डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

आपल्याकडच्या रोजगाराचाही प्रॉब्लेमच आहे. म्हणून तिकडे शिकणाऱ्यांना तिकडेच शिकून नोकरी करीत राहावं लागतं. त्यांना आपल्या देशाबद्दल, संस्कृतीबद्दल, भाषेबद्दल फार प्रेम असतं.तिकडे राहूनच ते आपलं प्रेम व्यक्तही करत असतात. मग आपल्यालाच तिकडे जाऊन सांस्कृतिक महोत्सव करावे लागतात. ही मुलं तिकडेच राहताहेत हे फार बरं असंही कधीकधी वाटतं. इकडे येऊन काही नोकरी किंवा उद्योग त्यांना करावा असं वाटलं तरी विषम हवामानामुळे ते शक्य होत नाही. विषम हवामानाचा त्रास त्यांना होत नसतो. आपल्याकडच्या सरकारी नोकरी करणाऱ्यांना तो होत असतो. विषम हवामानाचा त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम झालेला असतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.

आपला देश विविधतेनं नटलेला आहे यात शंका नाही. भिन्न भिन्न भाषा, भिन्न भिन्न भाषिक प्रश्न, त्यावरून होणाऱ्या भिन्न भिन्न दंगली! शेकडो जाती, विविध जातींची विविध प्रमाणपत्रं.आरक्षणासाठी एखादी जात पात्र ठरावी यासाठी आंदोलनं, त्या जातीला आरक्षण मिळू नये म्हणून होणारी आंदोलनं. वेगवेगळे धर्म, त्या त्या धर्मातल्या लोकांनी वेगवेगळ्या कारणांसाठी संवेदनशील होणं. त्या संवेदनशीलतेचेही भिन्न भिन्न अवतार. रस्ते रोखणं, वाहन पेटवून देणं. निरनिराळ्या गटांचे निरनिराळे महापुरुष. त्यांना योग्य ती प्रतिष्ठा दिली नाही म्हणून होणाऱ्या तोडफोडी-जाळपोळीचेही भिन्न भिन्न आविष्कार. या सगळ्या गोष्टी इतक्या जोरात आदळत असतात की मानवी जीवनाच्या विविध क्षेत्रांत वेगवेगळ्या गोष्टी घडत आहेत याची जाणीवच बोथट बनते. किंवा घडत नसतीलच असंही वाटत राहतं.

अशा वातावरणात मूल जन्माला येतं, ते थोडं वाढतं, मग शाळेत जातं. शाळांचेही भिन्न भिन्न प्रकार. झोपडीवजा, टिनटप्परवाली, पावसाळ्यात गळणारी, बसायला बाकं नसलेली, मोडकी बाकं असलेली, मळक्या-उदास भिंती असलेली, पानाच्या पिचकाऱ्या असलेली, जमीन उकरलेली, अंधाऱ्या खोल्यांची-विविध प्रकारच्या शाळा. जिल्हा परिषदेची, नगरपालिकेची, खाजगी संस्थेची शाळा आणि पॉश इंटरनॅशनल स्कूल. राहण्याच्या आणि ज्ञानग्रहणाच्या अद्ययावत सुविधा असलेली. गरीब शाळा, श्रीमंत शाळा. खडखडणारी एसटी बस आणि थंडगार वोल्वो. पाशिंजर गाडी आणि सुपर डिलक्स.ओढताना दमछाक करणारी सायकल रिक्षा आणि टोयोटा कार.लो बजेट फिल्म आणि मल्टिमिल्यनवाली. धी न्यू हिंदू होटल आणि सप्तारांकित. गल्लीतला पुढारी आणि दिल्लीतला नेता. तीन रुपयांचा चहा आणि दीडशे रुपयांचा टी. विविधता म्हणजे किती प्रकारची.

अशा परिस्थितीत एखादं पोरगं घरून बसायचं पटकूर आणि पाटी-पेनसल घेऊन शाळेत येतं. एकाचवेळी दोन-तीन वर्गांना शिकवणारे मास्तर आलेले असतात किंवा आलेले नसतात.उत्तमोत्तम पोषाख केलेले अध्यापक थोड्या मुलांना सुसज्ज खोलीत शिकवत असतात. वर्गात जागा नाही म्हणून मुलं दाटीवाटीनं बसलेली असतात आणि वाढत्या गोंगाटात काहीतरी शिकत असतात किंवा शिकत नसतात. कधीकधी तर मुलं शाळेकडे जातात तर शाळाच जागेवर नसते किंवा कडेकोट बंदअसते आणि उग्र पहारेकरी उभे असतात. शाळा चालवणं परवडत नाही म्हणून मॉल उभारण्यासाठी जागा दिली आहे अशी कुजबुज चालते. कधीकधी तर खिचडी मिळाली की मुलं घरी जातात.कधीकधी तर खिचडीदेखील मिळत नाही. आलेलं धान्य उंदरांनी फस्त केलं म्हणतात. आपल्याकडचे उंदीरही भिन्न भिन्न प्रकारचे आहेत. काळे, भुरे, रोड, लठ्ठ, किरटे, थोराड. कधीकधी तर अळ्यांना, किटकांना धान्यात स्वैर विहार करावा असं वाटतं.

शिजवण्याऱ्यांना चष्मे पुरवले गेलेले नसल्यानं त्यांना ते दिसत नसतात.गरिबीतून आलेल्यांची, नाना प्रकारच्या तडजोडी कराव्या लागलेल्यांची दृष्टी अधू झालेली असते. कधीकधी तर त्यांना हेही दिसत नाही की काल चांगल्या धान्याची पोती इथं होती ती आज कुठं गेली.आपल्याकडचे दृष्टिभ्रमदेखील भिन्न भिन्न प्रकारचे असतात. पुष्कळांना माणसं दिसतच नाहीत, धर्म दिसतात, जाती दिसतात. निःसत्व अन्न खाल्ल्यामुळे दृष्टी मंद होते.आपल्यासारख्या कृषिप्रधान देशात धान्याच्या पुष्कळ चांगल्या जाती असतात, परंतु त्यांना तांबेरा किंवा तत्सम आजार जडतात.

अशा परिस्थितीत एखादा मुलगा किंवा मुलगी शिकायला पाहिजे म्हणून शाळेत येते, बापानं धाडलं म्हणून येते, घरच्या किंवा शेताच्या कष्टांतून सुटका म्हणून येते. एखाद्या मुलाच्या डोळ्यांसमोर लहानपणापासूनच करिअर धरलं जात असतं. मग त्याला चांगली शाळा, चांगला क्लास हे सगळं करावंच लागतं.आपल्याकडे शिक्षकांना, प्राध्यापकांना, शिक्षणतज्ज्ञांना शिक्षणसंस्था काढाव्या असं वाटत नाही. मग नाईलाजानं, जनतेचं कल्याण व्हावं म्हणून, राजकारणातल्या लोकांना त्या काढाव्या लागतात किंवा कधी शिक्षणसंस्था काढल्यानंतर राजकारणात जावं लागतं. त्यामुळे आमच्या देशातल्या तरुण मुलांना आपल्या देशातच शिकावं असं वाटत नाही. शिक्षणतज्ज्ञांनी शाळा-कॉलेज काढली असती तर ती मुलं इथंच शिकली असती.

आपल्याकडच्या रोजगाराचाही प्रॉब्लेमच आहे. म्हणून तिकडे शिकणाऱ्यांना तिकडेच शिकून नोकरी करीत राहावं लागतं. त्यांना आपल्या देशाबद्दल, संस्कृतीबद्दल, भाषेबद्दल फार प्रेम असतं.तिकडे राहूनच ते आपलं प्रेम व्यक्तही करत असतात. मग आपल्यालाच तिकडे जाऊन सांस्कृतिक महोत्सव करावे लागतात. ही मुलं तिकडेच राहताहेत हे फार बरं असंही कधीकधी वाटतं. इकडे येऊन काही नोकरी किंवा उद्योग त्यांना करावा असं वाटलं तरी विषम हवामानामुळे ते शक्य होत नाही. विषम हवामानाचा त्रास त्यांना होत नसतो. आपल्याकडच्या सरकारी नोकरी करणाऱ्यांना तो होत असतो. विषम हवामानाचा त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम झालेला असतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.

अशाही परिस्थितीत मुलांना शिकायचं असतं. त्यांना चांगल्या शाळा नको असतात, चांगले शिक्षक नको असतात, चांगली पाठ्यपुस्तके नको असतात, कशीतरीच छापलेली, काहीतरीच मजकूर असलेली पुस्तकं त्यांना हवी असतात. त्यांना चांगलं शैक्षणिक धोरण नको असतं, वेठीला धरल्यासारखं शिकून घेणं त्यांना आवडतं. काहीही अभ्यासक्रम असला तरी तो करायचा, खूप पैसे देऊन करावा लागला तरी करायचा. शर्यतीच्या घोड्यासारखं धावावं लागलं तरी धावायचं असं त्यांना वाटत असतं.

तरीही मुलं शिकतच असतात. आमच्या सरकारांनी, राज्यकर्त्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी, विचारवंतांनी, उद्योगपतींनी आपल्या शिक्षणव्यवस्थेकडे जितकं कमी लक्ष देता येईल तितकं बरं. शिक्षणसंस्था काढाव्याच. कारण तो एक उद्योगधंदा आहे. औद्योगिकीकरणाचं स्वागतच केलं पाहिजे यातही काही शंका नाही.

माझंच काहीतरी चुकत चाललेलं आहे. मला दिवसेंदिवस निरक्षर व्हावं वाटू लागलेलं आहे. वरचं हे सगळं अक्षरओळख विसरण्यापूर्वी कसंतरी ओढून काढलं आहे हे आपल्या लक्षात येईलच.

Tags: शालेय शिक्षण रोजगार शिक्षण चौक/चौक वसंत आबाजी डहाके education system vasant abaji dahake in sadhana education weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वसंत आबाजी डहाके
vasantdahake@gmail.com

वसंत आबाजी डहाके  हे मराठीचे भाषातज्‍ज्ञ, कोशकार तसेच लेखक आणि कवी आहेत. त्यांच्या 'चित्रलिपी' या संग्रहाला साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले. फेब्रुवारी २०१२ च्या चंद्रपूर येथे झालेल्या ८५ व्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके