डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

हे तो प्रतीतीचे बोलणे भाषिक समस्या- पण किती वेगळी!

मणिपुरी भाषेला साहित्य अकादमीत स्थान मिळालेले आहे; पण ज्या मणिपुरी भाषेला स्थान मिळाले आहे, ती आपली भाषा असे मानणाऱ्या ट्राइब्ज जवळ जवळ नाहीतच. मणिपुरी वैष्णवांनी बळजबरीने लादलेली ही भाषा आहे, अशी भूमिका आता अगदी उघडपणे आणि हिरीरीने मांडली जात आहे अक्षरशः मणिपूर आणि नागालँडमधील भाषिक भूगोलांची चित्रे म्हणजे अठरा अठरा धान्यांची दोन कडबोळी आहेत.

अरुणाचलची भाषा कोणती? मणिपूरची कोणती? नागालँडची कोणती? मला वाटते या प्रश्नांची उत्तरे विचारली तर आपल्यापैकी नव्याण्णव टक्के तरी लोक नापास होतील. या यादीतच मेघालय आणि मिझोराम हे दोन प्रदेशही समाविष्ट करायला हरकत नाही. तूर्त आपण ही सगळी राज्ये मिळून होणारा एकच उत्तर-पूर्वी प्रदेश आहे असे समजू या. येथे राहणाऱ्या भारतीय समाजांशी आपले नेमके काय नाते आहे? ही सगळी भूमी नकाशात तरी आपल्या देशाचा अविभाज्य भाग म्हणून दाखवलेली आहे. पण इथले जनजीवन आणि उर्वरित भारतातील जनजीवन यांना जोडणारा धागा कोणता? सामान्यतः राष्ट्रातील जनसामान्यांना संघटित करणारी तत्त्वे म्हणजे धर्म, भाषा, वंश, समान इतिहास, समान सुखदुःखे, समान आकांक्षा किंवा या सर्वांपेक्षाही महत्वाची अशी नामातीत ऐक्यभावना.

आपल्या नकाशात आपल्या नावावर मांडलेला सर्व प्रदेश म्हणजे स्वदेश. या भाबड्या भावनेशिवाय आपल्या मनात आपल्या एकराष्ट्रीयत्वाचा विचार क्वचितच कधी घर करतो. त्यात पुन्हा देश खंडप्राय, दळणवळणाची साधने तुटपुंजी; सामाजिक अभिसरणाचा वेग कूर्मगतीचा. तर मग हा सर्व डोलारा आपण भक्कम पायावर कसा आणि केव्हा उभा करणार आहोत, हे काही समजत नाही. आपले कुळ, आपले घराणे, आपली जात-पोटजात, असल्या क्षुल्लक अस्मिता कुरवाळीत बसल्यावर बृहत्तर अस्मिता जोपासण्याचे आव्हान आपण दूरच्या भविष्यकाळात तरी पेलू शकतं किंवा नाही, याची शंका वाटते. 

आंतरप्रांतीय, आंतरधर्मीय आणि आंतरजातीय सोयरिकींचे प्रमाण अत्यल्प तर आहेच, पण या सर्वांचे कडेही भारतातील. सर्व जनजातींना एकवट करण्याइतके व्यापक नाही. म्हणजे असे की, मराठी तरुण आणि मिझो किंवा गारो तरुणी असा एखादा विवाह ऐकिवात आला, तर आपणां सर्वांना केवढा अचंबा वाटेल! कोणा जोशी-कुलकर्णी किंवा जाधव-मोरे घरातल्या मुलीचे सासर लडाखमध्ये आहे, असे कुणी ऐकले आहे काय? एखादे दुसरे तुरळक उदाहरण वगळता माझ्या तरी आढळात असल्या सोयरिकी आलेल्या नाहीत. उलटपक्षी, आपल्या उत्तर आणि पूर्व सीमेवर दवा धरून बसलेल्या मोंगोल वंशीयांना अशी जवळीक करणे अगदी सहज शक्य आहे! इतकेच नव्हे, तर व्यापक राष्ट्रीय हितासाठी(!) ईशान्येकडील मोंगोल-वंशीय, भारतीय वंशाशी बुद्धिपुरस्सर जवळीक करणे चीन आणि तिबेटमधील लोकांना सहज शक्य आहे.

हे सर्व एकवेळ सोडा, पण ईशान्येकडील आणि पूर्वेकडील आपले बांधव काय खातात, काय पितात, कसे राहतात, त्यांचे शिक्षण कोणत्या भाषेत होते, त्यांची व्यवहाराची आणि साहित्याची भाषा कोणती, या विषयांत आपण ‘ढ' इतके आहोत की, कधी म्हणून त्यांचा अभ्यास आपल्याला जमेल, अशी चिन्हे आज तरी दिसत नाहीत. वानगीदाखल सध्या मणिपूर आणि नागालॅंड हीच दोन राज्ये घ्या ना. या प्रत्येक राज्यात वेगळ्या वेगळ्या सुमारे वीस वीस जनजाती आहेत. जे ‘किरिस्ताव' झाले आहेत, ते सोडल्यास बाकी सर्व जनजातीचे धर्म भिन्न भिन्न आहेत आणि भाषाही वेगवेगळ्या आहेत. या सर्वांची यादीसुद्धा करण्यात अर्थ नाही. कारण त्यांच्या प्रत्येक धर्माला आणि भाषेला नाव असेलच असे नाही. मणिपूर त्यांतल्या त्यांत एकजिनसी आहे, असे आजवर वाटत असे.

मणिपुरी भाषेला साहित्य अकादमीत स्थान मिळालेले आहे; पण ज्या मणिपुरी भाषेला स्थान मिळाले आहे, ती आपली भाषा असे मानणाऱ्या ट्राइब्ज जवळ जवळ नाहीतच. मणिपुरी वैष्णवांनी बळजबरीने लादलेली ही भाषा आहे, अशी भूमिका आता अगदी उघडपणे आणि हिरीरीने मांडली जात आहे अक्षरशः मणिपूर आणि नागालँडमधील भाषिक भूगोलांची चित्रे म्हणजे अठरा अठरा धान्यांची दोन कडबोळी आहेत. मणिपुरी भाषा म्हणजे जनसामान्यांवर 'वरून' लादलेली भाषा आहे, असे तिथल्या 'पददलितां'चे म्हणणे आहे. पाश्चात्य संस्कृतीला अधिक वश झालेल्या नागालँडने आपल्या ‘कडबोळ्या'तल्या अठरा धान्यांचे सत्व काढून सर्व नागांना एक समान भाषा म्हणजे नागालँड पुरती ‘एस्परान्तो भाषा' तयार करण्याचा खटाटोप चालवला आहे.  

अशी भाषा सिद्ध झाली नाही, तर आपापली स्वतंत्र बोली जपणाऱ्या विविध नाग जमातींच्या 'असेम्ब्ली'ला तरी काय अर्थ राहणार आहे? एकाच्या प्रश्नाचे उत्तर दुसऱ्याने दुज्या भाषेत द्यायचे, त्यावर तिसऱ्याने तिज्या भाषेत उपप्रश्न विचारायचा. त्यावर चौथ्याने चौथ्या बोलीत आक्षेप घ्यायचा. या घटनेला आपण काय म्हणू! बॅबलच्या मनोऱ्यात अनेकानेक भाषांचा गोंधळ झाला, तरी निदान त्या भाषांना नावरूप तरी असले पाहिजे. त्यांचा काही तरी एकमेकांशी संबंध असला पाहिजे. नागालँडमध्ये सध्या चालू असलेला प्रयोग महानच म्हटला पाहिजे. भारतवर्षात शेकडो भाषा प्रचलित असल्याचे सत्य मियर्सन बोलून चुकला आहे. आधुनिक भारतात विशिष्ट भाषांना सरकारी मान्यता मिळाली आहे. त्या भाषांच्या वर्तुळांतील बोलींची नोंद आणि मीमांसा झालेली आहे, आणि अखिल भारतीय व्यवहारासाठी एकच एक राष्ट्रभाषा करण्यात आपल्याला अपयश आलेले असले, तरी हिंदी आणि इंग्रजी या दोहोंना सर्वसंपर्क भाषा, हे स्थान आपण दिलेले आहे.

पण असल्या सोडवणुकीचा उपयोग मणिपूरलाही नाही आणि नागालँडलाही नाही. नवजात राष्ट्रातील नवजात प्रदेशांतल्या या नवजात समस्या आहेत! त्या सुटल्या तरच प्रादेशिक स्थैर्याची अपेक्षा तेथे करता येईल. असे स्थैर्य निर्माण होऊन भारतीय राष्ट्रजीवनाच्या मुख्य प्रवाहात हे प्रदेश सरमिसळ झाले आहेत, हे चित्र आपणांस नजीकच्या भविष्यात तरी दिसू शकेल काय?
वाईट वाटते ते याचे की, असली कोडी सोडविण्याकडे तर बुद्धिमंतांचे लक्ष नाहीच, पण असली कोडी आहेत. याचीही गंधवार्ता फारशी कोणाला नाही.

कुणि कोडे यांचे उकलिल का!
 

Tags: Speed of Social Convergence Means of Communication Interracial Societies Manipur Vasant Bapat सामाजिक अभिसरणाचा वेग Linguistic Problems दळणवळणाची साधने आंतरजातीय सोयरिकीं मणिपूर वसंत बापट भाषिक समस्या weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके