डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

काय संबंध आहे यांचा आणि आपला? आहे का काही संबंध? तिब्बतमधून पळून आलेल्या खंपा-मोंपांसारखे हे दिसतात. यांचा धर्म वेगळा, आचारविचार वेगळे. शिवाजी महाराज आणि टिळक हे राष्ट्रपुरुष होते, हे यांना मी कसे सांगू? यांना चंडीगड कधी दिसेल का? श्रीनगर दिसेल का? मग पुणे-मुंबई कुठून दिसणार? हे कधी कन्याकुमारीला जातील का? यांना भाषावार प्रांत मंजूर आहेत की नाही, हा प्रश्न विचारणे म्हणजे केवढा गाढवपणा होईल! ब्रिटिश गेले हे यांना माहीत असेल का?

 

माणूस लष्करात नसला, तर लदाखला जाईल कशाला! नाही म्हटले तरी भारतीय माणूस प्रवास पुष्कळ करतो - यात्रेला जातो, लग्नामुंजीला जातो, कधी नोकरी शोधायला, कधी ती टाळायला जातो. माणसाची बदली होते, त्याला फिरतीवर जावे लागते. कधीकधी तो चक्क सुट्टी घेतो आणि प्रवासाला निघतो. निसर्गरम्य म्हणून नावाजलेल्या ठिकाणी गर्दी करतो. कधी तर सूक्ष्म अवलोकन का काय, तेही करू पाहतो. अंगात जास्त रग असली, तर हिमालयीन पहाडांवर चढतो. बद्रीकेदार आणि अमरनाथच काय, पण मानस आणि कैलासही जवळ करतो. काही चक्रम माणसे तर संस्कृतीबिंस्कृती पाहायला मणिपूरला गेल्याचीही नोंद आहे. पण लदाख? लदाखला कोण जाणार ! तिथे ना मंदिर ना घाट, ना मशीद ना कबर; बागबगीचे, कारंजी असला मोगली थाट नाही; भग्न तटबुरुजांमध्ये चिणलेला इतिहास नाही, ना चेरी-सफरचंदे, ना जांभळे-करवंदे; गुलाब आणि कमळे तर सोडाच, पण घाणेरी-कण्हेरीही नाहीत; लाल माती, हिरवी राने, आडवाटा हेही नाही. आणि हॉटेले, कॉफीगृहे, क्रीडामंदिरेपण नाहीत; तंबूतलादेखील सिनेमा नाही, सबकुछ खल्लास! अति दूर उत्तरेला, ईशान्य काश्मिरात, सात पहाडांपलीकडे सात पहाडांअलीकडे पसरला आहे लदाख. रूक्षरूक्ष, रौद्र, भव्य, भयाण निर्जन, पण अगदी मुलखावेगळा लामांचा वाडा- लदाख!

लदाख हा लहरी निसर्गाचा एक चमत्कार आहे. हिमालयाच्या अगदी कुशीत एक प्रचंड वाळवंट असावे, हा चमत्कारच नव्हे तर काय? आणि वाळवंटही कुठे? तर प्रत्यक्ष सिंधू नदीच्या दोन्ही तीरांवर! तरीच वाळवंटात बाळपण घालवलेली सिंधू थरपार्करच्या वाळवंटातच विसावली! तिची सगळी धाव आहे, वाळूपासून वाळूकडे. श्रीनगरहून सोनमर्गला जाऊन पुढे पावणेदोनशे मैल मोटरचे चाक पिरगळत पिरगळत झोजिलासारख्या प्रचंड खिंडीतून घरंगळत घरंगळत ‘लेह’ला यावे. साडेअकरा हजार फुटांवर वसलेल्या या लदाखी राजधानीला एका रेताड मैदानाने वेढा घातलेला दिसेल. पाच हजार फुटांपेक्षा जरा कमीच उंचीच्या डोंगरावर ‘जिवाचे महाबळेश्वर’ करणाऱ्या आणि तिथे लोकरी कपडे घालून कुडकुडणाऱ्या मराठमोळ्या माणसाला साडेअकरा हजार फूट उंची पुष्कळ झाली की! म्हणजे या एवढ्या उंचीवर दातखीळ बसायला हरकत नसावी! पण कसले काय नि कसले काय! दिवस उन्हाळी असले, तर लेहला अंगात कपडा ठेववणार नाही; घाम नाही यायचा, नुसती तलखी! शुद्ध काहिली! श्वास कोंडल्यासारखे वाटेल. विरळ झालेल्या वातावरणातून सूर्यकिरण सरळ ‘लेह’ला झोंबतात, म्हणून ही दमछाक! श्रीनगरहून विमानाने ‘लेह’ला यायचे, म्हणजे ‘थ्री सिस्टर्स’सारख्या त्रिशूळी शिखरांना चुकवले पाहिजे. खूप उंचावरून येणाऱ्या विमानातून प्राणवायूची नळी गुडगुडीदाखल घेऊन, लेहच्या अस्मानात येताना एका चिंचोळ्या पहाडी खिंडीतून, जीव मुठीत धरून कसेबसे लेहच्या विमानतळावर उतरायचे. उतरल्यावर प्रवासी चालू लागला की, ‘आपण इतके थकलो कसे?’ याचे आश्चर्य त्याला वाटू लागते. ते असते लदाखचे आव्हान; भल्याभल्यांची सत्त्वपरीक्षा घेणारे! न थकता लदाखमध्ये प्रवास करायचा, तर निदान महिनाभर लदाखी हवेचा सराव करायला हवा.

लदाखी हवेचा सराव? म्हणजे कमी प्राणवायूवर जगण्याचा सराव. ही हवा कसली? उन्हात कासावीस करणारी आणि थंडीत चराचर गोठवून, थिजवून पाषाणप्राय करणारी हवा. या हवेला निराळे विशेषनामच हवे. ‘लदाखी’ म्हणावे हवे तर! लदाखीचा तडाखा कळायला प्रत्यक्ष प्रमाणच पाहिजे. तिथे भूगोलाबिगोलाचे काम नाही. मी-मी म्हणणाऱ्यांना येथे धाप लागून भुईसपाट व्हावे लागते. ‘लेह’च्या परिसरात साधारणतः पुण्याच्या चतुरशिंगीइतपत उंच एक टेकडुली आहे. तिच्यावर भिक्षू कुशक बकुल (काश्मीर सरकारमधील एक भूतपूर्व मंत्री) यांचा मठ आहे. किल्ले रायगड, सिंहगड आणि पुरंदर चढून गेल्यावर कृतकृत्य वाटणारा आपल्या मुलखातला माणूस एवढीशी टेकडी चढून या मठात पोहोचला की, ‘मठाचिये द्वारी, निजे तासभरी’ अशी त्याची स्थिती होते. दम्याची शेवटची अवस्था क्रम चुकवून प्रथमच आल्यासारखे वाटते! प्राणवायूची महागाई; दुसरे काय! चालवत नाही, चढवत नाही, ओझे उचलवत नाही, श्रमाचे काम करवत नाही! आधीच दुबळा असलेला देह कसा निकामी निकामी वाटू लागतो. रात्रीच्या वेळी गाढ झोप लागावी, तो डोक्यात अचानक सणक उठते; डोकेदुखी असह्य होते. मग ध्यानात येते, ‘कंदील मालवला पाहिजे’, ‘गॅसबत्ती विझवली पाहिजे’. ही मंडळीच प्राणवायू बकाबका खातात ना! मग का नाही आपले डोके दुखणार?

तस्मात्‌ सराव हवा, मग सगळे साधते! लदाखी माणसे - म्हणजे बापे नव्हेत केवळ, मुलेमाणसेदेखील - मैलोनमैल रस्ते तुडवतातच की! डोंगरपहाड चढतात, उतरतात; पुन्हा चढतात, ओझी नेतात. इतके कशाला, आपले फौजी जवान डोक्यावर बोजा घेऊन खांद्यावर तुळबटे वाहत तासाभरात हजार-बाराशे फुटांचा पहाड अगदी सहज पालथा घालतात! वीस मिनिटांच्या आत आसपासच्या सर्व भुयारी ठाण्यांवर (बंकर्सवर) शिदोरी पोहोचवून तळावर परत येतात. मोठमोठ्या सेनाधिकाऱ्यांनासुद्धा पर्वतांची माथी धुंडाळण्याचा उपक्रम करावाच लागतो. लदाखमधील चुमातांग ठाण्याच्या आसपास सोळा ते एकोणीस हजार फुटी पर्वत आहेत. काही पर्वतांच्या माथ्यावर ऐसपैस सपाट जागा आहेत. त्यांत काहींवर हिरवी चराईची राने आहेत आणि काहींवर सरोवरे.

त्यांची माहिती सांगणाऱ्या एका शीख ब्रिगेडिअरला जेव्हा ‘तुम्ही तिकडे गेला आहात का?’ असे मी विचारले, तेव्हा आपल्या गुबऱ्या श्मश्रुल गालांत हसत तो म्हणाला, ‘अनेक वेळा. तो माझा धंदाच आहे. त्याबद्दल तर मला तनखा मिळतो!’

इतक्या उंचीवर सरोवरे! त्यांतही काही खाऱ्या पाण्याची आहेत. हिमालय हा केवल पर्वत आहे ना? आताशी कुठे समुद्रातून उगवला आहे! आणि ती कुरणे कुठून आली तिथे? सगळाच चमत्कार! एरवी लदाखी भूमी म्हणजे वैराण, विराट विराट वैराण, कोरडे ठणठणीत; वाळू, मुरमाड, भुसभुस कोसळणारी माती, प्रचंड ओकेबाके डोंगर, रसवर्ज्य रस्ते; नदीच्या काठावरही काही उगवत नाही. नदीचे पाखे आणि रस्त्याचे पाखे, दोन्ही सारखेच; कुठेही हिरवा ठसा नाही, झाडाचा ठिपका नाही. हिमालयाच्या हृदयामध्ये ही अशी कोरडी करुणा आणि एकोणीस हजार फुटांवर हिरवळीचे पठार!

देवाला काहीही वाहा, पण भक्तीने वाहा, ‘पत्रं पुष्पं फलं तोयम्‌’ काहीही चालेल, असे सांगणाऱ्या कृष्णाने (की व्यासाने?) लदाखचे दर्शन नक्कीच घेतलेले नसेल. पत्र, पुष्प आणि फल तर सोडाच, पण गवताची एक काडीदेखील मुश्किलीने मिळेल इथे! हिमालयाची मुलगी ‘अपर्णा’ ती हीच! पाचपंचवीस कोस रस्ता तुडवावा, तेव्हा क्वचित कुठे झाड दिसले तर दिसेल. लेहजवळ थोडासा झाडोरा आहे. सरकारी प्रयत्नांमुळे थोडी शेती आणि झाडी सौभाग्यालंकारासारखी जपलेली आहे. लेहपासून वीस-पंचवीस मैलांवर सिंधू ओलांडल्यास हिमिस मठाभोवती थोडी हिरवी सोयरी आहेत. किंवा लष्कराच्या ‘बीकन’ विभागाने केलेल्या रस्त्यावरून सरळ साठएक मैल पूर्वेला गेल्यावर जो ‘पहिला पूल’ लागतो, त्याच्या अलीकडच्या वाकणावर दहा-वीस उंच झाडे आहेत. एरवी झाड नाही, झुडूप नाही, लव्हाळे आणि गवतरान नाही, काऽऽही नाही!

‘असल्या वांझोट्या भूमीला सौंदर्य ते कुठून प्राप्त होणार’ असे मात्र म्हणू नये. लदाखची सृष्टी हिरवी नसूनही रंगदार आहे. हा एक अनवट राग आहे. इतका की, इथे षड्‌ज वर्ज्य आहे! वृक्षांशिवाय सृष्टिसौंदर्य म्हणजे षड्‌जाशिवाय स्वरमाला, नाही तर काय! पण कबूल केले पाहिजे की, हा निसर्ग वक्र आहे, वाम आहे, वेडापिसा आहे, विराट आहे; पण अचाट सुंदर आहे. प्रचंड डोंगर, प्रचंड चढणी, चढणीवरून धरणीपावेतो लोळत आलेले रेतीचे, मुरमाचे पट्टे - भगवे, पिवळे, उदी, तांबूस, जांभळे, करडे, राजवर्खी! कधी बर्फाइतकेच जडशीळ! असल्या रेताडातून वाहणारी सिंधू; अंगी न भरलेली, बागडायलाही न शिकलेली; एक चिंचोळ्या अंगाची सामान्य वाटणारी नदी. हिमिस मठाकडे जाताना सिंधू ओलांडण्यासाठी पूल कसा असावा? चक्क कळकाचा छोटासा साकव आहे तिथे! कोकणातली नदी याहून मोठी असते खास! लांबी मात्र पुसू नका. गोबीचे वाळवंट डावीकडे टाकून, लदाखला आडवा छेद देऊन, उत्तर काश्मिरातून पंजाबमधून सिंधकडे जाणारी ही उपखंडातली दीर्घतमा. हिच्या काठाकाठाने आता ‘बीकन’ने रस्ता केला आहे. शाबास आहे ‘बीकन’ची!

कधी सुरुंग लावावा, तर पर्वताचे भुसकट उडते आणि केला रस्ता झाकून टाकते. कधी कितीही दारू ठासा, कडा जाम फुटत नाही! असल्या भूमीवर उन्हा-थंडीत राबून, अन्नपाण्याचे हाल सोसून जवानांनी रस्ता तयार केला. लष्कराच्या जीपगाड्या आणि तीन टनी ‘शक्तिमान’ ट्रक्स जाण्याजोगा भक्कम आहे हा रस्ता! कारगिल-लेह आणि लेह-चुशूल जोडणारा. वळणा-वाकणांनीच त्याचा एकसुरीपणा कमी केला आहे म्हणून बरे, नाही तर उजाड उजाड वैराणातून ओसाड ओसाड क्षितिज दाखवणारा हा रस्ता जीवघेणा वाटला असता.

अर्थात, हा रस्ता केवळ उन्हाळी. थंडी पडली की, सर्वांत सुंदर रस्ता म्हणजे सिंधू नदी! बर्फाची लांब-अरुंद लादीच जशी! खुशाल वाटेल तेवढा अवजड ट्रक न्या, माणसे न्या, लादीला ढिमदेखील व्हायचे नाही! एक मात्र भानगड आहे. जिथे जिथे गरम पाण्याचे झरे असतील, तिथे तिथे सिंधूपासून सावधान! गरम पाण्याचे झरे म्हणजे आणखी एक चमत्कारच. वज्रेश्वरीचे गरम झरे मुंबईकरांच्या परिचयाचे असतात, पण तिथे तो एक किरकोळ चमत्कार वाटतो. कांग्रा खोऱ्यात, कुलू खोऱ्यात गरम पाण्याचे झरे आहेत, हेही एक वेळ समजण्यासारखे आहे, पण जिथे नदीच्या नदी गोठून जाते, तिथे तिला पोटाखालून पोखरणारे गरम झरे म्हणजे भलतेच अनाठायी वाटतात. अशा ठिकाणी बर्फाची लादी फार धोकेबाज गपकन गिळणाऱ्या राक्षसीसारखी!

लदाखची थंडी कल्पनातीत क्रूर असते. त्यातल्या त्यात लेह गरम ना? तिथे पारा शून्याखाली पंचविसावर जातो. मध्य लदाखमध्ये, म्हणजे चुमातांगजवळ शून्याखाली चाळिसावर स्थिरावतो, तर पूर्व सरहद्दीजवळ, म्हणजे दौलतबेग-ओल्दीपासून चुशूल-डेमचौकपर्यंत शून्याखाली साठापर्यंत जातो, असे म्हणतात! यात चूकभूल असेलही, पण थंडी मोजायची इतर मापने आहेतच की! या मापनांप्रमाणे सांगायचे म्हणजे, डिझेलसारखे जळणही थिजते! ट्रकचे इंजीन एकवार सुरू केले की, तीनतीन दिवस चालूच ठेवावे लागते. बंबाप्रमाणे गोलाकार असलेल्या तुर्की शेगडीभोवती शेक घेत जवान बसतात, तेव्हा शरीराची एक बाजू शेकता-शेकता दुसरी बाजू गोठून बधिर होऊन जाते. संत्री, मोसंबी, लिंबे उकडून खाण्यालायक करावी लागतात. तव्यावर टाकण्यापूर्वी अंडेदेखील गरम पाण्यात टाकायचे असते!

लदाखमध्ये राजकीय व्यासपीठ नाही, हेच बरे आहे; नाही तर वक्त्यांचे मुडदे पडले असते. कारण टोमॅटोचे लाललाल दगड होतात. निव्वळ! बर्फ फोडून, वितळवून, पाणी तयार करावे लागते. थंडीबद्दल ताणता येईल तेवढी कल्पना ताणली, तरी तिच्या पलीकडची थंडी असते लदाखमध्ये आणि अशा थंडीत शाश्वत हिमरेषा (परपेच्युअल स्नो लाईन) सांभाळीत भारताचे शूर जवान पाय रोवून उभे आहेत. इंचइंच भूमी लढवण्याची गाणी रचणे आणि ती म्हणणे तसे सोपे आहे; पण तृणशून्य भूमीमधल्या त्या महाभयंकर हिवाळ्याच्या कैदेत राहून मातृभूमीचे रक्षण करणे, ही महाकठीण कामगिरी आहे. महार रेजिमंटमधल्या एका वीरचक्रधराने मला सांगितले की, ‘मुतलो, तर धार जिमनीजवळजाईस्तो गोठती!’ मला त्याच्या विधानात अश्लील, बीभत्स तर काही वाटले नाहीच, उलट थंडीचे प्रत्ययकारी चित्र त्याने काढल्यासारखे वाटले. ‘डोंगरकपारीतल्या भुयारात तुम्ही कसे काय रे राहता हिवाळ्यात?’ असा प्रश्न विचारल्यावर आणखी एक शिपाईगडी म्हणाला, ‘तिघे जण एकाच कांभरुणात घुसतो. काय म्हना साहेब, मानसाची ऊब ती खरी ऊब!’ हो, तेही खरेच म्हणा!

एवढ्या थंडीत गरम झरे तेवढे तसेच उसळतात. कोमटदेखील होत नाहीत! स्नान करायला जागा अशी तेवढीच. आपल्या शिपाई गड्यांना आंघोळीशिवाय करमत नाही. मला आठवते, गंगटोकच्या मार्गावर एक धबधबा होता. हवा सर्दच होती. दोघे जवान लंगोट लावून पाणधारेत उभे होते. दोघे उघडेवाघडे बाजूला बसले होते. मी अंदाजाने विचारले, ‘काय, सातारा जिल्हा का?’

अंघोळ करणारे हसले. व्हय जी म्हणून पुढे आहे. गरम झऱ्याजवळ तात्पुरती स्नानगृहे केली आहेत, अशाच जवानांसाठी. खुद्द लदाखी माणसे तिकडे फिरकतही नाहीत. आणि कशाला फिरकतील! ‘लदाखींची अंघोळ आयुष्यात तीनदा; एकदा जन्मल्यावर, एकदा लग्नात (हेही भाग्यच!) आणि एकदा मेल्यावर!’ नाही तरी लदाखमध्ये घाम येत नाहीच, मग कोण करतो उगीच भुडुश्शो!

हजार चौरस मैलांच्या या विराट वैराणात अठ्‌ठ्याऐंशी हजार लोकवस्ती आहे. म्हणजे एका चौरस मैलाला अठ्‌ठ्याऐंशी हे प्रमाण पडले! (केरळ, बंगाल, उत्तर प्रदेश इथे दाटीवाटीने राहणाऱ्या माझ्या बांधवांनो, तुम्ही वाईच इकडे का बरे सरकत नाही?) या अठ्‌ठ्याऐंशी हजारांत हजारभर किरिस्तांव, सातएक हजार मुसलमान आणि उरलेले सर्व बौद्ध आहेत. ‘ॐ मणिपद्मने’ हा जप करीत हे बौद्ध चार-आठ जणांचे टोळके करून हिंडतात. ‘भरपूर कपडे’ हा त्यांचा शौक आहे. कपड्यांची कळा आणि काळा रंग पाहिल्यावर ‘एकदा अंगावर चढलेले कपडे फाटून जाईस्तोवर न उतरवण्याचे यांचे व्रत सहजच लक्षात येते’. मणिपद्म बुद्धाच्या नावे लहानमोठे दगड जवळ बाळगण्याची आणि पवित्र स्थळी या दगडांचा तट बांधण्याची लदाखींना फार हौस आहे. बहुधा या दगडांवर काही कलाकुसरही केलेली असते आणि मंत्रही कोरलेला असतो.

‘याक’ हे जनावर म्हणजे साक्षात कुरूपतेचा आणि घाणीचा गड्डा! पण याक म्हणजे जणू नारळाचे झाडच; मांस खायचे याकचे, दूध प्यायचे याकचे, कातडे पांघरायचे याकचे; ओझे वाहणार याक आणि माणसाला पाठीवरून नेणाराही याकच- याक एके याक! वाशाळ्या लोण्यामध्ये दमट-कुबट पीठ कालवल्यासारखा आपल्याला जो वास येतो, तो याकचा की त्याच्या धन्याचा कोण जाणे! दुसरे जनावर ‘आयबेक्स’. हे अर्थात डोंगर-पठारावर क्वचितच आढळणारे, पण खायला फर्मास म्हणतात! हे जंगली बोकड म्हणजे लदाखींची मेजवानी. एरवी ते काय खातात, भगवान गौतम जाणे! लदाखींच्या मेळाव्यात मध्येच एखादा गोरापान पुरुष आणि त्यातल्या त्यात सरळ नाकाची मीनाक्षी दिसली तर ओळखावे - हे लदाखी श्रीमंत, जवळजवळ राजवंशी आहेत! त्यांना नक्षीची टोपी, कुसरदार जाकीट असा पेहेराव आणि क्वचित बसण्यासाठी तिबेटी घोडेही असते. चुशूलच्या रस्त्यावर मध्ये निओमा, मूद, डुंगटी वगैरे ठाणी आहेत. त्यांच्या आसमंतात एक लांबचलांब हिरवळ आहे. तिथे रानटी तिबेटी घोडे आणि सुंदर सुंदर पक्षी दिसतात म्हणे, पण ते भाग्यवानाला!

बहुपतिकत्व ही लदाखींची एक खास रीत आहे. साधारणपणे चार भावांत एक बायको असते (‘पांडव’ पदवी थोडक्यात चुकली!). पाचवा भाऊ असेल, तर त्याला मात्र घरजावई (मॅग्पा) व्हावे लागते किंवा मठात जोगवा घ्यावा लागतो. काही लदाखिणीही भिक्षुणी होतात. ‘स्टाक्से’सारखे जुने, जवळजवळ परित्यक्त मठ असोत की, ‘हिमिस’सारखे गजबजलेले... होतकरू लामा नि लामणी तेथे घोंघावतात. लदाखच्या रेती-मुरमाच्या भूपृष्ठावर त्यांचे लाल पेहेराव नि पिवळ्या-तांबड्या पताका उठून दिसतात. त्यांच्या हातात धर्मचक्रे आणि मुखी (बहुधा) धर्मवचने असतात; पण त्यांना हवे असते ते ‘निर्वाण’ नव्हे; त्यांना हवे असते ‘अन्न’; उष्टेमाष्टे, कसलेही. त्यांना हवी असते दारू. ‘चांग’ नावाची स्थानिक भट्टीची भाताची दारू नव्हे, तर लष्करी अधिकाऱ्यांनी टाकून दिलेल्या बाटल्यांतली रम, व्हिस्की, बीअर. त्यांना हवी असतात चिरूट-सिगरेटींची थोटके. दारिद्र्याने लाचार झालेले लदाखी कधी पत्रावळीवर तुटून पडणाऱ्या कुत्र्यांप्रमाणे या वस्तुजातावर तुटून पडतात, तेव्हा आपल्याच पोटात खड्डा पडतो. हेही भारतीयच, माझ्यासारखे, माझेच. कुशक बकुल यांच्या मठात तर बुद्धमूर्तीशेजारी महात्मा गांधींचा एक फोटो होता. त्याच्यापुढेही श्रद्धेने धूपदीप होत होते. हा वेडेपणा असेल, पण एकंदर भारतीय वेडेपणात हा चपखल शोभणारा आहे. हे लदाखी; चौदा चौकड्यांच्या भारताचे हेदेखील रहिवासी! खरे की काय?

काय संबंध आहे यांचा आणि आपला? आहे का काही संबंध? तिब्बतमधून पळून आलेल्या खंपा-मोंपांसारखे हे दिसतात. यांचा धर्म वेगळा, आचारविचार वेगळे. शिवाजी महाराज आणि टिळक हे राष्ट्रपुरुष होते, हे यांना मी कसे सांगू? यांना चंडीगड कधी दिसेल का? श्रीनगर दिसेल का? मग पुणे-मुंबई कुठून दिसणार? हे कधी कन्याकुमारीला जातील का? यांना भाषावार प्रांत मंजूर आहेत की नाही, हा प्रश्न विचारणे म्हणजे केवढा गाढवपणा होईल! ब्रिटिश गेले हे यांना माहीत असेल का? की ते आले होते, हेच माहीत नसेल? यांचा आणि इतर भारतीयांचा रोटीबेटी व्यवहार व्हायला किती शतके जावी लागतील? आपले जवान तिथे प्राणपणाने (वगैरे) लढताहेत, पण लदाखींच्या लेखी ते कोण आहेत?

आणि आमच्या लेखी लदाखी कोण आहेत? त्यांना लुटायलासुद्धा कोणी भारतीय तिकडे जात नाहीत! लेहला विमानतळ बांधायचा होता, पण एक हरीचा लाल कंत्राट घेईल तर शपथ! लढवय्ये जवान विमान तळावर सिमेंटची घमेली वाहताहेत, रस्ते करण्यासाठी खडी फोडताहेत. का? कोणीही मजूर आणि मजूर पुरवठा करणारा कंत्राटदार तिथे जाऊ इच्छित नाही म्हणून. राजस्थान-गुजरात-तामीळनाडू... कुठलाही भांडवलदार तिकडे दुकान घालीत नाही की, कारखाना चालवीत नाही. चार-सहा चाकरमाने असतात, पण तेही नाखुशीने! दिल्लीतल्या सग्यासोयऱ्यांना आपली बदली करवून घेण्याविषयी सतत ते अजीजीने पत्रे लिहितात- ‘आमच्या बदलीसाठी पाहा ना मिळते का कोणाची चिठ्ठी?’

एकदा नेहरू म्हणाले होते- ‘नॉट अ ब्लेड ऑफ ग्रास ग्रोज देअर’. तेव्हा आम्हांला कोण संताप आला! पण मुख्य अडचण ‘ब्लेड ऑफ ग्रास’ नसण्याची नाही, तर इथे आपण कोणी नसण्याची आहे! आपण आहोत, ते केवळ लष्करी गरजेपुरते. 1962च्या पराभवानंतर आपले लष्कर तिथे चांगलेच रुजले, पसरले आहे. शत्रू पुन्हा हल्ला करील, तर त्याला याद राहील असा मार देण्यासाठी लष्कर उत्सुक आहे. प्रत्येक डोंगर, प्रत्येक खिंड आज सज्ज आहे! भयाण थंड एकान्तात, एकाकी ठाण्यावर वेड लागण्याची शक्यता निर्माण होण्याइतके एकलकोंडेपण असताना, लदाखी पर्वत-शिखरांवरचे भारतीय जवान पूर्वेकडे डोळे आणि बागनेट रोखून उभे आहेत. आज लदाखमध्ये त्यालाच - फक्त त्यालाच जागा आहे. पण जेव्हा हा ताण कमी होईल, वारे मोकळेपणाने वाहतील, दिशा स्वच्छ होतील, ‘ॐ मणिपद्मने’चा जप मोकळा होईल, हिमिसचा हरवलेला लामा तिब्बतमधून परत येईल, तेव्हा तरी आपण जाऊ का तिकडे? म्हणतात की, ख्रिस्त आठ वर्षे लदाखच्या हिमिस मठात येऊन राहिला होता. पण आपण जाऊ का तिकडे? अतिदूर उत्तरेला, सात पहाडांपलीकडे आणि सात पहाडांअलीकडे असलेल्या लामांच्या चिरेबंदी वाड्यात?

1990 दरम्यान वसंत बापट यांनी कोकण, राजस्थान, हिमालय व नेपाळ या प्रदेशांत भटकंती केली. त्यावरील लेखमाला 1991 मध्ये साधना साप्ताहिकात प्रसिद्ध झाली, 1997 मध्ये त्यातून ‘अहा, देश कसा छान!’ हे पुस्तक आले. त्यातील हा लेख.

Tags: जन्मशताब्दी प्रवासवर्णन लदाक वसंत बापट vasant bapat weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके