डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

विरोधी पक्षांतील फूट हेच भाजपाचे बळ

भाजप मित्रपक्षांशी युती केल्याशिवाय दिल्लीतील सत्ता मिळवता येणार नाही ही जाणीव 1991च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजप नेत्यांना झाली. या युतीमुळे या पक्षाच्या जागा 119 वरून 161 पर्यंत गेल्या. पण मतांचे प्रमाण सारखेच राहिले (20.19 टक्के) याचा अर्थ पाच वर्षांत भाजपचा पाठिंबा वाढला नाही. हिंदुत्ववादी शक्तींचे बळ आणखी वाढू द्यायवे काय याचा कौल मतदारांनीच द्यायचा आहे.

स्वातंत्र्याच्या 51व्या वर्षात भारतीय जनता पक्ष या हिंदुत्वनिष्ठ विचारप्रणालीच्या पक्षाने दिल्लीची सत्ता मिळविली ही देशातील धर्मनिरपेक्षवादी आणि डाव्या समाजवादी शक्तींची सर्वांत मोठी पिछेहाट आहे. भाजपला हे यश कसे मिळाले आणि येत्या निवडणुकीत तो ते टिकविण्यात यशस्वी होईल का?

पाठिंब्यात वाढ नाही

प्रथम हे लक्षात घेतले पाहिजे की भाजप एकट्याच्या बळावर दिल्लीची सत्ता मिळवू शकत नाही. मित्रपक्षांशी युती केल्याशिवाय आपण हे यश मिळवू शकणार नाही. 1996च्या लोकसभा निवडणुकांच्या निकालांनी भाजप नेत्यांना ही जाणीव करून दिली. या निवडणुकीत भाजपला 19 जागा व 20 टक्के मते मिळाली. यानंतर मित्रपक्षांशी युतीच्या प्रयत्नांना त्या पक्षाने सुरुवात केली. या युतीचे दोन टप्पे होते. एक निवडणुकीपूर्वीची युती आणि निवडणुकीनंतरची युती.

निवडणुकीपूर्वीच्या युतीनुसार निर्णायक बहुमत मिळू शकले नाही. 1991 व 1996 या दोन निवडणुकांत भाजपच्या जागा 119 वरून 161 पर्यंत वाढल्या, पण मतांचे प्रमाण 20.80  20.29 टक्के असे जवळजवळ सारखेच होते, याचा अर्थ या पाच वर्षांत भाजपला मतदारांचा पाठिंबा वाढला नाही, तरीही तिच्या जागा मित्रपक्षांशी युती करून मतविभागणी टाळल्याने वाढल्या. हेच धोरण भाजपने 1998 च्या निवडणुकीत चालू ठेवले. त्यामुळे भाजपच्या जागा 16 ने वाढून 177 झाल्या आणि मते पाच टक्क्यांनी वाढून 25 टक्के झाली. मित्रपक्षांसह भाजप युतीस 252 जागा मिळाल्या. त्यात अण्णा द्रमुक 18, समता पक्ष 12, बिजू जनता दल 9, अकाली दल 8, तृणमूल काँग्रेस 7, शिवसेना 6, डी.एम.के.4, लोकशक्ती 3, हरियाणा विकास पक्ष 1, जनता पक्ष 1, अशी त्यांची विभागणी होती. याशिवाय निवडणूक निकालानंतर हरियाणा लोकदलाच्या 4 व 2 अपक्ष यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला, त्यानंतर आता तेराव्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी काय परिस्थिती आहे? जयललितांचा अण्णा द्रमुक पक्ष या युतीतून बाहेर पडला आणि याऐवजी करुणानिधींचा द्रमुक पक्ष युतीत सामील झाला. बाकी काही फरक पडला नाही.

आता आणखी कोणते पक्ष आघाडीत आणता येतील यासाठी फर्नांडिस व हेगडे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे जनता दलाच्या शरद यादव गटाचा पाठिंबा भाजप आघाडीला मिळाला आहे. आघाडीचे बळ त्यामुळे खरोखर वाढणार आहे का याबद्दल भाजपमध्येच संघर्ष निर्माण झाला होता. कर्नाटक शाखेचा यास विरोध होता. जनता दलाच्या पटेल सरकारच्या धोरणांना व निर्णयांना गेली साडेचार वर्षे आम्ही तीव्र विरोध केला आणि आता त्यांना आघाडीत येऊन त्यांच्याबरोबर काय करायचे ? या अप्रिय पक्षांचे लोढणे कशाला गळ्यात अडकवून घ्यावयाचे असे त्यांना वाटते; पण समता पक्ष, लोकशक्ती पक्ष आणि जनता दलाच्या कर्नाटकातील पटेल गट यांची युती घडवून आणण्याचाच आमचा निर्णय ठाम व न बदलणारा आहे.

आमचा पाठिंबा भाजप आघाडीलाच राहील; पण भाजपच्या केंद्रीय नेत्यांना हे पसंत नसेल तर आम्ही आघाडीबरोबर बाहेर पडू असा इशारा फर्नांडिस, हेगडे यांनी दिला; तेव्हा जनता दताच्या तीन गटांच्या या युतीस मान्यता देण्यात आली व कर्नाटक शाखेनेही अखेर नाखुशीने मान्यता दिली. जयललितांचा पक्ष बाहेर पडल्यानंतर भाजप आणि आघाडीत आणखी फूट भाजपच्या नेत्यांना नको होती. 

फर्नांडिस यांचा उद्देश

जनता दलाचे हे विविध गट एकत्र आणण्यात फर्नांडिस यांचा उद्देश भाजप आघाडीत मित्रपक्षांतीत सर्वांत मोठा गट निर्माण कराण्याचा आहे. सरकारच्या व आघाडीच्या धोरणावर या गटाच्या बळावर आपण अधिक प्रभाव पाडू शकू, तसेच अधिक मंत्रिपदे, अधिक अधिकारपदांचर दावा सांगता येईल अशी अपेक्षा असू शकेल. भाजप नेत्यांनाही याची कल्पना आहे. ते या गटास डोईजड होऊ देणार नाहीत. भाजपचे बळ वाढले ते मुख्यतः कर्नाटक, ओरिसातील जनता दलाच्या फुटीमुळे. रामकृष्ण हेगडे यांनी जनता दलातून फुटून काढलेल्या लोकशक्ती पक्षाला 13 जागा व भाजपास 3 जागा मिळाल्या.

भाजप युतीने याप्रमाणे 16 जागा जिंकल्या आणि जनता दलास अवघ्या तीन जागा मिळाल्या आणि मते 21.7 टक्के मिळाली. 1996 मध्ये या पक्षाने कर्नाटकात 34.9 टक्के मते मिळविली होती. राज्यात जनता दलाचे सरकार असून त्याचीही पिछेहाट झाली. ओरिसात तर जनता दलाला एकही जागा मिळाली नाही. बिजू जनता दलाने 9 जागा जिंकल्या व त्याच्याशी युती करून भाजपने 7 जागा मिळविल्या. दोन पक्षांच्या या युतीने 21 पैकी 16 जागा जिंकल्या. असाच फायदा गुजरातमध्येही मिळाला. तेथे लोकसभेच्या 26 जागांपैकी भाजपने 19 जिंकल्या.

काँग्रेसला 7 मिळाल्या. जनता दलास एकही मिळाली नाही. भाजपचे 42 टक्के खासदार उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन राज्यांतून निवडून आते. उत्तर प्रदेशात 85 पैकी 57 जागा जिंकल्या, त्या 1996 पेक्षा पाच जागा जास्त असल्या तरी आपण 65 जागा मिळवू, या भाजपच्या अपेक्षेपेक्षा त्या कमी होत्या. मतांमध्ये तीन % वाढ झाली. 1998 मध्ये 33.5 टक्के मते होती ती 36.4 टक्क्यांपर्यंत वाढली. पण या वेळी जागा व मते यांत आणखी वाढ होण्याची शक्यता फारशी नाही. उलट मुख्यमंत्री कल्याणसिंग आणि त्यांचा प्रतिस्पर्धी गट यांच्यातील संघर्षाचा लोकसभा निवडणुकीवरही परिणाम होण्याचा संभव आहे.

विरोधी फुटीचा फायदा 

सप व बसप यांनी युती केली नाही आणि त्यांच्या मतविभागणीचा फायदा मिळून उत्तर प्रदेशात भाजपच्या जागा वाढल्या. सप ला 28.7 बसपला 20.9 टक्के मते मिळाली. त्यांना एकत्रित मते 45.6 असून ती भाजपपेक्षा 13 टक्के जास्त आहेत. चौसष्ट मतदारसंघांत या दोनही पक्षांची एकत्रित मते दुसऱ्या कोणत्याही पक्षांपेक्षा जास्त होती. त्यांची युती असती तर या 64 जागा त्यांनी जिंकल्या असत्या आणि निवडणुकीचे चित्र बदलते असते.

बिहारमध्ये युती करून भाजप आणि समता पक्ष यांच्या मतांच्या प्रमाणात वाढ झालेली नाही हे 1996 व 1998 च्या निकालावरून दिसून येते. भाजपला 1996 मध्ये 20.5, 1998 मध्ये 21.3 टक्के मते मिळाली म्हणजे त्यात एक टक्क्यापेक्षा कमी वाढ झाली. समता पक्षाला 1996 मध्ये 14.4 व 1998 मध्ये 14.6 टक्के मते मिळाली. या दोन पक्षांना मतदारांचा पाठिंबा वाढलेला आणि याचा अर्थ असाच होतो. भाजपला 1996 मध्ये 18 जागा मिळाल्या. त्यात फक्त एका जागेची वाढ 1998 मध्ये झाली.

समता पक्षाच्या जागा मात्र 1 वरून 10 पर्यंत वाढल्या व युतीचा फायदा त्यास मिळाला. महाराष्ट्र व राजस्थानमध्ये भाजपला मोठा हादरा बसला. 1996 मध्ये 48 पैकी 33 जागा मिळविणाऱ्या भाजप-शिवसेना युतीस महाराष्ट्रात 1998 मध्ये फक्त दहा जागा मिळाल्या, त्यात भाजपच्या 4 व शिवसेनेच्या 6 जागा होत्या. युतीच्या मतास मात्र घट न होता थोडी वाढच झाली. मतविभागणी टळली तर भाजपचा पराभव करता येतो हे काँग्रेस-रिपब्लिकन पक्ष युतीने दाखवून दिले. पण या वेळी काँग्रेसमध्ये फूट पडल्याचा फायदा भाजपला मिळण्याचा संभव आहे.

महाराष्ट्राप्रमाणे राजस्थानातही भाजपच्या जागात घट झाली आणि त्या 12 वरून 5 पर्यंत खाली आल्या. या पिछेहाटीची भरपाई भाजपने दक्षिणेत अधिक जागा मिळवून केली. त्यात तामिळनाडूत जयललितांच्या अद्रमुकशी केलेल्या युतीने 31 जागा मिळवल्या, त्यात अण्णा द्रमुकच्या 21 व भाजपच्या 3 होत्या. भाजपला प्रथमच तामिळनाडूत जागा मिळाल्या. पण या वेळी परिस्थिती बदलली आहे. अण्णा द्रमुकने भाजप आघाडीतून बाहेर पडून काँग्रेसशी युती केली आहे. तर करुणानिधीचा द्रमुक पक्ष भाजप आधाडीत सामील झाला आहे. पण द्रमुकला 1998 मध्ये 5 जागा लोकसभेत मिळाल्या होत्या.

दक्षिणेत भाजप युतीस 50 जागा मिळाल्या, त्यात भाजपच्या 20 आहेत. युतीस मते 33.9 टक्के मिळाली, त्यात भाजपची 16.6 टक्के आहेत. केरळमध्ये मात्र भाजपला आतापर्यंत एकही जागा मिळवता आलेली नाही. भाजपला जे यश मिळाले ते मित्रपक्षांशी युतीने आणि भाजपविरोधी पक्षांची मते विभागली गेल्याने. भाजपचे स्वतःचे बळ फारसे वाढलेले नाही. काँग्रेसमधील फूट आणि कारगिलचा विजय याचा फायदा मिळून भाजप आघाडीस स्पष्ट बहुमत या वेळी मिळेल असे भाजपच्या नेत्यांना वाटते. पण कारगिलचा विषय त्यांना फारसा हात देण्याचा संभव नाही. कारण घुसखोरांचा प्रश्न सुटलेला नाही. उलट काश्मीर आणि इतर भागांत हल्ले अजून चालूच आहेत. या बाबतीत आधीपासून झालेल्या गाफीलगिरीच्या आरोपातून भाजप सरकार सुटू शकत नाही. त्यामुळे भाजप आघाडीस स्पष्ट बहुमत या वेळीही मिळण्याचा संभव कमी आहे. 

आजचा भाजप म्हणजे पूर्वीच्या जनसंघातूनच विकसित झालेला पक्ष. 1952च्या पहिल्या निवडणुकीपासून त्याचे बळ कसे वाढत गेले हे दाखविणारा तक्ता पाहा.
लोकसभा निवडणुका

वर्ष               विजयी                  शे.मते

1952              3                     3.10
1957              4                     5.3
1962             14                     6.44
1967             35                     9.3
1971             23                     7.4
1977                     जनता पक्षात विलीन
1980                     जनता पक्षात विलीन
1984               2                     7.4
1989              86                   11.4
1991             119                  20.80
1996             161                 20.29
1998             177                    25

या हिंदुत्ववादी शक्तीचे बळ आणखी वाढू द्यायचे काय याचा कौल मतदारांनीच द्यावयाचा आहे.

----------

पश्चिम महाराष्ट्रात युतीचे बळ फारच कमी

पश्चिम महाराष्ट्रातील मतदारसंघात निरनिराळ्या राजकीय पक्षांचे बळ आणि त्यांपैकी कोण विजयी होण्याचा संभव याचा वस्तुनिष्ठ आढावा येथे घ्यावयाचा आहे. उत्तर, मध्य आणि पश्चिम असे पश्चिम महाराष्ट्राचे तीन उपविभाग करता येतील. मुख्यतः लोकसभा मतदारसंघातील परिस्थितीचाच विचार गेल्या दोन निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तेथे काही निराळे चित्र या वेळी दिसेल का या दृष्टिकोनातून येथे केला आहे. जागेअभावी विधानसभा मतदारसंघासंबंधी विश्लेषण येथे केलेले नाही. या निवडणुकीत लोकांना तीव्रतेने जाणवणाऱ्या प्रश्नांबाबत राजकीय पक्ष काही स्पष्ट भूमिका घेणार आहेत या दृष्टीने विचार करता उत्तर महाराष्ट्रात निराळा जाणवणारा प्रश्न म्हणजे धरणांमुळे बेघर झालेल्या आदिवासींच्या पुनर्वसनाचा. या तिन्ही जिल्ह्यांत आदिवासींची संख्या मोठी आहे.

नर्मदा धरणग्रस्तांच्या प्रश्नावर श्रीमती मेधा पाटकर सध्या आंदोलन करीत आहेत, पुनर्वसनाची व्यवस्था होईपर्यंत ते चालू ठेवण्याचा त्यांचा निर्धार आहे, या बाबत तुम्ही काय केले, करीत आहात, करणार आहात, हा प्रश्न मतदारांनी उमेदवारांना विचारला पाहिजे.

उत्तर महाराष्ट्र : भाजपला एकच जागा 

उत्तर महाराष्ट्रात धुळे, जळगाव आणि नाशिक हे तीन जिल्हे येतात. धुळ्याची जागा काँग्रेसने 1998 मध्ये शिवसेनेविरुद्ध 57 हजार मतांच्या आघाडीने जिंकली. पक्षफुटीने मते विभागली गेली तरीही शिवसेनेला तेथे विजयाची शक्यता नाही.

एरंडोलमध्ये भाजपने 1998 मध्ये काँग्रेसविरुद्ध 14,836 मतांच्या आघाडीने विजय मिळविला, तर या वेळीही काँग्रेसमधल्या फुटीचा फायदा मिळून निश्चित जिंकू असे भाजप कार्यकर्त्यांना वाटते. जळगावची जागा काँग्रेसने गेल्या वेळी 56,814 मतांच्या आघाडीने जिंकल्याने फुटीचा फायदा भाजपला मिळण्याची शक्यता नाही. नंदुरबारमध्येही काँग्रेसने 65,711च्या आघाडीने 1998 मध्ये विजय मिळविला असून फुटीने मते विभागली तरी भाजपला तेथे विजयाची आशा नाही.

नाशिकमध्ये 1 लाख 36 हजारांच्या आघाडीने काँग्रेसने 1998 मध्ये जागा जिंकली असल्याने फुटीचा फायदा शिवसेनेस न मिळता जागा काँग्रेसकडेच निश्चित राहील. गेल्या वेळचे विजयी उमेदवार माधवराव पाटीलच तेये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उभे आहेत. मालेगावमध्येही 61 हजारांची तफावत भरून काढणे भाजपला कठीण असल्याने काँग्रेसकडेच ही जागा राहील. याप्रमाणे उत्तर महाराष्ट्रातल्या सहा लोकसभा जागांपैकी भाजपता फक्त एरंडोलची जागा मिळविणे शक्य होईल व तेथेही 14 हजारांची आघाडी काही फार मोठी नसून विशेष प्रयत्न केला तर तेथेही काँग्रेसला विजय मिळविता येईल.

मध्य महाराष्ट्र : सेनेला फक्त नगरची जागा 

मध्य महाराष्ट्रात पुणे, नगर व सोलापूर हे तीन जिल्हे येतात. पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी. आता तर औद्योगिकदृष्ट्‌याही ते विकसित आहे. तेथील निवडणूक केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे लक्ष वेधून घेते. पुणे शहरात 1998 मध्ये काँग्रेसचे विठ्ठल तुपे यांनी भाजप-सेना पुरस्कृत उमेदवार कलमाडीसारख्या जबरदस्त उमेदवाराचा 93 हजारांच्या आघाडीने पराभव केला. या वेळी ते राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उभे आहेत.

पक्षफुटीमुळे काही मते कमी झाली तरी आपल्या विजयाची खात्री त्यांना वाटते. बारामती शरद पवारांचा बालेकिल्ला. 1998 मध्ये भाजपच्या विराज काकडेविरुद्ध 2 लाख 68 हजार मतांची प्रचंड आघाडी मिळवून ते निवडून आले. मुंबई व औरंगाबादच्या जातीय दंगलीसंबंधांत गुप्त पोलीस अहवालातील नोदींचा उल्लेख करून शंकरराव चव्हाण व भाजपने काही आरोप केले, चौकशीची मागणी केली. पवारांनी न्यायालयात आरोप सिद्ध करण्याचे आव्हान दिले. दोन्ही बाजूंनी केवळ निवडणूक प्रचारापुरते हे आरोप-प्रत्यारोपांचे, आव्हाने-प्रतिआव्हानांचे शाब्दिक युद्ध झाले. त्यांची तड लावण्यासाठी कृती कोणी केली नाही.

खेड मतदारसंघात 1998 मधील विजयी काँग्रेस उमेदवार अशोक मोहोळ या वेळी राष्ट्रीय काँग्रेसतर्फे निवडणूक लढवीत आहेत. शिवसेनेचे बलकवडे यांचा त्यांनी एक लाख एक हजार मतांच्या आघाडीने पराभव केला होता. या वेळी त्यांची चुरशीची लढत होणार आहे ती शिवसेनेपेक्षा सोनिया काँग्रेसचे उमेदवार अनंतराव थोपटे यांच्याशी. भोरमध्ये सोनियाजींची प्रचंड गर्दीची सभा त्यांनी घडवून आपली व आपल्या बाजूने अनुकूल हवा निर्माण केली. तरीही त्यांना निवडणूक जिंकणे कठीण जाईल, सोनियाजींच्या घराणेशाहीच्या वलयाची जनतेवर कितपत पकड आहे याचीही कसोटी लागेल. नगर जिल्ह्यात नगरची जागा शिवसेनेचे बाळासाहेब विखे यांनी काँग्रेसचे दादा पाटील-शेळके यांच्या विरुद्ध 14,561 मतांच्या आघाडीने जिंकली होती. या वेळी दादा पाटील-शेळके राष्ट्रीय काँग्रेसतर्फे उभे आहेत व शिवसेनेशिवाय सोनिया काँग्रेसच्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध लढत आहे. काँग्रेसच्या मतविभागणीचा फायदा मिळून शिवसेना ही जागा टिकविण्याचा संभव आहे.

कोपरगावमध्ये 1998 मध्ये निवडणुकीत काँग्रेसचे प्रसाद तनपुरे भाजपविरुद्ध 30 हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले होते. या वेळी तनपुरे यांच्याऐवजी गुलाबराव शेळके राष्ट्रीय काँग्रेसतर्फे निवडणूक लढवीत आहेत. भाजपशिवाय सोनिया काँग्रेसही लढत असल्याने काँग्रेसची मते फुटली तरी तफावत मोठी असल्याने जागा जिंकण्यांच्या दृष्टीने भाजपला त्याचा फायदा मिळणार नाही.  

सोलापूर जिल्ह्यात सोलापूरची जागा काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपचे चांगदेव यांच्याविरुद्ध एक लाख चार हजार मतांच्या आघाडीने 1998 मध्ये जिंकली. राष्ट्रवादी काँग्रेसविरुद्ध लढत द्यावी लागली व त्यामुळे काही मते विभागली गेली तरी शिंदे यांचा विजय निश्चित आहे. पंढरपूरमध्ये काँग्रेसचे संदिपान थोरात यांनी भाजपाविरुद्ध 27,432 च्या आघाडीने 1998 मध्ये विजय मिळविला. या वेळी तिरंगी लढत झाली तरी भाजपला त्याचा फायदा मिळण्याची शक्यता नाही. मध्य महाराष्ट्रातीक सात जागांपैकी शिवसेनेला याप्रमाणे फक्त नगरची जागा मिळण्याची शक्यता आहे.

दक्षिण महाराष्ट्र : 

राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रीय काँग्रेसमध्ये तुल्यबळ मुकाबला दक्षिण महाराष्ट्रात सातारा, सांगली व कोल्हापूर हे तीन जिल्हे येतात. सातारा जिल्ह्यातील साताऱ्याची जागा अभयसिंहराजे भोसले यांनी 1998 मध्ये शिवसेनेविरुद्ध लाख 81 हजार एवढ्‌या मोठ्या आघाडीने जिंकली होती. पवारांच्या पक्षात ते सामील इाले असले तरी या वेळी ते लोकसभेची निवडणूक लढविणार नाहीत. त्यांच्याऐवजी लक्षणराव पाटील उभे आहेत. तिरंगी सामन्यामुळे काँग्रेसची मते फुटली तरी शिवसेनेस विजयाची शक्यता कमी आहे. 

कराडच्या जागेसाठी निवृत्त सनदी अधिकारी श्रीनिवास पाटील राष्ट्रीय काँग्रेसतर्फे उभे आहेत. एक कार्यक्षम आणि लोकाभिमुख प्रशासक म्हणून ते लोकप्रिय होते. 1998 मध्ये पृथ्वीराज चक्हाण यांनी या मतदारसंघात शिवसेनेचा 1,72,000 मतांनी पराभव केला होता, शिवसेनेला तर यशाची आशा नाहीच, लढत दोन काँग्रेस पक्षांमध्ये होणार आहे. त्यात चव्हाणांविरुद्ध सामना देणे श्रीनिवास पाटील यांना कठीण जाणार आहे. सांगली मतदारसंघात 1998 मध्ये काँग्रेसचे मदन पाटील यांनी भाजपचे अण्णा डांगे यांचा 7 हजार मतांच्या आघाडीने पराभव केला, ते या वेळी राष्ट्रीय काँग्रेसतर्फे उभे आहेत. सोनिया काँग्रेसच्या प्रतिस्पर्ध्यांमुळे तिरंगी लढत झाली तरीही भाजपला ही जागा मिळण्याची शक्यता नाही. 

कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूरची जागा काँग्रेसचे सदाशिवराव मंडलिक यांनी 1998 मध्ये 34  हजारांच्या मताधिक्याने शिवसेनेविरुद्ध जिंकली. या वेळी मंडलिक राष्ट्रीय काँग्रेसतर्फे निवडणूक लढवीत असून सोनिया काँग्रेसच्या उमेदवारामुळे काँग्रेसची मते फुटली तरी शिवसेनेस त्याचा फायदा मिळण्याचा संभव नाही. इचलकरंजीच्या जागेसाठी या वेळी राष्ट्रीय काँग्रेसतर्फे श्रीमती निवेदिता माने उभ्या आहेत. 1998 मध्ये त्यांनी ही जागा शिवसेनेतर्फ लढविली होती आणि काँग्रेसचे आवाडे यांनी 28 हजार मतांनी पराभव केला होता.

शिवसेनेने उमेदवार उभा केला तरी चुरशीची लढत दोन काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचीच होईल. दक्षिण महाराष्ट्रातील पाच मतदारसंघांपैकी एकाही मतदारसंघात शिवसेनेस परिस्थिती अनुकूल नाही. पश्चिम महाराष्ट्रातील 18 मतदारसंघांत दोन-तीन जागांपेक्षा अधिक जागा भाजप-सेना युतीस मिळण्याची शक्यता नाही. दोन काँग्रेस पक्षांमध्ये शरद पवारांच्या पक्षास अधिक पाठिंबा असल्याचे दिसत आहे.

Tags: निवडणूक अंदाज विविध पक्षांचे डावपेच आगामी निवडणुका election predictions राजकीय trics of political parties upcoming elections political weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके