रत्नागिरीला मैदानात गुरुजींच्या भाषणाचा गंगौध सुरू झाला ही संधी साधून आम्ही तासभर समुद्रात डुंबू शकलो. ज्ञानेश्वर महाराज काही आपण पाहिलेले नाहीत पण गुरुजींची धाटणी थेट तशीच. नटवण्यासाठी नाही तर पटवण्यासाठी अलंकार. दुनियेतल्या सर्व देशांतून टिपून घेतलेले दृष्टान्त आणि कहाण्या. वेदापासून बायबलपर्यंत कोठून कोठून मनात उतरलेली अवतरणे! चार महिन्यांत आम्हां सर्वांची मने किती श्रीमंत झाली! हृदयाची कवाडे उघडली.
9 ऑगस्ट 1946. मी उभ्या केलेल्या महाराष्ट्र शाहीर पथकाचा पहिला कार्यक्रम नाशिकच्या सर्कल सिनेमागृहात यशस्वीपणे पार पडला. नाशिककर रसिकांनी वारंवार टाळ्यांचा कडकडाट करून पथकाला खूपच प्रोत्साहन दिले. मग नाशिक जिल्हा पिंजायला आम्ही सुरुवात केली. कसबे सुकेणे, लासलगाव, मालेगाव, निफाड… मग पुणे जिल्ह्यातल्या जत्रा, यात्रा. कधी सुपारी मिळायची. कधी आपणच आपल्या फडाचा खेळ लावायचा. रंगयात्रा सुरू झाली. जवळ वादये होती गरजेपुरती. कपडेपटाचा जामानिमा जेमतेम पण छातीत दम होता. दोन्ही फुफ्फुसे भरून, कार्यक्रमात लीलाधर हेगडे आणि भाल वायाळ असे तडफदार शाहीर होते, ते दणदणीत पोवाडे म्हणत. दत्तोबा पुरोहित कव्वाली रंगवीत. मुंबईचे काका केणी हे फार गोड गळ्याचे गायक होते. त्यांची मधुर गाणी ऐकणाऱ्याची तबियत खूप करीत. लोकांना हसवत हसवत त्यांचे शिक्षण करणे हा उपक्रम.
महाराष्ट्र शाहीर पथकात गौरीशंकर नावाचा वग लोकांचे भरपूर मनोरंजन करून आम्ही करत असू. भालू मास्तर माडगूळकर मोठा गमत्या माणूस. तो घोडे पेरायची गोष्ट सांगून अर्धा तास भरपूर खसखस पिकवी हे सर्व ठीक होते - म्हणजे छान होते. पण आमचा तमाशा बाईशिवाय होता. बाई शिवाय तमाशा…बाई शिवाय तमाशा लासलगावच्या लोकांना सहन होईना तेव्हा श्रोत्यांमधून एक जोरदार आवाज आला - तुमच्या बापाने कधी तमाशा केला होता का? आम्ही धीरगंभीर उत्तर दिले, नाही. पण आम्ही करणार आहोत. खरे तर आम्ही आता किंकर्तव्यमूह का काय ते, झालो होतो.
नेमकी त्याच क्षणी साने गुरुजींची हाक आली - "मी माझ्या महाराष्ट्रातील सर्व बंधुभगिनींना आवाहन करीत सर्वत्र दौरा करणार आहे - तुम्ही अस्पृश्यता नष्ट करा. तुमच्या हृदयाची कवाडे उघडून टाका. त्याचे प्रतीक म्हणून अयोध्या महाराष्ट्राच्या दैवताच्या मंदिराची - पंढरपूरच्या विठोबाच्या मंदिराची दारे हरिजनांना खुली करायला पाहिजेत. हे झाले नाही तर मी आमरण उपोषण करीन. पण आधी 'या रे या रे अवघे जन' म्हणत महाराष्ट्रभर फिरेन. माझ्या बरोबर गाणी पोवाडे म्हणणारे, लोकनाट्य रंगवणारे येतील का कोणी तरुण? आम्ही ताबडतोब कळवून टाकले - आले महाराष्ट्र शाहीर! गुरुजी, आम्ही संपूर्ण दौरा तुमच्या बरोबर करू. तुम्ही गावोगाव तुमचा संदेश सांगा.
आम्ही प्रत्येक सभेच्या आधी गाणी गाऊ. रात्री रंगभूमीवरून प्रबोधनपर नाटुकली करू. गुरुजी, आम्ही तुमचीच धडपडणारी मुले आहोत. तुमची हाक आल्यावर आम्ही तुमच्या मागे येणारच. आले महाराष्ट्र शाहीर! नव्या युगाचे नव्या दमाचे नवीन आले वीर साने गुरुजींबरोबर केलेल्या दौऱ्यात, एकदा रात्री आम्ही स्टेजवर उभे, आले महाराष्ट्र शाहीर॥
राहिलो तेव्हा लक्षात आले की एक नवा कलाकार महाराष्ट्र शाहीर पथकात आला आहे. त्याचे नाव पांडुरंग सदाशिव साने! साने गुरुजींचा दौरा हरिजन मंदिर प्रवेशासाठी साऱ्या महाराष्ट्राच्या न्यायबुद्धीला आणि अंतःकरणातील शुद्ध भावनांना जाग आणण्यासाठी निघाला होता.
समाजपरिवर्तन केवळ कायद्याने होणार नाही, व्यक्तिमात्राच्या अंतःकरणात प्रबळ प्रेरणा निर्माण झाल्या तरच होईल, ही या दौऱ्यामागची भूमिका होती आणि या भूमिकेचा पाठपुरावा करण्यासाठी गुरुजींनी आपल्या अंतःकरणातील प्रबळ भावशक्ती पणाला लावली होती. शेकडो मैलांचा प्रवास सतत करण्यासाठी हवी अथक परिश्रम करण्याची ताकद, तिची कमतरता नव्हती. पण अखंड यात्रा म्हटली की अखंड आर्थिक पाठबळाची हमी हवी. तिची वानवा होती. एक गोष्ट खरी, साने गुरुजी सर्वस्व समर्पणाच्या उदात्त भावनेने पेटून उठले होते आणि आपल्या प्राणांची चूड हाती घेऊन, आता उठवू सारे रान आता पेटवू सारे रान' या गर्जनेसह परिवर्तनाचे अभिनव अभियान सुरू करणार होते. एखाद्या धावत्या आगलोळासारखे हे अभियान अवघा महाराष्ट्र चेतवणार होते.
ही कल्पना इतकी विलक्षण होती.... तरुणाईला आव्हान देणारी होती! आम्ही म्हणजे स्वनामधन्य महाराष्ट्र शाहीर अत्यंत उत्साहाने यात सामील व्हावे हे स्वाभाविकच होते. दौरा होता चार महिन्यांचा. त्याची सांगता होणार होती चंद्रभागेच्या वाळवंटात. मोहीम दीर्घ होती, कष्टाची होती. अच्युतराव आणि रावसाहेब पटवर्धन, एस. एम.जोशी यांसारख्या तत्कालीन युवा नेत्यांनी साने गुरुजीना सुचवले होते की आधी आपली भूमिका गावोगाव पटवून यावी, प्रचाराची आधी धामधूम करावी आणि नंतरच प्रायोपवेशनासारखा अंतिम पवित्रा घ्यावा. ही कल्पना सेनापती बापट, हरिभाऊ फाटक, काकासाहेब बर्वे या ऋषितुल्य मंडळींनीही उचलून धरली सुदैवाने गुरुजींनी कल्पना मान्य केली आणि 11 जिल्ह्यांत हा 110 दिवसांचा चलत यज्ञ पुरा करण्याचे ठरले. ठिणगी पडली, नौबत झडली. चलती का नाम गाडी या आप्तवाक्याला अनुसरून जिला गाड़ी म्हणता येईल ती चालू लागली. छावणी हलू अगली… वा अभियानाचे नायक होते साने गुरुजी. त्याला बळकट नैतिक आधार दिला होता सेनापती बापट यांनी. सेनापती - आम्हां सर्वांचे पितामह तात्या - संपूर्ण दौऱ्यात, साने गुरुजींच्या यात्रेत पाठीराखे म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत राहिले. दर दिवशी शे-पाऊणशे मैलांचा प्रवास. दिन प्रतिदिन पाच पाच, सहा सहा भाषणे साने गुरुजी करीत. काही छोटी, काही मोठी. वाऱ्या-पावसामुळे, उन्हामुळे, धुळीमुळे आणि प्रवासाच्या रेट्यामुळे कधी आवाज थके, कधी ताप येई. पण चैतन्याने रसरसलेल्या साने गुरुजींना विश्रांती नको होती, न विरंगुळा हवा होता.
साने गुरुजींचे भाषण कसे असे ते शब्दांनी सांगताच येणार नाही. ते व्याख्यान नसे, प्रवचन नसे. त्याचा वेग आणि आवेग जबरदस्त असला तरी त्यात प्रचाराचा भडक उमाळा नसे. एकाच वेळी पुराणप्रिय धर्ममार्तडांना आव्हान आणि धर्मजिज्ञासूंना आवाहन करण्याची शक्ती गुरुजीच्या वाणीत होती. कधी गुरुजींच्या शब्दांतून मंत्रशक्ती प्रगटे तर कधी ऐकणाऱ्यांच्या मनावर मूर्तिमंत करुणेचा, वात्सल्याचा वर्षाव होई. ते बोलत एका वेळी हजारो श्रोत्यांशी. पण प्रत्यक्षात प्रत्येक श्रोत्याशी त्यांचा हृदयसंवाद होत असे. 'ये हृदयींचे ते हृदयीं' घालणारा हा अखंड वाग्यज्ञ होता आणि त्याचे पसायदान गुरुजींचे उदात्त आणि व्यापक प्रेम हेच होते.
या दौऱ्यात साने गुरुजींची उत्कट वाणी पिऊन घेण्यासाठी श्रवणीच फुटलेल्या जिभा' चटावल्या होत्या. ऐकणाऱ्याच्या मनाचे मालीन्य धुवून जावे आणि अंतःकरणाला शब्दातीत समाधान व्हावे अशी गुरुजींच्या भाषणाची शक्ती होती. अर्थात् गुरुजींच्या कार्यक्रमात छोटे ख्याल गाणारी, चटपटीत वक्तृत्वाने सभेला हसवणारी, खुलवणारी अशी लहानमोठी कलाकार मंडळी अधूनमधून असतच. अर्धशतक उलटले तरी क्रांतिसिंह नाना पाटील यांची जनमनाला गुदगुल्या करीत चाललेली टोलेबाजी विसर म्हणता विसरता येत नाही महाराष्ट्र शाहिरांनी साने गुरुजींना साथ दिली आणि साने गुरुजींनीही शाहिरी पथकाची, त्याच्याशी एकरूप होऊन साथसंगत केली. 'स्मॉल इज ब्यूटिफूल' हे सूत्र गुरुजींच्या जीवनात मुरलेले होते. त्यांनी मनोरंजन केले ते मुलांचे, त्यांच्या लेखणीतून साहित्यगंगा स्त्रवली ती बालांसाठी कुमारांसाठी. त्यांना नारायण दिसला तो इवल्याशा अश्रूंत. त्यांना प्रिय होती चिमुकली फुले, त्याचा आदर्श होता अंधार दूर सारणारी चिमुकली पणती.
एके काळी त्यांनी रॉकेलचे डबे बडवून देवाच्या नावे गदारोळ केला असेल पण आमच्या वाद्यमेळात त्यांना आवडे ती छोटी मंजिरी. वाद्यमेळात डफ होता, ढोलकी होती, नवाथे मास्तरांची पेटी होती, भाल वायाळ किंवा लीलाधर यांच्या हातांतली दिमडी आणि खंजिरी होती. कुतुबच्या हातातले तुणतुणे होते. पण सर्वात मंजुळ किणकिण वाजायची ती साने गुरुजींनी हातात घेतलेली चिमुकली झांज, कोकणात फिरत असतानाची गोष्ट. महाराष्ट्र शाहिरांचा पोवाड्याचा आणि गाण्याचा कार्यक्रम सुरू झाला.
वेळ रात्री दहाची. आता सेनापतींनी हरिस्मरण करीत पापण्या मिटल्या असतील. साने गुरुजीही थकून गाढ झोपेत असतील, पण आपल्याला उत्तररात्रीपर्यंत कार्यक्रम रंगवला पाहिजे अशा बुद्धीने महाराष्ट्र शाहीर एका ठिकाणी - बहुधा रोह्याला-जोसात आलेले असताना याद्यांच्या गदारोळात मंजुळवाणी मंजिरी तेवढी किनरी किणकिण करत होती. गायक कलाकारांनी चमकून मागे वळून पाहिले तो साथीला उभे असलेले दिसले - साने गुरुजी. गुरुजींच्या मनात भक्तिभावनेचे ध्वनी असतील संगीताची ओढ असेल पण याबरोबर एक वत्सल भावनाही होती. ही मुलंही शिणली भागली असतील, पण कर्तव्यभावनेने रंजनातून प्रबोधन करण्यासाठी सारे श्रम विसरून सगळे जण रात्र जागवणार आहेत, मग मी झोपून राहू, असे मनाशी पुटपुटत त्यांनी हळूच रंगभूमीवर प्रवेश केला असेल आणि छोट्यांतले छोटे वाद्य उचलून ते तल्लीन झाले असतील.
फड गाजायचा असेल तर शब्दब्रह्माचेही उत्कट सुंदर आविष्कार लाभावे लागतात. साने गुरुजींच्याच भावपूर्ण गीतांची शिदोरी जवळ असल्यावर 'महाराष्ट्र शाहीर’ ला काय कमी? घ्या रे हरिजन घरात घ्या रे, घरात घ्या रे, घरात घ्या’ प्रश्न फक्त देवळाची दारे हरिजनांना खुली करण्याचा नाही, त्यांना घरात घ्या, तुमच्या अंतःकरणात त्यांचा शिरकाव होऊ या. हरिजन आणि सवर्ण या भेदाला मूठमाती द्या. तरच तुम्ही 'चारी मुक्ती साधियेल्या'. विठ्ठलाचे मंदिर हे केवळ प्रतीक. त्याच्या दारापेक्षाही घट्ट बंद झाली आहेत ती तुमच्या मनाची कवाडे, ही गुरुजींची शिकवण या कवनात व्यक्त झाली आहे.
यालाच अनुसरून वसंत वापट यांचे एक गीत गायले जाई - 'उघडा हृदयकवाडे अपुली उघडा हृदयकयाडे' या महाराष्ट्राच्या आनंदवनभुवनी आम्ही हे परिवर्तन घडवून आणणारच, हा निश्चय पु. ल. देशपांडे यांच्या गीतात उमटला -
'हरिचे प्यारे हरिजन आम्ही बसलो हरिचरणी,
पंढरिराया राउळि तुमच्या बसू धरुन धरणी॥'
शाहीर पथकाच्या कार्यक्रमात लोकांच्या अंतःकरणाला उघड उघड साद घालणारी अशी गाणी असतच पण त्या बरोबर
'मिराबाइची मंजुळ भजने आणिति प्रभुला जाग
दारि सावतामाळी फुलवी सुंदरशी फुल्याग॥
साळी माळी महार गवळी शिंपी मोमीन
सारे झाले प्रभुला प्यारे नाहित कुणि हीन॥'
अशी जातिभेदांचा पाया हळुवारपणे उद्ध्वस्त करणारी गाणीही कार्यक्रमात असत.
रामनवमी नावाचे एक नाटुकले ऊर्फ वग सादर होत असे. आता त्याची संहिता कुणाजवळ नाही. तो आता आठवणीतही नाही. पण एवढे स्मरणात आहे की त्यात विठू महार म्हणून एक पात्र होते आणि त्याचे काम कुळकुळीत रंगाचा पण धरधरीत नाकाचा राजा मंगळवेढेकर नावाचा पंढरपुरी पोरगा करीत असे! साने गुरुजींनी आम्हाला 'या' म्हटले आणि आम्ही लगोलग गेलो त्यांनाही कल्पना नसेल आणि आम्हांलाही कल्पना नव्हती की मंदिर प्रवेशामागची भूमिका सांगणारी भाषणे आणि शाहीर पथकाचे कार्यक्रम या दोन गोष्टी वेगवेगळ्या राहणारच नाहीत मुळी! खरे म्हणजे आमचे स्थान दुय्यम; पण वाजवा रे वाजवा म्हटल्यावर आम्ही डफ - तुणतुण्यांची वाजंत्री सुरू करायची, अशी अवस्था कधीच आली नाही रानात काही पावले एकत्र चालल्यावर मैत्र आपोआप जुळते म्हणे.
तसेच घडले या मंदिरप्रवेशासाठी सुरू केलेल्या दीर्घ दीर्घ दौऱ्यात. डकाव डकाव चालणाऱ्या टपवाल्या गाडीतून बहुतांश दौरा झाला. सर्वांचा प्रवास एकत्रच व्हायचा. क्वचित कधी गुरुजी आणि सेनापती वेगळ्या गाडीतून जायचे आणि पथक त्यांच्या पुढे किंवा मागून मुक्कामावर पोचायचे. प्रवासात गुरुजी निवांत बसले किंवा निःस्तब्ध राहिले तरी सेनापती म्हणजे आमचे तात्या सतत गप्पागोष्टी करीत, गमतीजमती करीत. त्यांचे सुत्र बहुधा असे होते - चालू गाडीत कोट्या आणि मुक्कामावर पोचल्यावर गोट्या! साने गुरुजी आणि महाराष्ट्र शाहीर यांची एकत्र भ्रमंती म्हणजे आनंदयात्राच झाली.
आमच्या जेवणखाणाच्या तयारीत हातभार लावणारा मुळे नावाचा एक पोरगेला वल्लव होता. पथकातली मंडळी रोज त्याचे नवीन नाव ठेवायची. कधी बहादुरशहा, कधी नेपोलियन मधेच विनयकुमार की लगोलग दुसऱ्या दिवशी मल्हारराव, कधी साधे नाव बाळू. पण बऱ्याच जणांनी आवडीने दिलेले नाव पोप्या. मुळे सगळी मस्करी आनंदाने स्वीकारायचा. आम्ही टवाळ टोळीतले लोक असे धरून चाललो होतो की गुरुजी आणि तात्या अशा वडीलधाऱ्यांना आम्ही करीत असलेली गंमत माहीतच नाही. पण एक दिवस आमचा भ्रमाचा भोपळा फुटला. त्या दिवशी सकाळी गालातल्या गालात हसत गुरुजींनी विचारले, 'आजचे नाव काय ठेवले? आम्ही चपापून सांगितले 'आज साधेच नाव आहे.
पोप्या.' गुरुजींनी लगेच त्याला हाक मारली, 'पोऽप्या.' पोप्यानेही ताबडतोब प्रतिसाद दिला - 'ओ ओ!' अशा वेळी खूप हशा पिके. या पोप्याबद्दल गुरुजींना खुप प्रेम वाटे. दादू आणि राजू अशी दोन अर्काट पोरे आमच्या बरोबर होती. ती पुण्याच्या मांगवाड्यातून आलेली होती. त्यांना खाणेपिणे मिळते आहे की नाही यावर गुरुजींचे दुरून पण बारकाईने लक्ष असे. तसाच गडहिंग्लजला येऊन मिळालेला कुतुब नावाचा मुसलमान कलाकार. तो खरोखर 'नावाचा मुसलमान' होता. एरवी शंभर टक्के वारकरीच जसा, तोही गुरुजींचा लाडका झाला होता. सर्व खेळीमेळीत अशा काहीशा त्यक्त बहिष्कृतांविषयी गुरुजींचा पोटकळवळा लक्षात घेण्याजोगा होता.
तात्यांची कुठेही उपेक्षा होऊ नये यावर गुरुजींचा कटाक्ष असे. त्यांनी सांगूनच ठेवले होते, तात्यांची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे वाटभर तात्यांसाठी चुरमुऱ्याच्या भेळीची पिशवी तयार ठेवत जा, अशी गुरुजींची सूचना होती. तात्या आपल्या खाद्याला लेनिन मिक्स्चर म्हणत. एक दिवस प्रवासाच्या धांदलीत शिदोरीची पिशवी करून घ्यायला आम्ही विसरलो. गुरुजींना ते आवडले नाही. त्यांनी आम्हांला खडे बोल सुनावले - 'तात्यांची एवढी साधी इच्छा तुम्ही पुरवू शकत नाही का? पुन्हा अशी चूक करू नका. बरे तात्या तरी दोन-तीन फक्क्या फक्त मारायचे. बाकीचे मिक्स्चर मुठी भरभरून आम्हालाच देऊन टाकत. एकदा रस्ता एवढा धुळीचा होता की आमच्या खायात धुळीचे मित्रण होणे अटळच होऊन बसले.
आम्ही भीत भीत तात्यांना म्हटले, 'चुरमुऱ्यांत धूळ गेल्यावर आपण भेळ कशी खायची तात्या?' त्यावर तात्या गमतीने गुरुजींच्या शैलीत म्हणाले, 'धूळ का वाईट? अरे तो उलट आणखी एक मसाला तात्पर्य, ब्रह्मवेत्त्वाला सबकुछ ब्रह्मच! कागदात बांधलेली काळ अधिक चटकदार का याचे इंगित तात्यांना बरोबर ठाऊक होते. स्वच्छ हातांनी, स्वच्छ पदार्थांची भेळ केली तर धूळ नावाचा एक मसाला कमी पडतो ना! खानदेशातली गोष्ट. सीतारामभाऊ चौधरी म्हणजे मजबूत हाडपेराचा भलाभक्कम जीभाऊ. त्यांच्या वजनामुळे म्हणा की आणखी कशामुळे, आम्हांला वाहून नेणाऱ्या गाडीचे एक चाक सुटले आणि शेतात जाऊन पडले.
ढिले नट बोल्ट हे आमच्या वाहनाचे एक आगळे वैशिष्ट्य होते! पण जनताजनार्दनाच्या आशीर्वादाने आणि मुख्य म्हणजे गाडी चढावर असल्यामुळे ती तीन चाकांवर उभी राहिली नाहीतर तपस्वी सेनापती, मनस्वी साने गुरुजी आणि सर्वस्वी वेडे शाहीर पथक सर्वाचीच अंतिम गच्छन्ती झाली असती. दौऱ्याचा शेवट पंढरपूरला न होता खानदेशातच झाला असता. पण नाही, सदैव सैनिका पुढेच जायचे! कोकणातून उत्तरेला सरकलो तेव्हाची गोष्ट. रात्र काळोखी होती गुरुजी आणि तात्या पुढे गेले होते. वाहनाच्या लायटी बंद झाल्यामुळे पेण ते पनवेल 18 मैल अंतर कसे काटायचे हा प्रश्नच होता. पण काही नाही. गाडीच्या पुढत्या मडगारर्डावर आमच्यापैकी दोघेजण हातात टॉर्च ऊर्फ विजेऱ्या घेऊन पालथे झोपले आणि तेवढ्या प्रकाशात पनवेलीस पोचलो. पोटात खडा पडला होता तो भुकेमुळे की भीतीमुळे, समजत नव्हते.
एक खरे की शंभूशेट या पनवेलच्या उदार माणसाने ऊनऊन भात खाऊ घातला आणि आम्ही बचलो. असे किती प्रसंग सांगावेत? आमचा मान राखल्याचे आणि अपमान केल्याचे. आमची खादाडी यथेच्छ भागवल्याचे आणि नुसते पाणी पिऊन झोपावे लागल्याचे. वाई जवळ पसरणीला क्रांतिसिंह नाना पाटील यांनी ओळखले - पोरास्नी जाम भूक लागली आहे! त्यांनी वाई हून पेढे आणायला कोणाला तरी पिटाळले तो भिडू शेरभर पेढ्यांचा पुडा घेऊन आला. एवढासा पुडा समोर दिसल्याबरोबर क्रांतिसिंहाने गर्जना केली - आयला! हो इवलुसं खाणं कुणाच्या दाटला लागणार! जा, दोनचार टोपल्या पेढे आण. नाना पाटील शडू ठोकून व्यासपीठावर येत आणि आपल्या अस्सल रांगड्या भाषेत फर्मास भाषण ठोकीत.
अस्पृश्य समाज, मग तो गुरं फाडणारा असो, घाण उपसणारा असो की आणखी काही. त्याला दूर ठेवायला स्पृश्यांना लाज वाटली पाहिजे, हा आपला मुद्दा पटवण्यासाठी नाना पाटील सभेला विचारीत तुम्ही सकाळी सकाळी लोटा घेऊन शेतात जाता. जाता की नाही?' श्रोते म्हणत- 'जातो तर!" मंग लोटयातलं पानी घेऊन (साभिनय) खसाखसा घाण धुता. काय धुता ना? श्रोत्यांचा नुसताच हशा. त्यानंतर घाण धुनारा हात कापून टाकता का?...' श्रोत्यांचे उत्तर - 'नाय नाय!’ मग सगळ्या पब्लिकची सफाई करणाऱ्यांना तुम्ही तोडून टाकणार? दूर ठेवणार? कधी कधी, नाना पाटील असे गावरान दाखले देऊ लागले की गुरुजींच्या चेहऱ्यावर एक संकोची हास्य उमटू लागे. त्यांचे असे का होई ते नाना पाटलांना कधीच समजले नसावे. दौरा. झंझावाती दौरा. रानोमाळ भटकन्ती. कधी कधी तर रस्ताही नसे.
मला आठवते, कोल्हापूरहून चिखलीला जाताना माळरानावर नवा रस्ता आम्हीच तयार केला. अशा दौऱ्यात सर्वांत मोठे सुख म्हणजे आंघोळ मिळेल त्या ओढ्यात, आडव्या येणाऱ्या नदीत. कधी कधी गुरुजींच्या व्यक्तित्वासारख्याच असणाऱ्या, उचंबवळणाऱ्या सागरात. कधी कधी गुरुजींचे भाषण दोन दोन तास चाले. त्यातले सगळे टप्पे आम्हांला माहीत असत. म्हणून तर रत्नागिरीला मैदानात गुरुजींच्या भाषणाचा गंगौध सुरू झाला ही संधी साधून आम्ही तासभर समुद्रात डुंबू शकलो. ज्ञानेश्वर महाराज काही आपण पाहिलेले नाहीत पण गुरुजींची धाटणी थेट तशीच. नटवण्यासाठी नाही तर पटवण्यासाठी अलंकार. दुनियेतल्या सर्व देशांतून टिपून घेतलेले दृष्टान्त आणि कहाण्या. वेदापासून बायबलपर्यंत कोठून कोठून मनात उतरलेली अवतरणे! चार महिन्यांत आम्हां सर्वांची मने किती श्रीमंत झाली! हृदयाची कवाडे उघडली.
चंद्रभागा कृष्णेला आणि कृष्णा समुद्राला मिळते पण एक महासागर चंद्रभागेला मिळाला 1 मे 1947 ला. पंढरीच्या वाळवंटात साने गुरुजींनी दौऱ्यातले जे शेवटचे भाषण केले त्याचा रोमहर्षक अनुभव ज्यांना मिळाला ते धन्य आहेत. आपल्या मनाच्या कमंडलूत पंचखंडांतली सारी तीर्थे त्यांनी भरून आणली होती त्यांचा आमच्या माथ्यावर अभिषेक केला त्यांनी. ज्याच्या मस्तकामागे अदृश्य तेजोवलय निर्माण झाले होते तो महाराष्ट्राचा घट्टमुटट ठेंगणा सावळा पांडुरंग म्हणजेथ पांडुरंग सदाशिव साने आम्ही याचि देही याचि डोळा पाहिला. महाराष्ट्र शाहीर पथक दीर्ष काळ चालले नाही. कालांतराने राष्ट्र सेवादलाचे अधिकृत कलापथक निर्माण झाले. महाराष्ट्र शाहीर हा त्या अरुणोदया आधी दिसलेला संधिप्रकाश होता. साने गुरुजींच्या स्पर्शाने पथक धन्य झाले, कृतार्थ झाले.
Tags: एस. एम.जोशी रावसाहेब पटवर्धन लीलाधर हेगडे पंढरपूर नाना पाटील साने गुरुजी वसंत बापट S.M. Joshi Raosaheb Patwardhan Liladhar Hegade Pandharpur Nana Patil Sane Guruji Vasant Bapat weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या