डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

युगोस्लाव्हियात यूनोच्या बुरख्याआड नव्या साम्राज्यवादाची पकड

नाटोला पुढे करून अमेरिकेने कोसोवोमध्ये जी दादागिरी केली त्यामुळे अमेरिकेला शह देणारी प्रभावी शक्ती जगात नाही याची जाणीव तीव्रतेने झाली. यासाठी आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतील शांतताप्रिय देशांनी संघटित होऊन आपापसांतील सहकार्य वाढवावयास हवे.

कोसोवो प्रश्नावर 79 दिवसांच्या हवाई हल्ल्यांच्या युद्धातून अमेरिका व नाटो राष्ट्रांनी अखेर काय साधले? कोसोवो हा युगोस्लाव्हियाचाच एक भाग. तेथे 90 टक्के लोक अल्बानियन आहेत. त्यांना समान नागरिकत्वाचे हक्क न देता त्यांना कायमचे आपल्या नियंत्रणाखाली ठेवण्यासाठी त्यांच्यावर अमानुष दडपशाही व अत्याचार सर्व सैनिकांनी केले. अनेक ठिकाणी त्यांची सामुदायिक कत्तलही केली. ही अमानुष हत्या आणि अत्याचार युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष मिलोसेव्हिक यांनी थांबवावे आणि कोसोवोमधून सर्व सैनिक मागे घ्यावे अशी नाटो राष्ट्रांची मागणी होती. ती मान्य करण्यासाठी त्यांनी काही मुदतही दिली होती. पण मिलोसेव्हिक यांनी ती मान्य न केल्याने 23 मार्चला त्यांनी हवाई हल्ले सुरू केले आणि त्यात युगोस्लाव्हियाची मोठी हानी झाल्यावर अखेर 79 दिवसांनी मिलोसेव्हिक यांनी सर्व सैनिक काढून घेण्याचे मान्य केल्याने युद्ध थांबले, कोसोवोत शांतता प्रस्थापित करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या नियंत्रणाखाली नाटो राष्ट्रांच्या पन्नास हजार सैनिकांचे शांतताबळ ठेवण्यासाठी मिलोसेव्हिक यांनी मान्यता दिली आहे. आपल्या अटी मान्य करायला लावून युगोस्लाव्हियावर नाटो राष्ट्रे व अमेरिकेने यूनोच्या नियंत्रणाच्या नावाखाली प्रत्यक्षात आपली सत्ता प्रस्थापित केली आहे. ‘साम्राज्य’ परत आले. यूनोच्या बुरख्याखाली 'दि एम्पायर इज बॅक, डिसगाइज्ड अॅज दि यूनो' अशा शीर्षकाखाली नाटो व अमेरिकेच्या विजयाचे यथार्थ स्वरूप लंडनच्या ‘संडे टाइम्स’ च्या 13 जूनच्या अंकातील लेखात फर्डिनांड माउंट यांनी निदर्शनास आणले आहे.

यूनोचा विरोध डावलून युद्ध

वास्तविक यूनोची संमती न घेता तिला डावलून नाटो राष्ट्रांनी हे युद्ध सुरू केले होते आणि त्या बाबत शाब्दिक नापसंती व्यक्त करण्यापलीकडे यूनोंचे सरचिटणीस कोफी अन्नान काही करू शकले नव्हते. पण आता शांतता करार करताना मात्र यूनोस मान त्यांनी दिला आणि अखेर आपल्याला अगदीच न डावलता यूनोचे नियंत्रण मान्य करून शांततादल ठेवण्यात येत असल्याने अन्नान यांनीही त्यास मान्यता दिली. सुरक्षा समितीत ठराव पास करून घेऊन या करारास औपचारिक मान्यता घेण्यात आली. सुरक्षा समितीच्या पंधरा सभासदांपैकी फक्त चीनने त्यास मान्यता दिली नाही. बाकी रशियासह चौदा सभासदांनी पाठिंबा दिला. चीननेसुद्धा तटस्थ राहून आपली अमान्यता दर्शविली. पण या प्रश्नावर नकाराधिकार वापरला नाही. कारण चीनला शांतता कराराच्या अटी मान्य नसल्या तरी युद्ध यांबायला हवेच होते.

ठरावास रशियाने पाठिंबा दिला याचे कारण शांतता करारात रशियाच्या काही अटी मान्य करण्यात आल्या. कोसोवोची स्वातंत्र्याची मागणी मान्य करण्यात येऊ नये. तो युगोस्लाव्हियाचाच भाग असल्याचे मान्य करण्यात यावे ही त्यातली मुख्य अट होती तसेच कोसोवोमध्ये नाटोच्या शांतता दलाप्रमाणेच रशियाने आपले सैनिक आणले. नाटो राष्ट्रांना काही कल्पना न देताच रशियाने अचानक हे सैनिक आणून त्यांना चकित केले, या सैनिकांवर नियंत्रण कोणाचे, नाटोचे नियंत्रण ते मानणार का या बाबत वाटाघाटी करून निर्णय घेण्याचे ठरले. या युद्धात मिलोसेव्हिक यांचा संपूर्ण पराभव झाला असताही शांतता करार मान्य करताना आपला पराभव झालेला नाही असे त्यांनी भासविलेले आहे आणि विजयोत्सव साजरा करावा तशा थाटात युद्धसमाप्ती साजरी केली.

कोसोवो युगोस्लाव्हियाचाच भाग राहील हे मान्य करण्यात आले हा मिलोसेव्हिक यांच्या दृष्टीने त्यांचा विजयच आहे. तसेच ते अध्यक्षपदावर अजून कायम आहेत. युद्ध गुन्हेगार म्हणून त्यांच्यावर हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयापुढे खटला भरण्यात आला आहे, त्यांच्या विरुद्ध एवढा पुरावा सादर करण्यात आला आहे की ते निर्दोषी ठरण्याची शक्यता नाही. या निकालानंतर त्यांना अध्यक्षपद सोडावेच लागेल. ही नामुष्की टाळण्यासाठी खटल्याचा निकाल लागण्यापूर्वीच देशांतर करण्याच्या हालचाली मिलोसेव्हिक यांनी सुरू केल्या असल्याची बातमी आहे. मिलोसेव्हिक यांच्या मुलाने देशातून पळून जाण्याची पूर्वतयारी म्हणून दक्षिण आफ्रिकेतील बँकांत 50 लाख डीएम (सुमारे 17 लाख पौंड म्हणजे जवळजवळ 12 कोटी रुपये) ठेव म्हणून ठेवले आहेत. मार्को मिलोसेव्हिक यांनी स्वतः तेथील बँकांच्या खात्यात ही रोख रक्कम हस्तांतरित केली. दक्षिण आफ्रिकेत प्रवेश करण्यासाठी व्हिसा मिळविणे, लस टोचून घेणे वगैरेंबाबतही त्यांच्या कुटुंबाने चौकशी केली. मार्कोने तंबाखू व अल्कोहोलची लाखो पौंडांची आयात करण्याच्या सवलती सरकारकडून मिळवल्या आहेत.

मिलोसेव्हिक यांची मुलगी मरीना एक रेडिओकेंद्र चालविते तसेच एक टेलिव्हिजन केंद्र तिने आपल्या व्यवस्थापनाखाली घेतले असल्याची बातमी आहे. मिलोसेव्हिक यांची पत्नी मीरा जेयूएस या डाव्या पक्षाचे नेतृत्व करते आणि मिलोसेव्हिक यांच्या संमिश्र सरकारमध्ये तो एक घटकपक्ष आहे. मार्कोने दक्षिण आफ्रिकेतील बँकांमध्ये पैसा ठेवण्यासाठी सहा महिन्यांपूर्वी त्या देशास भेट दिली. सर्वियन स्टेट सिक्युरिटी सर्व्हिसेसचे प्रमुख रेड मार्कोव्हिच यांनी काही आठवड्यांपूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून प्रवेश परवाना मिळविण्यासाठी काय करायला हवे याची चौकशी केली. मार्कोव्हिच मार्कोचा निकटचा मित्र असून त्यांच्या कुटुंबाशीही त्याचे जवळचे संबंध आहेत. मरीनाचा तो नवा 'बॉयफ्रेंड' असल्याचेही बोलले जाते. मिलोसेव्हिक कुटुंबाने जमविलेली इतर संपत्तीही सायप्रसमार्गे दक्षिण आफ्रिकेत पाठविली असल्याची बातमी आहे.

सायप्रसमध्ये अनेक युगोस्लाव्ह बँका व्यवहार करतात. यूनोच्या सभासद राष्ट्रांनी मिलोसेव्हिक यांची खाती गोठवावीत अशा सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत. पण सायप्रसमधील बँकांना त्या लागू नाहीत. दक्षिण अफ्रिकेचे नेते नेल्सन मंडेला यांनी मिलोसेव्हिक यांना आसरा देण्याची तयारी गेल्या महिन्यात दर्शविली अशी बातमी आहे. मंडेला यांनी अशी भूमिका घ्यावी याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येते. पण त्यांनी त्याबद्दल असे स्पष्टीकरण केल्याचे समजते की मिलोसेव्हिक यांच्या कृत्यांचा आम्ही निषेध करतो. पण त्यामुळे त्यांना दक्षिण आफ्रिकेत प्रवेश करण्यास बंदी करणे समर्थनीय ठरणार नाही." पण वृत्तपत्रांतील या बातम्यांचा सरकारी अधिकाऱ्यांनी नंतर इन्कार केला. मिलोसेव्हिक यांना दक्षिण आफ्रिकेत प्रदेश दिला जाणार नाही असे गृहमंत्री मँगोसुथू बुथेलेझी यांनी स्पष्टपणे सांगितले.

मिलोसेव्हिक यांनी किंवा त्यांच्या कुटुंबीयांपैकी कोणी आपणांस व्हिसा किंवा आश्रय मिळावा अशी औपचारिक विनंती केलेली नाही असे परराष्ट्र खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मिलोसेव्हिक आणि त्यांची पत्नी यांची तुलना रुमानियाचे अध्यक्ष सिसेस्क्यू यांच्याशी व त्यांच्या पत्नीशी करण्यात येते. त्यांच्यावरही मिलोसेव्हिक यांच्याप्रमाणेच आरोप करण्यात आले आणि खटला चालविण्यात येऊन त्यांना देहांताची शिक्षा झाली. मिलोसेव्हिक यांचा मुलगा मार्को आणि मुलगी मरीना यांचे स्थानही मिलोसेव्हिक यांच्या पाठीराख्यांनी दिलेल्या पाठिंब्यावरच टिकून आहे. खटल्यात त्यांना शिक्षा झाल्यावर हा पाठिंबा राहणार नाही. दक्षिण आफ्रिकेत ठेवलेल्या ठेवींशिवाय अथेन्सच्या उपनगरात मिलोसेव्हिक यांच्या मालकीचा साडेसदतीस लाख पौड किमतीचा बंगला आहे. तसेच कोर्फ व त्यांनी उन्हाळ्यात राहण्यासाठी विश्रांतिस्थानेही बांधलेली आहेत.

शांतता कराराचे यश कोसोवो मुक्तिसेनेच्या सैनिकांकडून मिळालेल्या सहकार्यावर अवलंबून आहे. ‘आमच्या शत्रूचा पराभव झाला पण आम्ही युद्ध जिंकलेले नाही,’ अशा शब्दांत या मुक्तिसेनेच्या एका अधिकाऱ्याने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांची स्वातंत्र्याची मागणी मान्य झालेली नाही. शांतता करायची बातमी त्यांना प्रथम समजली तेव्हा तिच्यावर त्याचा विश्वास बसला नाही. मिलोसेव्हिक यांच्यावर हेग न्यायालयात एकीकडे खटला भरण्यात येतो आणि त्यांच्याशीच शांतता करार करण्यात येतो ही राजकीय विसंगती आहे, अशा शब्दात एका मुक्तिसैनिकाने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

कोसोवोचा प्रश्न

कोसोवोच्या स्वातंत्र्याची मागणी मान्य झाली नाही म्हणूनही त्यांच्यात असंतोष आहे. कोसोवोस तीन वर्षे अंतर्गत स्वायत्तता देण्यात यावी आणि नंतर सार्वमताने भवितव्य ठरवावे ही तडजोड योजना मुक्तिसेनेच्या नेत्यांनी मान्य केली होती. पण मिलोसेव्हिक यांनी ती फेटाळली. आता ही तडजोड योजनाही ते मान्य करायला तयार नाहीत. शांतता करारानुसार कोसोवो यूनोच्या आंतरराष्ट्रीय नियंत्रणाखाली राहायचा आहे. हा काही कायमचा तोडगा होऊ शकत नाही, अशा शब्दांत मध्य कोसोवोमधील ‘नेटो टाइम्स’ या पट्ट्यातील मुक्तिसेनेचे प्रमुख शुफी बुजा यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. कायम तोडग्यासाठी त्यांचा झगडा चालू राहील. शांतता करारानुसार कोसोवो मुक्तिसेना यापुढं सशस्त्र सेना म्हणून राहू शकत नाही, पण शांततादल म्हणून यापुढे कार्य करण्याची भूमिका त्यांच्या नेत्यांना मान्य करणे कठीण जाईल. मिलोसेव्हिक यांच्याबद्दलचा अनुभव लक्षात घेता हा करार फार काळ टिकेल असे त्यांना वाटत नाही. 

शांततादल कोसोवोमध्ये किती काळ राहणार? 

“आम्हांला कोसोवोमध्ये काही महिने किंवा वर्षे नव्हे तर एक पिढी रहावे लागेल." अशी भाषा अमेरिकन स्पष्टपणे बोलत आहेत. अर्थात आपल्या भूमीवर परकीय सैनिकांना फार काळ राहू देणे कोसोवोची जनता मान्य करणार नाही. निश्चित कालावधीत कोसोवोचे भवितव्य ठरविण्याची योजना आखण्यात आली नाही तर त्यांच्यात असंतोष वाढून ते पुन्हा सशस्त्र लढा सुरू करतील अशी शक्यता आहे. मिलोसेव्हिक यांना पदच्युत करण्याचाच अमेरिकेचे अध्यक्ष क्लिंटन यांचा उद्देश साध्य झाला नाही, आता जनतेनेच त्यांच्याविरुद्ध बंड करावे असे आवाहन त्यांनी केले आहे. युगोस्लाव्हियात लोकशाही सरकार प्रस्थापित झाल्याशिवाय अमेरिका पुनर्वसनासाठी मदत सुरू करणार नाही असेही त्यांनी सांगितले. कोसोवोतून बाहेर गेलेल्या निर्वासितांना परत आणून त्यांचे पुनर्वसन करावे आणि युद्धात झालेली हानी भरून काढणे ही निकडीची कामे प्रथम करायला हवीत. पुनर्वसनाचा खर्च तीस ते शंभर अब्ज पौंड म्हणजे सव्वाशे अब्ज रुपयांपेक्षा अधिक येईल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. युद्धातील एकूण हानीचा तपशील आता उपलब्ध झाला आहे.

1. चौदा वीज केंद्रे उद्ध्वस्त करण्यात आली त्यांच्या उभारणीचा खर्च अंदाजे 21 अब्ज रुपये.

2. त्रेसष्ठ पूल उड़वून देण्यात आले. त्यांच्या उभारणीचा खर्च अंदाजे 75 अब्ज रुपये.

3. झास्ताबा मोटार कारखान्यावर तीन दिवस बाँबफेक करण्यात आली. या कारखान्यात 38 हजार कामगार काम करतात. या कारखान्याच्या हानीची किंमत सुमारे 75अब्ज रुपये.

3. पैंकाको व नेव्ही साद येथील तेल शुद्धीकरण कारखान्यांच्या हानीचा खर्च अंदाजे 600 कोटी रुपये.

4. चाळीस औद्योगिक कंपन्या आणि शंभर व्यापार केंद्रे यांच्या हानीची किंमत अंदाजे 200 कोटी रुपये. तेरा विमानतळांची हानी

5. तेवीस रेल्वेमार्ग व स्टेशनांची हानी.

6. मोठ्‌या महामार्गाची हानी.

7. नऊ हॉस्पिटलांची हानी.

8. तीनशेपेक्षा अधिक प्राथमिक, माध्यमिक शाळा व विद्यापीठ केंद्रांची हानी.

(यातील हानी व उभारणीच्या किमतीचे आकडे येथे पौंडांवरून रुपयांत परावर्तित केले आहेत.) युद्ध एकतर्फी झाले. नाटो राष्ट्रांना आपला एकही सैनिक गमवावा लागला नाही. पण 1500 पेक्षा अधिक युगोस्लाव्हियाचे सैनिक ठार आणि आठ हजारपेक्षा अधिक जखमी झाले, असा नाटो राष्ट्रांचा अंदाज आहे. मिलोसेव्हिक यांनी मात्र फक्त 462 युगोस्लाव्ह सैनिक ठार व 114 पोलीस ठार झाल्याचे जाहीर केले. 

थंडी लढाई संपल्यानंतर नाटो राष्ट्रांनी स्वतःच्या सभासद राष्ट्राच्या संरक्षणासाठी नव्हे तर सभासद नसलेल्या एका देशातील एका प्रांतातील अल्पसंख्य वंशाच्या लोकांची सामुदायिक हत्या व अत्याचार थांबविण्यासाठी आणि युगोस्लाव्हियाच्या सर्व सैनिकांना तेथून माघार घ्यावयास लावण्यासाठी हे हवाईयुद्ध केले. ते इतके दिवस लांबेल असे त्यांना वाटले नव्हते. लष्करी केंद्राची हानी करणे हा मुख्य उद्देश असल्याचे प्रथम सांगण्यात आले पण तेवढ्याने मिलोसेव्हिक नमत नाहीत असे दिसून आल्यावर वीजकेंद्रे, तेलशुद्धीकरण केंद्रे, मोटारीचे व इतर औद्योगिक उत्पादनांचे कारखाने, शाळा, हॉस्पिटल्स, रेल्वेमार्ग, पूल यांचीही मोठी हानी केली.

एकाकी मिलोसेव्हिक किती काळ लढणार? त्यात त्याच्या हुकूमशाही पद्धतीच्या कारभाराने जनतेचा पाठिंबा त्याला नव्हता. पण त्याच्याविरुद्ध बंड करण्याचे धैर्यही जनतेने दाखविले नाही. रशिया व चीनने नाटोच्या हल्ल्यांचा शाब्दिक निषेध केला. पण युगोस्लाव्हियास प्रत्यक्ष मदत केली नाही. रशिया स्वतःच आर्थिक पेचप्रसंगात असताना तो काय मदत करणार? कंबोडिया युद्धाचा अनुभव लक्षात घेता चीनला स्वतः युद्धात अडकवून घ्यावयाचे नव्हते, केवळ हवाई हल्ल्यांनी युद्ध जिंकता येते हे नाटो राष्ट्रे व अमेरिकेने दाखवून दिले असले तरी प्रतिस्पर्धी छोटा व एकाकी असल्यानेच हे शक्य झाले. नाटोला पुढे करून अमेरिकेने केलेल्या दादागिरीस शह देणारी प्रभावी शक्ती जगात नाही याची जाणीव तीव्रतेने झाली.

आज परिस्थिती निराशाजनक दिसत असली तरी यातूनच मार्ग काढायला हवा. रशिया, चीन आणि भारत यांच्या महासंघाची प्रिमाकोव्ह यांनी सुचविलेली योजना फारशी गंभीरपणे विचारात घेतली गेली नाही. प्रिमाकोव्ह पदच्युत झाल्याने ते या बाबत पुढे काही करू शकले नाहीत. येल्‌त्सिननी सत्तासंघर्षात सध्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली असली तरी त्यांचे व त्यांच्या समर्थकांचे आसन अस्थिर आहे, पुढच्या वर्षी तेथे निवडणुका आहेत व तसेच भारतातही निवडणुका होऊन नवे सरकार येईल. त्यानंतर तिन्ही देशांच्या नेत्यांनी एकत्र येऊन आपले सहकार्य वाढविण्याच्या योजना आखायला हव्यात.

रशिया व चीनने तीनशे वर्षांचा सीमावाद कायमचा निकालात काढला. भारताशीही संबंध सुधारण्याची तयारी तिन्ही नेत्यांनी दर्शविली आहे. तिन्ही देशांचे सहकार्य वाढल्यास त्यातूनच महासंघाच्या दिशेने पावले टाकण्याच्या विचाराला चालना मिळेल. अलिप्त राष्ट्रांनीही आपली संघटना अधिक प्रभावी करायला हवी, त्यासाठी आपापसांतील सहकार्य त्यांनी वाढवायला हवे. आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतील शांतताप्रिय देशांनी संघटित होऊन सहकार्य वाढवून आपल्या विकासाच्या योजना आखणे हेच अमेरिका व युरोपच्या विशेषतः अमेरिकेच्या दादागिरीस परिणामकारक उत्तर ठरणार आहे. आज हे स्वप्न वाटत असले तरी निर्धारपूर्वक संघटित कृतीने स्वप्ने साकार होऊ शकतात.

Tags: मिलोसेव्हिक नाटो राष्ट्रे शांतता करार यूनो कोसोवो स्वातंत्र्य युगोस्लाव्हिया आंतरराष्ट्रीय milosavic NATO nations peace agreement UNO freedom ugoslavia-kosovo international weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके