डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

1996 मध्ये वसंत बापट यांनी अमेरिका व ऑस्ट्रेलिया या देशांचा दौरा केला. तेथील प्रवासावर आधारित लेखमाला त्याच वर्षी साधना साप्ताहिकातून प्रसिद्ध झाली, 1997 मध्ये ते लेखन ‘गोष्टी देशांतरीच्या’ या  पुस्तकात आले. त्यातील हा लेख.

आपल्या देशात विमान प्रवास म्हणजे कपिलाषष्ठीचा योग, सटीसामासी घडून येणारी अविस्मरणीय घटना, आणि अमेरिकेत?

‘तुझी-माझी धाव आहे, विमानातून विमानात’ हा अगदी नित्याचा खाक्या! कधी कधी या विमान प्रवासाचा माणसाला कंटाळा येतो. आता असं म्हणणं म्हणजे कुणाला तरी ढोंग वाटेल, पण हे अगदी खरं आहे. मला तर वाटतं, आपण जेव्हा विमानातून जातो, तेव्हा प्रवास म्हणजे आपलं गाठुडं इकडून तिकडे नेऊन टाकायचं; मालवाहू मोटारीनं पाठवलेल्या बोजासारखं. आपण जेव्हा आगगाडीतून जातो, तेव्हा गाडी जर एकदम फास्टम्‌ फास्ट असेल, तर जवळजवळ असाच प्रकार असतो. पण जमिनीवरून सरपटत असल्यामुळे वृक्षवेली, खेडीपाडी, माणसंकाणसं यांची ओझरती तरी दर्शनं होतात. गाडी जर धीमी असेल - म्हणजे स्टॉपिंग ॲट ऑल स्टेशन्स अँड ऑल्सो इन द मिडल - आणि आपल्याला जर वेळ भरपूर असेल, तर अधिक मजा येते. मात्र कोणत्या स्टेशनवर काय खावं, काय प्यावं याची माहिती पक्की असली पाहिजे. सगळ्यात छान म्हणजे, चाकावरून जगाची चक्कर! हवं तेव्हा निघावं, हवं तेव्हा पोहोचावं. कधी सुसाट सुटावं, कधी डकाव्‌ डकाव्‌ रमतगमत जावं. कधी हे पाहण्यासाठी किंवा ते पाहण्यासाठी वाट वळणाची पत्करावी. कधी गावकरी मंडळींशी गप्पाटप्पा कराव्यात. तात्पर्य, संपूर्ण यात्राभर सुख घेतघेत जावं!

पण हे जमावं कसं? कारण आमचा कार्यक्रम असा की, आज पश्चिम किनाऱ्यावर कॅलिफोर्नियात तर उद्या दक्षिणमध्य अमेरिकेत, मग परवा एकदम उत्तर दिग्विजय! आयुर्विम्याला जसा पर्याय नसतो, तसा विमानप्रवासाला तिथे पर्याय नाही. पण अचानक कधी कधी वेगळा योग येतो. सेंट लुईसहून ग्रे हाउंड बसने मी निघालो गेल्सबर्गला. ग्रे हाउंड ही अमेरिकन एष्टी, पण जरा कमी कष्टी! पोहोचे-पोहोचेपर्यंत रात्र झाली. गेल्सबर्गला माझं हक्काचं घर होतं. के. नारायण काळेंचा मुलगा अशोक आणि त्याची बायको अजिता, मुंबईच्या डॉ. दिवेकरांची मुलगी- दोघेही ‘साधना’चे लेखक. अजिता तर छोटी असल्यापासून आपली दोस्तच! मुख्य म्हणजे, मला अत्यंत आवडणारं असं एक प्रलोभन त्यांनी माझ्यापुढे ठेवलं होतं. परतीचा प्रवास ती दोघंही आपल्या मोटरनं घडवणार होती. गेल्सबर्ग ते सेंट लुईस या रस्त्यावरच आहे स्प्रिंग फील्ड.

लक्षात आलं ना, स्प्रिंग फील्ड! साधंसुधं नव्हे, अब्राहम लिंकनचं गाव. आयुष्यभर ज्यांच्याकडे खास आवडीचे नायक म्हणून पाहिलं, त्यांत अर्थातच अब्राहम लिंकनचं स्थान आहे. ‘लिंकनच्या गावी आपण जाणार’ या कल्पनेनंच मनातल्या मनात पुलकित का काय ते, झालो होतो.

अब्राहम लिंकन. आम्ही त्याला प्रेमानं ‘ॲब लिंकन’ म्हणतो. हा मोठा अमेरिकन नेता होता. अमेरिकेचा मोठ्या कठीण काळातला राष्ट्राध्यक्ष होता. अमेरिकेची शकलं उडू न देता यादवीचा निर्धारानं सामना करणारा आणि ‘मानवाचे अंती एक गोत्र’ असे मानणारा महान मानवतावादी होता. ही त्याची ख्याती सर्वश्रुतच आहे. पण मला लिंकनच्या दुसऱ्याच काही गुणांमुळे त्याच्याबद्दल प्रेम वाटतं. त्याला वशिलेबाजीचा तिटकारा होता. त्याच्या ठायी निखळ प्रामाणिकपणा होता. तो अतिशय साधा होता आणि राजकारण्यांमध्ये क्वचित आढळणारी मर्मग्राही विनोदबुद्धी त्याच्यापाशी होती. लिंकनची आणखी एक थोरवी म्हणजे, मनुष्यमात्राच्या सर्वांगीण विकासाचा तो सतत विचार करीत असे. आपल्या मुलाच्या शाळेच्या हेडमास्तरांना महात्मा लिंकनने जे पत्र लिहिलं आहे, त्यात जीवनाच्या समग्रतेचं त्याला सतत घडत असणारं दर्शन आपण स्पष्टपणे पाहू शकतो.

मला साहजिकच विलक्षण उत्सुकता होती - लिंकन कुठे, कसा राहत होता? त्याचं घर कसं असेल? केवढं असेल? प्रासादतुल्य असेल का? सामर्थ्यसंपन्न अमेरिकेच्या वैभवाची खूणगाठ ते घर पटवीत असेल का?

आदल्या दिवसापर्यंत गेल्सबर्गमधलेच बाकीचे कार्यक्रम पार पडले. रात्री झोपते वेळीही मी मनातल्या मनात लिंकनच्या घराचाच जसा काही धोशा घेतला होता. त्याच्या पायी मी एक मूर्खपणा करून बसलो. गेल्सबर्गच्या जवळच जागतिक कीर्तीचा अमेरिकी कवी कार्ल सँडबर्ग याचंही घर राष्ट्रीय स्मारकासारखं जपून ठेवलेलं आहे, ते मी पाहायला हवं होतं... पण माझं मन लहान मुलासारखं एकच हट्ट घेऊन बसलं होतं - मला लिंकनकडे जायचंय!

गाडीने एक सफाईदार वळण घेतलं आणि ती स्प्रिंग फील्डमध्ये शिरली. स्प्रिंग फील्ड नावाप्रमाणेच हिरवळींच्या मैदानांनी व्यापलेलं आहे. गाव नेटकं आणि टुमदार आहे. हेच गाव लिंकननं आपल्या निवासासाठी का पसंत केलं, याला काही तर्कसमर्थ कारण असेलही. हे ना बाजाराचं गाव, ना जादा गजबजलेलं, ना राजरस्त्यावर मिरवणारं, पण ना शुद्ध अज्ञातवासात राहणारं. साध्यासीध्या लिंकनला ‘शिकागो फार जवळ नव्हे, फार लांब नव्हे’ अशी जागा हवी असावी. म्हणून त्यानं निवडलं असावं हे ‘स्प्रिंग फील्ड’.

अनेक एकर क्षेत्रफळाच्या विस्तृत हिरवळीवर लिंकनचं सार्वजनिक स्मारक उभं आहे. त्याच्यासारख्याच शेलाट्या बांध्याचा आणि ताठ मानेचा अग्रदार स्तंभ आपल्या अनलंकृत दिमाखात उभा आहे. तेच त्याच्या उत्तुंग व्यक्तित्वाचं स्मारक. जनसामान्यांच्या समजुतीसाठी स्तंभाच्या पायथ्याशी लिंकनचा पंचरसी पुतळा बसवलेला आहे. या स्मारकाच्या मागे एक बेतशीर स्मृतिगृह बांधलेलं आहे. त्यात लिंकनच्या आठवणी जपणारी चित्रं आहेत आणि ऐतिहासिक महत्त्वाचे शब्दही कोरून ठेवलेले आहेत. हे सारं पाहून झाल्यावर मात्र पुन्हा बाहेर यावं, हवं तर स्मृतिगृहाच्या सौधावर जावं, हवं तर प्रांगणातच थांबावं. उंच उंच वृक्ष अंतरा-अंतरावर आब राखून उभे दिसतील. पायतळी हिरवी मखमल आणि माथ्यावर निळा चांदवा. ऊन सौम्य आणि सुखकर हवा चंद्रशीतल थंडाव्याची. ही जागा माणसांना म्हणते,

या बांधवांनो, चहूं दिशांनी या.

कुबट तटभिंतींनी कोंझ्या केलेल्या

बंदिस्त बंदिशाळा फोडून टाका.

मोकळ्या हवेच्या वारूवर

आपल्याच आकांक्षांची अदृश्य निशाणे

फडकवीत या.

मनुष्यमात्राच्या स्वातंत्र्याची गाणी

मुक्तकंठ आळवीत या.

मानवाच्या विशाल गोत्रामध्ये

ज्याला जे मिळायला हवे ते मिळो.

अन्यायाने कोणाला काही नाकारले गेले

तर मात्र शस्त्र उपसावे लागेल.

माणूस गोरा आहे की काळा,

तांबूस की पिवळा,

त्याचे आपले नाते असते, हे विसरू नका.

जागा बोलतात का? त्या झपाटलेल्या असतात का? गेलेला माणूस आपल्या स्पर्शाने आणि श्वासाने वास्तू भारून ठेवतो का? कोणास ठाऊक! पण काही ठिकाणी तरी प्रथम भेटीत ज्या व्यक्तीच्या नावाने ते ठिकाण तीर्थक्षेत्रासारखं झालेलं असतं, त्याने सारं आसमंत झपाटलेलं आहे असं वाटतं. असाच अनुभव पूर्वी शांतिनिकेतनाच्या प्रथम दर्शनात आला होता.

स्मारकाच्या परिसरात हिंडताना ‘लिंकनविषयी आपल्याला वाटणारं आकर्षण कसं वाढत गेलं’ याचा शोध माझं मन घेऊ लागलं. कसाबसा वकिली पास झालेला आणि अनेक सामान्य वकिलांप्रमाणे काम मिळावं म्हणून वणवणणारा लिंकन आणि तरीही लबाडी करून खटले जिंकण्याचं अव्हेरणारा, लुच्चेपणाची वकीलपत्रं घेण्याचं नाकारणारा लिंकन, आपल्या मार्मिक भाषणांनी निवडणुका जिंकणारा लिंकन आणि आपली तत्त्वनिष्ठा व स्पष्टवक्तेपणा यांमुळे निवडणुका हरणारा लिंकन; गावंढ्या गावातून बाहेर पडून अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झालेला, राष्ट्र दुभंगवू पाहणाऱ्या यादवीला खंबीरपणे तोंड देणारा लिंकन संघराज्याचा विजयध्वज अभिमानाने उंच धरू शकणारा लिंकन, अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना न्याय मिळाला पाहिजे असं म्हणणारा आणि त्यांचा कैवारी लिंकन... अशी या महामानवाची कर्तुकी तर मला आठवत होतीच, पण महामानवांच्या ठिकाणी दुर्मीळ असणारी लिंकनची विनोदप्रियताही आठवून आठवून मला हसू येत होतं.

एकदा लिंकन आपल्या बुटांना पॉलिश करीत बसला असता, एक घमेंडखोर ब्रिटिश वकील तिथे आला आणि त्याने तुच्छतेने लिंकनला विचारलं- ‘काय प्रेसिडेंटसाहेब, तुम्ही तुमच्या बुटांना पॉलिश करता?’ त्याची टवाळखोरी आपल्या लक्षात न आल्याचा बहाणा करून लिंकन म्हणाला, ‘होय महाराज, मी माझ्या बुटांना पॉलिश करतो. आपण कुणाच्या बुटांना पॉलिश करता?’

भांजा-भतीजांना चिकटवून वशिलेबाजी करणे, लिंकनला अगदी नापसंत असे. तरी त्याचे नातेवाईक, गाववाले अनेकदा त्याला गराडा घालीत आणि आपली वर्णी लावण्यासाठी तगादे लावीत. त्या सर्वांना थोडा वेळ बसायला सांगून एकदा लिंकन म्हणाला, ‘मी तुम्हांला आधी एक गोष्ट सांगतो. कोणे एके काळी सगळे प्राणी आळीपाळीने एकेकाला आपला राजा करीत. होता होता गाढवाची पाळी आली. गाढवाचे भाईबंद आपल्याला अधिकार मिळावा म्हणून एकच हाकाटी करू लागले. तेव्हापासून जगात तीच पद्धत पडली. आजही त्याचेच भाईबंद हक्कानं वशिला लावायला येतात.’

लिंकन, गुरू आहेस बाबा! माणसाच्या जीवनाच्या किती क्षेत्रांवर तू प्रकाश टाकला आहेस! मानव समाज तुझ्या नेहमी ऋणात राहील.

लिंकनला मनातल्या मनात लाख प्रणाम करीत आम्ही ते स्मारकाचं उद्यान सोडायचं ठरवलं, पण त्या उद्यानाच्या कोपऱ्यात आणखी एक स्मारक आमची वाट पाहत होतं. व्हिएतनामच्या युद्धात हजारो अमेरिकी नवयुवक ठार झाले. एखाद्या तुघलकाप्रमाणे अमेरिकी शासनानं त्यांची आहुती देण्यासाठी त्यांना लढाईवर पाठवलं, ही एक लहर झाली. दुसरी लहर येताच, युद्धबंदी पुकारून आणि जगात सर्वत्र उठलेल्या निषेधाच्या आवाजापुढं मान तुकवून व्हिएतनाममधून लष्कर परत घेतलं. साराच पोरखेळ! त्यांचा खेळ झाला, पण असंख्य निरागसांचा त्यात जीव गेला.

युद्धात मरण पावलेल्या सर्व सैनिकांची स्मारके उभारणार तरी कशी! नुसते क्रूस उभारले, तरी त्यांनी शेकडो एकर जमीन व्यापली असती. त्यामुळे कोणा चतुर शिल्पकाराच्या कल्पकतेने ‘अनाम सैनिक’ ही संकल्पना काढली आणि या ‘अनाम सैनिकाचे स्मारक’ म्हणजे ‘सर्वच हुतात्मा सैनिकांचे स्मारक’ असं मानण्याचा जगभर प्रघात पडला; पण कल्पक बुद्धी कधी एका निर्मितीवर पूर्णविराम घेत नाही. म्हणून अलीकडच्या काळात अमेरिकेत वॉशिंग्टनजवळ काळ्या कुळकुळीत ग्रॅनाईट्‌सचे त्रिकोण अथवा शंकू रचून त्यांचा एक अमूर्त आकृतिबंध उभवण्यात आला आणि ग्रॅनाईटवर रणांगणात पडलेल्या सर्वांची नावं कोरण्यात आली. हे मोठं स्मारक आहे वॉशिंग्टनजवळ, तर स्प्रिंग फील्डला असंच छोटं स्मारक उभारून सभोवतालच्या प्रदेशातील मृत सैनिकांची नावं त्यावर कोरण्यात आली आहेत. आम्ही पोहोचलो त्याच वेळी शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी बसेसमधून स्मारकाला भेट देण्यासाठी आली होती. आपल्या प्रिय व्यक्तीच्या कोरलेल्या नावावरून हात फिरवताना किंवा ग्रॅनाईटच्या पायथ्याशी फुलं ठेवताना त्यांचे डोळे पाणावत होते. तशी सगळ्यांची दृष्टी शाबूत होती हे खरं, पण डोळे पाण्याने भरल्यामुळे सारे जसे काही आंधळे झाले होते. ग्रॅनाईटवर नावं कोरलेली असल्यानं त्यांनी ती नावं एका अभिनव ब्रेल लिपीतच वाचली, असं मला वाटलं.

स्मारकाच्या विशाल परिसरातून आमचा मोर्चा वळला, लिंकनच्या घराकडे. ‘एक राष्ट्रीय महत्त्वाची वास्तू’ म्हणून अवघ्या अमेरिकी राष्ट्रानं लिंकनचं निवासस्थान प्रेमादरानं जपलेलं आहे. हे घर तसं इतरे जनांच्या वस्तीतच बांधलेलं आहे. ते प्रासादतुल्य नाही, राष्ट्राध्यक्षाच्या वैभवाची मिजास मिरवणारं नाही. ‘फुलबाग बगीचा भवती’ घेऊन उभा असलेला ‘बंगला नवा नवकोनी’ नाही. पुढे-मागे सज्जे काढलेलं ते एक दुमजली, नीटनेटकं, पण साधं घर आहे. त्याच्या संरक्षणाच्या दृष्टीनं आता कडीकोयंडे आणि साखळ्या-कठडे यांत वाढ करण्यात आली आहे. आत फिरण्यासाठी प्रदक्षिणामार्ग निश्चित करून देखभाल करायला माणसं नेमलेली आहेत, हेच त्याचं वेगळेपण आहे. गर्दी होऊ नये म्हणून मोजून मोजून ठरावीक संख्येनं समुदाय आत सोडले जातात आणि ते बरोबर आहे. घर बघायला आलेल्या सर्वांचं वर्तन अगदी आदर्श असतं. आखून दिलेले मार्ग सोडून कोणी स्वैर भटकत नाहीत, घरातील वस्तूंना हात लावत नाहीत. लिंकनच्या स्मृतीच्या पावित्र्याला कोणीही थोडासुद्धा ढळ पोहोचू देत नाही.

लिंकनचं घर, घरंदाज गृहस्थाचं घर - बैठकीची खोली, छोटीशी अभ्यासिका, वाद्यं वाजवायची आणि गायची कौटुंबिक संगीतशाळा, अगदी गरजेपुरती शयनगृहं; भक्कम, साधं फर्निचर; डामडौलाला फाटा देणाऱ्या गाद्यागिरद्या, भलीमोठी स्वयंपाकाची भांडी, चुल्हाण; गंमत म्हणजे, संडास चक्क घरापासून वेगळा, परसदारी! आर्किटेक्ट बहुधा भारतातून नेलेला असावा!!

घरातलं फर्निचर पाहताना मला लिंकनची आडमाप उंची आठवून मनातल्या मनात हसू येत होतं. त्याच्या उंचीच्या मानाने पलंगाची लांबी जरा कमी वाटली. बिच्चारा! पोटाशी पाय घेऊन झोपत असावा. स्वारीने पलंग रेडिमेड आणला होता की काय कुणास ठाऊक! पण घरासारखं घर होतं म्हटल्यावर त्यात सोयीप्रमाणे गैरसोयीही असणारच.

मला उगीचच हो चि मिन्हची आठवण झाली. राष्ट्राचा प्रमुख झाल्यानंतरदेखील त्याने तीन खोल्यांचा आपला फ्लॅट सोडला नव्हता म्हणे!

अहो दिल्लीमधील लहानथोर, पण बहुधा थोरच शहेनशाह हो, तुम्ही यांच्यापासून काहीही शिकू नका. तुमच्यापैकी प्रत्येकाला दहा-वीस शयनकक्ष असणारा बंगला मिळालाच पाहिजे. तुमच्यापुढे आदर्श असावा, तो लिंकनचा नव्हे आणि हो चि मिन्हचाही नव्हे. तुमच्यापुढे आदर्श हवा चौदाव्या लुईचा, रशियाच्या झारचा, अकबर शहाजहानचा. अलीकडच्या काळातला हवा असेल, तर सातशे बिब्यांसह नांदणाऱ्या निजामाचा. लिंकनची भिकारडी लक्षणं त्याची त्यालाच लखलाभ असोत! तशी लक्षणं धारण करून महत्पदी चढणं लालबहादूर शास्त्रींना जमलं असतं, पण गेले बिचारे! लिंकनसारखीच शरीरयष्टी आणि विनोदबुद्धी असलेल्या आमच्या एस. एम.ना ही लक्षणं शोभली असती, पण नशिबात पाहिजे ना!

 

Tags: pravasvarnan goshti deshantarichya vasant bapat अब्राहीम लिंकन गोष्टी देशांतरीच्या प्रवासवर्णन वसंत बापट weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके