डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आपल्याला सगळंच करायचं असतं... हेही, तेही, तेही आणि तेही... कधी सगळं जमूनही जातं, पण नेहमीच नाही. ‘खूप कामं करते मी... कुणाची मदतच नाही... वेळच मिळत नाही इतर कशाला...’ या सगळ्याच्या आपण इतक्या प्रेमात पडलेल्या असतो, की नवऱ्याला आपण कधी मुलांना सांभाळायची, त्यांचा अभ्यास घ्यायची, वरण-भाताचा कुकर लावायची सवयच लावलेली नसते. अशी छोटीछोटी कामं मुलांकडून कधी करूनच घेतलेली नसतात, आणि मग आपल्याला बनायचं असतं सुपरवुमन! सगळी कामं स्वतः करणारी... ऑफिस आणि घर दोन्ही सांभाळणारी…

‘काय काय करणार... घास घ्यायलाही वेळ मिळत नाही! 

‘घरी कुणी आजारी पडलं की मला वाटतं आपणही आजारी पडावं आणि चार दिवस मस्तपैकी झोपून रहावं... पण आजारी पडायलाही फुरसत नसते.’ 

‘काही आयुष्यच नाही गं राहिलंय ऑफिस आणि घर यांशिवाय...’

‘या आणि अशाच तऱ्हेच्या एक ना दोन, अनेक वैतागवाण्या प्रतिक्रिया आपण आपल्या मैत्रिणींकडून ऐकत असतो. घर आणि ऑफिस सांभाळता सांभाळता त्यांना करावी लागणारी कसरत पहात असतो, त्यांची होणारी तारांबळ अनुभवत असतो. कधी त्यांच्यासाठी चुकचुकत असतो, हळहळत असतो... आणि मनातल्या मनात म्हणत असतो, ‘काय करणार... वुई आर सेलिंग इन द सेम बोट...! आपली परिस्थिती सारखीच आहे!’

चूल आणि मूल यात रमणारी बाई अर्थार्जनासाठी घराबाहेर पडायला लागली... घराबाहेरच्या जगात वावरण्याचा आत्मविश्वास तिला आला आणि मग तिच्या घराबाहेर पडण्याचं कारण केवळ अर्थार्जन उरलं नाही. बुद्धीचा, सर्जनशीलतेचा वापर आणि त्यातून मिळणारं मानसिक समाधान हे उद्देशही तिच्या घराबाहेर पडण्याला जोडले गेले. आता तर असं एकही क्षेत्र नसेल, जिथं स्त्री नाही. पुरुषांची मक्तेदारी मानली जाणारी अनेक क्षेत्रं तिने पादाक्रांत केली आहेत...

सगळीकडे हे आपण वाचत असतो. गेल्या आठवड्यातल्या महिला दिनाच्या निमित्ताने प्रत्येक ठिकाणी याची उजळणी झाली. वेगळ्या क्षेत्रात करिअर करताना यशस्वी ठरलेल्या स्त्रियांचे ठिकठिकाणी सत्कार झाले. कौतुक झाले. त्यांच्यावर अनेक ठिकाणी छापून आलं. खास स्त्रियांच्या मासिकांचे महिला दिन विशेषांक या सगळ्यांमुळे भरभरून वाहिले. या सगळ्याला जोड होती अधूनमधून होणारी संशोधनं, पाहण्या आणि त्यांचे निष्कर्ष, अहवाल यांची. त्यातूनही सगळीकडे स्त्रियांच्या कर्तृत्वाचं. क्षमतेचं खणखणीत नाणं वाजवलं जात होतं. कुणी म्हणत होतं, स्त्री जात्याच पुरुषापेक्षा कणखर असते... शरीरानेही आणि मनानेही. त्यामुळेच ती भरपूर शारीरिक कष्ट करू शकते. त्याचबरोबर संकटांचाही खंबीरपणे सामना करू शकते. मोठ्या संकटात पुरुष कोलमडून जातो, बाई मात्र जिद्दीने त्यातून उभी राहते...

कुणी कौतुक करत होतं तिच्या ‘मल्टिटास्किंग’चं. एकाच वेळी अनेक कामं करण्याच्या, अनेक गोष्टी लक्षात ठेवण्याच्या, अनेक व्यवधानं सांभाळण्याच्या तिच्या क्षमतेचं...

यासाठी फार लांब नकोच जायला, जरा आपली कामं आणि दिवसभरात डोक्यात फिरणारी चक्रं आठवून पहा. पहाटे पाच वाजता गजर होतो, आपण उठतो. उठल्याबरोबर पहिला विचार येतो, ऑफिसमध्ये आज पुढच्या तीन महिन्यांच्या प्लॅनिंगची मीटिंग आहे… काय काय करता येईल... एकीकडे हात काम करत असतात, भाजी चिरून होते, ती फोडणीला जाते... पोळ्या होतात... मुलांना उठवलं जातं... त्यांचं आवरणं, डबे घेऊन त्यांना शाळेत पाठवणं... मग घर आवरणं, स्वत:चं आवरणं.... मधे बेल वाजत असते... कुणीतरी येत असतं... त्यांना हवं ते देणं, हवं ते सांगणं... आवरल्यावर पोटात काहीतरी ढकलणं आणि कधी, कोणत्या गोळ्या घ्यायच्या, ते सासूबाईंना समजावून सांगून बाहेर पडणं... बाहेर पडतो, तेव्हा घर पूर्ण आवरलेलं... स्वच्छ, नीटनेटकं, व्यवस्थित.... आणि ऑफिसमधलं तीन महिन्याचे प्लॅनिंग डोक्यात तयार! 

एखादं गाणं आपण ऐकतो, तेव्हा ते अनेक साऊंड ट्रॅक्सचं मिक्सिंग असतं. आपलं आयुष्यही तसंच असतं. एकाच वेळी अनेक ट्रॅक्स चालू... आपलं आपल्यालाच कौतुक वाटतं... कित्ती करतो आपण!

पस्तिशी उलटून जाते, चाळीशी जवळ यायला लागते आणि मग स्वत:च्या कौतुकाची जागा घ्यायला लागतो वैताग! घरच्या कामात कुणाचीच मदत होत नाही. बरं, ही कामं टाळताही येत नाहीत. घर तर चालायलाच हवं ना! ऑफिसमध्ये जबाबदाऱ्या वाढलेल्या, दिवसेंदिवस जाण्या-येण्याच्या प्रवासाची दगदगही वाढलेली... त्यातून होणारी चिडचीड... आणि मग त्याचा आख्ख्या घरावरही परिणाम आणि स्वत:वरही... आता उफाळून येते स्वत:बद्दलची कीव, कणव.... 

त्यातच येतो महिला दिन, सगळीकडे स्त्रियांची कौतुकं. करिअरिस्टिक स्त्रिया सगळ्या. त्यांना हमखास विचारला जाणारा प्रश्न. ‘घर आणि करिअर, दोन्ही कसं सांभाळता?’

आणि त्यांचं हसतमुख उत्तर, ‘टाइम मॅनेजमेंट! वेळेचं व्यवस्थापन करतो आम्ही, आणि कामांची प्राथमिकता ठरवतो. घरी आमची जास्त गरज असेल तेव्हा ऑफिस मागे सारतो आणि ऑफिसमध्ये अतिशय महत्त्वाचं काम असेल तेव्हा घर... अर्थात आपण ऑफिसला गेला नाही की आपल्या कामांचा चार्ज कुणाकडे तरी देतोच की नाही... तसा तो घरच्या कामांचाही द्यायचा! कधी नवऱ्याकडे, कधी मुलांकडे! दिवसाचे चोवीस तास असतात आणि तेवढ्या वेळात ठराविक कामं करायचीच असतात.... हात तर लागणारच की ती कामं करायला!’

तपशील बदलत असतील, पण बहुतेकींचं उत्तर हेच असतं. आणि नेमका तोच त्यांच्यातला आणि आपल्यातला फरक असतो... आपल्याला सगळंच करायचं असतं... हेही, तेही, तेही आणि तेही... कधी सगळे जमूनही जातं, पण नेहमीच नाही. ‘खूप कामं करते मी… कुणाची मदतच नाही... वेळच मिळत नाही इतर कशाला...’ या सगळ्याच्या आपण इतक्या प्रेमात पडलेल्या असतो, की नवऱ्याला आपण कधी मुलांना सांभाळायची, त्यांचा अभ्यास घ्यायची, वरण-भाताचा कुकर लावायची सवयच लावलेली नसते. झाडांना पाणी घालणं, फर्निचरवरची धूळ पुसणं अशी छोटीछोटी कामं मुलांकडून कधीच करूनच घेतलेली नसतात. आणि मग आपल्याला बनायचं असतं सुपरवुमन! सगळी कामं स्वतः करणारी... ऑफिस आणि घर दोन्ही सांभाळणारी...

दोन्ही सांभाळलं जात असतं... अगदी छान, व्यवस्थित. फक्त आपण रात्री थकून बिछान्याला पाठ टेकतो तेव्हा आपल्या डोक्यात वैताग असतो आणि सकाळी उठतो तेव्हाही वैताग! कधी वाचायला मिळालेलं नसतं, कधी टीव्हीवरचा एखादा आवडता कार्यक्रम पहायला मिळालेला नसतो, कधी गाण्याच्या कार्यक्रमाला जाता आलेलं नसतं... सगळ्याचं कार एकच... भरपूर काम! 

अर्थात शंभर टक्के स्त्रियांना हे आणि हेच लागू पडतं असं नाही. कित्येक जणी घरच्या जबाबदाऱ्या वाटून देऊन स्वत:साठी वेळ काढण्यात यशस्वी होतात. कधी एकट्याच विंडो शॉपिंगला जातात, कधी मैत्रिणींबरोबर ट्रीपला जातात, तर कधी घरचं सगळं नऊ वाजताच आवरून घरातले सर्वजण रात्री बारा वाजेपर्यंत आवडता कार्यक्रम पहात बसतात किंवा चक्क बाहेर फिरायला जातात! पण बहुसंख्य स्त्रियांच्या बाबतीत मात्र....

‘मल्टिटास्किंग’ हे स्त्रियांचं वैशिष्ट्य आहे. शंकाच नाही. स्त्रिया एकाच वेळी अनेक कामं करू शकतात. आपल्या या क्षमतेबद्दल स्वत:चा अभिमानही बाळगायला हवा. पण एका वेळी अनेक कामं करू शकते म्हणून घरातलं प्रत्येक काम स्त्रीच  करेल, असं घरातल्यांनी का गृहीत धरावं? प्रश्न फक्त स्त्रियांनी काम करण्याचा तर आहेच; पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं, घरातल्या इतरांनी त्यांना गृहीत धरण्याचा आहे आणि हे गृहीत धरणं स्वतः स्त्रीला न खटकण्याचा आहे.

ऑफिसमध्ये पोहोचलो की आपण दिवसभरातल्या ऑफिसच्या कामांची प्राधान्यक्रमानुसार यादी करतो आणि एकेक काम झालं की त्यावर टीक करत जातो. घरच्या कामांच्या बाबतीतही आपण असा प्रयोग केला तर... घरातली कामं काही फार बदलत नाहीत, बदलतात ते फक्त त्यांचे तपशील.. 

रोज रात्री घरातल्या सगळ्यांनी बसून दुसऱ्या दिवशीच्या कामांची यादी करा. आपापल्या वेळेनुसार, क्षमतेनुसार कोणी, कधी, कुठली कामं करायची हे ठरवा. जी कुणालाही जमणार नाहीत ती दुसऱ्या दिवसासाठी ठेवा किंवा ती करणं आवश्यकच असेल तर त्यावर कसा मार्ग काढता येईल याचा सगळ्यांनी मिळून विचार करा.... दिवसाच्या शेवटी सर्व कामं झालेली असतील, तीही तुम्हाला फ्रेश ठेवून! 

आणि फक्त तुम्ही ‘सुपर वुमन’ नाही, तुमचं संपूर्ण कुटुंब ‘सुपर फॅमिली’ झालेलं असेल!

Tags: वेळेचं व्यवस्थापन सामाजिक वैशाली रोडे सुपर फॅमिली सुपर वूमन परिघावरून weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके