डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

काँग्रेसला जादा जागा तर नाहीच, पूर्वीचे यश टिकविणेही कठीण

निवडणुकीच्या निमित्ताने ज्येष्ठ राजकीय समीक्षक वा. दा. रानडे ‘साधना’त नियमित लिहिणार आहेत. भारतीय राजकारणातील प्रमुख पक्षांचा मागोवा, भारताच्या उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम या चार विमागांतील निवडणुकांचे रागरंग आणि महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, खान्देश, मुंबई, कोकण अशा विविध भागांतील निवडणूक घडामोडी असे या सदराचे तिहेरी स्वरूप असेल. वाचकांना ते उद्बोधक वाटेल असा विश्वास वाटतो.

आकड्यांच्या साम्यामुळे काही गोष्टी लक्षात राहतात. 10 जनपथ, नवी दिल्ली हा सोनिया गांधींच्या निवासस्थानाचा पत्ता वाचला की त्यातल्या दहा आकड्यावरून मला आठवण होते लंडनमधील 10 डाउनिंग स्ट्रीट या ब्रिटिश पंतप्रधानांच्या निवासस्थानाची. भारतात 10 जनपथला लंडनच्या 10 डाउनिंग स्ट्रीटचे महत्त्व येत्या निवडणुकीत येण्याची कितपत शक्यता आहे? सोनिया गांधी काँग्रेसला पुन्हा सत्तेवर आणू शकतील? राजीव गांधींच्या हत्येनंतर पी.व्ही. नरसिंह राव आणि सीताराम केसरी काँग्रेसची घसरगुंडी थांबवू शकले नाहीत, उलट ती वाढतच गेली. राजीव गांधी काँग्रेसचे अध्यक्ष असताना झालेल्या 1991 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 244 जागा मिळाल्या होत्या.

1996 च्या निवडणुकीत त्या 104 ने घटल्या, यातून घराणेशाहीचे वलयच पक्षाला सावरू शकेल आणि पुन्हा सत्तेवर आणू शकेल असे सत्तेशिवाय चैन न पडणाऱ्या काँग्रेस नेत्यांना वाटू लागले. त्यांनी 1998 च्या निवडणुकीच्या वेळी सोनिया गांधींपुढे लोटांगण घालून त्यांना निवडणूक मोहिमेत भाषणे करण्याची विनंती केली. पण नुसतीच भाषणे करण्यात त्यांना समाधान नव्हते. ज्या घराण्यात त्यांनी पंतप्रधान इंदिरा गांधींची सून म्हणून प्रवेश केला त्या घराण्याची देशाला नेतृत्व देण्याची आणि पंतप्रधानपदाची परंपरा आणि वारसा पुढे चालविण्याधी आकांक्षा त्यांच्या मनात निर्माण होऊन त्या उद्देशाने त्यांनी पावले टाकली. आपल्या सभांना होणाऱ्या गर्दीवरून घराणेशाहीच्या वलयाचा प्रभाव त्यांनी अनुभवला. पण 1998 च्या निवडणुकीत त्याच्या मर्यादाही दिसून आल्या, काँग्रेसची पडझड फक्त त्यांनी थांबबिली.

1996 मध्ये काँग्रेसला मिळालेल्या 140 जागा 1998 मध्ये फक्त एकने वाढल्या. पण त्यानंतर चार राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांत कॉँग्रेसने मिळवलेल्या यशाने लोकमत पुन्हा काँग्रेसकडे झुकू लागले आहे आणि सोनियाजींच्या नेतृत्वाखाली पुन्हा सत्तेचे दिवस आपण पाहू अशी, आशा सत्तास्थानाचे फायदे लुटणाऱ्या आमदार-खासदारांना वाटू लागली आणि आता तेराव्या लोकसभेच्या निवडणुकांत काँग्रेस पुन्हा सत्तेवर येण्याची स्वप्ने ते पाहत आहेत. शंकरराव चव्हाणांनी तर 'सोनिया लाट' आपणांस सर्वत्र जाणवत असल्याचे सांगितले. याउलट सोनिया गांधींच्या सभांना गर्दी कमी होऊ लागल्याने त्या अस्वस्थ झाल्या असल्याच्या बातम्याही काही वृत्तपत्रांत आल्या आहेत.

निवडणुकीतील प्रचारकी भाषणांतून आणि बातम्यांतून सत्य पारखूनच घ्यावे लागते. सोनिया गांधींपुढे फार मोठे आव्हान आहे आणि त्यांची आतापर्यंतची कार्यपद्धती पाहता त्यांना त्यात यश मिळण्याचा संभव फार कमी आहे. एक शिस्तबद्ध पक्ष अशी काँग्रेसची पुनर्घटना त्या करू शकलेल्या नाहीत. सोनिया गांधींना वास्तविक राजकारणात रस नव्हता. संजय गांधींच्या अपधाती निधनानंतर राजीव गांधींना आपला वारस करण्याचे इंदिरा गांधींनी ठरविले आणि राजीव गांधी राजकीय कार्यात भाग घेऊ लागले, त्यामुळे त्या नाराज झाल्या होत्या. पण पुढे इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव पंतप्रधान झाल्यावर पंतप्रधानांची पत्नी म्हणून त्यांना राजकारणात रस घ्यावा लागला; पण पतीच्या कार्यात मदत एवढेच त्या सहभागाचे मर्यादित स्वरूप होते.

राजीव गांधींच्या हत्येनंतर मात्र राजकीय कार्यापासून अलिप्त राहावयाचे की त्यात क्रियाशील भाग घ्यावयाचा यातून निवड करण्याची वेळ त्यांच्यावर आली. सात वर्षे त्या क्रियाशील राजकारणापासून दूर होत्या. पक्षाचे नेतृत्व करणे आपणास कितपत जमू शकेल याचा अंदाज त्या घेत होत्या. ज्येष्ठ नेते मंडळी कशा पद्धतीने पक्ष चालवितात त्याचे दुरून निरीक्षण त्या करीत होत्या. यापेक्षा अधिक प्रभावी नेतृत्व आपण काँग्रेसला देऊ शकू असे त्यांना वाटू लागले. त्यांना पुढे आणायला अर्जुनसिंग, प्रणव चौधरी ही प्रभावळ तयार होतीच आणि काँग्रेसचे नेतृत्व त्यांनी स्वीकारले. शरद पवारांसह सर्वांनी त्या वेळी त्यांची स्तुती केली, तेव्हा त्यांचे परदेशीपण पवारांना आठवलं नाही, पण आपली पंतप्रधानपदाची संधी हुकणार असे दिसू लागताच त्यांनी हा प्रश्न उपस्थित करून बंडखोरी केली व वेगळा पक्ष काढला.

पवारांच्या या नव्या पक्षामुळे काँग्रेसच्या यशावर काय परिणाम होईल? ‘‘काँग्रेसमधील फुटीचा फायदा मिळून आम्ही सत्तेवर येणार,’’ असा अंदाज भाजपचे नेते व्यक्त करीत आहेत. तर पवारांना महाराष्ट्रापलीकडे पाठिंबा मिळू शकलेला नाही. काँग्रेसवर त्याचा परिणाम होणार नाही असे काँग्रेस नेते सांगत आहेत, याबद्दल वस्तुनिष्ठपणे एवढाच अंदाज करता येईल की गेल्या वेळी थोड्‌या मतांनी जिंकलेल्या जागा काँग्रेस गमावण्याचा संभव आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसने 17 जागा 10 टक्क्यांपेक्षा अधिक तफावतीने जिंकल्या. त्यामुळे फूट पडली तरी त्या सुरक्षित समजता येतील. काँग्रेसने 54 जागा 5 टक्क्यांच्या प्रमाणात गमावल्या त्या जिंकण्याचा या वेळी पक्षाचा प्रयत्न राहील. 159 मतदारसंघांत काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर होती. त्यातल्या काही जागा अधिक प्रयत्नाने जिंकू शकू असे कार्यकर्त्यांना वाटते.

उमेदवारांची निवड करताना पक्षनिष्ठेला फारसे महत्त्व देण्यात आलेले नाही, त्यासाठी उत्तर प्रदेशातले एकच बोलके उदाहरण द्यावयाचे तर तेथील उमेदवारांच्या यादीत फैजाबाद येथील शिवसेनेचे माजी प्रमुख पवन पांडे यांचे नाव होते. बाबरी मशीद पाडण्याच्या खटल्यातील ते एक आरोपी आहेत. शिवसेना प्रमुखांनी त्यांचा गौरव केला होता, पण पुढे मतभेद होऊन ते शिवसेनेबाहेर पडले. पवारांच्या पक्षात जाण्याचा त्यांचा प्रयत्न होता त्या आधीच काँग्रेसने त्यांना आपल्या पक्षात घेऊन तिकीट दिले. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून खटले चालू असलेल्या तामिळनाडूतील जयललितांच्या अण्णा द्रमुक पक्षाशी युती करून आणि मिनतवारी करून काँग्रेसने 12 जागा तिथे मिळवल्या. अशा भ्रष्ट पक्षाशी युती करण्यास कोणीच विरोध केला नाही इतकी काँग्रेसची नैतिक पातळी खालावलेली आहे. अशा पद्धतीने निवडणूक लढवून काँग्रेसला बहुमत मिळण्याची तर शक्यता नाहीच पण 1998 एवढ्या 141 जागा तरी कांग्रेस जिंकेल की नाही याबद्दल निरीक्षकांना शंका वाटते. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या उमेदवारांना मतदारांनीच पुन्हा निवडून दिले तर मात्र या देशात मतदारांनाच मूल्याधिष्ठित लोकशाही नको आहे असा त्याचा अर्थ लावावा लागेल. पण मतदार असा कौल देतील असे वाटत नाही.

उत्तर भारताची निवडणूक विरोधकांच्या युतीनेच भाजपचा पराभव शक्य

‘उत्तर प्रदेश’ या नावातील उत्तर शब्द त्या राज्याचे भौगोलिक स्थान दर्शविणारा असला तरी आपल्यापुढील प्रश्नांची उत्तरे शोधणे, राज्यातील 'उत्तर' या शब्दाच्या अर्थाने भारतीय जनता स्वातंत्र्यलढ्याच्या काळापासून या देशातील नेत्यांकडे पाहत आलेली आहे. या देशाने देशास चार पंतप्रधान दिले. त्यांनी यापुढील प्रश्न आपापल्या पद्धतीने सोडविण्याचा प्रयत्न केला. काही प्रमाणात त्यांना यश आले. पण नेतृत्वाचा कस कमी होत गेला आणि प्रश्नांची तीव्रता वाढत गेली. हे नेते व त्यांचा पक्ष प्रश्न सोडवू शकत नाही असे दिसून आल्यावर जनतेने त्यांना सत्तेवरून दूर केले आणि केवळ उत्तर प्रदेशातच नव्हे तर उत्तरेकडील पट्ट्यात काँग्रेसने सत्ता गमावली. आता काँग्रेसच देशाला स्थिर सरकार देऊ शकते असा दावा करून सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली पुन्हा सत्तेवर येण्याची स्वप्ने काँग्रेसजन पाहत असले तरी उत्तर भारतातील जनता त्यांना या बाबतीत कितपत साथ देईल याचा वस्तुनिष्ठ आढावा आपणांस येथे घ्यावयाचा आहे.

काश्मीरपासून हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि या भौगोलिक पट्ट्यात येणारे चंदिगढ व दिल्ली हे केन्द्रप्रदेश यांत निरनिराळ्या राजकीय पक्षांचे बळ काय आहे हे आपणांस पाहावयाचे आहे. त्यात उत्तर प्रदेश हे सर्वांत महत्त्वाचे राज्य. लोकसभेच्या सर्वांत जास्त 85 जागा या राज्यात असून त्यामुळे सरकार बनविण्यात येथील खासदार महत्त्वाची भूमिका बजावतात. 1998 च्या निवडणुकीत सोनिया गांधींकडे निवडणूक मोहिमेची सूत्रे होती. तरीही उत्तर प्रदेशात काँग्रेस एकही जागा जिंकू शकली नाही. 1996 साली जिंकलेल्या पाच जागाही तिला टिकविता आल्या नाहीत. मतांचे प्रमाणही 8 टक्क्यांवरून 4 टक्क्यांपर्यंत घसरले. उत्तर प्रदेशात काँग्रेसला काहीही जनाधार राहिलेला नाही याचेच हे निदर्शक आहे.

काँग्रेसने इतर पक्षांशी युती केली तरच काँग्रेस आपले अस्तित्व टिकविण्यापुरत्या काही थोड्‌या जागा मिळवू शकेल. पण इतर पक्ष अशा युतीला तयार नाहीत आणि त्याचा फायदा भाजपला मिळत आहे. 1998 च्या निवडणुकीत भाजपला 52 जागा व 39.1 टक्के मते मिळाली. त्यांच्या मतांत 1996 पेक्षा 5.6 टक्के वाढ झाली. भाजपने जिंकलेल्या जागांपैकी 41 मतदारसंघांत समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांची एकत्रित मते भाजपपेक्षा जास्त आहेत व तसेच आणखी 7 मतदारसंघांत हे दोन पक्ष आणि काँग्रेस यांची एकत्रित मते भाजपपेक्षा जास्त आहेत. त्यांच्या मतविभागणीमुळेच भाजपचा विजय होऊ शकेल, पण यापासून हे पक्ष काही धडा शिकलेले नाहीत. बसपने आपण स्वतंत्रपणे निवडणुका लढविणार असल्याचे जाहीर केले. इतर डाव्या पक्षांचीही युती नाही, त्याचा फायदा भाजपला मिळणार आहे. पण पक्षातील फूट आणि कल्याणसिंग सरकारबद्दलची नाराजी यांमुळे भाजपच्या मतांत घट होण्याची शक्यता आहे, तसेच भाजपविरोधकांची युती नसल्याने जागा मिळण्याच्या दृष्टीने त्याचा फारसा उपयोग होण्याचा संभव नाही.

उत्तर प्रदेशच्या तिकीटवाटपात काँग्रेसने तेथील माजी शिवसेनाप्रमुख पवन पांडे यांना तिकीट दिल्याची बातमी इंडियन एक्स्प्रेसने प्रसिद्ध केली. सोनिया गांधींच्या निदर्शनास ती बातमी येताच त्यांनी लागलीच ते नाव काढण्याच्या सूचना भोरच्या दौऱ्याला जाण्यापूर्वी दिल्या. प्रसिद्ध झालेली बातमी निराधार व खोडसाळ असल्याचा सारवासारवीचा खुलासा काँग्रेसचे प्रवक्ते अजित जोगी यांनी केला; पण बातमी साधार असल्याचा दावा एक्स्प्रेसने केला. पांडे यांना काँग्रेसमध्ये आणण्याचे प्रयत्न गेल्या वेळचे अमेठीतील काँग्रेस उमेदवार सतीश शर्मा यांनी केले आणि सुलतानपूरला येत्या 20 ऑगस्टच्या सभेत त्यांचा रीतसर काँग्रेस प्रवेश व्हावयाचा होता.

बाबरी मशीद पाडण्याचा कट शिवसेना व भाजपने कसा केला हे त्यांनी आपल्या भाषणातून सांगावे, त्याचा काँग्रेसला प्रचारात उपयोग होईल या उद्देशाने त्यांना काँग्रेसप्रवेश दिल्याचे समर्थन करण्यात येत आहे. पण या पक्षांतरामागील पवन यांचा संधिसाधू उद्देश त्यामुळे समर्थनीय ठरत नाही. बिहार हे दुसरे मोठे राज्य. तेथे लोकसभेच्या 54 जागा आहेत. या राज्यात लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल पक्षाचे सरकार आहे. 1998 च्या निवडणुकीत राजदशी समझोता केल्याचा फायदा काँग्रेसला मिळाला.

1996 मध्ये काँग्रेसने स्वतःच्या बळावर निवडणूक लढविली तेव्हा तिला फक्त दोनच जागा मिळाल्या होत्या, त्या 1998 मध्ये पाचपर्यंत वाढल्या आणि मतेही 12.96 टक्क्यांवरून 19.16 टक्क्यांपर्यंत वाढली. हा समझोता या निवडणुकीतही चालू रहाणार असल्याने त्याचा फायदा काँग्रेसला मिळेल. राजमहलची जागा भाजपने 1998 मध्ये अवध्या 1 मतांनी जिंकली आणि काँग्रेसचे थॉमस हंसदा पराभूत झाले. आणीबाणी नंतरच्या 1977 च्या निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती, पण त्या पूर्वीच्या सर्व निवडणुकांत काँग्रेसने नेहमी चांगले यश मिळविले होते. 1981 पासून काँग्रेसची घसरगुंडी सुरू झाली. ती तिला फारशी सावरता आली नाही.

1985 मध्ये काँग्रेसला 4 जागा मिळाल्या होत्या. 1991 मध्ये फक्त एकच जागा मिळाली. 1916 मध्ये 2 व 1998 मच्ये 5 अशा त्या अल्पप्रमाणात वाढल्या. येत्या निवडणुकीतही त्यात फारसा फरक पडण्याची शक्यता नाही. लालूप्रसाद व मुलायमसिंग या दोन यादवांच्या यादवीचा फायदा मिळून भाजपने 1998 मध्ये 39 जागा जिंकल्या आणि ही यादवी अजूनही असल्याने भाजपचे बळ घटण्याची शक्यता फारशी नाही. मध्य प्रदेशात काँग्रेसचे सरकार असले तरी 1998 मध्ये लोकसभेच्या 40 पैकी 30 जागा भाजपने जिंकल्या व कॉँग्रेसला फक्त 10 जागा मिळाल्या. मतदारांना राज्यात भाजपचे सरकार नको असले तरी केन्द्रात मात्र भाजपला अनुकूल कल दिसून आला व येत्या निवडणुकीत त्यात फारसा फरक पडण्याचा संभव नाही.राजस्थानात मतांच्या दृष्टीने काँग्रेस आणि भाजप जवळजवळ तुल्यबळ असले तरी काँग्रेसला पाठिंबा वाढत असल्याचे आणि भाजपचा कमी होत असल्याचे मतदानाच्या आकड्यांवरून दिसून आले. भाजपला 1996 मध्ये 42.36 व 1998 मध्ये 45.02 टक्के मते मिळाली तर काँग्रेसला 1996 मध्ये 40.51 टक्के मते होती ती 1998 मध्ये 4 टक्क्यांनी वाढून 44.43 टक्के झाली. हाच कल चालू राहिला तर राजस्थानात काँग्रेस या वेळी थोड्या अधिक जागा मिळवू शकेल.

हरियाणामध्ये विधानसभा बरखास्त करायला लावण्याचे काँग्रेसचे डावपेच यशस्वी झाले नाहीत व बन्सीलाल सरकारने राजीनामा दिला. त्यांच्या हरियाना विकास पक्षात फूट पडून त्यातील बंडखोर गटाच्या व भाजपच्या पाठिंब्याने चौटाला यांनी नवे सरकार बनविसले. चौटालांच्या पक्षाचा भाजपशी समझोता आहे. याशिवाय हरियाणा विकास गटातील बंडखोर गटाच्या पाठिंब्याने भाजप लोकसभेत या वेळी हरियाणात अधिक जागा मिळवण्याचा संभव आहे. पंजाबमध्ये अकाली दल आणि भाजप युती येत्या निवडणुकीतही कायम असून 1998 प्रमाणे अकाली दलास 8 व भाजपास 3 जागा मिळतील असा त्यांच्या नेत्यांचा अंदाज आहे.

अकाली दलात फूट पडून तोहरांनी वेगळा पक्ष काढला असला तरी त्याला फारसा पाठिंबा असल्याचे दिसत नाही. या पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसशी समझोता केला आहे, त्यामुळे या दोन पक्षांना एक दोन जागा मिळतील. अकाली दलाची एखादी जागा कमी होईल. काँग्रेसलाही एखाददुसरीच जागा मिळू शकेल असा अंदाज करण्यात येत आहे. हिमाचल प्रदेशात काँग्रेस व भाजप यांच्यातच लढत आहे. लोकसभेत या राज्याला चारच जागा असल्या तरी निर्णायक बहुमताच्या दृष्टीने एकेक जागा जिंकण्याला महत्त्व येणार असून एकेक जागा चुरशीची ठरणार आहे. काश्मीरमध्ये लोकसभेच्या 6 जागा, तर मुख्यमंत्री फारुक अब्दुल्लांची नॅशनल कॉन्फरन्स भाजपच्या आघाडीत सामील झालेली आहे. याच वेळी काँग्रेसमधून बाहेर पडून मुफ्ती महमद सैद यांनी वेगळा पक्ष काढला आहे.

काश्मीरप्रश्न सोडविण्यासाठी दहशतवादी गटांशी बिनशर्त वाटाघाटी कराव्या अशी त्यांची सूचना असून तिला पाठिंबा मिळत आहे. या फुटीमुळे काँग्रेसला निवडणूक जिंकणे कठीण जाणार आहे. असे हे उत्तर भारतीय निवडणुकीचे आजचे चित्र आहे. भाजपविरोधी पक्षांनी समझोता केला तर ते भाजपचा पराभव करू शकतील. पण त्यांच्यातील मत विभागणीचा फायदा गेल्या वेळेप्रमाणे या वेळीही भाजपला मिळेल. वाजपेयी सरकारविरुद्ध नाराजी असली तरी विरोधकांच्या मत विभागणीमुळे आपल्या जागा आपण टिकवू असे भाजपला वाटते, परिस्थिती निवडणुकीपूर्वीच्या शेवटच्या आठवड्यात अधिक स्पष्ट होईल, पण चित्र फारसे बदलण्याचा संभव नाही.

महाराष्ट्रातील निवडणूक : मुंबई व कोकणात शिवसेनेच्या बालेकिल्ल्यास आव्हान

लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी होणार असल्याने महाराष्ट्रातील लढती या वेळी विशेष चुरशीच्या होतील. मुंबई व कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ हे राज्याचे चार भौगोलिक विभाग. त्यांपैकी मुंबई व कोकणातील निवडणूक लढतीचा आढावा येथे घ्यावयाचा आहे. मुंबईचे 6 व कोकणचे 5 असे 11 लोकसभा मतदारसंघ आणि त्यांच्या अंतर्गत विधानसभेचे 65 मतदारसंघ या विभागात येतात. मुंबई व कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला. 1998 च्या निवडणुकीत काँग्रेसने या बालेकिल्ल्यास हादरा दिला.

मुंबईच्या 6 जागांपैकी शिवसेनेस 3, भाजपला 1 आणि काँग्रेसला 2 जागा मिळाल्या. कोकणातही पाचपैकी एक जागा शिवसेनेने गमावली. महाराष्ट्रातील इतर भागांच्या तुलनेने मुंबई व कोकणात शिवसेनेस बसलेला हा हादरा मोठा नव्हता. पण युती सरकारच्या कारभाराविरुद्ध जनतेत मोठा असंतोष असून युतीविरुद्ध आपला स्पष्ट कौल जनता या वेळी दर्शवण्याचा संभव आहे. त्यामुळे चित्र पालटू शकेल. मुंबई शहराच्या सहा जागांपैकी तीन जागांसाठी शिवसेनेने रावले, सरपोतदार आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना उभे केले आहे, तर तीन जागा भाजप लढवीत आहे.

मुंबई दक्षिण-मध्यची निवडणूक 1998 मध्ये अत्यंत चुरशीची होऊन शिवसेनेचे रावले यांनी ही जागा समाजवादी पक्षाचे लोखंडवाला यांच्याविरुद्ध अवघ्या 152 मतांनी जिंकली. त्या वेळी काँग्रेस व समाजवादी पक्ष यांची युती होती. या वेळचा महत्त्वाचा बदल म्हणजे काँग्रेस पक्षात फूट पडली आहे. पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी समाजवादी पक्षाने युती केली आहे. काँग्रेसच्या फुटीचा फायदा मिळवून आपण जिंकू असे शिवसेनेस वाटते. पण युतीच्या कारभाराविरुद्ध असंतोषामुळे शिवसेनेच्या मतात घट होऊन तिचा पराभव होण्याचीही शक्यता आहे. मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात शिवसेनेचे मधुकर सरपोतदार, समाजवादी पक्षाचे तुषार गांधी यांच्याविरुद्ध 19223 मतांची आघाडी मिळवून 1998 मध्ये विजयी झाले.

काँग्रेसमधील फुटीमुळे एवढी तफायत भरून काढणे शिवसेनेविरुद्ध उभ्या असलेल्या कोणत्याही उमेदवारास कठीण जाईल आणि सरपोतदार सहज जिंकतील असा त्यांच्या गोटातील अंदाज आहे. पण युती सरकारविरुद्ध नाराजीमुळे शिवसेनेच्या मतातच घट झाली तर त्यांना निवडणूक जिंकणे कठीण जाईल. शिवसेनेची तिसरी जागा मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघाची. 1998 मध्ये रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले आणि शिवसेनेचे नारायण आठवले या दोघा आठवल्यांमधील सामन्यात रामदास आठवले यांनी चौदा हजारांवर मतांची आघाडी मिळवून बाजी मारली. या वेळी शिवसेनेने उमेदवार बदलला असून नारायण आठवले यांच्या जागी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना उभे केले आहे.

मनोहर जोशी त्यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या व गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे मतदारांत अप्रिय झाले आहेत. काँग्रेसमधील फुटीमुळे काही प्रमाणात मत विभागणी झाली हे गृहीत धरले तरी त्यांनी निवडणूक जिंकणे कठीण आहे. पण रामदास आठवले यांचा विजयही सोपा नाही. कारण रिपब्लिकन पक्षात फूट पडली असून आंबेडकर गट व गवई गटाने काँग्रेसबरोबर समझोता केल्याने त्यांच्या समर्थकांची मते आठवले यांना मिळणार नाहीत. मुरली देवरा मुंबई-दक्षिण मतदारसंघात 21065 मतांच्या आघाडीने विजयी झाले.

समाजवादी पक्षाशी युती असल्याने त्यांना मुस्लीम आणि रिपब्लिकन पक्षाशी युतीने दलित मते मिळाली; पण या वेळी समाजवादी पक्षाने पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी युती केली आहे. तसेच रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाने पवारांच्या पक्षाशी युती केली आहे. त्यामुळे या वर्गाची मते फुटण्याचा तसेच काँग्रेसचीही मते फुटण्याचा संभव असून देवरांना निवडणूक जिंकणे कठीण जाईल. मुंबई ईशान्य मतदारसंघात काँग्रेसचे गुरुदास कामत, भाजपचे प्रमोद महाजन यांच्याविरुद्ध 1998 च्या निवडणुकीत 55 हजार मतांची आघाडी मिळवून विजयी झाले होते. फुटीने काही मते विभागली तरी एवढी तफावत महाजन भरून काढू शकणार नाहीत.

मुंबई उत्तरमध्ये केन्द्रीय रेल्वे राज्यमंत्री राम नाईक भाजपतर्फे उभे आहेत. 1998 च्या निवडणुकीत काँग्रेसचे राम पडांगळे यांच्याविरुद्ध 55 हजार मतांची आघाडी त्यांनी मिळवली होती. काँग्रेसमधील फुटीमुळे काँग्रेसची मते वाढण्याऐवजी विभागली जातील आणि राम नाईक यांना निवडणूक जिंकणे सोपे जाईल. तसेच वाजपेयी राजवटीच्या कारभाराबद्दल जनतेत नाराजी असली तरी व्यक्तिशः राम नाईक यांनी चांगले कार्य केले अशी त्यांची प्रतिमा जनमानसात आहे. 

असे हे मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांचे प्राथमिक चित्र. यावरून रावले यांची व मनोहर जोशी यांची जागा जिंकणे शिवसेनेस कठीण जाईल असे दिसते. राम नाईक यांची जागा भाजपास खात्रीची वाटते. काँग्रेसचे देवरा व गुरुदास कामत यांना मुख्य लढत पवारांच्या पक्षाशीच द्यावी लागणार असून पवारांना मुंबईत किती पाठिंबा आहे याची कल्पना येण्याच्या दृष्टीने या निवडणुका चुरशीच्या आहेत. कोकणच्या पाच मतदारसंघांपैकी काँग्रेस नेते बॅ. अंतुले यांचा बालेकिल्ला समजली जाणारी कुलाब्याची जागा शे. का. पक्षाचे रामशेठ ठाकूर यांनी 9126 मतांच्या आघाडीने जिंकली होती.

शिवसेनेच्या उमेदवाराला अंतुले यांच्यापेक्षाही 31 हजार मते कमी पडली होती. ठाकूर या जागेसाठी पुन्हा उभे आहेत. अंतुले यांचा या मतदारसंघातील प्रभाव कमी झालेला असून ते जागा बदलून औरंगाबादेतून उभे रहाण्याचा विचार करीत असल्याची बातमी आहे. कोणीही प्रतिस्पर्धी असला तरी आपण जिंकू असा ठाकूर यांना आत्मविश्वास वाटतो. शेकाप व पवारांचा पक्ष यांच्यात युतीसंबंधात काही मतभेद असले तरी ठाकूर यांना पवारसमर्थकांचा पाठिंबा मिळणार आहे. ठाणे जिल्ह्यातील ठाणे व डहाणू या दोन मतदारसंघांपैकी ठाण्याची जागा शिवसेनेचे प्रकाश परांजपे यांनी समाजवादी पक्षाच्या चंद्रिका केनिया यांच्याविरुद्ध 2 लाख 49 हजार मतांची आघाडी मिळवून 1998 मध्ये जिंकली.

परांजपे पुन्हा उभे आहेत आणि प्रतिस्पर्धी कोणीही असला तरी त्याला त्यांच्याशी सामना देणे कठीण जाणार आहे. डहाणू ही ठाणे जिल्ह्यातील आदिवासी राखीव जागा काँग्रेसने 1998 मध्ये भाजपविरुद्ध 38 हजार मतांच्या आघाडीने जिंकली हे लक्षात घेता या वेळीही आपण ती जिंकू, फुटीचा परिणाम फारसा जाणवणार नाही असा काँग्रेस गोटातील अंदाज आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी व राजापूर या दोन्ही जागा 1998 मध्ये शिवसेनेने जिंकल्या. रत्नागिरीत त्यांचा उमेदवार काँग्रेसविरुद्ध 31 हजार मतांच्या आाडीने विजयी झाला तर राजापूरची जागा शिवसेनेने 65 हजार मतांच्या आघाडीने जिंकली. राजापूरमध्ये मधु दंडवते यांनी पुन्हा उभे राहावे, राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना पाठिंबा देईल असे प्रयत्न करण्यात आले, पण त्यांना होकार मिळालेला नाही. दंडवते यांनी केन्द्रीय मंत्री म्हणून चांगले कार्य करूनही दोन वेळा त्यांचा पराभव झाला त्यामुळे ते पुन्हा उभे राहण्याची शक्यता कमी आहे. कोणीही उभा राहो, राजापूरची जागा शिवसेना टिकवील असा त्यांच्या गोटातील अंदाज आहे. असे हे कोकणातील पाच जागांचे चित्र आहे. त्यांपैकी तीन शिवसेना, एक शेकाप व एक काँग्रेस जिंकण्याची शक्यता दिसत आहे. शेवटच्या आठवड्यात चित्र अधिक स्पष्ट होईल.

Tags: शिवसेना राष्ट्रवादी बसप काँग्रेस भाजपा महाराष्ट्र उत्तर भारत लोकसभा आगामी निवडणूक विश्लेषण राजकीय shivsena rashtravadi bsp congress bjp Maharashtra north india loksabha-vidhansabha upcoming election report political weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके