उत्साहानं भरभरून वाहणारी अनेक पत्रं लालजींना त्यांच्या षष्ट्यब्दिनिमित्त आली. प्रत्येकाच्या पत्रातनं लालजींनी दीर्घायुषी व्हावं ही सदिच्छा. पण शब्द शब्दच राहिले! लालजींच्या भिडस्तपणाला, प्रसिद्धिपराङमुख वृत्तीला हा समारोहाचा सोपस्कार जणू मानवला नाही.
उत्साहानं भरभरून वाहणारी अनेक पत्रं लालजींना त्यांच्या षष्ट्यब्दिनिमित्त आली. प्रत्येकाच्या पत्रातनं लालजींनी दीर्घायुषी व्हावं ही सदिच्छा. पण शब्द शब्दच राहिले! लालजींच्या भिडस्तपणाला, प्रसिद्धिपराङमुख वृत्तीला हा समारोहाचा सोपस्कार जणू मानवला नाही.
इतके दिवस हळूहळू शिरकाव केलेल्या रोगानं, षष्ट्यब्दी समारंभानंतर लालजींना पुरतं ग्रासून टाकलं.
हात, पाय, कान, नाक, यांच्यासारखाच शरीराचा एक अवयव झालेली त्यांची सायकल, तिची आणि त्यांची जोडी सुटली. सायकल पोरकी झाली. सायकल आणि लालजींचं हे असं समीकरण. त्या सतत कामात व्यग्र राहाणाऱ्या माणसाला दवाखान्यातल्या पलंगावर पडून राहाणं कोण असह्य होत असेल?
भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला स्वतःच्या प्रकृतीचं तुणतुणं वाजवत न बसता, त्याच्या त्याच्या कामासंबंधीची, घरच्या, दारच्यांची चौकशी करून, चार कौतुकाचे, समजुतीचे शब्द देऊन लालजी परत पाठवत होते.
पण मृत्यू काही थांबला नाही. लालजींनी पण आपल्या सायकलीवर टांग मारावी तसा सहजपणे मृत्यूच्या गळ्यात हात अडकवून निरोप घेतला.
तीन एप्रिल 1979. सत्कारानंतर दोन महिने आणि एकोणीस दिवसांनंतर लालजींच्या निधनाचे वृत्त आले.
वृत्त अनपेक्षित नव्हते. पण वेडी आशा असते ना, तिला वाटत राहिलं काही तरी चमत्कार, नाट्यमय मुक्तता या विलक्षण व्यक्तिमत्त्वाच्या बाबतीत घडून येतील. आणि लालजी वाचतील. पण ते होणे नव्हते. लालजींच्या चिरंजीवांना- उत्तमला-कल्याणहून नंदा नावाच्या मित्राचे सांत्वनपर पत्र आले आहे. हे सांत्वनपर पत्र म्हणावे की स्वगत समजावे?
प्रिय उत्तम,
पत्र लिहायला हीच वेळ होती का?
आम्ही रास्ता पेठेत रहायला येऊन जवळ जवळ 21 वर्षे झाली. आपली मैत्रीही तेवढीच जुनी. आमचे आई-वडील दोघेही बहुतेक घरी नसायचे. माझ्यासकट आपल्या सर्व मित्रांचा मुक्काम तुमच्या घरी असायचा. त्यामुळे तुझे आई- वडील निराळे असे वाटलेच नाही.
माझ्या वडलांच्या निधनानंतर मी लालजींनाच वडीलधारे मानत होतो. माझा कान धरण्याचा हक्क होता असे एक वडीलधारे माणूस आम्हाला पोरके करून गेले आहे.
तात्यांच्या नावामागे कै. लावताना हात थरथरतोय रे!
आणखी काय लिहू! ऊर भरून आला आहे. आईची समजूत कशी घालणार? व समजूत कोणी कोणाची घालायची?
- नंदा
------
लालजींच्या दुःखद निधनाची बातमी ऐकून सुन्न झालो. दुःखाने हळहळलो.......
- मधू दंडवते
---------
महात्माजी म्हणत की महाराष्ट्र हे कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे. या मोहोळात बरे वाईट सर्वच येते. परंतु ज्यांच्यामुळे ते विधान भूषणावह ठरावे, असे जे निवडक कुशल, त्यागी आणि ध्येयप्रवण कार्यकर्ते असावे लागतात, त्यांत लालजींचा समावेश होतो. अविरतपणे श्रमत असताना लालजींना मी गेली पंचवीस तीस वर्षे पहातो आहे.
आणीबाणीत लालजींचे इतर पैलूही प्रत्ययास आले. तुरुंगांत आमच्यासारखे घरची चिंता नसणारे कार्यकर्ते होते. तुरुंगात आम्हाला कसली कमतरता नव्हती, परंतु पुष्कळ असे होते की, ज्यांचे पालकत्व बाहेर कुणीतरी घेणे आवश्यक होते. लालजींनी हे काम मोठ्या वात्सल्याने केल्याचे मी पाहिले आहे. कोणाचे कपडे फाटले, कोणाला काय हवे आहे याची बिनचूक नोंद लालजी घेत. मायेने सर्व पुरवीत.
एरवी फटकळ वाटणारे लालजी, आणीबाणीच्या काळात फार निराळेच जाणवले. महाराष्ट्रात व देशात समाजवादी शक्ती जेव्हा वाढलेल्या दिसतील, तेव्हा ज्यांची आठवण करावी लागेल, त्यांत लालजींचा अवश्य समावेश असेल.
- अनंत भालेराव
---------
13 जानेवारीला लालजींचा सत्कार होता. त्याच दिवशी मला अपघात झाल्याची बातमी त्यांना समजली आणि प्रा. प्रधानांसह स्वारी माझ्या घरी हजर! माझ्या डोळ्यांत अक्षरश: पाणी आले.
म्हटलं, 'आज तुमचा सत्कार, आज तरी निवांतपणानं बसायचंत.' त्यावर म्हणाले, 'तुला अपघात झाल्याचं कळल्यावर मला स्वस्थ कसं रहावेल?'
आणि मला त्यांच्या आजारपणात त्यांना भेटता आले नाही. दरवर्षी अनेक होतकरू मुलांना कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी मार्गदर्शन कर म्हणून त्यांच्या चिठ्ठ्या येत. या वर्षी ते अक्षर दिसणार नाही! ...
-मुकुंद महाजन
Tags: लालजी कुलकर्णी ध्रुवाचा तारा weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या