डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

पश्चिम बंगाल व त्रिपुरात डाव्या आघाडीची पकड कायम

पश्चिम बंगालच्या शेजारचे त्रिपुरा हे दुसरे छोटे कम्युनिस्ट सत्ता असलेले राज्य. तेथील लोकसभेच्या दोन्ही जागा 1996 व 1998 मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्टांनी जिंकल्या. 1996 मध्ये काँग्रेस आणि त्रिपुरा उपजाती संघ यांच्यात समझोता नव्हता. दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणाने निवडणुका लढविल्या आणि त्यांचे उमेदवार पराभूत झाले. 1998 मध्ये लोकसभेबरोबरच विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्यात 60 पैकी 40 जागा जिंकून डाव्या आघाडीने दोन तृतीयांश बहुमत मिळविले आणि डावी आघाडी तेथे चौथ्यांदा सत्तेवर आली.

तेराव्या लोकसभा निवडणुकीचा पाचवा शेवटचा टप्पा 3 ऑक्टोबरला झाला. त्यात पश्चिम बंगालच्या निवडणुका सर्वांत लक्ष वेधून घेणाऱ्या आहेत. या राज्यात 1977 पासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीची राजवट आहे. डाव्या आघाडीस 1996 व 1998 या दोन्ही निवडणुकांत 42 पैकी 33 जागा मिळाल्या. पक्षोपपक्ष व त्यांची विभागणी पुढीलप्रमाणे होती - मार्क्सवादी कम्युनिस्ट 24, 23; कम्युनिस्ट पक्ष 3, 3, क्रांतिकारी समाजवादी पक्ष 4, 4, पुरोगामी गट 3, 2. यावरून 1998 मध्ये मार्क्सवादी पक्षाची एक जागा वाढली, तर पुरोगामी गटाची एक जागा कमी झाली. मतांच्या दृष्टीने दोन्ही निवडणुकांतील तफावत पुढीलप्रमाणे आहे.

डावी आघाडी 18, 17.13; काँग्रेस 14.7, 5.6; तृणमूल काँग्रेस 0.8, 6; भाजप 2.5, 3.4. दोन निवडणुकांतील एक फरक म्हणजे मार्क्सवादी पक्षाची एक जागा वाढली असली तरी शहरी व निमशहरी मतदारसंघांत त्यांच्या मतांत 1996 पेक्षा 1998 मध्ये 6 ते 7 टक्के घट झाली. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आता नगण्य पक्ष झालेला आहे. ममता बॅनर्जीच्या तृणमूल काँग्रेसने तिची जागा घेतली आहे. गेल्या दोन निवडणुकांत काँग्रेसची घसरगुंडी वाढतच गेली. तिच्या जागा 9 वरून 1 पर्यंत खाली आल्यावर मते 14.7 वरून 5.6 पर्यंत घटली. निवडणुकीत तृणमूल काँग्रेस व भाजपने युती केली होती. तिचा फायदा दोन्ही पक्षांना झाला. तृणमूलला 7 जागा व भाजपला 1 जागा मिळाली, तृणमूलला 8.6 टक्के मते मिळाली.

युतीमुळे भाजपच्या मतांत 2.5 वरून 3.7 %पर्यंत वाढ झाली. युतीमुळेच भाजपला पश्चिम बंगालमधून लोकसभेवर प्रथमच प्रवेश मिळाला. बारासात मतदारसंघ हा पुरोगामी गटाचा बालेकिल्ला. त्या पक्षाचे अध्यक्ष चित्त बसू अनेक वेळा या मतदारसंघातून निवडून आले. पण त्यांच्या निधनानंतर 1998 च्या निवडणुकीत ही जागा पुरोगामी गटाने गमावली व तृणमूल काँग्रेसने जिंकली. डमडमची जागाही डाव्या आघाडीने गमावली. तेथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे निर्मल चटर्जी यांचा भाजपचे तपन सिकदर यांनी पराभव केला. चटर्जी यापूर्वी दोन वेळा या जागेवर निवडून आले होते. हे दोन्ही पराभव म्हणजे डाव्या आघाडीस मोठा हादरा होता. 

पश्चिम बंगालच्या शेजारचे त्रिपुरा हे दुसरे छोटे कम्युनिस्ट सत्ता असलेले राज्य. तेथील लोकसभेच्या दोन्ही जागा 1996 व 1998 मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्टांनी जिंकल्या. 1996 मध्ये काँग्रेस आणि त्रिपुरा उपजाती संघ यांच्यात समझोता नव्हता. दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणाने निवडणुका लढविल्या आणि त्यांचे उमेदवार पराभूत झाले. 1998 मध्ये लोकसभेबरोबरच विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्यात 60 पैकी 40 जागा जिंकून डाव्या आघाडीने दोन तृतीयांश बहुमत मिळविले आणि डावी आघाडी तेथे चौथ्यांदा सत्तेवर आली. काँग्रेस, त्रिपुरा उपजाती संघ आणि त्रिपुरा नॅशनल व्हॉलेंटिअर्स (टीएनव्ही) या पक्षांनी युती करूनही त्यांचा पराभव झाला.

आसाममध्ये लोकसभेच्या सर्व 14 जागांसाठी 3 ऑक्टोबरला मतदान झाले. 1996 व 1998 या दोन निवडणुकांत काँग्रेसने आपले बळ तेथे वाढविले. 1996 मध्ये काँग्रेसने 14 पैकी 5 जागा जिंकल्या होत्या. 1998 मध्ये त्या 10 पर्यंत वाढल्या आणि मतांतही 31.64 वरून 38.97 %पर्यंत वाढ झाली. आसाम गण परिषदेस 1996 मध्ये 5 जागा मिळाल्या, पण 1998 मध्ये एकही मिळाली नाही. भाजपने दोन्ही निवडणुकांत एकेक जागा जिंकली. त्याच्या जागा वाढल्या नसल्या तरी मते 17.41 %वरून 24.47 %पर्यंत वाढली. अरुणाचलमध्ये या वेळी लोकसभेच्या दोन जागांबरोबरच विधानसभेच्या 60 जागांची निवडणूक झाली. अरुणाचल काँग्रेस हा प्रादेशिक पक्ष काँग्रेसमधून फुटून स्थापन झालेला आहे. 1998 मध्ये दोन्ही जागा या पक्षाने लढविल्या व जिंकल्या. नंतर भाजप आघाडीत हा पक्ष सामील झाला.

हिंसाचाराच्या दहशतीने मतदानाच्या प्रमाणात घट

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याच्या मतदानासह एकूण निवडणुकीचा विचार करता या वेळी वाढते हिंसाचार होऊनही मतदान 55 %च्या आसपास झाले. दहशतीला न भिता लोक मतदान करतात हे लोकशाहीवरील विश्वासाचे निदर्शक असले तरी मतदानाच्या प्रमाणात त्यामुळे 1998 पेक्षा घट झाली, पश्चिम बंगाल व त्रिपुरामध्ये नेहमी 70 %च्या वर मतदान होते, या वेळी ते 60 ते 65 % झाले. उत्तर प्रदेशात लखनौ व अमेठीतील मतदानाने विशेष लक्ष वेधून घेतले. लखनौत पंतप्रधान म्हणून वाजपेयींभोवती असलेल्या वलयाचा प्रभाव कमी झाल्याचे दिसून आले. अमेठीत भाजपचे उमेदवार संजय सिंग बंदूक घेऊन मतदारांवर दडपण आणत असल्याची तक्रार काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली. पाचव्या टप्प्यात सर्वांत जास्त हिंसाचार होऊन त्यात 44 ठार झाले. सर्वांत जास्त 82 टके मतदान लक्षद्वीपमध्ये झाले.

आसाममध्ये मतदानाचे प्रमाण 55 % होते. बिहारमध्ये माधोपुराच्या निवडणुकीने सर्वांत जास्त लक्ष वेधून घेतले. राजदचे नेते लालूप्रसाद यादव आणि जनता दल (संयुक्त) वे नेते शरद यादव अशा दोन यादवांमधले यादवी युद्ध तेथे होते. दोन्ही बाजूंचे समर्थक मतदान केन्द्रे ताब्यात घेऊन मतदारांवर दडपण आणत होते. मतपत्रिका व मतपेट्‌या लुटणे, मतपेट्‌यांत शाई ओतणे, स्फोटांनी व शस्त्रे परजून दहशत निर्माण करणे हे प्रकार या वेळच्या निवडणुकीतही घडले. कोणी गडबड करीत असल्याचे दिसताच गोळ्या झाडा, असे आदेश असूनही सैनिक व पोलीस हे प्रकार थांबवू शकले नाहीत.

बिहारच्या तुलनेने उत्तर प्रदेशात मतदान शांततेने पार पडले हे मुख्य निवडणूक आयुक्त गिल यांनी निदर्शनास आणले. गुरखालँडचे नेते सुभाष घिशिंग यांनी बहिष्काराचा आदेश दिला होता, त्यामुळे त्यांचा प्रभाव असलेल्या दार्जिलिंग लोकसभा मतदारसंघाच्या तीन विधानसभा मतदारसंघांत कमी मतदान झाले. कारगिल, सोनिया गांधींचे विदेशीपण या प्रश्नांवरच निवडणुकीतील प्रचारात भर देण्यात आला आणि बेकारी, भ्रष्टाचार वगैरे लोकांना तीव्रतेने जाणवणारे प्रश्न दुर्लक्षिले गेले.

Tags: मतदानात घट त्रिपुरा प. बंगाल डाव्या आघाडीचे यश निवडणूक विशेष decline to vote success of leftists in w. bengal & tripura election special weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके