डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

लीलाधर हेगडे : एक हसतखेळत फुललेले व्यक्तित्व!

त्याचं वैभव डोळे भरून पहायला आणि त्याच्या अष्टपैलूपणाबद्दल त्याला शाबासकी द्यायला परवा नानासाहेब गोरे, दत्ता ताम्हणे, द. म. सुतार, अशी थोर वडीलधारी मंडळी आली होती. लीलाधरचे सेवा दलातले जुने सहकारी आले होते. साहित्य, शिक्षण आणि सामाजिक कार्य या क्षेत्रांतले लहानथोर कारकर्ते आले होते. आपल्या कामासाठी फटिंगवृत्तीने केव्हाही अनिकेत होऊ शकणाऱ्या लीलाधारवर जीव लावून माया करणारे त्याचे कुटुंबीयही मोठ्या संख्येने आले होते.

माझा मित्र लीलाधर 60 वर्षांचा झाला. आमची मैत्री 42 वर्षांची झाली. म्हणजे असं की 1945 साली आम्ही प्रथम भेटलो आणि नंतर आम्हा दोघांनाही नकळत परिचयाचे रूपांतर दाट स्नेहामध्ये कसे झाले ते आता आठवठी नाही. त्याच्या असण्याला माझ्या आयुष्यात आणि माझ्या असण्याला त्याच्या आयुष्यात फार मोठे स्थान निर्माण झाले एवढे खरे! मात्र जे घडले ते अकारण घडले असे मी म्हणणार नाही, सेवा दलाने परिसस्पर्श केल्यामुळे आम्हा दोघांच्या आयुष्याचे सोने झालेले आहे हे तर कारण आहेच पण त्यातही दोघांना असलेली काही वेडं समान असण्याची भर पडत गेली आहे. एक तर घरट्यातून आकाशात आणि आकाशातून घरट्यात भिरभिरत राहाण्याची हौस दोघांनाही आहे. आणि त्यात भरीला शाहिरी कलेची कधीच न ओसरणारी ओढ. 42 वर्षाचा सहवास म्हटलयावर दोघांच्याही मनात जाऊन बसलेले संस्मरणीय प्रसंग, हकीकती, किस्से, चुटके, माणसांचे अजब नमुने, हे सारे समान असावे हे तर स्वाभाविक आहे. त्यामुळे चारचौघांत बोलताना किंवा जनसमुदायात वावरताना नआमचे आपापसातही विशेष संकेत हे अर्थातच असतात.

वैयक्तिक स्नेहाचे विश्लेषण अधिक नको. आज समाजासमोर विकसित आणि परिपक्व व्यक्तित्व घेऊन उभा असलेला लीलाधर कसा घडत गेला ते मी जवळून पाहिला आहे, एवढेच सांगण्याच्या हेतूने आमच्या मैत्रीचा थोडा प्रपंच मी केला. पण त्याचे कर्तृत्व आणि गुणविशेष यांमुळे त्याला सामाजिक दृष्ट्याही एक वेगळे स्थान निर्माण झाले आहे. म्हणून तर गेल्या 9 नोव्हेंबरला त्याचा 60वा वाढदिवस त्याचा चाहत्यांनी उत्साहाने साजरा केला. वास्तविक त्याच्या चाहत्यांची संख्या खूप मोठी आहे, आणि सर्वापर्यंत या साठीच्या उत्सवाची वार्ता पोचू शकली असती तर उभ्या महाराष्ट्रातून आणखी शेकडो माणसे समारंभाला लोटली असती, पण सहकाऱ्यांच्या प्रयत्नांत थोडी खूट राहिल्यामुळे म्हणा किंवा टपाल खात्याच्या लहरीमुळे म्हणा, आमंत्रणे पोचलीच नाहीत आणि लीलाधरले मित्र रुष्ट झाले. त्यांचा रोष अर्थातच टिकणार नाही. लीलाधर त्यांचा लाडका आहे आणि ते लीलाधरचे! हे मित्र किती आणि कोठकोठले असावे! त्यात शहरी आहेत, खेड्यातले आहेत, बंदरपट्टीचे कोळी आहेत, नगरनाशिकचे माळी आहेत, शेतकरी अन् साळी आहेत आणि हे सगळे सेवा दलाची संघटना बांधताना अन् डफ दिमडी घेऊन गावोगाव जाताना जोडलेले भावबंध आहेत. पुष्कळ नामवंठी आहेत. म्हणजे लेखक, नाटकासिनेमातले कलावंत, राजकीय आणि विधायक कार्यकर्ते वगैरे. अलीकडे यात भर पडली आहे ती साने गुरुजी विद्यामंदिरातल्या शेकडो चिमण्या बालमित्रांची. ही त्यांची भासरं आहेत आणि तो त्यांचा लीलीमामा! 

हे त्याचं वैभव डोळे भरून पहायला आणि त्याच्या अष्टपैलूपणाबद्दल त्याला शाबासकी द्यायला परवा नानासाहेब गोरे, दत्ता ताम्हणे, द. म. सुतार, अशी थोर वडीलधारी मंडळी आली होती. लीलाधरचे सेवा दलातले जुने सहकारी आले होते. साहित्य, शिक्षण आणि सामाजिक कार्य या क्षेत्रांतले लहानथोर कारकर्ते आले होते. आपल्या कामासाठी फटिंगवृत्तीने केव्हाही अनिकेत होऊ शकणाऱ्या लीलाधारवर जीव लावून माया करणारे त्याचे कुटुंबीयही मोठ्या संख्येने आले होते. लीलाधर म्हणजे त्यांच्या घराततं शेंडेफळ! साहजिकच लहानपणी त्याचे लाड झाले, आणि विशेष म्हणजे मोठेपणीही त्याच्या सर्व वडीलधाऱ्यांनी त्याच्यावर समतेची छत्रच्छाया धरली. या सर्वांना या साठीच्या समारंभात एक अदृश्य चित्रपट दिसत राहिला असेल...

त्यांना दिसता असेल लीलाधर,ऐन षोडशीत आपले आयुष्य वहायला निघालेला, रात्रंदिवस या गावाहून त्या गावी पायपीट करणारा, जडजंबाल सिद्धांतावाचून आणि रोमॅंटिक प्रतिज्ञेशिवाय ठायी ठायी ध्येयशील युवकांचे संघटन करणारा, लीलाधर, एक बुलंद खड्या आवाजाचा शाहीर! आशयाशी समरस होऊन पवाड्यात रंग भरणारा, लोकगीतांची धून साभिनय घूमवणारा, आपल्या बरोबर इतरांना सामील करीत समरगीते आणि संचलनगीते गाणारा, प्रथम चाचरत, चाचपडत मग सराईत बिन्धास्तपणे तमासगिरी करणारा, हिरीरीने खेळणारा, कवायत करणारा, कोणत्याही कार्यात हातचे न राखता झोकून देणारा लीलाधर! एक सैनिक, कार्यकर्ता, अन् कलाकारही. मग उशिरा बार धरलेल्या वृक्षासारखा साहित्याच्या अंगणात, डवरून आलेला एक मिष्किल, सहजपणे विनोदी लेखन करणारा, अनेक पुरस्कारांचा मानकरी आणि आता पंचवीस वर्षे होतील, सांताक्रूजच्या चुनाभट्टी, झोपडपट्टीत खंबीरपणे पाय रोवून, विधायक कर्तृत्वाचा एक आदर्श त्याने आपल्या परिश्रमाने उभा केला. आज तेथे सांभाळली जातात गरिबांची अर्भके. तेथे शिकतात कोवळ्या वयाची बालके आणि विकसित होऊ पाहणारे किशोर, किशोरी. येथेच उभे आहे आरोग्य केन्द्र आणि क्रीडामंदिर आणि येथेच चालतात तंत्रविद्यांचे वर्ग संगीत आणि नृत्य-जीवनानंदाचे अक्षय झरे. त्यांचे गुंजन येथे पडेल तुमच्या कानावर. सारांशच सांगायचा तर उद्याच्या पिढीला सर्वांगी समर्थ करणारे साने गुरुजी आारोग्य मंदिर हीच आहे आज लीलाधरच्या गुणसंपदेची साक्ष. 

...असा हा सारा चित्रपट समारंभाला उपस्थित असलेल्या आणि नसलेल्याही सर्व लीलाधरच्या सुहृदांना झर्रकन दिसला असेल. आपल्या समाजात माणसाचे मोठेपण मोजण्याच्या ज्या फुटक्या फूटपट्ट्या आहेत त्या लावल्या तर लीलाधर काही फारसा मोठा माणूस नाही. सत्ता, संपत्ती आणि परपीडनशक्ती यांच्या आधारेच समाजात काही माणसे म्हणजे प्रस्थ होऊन बसतात. यांतले काहीच लीलाधरजवळ नाही! पण समाजाच्या भल्याची सतत तळमळ, त्यासाठी जाणीवपूर्वक परिश्रम करण्याची तयारी, जे जे सुंदर, जे जे उदात्त त्याच्यावर प्रेम आणि हे सारे सांभाळत असताना कसलाही आव न आणता रानझऱ्याप्रमाणे हसतखेळत वाटचाल करण्याची सहजता ही जर माणसाच्या मोठेपणाची लक्षणे मानली तर मात्र लीलाधरच्या ठायी असलेल्या थोरवीचे भान समाजाला होईल. म्हणून तर लीलाधरला आणि त्याच्या सहकाऱ्यांना मनापासून शाबासकी देताना नानासाहेब गोरे म्हणाले, "असे काही पाहिले की हरपलेली उमेद परत येते. वाटते, मोठी माणसे मागच्या पिढ्यांतच होऊन गेली असे नाही. ती आजही आहेत. आणि अशा मोठ्या कर्तुकीच्या माणसांना माझा हात पाठीवर पडल्याने बळ चढत असेल तर अजूनही पुष्कळ जगावे असे मला का वाटू नये? 
 

Tags: मध्यमवर्गीय उच्च आदर्श व्यक्ति लीलाधार यांचे व्यक्तित्व Highly respected ordinary person Leeladhar’s personality weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके