण प्रत्यक्षात आपणांस कोणतेही जादा अधिकार मिळालेले नाहीत असे पंतप्रधान प्रियाकोव्ह यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले. 

एकजुटीचा फुसका दावा

कम्युनिस्ट सत्ता संपुष्टात आल्यावर सोव्हिएत युनियनचे विघटन होऊन घटक प्रजासत्ताक राज्ये फुटून निघाली व त्यांनी आपली स्वतंत्र राज्ये स्थापिली. सोव्हिएत युनियनच्या घटनेत घटकांना स्वयंनिर्णयाचा व फुटून निघण्याचा अधिकार दिला होता. पण कम्युनिस्ट राजवट असताना त्यांपैकी कोणीही फुटून निघाले नाही याचा अर्थ त्यांना सक्तीने एकत्र ठेवण्यात आले होते. अनेक भाषा, धर्म, वंश असलेल्या देशातील राष्ट्र-जमातीचा (नॅशनॅलिटीज) प्रश्न आम्ही यशस्वीपणे सोडविला, असा दावा रशियन नेते करीत होते तो फुसका असल्याचे या विघटनाने दिसून आले.

प्रथम लेनिन यांनी या विषयाची मांडणी केली. नंतर स्टॅलिन यांनी त्यावर पुस्तक लिहिले. कम्युनिस्ट साहित्यात या विषयावरचा हा प्रमाणभूत ग्रंथ मानला जाई. भारतीय कम्युनिस्टांवर या सिद्धांताचा एवढा प्रभाव पडला की मुस्लीम लीगचे नेते बॅ. जीनांच्या पाकिस्तानच्या मागणीवर हा चांगला तोडगा आहे असे त्यांना वाटले आणि बहुसंख्य मुस्लीम वस्तीच्या लोकांना स्वयंनिर्णयाचा व फुटून निघण्याचा अधिकार द्यावा अशी योजना त्यांनी मांडली. काँग्रेस नेतेही या सिद्धांताने प्रभावीत झाले आणि स्वयंनिर्णयाचा व फुटून निघण्याचा अधिकार मान्य करणारा ठराव काँग्रेसने पास केला.

धार्मिक पायावर विभागणी ही या सिद्धांताची चुकीची मांडणी होती. कम्युनिस्टांनी तिचा आग्रह धरल्याने पाकिस्तानचे पुरस्कर्ते म्हणून जनतेचा रोष त्या पक्षास सहन करावा लागला. अंतद्वंद्वात्मक स्वयंगती विकासवाद ही मार्क्सवादाची मूळ तात्त्विक बैठक हाच सिद्धान्त इतिहासाला लावून ऐतिहासिक भौतिकवादाची मांडणी कार्ल मार्क्स यांनी केली. मानव समाजाचा इतिहास म्हणजे वर्गसंघर्षाचा इतिहास हे सूत्र कम्युनिस्ट जाहिरनाम्यात त्यांनी मांडले. मानव समाजाच्या प्राथमिक अवस्थेपासून भांडवलशाहीपर्यंत शोषकवर्ग आणि शोषितवर्ग यांच्या संघर्षात शोषितवर्गाचा विजय होऊन समाजाच्या पुढच्या अवस्थेत त्याच्याकडे सत्ता जाते.

भांडवलशाहीतून समाजवाद या इतिहास क्रमाने येतो, तो कोणास टाळता येणार नाही, असे मार्क्स यांचे प्रतिपादन होते. ब्रिटनसारख्या प्रगत देशात प्रथम क्रांती होईल आणि ती लोकशाही मार्गानेही होऊ शकेल असे अंदाज त्यांनी केले होते, पण प्रत्यक्षात क्रांती झाली ती मागासलेल्या रशियात. भांडवलशाहीच्या सर्वांत कच्च्या दुव्यावर आघात करून क्रांती घडवून आणणे अधिक सोपे, असा सिद्धान्त लेनिन यांनी मांडला व प्रत्यक्षात त्यानुसार क्रांती घडवून आणली, क्रांती झाली पण भांडवलशाहीचा टप्पा अल्पावधीत ओलांडण्याच्या घाईमुळे काही दोष राहिले. रशियातील प्रयोगाच्या अपयशाचे हे एक कारण आहे असे काही विचारवंतांना वाटते. क्रांतीसाठी व समाजवादाच्या उभारणीसाठी समाजाची पुरेशी पूर्वतयारी झालेली नव्हती आणि कार्यक्रम अमलात आणण्यास लेनिन यांना पुरेसे आयुष्य लाभले नाही.

अपयशाची चिकित्सा

रशियातल्या प्रयोगाच्या अपयशाची चिकित्सा करताना सर्व दोषांचे खापर मुख्यतः स्टॅलिन यांनी निर्माण केलेल्या व्यवस्थेवर फोडले जाते. लेनिन यांना स्टॅलिन यांचे दोष माहीत होते. त्यांच्या मनातून पक्षाची सूत्रे त्यांच्याकडे जायला नको होती, पण लेनिन यांच्या आजारीपणाच्या काळात स्टॅलिन यांनी पक्षावर एक पकड बसविली होती की त्यांना या बाबत काही करता आले नाही. लेनिन यांच्या काही चुका झाल्या का, याचेही वस्तुनिष्ठ विश्लेषण करायला हवे. पण साम्यवादी चळवळीत ते फारसे झाले नाही आणि ज्यांनी ते केले त्यांच्या हेतूबद्दलच शंका घेतल्या जाऊन त्यांची पक्षातून हकालपट्टी झाली.

एवढेच नव्हे तर स्टॅलिनच्या काळात बनावट खटले भरून त्यांचे शिरकाण करण्यात आले. त्याबद्दलच्या बातम्यांनी भारतातील समाजवादी नेत्यांना धक्का बसला आणि आपल्याला समाजवाद हवा असला तरी स्टॅलिन यांच्या मार्गाने जायचे नाही. लोकशाही मार्गानेच समाजवाद आणावयाचा अशी भूमिका त्यांनी घेतली. रशियन क्रांतीने जयप्रकाश नारायण प्रभावीत झाले होते तरी घटना समितीत कम्युनिस्टांचे बहुमत नव्हते म्हणून ती बरखास्त करण्याच्या लेनिन यांच्या निर्णयावर त्यांनी टीका केली. आपली ती चूक पुढे लेनिन यांनीही मान्य केली असे गोर्बाचेव्ह यांच्या काळात प्रसिद्ध झालेल्या कागदपत्रांवरून दिसते.

कम्युनिस्ट पक्षात निर्णय व धोरण ठरविताना लोकशाही मध्यवर्तित्वाच्या पद्धतीने म्हणजे वरपासून खालपर्यंत आणि खालपासून वरपर्यंत चर्चा झाली पाहिजे. व्यक्तिस्तोम माजविले जाऊन तिच्या प्रभावाखाली निर्णय घेतले जाऊ नयेत असा लेनिन यांचा आग्रह असे; पण पुढे स्टॅलिनच्या काळात हे तत्त्व पाळल्याचा केवळ देखावा केला गेला. व्यक्तिस्तोम वाढले. स्टॅलिन म्हणतील तीच पूर्व दिशा झाली. थोडे निराळे मत कोणी मांडले तरी पक्षद्रोही, भांडवलशाहीचा हस्तक, यांसारख्या कम्युनिस्ट शब्दकोशातील शेलक्या विशेषणांनी त्याची संभावना होई.

भांडवलदार वर्गाने प्रतिक्रांती करून पुन्हा सत्ता हाती घेऊ नये यासाठी काही काळ कामगारवर्गाची सर्वाधिकारशाही अटळ साम्यवादाचा एक महत्त्वाचा सिद्धांत, पण प्रत्यक्षात ही सर्वाधिकारशाही काही काळापुरती न राहता दीर्घ काळ राहिली आणि कामगार वगएिवजी कम्युनिस्ट पक्षाची सर्वाधिकारशाही आणि पुढे पक्षाच्या प्रभावी नेत्यांची सर्वाधिकारशाही असे स्वरूप तिला आले. त्यामुळे चुका झाल्या तरी त्या लवकर दुरुस्त केल्या न जाता चालूच राहिल्या. एकाच पक्षाच्या हाती दीर्घ काळ सत्ता आणि पक्षनेत्यास अनिर्बंध अधिकार यांमुळे पक्षनिष्ठेचा देखावा करून स्वार्थ साधणारी नोकरशाही पक्षात आणि सरकारमध्ये निर्माण झाली. वस्तुस्थितिदर्शक अहवालाऐवजी नेत्यांना खूश करणारे अहवाल सादर करण्यात आले, त्यामुळेच आर्थिक पेचप्रसंगाबाबत नेते लवकर सावध झाले नाहीत. माणसाच्या आवश्यक गरजा भागल्यावर तो सांस्कृतिक विकासात रमेल आणि सर्वांनाच विकासाची संधी मिळाल्याने भांडवलशाहीपेक्षा समाजवादी पद्धतीत समाजाची सांस्कृतिक उंची वाढेल अशी मार्क्स यांची अपेक्षा होती. पण तसे काही न घडता सुखसोईच्या साधनांचा वाढता हव्यास आणि व्यसनाधीनता वाढत गेली.

चिंतन

हे असे का घडले? त्या संबंधी कोणते नवचिंतन विसाव्या शतकाच्या शेवटव्या दशकात घडले? त्यातून साम्यवादी चळवळ पुन्हा उभी राहण्याधी कितपत शक्यता आहे? भांडवलशाही जागतिकीकरणाकडे केवळ व्यापारउद्योग वाढवून जास्तीतजास्त नफा मिळविण्याच्या दृष्टीने पाहावे, पण जागतिकीकरण करायला हवे ते जगातील बहुसंख्य जनतेचे दारिद्र्‌य, निरक्षरता, अनारोग्य हे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने. त्यासाठी जागतिक नियोजन हवे. रशियातील नियोजनात चुका झाल्या असतील, पण पंचवार्षिक आर्थिक नियोजनाची देणगी रशियाच्या प्रयोगाने जगाला प्रथम दिली. अविकेंद्रीकरण, नोकरशाही पद्धतीने अंमलबजावणी वगैरे त्यातील दोष टाळायला हवेत. नियोजनामुळेच रशियाचा अल्पावधीत विकास होऊन तो हिटलरचा पराभव करू शकला हे लक्षात घेतले पाहिजे.

कोणतेच तत्त्वज्ञान परिपूर्ण नसते आणि त्याला साचेबंदपणा व पोथीपद्धत आणू नये. स्वतः मार्क्स यांचाही साचेबंदपणाला विरोध होता. कम्युनिस्टांचीच परिभाषा वापरायची तर नवीन ज्ञान-विज्ञान, परिस्थिती आणि अनुभवाच्या प्रकाशात मार्क्सवादही समृद्ध करायला हवा. अंतर्द्वद्वात्मक स्वयंगती विकास पद्धतीने जगातील संघर्षाचे स्वरूप समजण्यास मदत होत असली तरी ती एकमेव पद्धती नव्हे. इतर शास्त्रीय कसोट्यांपेक्षा या पद्धतीने अज्ञात गूढ लवकर उकलेल का या बाबत शास्त्रज्ञांनी आपले निष्कर्ष मांडावेत. साम्यवाद देव, धर्म, आत्मा या गोष्टी मानीत नसला तरी मनाचे अस्तित्व तरी मानतो की नाही? मनाच्या शुद्धशक्ती योगसाधनेने वाढविता येतात.

नैतिक मूल्ये रुजविण्यासाठी आणि व्यक्तिविकास व समाजविचारासाठी त्यांचा उपयोग होतो. साम्यवादास योगाभ्यासाची जोड द्यावयास हवी. आपल्याकडे भाई विष्णुपंत चितळे यांनी हा प्रयत्न केला होता. केवळ व्यवस्था बदलण्याने समाज बदलत नाही. त्यासाठी माणूस बदलावा लागतो, रशियन प्रयोगात तिकडे दुर्लक्ष झाले. उद्दिष्ट चांगले असेल तर त्यासाठी कोणत्याही साधनांचा किंवा मार्गाचा अवलंब साम्यवादी समर्थनीय मानतात. हिंसा आणि कटकारस्थानाने सत्ता मिळविली तर सत्ता टिकविण्यासाठी त्याच साधनांचा अवलंब करण्याची प्रवृत्ती निर्माण होते. रशियन प्रयोगाच्या अपयशाचे हेही एक कारण होते. कमीतकमी हिंसा आणि शांतता व लोकशाहीच्या मार्गानेच उद्दिष्ट साधायचे असे मानण्याकडे रशिया व पूर्व युरोपातील साम्यवाद्यांची प्रवृत्ती होऊ लागली आहे. कामगार वर्गाच्या सर्वाधिकारशाहीबद्दलही आता त्यांचा आग्रह नाही. चीनने आर्थिक धोरण बदलून परकीय भांडवलाचे गुंतवणुकीने विकास साधला; पण सत्तेवरची पकड टिकविण्यासाठी सर्वाधिकारशाही सोडून लोकशाही हक्क देण्याची चिनी कम्युनिस्टांची मात्र अजूनही तयारी नाही.

चीन, व्हिएतनाम, उत्तर कोरिया आणि क्यूबा या देशांत कम्युनिस्ट सत्ता टिकून आहे. त्यांना आर्थिक सुधारणा अमलात आणाव्या लागल्या याचा अर्थच पूर्वीचे धोरण काही प्रमाणात चुकीचे होते. आर्थिक सुधारणांबरोबर त्यांनी लोकशाही मात्र आणली नाही. पण भांडवलशाही देशात सत्तेवर येण्यासाठी तेथील लोकशाही-हक्कांचा व निवडणुकांचा मात्र फायदा घेतला. भारतात केरळमध्ये जगातले पहिले कम्युनिस्ट सरकार निवडणुका जिंकून अधिकारावर आले. पुढे पश्चिम बंगाल व त्रिपुरामध्येही त्यांची सरकारे आली आणि त्यातले पश्चिम बंगालचे सरकार 1977 पासून दीर्घ काळ सत्तेवर आहे. पण भारतात या तीन राज्यांपलीकडे कम्युनिस्टांना आपले साम्राज्य वाढविता आले नाही.

आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट संघटना (कॉमिन्टन) रशियाच्या धोरणांना पाठिंबा देण्यासाठी उभारण्यात आली, गरज संपताच विसर्जित करण्यात आली. ‘कोमिन्फॉर्म’ च्या स्वरूपात पुन्हा उभी करण्यात आली. रशिया व चीनमध्ये मतभेद होऊन तीत फूट पडली. लोकशाही सत्तावाद मानणाऱ्या पक्षांनी आपली वेगळी आंतरराष्ट्रीय संघटना काढली होती. त्यांच्या एका परिषदेत मधू लिमये उपस्थित होते. पण या संघटनेस फारसा पाठिंबा मिळाला नाही. युरोपातील नॉर्वे व स्वीडन या स्कँडिनेव्हियन देशांत निवडणुकीत विजय मिळवून समाजवाद्यांची सरशी झाली.

ब्रिटनमध्ये काही काळ मजूर पक्षाकडे आणि फ्रान्समध्ये समाजवाद्यांकडे सत्ता आली. पण भांडवलशाहीची पकड कायमच राहिली. विषमतेविरुद्ध व्यापक आघाडी हुकूमशाही मार्गाने समाजवाद आणणाऱ्या कम्युनिस्टांना अपयश आले, तर लोकशाहीच्या मार्गाने समाजवाद आणण्यात समाजवाद्यांना यत्किंचतही अपयश आले. पण समाजवादाची आवश्यकता संपलेली नसून जगातील बहुसंख्य जनतेचे दारिद्र्‌य उपासमार, निरक्षरता, अनारोग्याचे प्रश्न सोडविण्यासाठी समाजवाद आणून जगातील नियोजनच करायला हवे, त्यासाठी सर्व प्रकारच्या शोषणापासून मुक्तता म्हणजे समाजवाद- अशी समाजवादाची व्यापक व्याख्या करून आणि एकमेकांबद्दलथे पूर्वग्रह बाजूला ठेवून सर्व साम्यवादी, समाजवादी, इतर सारे गट आणि गांधीवाद्यांनीसुदा एकत्र येऊन शोषणमुक्त समताधिष्ठित समाजाच्या उभारण्यासाठी व्यापक आघाडी उभारायला हवी.

सध्याच्या संगणक युगात काही नवे प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यांतला पहिला प्रश्न कामगारवर्ग आता क्रांतिकारक राहिलेला आहे का? संगणक यंत्रामुळे कमी होणाऱ्या कामगारांचे पुनर्वसन कोठे आणि कसे करावयाचे? चंगळवाद व व्यसनाधीनता बदलून उच्च दर्जाच्या सांस्कृतिक कलाविलासात रमण्याची मनोवृत्ती कशी विकसित करायची? केवळ साम्यवाद्यांनी नव्हे, तर शोषणमुक्तीसाठी लढणाऱ्या सर्वांनीच या प्रश्नांची उत्तरे शोधायला हवीत. धर्मांध शक्तीचे आव्हानही त्यांच्यापुढे आहे. कम्युनिस्ट व समाजवादी आपसांत भांडल्याने जर्मनीत हिटलरला सत्तेवर येण्याची संधी मिळाली. तोच धोका धर्मांध शक्तीच्या बाबतीत आहे हे लक्षात घेऊन आजच्या काळात सर्व समाजवादी शक्तींची एकजूट करायला हवी.

Tags: मानव विकास एकजूट समाजवादी-कम्युनिस्ट रशियाचे अपयश स्टॅलिन लेनिन कार्ल मार्क्सचे तत्त्वज्ञान राजकारण solidarity socialst-communist failure of russia stalin lenin philosophy of karl marx politics weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके