डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

हे तो प्रतीतीचे बोलणे प्रवास घडला... पण कुणिकडला?

‘अहमदनगरला यंत्रसज्ज दलाच्या तळावर जा आणि तिथले गाडे चालवायचं प्रशिक्षण घे.' नगर म्हणजे पुण्याची पूर्वेकडची शींवच की. जाताना दोन दिवस पुण्याला घरी विसावता येईल, आईवडिलांना, भावाबहिणींना भेटता येईल या ओढीनं कप्तान रातोरात जीपनं निघाला. इंफाळ ते कोहिमा, कोहिमा ते दिमापूर... मग नेईल झुकझुक गाडी थेट आपल्या गावी. अदृष्ट म्हणा की आणखी काही.... त्याला कुठे माहीत होतं भवितव्य?

नुकता नुकता मी कोहिमाला गेलो होतो. इंफाळ ते कोहिमा, मोटरचा प्रवास. सगळाच रस्ता चढउतारांचा आणि अनंत वळणावाकणांचा असल्यावर घाट सुरू कुठे होतो अन् संपतो कुठे याच्या पाट्या कोण कशाला लावील?
तशात चार नोव्हेंबरचा तो दिवस म्हणजे एक अकाल – दुर्दिन. 
सकाळपासून संतत धार लागलेली. हवा कुंद. मनातल्या उल्हासावर एक प्रकारचं मळभ धरलेलं. तरी बर मुलुख अनोळखी होता. 
नजर सारखी डोंगरद-या, झाङमाड, झरे-पऱ्हे न्याहाळत होती आणि प्रवासी मौनात होते. अशा घटकेला मन जरा जास्तच चाळवत का?

*
आठवणी म्हणजे अस्ताव्यस्त साठवणी आणि तरीही त्यांची एक गंमतच असते प्रचंड पाळणाघरात असंख्य मुलं झोपी गेलेली असावीत जरासं एखादं तावदान वाऱ्यानं थरथराव अन् त्यामुळे एखादंच अर्भक जागे व्हाव चुळबुळावं, कुशीवर वळावं, अर्धवट बसतं व्हाव कुरकुरावं अन् मग त्यानं अकस्मात आकांत करीत थैमान मांडावं ... तशी असतात मनाच्या अगणित वळचणींतली आठवणींची असंख्यात पाखरं. कुठे तरी काही तरी साधंसुधच थरथरत आणि मनाच्या गहनगूढ ढोलीमधून प्रथमच डोळे उघडलेल्या चिमण्या पिल्लागत एखादी आठवण डोकावते आणि न थांबणारा चिवचिवाट करू लागते. 

*
इंफाळ ते कोहिमा . कोहिमा ते इंफाळ अखंड घाटवळणांची ती वाट सरघसरणीची पायफसणीची झालेली होती अन् काही ठिकाणी तर तिला, भूमीन पोटात घ्यावं तशी खोलगट पडली होती. त्यांना चुकवून तात्पुरत्या कच्या सडका बांधल्या होत्या, पण कधी मोटरची चाक दगा देतील आणि पाताळमार्ग स्वर्गात पोचवती या भीतीची सावटं अधूनमधून मनावर पडत, गतीच्या हिंदोळ्यावर सहजी पेंग येते, तशी अवस्था झाली असताना, मोटारनं अचानक एक गचका खाल्ला. डोळे उघडले. मी अंग सावरून बसलो. त्या धककयानं झाले ते जरा अनपेक्षितच..... एक आठवण तीरासारखी आली... ...याच रस्त्यावर 44 वर्षांपूर्वी माझा सख्खा थोरला भाऊ अपघातात ठार झाला.... 
*
सत्तर वर्षांचे माझे वडील, पासष्टीची, आई ऐन पंचविशीतला त्यांचा होनहार हरपला. मराठा पलटणीतला शाही कमिशनदार कप्तान सावळा. तरतरीत. सुदृढ शेलाटा, मैदान गाजवणारा, माटे मास्तर त्याला म्हणायचे. 

‘गड्या! तुझ्या छातीच तकट झकास वर आलंय उमदा आहेस पठ्ठ्या, मर्दुमकी करशील' केलीच असती त्यानं मर्दुमकी. मोठा धैर्याचा होता, निडर होता. मी त्याच्याहून चार वर्षांनी लहान, विशीचा. 1943 च्या मार्च अखेर, बेळगावच्या मराठा पलटणीच्या मुख्य छावणीत माझ्या या रुबाबदार जवान भावाकडे मी शिरूभाऊंबरोबर भूमिगत अवस्थेत ... खुशाल आश्रयाला गेलो होतो. तेव्हा हवे होते ब्रिटिश सरकारला शिरुभाऊंचे प्राण, आम्हा घुंगुरट्यांसकट...
आणि आमचा आश्रयदाता होता, माझा भाऊ.. ब्रिटिशांच्या फौजेतला बहादूर शिपाईगडी !

*
1943 ची अखेर. मी येरवड्याच्या कारागृहात. माझा भाऊ भारत-ब्रह्मदेश सीमेवर. त्याला अकस्मात हुकम आला...

‘अहमदनगरला यंत्रसज्ज दलाच्या तळावर जा आणि तिथले गाडे चालवायचं प्रशिक्षण घे.' नगर म्हणजे पुण्याची पूर्वेकडची शींवच की. जाताना दोन दिवस पुण्याला घरी विसावता येईल, आईवडिलांना, भावाबहिणींना भेटता येईल या ओढीनं कप्तान रातोरात जीपनं निघाला. इंफाळ ते कोहिमा, कोहिमा ते दिमापूर... मग नेईल झुकझुक गाडी थेट आपल्या गावी. अदृष्ट म्हणा की आणखी काही.... त्याला कुठे माहीत होतं भवितव्य?

त्याला कुठे माहीत होतं आपले अकल्पित मरण? ....आजच्यासारखीच हवा, आजच्यासारखाच पाऊस, आजच्याहून कच्ची सडक, भरदुपारी अंधार, ढगांनी झाकलेल्या फसव्या वाटेवरून तो गेला निघून मरणगुंफेच्या गूढ मार्गाने इंफाळ ते कोहिमा. कोहिमा ते इंफाळ. पाऊस. ढगांचे पुंजच पुंज. वाढता अंधार. आणि तरी प्रत्येक वळणावर, ओढ्याच्या फरशीच्या शेवाळी कट्ट्यावर मला दिसत होता माझा हरपलेला भाऊ, अधून मधून पडणाऱ्या ट्रक्सच्या प्रकाशात तरळून जाई त्याची हसरी मुद्रा. रस्त्याकाठच्या शेलाट्या वृक्षांतून दिसायची त्याचीच उभी छबी, छातीचं तकट उचललेली... 44 वर्षांनी व्हायची होती जशी भेट, तशाच दिवशी! काय घडत होतं ते समजत नव्हतं. काय घडत असतं ते समजत नाही. कसे असतात है लागेबांधे? ही रक्ताची नाती? रक्तच मारतं का रक्ताला हाक? का मनाच्या मुळापाशी पुरुन ठेवलेली वेदना हवेच्या एका झुळुकीसरशी तरतरून मोहरते आणि व्यापते मनाचा अनंत अवकाश..

छे:! मी कुठे गेलो होतो इंफाळ ते कोहिमा? मी तर गेलो होतो 44 पायऱ्या उतरून माझ्या भावाच्या भेटीसाठी रहस्यमय भूतकाळाच्या अंधाऱ्या विहिरीकाठी.

Tags: मोटर प्रवास घाटवळण इम्फाल ते कोहिमा Road journey Ghat turn Imphal to Kohima weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके