डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

1962 मध्ये राष्ट्र सेवादलाने वसंत बापटयांना भारतभ्रमण करण्यासाठी पाठवले. त्यांच्या सोबतीला लीलाधर हेगडे आणि दिमतीला नवी कोरी फियाट गाडी आणि ड्रायव्हर दिले होते. त्या प्रवासात त्यांनी भारताच्या पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर भागांत मुशाफिरी केली. त्या प्रवासावरील लेखमाला त्यांनी ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध केली, नंतर त्या लेखमालेचे पुस्तक 1966 मध्ये पॉप्युलर प्रकाशनाकडून आले, त्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती 1991 मध्ये साधना प्रकाशनाकडून आली. त्या पुस्तकातील हा बीजलेख आहे.

माझा जन्म कऱ्हाडला झाला, शिक्षण पुण्यात, घर तर चक्क सदाशिव पेठेत! त्या मानाने मी बरेच देशाटन केले! या ना त्या प्रसंगाने इकडेतिकडे प्रवास घडला होता, पण ‘रात्रंदिन आम्हां यात्रेचा प्रसंग’ असे गतवर्षी झाले. शाळकरी वयात भूगोलदेखील काव्यात्म वाटे. ‘हिमालय’ हा शब्द कानांवर पडला की, मन थरारून जाई. ‘काश्मीर ते कन्याकुमारी’ आणि ‘अटक ते कटक’ हे दोन मंत्र उच्चारताना भलतेच उदात्त काहीतरी वाटे! ‘गंगा-यमुना’ या तर देशाच्या नीलारोहिणीच! पण त्यांच्याहून लहानसहान नद्या-निर्झरिणीदेखील विराट पुरुषाच्या नसांसारख्या वाटत. शहरांच्या नामोच्चारासरशी मनामध्ये मुलुखावेगळे संगीत थरारून उठे. इतिहासाने गुंफलेली महावस्त्रे धारण करून, झाशी-दिल्ली-कानपूर-कलकत्ता असली नगरे रुबाबात उभी राहत. ‘सुजलाम सुफलाम मलयजशीतलाम’ अशी भूमी डोळे भरून पाहायची इच्छा उसळेच; पण कच्छचे रण, थरचे वाळवंट, नेपाळ-आसामची दलदल... सगळे सगळे अनुभवावेसे वाटे, आणि हे सारे मला एका घासात हवे होते! चिमटीने काही उचलणे मला जमत नाही. मी घेतो, तेव्हा बचकेने घेतो. देतो, तेव्हाही ओंजळ ओसंडावी, असे मला वाटते. पाचपन्नास मैलांचा प्रवास म्हणजे मला अगदीच पोरकट वाटतो. चारही खूर बांधून ठेवल्यावर त्या ठाणबंद घोड्यावर स्वार होण्यात कसली आली आहे गंमत? आपल्या मागचे व्याप, आपल्या पुढचे व्यापार-व्यवहार, आपल्या आतल्या चिंता यांची बोचकी घरात ठेवून, फुटेल त्या वाटेने दीर्घ दीर्घ प्रवास, दीर्घ दीर्घ काळ करावा हेच खरे!

हे मला लाभले. माझी यात्रा पूर्ण निष्काम होती. मला कसलाही अभ्यास करायचा नव्हता. वरकांती सोंग म्हणून मी साहित्यिकांच्या भेटी घेतल्या, लोककलांची पूसतपास केली, राजकारणाची चाहूल घेतली आणि सामाजिक संस्थांचा परिचय करून घेतला. पण अंतर्यामी इच्छा एकच होती, भिन्नाट फिरायचे, पटेल तसे! अंगाला हजार डोळे असल्यासारखे त्या देशाकडे पाहायचे. ही सृष्टी साठवीत जायचे. माझा देश! याची गाणी मी म्हटली, याची गाणी मी रचली. ही माझी भूमी; निर्वेषपणे वहिवाटण्यासाठी मिळालेली.

मी खूप हिंडलो. वर्षभरात छत्तीस हजार मैल! दिवसाला शंभर मैल हिशेब झाला हा. हा हिशेबदेखील अलीकडे केला. यात्रेच्या वेळी फक्त यात्रा केली. देशाची यात्रा, दिशांची यात्रा, चारी धाम यात्रा! काश्मीर-लडाखचे पहिले तीर्थ, आसामचे दुसरे, तिसरे कन्याकुमारीचे, आणि शेवटी वेरावळ-पोरबंदरचे. भारतीय समाजाची ही नवी क्षेत्रे. या दिगन्त यात्रेत मी कृतार्थ झालो. डोळे उघडले, नवे फुटले. कानात आणि मनात खूप साठवले. घुळीने नित्यस्नान केले, वाऱ्यापावसाने झोडपून काढले. झेलम-सतलज यांचे तुषार मी अंगावर घेतले. सावळ्या यमुनेने रसवृत्ती जोपासल्या. मी कितीदा तरी गंगापार झालो! मी ब्रह्मपुत्रेशी सलगी केली. महानदी, स्वर्णरेखा, ब्राह्मणी, गोदा, कृष्णा, तुंगा, कावेरी, पेरियार - सारे प्रवाह माझ्यावरून वाहत गेले. मी किती जलाशयांत डोकावलो! मी किती धबधब्यांचा आवेश पाहिला, आक्रोश ऐकला. समुद्राच्या अखंड असून भिन्न वाटणाऱ्या पाण्यात डुंबलो. वने-उपवने, राजमार्ग तशा करडूवाटा, राई आणि तराई, माळ आणि वाळवंटे, उंच उंच डोंगर आणि खोल खोल भोवळदऱ्या, मंदिरे, लेणी, शिलालेख, जयस्तंभ, वेधशाळा आणि नृत्यशाळा, इतिहासपूर्व मानवाच्या गुहा-गुंफा आणि उद्याच्या मानवाची गर्भागारे, महापुरुषांच्या पर्णकुट्या आणि क्षुद्र श्रीमंतांचे आरसेमहाल... कितीतरी विचित्रे मी पाहिली. काही आठवते, बरेच आठवत नाही. पण जे आठवत नाही, तेही जवळ असतेच. कधी आज्ञा करताच, ते कामी येईल, कधी दत्त म्हणून पुढे उभे राहील. काही काही कधीच आठवणार नाही, पण तेही कशात तरी, कसे तरी विरघळलेले असेल. मोत्याच्या मूलकणीवरचा प्रत्येक थर वेगळा थोडाच काढता येतो!

या प्रचंड चित्रात काही बिंदू पक्के ओळखीचे झाले आहेत. या भूमिरूपी सागरातली ती बेटे आहेत. वाटांच्या लाटांवर झुलता झुलता डोके गरगरू लागले की, या बेटांवर आसऱ्याला जावे. ‘कुठेतरी दूर दूर’ जाऊ पाहणाऱ्या कवीमनालादेखील अज्ञात का होईना, पण ‘ठिकाण’ लागतेच; चिमणे का होईना, पण खोपट पाहिजे असतेच. विजनातून हिंडावे, वैराणात वणवण करावी, मनाचा ब्रेक तोडून वाटभर घरंगळावे, पण वसतीला वाडी हवीच! शेवटी जनात जावेसे वाटतेच आणि हे हवे, तर जनपदे हवीत. खेडी आणि कुग्रामे, नगरे आणि महानगरे, सगळी आसऱ्याची बेटे असतात. काही वावभर खडकाएवढी छोटी, तर काही एकेका देशाची वसणूक करावी एवढी मोठी. काही खेडी, काही महानगरे, पण सगळी आसऱ्याची बेटेच. काही बेटे निवांत, काही गजबजलेली, काही लख्ख, काही काळी, काही बरड, काही नित्य हिरवी. काही प्रवाळाची, काही शेवाळाची. पण सगळी अशी ना तशी, कधी ना कधी, कुणा ना कुणाला आसरा देतात. उपाशीतापाशी मुशाफिराला उनउनीत घास घालतात, निदान त्याच्या एकाकी मनाची थरथर थांबावी एवढी ऊब देतात. म्हणून रानावनांइतकीच या गावांची मला ओढ आहे. विजनातून फिरत फिरत मला जनात जावेसे वाटते, ते यामुळेच!

‘निसर्ग’ नावाची माणूसद्वेष्टी शक्ती मला आवडत नाही. खरे म्हणजे ‘निर्जन’ व ‘सर्जन’ अशी निसर्गाचीच दोन रूपे असतात, असे मला वाटते... की ‘निर्जन’ रूप नसतेच? निर्जन रूप कोणी पाहिले आहे? ज्या क्षणी पाहणारा तिथे जातो, त्या क्षणी तेथली निर्मनुष्यता संपत नाही का? निसर्गाला भव्यता वा क्षुद्रता, उग्रता वा सौम्यता, सुंदरता वा कुरूपता बहाल केली, ती आम्ही माणसांनी! पण माझा विचार याच्याही पुढे जातो. तो असा की, सगळ्या वाड्यावस्त्या आणि गावे-नगरे हादेखील निसर्गच आहे! ‘हा निसर्ग कसा?’ ते समजायला सूक्ष्म देह धारण करून जरा उंचावर जायची सिद्धी हवी.

डोंगराच्या उतारावरून पाऊसपाणी वाहिले की, माती दरीच्या तळाशी साचते आणि तळ कसा हिरवागच्च होऊन जातो! नदीचा पूर ओसरला की, मागे रेंगाळणारा गाळ तिथे मख्खपणे बसतो आणि त्याच्यावर मळीतली कवळी-गोड कणसे धरतात. रखरखत्या वाळवंटात कुठेतरी झिरपते, तिथे चार बुटबैंगण झाडे वसती करतात. खडकांच्या आडोशाला पाणी लपते, साचते, कुजते, वर साय धरते, शेवाळ दाटत जाते, तिथे जीव खसफसू लागतात. आपली माणसांची वसती तरी काय, ही अशीच जमते, वाढत राहते. कुठून कुठून प्रवाह येत असतात, स्थिरावतात, कधी साचेबंद होतात, कुजतात, मोडतात, पुन्हा भरतात. भुकेची पराणी लागून धावणारी माणसे, हिंस्र अशा स्वबांधवांना भेदरलेली माणसे, आपल्या गोतावळ्याच्या पोटात दोन घास ढकलता यावेत म्हणून मिळेल त्या जमिनीची शिकार करायला निघालेली माणसे. केवळ दाटीवाटी झाल्यामुळे कढईच्या बाहेर पडून ओघळत राहिलेले प्रवाह, त्यांचे पडलेले बुंद, त्यांवर धरणाऱ्या बुरशा, त्यांत वाढणारी गजबज! ही खेडी, ही गावे, ही नगरे... काही खबदाडातली हिरवळ, काही वैराणातील ओल, काही युगायुगांच्या रवेदार गाळावर पोसलेली हिरवीकंच राने! काही ओघ हिमालयाच्या खिंडीतून हळूहळू खाली सरकले. काही खैबरच्या दारातून घुसले, काही वाळवंटातून झिरपले, जमेल तेथे स्थिरावले, वाढले. काही थेट दक्षिणेपर्यंत घसरत गेले आणि तिथल्या अगाथ काळ्या डोहांना मिळाले. हे डोहदेखील केव्हा ना केव्हा अशाच वाहणाऱ्या प्रवाहांनीच बनले होते.

या ना त्या प्रकारे या माणसांचे पुंज बनले, या किंवा त्या आकाराचे. त्यांतूनच घडली ही विचित्र बेटे! ही अनेकदा फुलली, फळली. अनेकदा इथे पानगळ झाली, पालवी धरली. इथले प्रत्येक घर म्हणजे एकेक झाड आहे. प्रत्येक वर्षाचा एक नवा थर याच्या खोडावर आहे. या झाडांचे सम किंवा विषम प्रकार दाटीवाटीने वा विरळतरळ उभे असतात, पडतात, झडतात, घेरले जातात. कोणी महावृदा होईतो जगतात, कोणी अकाली खुरटतात, मरतात. काही गावे राईसारखी, काही वेतसबनांसारखी. काही जंगले, काही उद्याने. कुठे एकाच गावात इथे कळकी तर तिथे केतकी, इथे वड तर तिथे फड्या निवडुंग... अशी दृश्ये दिसतात. तर कुठे सबंध वस्ती कशी आमराईसारखी नागर, डौलदार, डेरेदार, पोसलेली, ठाकठीक आणि गारेगार असते. ही सृष्टी पाहायला हवी, तटस्थपणे पण फटकून दूर न जाता!

मी या सृष्टीतही रमतो. कशी एकेक गावे-नगरे! काही नदीच्या एका काठावर राहून दुसऱ्या काठाची मशागत करणारी, काही दोन्ही तीरांवर पंखांसारखी पसरलेली, काही तीरावरच नव्हे, तर प्रत्यक्ष प्रवाहावरही वसलेली! काही डोंगरांच्या उतारावर संयतपणे रवंथ करीत बसलेली. काही संकोचाने दरडीआड वस्त्रांतर करणारी. काही एखाद्या गोत्रपुरुषासारखी भव्य आणि उदार, काही कशी कंजुष आणि कर्मदरिद्री. काही मधमाशांच्या प्रचंड पोळ्यांसारखी गजबज गजबज करणारी. काही कोळ्याच्या जाळ्यांइतकी निवांत. काही नेहमी पाणथळी राहिल्यासारखी गप्पगार निवलेली, काही धगधगत्या भट्टीसारखी रात्रंदिस पेटलेली; काही स्वतःवर लोभावून स्वतःमध्ये रमलेली; काही विमनस्कपणे दूर टक लावणारी. काही उठवळ, काही गरती! काही भव्यदिव्य पर्वतांच्या आश्रयाला गेलेली. काही मानीपणाने पूर्ण दिगंबर! काही गर्भश्रीमंत, काही नवश्रीमंत. काही राजाश्रयावर माजलेली, काही लोकाश्रयावर! काही, काही केले तरी दरिद्रीच वाटणारी! काही चिरतरुण, चिरसुंदर, चिरसस्मित. प्रत्येकाचा वेगळा सूर, वेगळा नूर. प्रत्येकाचा वेगळा गंध, वेगळा छंद; क्वचित भावंडांसारखा तोच तोंडावळा, पण स्वभाव भिन्न. प्रत्येक ठिकाणी भाकरीची चव वेगळी, पाण्याचे वजन वेगळे. ‘लक्ष चौऱ्यांऐशी ठसे, वेगळाले केले कसे’ म्हणून ‘देव रंगारी’ म्हणणाऱ्या नामदेवाप्रमाणे आपणदेखील रंगारी मानवजातीने रंगवलेली ही परस्परभिन्न विचित्रावली पाहून स्तिमित होतो.

या गावांचे वेगवेगळे पाणी मला दिसले. मी मनाची कावड भरून घेतली. डोळ्यांच्या शिंपलीत ते मावेना. ते अंगातच भिनले. त्याने मला केवढे तरी बडबडायला लावले. अशा वेडाला उतारा एकच. हे वेड वाटून घावे, श्रोत्यांमध्ये, वाचकांमध्ये!

मुशाफरीने माणूस माणसाळतो. तो आपला शिकारी स्वार्थ आणि दुष्ट पूर्वग्रह सोडून देतो. जेवढ्या नद्या तो ओलांडतो, तेवढ्या खंदकांच्या पलीकडे जातो. जेवढ्या राज्यांच्या सीमा तो उल्लंघून जातो, तेवढे तट तो मोडून टाकतो. जेवढी क्षितिजे तो छेदतो, तेवढ्या त्याच्या शृंखला तुटतात. आणि जेवढ्या शहरा-गावांतून तो राहतो, तेवढी नवी दालने त्याच्या वाड्यात उगवतात. जिकडे जातो, तिकडे त्याला भावंडे दिसतात. जमेल तेथे तो खूण जमवतो. मिळेल ते पाणी पितो. बारा गावचे पाणी पितो, म्हणजे वारा पितो, जन्मभर वासरासारखे बागडण्यासाठी!

 

Tags: प्रवासवर्णन बीजलेख वसंत बापट bijlekh vasant bapat bara gavacha pani weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके