डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मी कधीच काही प्लॅन केलं नाही. सगळं आपोआपच घडत गेलं. मुझे लिखने का चस्का है और अलग अलग एक्सपिरियन्स लेने का भी. मला सगळं लिहायचं आहे, प्रत्येक प्रकारचे लेखन करायचे आहे- प्रत्येक भाषेतील एक सिनेमा, हर तऱ्हेच्या कागदावर छापल्या जाणाऱ्या कादंबऱ्या. मला सगळं करून पाहायचं आहे. हां, पण सगळं काही मला करता येणार नाही, आयुष्य लहान आणि मार्ग अरुंद आहेत. पण या सगळ्यात मला जे सर्वाधिक प्रिय आहे- गीतलेखन, कॉमेडी व सिनेमा- हे तीनही प्रकार लिहिण्याचा प्रयत्न केलाय आणि हळूहळू त्यात पुढे सरकत आहे आणि खरं तर अजूनही बरंच काही शिकत आहे. त्यात खंड पडलेला नाही.

गीतकार, लेखक, पटकथालेखक, संवादलेखक, स्टँडअप कॉमेडीयन... असे सर्वच कलाप्रकार यशस्वीपणे हाताळत लोकप्रिय, परंतु अर्थगर्भ आशयनिर्मिती करणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणजे वरुण ग्रोवर.. वरुणच्या सिनेसृष्टीतील प्रवासाची सुरुवात झाली 2004 मध्ये. ‘स्टार वन’ या वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या ‘द ग्रेट इंडियन कॉमेडी शो’ या कार्यक्रमासाठी तो लेखन करू लागला, मात्र त्याला खरी ओळख मिळवून दिली ती 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ या सिनेमाच्या गीतांनी. विशेष म्हणजे ‘गार्डियन’ या जगप्रसिद्ध वृत्तपत्राने जगभरातील सर्वोत्तम  100 सिनेमांची यादी नुकतीच प्रसिद्ध केली. त्यात ‘गँग्ज ऑफ वासेपुर’चा समावेश करण्यात आलाय. या सिनेमाला इतक्या उंचीवर पोहोचविण्यात वरुणने लिहिलेल्या 17 गीतांची प्रमुख भूमिका राहिली आहे. पुढे 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दम लगा के हैशा’ या चित्रपटातील ‘मोह मोह के धागे’ या गीतासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळालाय. मात्र इतक्यावरच समाधान मानेल तो वरुण कसला!

अगदी सुरुवातीपासून कथा लिहीत असला तरी, पटकथालेखक म्हणूनही त्याचे नाव चर्चिले जाऊ लागले ते ‘मसान’ या वास्तववादी सिनेमामुळे. काळाची पावले ओळखून त्याने वेबसिरीज या कलाप्रकारातही हात अजमावला. ‘सेक्रेड गेम्स’ या लोकप्रिय वेब-सिरीजचे लेखन वरुणने केलंय. पडद्यामागचा ‘मिडास राजा’ म्हणवण्याइतपत त्यानं मिळालेल्या संधींचं सोनं केलंय. एकीकडे अतिशय संवेदनशीलतेला हात घालणारी गीते आणि पटकथा, तर दुसरीकडे मानवी स्वभावातील विकृतींवर भाष्य करणारी गंभीर स्वरूपाची मालिका... हे दोनही प्रकार वरुणने लीलया हाताळले.

हे कमी म्हणून की काय, म्हणून तो स्टँडअप कॉमेडीही करतो. त्याच्या ‘ऐसी तैसी डेमोक्रॅसी’ नावाच्या कार्यक्रमाचे देश-विदेशांत प्रयोग होतात. इंटरनेटवर त्याचे ‘गंभीर विनोद’ प्रचंड लोकप्रिय ठरताहेत. भारतीय मानसिकता, त्यांमधील विरोधाभास यांचं सूक्ष्म निरीक्षण करणारा वरुण येथील समाजकारण, राजकारण यांच्यावर उपहासात्मक भाष्य करून आपल्याला अंतर्मुख व्हायला भाग पाडतो. आयआयटी ग्रॅज्युएट असलेला हा इंजिनिअर तरुण गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून लेखक बनण्यासाठी मुंबईत आला आणि एकापाठोपाठ उत्तमोत्तम कलाकृतींची निर्मिती करू लागला. दर वेळी असं वाटत राहतं, वरुणचे हे सर्वोत्तम काम आहे. मात्र पुढच्या वेळी तो पूर्वीपेक्षा अधिक उत्तम काम करून दाखवतो. दर्जा आणि सातत्य यांचं मनोरंजनक्षेत्रातील आजच्या काळातील सर्वोत्तम उदाहरण म्हणजे वरुण ग्रोवर.

अशा या हरहुन्नरी अवलिया तरुणाची जडण-घडण, त्याचे मनोविश्व आणि सौंदर्यदृष्टी, लेखनातील प्रेरणा या सर्वांचा वेध घेण्याचा प्रयत्न या मुलाखतीद्वारे करण्यात आलाय...

प्रश्न - वरुण, येत्या जानेवारीत तू वयाची चाळिशी पार करतोयस, पण तुला स्क्रीनवर पाहताना तुझ्या वयाचा बिलकुल अंदाज येत नाही. तुझ्या शिडशिडीत अंगकाठीकडे पाहिलं की, तू 28-29 वर्षांचाच असशील, असं वाटतं. असो. आपल्या मुलाखतीच्या पहिल्या प्रश्नाकडे येतो. तुझा जन्म हिमाचलचा. मात्र डेहराडून-उत्तराखंड आणि लखनौ- उत्तर प्रदेश या ठिकाणीही तू आयुष्याची काही वर्षे व्यतीत केलीस. याचं कारण तुझं शिक्षण होतं, की घरच्यांची नोकरी?

- वडिलांची नोकरी हेच मुख्य कारण होतं. ते मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस अर्थात ‘एमईएस’मध्ये तहहयात कार्यरत होते. त्यामुळे ठरावीक वर्षांनंतर त्यांची बदली होत राहायची. सुरुवातीला हिमाचल, मग डेहराडून, तिकडून लखनौ आणि मग चंदिगड असा बदल्यांचा (आणि सोबतच आमचाही) प्रवास होत राहिला. आम्ही बिऱ्हाड हलवलं की, माझी आई नव्या ठिकाणी शिक्षिकेची नोकरी बरोबर शोधून काढायची आणि प्रत्येक ठिकाणी शिक्षिका म्हणून तिला खूपच सन्मान मिळायचा.

प्रश्न - आई-वडील दोघेही उच्चशिक्षित आणि नोकरदार असल्याने तुझ्या घरी अभ्यासाचे वातावरण असेलच. शाळा-कॉलेजात असताना अभ्यासात तुझी गती कशी होती? तेव्हा मोठा होऊन काय बनण्याचं स्वप्न पाहायचास ?

- बचपन से ही मुझे पढ़ने- लिखने का बहुत शौक था. माझा लहान भाऊ ‘तरुण’ शाळेत कायम पहिला क्रमांक मिळवायचा. तसा मीसुद्धा पहिल्या तीनमध्येच असायचो. आम्ही दोघं भाऊ शालेय पाठ्यपुस्तकांच्या बरोबरीनं बाल-कादंबऱ्या आणि नियतकालिकांचा अक्षरशः फडशा पाडायचो. आणि मोठा झाल्यावर लेखक व्हायचं, हे मी लहानपणीच मनाशी पक्कं केलं होतं; मात्र लेखक होतात कसं, हे मला ठाऊक नव्हतं. बरं मी पडलो लाजाळू, त्यामुळे याविषयी कुणालाही काही विचारलं नाही. एकदा कुठल्यातरी पुस्तकात एक ओळ वाचली होती. ‘चांगले पुस्तक तेच असते, जे वाचताक्षणी आपल्या मनात येतं की, यार या पुस्तकाचे लेखक/ लेखिका आपले मित्र/ मैत्रीण का नाहीत!’ मलाही नेहमी असंच वाटायचं.

मग मी लेखकांच्या नावाकडे लक्ष द्यायला लागलो. त्यापूर्वी,  पुस्तकं ‘जादूई’ वाटायची. असं वाटायचं की, ती अनंत काळापासून अस्तित्वातच आहेत. जणू ती कुणी लिहिलेलीच नसावीत, तर थेट प्रकटच झाली असावीत. मग हळूहळू कळायला लागलं की, पुस्तकं प्रकट व्हायलासुद्धा एक निमित्त लागतं- एक जरिया चाहिये और वो जरिया होता है लेखक.

प्रश्न - आयआयटीमध्ये प्रवेश घेण्याचं स्वप्न कुणाचं नसतं? पण अभ्यासात जेमतेम असणारी मुलं अशा मातब्बर संस्थांच्या प्रवेश परीक्षांना बसायलाही घाबरतात. तू मात्र प्रवेश परीक्षा पास करून आयआयटी बनारस इथे प्रवेश मिळवलास आणि 2003 मध्ये इंजिनिअर बनून आयआयटीतून बाहेर पडलास. या प्रवासाविषयी काय सांगशील...?

- आयआयटीची प्रवेश परीक्षा पास होणं, ही माझ्या आयुष्यातील तोपर्यंतची सर्वांत मोठी अचिव्हमेंट होती. अर्थात आज माझ्या लक्षात येतंय की, मेरिटची ही सगळी संकल्पनाच मुळी पोकळ आहे. मुळात आयआयटीपर्यंत पोहोचण्यामध्ये माझ्या मेहनतीचा जितका वाटा होता, तेवढाच- किंबहुना त्याहून जास्त वाटा- मला मिळालेल्या प्रिव्हिलेजचाही होता. एका मध्यमवर्गीय सवर्ण हिंदू परिवारात जन्म घेणे म्हणजे लॉटरी लागण्यासारखंच असतं. सर्वसामान्य लोकांना मिळत नाहीत, अशा अनेक संधी मला त्यामुळेच मिळत गेल्या. पण तेव्हा माझ्यासाठी तीच मोठी अचिव्हमेंट होती. त्यामुळे प्रवेशपरीक्षा पास झाल्यानंतर 1999 मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग करण्यासाठी मी बनारसला (वाराणसी) आलो. आणि बनारस हिंदू विद्यापीठ व बनारस शहराच्या प्रेमात आकंठ बुडालो. त्या चार वर्षांनी मला आयुष्यभराची नाती, समज आणि आत्मविश्वास दिला. त्या बळावरच तर मी अजूनही टिकून आहे.

प्रश्न - आयआयटीतून बाहेर पडल्यावर तू थेट पुण्यातल्या एका आयटी कंपनीत रूजू झालास. त्या काळात आयटी फिल्डचं तरुणाईला प्रचंड आकर्षण होतं. पैसाही बक्कळ असतो या क्षेत्रात. तू मात्र 2002 ते 2003 अशी जेमतेम एक वर्षच नोकरी करून या क्षेत्राला रामराम ठोकलास. काय घडलं होतं तेव्हा?

- आयआयटीतून पास झाल्यावर मी पुण्यात नोकरी स्वीकारली ते तिथं एफटीआयआय आहे म्हणूनच, शिवाय मुंबई शहर पुण्याजवळ होते हेही एक कारण. मुझे IT की नौकरी का कोई शौक नहीं था और जॉइन करने के बाद तो बची खचि इच्छा भी भस्म हो गयी. केवळ 11 महिन्यांतच नोकरीचा राजीनामा दिला आणि थेट मुंबई गाठली.

प्रश्न - आपल्या मुलाने आयआयटीसारख्या प्रतिष्ठित संस्थेतून शिक्षण पूर्ण केले असेल, तर पालक त्याच्या भविष्याविषयी निश्चिंत होऊन जातात. पण तू तर गलेलठ्ठ पगार, सुखासीन आयुष्य सोडून अनिश्चिततेने भरलेला मार्ग निवडण्याचा निर्णय घेतलास, तेव्हा तुझ्या आई-वडिलांची प्रतिक्रिया काय होती?

- माता-पिताने बचपन से ही अपने रास्ते ख़ुद चुनने की सीख दी है, और हमेशा बड़ी ईमानदारी से इसका हिस्सा निभाया भी है. पुण्यातील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून मुंबईत लेखक बनण्यासाठी जातोय, असं जेव्हा मी वडिलांना सांगितलं; तेव्हा ते अजिबात रागावले नाहीत, ना त्यांनी कुठली शंका घेतली. ‘पुढे कसं होणार? तू नीट विचार केलायंस का?’ असं एकदाही त्यांनी विचारलं नाही. उलट तत्परतेने ते इतकंच म्हणाले, ‘अगर कोई जरूरत हो तो बता देना.’ आईची प्रतिक्रियाही काहीशी अशीच होती. यहाँ एक बार फिर मेरा प्रिव्हिलेज, मेरे जन्म की लॉटरी, मेरे काम आयी।

प्रश्न - महाराष्ट्रातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे आचार्य अत्रे. लेखक, कवी, पत्रकार, शिक्षक, संपादक, राजकारणी, नाटककार, दिग्दर्शक अशा अनेक भूमिका लीलया पेलणारे अत्रे हे उच्च कोटीचे सटायरिस्टही होते. शिव्या ही वाङ्‌मयातील हिंसा असेल तर विनोद ही वाङ्‌मयातील अहिंसा आहे, असे ते म्हणायचे. त्या अर्थाने तू गांधीवादीच भासतोस. तुझे विनोद तसेच तर आहेत. एकूणच कॉमेडी, सटायर आदींविषयीची तुझी स्वतःची फिलॉसॉफी काय आहे?

- विनोदाविषयी माझी समज तयार झाली ती शरद जोशी, हरिशंकर परसाई आणि श्रीलाल शुक्ल या हिंदी साहित्यातील महारथींना वाचून. त्याचं लेखन वाचून व्यंग्य किंवा सटायरविषयीचं माझं आकलन वाढलं. सटायर में एक बहुत गहरा सच, अक्सर कड़वा सच, होना चाहिए जिसे बिना कॉमेडी की मदद की कहना नामुमकिन सा ही हो।  

प्रश्न - ‘आजच्या काळात विनोद हे विरोधकांच्या (लिबरल) हातातील प्रभावी अस्त्र आहे,’ असं गेल्या वर्षी रामचंद्र गुहा आपल्या एका लेखात म्हणाले होते. सध्याची राजकीय परिस्थिती, लोकशाही अशा अनेक गोष्टींवर व्यंग्यात्मक शैलीत भाष्य करणारा तुझा ‘ऐसी तैसी डेमोक्रॅसी’ हा स्टॅण्डअप कॉमेडी शो सध्या प्रचंड लोकप्रिय ठरलाय. देश-विदेशांत जाऊन तू हा कार्यक्रम सादर करतोयस. गुहांच्या विधानाशी तू कितपत सहमत आहेस?

- संकुचित विचारांच्या मंडळींशी-झुंडीशी लढण्यासाठी पुरोगामी/लिबरल मंडळींकडे व्यंग्याशिवाय दुसरे कुठले अस्त्र उरले नसेल, तर ते ही लढाई लढण्यापूर्वीच हरले आहेत असं म्हणावं लागेल. कुठल्याही कलेचा उद्देश समाज-परिवर्तन घडवणे हा नसतोच. कलेचा मुख्य हेतू असतो बदलत्या समाजाचं डॉक्युमेंटेशन करणं, समाजाला आरसा दाखवत त्याची स्तुती किंवा टीका करणं. आपल्या देशातील व संस्कृतीतील विविधता वाचविण्यासाठी असंख्य लोक आपापल्या स्तरावर लढाई करत आहेत. कला फार तर त्यातला छोटासा भाग आहे, असं म्हणता येईल.

प्रश्न - सध्या स्टॅण्डअप कॉमेडी हा कलाप्रकार तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरतोय. हा कलाप्रकार मतभेद व्यक्त करण्याचं एक प्रभावी माध्यम बनलंय. तू आणि तुझ्यासारखी अनेक तरुण मंडळी स्टॅण्डअप कॉमेडीच्या माध्यमातून राजकीय भूमिका उघडपणे घेताना दिसतात. सरकार आणि सत्ताधाऱ्यांवर मुख्य प्रवाहातील माध्यमे बिचकत-बिचकत टीका करत असताना, तुम्ही मंडळी मात्र अतिशय निर्भयपणे व्यंग्यबाण सोडता; हे धैर्य येतं कुठून?

- ही काय आजची गोष्ट नाही. अशी टीकाटिप्पणी कायमच होत आलीय; आपल्या संस्कृतीत विदूषकांची मोठी परंपरा राहिलेली आहेच की! राजाच्या दरबारात एक विदूषक नेहमी असायचा. त्याच्याकडे राजावरही व्यंग्य करण्याची ताकद असायची. वर खुद्द राजाच त्याला पगार आणि सन्मान देऊ करायचा. स्वातंत्र्यानंतर आपल्याकडे हास्यकवी संमेलनाची परंपरा राहिली, जी आजतागायत सुरू आहे. प्रत्येक काळात विदूषक आणि कवी जागल्याची भूमिका निभावतच आलेत. आज तरुणाईमध्ये लोकप्रिय ठरणारे स्टँडअप कॉमेडियन्स याच परंपरेचे वाहक आहेत.

प्रश्न - अच्छा! म्हणून तुझ्या टि्वटर हँडलचे नाव विदूषक आहे तर, मग आम्हाला सांग, या पठडीतील कुठल्या कार्यक्रमांनी तुला सर्वाधिक प्रभावित आणि प्रेरित केले?

- मी सर्वाधिक भारावून गेलो ते दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या जसपाल भट्टी यांच्या ‘फ्लॉप शो’ या मालिकेने. याशिवाय, शेखर सुमन यांचा ‘मूव्हर्स अँड शेकर्स’ हा कार्यक्रमही मला फार आवडायचा. सध्या अमेरिकन  वाहिन्यांवर प्रसारित होणाऱ्या ट्रेव्हर नोव्हा आणि जॉन ऑलिव्हर यांच्या लेट नाईट शोजमधूनही शिकण्यासारखं खूप असतं.

प्रश्न - वरुण, तुझ्या आजवरच्या प्रवासाकडे पाहिलं तर निदा फाजली यांचा एक शेर आठवतो- ‘एक आदमी में छुपे होते है दस-बीस आदमी, जिस को भी देखना हो, कई बार देखना.’ एकीकडे उच्च दर्जाचा सटायरीस्ट, त्याचवेळी उत्तम कथाकार, राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा गीतकार आणि बरेच काही... कसं काय जमून येतं हे सगळं?

- मी कधीच काही प्लॅन केलं नाही. सगळं आपोआपच घडत गेलं. मुझे लिखने का चस्का है और अलग अलग एक्सपिरियन्स लेने का भी. मला सगळं लिहायचं आहे- प्रत्येक प्रकारचे लेखन करायचे आहे. प्रत्येक भाषेतील एक सिनेमा, हर तऱ्हेच्या कागदावर छापल्या जाणाऱ्या कादंबऱ्या. मला सगळं करून पाहायचं आहे. हां, पण सगळं काही मला करता येणार नाही, आयुष्य लहान आणि मार्ग अरुंद आहेत. पण या सगळ्यात मला जे सर्वाधिक प्रिय आहे- गीतलेखन, कॉमेडी व सिनेमा- हे तीनही प्रकार लिहिण्याचा प्रयत्न केलाय आणि हळूहळू त्यात पुढे सरकत आहे आणि खरं तर अजूनही बरंच काही शिकत आहे. त्यात खंड पडलेला नाही.

प्रश्न - राज्यसभा टीव्हीवरील मुलाखतीत तू म्हणाला होतास की- ‘तुझ्यातही उच्चवर्णीय पुरुषी पूर्वग्रह’ आहेत. या पूर्वग्रहांची जाणीव तुला कधी झाली? आणि ते तू यशस्वीपणे दूर कसे केलेस? पूर्वग्रह यशस्वीपणे दूर केलेस, असा दावा मी यासाठी करतोय की, वाराणसीत प्रेतं जाळण्याचे काम करणाऱ्या डोम समाजातील मुलाचे भावविश्व, जातिभेद, अनुभव याचं जिवंत चित्रण तू लिहिलेल्या ‘मसान’ या सिनेमाच्या पटकथेत आलंय. अतिशय वास्तववादी वाटणाऱ्या या सिनेमाला अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत. या प्रवासाविषयी थोडं विस्ताराने सांगशील?

- आपण ज्या घरात, समाजात, जातीत किंवा धर्मात जन्म घेतो, त्या प्रत्येक घटकाचा प्रभाव आपल्यावर खूप खोलपर्यंत असतो. कसंय, विविध प्रकारच्या मिथकांवर आणि श्रद्धांवर (belief) मानवी विश्व आधारलेलं आहे. त्या मिथक आणि श्रद्धांशिवाय हा समज, इथली शांती आणि भ्रामक स्थैर्य (illusion of stability)- सगळंच उद्‌ध्वस्त होऊन जाईल.

पैसा काय आहे? दहा रुपयांच्या नोटेवर लिहिलेले असते, ‘मै धारक को दस रुपये अदा करने का वचन देता हूँ!’ म्हणजेच ती नोट दहा रुपये नसून दहा रुपयांचे वचन आहे. मग खरे दहा रुपये आहेत कुठे? त्यांचं अस्तित्वच नसतं, असतं ते केवळ ते देण्याचे वचन. धर्म, जात आणि लिंगाप्रमाणेच पैसा हीसुद्धा श्रद्धेवर आधारलेलीच व्यवस्था आहे. मात्र या साऱ्या व्यवस्था आपल्या आत रुतून बसतात, खूप खोलवर. बिलिफ सिस्टीममध्ये आपण ज्या स्तरावर आहोत, त्यामुळंच जीवनातल्या अनेक गोष्टी आपल्याला मिळाल्या आहेत; हे जेव्हा हळूहळू कळायला लागतं, तेव्हा तुमचा अहंकार गळून पडायला लागतो. तो गळायलाच हवा. अनेक लोक या परिवर्तनाला विरोधही करतात.

जसं सुरुवातीच्या काळात माझी देखील पक्की धारणा होती की, शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण असणं चुकीचं आहे. कारण आरक्षणाबद्दल न वाचताच, केवळ माझ्या भोवतालातून विरोधाची ही भूमिका स्वीकारली होती आणि त्यावेळी मला या भूमिकेची चिकित्साही करावीशी वाटली नाही. परंतु जसं-जसं तुमच्या विचारांत मोकळेपणा येतो, नवनवीन शंकांनाप्रश्नांना तुम्ही तुमच्या आत येऊ देता; तसतसे अशा धारणा-संकल्पनांचे आंधळेपण खुपायला लागतं... माझ्याही बाबतीत हेच घडलं.

प्रश्न - तुझ्या कॉमेडीमधून गांधीवाद डोकावतो, असं मी वर म्हणालो. मात्र ‘सेक्रेड गेम्स’ ही आजकालची सर्वाधिक चर्चिली जाणारी लोकप्रिय वेबसिरीजही तुझ्याच लेखणीतून साकारलीय. या सिरीजमध्ये हिंसा, शिवीगाळ आणि अन्य अनेक ‘तामसिक’ गोष्टी पाहायला मिळतात. सात्त्विक स्वभावाच्या वरुणचा अशा प्रकारच्या लेखनातही हातखंडा कसा?

- तमस और उजाला... अंधकार आणि प्रकाश या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एकाचे अस्तित्व असेल, तरच दुसऱ्याच्या असण्याला अर्थ आहे. आणि हो, ज्या गोष्टीमध्ये कुठल्याही प्रकारच्या अभ्यासाला  वाव दिसतो, ती गोष्ट करून पाहायला मला आवडते. विक्रम चंद्रा यांच्या ‘सेक्रेड गेम्स’ या कादंबरीमध्ये अशाच अनेक वैशिष्ट्यपूर्ण थीम्स होत्या... जिनसे भिड़ने का मन किया तो हम कूद गए!

प्रश्न - आता प्रत्येकाला अगदी अल्प दरात रोज एक-दोन जीबी डेटा मिळू लागलाय. त्यामुळं इंटरनेटचं खऱ्या अर्थाने लोकशाहीकरण झाले आहे. तू इंटरनेटचा सुरुवातीचा काळ पाहिला आहेस. जेव्हा अगदी मोजक्या लोकांकडे ही सुविधा उपलब्ध होती, तेव्हापासून तू सार्वजनिकरीत्या इंटरनेटशी जोडला गेलास... आणि अगदी अलीकडे ‘इंटरनेट आणि आपण’ याविषयीचा तुझा एक स्किटही चांगलाच लोकप्रिय ठरलाय. सोशल मीडिया आणि व्हर्च्युअल स्पेसमुळे सामाजिक व्यवहारांमध्ये काय बदल जाणवतात तुला?

- जग जवळ आलंय ते इंटरनेटमुळे. जग जवळ आलंय पण लोकांच्या मनातली भीतीही वाढलीये. आता अगदी जगातल्या एका टोकावरील निर्वासितांचा प्रश्नही आपल्या दाराशी आल्याचा भास होतोय आणि मग तुमच्या आमच्यातील या भीतीचा वापर करत स्थानिक नेते लोकांना विभागण्याचं कामही करू शकतात.. याउलट, दूरवरचं दु:खही आपल्याला आपलंच वाटू शकतं. अमेरिकेतील एखाद्या शाळेतील गोळीबाराचे फोटो पाहून आपल्यालाही रडू कोसळतं. सद्य:स्थितीत जग एका हायपर-इमोशनल स्टेट म्हणजेच अति- भावनिक अवस्थेतून जात आहे. सब कुछ बहुत तेजी से हो रहा है और बहुत गजब की इंटेन्सिटीसे. या गदारोळातच हवामान बदलासारख्या समस्या आपला फासा टाकून म्हणताहेत, ‘आओ बेटा, ये बाजी भी हार लो!’

असं असलं तरी कलेसाठीचा हा सर्वोत्तम काळ आहे. प्रत्येक संकट कलेला अधिक सशक्त करते, मात्र जगासमोरच्या अडचणीही वाढवून ठेवते.  

प्रश्न - संकटावरून आठवलं, ‘देश संकट में है’ हा सेक्रेड गेम्समधील तू लिहिलेला संवाद चांगलाच लोकप्रिय ठरलाय. तुझ्यासारख्या संवेदनशील व्यक्तीला काय वाटतं, खरंच देश संकट में है?’

- देशाचं काय घेऊन बसलास, सगळं जगच संकटात आहे! आणि याचं सर्वांत महत्त्वाचं कारण जे मी आत्ताच म्हणालो- हवामान बदलाची समस्या, ज्याकडे अजूनही दुर्लक्षच केले जाते.

प्रश्न - लेखक, पटकथाकार, गीतकार, स्टॅण्डअप कॉमेडीयन अशी विविध प्रांतांतील तुझी मुशाफिरी सर्वपरिचित असली तरी, तू दशकभरापासून बालसाहित्य लिहितोस याची अनेकांना कल्पना नाही. ‘पेपरचोर’ या तुझ्या पुस्तकाविषयी आणि ‘बिक्सू’ या ग्राफिक नॉव्हेलविषयी आम्हाला थोडं सांग.

- लहान मुलांसाठी गेली तीन दशकं काम करणाऱ्या एकलव्य या संस्थेद्वारे ‘चकमक’ ही पत्रिका प्रकाशित होते. या पत्रिकेसाठी मी जवळपास दहा वर्षांपासून कथा, कविता आणि लेख लिहितोय. लहान मुलांसाठी लेखन करायला मला खूप आवडतं. कारण तिथे तुम्हाला स्वतःमध्ये खोलवर बुडी मारावी लागते आणि स्वतःला सोपं करत जावं लागतं. फिर समझ आता है की हम आम जीवन में कितना उलझ गए हैं, कितनी जटिलता में तैर रहे हैं। आणि ‘बिक्सू’विषयी म्हणशील तर लहान मुलांसाठीच्या या ग्राफिक नॉव्हेलचं बरचसं काम माझ्या बायकोने- राजकुमारीने- केलं आहे. लेखन आणि चित्रं- सगळं तिने स्वतःच केलंय. मी केवळ लेखनात थोडं साह्य केलंय.

‘पेपरचोर’ हे माझं एकमेव हिंदी पुस्तक आहे, त्यात लहान मुलांसाठी मी लिहिलेल्या दहा कथांचा समावेश करण्यात आला आहे.

प्रश्न - भारत हा जगातील सर्वांत युवा देश आहे, म्हणजे सगळ्यांत जास्त युवक सध्या भारतात आहेत. पण हे मिलेनियल्स (1990 नंतर जन्मलेल्या युवकांसाठी वापरला जाणारा शब्दप्रयोग) आजकाल टिकेचा विषय बनले आहेत. पालक, नातेवाईक इथवर ठीक होतं, आता तर अर्थमंत्र्यांनीदेखील मंदीचे खापर ‘मिलेनियल्स’वर फोडलंय. आजच्या युवकांच्या सामाजिक आणि राजकीय समजेविषयीही नेहमीच शंका उपस्थित केली जाते. याविषयी तुझं काय मत आहे?

- प्रत्येक काळातील युवक हा असाच असतो. युवा का काम ही है सबसे गाली खाना लेकिन अपने नए बिम्ब, नए मानक, नए हवाई किले गढ़ते रहना भी. माझ्या मते, मिलेनियल्स ही माध्यम-निर्मित संकल्पना (media generated idea) आहे, जिला शुद्ध मार्केटिंगही म्हणता येईल. आजचा युवक हा कुठल्याही काळातल्या युवकांसारखाच आहे. थोड़ा परेशान, थोड़ा रोमांटिक, थोड़ा गुस्सैल, थोड़ा delusional, थोड़ा भटका हुआ, थोड़ा सुधरा हुआ.

प्रश्न - तू युवकांविषयी किती छान बोललास रे. आता शेवटच्या प्रश्नाकडे वळू यात. खरं तर हा प्रश्न सुरुवातीलाच विचारायला हवा होता, पण जाणीवपूर्वक शेवटी विचारत आहे. त्याचं कारण तू जे उत्तर देशील ते आमच्या युवा मित्र-मैत्रिणींना वाचण्या-पाहण्यासाठी मदत करेल. तुझ्या व्यक्तिमत्त्वात व लेखनात साहित्य आणि सिनेमा यांचा मोठा प्रभाव जाणवतो. कुठल्या साहित्यिकांनी आणि दिग्दर्शकांनी तुझ्यावर प्रभाव टाकला?

-बडी लम्बी लिस्ट है. पर सरसरी तौर पर कुछ बताता हूं. अमृता प्रीतमच्या कथा आणि कविता, उदय प्रकाश यांच्या कथा, मनोहर श्याम जोशी यांच्या कादंबऱ्या, मंटोचे ‘मिठा जहर’सारखे किस्से, अमृत लाल वेगड यांची प्रवासवर्णनं, विनोदकुमार शुक्लांचे कुतूहलांनी भरलेले साहित्यिक जग, विसल्वा जिम्बोर्स्काच्या कविता, टेड चियांग आणि स्टीफन किंग यांच्या विज्ञानकथा यांनी मला प्रभावित केलंय. सिनेमांबाबत सांगायचं झालं तर पॉल थॉमस अँडरसन, ग्रेटा गर्विग, फिबी वॉलर ब्रिज, सिडनी ल्यूमेट, सत्यजित रे, गुलजार, मार्टिन स्कोर्सेसी, बोंग जून हो, माइकल हनेके आणि अल्फोंसो कूरों यांच्या कलाकृती मला प्रचंड भुरळ घालत आल्यात.

Tags: मुलाखत Interview Sameer Shaikh समीर शेख वरुण ग्रोवर Varun Grover weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

समीर शेख
sameershaikh7989@gmail.com


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके