डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

'पडघम' - एक प्रभावी, पण आक्षेपार्ह नाटक

मुख्य वस्तूच जिथं आक्षेपार्ह आहे, तिथे गायन अतिशय प्रभावी आणि जोरकस आहे. पडघम पाहताना शेवटपर्यंत बसावेसे वाटते, ते मुख्यतः या नवख्या पण गुणी गायकांमुळे! त्यांच्या तोंडी असलेली गाणी तसे पाहिले तर न धड छंदात वा मुक्त छंदात. त्यांची रचना साधूंना साधेल तशी. परंतु संगीत दिग्दर्शक हिकमती असला, तर तो अनुक्रमणिका आणि तळटीपा यांतूनही संगीत निर्माण करू शकतो! नाटकाची भाषा लेखकाने घेतलेल्या तिरस्कारगर्भ उपरोधाला साजेशी आहे.

मराठी रंगभूमीवर सध्या ‘पडघम’चा पडघम फार जोराने वाजत आहे. अरुण साधू यांच्या या नाटकाचे प्रयोग आधी पुण्याला झाले, आता मुंबईस होत आहेत. लवकरच पडघमचे बोल इतरत्रही दुमदुमू लागतील. नाटकाचे लेखक आजचे आघाडीचे कादंबरीकार आहेत. आणि राजकारणावर जळजळीत कटाक्ष टाकणारे त्यांचे लेखन आता सर्वांच्या, विशेषतः राजकीय आणि सामाजिक वर्तुळात वावरणाऱ्या मंडळींच्या मनात भरलेले आहे. ‘मुंबई दिनांक’ ही त्यांची कादंबरी आणि 'सिंहासन’ हा गाजलेला चित्रपट या त्यांच्या कृती त्यांच्या वैशिष्ट्यांचे उत्तम दर्शन घडवितात. साहजिकच अरुण साधूंचे नाटक रंगभूमीवर येण्याआधीच गाजू लागले यात काही नवल नाही. 

लेखक मातब्बर आणि दिग्दर्शकही जब्बार सारखा जबर ताकदीचा. ‘खेळिये’ थिएटर अ‍ॅकॅडमीचा. म्हणजे खेळ आकर्षक आणि रंगतदार होण्याची हमीच. नाटकाचा आकृतिबंध वेगळा, तसा खेळही अभिनव उपक्रमांनी सजलेला असणार, ही खात्री. त्यामुळे ‘पडघम’ने आधीच फार मोठ्या अपेक्षा निर्माण केल्या होत्या. 

पडघमविषयी अरुण साधूंचे छोटे निवेदन पुस्तकाच्या मलपृष्ठावर वाचायला मिळते. नाटकाला कथा आहे आणि नाहीही, असे ते म्हणतात आणि ते बरोबरही आहे. पात्रांना नावे आहेत ती नाममात्र कारण पात्रे मुख्यतः प्रतीके आहेत. 

'एक सर्वव्यापी प्रस्थापित व्यवस्था आणि त्याविरुद्ध समाजाच्या अंतःप्रवाहातील खळबळींमुळे उभे राहणारे संघर्ष’ हा नाटकाचा विषय आहे असे सांगून लेखक आपली भूमिका स्पष्ट करताना म्हणतात-‘प्रस्थापित व्यवस्था तळातून उचंबळून येणाऱ्या शक्ती दडपून टाकण्यासाठी विविध रूपे घेते, आकार घेते, उपाय योजते. 

व्यवस्था स्थितिशील नसते. समाज तिला तसे राहू देणारही नाही. बदल हा निसर्गाचा आणि सामाजिक जीवनाचाही नियम आहे. समाजाच्या विविध स्तरावर अपरिहार्यपणे संघर्ष उभे राहात असतात. असे संघर्ष कधी वाया जात नाहीत. या संघर्षातून निर्माण होणारे स्फुल्लिंग प्रस्थापितात मिसळून-विझून जाताना दिसतातही. पण बदललेल्या परिस्थितीत पुन्हा नव्या उमेदीने, नव्या युद्धाचे, नव्या युगाचे पडघम वाजू लागतात.'

प्रत्यक्ष नाटक पाहताना मात्र नव्या युद्धाचे, नव्या युगाचे पडघम नव्या उमेदीने वाजू लागतात, असा प्रत्यय अखेरीस येण्याऐवजी अटळ आणि घनघोर नैराश्याचा प्रत्ययच येतो. पुस्तकाच्या मलपृष्ठावर सूचित केलेले नव्या उमेदीचे आशावादी प्रसादचिन्ह दिसण्याऐवजी वैफल्यग्रस्त ‘सब झूट'-वादाचा आविष्कार आपण पाहिला, या भावनेनेच प्रेक्षक भारला जातो. उपहास आणि उपरोध यांच्या दुधारी वस्तऱ्याने एकजात सर्वांची उलटीसुलटी केल्यानंतर नाट्यवस्तूला काही भावात्मक दिशा देणे लेखकाला अशक्यच झाले आहे. ‘पडघम’ हे या दृष्टीने अपेक्षी नाटक आहे, हे स्पष्टपणे सांगितले पाहिजे. नाटकाचा शेवट गोडच असावा, असला अजागळ भाबडा विचार माझ्या मनात नाही. समाजाचे वस्त्रहरण करून त्यांची सर्व व्यंगे प्रकाशात आणणे, या गोष्टीला विशिष्ट मर्यादेपर्यंत खूप महत्त्व आहे, असेच मी मानतो.

परंतु ‘हम सब चोर हैं’, ‘ सब घोडे बारा टक्के ‘, असले सब-झूटवादी (सिनिकल) तत्वज्ञान अरुण साधूंना अभिप्रेत आहे काय? असेल, तर निवेदनामधील ‘समाजाच्या विविध स्तरांवर अपरिहार्यपणे संघर्ष उभे रहात असतात, असे संघर्ष कधीच वाया जात नाहीत’ या नकारात्मक विधानाचा अन्वय कसा लावायचा? सर्व संघर्ष वाया जातात, प्रामाणिकपणाचे बळकट तंतू झिरझिरीत होतात, नंगी दांभिकता मात्र बलवत्तर होत जाते, नव्या दमाच्या तरुण नेतृत्वाचाही अधःपात अटळ असतो, याच गोष्टी पडघममध्ये अरुण साधू ओरडून सांगत आहेत असे वाटते. पडघमचा खेळ यशस्वी करण्यासाठी रंगकर्मीनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे आणि परिणामी नाटकात, निदान त्याच्या पूर्वार्धात, प्रस्थापित समाजाच्या चिंध्या चिंध्या करणारा हा खेळ अतिशय प्रभावी झालेला आहे. किंबहुना प्रयोगाचे सामर्थ्य, सफाई आणि प्रभावशीलता वाढविल्यामुळेच मुख्य नाट्यवस्तूंची अनिष्टता अधिकच निराशा करते. एका दीर्घ दणदणीत गदारोळानंतर पडघम ऐकू येतात ते नव्या उमेदीचे, नव्या युद्धाचे नसतात, ते असतात वांझोट्या तुच्छता वादाचे! आणि हे तर नाटककाराने केलेल्या जाहीर निवेदनाशी अगदीच विसंगत आहे.

पडघमला कथा आहे आणि नाहीही. त्याप्रमाणे नाटकालाही नायक आहे आणि नाहीही. कारण साधू म्हणतात तशी ती एका व्यक्तीची कथा नव्हे. तरीही प्रवीण नामक प्रतीकात्मक पात्राच्या परिमाणानेच पडघमची शोकात्मता मोजावी लागते. पडघमसारख्या कृतीचे कथानक सांगणे अशक्य असले, तरी नाट्यवस्तूला काही सूत्र असावे लागते, आणि तसे ते येथे आहेही. आरंभ भाबडेपणाच्या विनोदी दर्शनाने होतो. मग विद्यापीठातील सर्व घटक म्हणजे विद्यार्थी, प्राध्यापक, व्हाईस चँन्सेलर, इत्यादींची भरपूर खिल्ली आपण पाहतो. 

सर्व शिक्षण म्हणजे फसवणुकीचा प्रचंड खेळ चालू आहे, अशा निष्कर्षाला आपण येतो. ओघाओघाने दंगल येते. म्हणजे 'पोलिस व्हायोलन्स’ आालाच. विद्यार्थ्यांचा नेता होऊ पाहणारा प्रवीणच त्याचा बळी होणे नाटकात क्रमप्राप्तच. या पोलिसी अत्याचाराच्या भडक दर्शनावरच नाटकाचे मध्यंतर योजिले आहे. या पूर्वार्धात प्रेमाच्या लफड्याची टिंगल, प्रोफेसरांचा पोकळपणा आणि ढोंग, मार्कांची टक्केवारी आणि व्यावसायिक शिक्षणामध्ये होणारी नाकेबंदी इत्यादी सर्व मसाला आहेच. पण मुख्य म्हणजे प्राध्यापक हर्षे – यांच्या अ‍ॅसेम्ब्लीच्या निवडणुकीचा फार्सही बऱ्याच तपशिलाने आला आहे. त्यानिमित्ताने निवडणूक प्रचाराचे नमुने, त्यातल्या ढोंगी घोषणा, जातीयता, गावगुंडांचा सहभाग, आणि आता निळू फुल्यांनी ‘लई म्हणजे लईच ओळखीचा करून टाकलेला’ बहुजन समाजातला पुढारी, असे अनेकानेक उपहास्य विशेष साधूंनी आपल्या शस्त्राने सोलून काढले आहेत. प्रस्थापित व्यवस्थेचे सर्वात भयावह रूप म्हणजे ठोकळेबाज पोलिस यंत्रणा. तिलाही सतत वेठीला धरलेले आहेच.

सर्व बाजूंनी गिरगिरणाऱ्या गलिच्छ पाण्याच्या भोवऱ्यात प्रवीण नेर्लेकर ही एकच डोलकाठी ताठपणाने उभी राहील, अशी अपेक्षा प्रेक्षकांच्या मनात निर्माण करीत पहिला अंक संपतो. पण दुसऱ्या अंकात ही डोलकाठी लेचीपेची झाल्याचे दर्शन आपल्याला घ्यायचे असते. आता प्रवीणचे पुढारीपण प्रतिदिन, प्रतिमास वाढू लागते आणि तेही इतर पुढाऱ्यांप्रमाणे फोपसेच असते. त्याची लढायची जिद्द संपते. तो उपलब्ध, म्हणजेच प्रस्थापित साधनांचा उपयोग करून घेण्याची भाषा बोलू लागतो, आणि सर्वाची वंचना करीत करीत, नाटक संपते तेव्हा, राज्यपालांसमोर मंत्रिपदाची शपथ घेण्यापर्यंत त्याची मजल जाते.

हे सर्व घडत असताना प्रो. हर्षे यांची धोतरफेड पुढे चालू राहते. भाबड्या, स्वप्नाळू अंजूचा प्रेमभंग होतो. त्याऐवजी कॉम्रेड सुनीता प्रवीणवर प्रेम करू लागलेली असते व तिचे बाकीचे कॉम्रेड्स तिची टवाळी करीत असतात. आर्. एस्.एस् पासून मार्क्सवाद्यांपर्यंत सर्वांची खिल्ली करीत करीत नाटक ‘त्याच त्याच खड्ड्यांमध्ये पुन्हा पुन्हा तोच पाय’ हे विंदा करंदीकरी सूत्र पकडून एका भयाण पोकळीत गिरगिरत राहते. शेवटी तर वाटते की, हे नाटक प्रस्थापित व्यवस्थेमध्ये असणारा विरोध आणि त्याविरुद्ध अटळ असणाऱ्या संघर्षाचे चित्र काढीत नाही, तर सर्व ध्येयवाद म्हणजे बावळटपणा, सर्व राजकीय तत्त्वज्ञान म्हणजे आर्गनबाजी आणि सर्व राजकीय पक्ष म्हणजे दांभिकतेची माहेरघरे, असे आम जनतेच्या मनावर ठसवण्याचे काम करते. असली निःसंग नकाराची भूमिका घेतली तर, प्रस्थापितांची अवस्था डळमळण्याऐवजी उलट यावच्चंद्रदिवाकरी कायम मात्र होऊन बसेल आणि असे होणे लेखकाला तरी आवडेल काय?

मुख्य वस्तूच जिथं आक्षेपार्ह आहे, तिथे गायन अतिशय प्रभावी आणि जोरकस आहे. पडघम पाहताना शेवटपर्यंत बसावेसे वाटते, ते मुख्यतः या नवख्या पण गुणी गायकांमुळे! त्यांच्या तोंडी असलेली गाणी तसे पाहिले तर न धड छंदात वा मुक्त छंदात. त्यांची रचना साधूंना साधेल तशी. परंतु संगीत दिग्दर्शक हिकमती असला, तर तो अनुक्रमणिका आणि तळटीपा यांतूनही संगीत निर्माण करू शकतो! नाटकाची भाषा लेखकाने घेतलेल्या तिरस्कारगर्भ उपरोधाला साजेशी आहे. पण तो उपरोधच पुढे पुढे बटबटीत आणि ढोबळ झाल्यामुळे त्याची धारच नाहीशी होते. दिग्दर्शक जब्बार पटेल यांना या नाटकाकडे लक्ष देणे बहुधा अधून मधून शक्य झाले असावे. नाटकाची संहिता बरीच छाटलेली दिसते.

मात्र जी शिल्लक ठेवलेली आहे ती आत्यंतिक पुनरावृत्तीमुळे कंटाळवाणी करण्याचे काम दिग्दर्शकाकडून झाले आहे. त्यातच ' घाशीराम,' 'महा-निर्वाण' आणि 'तीन पैशांचा तमाशा' यातील लकबींचे पुन्हा दर्शन घडविण्याच्या मोहाची भर घातली की दिग्दर्शन अधिकच सदोष वाटू लागते.  हे सर्व लक्षात घेतले, तरी नाटक प्रभावशून्य आहे, असे बिलकुल म्हणता येणार नाही. आणि नेमक्या याच कारणासाठी ते अधिक भयावह आणि आक्षेपार्ह वाटते! रंगभूमीचा लोकमानसावर परिणाम होत असेल, तर अशा तुच्छतावादी नाटकांमुळे संघर्षातली हवा काढून घेण्याचा आणि ध्येयवादाचा कायमचा बंदोबस्त करण्याचा लेखकाचा हेतू तडीस जाण्याचा संभव आहे! याहून अधिक दुःखाचा दिवस कोणता?

Tags: नाटक. निळू फुले सिंहासन मुंबई दिनांक जब्बार पटेल अरुण साधू पडघम Play Nilu Phule Sinhasan Mumbai Dinank Jabbar Patel Arun Sadhu Padgham weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके