डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

उत्तर प्रदेश व बिहारमध्ये भाजपच्या जागा वाढणार का?

उत्तर प्रदेश आणि बिहारमधून 139 खासदार लोकसभेत जातात, संसदेत स्पष्ट बहुमत मिळवण्यासाठी या दोन्ही राज्यांमधील जागा वाढवण्यासाठी भाजपने आधीपासून प्रयत्न केले. त्यालाच या वेळेस यश येईल काय? भाजपमधील भांडणाचा काय परिणाम होईल? 

तेराव्या लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान 18 सप्टेंबरला असून उत्तर प्रदेश आणि बिहारमधील मतदानाचा पहिला टप्पा त्या दिवशी आहे. दोन्ही राज्यांत मतदानाचा दुसरा टप्पा 25 सप्टेंबरला आणि तिसरा व शेवटचा टप्पा 3 ऑक्टोबरला आहे. या दोन राज्यांशिवाय मध्य प्रदेशातील मतदानाचा दुसरा टप्पा 18 सप्टेंबरला असून अखेरचा तिसरा टप्पा 25 सप्टेंबरला आहे. जम्मू-काश्मीरमधील मतदानाचा तिसरा अखेरचा टप्पा 18 सप्टेंबरला आहे. यापैकी उत्तर प्रदेश व बिहारचा कौल विशेष महत्त्वाचा आहे. उत्तर प्रदेशातून 85 व बिहारमधून 54 असे 139 खासदार लोकसभेत जातात आणि केन्द्रसरकार बनविण्यात आणि महत्त्वाच्या प्रश्नांवर धोरणे ठरविण्यात त्यांचा प्रभाव मोठा असतो.

स्पष्ट बहुमत मिळविण्यासाठी या दोन्ही राज्यांत आपल्या जागा वाढवायचा असा भाजप आघाडीच्या नेत्यांचा प्रयत्न आहे. उत्तर प्रदेशात भाजपला 1998 च्या निवडणुकीत 85 पैकी 57 आणि बिहारमध्ये 54 पैकी 27 जागा मिळाल्या होत्या. त्या वाढविणे त्यांना कितपत शक्य होईल? की त्यात घटच होईल? उत्तर प्रदेशात भाजपच्या जागा आणखी वाढण्याचा संभव नाही, असा वस्तुनिष्ठ निरीक्षकांचा अंदाज आहे. भाजप नेत्यांनाही त्याची कल्पना असल्यामुळे दक्षिणेत अधिक जागा मिळविण्याकडे त्यांनी लक्ष दिले. आपणांस 65 जागा मिळाव्या असा 1996 पासूनच भाजपचा प्रयत्न होता; पण त्यास 1996 मध्ये 52 जागा मिळाल्या आणि 1998 मध्ये त्या 57 पर्यंत वाढल्या. अगदी 1952 पासूनचा मागोवा घ्यायचा तर भाजप ज्या पक्षातून जन्मला त्या भारतीय जनसंघाला 1952 मध्ये उत्तर प्रदेशात एकही जागा मिळाली नव्हती. 1957, 1962 व 1967 या तीन निवडणुकांत 2, 7, 12 असे त्यांचे बळ हळूहळू वाढत गेले. 1971 मध्ये इंदिरा लाटेने ते 4 पर्यंत खाली आले. जनसंघ जनता पक्षात विलीन झाल्याने 1977 व 1980च्या निवडणुका त्याने स्वतंत्रपणे लढविल्या नाहीत. 1984 मध्ये इंदिरा-हत्या सहानुभूतीच्या लाटेत भाजप एकही जागा मिळवू शकला नाही. 1989, 91, 96 व 98 च्या चार निवडणुकांत मात्र त्याचे बळ 8, 51. 52, 57 असे वाढत गेले.

कारगिल विजयाचा फायदा मिळून आपल्या जागा थोड्‌या तरी वाढतील असे भाजप नेत्यांना वाटत होते. कारगिल, सोनिया गांधींच्या विदेशीपणाचा मुद्दा यांचा शहरी मतदारांवर प्रभाव पडत असला तरी ग्रामीण भागांतील मतदार प्रभावीत होत नाहीत, असे भाजप नेत्यांना प्रचारात आढळून आले. निवडणूक मोहीम सुरू करण्यापूर्वीच्या एका भाषणात मुख्यमंत्री कल्याणसिंग म्हणाले, "भाजप अधिक यश मिळवील पण निकाल काहीही लागो त्याची जबाबदारी एका नेत्यावर राहणार नाही. आम्ही संयुक्त जबाबदारी मानतो." अनपेक्षित निकाल लागले तर त्याचा ठपका केवळ आपल्यावर ठेवला जाऊ नये म्हणून सावधगिरीचे विधान त्यांनी केले. पक्षात कल्याणसिंगविरोधी गट आहे.

पक्षाचे बळ घटले तर त्याबद्दल कल्याणसिंग यांना जबाबदार धरून निवडणुकीनंतर त्यांचे मुख्यमंत्रिपद काढून घ्यावे असे या गटाकडून सूचित करण्यात येत आहे. आम्ही अधिक यश मिळवू, असे भाजप नेते आपल्या भाषणातून बाह्यत: सांगत असले तरी पक्षाने केलेल्या अंतर्गत चाचपणीत जागा घटण्याचा संभव व्यक्त करण्यात आला. दोन कारणांमुळे हे घडू शकेल. एक, कल्याणसिंग सरकारच्या कारभाराबद्दल तीव्र नाराजी आणि पक्षातील गटबाजी व अंतर्गत संघर्ष, उच ब्राह्मण वर्गात गट आणि नव्या इतर मागास जमातींचा गट असे पक्षात सरळ दोन गट कल्याणसिंगांनी पाडले. मुलायमसिंग यांचा समाजवादी पक्ष हा उत्तर प्रदेशात भाजपच्या खालोखाल मोठा पक्ष. त्याने 1996 मध्ये 16 व 1998 मध्ये 20 जागा मिळविल्या.

राज्यात 1989 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने बहुमत मिळवून प्रथमच सत्ता मिळविती. पण 1994 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांनी युती करून भाजपला सत्तेवरून हटविले. पण पुढे ही युती फुटून राज्यात काही काळ राष्ट्रपती राजवट आली तेव्हा पुन्हा सत्तेवर येण्यासाठी बसपने भाजपशी युती करून सहा-सहा महिने मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याचा समझोता केला. प्रथम मायावतींचे आणि नंतर सहा महिन्यांनी कल्याणसिंगांचे सरकार आले. पण बसपने स्पीकरपदाबद्दल आग्रह धरला. भाजपने ते मान्य न केल्याने युती फुटली. पण काँग्रेसमधल्या बंडखोर गटाचा पाठिंबा मिळवून आणि त्या सर्व 40 जणांना मंत्रिपदे देऊन 90 मंत्र्यांचे मंत्रिमंडळ कल्याणसिंग यांनी बनविले आणि विश्वासाचा ठराव पास करून घेतला. दिल्लीत हाच डाव खेळून कलमाडींच्या पाठिंब्याने सत्ता मिळवण्याचा घाट भाजपने घातला होता, पण बहुमताला सात सभासद कमी पडल्याने तो यशस्वी झाला नाही.

सत्ता मिळविण्यासाठी भाजप नेते कोणताही विधिनिषेध पाळत नाहीत हे त्यावरून स्पष्ट झाले. कलमाडींनी ही जी मदत केली त्यामुळे 1998 च्या लोकसभा निवडणुकीत पुण्यातून कलमाडींच्या उमेदवारीस भाजपने पाठिंबा दिला पण ते निवडून आले नाहीत. भाजपच्या पाठिंब्याने खासदारपद व मंत्रिपद मिळविण्याचे प्रयत्न फसल्यानंतर कलमाडींनी या निवडणुकीच्या वेळी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. समाजवादी पक्ष व बसप यांची युती फुटल्याने राज्यातील सत्ता गेली आणि भाजपला सत्तेवर येण्याची संधी मिळाली, पण त्यापासून धडा घेऊन हे दोन पक्ष अजूनही एकत्र येत नाहीत. बसप या वेळी सर्व 85 जागा लढवीत आहे. त्यामुळे मतविभागणी होऊन त्याचा फायदा भाजपलाच मिळण्याचा संभव आहे. वाजपेयींचे सरकार पडल्यानंतर पर्यायी सरकार बनविताना भाजपविरोधी पक्षांच्या आघाडीचे सरकार यावे, पण त्यांचा पंतप्रधान आघाडीचा असावा असा मुलायमसिंग यांचा आग्रह होता. पण सोनिया गांधींनी ते अमान्य केल्याने काँग्रेसशी त्यांचे बिनसले.

काँग्रेसमध्ये फूट पडून पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापून तिसरी आघाडी उभारण्याच्या दृष्टीने मुलायमरसिंग यांच्या समाजवादी पक्षाशी समझोता केला. महाराष्ट्रात तो टिकला, पण उत्तर प्रदेशात जागा वाटपावरून मतभेद होऊन समाजवादी पक्षाने स्वतंत्रपणे निवडणुका लढविण्याचे ठरविले. काँग्रेस व समाजवादी पक्ष यांची युती नसल्याने मुस्लीम मते या वेळी या दोन पक्षांत विभागली जाऊन त्याचा फायदा भाजपला काही ठिकाणी मिळू शकेल. उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सलमान खुर्शीद यांच्याकडे निवडणूक मोहिमेची सूत्रे सोनिया गांधींनी सोपविली आहेत. त्या स्वतः अमेठी या राजीव गांधींच्या मतदारसंघातून उभ्या आहेत. गेल्या वेळी या मतदारसंघात भाजपचे संजय सिंग विरुद्ध काँग्रेसचे सतीश शर्मा अशी लढत होती आणि संजय सिंग निवडून आले होते. या वेळी सोनियाजी उभ्या राहणार अशी बातमी येताच संजय सिंगांना घाम फुटला अशा प्रचारकी बातम्या आलेल्या आहेत. त्यातला अतिशयोक्तीचा भाग सोडला तरी घराणेशाहीच्या वलयाच्या प्रभावावर त्या ही जागा सहज जिंकतील, असे काँग्रेस नेत्यांना वाटते.

वलयाचा प्रभाव पक्षाच्या विजयावर फारसा पडला नाही तरी वैयक्तिक त्यांच्या निवडणुकीपुरता पडून त्या निवडून येतील. सलमान खुर्शीद यांच्या पत्नी फरुकाबादमधून उभ्या आहेत. ही जागा खुर्शीद यांनी 1991 मध्ये जिंकली होती, पण त्यानंतरच्या दोन्ही निवडणुकांत काँग्रेसने ती गमावली. या वेळी कोणत्याच नेत्याच्या किंवा पक्षाच्या बाजूने लाट नाही, काँग्रेसने 1997 च्या विधानसभा निवडणुकीत बसपशी समझोता केला होता. तसा समझोता या वेळी असता तर त्याचा फायदा दोन्ही पक्षांना झाला असता. बसपला 1998 मध्ये चारच जागा मिळाल्या, त्या वाढल्या असत्या आणि काँग्रेसलाही थोड्या जागा मिळाल्या असत्या. बसप व समाजवादी पक्षाची काही मते आपणांस या वेळी मिळतील अशी आशा काँग्रेस गोटातून व्यक्त करण्यात येत आहे. समाजवादी पक्षाचे बारा आमदार नुकतेच काँग्रेसला मिळाले, त्यांपैकी बहुसंख्य मुस्लीम आहेत.

मुस्लिमांचा कल काँग्रेसकडे झुकत असल्याचे हे निदर्शक मानले जाते. मुस्लिमांची गठ्ठा मते काँग्रेसला मिळतील असा निष्कर्ष यावरून काढणे चुकीचे ठरेल; पण काही मुस्लीम जागा काँग्रेसला मिळण्याचा संभव आहे. ज्या जागा समाजवादी पक्षास मिळण्याचा संभव दिसत आहे तेथे त्या पक्षालाच मते द्यावयाची व बाकीच्या जागांसाठी काँग्रेसला पाठिंबा द्यावयाचा. भाजपचा उमेदवार विजयी होऊ द्यावयाचा नाही असा वास्तववादी विचार करूनच मुस्लीम मतदार मत देतील. केवळ दलितांचा पक्ष अशी आपल्या पक्षाची प्रतिमा असल्याने आपल्या यशास मर्यादा पडतात. अधिक जागा मिळवायच्या तर पक्षाने व्यापक भूमिका घेतली पाहिजे, केवळ ‘बहुजन समाजाचे हित’ अशी आमची भूमिका नसून सर्वजन समाजाचे हित आम्हांला साधायचे आहे अशी भूमिका पक्षाच्या नेत्या मायावती मांडू लागल्या आहेत, केवळ भूमिका मांडून न थांबता आपण त्याप्रमाणे वागत आहोत असे दाखवायला हवे म्हणून या वेळी एका यादव उमेदवारास त्यांनी उभे केले आहे.

विसर्जित लोकसभेतील समाजवादी पक्षाचे खासदार जंगबहादुर पटेल यांना पक्षाने या वेळी तिकीट नाकारले त्यामुळे स्थानिक पातळीवर असंतोष आहे. त्याचा यदा मिळून बसपचे यादव उमेदवार तुळशीराम यादव निवडून येतील असा अंदाज आहे. समाजवादी पक्षातील वैयक्तिक हेव्यादाव्यांचाही निवडणुकीवर परिणाम होत आहे. अलाहाबादमधील एका भागातून पूर्वी निवडून आलेले समाजवादी पक्षाचे आमदार अतिक अहमद एका गुंड-टोळीचे नेते आहेत. मुलायमसिंग यांच्या मर्जीतून ते उतरले असून त्याचा बदला घेण्याच्या सूडभावनेने त्यांच्या हालचाली चालू आहेत. जंगबहादुर पटेल यांच्या बाजूने फुलपूर येथील पक्षाच्या स्थानिक शाखेत त्यांनी मुलायमसिंग यांच्याविरुद्ध बंडखोरीची परिस्थिती निर्माण केली आहे. भाजप आणि बसप यांच्या तुलनेने काँग्रेसची प्रचार मोहीम उशिरा सुरू झाली. पण फार आधी सुरू केला तर प्रचाराच्या शेवटच्या आठवड्यात कार्यकर्ते थकतात. शेवटच्या काही दिवसांत केलेल्या प्रचाराचाच प्रभाव मतदारांवर टिकून राहतो अशी काँग्रेसचा प्रचारतंत्रामागील भूमिका आहे असे कार्यकर्ते सांगत असले तरी प्रचारास कार्यकर्तेच कमी, हे खरे कारण आहे. पण तसे भासविण्यात येत नाही. रायबरेलीत अरुण नेहरू विरुद्ध सतीश शर्मा असा सामना आहे.

अरुण नेहरू भाजपतर्फे उभे आहेत. 1980 व 1984 मध्ये याच मतदारसंघातून ते काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. होते. इंदिरा गांधींचा हा मतदारसंघ असून त्यांच्या प्रभावाचीच नव्हे, तर नेहरू घराण्याच्या प्रभावाची जाणीव अरुण नेहरूंना आहे. भाषणे करताना व्यासपीठावर ते जवाहरलाल नेहरू व इंदिरा गांधी यांचे फोटो ठेवतात. वाजपेयींचा कारभार पारदर्शक आहे, असे सांगून सोनिया गांधींचा ‘परदेशी’ असा ते उल्लेख करतात आणि देशाच्या गरजा वाजपेयीच जाणू शकतात, परदेशी व्यक्ती नव्हे. हे त्यांच्या भाषणाचे सूत्र असते. लोकांशी उद्धटपणे, अरेरावीने वागणारा नेता अशी लोकमानसात त्यांची प्रतिमा आहे. त्यांना मत देताना त्याचाही विचार मतदार करतील. कल्याणसिंगांच्या नेतृत्वाला पक्षातील एका गटाचा असलेला विरोध आणि गेल्या एक वर्षातील सरकारचा गैरकारभार यांमुळे भाजपच्या जागा वाढण्याची शक्यता कमी दिसत आहे. बिहारमध्ये लालूप्रसादांचा प्रभाव कितपत टिकून राहणार हा या निवडणुकीतील मुख्य प्रश्न आहे. 1998 च्या निवडणुकीत एकूण 54 जागांपैकी भाजपने 20 जागा मिळविल्या. बहुसंख्य जागा त्यास मिळविता आल्या नाहीत तरी पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून तो निवडून आला आणि लालूप्रसादांच्या राष्ट्रीय जनता पक्षास (राजद) 17 जागा व दुसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळाले.

भाजपने 1996 च्या निवडणुकीत 18 जागा जिंकल्या होत्या. 1998 मध्ये त्यात फक्त 2 जागांची वाढ झाली. भाजप आघाडीचा भाग असलेल्या जॉर्ज फर्नांडिस यांच्या समता पक्षास 1996 मध्ये 6 व 1998 मध्ये 10 जागा मिळाल्या, त्या जमेस धरता भाजप आघाडीने 54 पैकी 30 जागा जिंकल्या. लालूप्रसादांनी निवडणुकीत अधिक जागा मिळविण्यासाठी काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाबरोबर बोलणी करून आघाडी उभारती, पण जागा वाटपाबाबत मतभेद होऊन ही आघाडी मोडली, जागावाटपात राजद 35, काँग्रेस 93, कम्युनिस्ट 3, मार्क्सवादी 2 आणि कम्युनिस्ट समन्वय पक्ष 1 असे वाटप वाटाघाटीत ठरण्याचा लालूप्रसाद यांचा दावा होता, पण कम्युनिस्ट व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी तो अमान्य केला. काँग्रेसचे शिष्टमंडळ सोनिया गांधींना भेटले आणि जागा वाढवून मिळणार नसतील तर समझोता मोडा अशी त्यांनी मागणी केली. सोनियाजींनी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. पण त्यांना त्यात यश आले नाही. आपण देऊ केलेल्या जागात अधिक वाढ करणार नाही असे लालूप्रसादांनी जाहीर केले. काँग्रेसने समझोत्यास देऊ केलेल्या 13 जागांपेक्षा फक्त 1 जागा अधिक लढविण्याचे ठरविले. कम्युनिस्ट पक्षाने मात्र समझोता मोडून 9 जागांसाठी आपले उमेदवार उभे केले आहेत. याचा परिणाम भाजपविरोधी मते विभागली जाऊन भाजपलाच होण्याचा संभव आहे; पण भाजपविरुद्ध मतदारांनी नाराजी मोठ्या प्रमाणावर व्यक्त केली तर मात्र हा फायदा भाजपला मिळणार नाही.

काँग्रेसला 1996 मध्ये फक्त 2 जागा मिळाल्या होत्या, त्या 1998 मध्ये 5 पर्यंत वाढल्या पण या वेळी कोणत्याच पक्षाबरोबर युती नसल्याने त्या अधिक वाढण्याची शक्यता कमी आहे. सर्वांत जाणवते ती जनता दलाची घसरगुंडी. 1996 मध्ये या पक्षाने 22 जागा जिंकल्या होत्या, त्या 1998 मध्ये एकपर्यंत घटल्या. पक्षातील फूट हेच याचे मुख्य कारण. भाजपने 1998 च्या निवडणुकीत जिंकलेल्या जागांत 42% जागा उत्तर प्रदेश व बिहारमध्ये मिळाल्या आहेत. मी पूर्वीच्या लेखात उल्लेख केला त्याकडेच पुन्हा लक्ष वेधायचे तर भाजपला एवढा विजय मिळाला तो भाजपविरोधी मते विभागली गेल्याने. उत्तर प्रदेशातील 41 मतदारसंघांत समाजवादी पक्ष व बसप यांची एकत्रित मते भाजपपेक्षा जास्त आहेत. तसेच आणखी 7 मतदारसंघांत सप, बसप व काँग्रेस यांची एकत्रित मते भाजपपेक्षा जास्त आहेत. आघाडी असली तर या जागा भाजपला मिळाल्या नसत्या. आघाडी करून ते भाजपचा पराभव करू शकतात हे स्पष्ट झाले असताही तो धड़ा अजून ते शिकलेले नाहीत. त्यामुळे या निवडणुकीत वेगळे चित्र दिसण्याचा संभव नाही.

काँग्रेसला उत्तर प्रदेशात 1998 मध्ये एकही जागा मिळाली नाही, तरी तिच्या मतांत थोडी वाढ झाली आहे. 1996 मध्ये काँग्रेसला 8 टक्के मते मिळाली होती. ती एक टक्क्याने वाढली. पण काँग्रेसच्या तुलनेने इतर पक्षांच्या मतांच्या प्रमाणात अधिक वाढ झालेती आहे. सप 6.7 टक्के, बसप 1.96 टक्के अशी ही वाढ आहे. मतविभागणीमुळे भाजपला अधिक यश मिळाले हे खरे असले तरी त्याच्या मतांतही वाढ झाली आहे. भाजपला 39.1 टक्के मते मिळाली ती 1996 पेक्षा 5.6 टक्के जास्त आहेत.

बिहारमध्ये 1984 पर्यंतच्या निवडणुकांत 1977 चा अपवाद वगळता काँग्रेसने नेहमीच मोठा विजय मिळविला. एकूण 54 जागांपैकी 1952 पासून 1984 पर्यंतच्या आठ निवडणुकांत काँग्रेसला मिळालेल्या जागा पुढीलप्रमाणे - 42, 41, 39, 34, 39, 0, 30, 48. त्यानंतर 1989 पासूनच्या निवडणुकांत 4, 1, 2, 5 अशा जागा काँग्रेसला मिळाल्या. लालूप्रसादांच्या राजद पक्षाशी समझोता केल्याने काँग्रेसच्या जागा थोड्‌या वाढल्या. या वेळी तो फायदाही काँग्रेसला मिळणार नाही. 1989 मध्ये काँग्रेसने स्वतःच्या बळावर फक्त एक जागा जिंकली होती. या वेळी पुन्हा एकट्याच्या बळावर बिहारमध्ये तो पक्ष निवडणूक लढवीत असून त्याचे बळ वाढण्यास सोनिया गांधींच्या घराणेशाहीच्या वलयाचा कितपत उपयोग होतो हे या निवडणुकीत दिसून येणार आहे.

दिग्विजयसिंगांची पकड : मध्य प्रदेशात शुक्लकाष्ठ संपले

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री दिग्विजयसिंग यांच्या नावात नुसता विजय नव्हे तर दिग्विजय आहे. गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुका जिंकून त्यांनी विजय मिळविला. पण या वेळच्या लोकसभा निवडणुकांतही त्यांच्या काँग्रेस पक्षाने बहुसंख्य जागा जिंकल्या तर तो दिग्विजय ठरेल. असा विजय मिळवणे त्यांना शक्य होईल का? लोकसभेच्या 1998 च्या निवडणुकांत राज्याच्या 40 जागांपैकी भाजपनं 30 आणि काँग्रेस पक्षानं फक्त 10 जागा जिंकल्या. विधानसभेत एका पक्षास आणि लोकसभेत दुसऱ्या पक्षाला असा वेगळा कौल मतदारांनी का द्यावा? एकाच वेळी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका असत्या तर असा वेगळा कौल दिसला असता का? मध्य प्रदेशातही मतदारांनी भाजपकडे सत्ता दिली होती पण पाच वर्षांतच लोकमत प्रतिकूल झाले आणि भाजपने सत्ता गमावली.

नंतरच्या दोन निवडणुकांत काँग्रेसने दिग्विजयसिंग यांच्या नेतृत्वाखाली सत्ता मिळविली व टिकविली, केन्द्रापेक्षा राज्यातील सत्ता बदलणे सोपे असते. ते तेथील मतदारांनी करून दाखविले. स्वातंत्र्यापासून गेले अर्धशतक मध्य प्रदेशच्या राजकारणावर आपला प्रभाव गाजविणाऱ्या शुक्ला घराण्याचा प्रभाव आणि त्याचे शुक्लकाष्ठ या निवडणुकीनंतर संपविण्यात दिग्विजयसिंग यांनी यश मिळविले आहे. विद्याचरण शुक्ला या वेळी उभे नाहीत, श्यामचरण शुक्लांना लोकसभेसाठी उभे करून दिल्लीस पाठविण्यास येत आहे.

राज्य आम्ही सांभाळतो, तुम्ही दिल्लीकडे पाहा, असाच संकेत दिग्विजयसिंगांनी त्यांना दिला आहे. श्यामचरण यांचे पुत्र अमितेष पुढे निवडणुकीस उभे राहिले तरी त्यांना दिग्विजयसिंगांचेच ऐकावे लागेल. शुक्ला गटाचे सहा समर्थक लोकसभेसाठी उभे आहेत. ते निवडून येवोत किंवा न येवोत त्यांना दिग्विजयसिंगांचाच शब्द मानावा लागणार आहे. असे असले तरी लोकसभा निवडणुकीत मध्य प्रदेशात या वेळी काँग्रेसने जास्त जागा मिळविल्या नाहीत तर सोनिया गांधींचे दिग्विजयसिंगांबद्दल प्रतिकूल मत होईल. त्यांनी निवडणुकांत फारसे लक्ष घातले नाही. त्यांना राज्याची सत्ता टिकविण्यात अधिक रस आहे असा त्याचा अर्थ लावला जाईल, हे लक्षात घेऊन या निवडणुकीत जोरदार प्रचार मोहीम ते करीत आहेत.

सोनिया गांधी अपशकुनी

सोनिया गांधींच्या विदेशीपणाच्या जोडीस लोकांमधील अंधश्रद्धेचा व अंध समजुतींचा फायदा त्यांच्याविरुद्ध प्रचारासाठी भाजप नेते करीत आहेत. भाजपचे उपाध्यक्ष सुंदरलाल पटवा होशंगाबाद मतदारसंघातील मिसरोड खेड्यातील एका सभेत म्हणाले, ‘‘आमचा अपशकुनांवर विश्वास आहे. गांधीघराण्यात प्रवेश केल्यापासून सोनियाने या कुटुंबावर शोककळाच आणली आहे. प्रथम संजय गांधी, नंतर इंदिराजी आणि नंतर राजीव; आणि आता या वेळी त्या काँग्रेसचाच अंत करणार आहेत.’’ प्रचारासाठी अशा पातळीस भाजपने जावे याचा अर्थच त्यांच्याजवळ लोकांपुढे मांडण्यासारखे दुसरे प्रभावी मुद्दे नाहीत असा होतो.

काश्मीरमध्ये दहशतीचे वातावरण

काश्मीरमध्ये या वेळी मतदानाचा दुसरा टप्पा आहे. दहशत निर्माण करून निवडणुका होऊ नयेत असे प्रयत्न पाककडून शस्त्रांची मदत मिळत असलेले अतिरेकी करीत आहेत. अनंतनाग मतदारसंघातील भाजपचे उमेदवार गुलाम हैदर नुराणी हे सुरुंग-स्फोटात ठार झाले. अतिरेक्यांनीच हे सुरुंग पेरले होते. उमेदवाराचे निधन झाले तर त्या मतदारसंघाची निवडणूक रद्द करण्याची आतापर्यंतची पद्धत. पण या वेळी आयोगाने त्यात बदल केला. उमेदवारीचे अर्ज पुन्हा मागविण्यापासून निवडणुकीची सर्व प्रक्रिया नव्याने न करता फक्त भाजपला दुसरा उमेदवार सुचविण्यासाठी व त्याचा अर्ज भरण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली. आता या मतदारसंघाची निवडणूक 6 ऑक्टोबरला होईल. ही योग्य पद्धत आयोगाने स्वीकारली आहे.

काश्मीरचे मुख्यमंत्री डॉ. फारुख अब्दुल्ला बाँबहल्ल्यातून बचावले. पुंछ जिल्ह्यातील एक मतदान केन्द्र अतिरेक्यांनी स्फोटाने उद्ध्वस्त केले. असे प्रकार चालू असले तरी या दहशतीपुढे न नमता काश्मीरमधील निवडणुका होणार आहेत आणि त्या घेण्यानेच लोकशाहीवरील आपली निष्ठा व्यक्त होणार आहे.

Tags: पक्ष बलाबल काश्मीर मध्य प्रदेश बिहार उत्तरप्रदेश आगामी निवडणुका निवडणूक विशेष party strength kashmir mp bihar up upcoming elections election special weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके