डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

सारे कसे पुष्कळ पुष्कळ. जे हिरवेगार आहे तेही पुष्कळ आणि जे वैराण आहे तेही पुष्कळच. कॅलिफोर्नियाचा काही भाग आणि ॲरिझोना म्हणजे रेताड, वैराण, उजाड असल्या विशेषणांची अधिष्ठाने आणि तरीही निसर्गाची विचित्रे तुमची नजर केव्हा खेचून घेतील, सांगता येत नाही. कॅक्टस ऊर्फ निवडुंग. ॲरिझोनात त्याला निवडुंगेश्वर किंवा निवडुंगोबा तरी म्हटले पाहिजे.

अमेरिकेत सर्वात श्रीमंत कोणी असेल तर तो निसर्गच. सर्वात अधिक प्रेक्षणीय आहे तोही निसर्गच. भौतिक विकासाच्या रेट्याखाली आणि दिमाखदार दिखाऊपणाच्या भपक्यापुढे अमेरिकेताली सृष्टी दबलेली नाही, तिने हार मानलेली नाही.

सारे कसे पुष्कळ पुष्कळ. जे हिरवेगार आहे तेही पुष्कळ आणि जे वैराण आहे तेही पुष्कळच. कॅलिफोर्नियाचा काही भाग आणि ॲरिझोना म्हणजे रेताड, वैराण, उजाड असल्या विशेषणांची अधिष्ठाने आणि तरीही निसर्गाची विचित्रे तुमची नजर केव्हा खेचून घेतील, सांगता येत नाही. कॅक्टस ऊर्फ निवडुंग. ॲरिझोनात त्याला निवडुंगेश्वर किंवा निवडुंगोबा तरी म्हटले पाहिजे. एकेक निवडुंगोबा दोन दोन पुरुष सरासरी उंचीचा. नाहीत त्याला पाने. फुले किंवा रसाळ बोंडे.. असली तरी असून नसल्यासारखी. प्रचंड चकलीपात्रातून निघाल्यासारखे या निवडुंगाचे देह. देह म्हणजे एक धड. त्याला दोन चार पाय किंवा हात. बाकी सगळ्या वनस्पतींना जराही जागा न देता शस्त्रसज्ज योद्ध्यासारखे निवडुंगोबा उभे.. केवळ कबंध. पाहणाऱ्याचे मन भयचकित करणारे पण त्यांच्या आकृत्या मात्र चित्रात रेखाटल्यासारख्या रेखीव. वाळवंटात हे निवडुंगोबा चिलखतधारी, शस्त्रसज्ज, शापित शिरोहीन शिपायांच्या पाषाणमूर्तीसारखे उभे आहेत. गंमत म्हणजे असे उघडेबोडके असूनही केवळ आकार विशेषांमुळे ते आपले लक्ष वेधून घेतात. प्रवासी आपल्याकडे वळावेत म्हणून हे प्रदेश जी पोस्टर्स काढतात त्यांत प्रवाशांना हाक मारण्यासाठी या विचित्र ऊर्ध्वबाहूंची योजना केलेली असते.

हा कसला निसर्ग, असे कोणी म्हणेल तर त्याने मात्र जरा अमेरिकेच्या मध्य प्रदेशापर्यंत मजल मारली पाहिजे. त्या बाजूला ग्रँड कॅन्यॉन नावाचे अद्भुत त्याला झपाटून टाकेल. हा उलटा पर्वत आहे! सपाटीचा भूप्रदेश मुख्य मानला तर डोंगर कसे त्याच्याहून अधिक उंच असायला हवेत. पण इथे कोलोरॅडो नदीने भूमी खोदत खोदत खोल खोल दऱ्या निर्माण केल्या आहेत. त्यामुळे नदीच्या दोन्ही काठांवर पर्वतांचे विचित्राकार उभे राहिल्याचा भास होतो. त्यालाच म्हणायचे ग्रँड कॅन्यॉन! पण या उलट्या पर्वतांत खापे काय पडले आहेत, त्यांत मुरमाडे काय तयार झालेली आहेत, त्यांत तऱ्हेतऱ्हेचे रंग काय झळकताहेत! या सर्वांच्या पायथ्याशी पाताळाचा शोध घेण्यासाठी नदी खोल खोल जमीन पोखरत शतकानुशतके वाहते आहे.

निसर्गाच्या चिरंतन रूपांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. पण ऋतुमानाप्रमाणे निसर्गाचे जे बदलणारे रंगढंग असतात, त्यांची नवलाईही काही न्यारीच! थंडीने पाणी गोठते. पण म्हणजे काय समुद्रानेही गोठावे? समुद्रासमान असणाऱ्या सरोवरांनीही गोठून जावे आणि त्यांचे चक्क आरसे व्हावेत? मग नायगाऱ्याने काय करावे? नायगाऱ्याकडे कितीही वेळ, कितीही दिवस, कितीही महिने, कितीही वर्षे टक लावून कोणी बसला तरी नायगाऱ्याचे पाणी धो-धो कोसळतच असते. त्याला खळ नाही. त्याला चढउतार नाही. जसे काही खाली कोसळते तेच पाणी कोणी अदृश्य शक्ती अदृश्य पंपांच्या मदतीने पुन्हा वर चढवते आणि म्हणून धबधबा अखंड कोसळतच राहतो. पण समजा, शून्याखाली 60 अंश इतके तापमान घसरले आणि धबधबाही गोठला तर? छट्! नायगारा कसा गोठेल? असे म्हणतात की जुन्याजाणत्या लोकांच्या स्मरणात आहे त्याप्रमाणे एकदा आणि फक्त एकदाच नायगारा गोठला होता म्हणजे काय झाले असेल? वरून खाली झेप घेणारे पाणी अचानक मधेच स्तब्ध झाले असेल? एक काचेची खडबडीत भिंत तयार व्हावी तसे दृश्य नायगाऱ्यात दिसले असेल? तळाशी उसळणारे कोट्यवधी तुषार काय आकाशगंगेतील तारकांच्या चुऱ्याप्रमाणे अधांतरी तरंगले असतील? आणि हे सारे किती वेळ? किती वेळ थांबला असेल पाणी नावाच्या महाभूताचा अखंड घोष! अकस्मात अवतरलेल्या विलक्षण शांततेमुळे किती विचित्र वाटले असेल? माणसांनाच नव्हे तर पक्ष्यांना आणि कीटकांनाही? मला वाटते नायगारा एकदाही गोठला नसेलच. पृथ्वीचे भ्रमण क्षणभरही थांबत नाही तसा नायगाऱ्याचा प्रवाहही अविश्रांतपणे धो धो कोसळतच असणार. कारण नायगारा आहे निसर्गाच्या श्रीमंतीचा निखालस, निरपवाद पुरावा!

निसर्गसौंदर्य म्हटले की त्याच्या विकासाच्या खुणा चंद्र आणि चांदणे, नदी-निर्झर-समुद्रांचे पाणी आणि वन-उपवनांतील हिरव्या हिरव्या वृक्षवेलींवरील फुलाफळांचे बहार यांतूनच मुख्यतः आपण पाहतो. गुलाबांचे किंवा शेवंतीचे ताटवे, हजारो रानफुलांचे वाऱ्यावर झुलणारे दाट झुबके, वसंत ऋतूची द्वाही फिरवणारे रंगीबेरंगी फुलांनी लहडलेले वृक्ष... ही सगळी निसर्गाच्या वैभवाची राजचिन्हे आहेत असे आपल्याला वाटते. पण अमेरिकेतला निसर्ग असा श्रीमंत आहे बेटा की हिवाळ्याच्या पूर्वरंगात म्हणजेच शरद-हेमंत यांच्या सीमारेषेवर अमेरिकेत वृक्षांची पर्णशोभा अक्षरशः फुलांना लाजवून सोडणारी असते. या मोसमाला म्हणतात 'फॉल'. फॉल आला की एका रात्रीत रानेच्या राने कात टाकतात.

पानापानांवरचे रंग जादू झाल्यासारखे बदलून जातात. आता हिरवट पाने, काळपट पाने, करडी पाने, राखाडी पाने, तपकिरी पाने, भुरकट पाने, मातकट पाने असली गरिबीची वेषभूषा वृक्षा-वनस्पतींनी भिरकावून दिलेली असते, आणि हळदी, केशरी, लिंपवणी सोनेरी, तांबूस, लालचुटुक, गुलबाशी, कुसुंबी अशा उत्सवी रंगांचे पर्णसंभार वृक्षावृक्षांवर दाटलेले दिसतात. पाहावे तिकडे रंगपंचमीच सजलेली दिसते. फुलांच्या गमजा नकोत, हम भी कुछ कम नहीं असे निळ्याभोर आकाशाला बजावण्यासाठी असंख्य यूवा आपल्या कुंकमपताका वाऱ्यावर फडकवीत असतात.

या आव्हानाला फुलांचा दिमाख मिरवणाच्या वृक्षांपाशी उत्तर आहे, पण त्याच्यासाठी चेरी ब्लॉसम सीझनपर्यंत थांबायला हवे! 

एप्रिल महिन्यात वॉशिंग्टनचा परिसर अभूतपूर्व सौंदर्याने नटतो. कारण एकच: चेरी ब्लॉसम रंगात आलेले असतात! महायुद्धात पराभूत झालेल्या जपानने अमेरिकेला दिलेली ही बहुमोल खंडणी आहे. आता ही अमेरिकेची चिरंतन जायदाद झाली आहे. कालांतराने इतिहास विस्मरणाच्या दाट अंधारात नाहीसा होईल; पण भूगोल कसा पुसला जाईल? पृथ्वीभोवती ऋतूंनी धरलेला फेर शाश्वत काळ चालणारच आहे; आणि प्रत्येक ऋतूच्या आगमनासरशी सृष्टीचे रंगविलास तसेच होत राहणार आहेत. शतकानुशतके चेरी ब्लॉसम बहरणारच; आणि त्यांचे वैभव पाहण्यासाठी फुलवेडी माणसे आसुसल्यासारखी फुलांच्या मुलखात फेरफटका करायला जाणारच!

फुलांचे कौतुक सर्व देशांत आणि सर्वांनाच असते पण पानांचे कौतुक? होय, चक्क पानांचे कौतुक! 'फॉल' मध्ये रायाच्या राया, रानेच्या राने रंगदार पानांनी सजणार आहेत, एवढ्यावरच शौकीनांचे समाधान होत नाही. ही रंगशोभा सूर्योदयाच्या आधी अर्धा तास पाहिली, तर खरे 'नेत्र निर्वाण' लाभते, हे रसिकांना माहीत आहे. म्हणून महाबळेश्वरला अगर बिहारमध्ये 'नेतरहाट'ला सूर्यास्त पाहण्यासाठी अर्धा अर्धा तास टपून बसावे लागते; कौसानीला हिमालयाच्या रांगांवरून परावर्तित होणारे कोवळे ऊन्ह पाहण्यासाठी सूर्योदयापूर्वी क्षितिजावर टक लावून बसावे लागते; किंवा कन्याकुमारीला एकाच वेळी सूर्यास्त आणि चंद्रोदय पाहण्यासाठी दोन समुद्रांच्या संगमावर; आणि मुहूर्ताची वेळ साधून पौर्णिमेला टिपण साधावे लागते; तसे अमेरिकेतल्या 'फॉल'मध्ये पानांची रंगपंचमी सर्वात सुंदर अवस्थेत पाहण्यासाठी सूर्योदयापूर्वी अर्धा तास सुयोग्य स्थळी अदृश्य माचणीवर बैठक जमवावी लागते, टिपण साधावे लागते. मग हळदुल्या, नारंगी, लालवट, कुसुंबी, केसरिया पानांच्या दाटीला हळुवार हात लावणाऱ्या प्रकाशामुळे त्यांचे कवळे रूप कसे राजसवाणे होते, लसलस करू लागते, ते समजेल!

अमेरिकेते वृक्षकौतुक वेगळेच आहे. वृक्ष वनांतले , म्हणून अस्ताव्यस्त आणि प्रचंड. वृक्ष उपवनांतले, म्हणून विविधाकार आणि उत्तम पोसलेले. वृक्ष अंगणातले. वृक्ष परसांतले. छायाबहुल वृक्ष रस्त्यावर कमानी रचणारे. सर्वांच्या पायातळी अतिविशाल हिरवे हिरवेगार गालिचे. प्रमाणात रेखलेली अनाम फुलांची वेलपत्ती.

मला वाटते, मशागत न करता जे भाताचे पीक प्राचीन भारतात येई, त्याला देवभात (नीवार) म्हणत. अमेरिकेत निगराणी न करता बेफाम वाढणारी वनराई नांदत असते, तिला भाविक माणसांनी 'देवराई'च म्हणायला हवे! 

'पैशाकडे पैसा जातो' अशी आपल्याकडे म्हण आहे. अमेरिकेत सर्वच क्षेत्रात विपुलतेकडे विपुलता जाते, असं निःसंशय म्हणता येईल. जे पिकते, ते उदंड; जे विकते, ते प्रचंड. जे फुलते ते भरभरून; जे फळते ते रसरसून. निसर्गाची कृपा अशी की निसर्गाचे युगानुयुगांचे साथीसोबती जे प्राणी, तेही अमेरिकेत बख्खळ आहेत. अवाच्या सवा आहेत! 'फॉल'च्या सुमाराला मृगवंश भलताच फोफावतो. हरणेच हरणे‌! काही शहरांतून तर शहराच्या सीमेवरून जाणाऱ्या विदीमधून हरणांचे कळपच्या कळप धावत असतात. 'नका रे हरणे मारू...त्यांचा निर्वश होईल'- असे आपण आपल्या देशात कळवळून म्हणतो आणि त्या कळवळ्याची गरजही आहे. पण नुकत्याच संपलेल्या हरणांच्या 'शिज्जन'मध्ये हरणांची संख्या अमेरिकेत एवढी प्रचंड वाढली की त्यांच्या शिकारीला परवानगी दिल्याशिवाय अमेरिकन शासनाला गत्यंतरच नव्हते. तरी कनवाळू होऊन सरकारने या शिकारीवर मर्यादा घातली. मर्यादा काय माहीत आहे? 'या वर्षी फक्त दहा लाख हरणे मारण्यास परवानगी आहे!'- आता ही मारलेली हरणे कोण मोजते, माहीत नाही. बरे, या हरणांना 'गरीब बिच्च्यारी'- वगैरे म्हणण्यात सुध्दा अर्थ नाही. त्यांतले काही काळवीट तर असे दांडगे आणि मस्तवाल की ते रस्त्यातून जाणाऱ्या मोटरींवर हल्ले चढवतात! मोटरींच्या काचा कुणी लावून घेतलेल्या असल्या, तर आपल्या 'शिंगदार' डोक्यांनी हुशा देऊन ते काचांचा चुराडा करून टाकतात. तात्पर्य- हरणेही हिंस्त्र असू शकतात!

बाकी हरणांनाच बोल कशाला लावा! अमेरिकेतल्या प्रचंड उद्यानांतून ज्या खारी हिंडतात, त्यांची देखील भीतीच वाटते. एकतर त्या मुंगसाच्या दीडपट मोठ्या असतात: त्यांचा रंग काळाकुट्ट असतो. रामाची बोटे पाठीवर उठलेली खार म्हणजे त्यांत 'फॉरिनर'च समजली पाहिजे! काळ्या खारीचे डोळे रानमांजरासारखे वाटतात. आपल्या इवल्याशा हातांत भुईमुगाची शेंग धरून चिमुकल्या जिवणीत ती कोंबायची आणि मग भितुरड्या डोळ्यांनी इकडे तिकडे पाहत ती कशीतरी कुरतडायची: हे अमेरिकन खारींना मंजूर नाही. फरच्या कोटाच्या कॉलरएवढी गुबगुबीत शेपूट लबालबा हलवीत या महाकाय खारी झाडावर चढतात आणि तुरुतुरू पळतात, त्या आपल्या खारीसारख्याच त्यांची घरेही झाडांच्या ढोलीतच खुबीदारपणे केलेली असतात. पण त्या खातात मात्र अचाट. मिळेल ते फस्तच करतात. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान करु शकतात.

पण अमेरिकनांना याची चिंता नाही. पिकते ते इतके विपुल, की खारींनी खाऊन खाऊन फार मोठे नुकसान थोडेच होणार आहे!

Tags: देवराई. बहर निसर्गसौंदर्य नायगारा धबधबा निसर्ग निवडुंग कॅलिफोर्निया वसंत बापट Deorai Bahar Nature Beauty Niagara Falls Nature Nivdung California #Vasant Bapat weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके