डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

हा वीर पुढे व्हरायटी चौकात दिसला, महालमध्ये दिसला, शुक्रवार तलावाजवळ दिसला, ताज टॉकीजजवळ, मेडिकल कॉलेज चौकात दिसला. आणखी कुठंकुठे. जिथं जिथं मी गेलो, तिथं तिथं. मी गेलो नाही तिथंही तो असेलच, कोणत्याही चौकात. तो नेहमी कोणत्या तरी चौकातच दिसत असायचा. पाहणाऱ्यांना अदृश्य अशा शत्रूशी त्याचं लढणं सुरूच असायचं. पावसाळा गेला, हिवाळा गेला, उन्हाळा गेला, परत पावसाळा आला. परत मी विद्यापीठाच्या स्नातकोत्तर विभागात जाऊ लागलो. त्याच्या पोषाखाच्या चिंध्या झाल्या होत्या. रूबाबदार वीराचा चेहरा दयनीय झाला होता. पण लढणं सुरूच होतं. कुणाशी, कशासाठी, का, माहीत नाही. तो जेवत होता की नव्हता, असल्यास कुठं ? झोपत होता की नव्हता, असल्यास कुठं ? असे प्रश्न मला पडायचे.

या सदराला मी ‘चौक’ हे नाव दिलं, यामागे एक आठवण आहे. मी एम.ए. करायला नागपूरला गेलो, तेव्हा विदर्भ साहित्य संघाच्या समोरच्या झाशी राणी चौकातून पुढे विद्यापीठ ग्रंथालयाच्या इमारतीत जायचं असायचं. तिथं त्यावेळी आमचे एम.ए.चे वर्ग होत असत. एके दिवशी सायकलवरून मी झाशी राणी चौकात वळलो तर एक विलक्षण दृश्य दिसलं. वीराचा राजस्थानी पोषाख म्हणता येईल असा पेहराव केलेला एक इसम, तलवारीचे वार करावेत तसे हातवारे करीत उभा होता. तो कुणाशी तरी लढत होता. समोर त्याचा प्रतिस्पर्धी नव्हता. पोषाख अतिशय सुंदर होता, नवा होता. झाशीच्या राणीच्या पुतळ्याखाली अदृश्य अशा शत्रूशी तो लढत होता.

हा वीर पुढे व्हरायटी चौकात दिसला, महालमध्ये दिसला, शुक्रवार तलावाजवळ दिसला, ताज टॉकीजजवळ, मेडिकल कॉलेज चौकात दिसला. आणखी कुठंकुठे. जिथं जिथं मी गेलो, तिथं तिथं. मी गेलो नाही तिथंही तो असेलच, कोणत्याही चौकात. तो नेहमी कोणत्या तरी चौकातच दिसत असायचा. पाहणाऱ्यांना अदृश्य अशा शत्रूशी त्याचं लढणं सुरूच असायचं. पावसाळा गेला, हिवाळा गेला, उन्हाळा गेला, परत पावसाळा आला. परत मी विद्यापीठाच्या स्नातकोत्तर विभागात जाऊ लागलो. त्याच्या पोषाखाच्या चिंध्या झाल्या होत्या. रूबाबदार वीराचा चेहरा दयनीय झाला होता. पण लढणं सुरूच होतं. कुणाशी, कशासाठी, का, माहीत नाही. तो जेवत होता की नव्हता, असल्यास कुठं ? झोपत होता की नव्हता, असल्यास कुठं ? असे प्रश्न मला पडायचे. माझं एम.ए. झालं, घरी गेलो. त्या वर्षी कुठंही काम मिळालं नाही. अधूनमधून नागपूरला येत असे. तो फाटून चिंध्या झालेला वीर कुठंतरी, कोणत्या तरी चौकात लढत असलेला दिसायचा. त्याच्या जवळून किती माणसं, वाहनं जायची, मिरवणुका, प्रेतयात्रा, विजययात्रा, मोर्चे जायचे. निवडणुका व्हायच्या, सरकारं बदलायची, न्यायालयाचे निवाडे व्हायचे, व्यक्तींच्या आयुष्यात काही घडायचं, प्रदेशाच्या राजकारणात उलथापालथी व्हायच्या, साहित्यात कोणतं तरी प्रवर्तन व्हायचं, शहराच्या सौंदर्याकरणाचे प्रस्ताव यायचे. तो फाटकी कापड ल्यायलेले, हातात न दिसणारं गंजलेलं हत्यार घेऊन लढत असायचा.

कुणाशी तो लढत होता, आणि का ? मला काही कळण्याचा प्रश्न नव्हता. तो लढत होता. त्याचं ते लढणं हवेत होतं. त्याचे हातवारे फक्त दिसत. तो कोणत्या शत्रूच्या विरोधात लढत होता, हे दिसत नव्हतं.

मला त्याच्याकडे पाहिलं की आतडं ओढल्यासारखं व्हायचं. पीळ पडायचा.

मग मला एक प्रश्न पडला की चौकातच तो का दिसतो ? आडबाजूच्या गल्लीबोळात का नाही? असंही असेल की मी चौकात जात होतो. गल्लीबोळात जात नव्हतो. मी मुख्यतः मध्यमवर्गीय पांढरपेशा वस्तीत, अशा लोकांच्या जाण्यायेण्याच्या, वावरण्याच्या ठिकाणी जात होतो. मी झोपडपट्टीत, दरिद्री लोकांच्या तुटपुंज्या वसाहतीत जात नव्हतो. त्यामुळे तिकडे, तिकडच्या गड्डीगोदाम, गिट्टीखदान चौकात तो असायचा की नाही, हे मला कळत नव्हतं. तिकडच्याही चौकात तो असेलच.

त्याला आपलं लढणं आणि त्यातलं हरणं चौकातच दाखवायचं असावं. तो पराभूत योद्धा असावा, पण त्याचा पराभव दगलबाजीनं झाला असावा असं मला वाटायचं. चौक ही उघडी रणभूमी आहे, कोणत्या तरी गल्लीत घुसून, पाठीत सुरा खुपसणं त्याला मान्य नसावं. पराभव हा शब्द मी वापरतो आहे. तो निरंतर लढतच आहे. विजय काय आणि पराभव काय, हे त्याला महत्त्वाचं वाटत नसावं. लढणं संपलेलंच नाही. तर पराभव तरी कसा ?

बहुतेक लोकांनी ‘तो वेडा आहे’ असंच मानलेलं होतं. त्यामुळे त्याच्याविषयी आस्था असण्याचं काही कारणही नव्हतं.
मला तसं वाटत नव्हतं.

स्वातंत्र्यानंतरच्या काळात वेगवेगळ्या चौकात लढणारी वेगवेगळी माणसं मी पाहिली होती किंवा त्यांच्याविषयी ऐकलं होतं. ते सगळे लोक वेडे आहेत असं मला मुळीच वाटत नव्हतं.

अवतीभवतीचा सगळा प्रदेश बधीर असताना लोक लढत असतात. तथाकथित शहाण्यांना ते वेड्याचे हातवारे वाटतात.

स्वातंत्र्यानंतर आजही विविध शहरांतल्या विविध चौकात फाटून चिंध्या झालेला तो योद्धा मला दिसतो. करोल बागेल, चांदनी चौकात, दर्यागंजमध्ये, सराफ्यात, होळकर वाड्याच्या समोर, आझाद मैदानात, नाना चौकात, शिवाजी पार्कमध्ये, गवालिया टँक मैदानात, शनिवार वाड्यासमोर, चौरंगीत, रंकाळा तलावाकडे, चारमिनारजवळ, मणीबेलीत, नंदीग्राममध्ये, सगळीकडच्या गांधी चौकात, नेहरू चौकात, सुभाष चौकात...

मला आता असं वाटतं की मी त्याच्यात आणि माझ्यात काहीतरी एकरूपता पाहात होतो.

नंतर पुढच्या काळात माझ्या असं लक्षात आलं की तो मीच होतो, मी तोच होतो.

डोकं कसं चालतं, कुणास ठाऊक. माझं डोकं याप्रमाणे चालतं. कबीर बाजारात उभा नव्हता, चौकात उभा होता. तेही वाराणसीच्या. वाराणसी, पैठण, दिल्ली, मुंबई-इथल्या चौकात उभं राहणं ही कठीण गोष्ट असते.

नंतर सगळे चौक मोठमोठ्या सभांनी काबीज केले. सभा संपल्यानंतर, सगळे पुढारी नेते आणि कार्यकर्ते पांगल्यानंतर हस्तपत्रांचा आणि कार्यकर्त्यांच्या थकव्याचा पाचोळा पडलेल्या सुन्न चौकात हातवारे करणारा योद्धा उभा असलेला दिसतो. त्याच्यावर तो विशिष्ट असा झोत नसतो. चौकातल्या दिव्यांच्या उजेडात त्याच्या सावलीचे हातवारे स्पष्ट उमटलेले दिसतात.

Tags: वाराणसी कबीर कार्यकर्ता स्वातंत्र्य सदर साहित्य मराठी साहित्य चौक वसंत आबाजी डहाके weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वसंत आबाजी डहाके
vasantdahake@gmail.com

वसंत आबाजी डहाके  हे मराठीचे भाषातज्‍ज्ञ, कोशकार तसेच लेखक आणि कवी आहेत. त्यांच्या 'चित्रलिपी' या संग्रहाला साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले. फेब्रुवारी २०१२ च्या चंद्रपूर येथे झालेल्या ८५ व्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके