डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

हिमाचल मुख्यमंत्र्यांच्या भ्रष्टाचारावरकाँग्रेस प्रचारमोहिमेत भर

मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप हाच काँग्रेसने प्रचाराचा मुख्य मुद्दा केलेला आहे. धुमल यांच्या कारकीर्दीच्या काळात राज्य सरकारवरील कर्जाचा बोजा 500 कोटी रुपयांवरून 15000 कोटी रुपयांपर्यंत वाढला पण याच काळात धुमल यांनी आपली व आपल्या परिवाराची मालमत्ता बेकायदा व नियमबाह्य मार्गानी 41 कोटी रुपयांपर्यंत वाढविली असा आरोप काँग्रेसने त्यांच्यावर केला आहे.

गुजरातमध्ये नरेंद्र मोदींच्या आक्रमक हिंदुत्ववादी प्रचार मोहिमेने मिळविलेल्या विजयानंतर आता येत्या 26 फेब्रुवारीस देशाच्या चार राज्यांत होणाऱ्या  विधानसभा निवडणुकांत तेच तंत्र वापरून भाजप आपले बळ वाढवू शकेल काय? हिमाचल प्रदेश, त्रिपुरा, मेघालय व नागा या चार राज्यांत निवडणुका होणार असल्या तरी त्यांपैकी हिमाचल प्रदेश निवडणूक विशेष लक्ष वेधून घेत असून भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना ती प्रतिष्ठेची वाटते. गुजरातप्रमाणेच हिमाचलही आपण मोठ्या बहुमताने जिंकू असे भाजपचे नेते म्हणत आहेत तर तेथे भाजपला आपण थोपवू आणि काँग्रेसचे राज्य आणू, अशी भाषा काँग्रेस नेते बोलत आहेत. त्यातला प्रचारकी दाव्यांच्या भाग सोडला तरी ही निवडणूक जवत चुरशीची होणार असून याची निवडणुकाच्या दृष्टीने दिशादर्शक ठरणार आहे.

गेल्या दोन विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या  वेळच्या निवडणुकीकडे पहायला हवे. काँग्रेसने 1993 ची  निवडणूक 68  पैकी 52 जागा जिंकून मोठे बहुमत मिळवले होते. भाजपत्ता फक्त 8 जागा मिळाल्या होत्या. पण 1978 मध्ये चित्र पालटले, काँग्रेसच्या जागाची संख्या 29 पर्यंत घटली  तर भाजपच्या जागा 8  वरून  31 पर्यंत पावल्या. 1998 मध्ये निर्णायक बहुमत कोणत्याच पक्षास मिळाले नाही, पण सुखराम यांच्या हिमाचल विकास पक्षाने भाजपला पाठिंबा दिल्याने त्या दोन पक्षांच्या युतीचे सरकार आले. सरकारमध्ये दोन्ही  पक्षानी युती केली तरी या वेळच्या निवडणुका मात्र दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढवीत आहेत. याचा अर्थ  दोन्ही पक्षांच्या नेत्यांना निवडणूकपूर्व युती नको होती, असे नाही. तसे प्रयत्न झाले पण सौदा पटला नाही. सुखराम यांच्या पक्षास गेल्या निवडणुकीत 4 जागा व 10 टक्के मते मिळाली होती. 

मतांच्या टक्केवारीवरून 1993 च्या तुलनेने 1998  मध्ये काँग्रेसच्या मतांत 49 वरून 44 टक्के अशी 5 टक्कयांची घट झाली आणि भाजपची मते 34  टक्कयांवरून 38 टकक्यापर्यंत वाढली तरी ती काँग्रेसपेक्षा कमीच होती. या वेळी गुजरातच्या विजयाचा फायदाम मिळून भाजपला पाठिंबा वाढला तरी तो किती वाढेल? निर्णायक बहुमतासाठी 35 जागा जिंकायला हव्या. 1998 मध्ये आपण 31 जागा जिंकल्या आता 35 सहज मिळवू असा विश्वास भाजपचे नेते व्यक्त करीत आहेत; तर भ्रष्टाचारी कारभारामुळे भाजपबद्दल जनतेत असंतोष असून निर्णायक बहुमत भाजप मिळवू शकणार नाही, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप हाच काँग्रेसने प्रचाराचा मुख्य मुद्दा केलेला आहे. धुमल यांच्या कारकीर्दीच्या काळात राज्य सरकारवरील कर्जाचा बोजा 500 कोटी रुपयांवरून 15000 कोटी रुपयांपर्यंत वाढला पण याच काळात घुमल यांनी आपली व आपल्या परिवाराची मालमत्ता बेकायदा व नियमबाह्य मार्गांनी 41 कोटी रुपयांपर्यंत वाढविली, असा आरोप काँग्रेसने त्यांच्यावर केला आहे. धुमल यांनी आपल्या मालमत्तेचा तपशील विधानसभेच्या सभापतींना सादर केलेला नाही, याकडेही काँग्रेसने लक्ष वेधले आहे. या मालमत्तेपैकी धर्मशाला येथील मेक्को रेस्टॉरंट एवढेच फक्त हिमाचल प्रदेशात असून बाकी मालमत्ता पंजाबमध्ये व मुख्यतः जालंदरमध्ये आहे.

बारोग येथे एका पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा यांनी या आरोपांचा तपशील दिला. चार निवासी इमारती, एक रेस्टॉरंट, एक खासगी मालकीची शाळा, दोन पेट्रोल पंप, यंत्रांचे सुटे भाग बनविणारा एक कारखाना, व्हॉल्व बनविणारे चार कारखाने, पाइप बनविणारे दोन कारखाने, मोबाईल फोन-संगणक यांचे भाग बनविणारा कारखाना यांचा या मालमत्तेत समावेश आहे. 

आपल्यावरील आरोप मुख्यमंत्री धुमल यांनी फेटाळले असून त्याबद्दल काँग्रेस नेत्यांविरुद्ध न्यायालयात बदनामीचा खटला भरला आहे. त्यापूर्वी या आरोपांबाबत काँग्रेस नेते लोकायुक्तांकडे तक्रार का करीत नाहीत असे त्यांनी म्हटले होते. त्यास उत्तर देताना हिमाचल प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती विद्या स्ट्रोकर यांनी सांगितले की लोकायुक्तांपुढील चौकशीत फार वेळ जातो, म्हणून आम्ही त्या मार्गाचा अवलंब केला नाही. 

आपण एकजुटीने निवडणूक लढवत असल्याचा दावा भाजप आणि काँग्रेसचे नेते बाह्यतः करीत असले तरी दोन्ही पक्षांत गट व अंतर्गत संघर्ष आहेत. भाजपमध्ये मुख्यमंत्री धुमल व केन्द्रीय मंत्री शांताकुमार यांच्यात संघर्ष आहे. शांताकुमार यांना मुख्यमंत्री पदाची आकांक्षा आहे. असे घुमत समर्थकांचे म्हणणे आहे. शांताकुमार यांनी याचा इन्कार करून प्रांतिक राजकारणात आपणास यावयाचे नाही, असे म्हटले आहे. मतदारसंघांची पुनर्रचना करण्यासाठी नेमलेल्या समितीने केलेल्या शिफारशीमुळे आपल्या लोकसभा मतदारसंघातील तीन विधानसभा मतदारसंघ शांताकुमार यांनी कमी करून घेतले, असाही आरोप शांताकुमार यांच्याविरुद्ध करण्यात आला आहे. त्यास उत्तर देताना आपण या बाबतीत कोणताही हस्तक्षेप केला नाही. या समितीचे काम स्वतंत्रपणे चालते असे शांताकुमार यांनी म्हटले आहे. 

निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाला  तर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंग पुन्हा मुख्यमंत्री होणार की नवा नेता निवडला जाणार? वीरभद्र सिंग हेच मुख्यमंत्री होतील असे केन्द्रीय कॉंग्रेस नेत्यांतर्फ सूचित करण्यात झालेले नाही याबाबत वार्ताहारांनी विचारले असता निवडणुकीनंतर विधिमंडळ पक्षातर्फे नेत्याची निवड होईल असे तांत्रिक  उत्तर देण्यात आले. पण सध्याच्या प्रदेश काँग्रेस अध्यक्ष विद्या स्ट्रोकर याही मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धक असल्याचे बोलले जात आहे. 

निवडणुकीत मतदारसंघाच्या मतांवर जातीचा प्रभाव पडत असल्याचे दिसून आले आहे. हिमाचल प्रदेशात 98 टके लोक हिंदू असून ख्रिस्ती, मुस्लिम वगैरे अल्परसंख्याक फक्त 2 टक्के आहेत. हिंदू 98 टक्के असते तरी ती सर्व मते हिंदुत्वाचा कितीही जोरदार प्रचार केला तरी भाजपला न मिळता जातवार विभागली जाण्याची शक्यता आहे. जातींमध्ये सर्वात जास्त 38 टक्के  रजपूत आहेत आणि हिमाचल प्रदेशाच्या स्थापनेपासून या जमातीचे नेतेच राज्य करीत आलेले आहेत. पहिले मुख्यमंत्री वाय. एस. परमार रजपूत होते. सध्याचे मुख्यमंत्री घुमल ही रजपूत आहेत. काँग्रेस नेत्यांपैकी 12 वर्षे मुख्यमंत्री असलेले वीरभद्र सिंग रजपूत आहेत आणि विद्या स्ट्रोकर या त्यांच्या आडनावावरून ख्रिस्ती वाटत असल्या तरी त्यांचे वडील रजपूत होते. 

वरिष्ठ जातींपैकी रजपूतांशिवाय दुसरी वरिष्ठ जात ब्राह्मणांची. त्यांचे प्रमाण 18 टक्के आहे. काँग्रेसकडे प्रभावी ब्राह्मण नेता नाही. भाजपमध्ये शांताकुमार आहेत. पक्षाने त्यांना निवडणूक समितीचे अध्यक्ष केले आहे. ब्राह्मण मतदारांची मते मिळविण्यास त्यांच्या प्रभावाचा उपयोग होऊ शकेल.

निवणुकीत विजयी होण्यासाठी दलितांची मते मिळवायला हवीत याची जाणीव काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना आहे. दलित मतदार 25 टक्के  असून 16 टक्के  इतर मागास जमातींचे आहेत. त्यात 12 टक्के प्रमाण गुज्जर व गद्दी जातींचे आहे. त्यांना सवलती देऊन त्यांची मते मिळविण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री धुमल यांनी केला आहे. दलितांमध्ये कोळी जातीचा प्रभाव असून त्यांची मते मिळवून काही जागा जिंकण्यासाठी लोकशक्ती पक्षाचे नेते रामविलास पासवान यांनी आपल्या पक्षाचे उमेदवार उभे करून हिमाचलच्या प्रांतिक राजकारणात प्रवेश करण्याचे प्रथमच ठरविले आहे.

भाजप व काँग्रेसचे नेते निर्णायक बहुमताचा दावा करीत असले तरी निवडणूक गुजरातप्रमाणे एकतर्फी न होता चुरशीची झाल्यास या दोहोंपैकी कोणत्याच पक्षास बहुमत मिळणार नाही आणि सरकार बनविण्यास सुखराम यांच्या पक्षाचा पाठिंबा मिळवावा लागेल असा निरीक्षकांचा अंदाज आहे. तशी वेळ येऊ यासाठी सुखराम बरगळून त्यांच्या पक्षाच्या बाकी सभासदांना आपल्या पक्षात घेण्याच्या दृष्टीने काँग्रेस पक्षाचे प्रयत्न चालू आहेत. 

हिमाचल प्रदेशाशिवाय त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या ईशान्य सीमा भागातील तीन राज्यांत निवडणुका व्हावयाच्या आहेत. त्यांपैकी त्रिपुरामध्ये सध्या कम्युनिस्ट राजवट असून त्यांच्या हाती या वेळी सत्ता राहू द्यावयाची  नाही यासाठी सर्व कम्युनिस्टविरोधी पक्षांनी आघाडी स्थापन केली आहे. त्रिपुरातील निववणूक प्रचार मोहिमेच्या बातम्या फारशा आलेल्या नाहीत. ईशान्य सीमा भागातील इतर राज्यांप्रमाणे तेथेही दहशतवादी गटांच्या हालचालींचा प्रभाव आहे. निवडणूक मोहिमेच्या काळात त्यांनी केलेल्या हल्ल्यात  पाचजण ठार झाले. त्यांच्या हालचाली विरुद्ध प्रभावी उपाय योजण्यात सरकार अयशस्वी ठरले आहे. असा विरोधी पक्षांचा आरोप आहे. तर सुरक्षिततेच्या उपायांसाठी केन्द्र आपणास पुरेशी मदत करीत नाही अशी राज्य सरकारची तक्रार आहे. 

मेघालय व नागालँडमधील निवडणुकीसंबंधी विवेचन पुढील अंकात.

Tags: विद्या स्ट्रोकर राज्य निवडणुका 2002 वीरभद्र सिंग नागालँड मेघालय त्रिपुरा हिमाचल प्रदेश वा. दा. रानडे vidya strokar virbhadr singh Nagaland State  Election-2002 Meghaalay Tripura Himachal Pradesh V. D. Ranade weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके