डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मेघालयात संगमांच्या प्रभावाची कसोटी

ईशान्य भागातल्या या तीन राज्यांपैकी मेघालयात काँग्रेसचे दोन्ही पक्ष आणि नागालँडमध्ये काँग्रेसकडे सत्ता जाण्याची शक्यता दिसत आहे.

ईशान्य सीमा भागातील तीन राज्यांत येत्या 26  फेब्रुवारीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकांत व मेघालयमध्ये निवडणूक प्रचाराचा जोर विशेष दिसत आहे. या राज्यांतील गारो टेकड्याच्या भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे क्रमांक दोनचे नेते पी. ए. संगमा यांचा प्रभाव आहे  आणि त्यांच्यावरच या राज्यात सता मिळण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आशा अवलंबून  आहेत. पूर्वी पी. ए. संगमा लोकसभेचे माजी सभापती आहेत. काँग्रेसच्या पी. वी. नरसिंहराव  मंत्रिमंडळाच्या काळात से सभापती होते. नंतर लोकशाही आघाडीच्या सरकारनेही त्यांच्याकडे सभापतीपद कायम ठेवले होते. पण वाजपेयीच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार केन्द्रात आल्यावर सभापती पदाच्या निवडणुकीत ते पराभूत झाले आणि त्यांचे सभापती गेले.

मेघालय विधानसभेच्या 60  जागांपैकी 24  जागा गारी टेकडांच्या भागात आहेत. त्यांतल्या जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी दोनों काँग्रेस पक्षांत स्पर्धा आहे. 1998 च्या निवडणुकांच्या वेळी काँग्रेस पक्षात फूट पडलेली नव्हती आणि काँग्रेसने जिंकलेल्या 25  जागांपैकी 17 जागा गारो टेकड्यांच्या तीन जिल्ह्यांत जिल्यात जिंकल्या  होत्या. बाकीच्या 8 जागा पूर्व व पश्चिम  खासी टेकड्यामध्ये मिळाल्या होत्या. काँग्रेसला संगमाचा प्रभाव  1999 च्या निवडणुकीतच  जाणवला होता. त्या वेळी गारो टेकड्यांमधील 24  जागांपैकी 21 जागा संगमा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षास मिळवून दिल्या होत्या. तसाच विजय या वेळीही आपण मिळवू असा आत्मविश्वास संगमा व्यक्त करीत आहेत.निर्णायक विजयासाठी राष्ट्रवादी पक्षाला 60  पैकी 31 जागा जिंकायला हव्यात. गारो टेकड्यांच्या सर्वच्या सर्व 24 जागा जिंकल्या तरी बहुमतासाठी आणखी 7 जागा खासी व जैतिया टेकड्यांच्या भागात जिंकायला हव्यात. तेथे संगमा यांचा फारसा प्रभाव नाही. 

राष्ट्रवादीचे राज्यसभेतील खासदार रॉबर्ट खरशिंग यांचा या टेकड्यांच्या भागात प्रभाव आहे. आम्हांला बहुमत मिळाल्यास आम्ही खरशिंग यांना मुख्यमंत्री करू. तेव्हा तुमच्या भागातूनही राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून द्या, असा प्रचार राष्ट्रवादी पक्ष या भागात करीत आहे. खरशिंग निवडणुकीत उभे नाहीत. राष्ट्रवादी पक्षाचे सरकार बनत आहे अशी खात्री झाली तरच ते राज्यसभेचे सभासदत्व सोडून मुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास तयार होतील. खासी व जैतिया टेकडयांमध्ये राष्ट्रवादीला विजय मिळण्यात खरशिंग यांच्या प्रभावाचा कितपत उपयोग होतो ते निवडणुकीत दिसून येईल.

गेल्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने एफ. ए.खोंगलाम मुख्यमंत्री झाले होते. पण या वेळी राष्ट्रवादीने त्यांना तिकीट देण्याचे नाकारल्याने ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवीत आहेत. सोहरा मतदारसंघातून ते उभे आहेत. गेल्या वेळीही अपक्ष उमेदवार म्हणूनच त्यांनी निवडणूक लढविली होती. डिसेंबर 2000 मध्ये राष्ट्रवादीने संयुक्त मंत्रिमंडळ बनविले तेव्हा खोंगलाम यांना मुख्यमंत्रिपद दिले. या वेळी त्यांना राष्ट्रवादीने तिकीट नाकारण्याचे मुख्य कारण त्यांचा गैर कारभार आणि त्यांच्यावर करण्यात आलेले भ्रष्टाचाराचे आरोप. त्यांना तिकीट दिले तर त्यांच्या भ्रष्ट प्रतिमेमुळे राष्ट्रवादीला निवडणुका जिंकणे कठीण जाईल, असे राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटले म्हणून त्यांना तिकीट नाकारण्यात आले. वास्तविक त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, तेव्हाच राष्ट्रवादीने त्यांच्याशी संगत तोडायला हवी होती पण राष्ट्रवादी पक्षाने ते केले नाही. 

खोंगलाम यांच्या गैरकारभारावर टीका करताना राष्ट्रवादीचे सरचिटणीस वारज्री म्हणाले, "पक्षाची धोरणे व कार्यक्रमानुसार त्यांनी कारभार केला नाही." राज्याला स्वच्छ पारदर्शक आणि कार्यक्षम सरकार देण्याची संधी आपल्या पक्षाने गमावली याबद्दल त्यांनी खेद   व्यक्त केला मुख्यमंत्री गैरकारभार करीत असताही तुमचा पक्ष त्यांच्या बरोबर कसा राहिला, या टीकेस  उत्तर देताना ते म्हणाले, "संयुक्त सरकारवर येणाऱ्या दडपणाचा तो भाग असावा."

भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या मुख्यमंत्र्याना तिकीट कापवयाचे नाही हा एक चांगला पायंडा आम्ही  पाडला. आमचे अनुकरण करून काँग्रेसनेही भ्रष्टाचाराचा  आरोप असलेसे कॉंग्रसचे  मंत्री मुकुल संगमा-यांना तिकीट नाकारण्याचे धेर्य दाखवावे अशी मागणी त्यांनी केली, पण कॉंग्रेसने ही मागणी मान्य केली नाही. एम एस. असोसिएट यांना ऑनलाइन लॉटरी कंत्राट देण्यात मुख्यमंत्री खोंगलाम यांच्या इतकेच काँग्रेसचे कर-खात्याचे मंत्री सुरु संममा जबाबदार आहेत अशी टीका त्यांनी केली. 

भ्रष्टाचाराचा आरोप असलेले मुख्यमंत्री खोंगलाम  आणि कर-खात्याचे मंत्री मुकुल संगमा यांना  पुन्हा  निवडून द्यावयाचे की नाही हे आता मतदारांनी ठरवायचे आहे.  ते पुन्हा निवडून आले वर मतदारांनाच भ्रष्टाचारी मंत्री हवे  असतात, असा त्याचा अर्थ लावायचा का? भ्रष्टाचाराचा आरोप असेलेले  मंत्री त्यांना चालतात. याचे एक कारण त्यांची कामे त्यांनी केलेली असतात. त्यांच्या पाठीब्याने  हे मंत्री  निवडून येतात आणि भ्रष्ट कारभार पुढे चालू राहतो. महाराष्ट्रातही काही मतदारसंघात जसा अनुभव आलेला आहे. न्यायालयात भरीव पुराव्या अभावी असे मंत्री निर्दोष सुटतात आणि आपण भ्रष्टाचारी नसल्याचा दावा मांडतात.भ्रष्टाचार करायला  पण कायद्याच्या कचाट्यात सापडायचे नाही. गुन्ह्याच्या तपासापासूनच आपल्या विरुद्ध भरीव पुरवा पुढे येऊ न देण्याची दक्षता ते  घेत असतात. पुरावा दडपण्यात पोलिस व नोकरशाही त्यांना साथ देते. भ्रष्टाचाराच्या साखळीत त्यांचाही सहभाग असतो आणि त्यांच्या वाट्याचा मलिदा त्यांना मिळत असतो. म्हणूनच भ्रष्टाचार पुढे चालू राहतो हे मंत्री आपली  कामे करतात. हा स्वार्थी, संकुचित विचार बाजूला सारून भ्रष्टाचारी कारभार सुधारण्यासाठी अशा भ्रष्ट प्रतिमा असलेल्या  मंत्र्यांना मतदारांनीच पाडले पाहिजे. पक्षाने तिकीट दिले तरी त्यांना निवडून द्यावयांचे नाही असा निर्धार करून मतदारांनीच अशा मंत्र्यांना पाडल्याशियाय भ्रष्ट  कारभाराला आळा बसणार नाही.

जागृत मतदार हा लोकशाहीचा आधार आहे. भ्रष्ट मंत्र्यांना पाडण्याची जागरुकता तो दाखवीत  नाही तो पर्यंत भ्रष्टाचाराचे चक्र चालूच राहील. प्रत्येक मतदारसंघात जागरूका मतदारांच्या संघटना उभारणे हाच त्यावर प्रभावी उपाय आहे.

परिस्थितीतील एक महत्त्वाचा बदल म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शारद पवार यांचा सोनियाविरोध सौम्य झाला आहे. भाजप आघाडीला केन्द्रातील हटविण्यासाठी  दोन्ही काँग्रेस पक्षानी इतर समविचारी पक्षाच्या सहकार्याने आघाडी उघडणे त्यांना अधिक महत्वाचे वाटते. 
लोकसभा निवडणुका लवकर  घेण्याचा भाजप नेत्यांचा विचार असल्याच्या बातम्या आहेत. दोन काँग्रेस पक्षांनी  आपसात लढून  कोणास अधिक पाठिंबा, यात वेळ घालवावा हे  त्यांना महत्त्वाचे वाटत नाही. त्यामुळे मेघालयात दोन्ही पक्षानी बाह्यतः एकमेकांना विरोध केला तरी जागा वाटपाचा अलिखित समझोता त्यांच्यात होण्याची शक्यता आहे. दोन्ही काँग्रेस पक्षांनी मिळून निर्णायक मते  अपक्षांच्या पाठिंब्यावर विसंबून राहू नये, असे धोरण ठरवून मेघालयाची निवडणूक लविली जाईल असे दिसते. संगमा यांना हे धोरण पसंत नसले तरी मान्य करावे लागेल. 

नागालँडमध्ये कॉंग्रेसच प्रभावी

नागालँडमध्ये काँग्रेसला प्रतिस्पर्धी प्रभावी विरोधी पक्ष नाही. 1958 च्या  निवडणुकीत काँग्रेसने 10  पैकी 53  जागा जिंकल्या होत्या आणि 50. 7 टक्के  मते मिळविली होती. नागा बंडखोर गटांनी निवणुकीवर बहिष्काराचा आदेश दिला होता, तरीही 78.9 टक्के  मतदान झाले बहिष्कारास पाठिंबा न मिळाल्याचेच निदर्शक होते. या राज्यात भाजपचे अस्तित्व नगण्य आहे. पण मुख्यमंत्री जमीर यांच्या नेतृत्वाखालील  काँग्रेस पक्षास विरोध करण्यासाठी भाजप व नागा पीपल्स फ्रंट यांनी आघाडी उभारली आहे. नागा बंडखोरांच्या  नेत्याशी केन्द्र सरकारने जी बोलणी केली, त्यामुळे या आघाडीस थोड्या आधिक जागा मिळतील असे आघाडीच्या नेत्यांना वाटते. काँग्रेसच्या जागा यावेळी थोड्या कमी झाल्या तरी निर्णायक बहुमत मिळवून राज्याची सत्ता काँग्रेस आपल्याकडे राखील असा आत्मविश्वास  काँग्रेस नेते व्यक्त करीत आहेत.

ईशान्य भागातल्या या तीन राज्यांपैकी मेघालयात काँग्रेसचे दोन्ही पक्ष आणि नागालँडमध्ये काँग्रेसकडे सत्ता जाण्याची शक्यता दिसत आहे.

एकूण चार राज्यांपैकी हिमाचलमध्ये  चुरशीची निवाणूक होईल आणि त्रिपुरात कम्युनिस्ट, मेघालयात दोन्ही काँग्रेस पक्ष  व नागालँड मध्ये काँग्रेस विजय मिळवील असा निरीक्षकांचा अंदाज आहे.

Tags: मुकुल संगमा खारसिंग एफ. ए. खोंगलाम राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पी. ए. संगमा नागलँड- मेघालय  निवडणुका वि. दा. रानडे Mukul Sangmaa Kharsingh  F.A. Khonglam National Congres Party P.A.Sangmaa Nagaland- Meghlay Election V.D. Ranade weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके