डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

महात्मा गांधी हे भारतीय जनता पक्षाचे दैवत कधीच नव्हते. या पक्षाच्या परिवाराचे तर ते मुळीच नव्हते आणि गेल्या वर्षीच नथुराम गोडसेने केलेल्या हत्येचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न भाजपच्या सहकारी पक्षाने केला.

30 जानेवारी या महात्मा गांधींच्या निर्वाणदिनी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि देशाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे एक दिवस उपवास करणार आहेत. देशात सौहार्द निर्माण होण्यासाठी हा उपवास आहे. ही बातमी वाचूनच सध्या भारतीयांची मने अस्वस्थ झाल्याशिवाय राहणार नाहीत. महात्मा गांधी हे भारतीय जनता पक्षाचे दैवत कधीच नव्हते. या पक्षाच्या परिवाराचे तर ते मुळीच नव्हते आणि गेल्या वर्षीच नथुराम गोडसेने केलेल्या हत्येचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न भाजपच्या सहकारी पक्षाने केला. गेले काही महिने ख्रिश्चनांच्या प्रार्थना मंदिरांवर गुजरातेत हल्ले झाले आणि ओरिसातील ऑस्ट्रेलियन मिशनऱ्याला, त्याच्या दोन मुलांना जिवंत जाळण्याचा जो प्रकार घडला, त्यामुळे पंतप्रधानांसारखा कविमनाचा आणि सौहार्दाचा आदर्श असा माणूस हवालदिल झाला यात नवल नाही.

भारताची धर्मातीत राष्ट्र म्हणून जी जगभर प्रतिमा होती, ती परदेशस्य मिशनऱ्यांच्या अमानुष हत्येने संपली. यात सर्वांत खेदजनक भाग असा की पंतप्रधानांच्या प्रतिमेला तडे पडतील असे वर्तन त्यांच्याच सहकाऱ्यांकडून सुरू आहे. भाजपचे सहकारी पक्ष बाजूला ठेवू या, माझी तर अशी स्वधारणाच होत चालली आहे की भाजपमधील अडवाणी-ठाकरेंसारख्या हिंदुत्ववाद्यांनाच वाजपेयी पंतप्रधानपदावर राहायला नको आहेत. तसे नसते तर वाजपेयींच्या विचारधारेत न बसणारी आणि राजकीयदृष्ट्या अतिशय गैरसोयीची विधाने अडवाणी-ठाकरे यांनी केली नसती. ते वाजपेयींच्या मुळावरच उठले आहेत असे मला वाटू लागले आहे. बजरंग दलाचा मिशनऱ्यांच्या हत्येशी संबंध नाही, कार्यकर्त्यांना मी चांगला ओळखतो, असे देशाच्या गृहमंत्री अडवाणींनी दुसऱ्या दिवशीच जाहीर करून एका परीने पुढील चौकशीच निकालात काढली आणि आता जॉर्ज फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखालचे तीन सदस्यीय मंडळ ओरिसाच्या दौऱ्यावर असताना भाजपचे अध्यक्ष कुशाभाऊ ठाकरे यांनी बजरंग दलाला या प्रकरणातून आपले प्रशस्तिपत्रक देऊन दोषमुक्त केले आहे.

क्षणभर अडवाणी आणि कुशाभाऊ ठाकरे यांचे म्हणणे सत्य आहे असे गृहीत धरू या, परंतु ही विधाने इतक्या घाईने करण्याचे कारणच काय? दोघेही सरकार पक्षाचे आहेत. एक गृहमंत्री तर दुसरे पक्षाध्यक्ष आहेत. कोणतीही चौकशी सुरू होण्यापूर्वीच बजरंग दल या आपल्या मित्र घटकाला दोषमुक्त करण्यामागे उभयतांची जवळीक आपोआप सिद्ध होते. त्यांच्या लक्षात येत नाही काय? पुन्हा पंतप्रधान त्यांच्या पक्षाचे असले तरी त्यांना एक निष्पक्ष प्रतिमा देशासमोरच नव्हे, तर जगासमोर ठेवणे आवश्यक आहे. पंतप्रधानांना अडचणीत आणणारी विधाने या जबाबदार व्यक्तींनी करणे याचा अर्थ राष्ट्रीय अजेंड्‌यापलीकडचे हे नेते आहेत आपल्या मूळ हिंदुत्ववादी, ख्रिश्चन आणि मुस्लीमविरोधी मनोवृत्तीला चिकटून आहेत. त्यांच्यात काही बदल झालेला नाही आणि त्यासाठी त्यांच्या खऱ्या नेत्यावर एक दिवस सहकाऱ्यांच्या ते चित्तशुद्धीसाठी उपवास करण्याची वेळ आली आहे.

भारतीय जनता पक्षाबद्दल प्रेम नसलेल्या या देशातील लोकांना अटल बिहारी वाजपेयींबद्दल प्रेम आहे, आस्था आहे. ते त्या पदावर टिकावेत असे वाटते. याची कारणेही उघड आहेत. ते प्रखर भ्रष्टाचाराची ओझरती सावलीसुद्धा त्यांच्यावर कधी पडलेली नाही आणि त्यांना त्यांच्या या मुजोर सहकाऱ्यांनी काम करून दिले तर इतका प्रामाणिक आणि कार्यक्षम पंतप्रधान देशाला पुन्हा मिळणार नाही. सर्वांनी आपल्या मिळकतीचे दाखले ठरावीक मुदतीत जाहीर करावेत असे वाजपेयींनी नुकतेच जाहीर केले. कोण त्यांना प्रतिसाद देणार आहे?

सध्याचे राजकीय चित्र असे आहे की, अडवाणी-ठाकरे आणि शिवसेनेचेही ठाकरे या तिघांच्या वर्तनामुळे या सरकारचे सहकारी पक्ष आज ना उद्या त्यांच्यापासून दूर होतील. जॉर्ज फर्नांडिस ओरिसात गेले आहेत. ते आपला अहवाल पंतप्रधानांना देतील. प्रत्यक्ष अहवाल आणि त्या घटनेचे राजकीय गांभीर्य यामुळे जॉर्जना या सरकारातून एक दिवस बाहेर यावेच लागेल. त्यांच्या पक्षाकडे असलेले रेल्वे मंत्रालय मागितले ते चूक असेल, परंतु ते चूक आहे असे कुशाभाऊ ठाकरे जाहीर करतात. यामुळे जॉर्ज संतप्त झाले होते. कारण पंतप्रधानांचा तोही अधिक्षेपच होता.

वाजपेयी गप्प बसतात आणि ठाकरे बोलतात है बेशिस्ती, गैर कार्यपद्धती याचा नमुना होता. रामकृष्ण हेगडेही एक दिवस संगत सोडतील. ममता बॅनर्जी तर रिंगणाबाहेर उभी आहे. शेवट एका संन्याशाच्या राजीनाम्यातून होईल. निर्लोभी वाजपेयी बाहेर येतील. संघ परिवार कदाचित टाळ्याही वाजवील; परंतु तेव्हा त्यांचा सत्तेचा रस्ता कायमाचा बंद झालेला असेल! वाजपेयींना टिकू द्या, हे या लोकांना कितीदा सांगायचे?

(दै. ‘ऐक्य’वरून साभार)

 जे-15, नवप्रभात सोसायटी, हनुमान रोड, विले पार्ले (पूर्व), मुंबई 400 057.

Tags: पक्षप्रतिमा अटल बिहारी वाजपेयी राजकीय image of party atal bihari wajpeyi political weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके