डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

सेवादलाचे पुनरूत्थान शक्य आहे काय ?

राष्ट्र सेवादलाचे पुनरुत्थान साधावयाचे असेल तर ते व्यापक लोकशाही समाजवादी व सर्वोदयी राजकीय चळवळीच्या पुनरुत्थानाच्यासह, एकाच वेळी व एकाच प्रक्रियेचा भाग म्हणून साधेल, हे प्रथम पक्के जाणले पाहिजे. एस.एम.जोशी, भाऊसाहेब रानडे यांच्या पिढीनंतर सेवादलाला जे नेतृत्व लाभले ते नवी आव्हाने पेलू शकण्याच्या क्षमतेचे व उंचीचे नव्हते. सेवादलाचे लोकशाहीकरण झाल्याने समर्थ नेतृत्वाचा प्रश्न सुटला नाही. दुय्यम-तिय्यम क्षमतेच्या कार्यकर्त्यांनी आपल्या मर्यादित क्षमतांचे भान राखून, परस्परांचा विश्वास कमावून एकदिलाने काम करीत, अशा समर्थ नेतृत्वाच्या उदयाची पूर्वतयारी करण्याचा हा काळ आहे. अशा नेतृत्वाच्या उत्कर्षाला प्रोत्साहक व स्वागतशील वातावरण निर्माण करणे व टिकविणे हे मग आत्ताच्या धुरिणांचे काम ठरते.

राष्ट्र सेवादलाच्या हीरक महोत्सववर्षी ‘साधना'मध्ये दलाच्या पुढील वाटचालीविषयी लेखन प्रसिद्ध होत आहे. अलीकडे या विषयावर नरेंद्र दाभोलकरांनी लिहिलेले संपादकीय व मेधा पाटकर, ना.य.डोळे यांचे लेख वाचले. 

सेवा दल चे ‘संस्कार' माझ्यावर झाले नाहीत. याचे एक कारण माझे बालपण व कुमारवय हैदराबाद येथे गेले. तेथे सेवादलाचे काम त्या काळात नसावे. (1942-1950). पण साने गुरुजींच्या पुस्तकांचे मनःपूर्वक वाचन हा जर सेवादल विचाराचा ‘संस्कार' म्हणता येत असेल तर तो माझ्यावर खोलवर त्या काळात झाला. पुढे 1951 साली नेरळ येथे साने गुरुजी सेवापथकाचे एक उन्हाळाभरचे मोठे श्रमदान शिबीर झाले. त्या शिबिरात तीनचार आठवडे मी सहभागी होतो. पुणे व मुंबई येथील सेवादलातील अनेकानेक मुख्य कार्यकर्ते यांमध्ये वेळोवेळी सहभागी होते. यांच्यापैकी काहींशी मैत्री जुळून आली. हादेखील सेवादलाचा ‘संस्कार'च. 

तेथपासून सेवादलाची वाटचाल काहीशा अंतरावरून पाहात आलो आहे. गेल्या पन्नास वर्षांतली लोकशाही समाजवादी राजकीय चळवळ आणि राष्ट्र सेवादल यांच्या जीवनकार्याचा आढावा एका वाक्यात सांगावयाचा झाला तर त्याचे, ‘या दोन्हींच्या ऱ्हासाचा नि वाताहतीचा हा कालखंड आहे.’ असे वर्णन करावे लागेल. गुणी, कर्तबगार, निष्ठावान, विचारी कार्यकर्त्यांची संख्या या सर्व काळात हेवा वाटावा इतकी कायम राहूनही असे का घडले ? 

राष्ट्र सेवादलाचे पुनरुत्थान साधावयाचे असेल तर ते व्यापक लोकशाही समाजवादी व सर्वोदयी राजकीय चळवळीच्या पुनरुत्थानाच्यासह, एकाच वेळी व एकाच प्रक्रियेचा भाग म्हणून साधेल, हे प्रथम पक्के जाणले पाहिजे. काँग्रेसची लोकप्रियता व प्रभुत्व नकीच ओसरणार व मग स्वाभाविकपणे लोकशाही समाजवाद्यांच्या हाती सत्ता येणार, या आशयाचा आशावाद आचार्य जावडेकरांनी 1955 च्या आसपास प्रकट केला होता. तसे का घडले नाही, याची प्रांजळ व परखड चिकित्सा होऊन त्यातून निघणारा बोध आत्मसात केल्याशिवाय, त्यानुसार बदल, सुधारणा केल्याशिवाय पुनरुत्थान शक्य नाही.

अभिनेत्री स्मिता पाटील सेवादलाच्या, नटश्रेष्ठ निळू फुले, राम नगरकर, सेवा दल कलापथकाचे मेधा पाटकर सेवादलाच्या या पद्धतीने युक्तिवाद करून स्वतःचे समाधान करण्याने कोंडी फुटणार नाही. अशा अनेक व्यक्ती त्यांच्या त्यांच्या व्यावसायिक वा समाजकार्याच्या क्षेत्रात नामवंत होत गेल्या, त्याच काळात सेवादलाचा ऱ्हास होत होता; आणि या व्यक्तीदेखील सेवादलापासून कमीअधिक दूर गेल्या, हे सत्यही लक्षात घ्यावे. 

ऱ्हासाची कारणे निःपक्षपातीपणे शोधली पाहिजेत 
आपणा बहुतेकांच्या मनात, अटळ स्वाभाविकपणे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी तुलना होते. आज संघपरिवार ही एक राजकीय-सामाजिक ताकद म्हणून आपल्याला पदोपदी अनुभवाला येते. सेवादलाचे संस्कार घेऊन मोठे झालेल्या अनेकांनी विभिन्न क्षेत्रांत लहानमोठ्या संस्था उभारल्या आहेत. आणि तरीही ‘सेवा दल परिवार' असा काही उभाही राहिला नाही आणि ती एक मोठी राजकीय सामाजिक शक्ती म्हणूनही अनुभवाला येत नाही. 

बरे, बुद्धीची चमक, विचारांची प्रगल्भता व झेप, कौशल्ये-क्षमता कर्तृत्व या बाबतीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला असामान्य गुणवत्तेच्या माणसांना आकृष्ट करण्यात यश आले, तर सेवादलाच्या वाट्याला सामान्य प्रतीच्या व्यक्तीच आल्या; असा काही अनुभव नाही. मग आपला ऱ्हास का व्हावा ? 

भारताच्या वैशिष्ट्यपूर्ण सामाजिक-राजकीय, धार्मिक-सांस्कृतिक, आर्थिक-तंत्रवैज्ञानिक, बौद्धिक-दार्शनिक समाजस्थितीची सम्यक ओळख करून घेऊन ‘लोकशाही समाजवादा’चा आशय स्पष्ट करून घेणे, त्याच्या पायाभरणीची दीर्घ पल्ल्याची कार्यक्रमपत्रिका तयार करणे, आणि ती मूर्त करण्याची क्षमता व कौशल्ये असलेल्या कार्यकर्त्यांची फळी बांधणे वा जाळे आच्छादणे यांत आपण कमी पडलो आणि उत्तरोत्तर अधिकाधिक कमी पडत गेलो.

अलीकडे आपला (तथाकथित) ‘ब्राह्मणी' चेहरा वा वारसा नाकारण्याच्या ओघात आपण छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जास्त उठाव देण्याचे धोरण अंगीकारले. पण त्यांचे विचारधन व इतर गुणवैशिष्ट्ये आत्मसात करून ‘लोकशाही समाजवादा’ची मूलगामी फेरमांडणी केली नाही. यासाठी जो निरक्षीरविवेक करणे आवश्यक होते तो केला नाही. उदाहरणार्थ, ज्या मोकळेपणाने व तटस्थतेने गांधी-विनोबा, सर्वोदय चळवळ यांची चिकित्सा होत असते, त्याच मोकळेपणाने छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची वा भूमिकांची केली गेली नाही. ही प्रक्रिया करूनच खऱ्या अर्थाने त्यांना आत्मसात करता येणार आहे. 

संघ-सावरकरप्रणित हिंदुत्ववादाचा मी कोणत्याही अर्थाने समर्थक नाही. पण ही हिंदुत्ववादी विचारसरणी, केवळ उच्चवर्णीयांची नव्हे तर, मध्यम व कनिष्ठ जातीय समूहांचीही पकड घेते, याचा अर्थ लावणे जर जरूरीचे आहे; जर भारत हे एक राष्ट्रवादी राष्ट्र राज्य म्हणून भक्कमपणे उभे राहावे, ही आजची गरज असेल तर त्यासाठी सांस्कृतिक- ‘वांशिक (‘एघ्निक' या अर्थाने, वंशवादी या अर्थाने नव्हे) अस्मिता गाभ्याशी असायलाच लागणार. आपण सगळे ‘भारतीय' आहोत, आणि आमची निष्ठा भारताच्या राज्यघटनेला आहे हे म्हणणे पुरेसे ठरत नाही. चातुर्वर्ण्याच्या चौकटीतील जात ही या देशात अनेक शतके अस्मिता प्रदान करणारी गोष्ट होती. आज मी इस्लामधर्मीय, शीखधर्मीय, ख्रिश्चनधर्मीय, मी झरधुष्टधर्मीय, मी यहुदीधर्मीय; पण त्याच वेळी मी भारतीय आहे असे इतर समाजघटक आवर्जून सांगत असतील तर आम्ही अमूक जातीचे, जमातीचे अशी अस्मिता न बाळगता आम्ही ‘हिंदू' आहोत ही अस्मिता बाळगणे व त्याचवेळी भारतीय असणे हे स्वाभाविक तर आहे, पण अनुचितही नाही. सेक्युलर बनण्याच्या आग्रहापोटी जर आम्ही ‘हिंदू' या अस्मितेला योग्य स्थान व अवकाश देण्याचे नाकारत राहिलो असू तर ‘हिंदुत्ववादी’ विचारसरणी बाळगणाऱ्या संघटनेकडे लोक वळणार, यात नवल ते काय ? 

‘विविधतेत एकता' या गुणवैशिष्ट्याचा प्रामाणिक स्वीकार 
‘विविधतेत एकता' हे भारतीयत्वाचे व्यवच्छेदक गुणवैशिष्ट्य आहे. ही सर्वसमावेशक भूमिकाही सेवादलाची एक पक्की वैचारिक बैठक असायला हवी. विविधतेचे निमित्त पुढे करून, एकता कधीच कशी या देशात व समाजात नव्हती; ‘हिंदू' ही कोटी कशी लादलेली आहे, हे आक्रमकपणे ‘दाखवून' देत, ‘सिद्ध' करीत राहणाऱ्या वैचारिक भूमिकांना गेल्या पंचवीस वर्षांमध्ये सेवादल अधिमान्यता देत आहे, (या द्यावी असे म्हणत आहे) अशी छाप उमटते. साने गुरुजींच्या विचारव्यूहाशी मग फारकत घेतली जाते; गुरुजींचे ‘भारतीय संस्कृती’ हे पुस्तक मग ‘हिंदुत्ववादी' ठरविले जाते. व्यवहारात, या भूमिकेमुळे पुरोगामी, सेक्युलर परिवर्तनवादी चळवळीत गेल्या वीस वर्षांमध्ये किती सवतेसुभे उभे राहिले आहेत, ते लक्षात घ्यावे. ‘तेलही गेले, तूपही गेले, हाती धुपाटणे तेवढे राहिले’, अशी तर आपली अवस्था झालेली नाही ना, याचा गंभीरपणे सेवादलामध्ये विचार व्हायला हवा. 

हे एक उदाहरण म्हणून विस्ताराने विचारांत घेतले. मुख्य मुद्दा हा की भारतीय समाजाचा इतिहास, त्याची परंपरा, येथील लोकांची जडणघडण व मानसिकता, बदललेला काळ, परिस्थिती व समस्या यांच्या आलोकात ‘लोकशाही समाजवादा'चा आशय- म्हणजेच विचारव्यूह- सुस्पष्टपणे पुन्हा एकवार मांडण्यातले अपयश हे सेवादलाचा ऱ्हास होण्याचे एक कारण मला दिसते. 

सेवादलाच्या चौकटीबाहेर, पण ज्या ठिकाणी सेवादलात वाढलेल्या मंडळींचाही सहभाग होता, अशी दोन मोठी व्यासपीठे अलीकडच्या काळात महाराष्ट्रात उभी राहिली. डॉ. बाबा आढाव यांच्या ‘एक गाव, एक पाणवठा' मोहिमेमधून प्रामुख्याने, अंशतः नामांतराच्या चळवळीमधूनही, उभे राहिलेले ‘विषमता निर्मूलन शिबीर' हे एक; आणि वि.नि.शि.मधूनच काहीसे वेगळे होऊन उभारलेले ‘विचारवेध संमेलन' हे दुसरे. म्हटले तर, ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती' हे तिसरे व्यासपीठ म्हणता येईल. या तिन्ही व्यासपीठांचे यश व अपयश, मर्यादा, तुंबलेपणा यांचीही मोकळेपणी चिकित्सा व्हायला हवी. प्रक्षोभक ठरण्याची शक्यता ध्यानात घेऊनही दोन विधाने पुढीलप्रमाणे करता येतील. मार्क्सवाद, फुलेवाद, आंबेडकरवाद या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विचारव्यूहांमुळे लोकशाही समाजवादी विचारव्यूह अधिक परिपूर्ण व सशक्त बनण्याऐवजी तो अधिक फुटकळ, क्षीण व एकांगी बनला तर नाही ? सेक्युलॅरिझम इहवाद, बुद्धिप्रामाण्यवाद, विज्ञाननिष्ठा यांच्या अंगीकाराने विचार अधिक प्रगल्भ, समंजस बनण्याऐवजी मने जास्तच झापडबंद व अप्रस्तुत तर बनलेली नाहीत? 

स्वातंत्र्य व समता व व्यक्तीची आत्मनिष्ठा व स्वायत्तता यावर लोकशाहीचा विचार आधारलेला आहे. पण हक्कांबरोबरच कर्तव्ये, स्वातंत्र्याबरोबर निर्बंध व मर्यादा, समतेबरोबर क्षमता व अधिकारभेद, व्यक्तीची आत्मनिष्ठा व स्वायत्ततेसोबत समूहनिष्ठ समर्पितता व मुरड... थोडक्यात शिस्त आणि कर्मठपणा यांची गरज व मौलिकता जर एखाद्या समाजात जाणीवेत, वागण्या-बोलण्यात मुरलेली नसेल तर मोठ्या कामगिऱ्या पार पाडू पाहण्यासाठी आवश्यक त्या संघटना उभ्या राहत नाहीत; कार्यसिद्धी होत नाही. तसेच लोकशाही व्यवस्थेतही नेतृत्व हा घटक तेवढाच महत्त्वाचा राहतो. जेवढा आदेशावरहुकूम कार्य केली जाणाऱ्या व्यवस्थांमध्ये, याचा विसरही वा याची उपेक्षाही मोठ्या कामगिऱ्या पार पाडण्याच्या आड येते. 

सामान्य व्यक्तींचे सामूहिक नेतृत्व; नेतृत्वगुण जोपासण्याची गरज 
एस.एम.जोशी, भाऊसाहेब रानडे यांच्या पिढीनंतर सेवादलाला जे नेतृत्व लाभले ते नवी आव्हाने पेलू शकण्याच्या क्षमतेचे व उंचीचे नव्हते. सेवादलाचे लोकशाहीकरण झाल्याने समर्थ नेतृत्वाचा प्रश्न सुटला नाही. तसा तो आपोआप सुटत नसतोच. एकचालकानुवर्तित्व हे संघटनसूत्र जिथे मान्यच असते तिथे जो कोणी त्या पदावर आरूढ होतो त्याच्याभोवती वलय निर्माण होते (वा केले जाते). आणि पुष्कळदा अशा संघटनेची बांधणीही अशी असते, जिथे वरून दुसऱ्या पातळीवरील कार्यकत्त्या/पुढाऱ्यांमध्ये सत्तेसाठी स्पर्धा तीव्र असते, आणि त्यात, एका अर्थी, नेतृत्वगुणांचा कस लागतो. या प्रकारची स्थिती रोमन कॅथॉलिक चर्चमध्ये उदाहरणार्थ आढळते. पोप म्हणून ज्या व्यक्तीची निवड होते तो अगदी सामान्य वकूबाचा असण्याचा संभव फार कमी असतो. पोप म्हणून ज्या व्यक्तीची निवड होते त्याला निष्ठा वाहून कर्मठपणे आपले कार्य करीत राहण्याची शिस्त इतरेजन पाळतात. जिथे हे संघटनसूत्र नसते, तसे जिथे स्पर्धेपेक्षा भ्रातृभाव, सहकार्य यांवर भर दिला जातो, तिथे नेतृत्वगुणांचा कस लागण्याची, नेतृत्वगुण जोपासले जाण्यासाठी कार्यकर्ते, पुढारी यांना खण्याची, आणि आपल्यातील अधिक सक्षम, गुणी व कर्तृत्ववान व्यक्तीचे नेतृत्व निष्ठापूर्वक स्वीकारण्याची एक रीत अंगवळणी पडायला लागते. ‘भाकरी फिरवली नाही तर करपते' अशी म्हण आहे. (खाली चांगला जाळ गृहीत असतो). पण संघटना, संस्था यांच्यापुढे आव्हानाचा काळ उभा ठाकलेला असतो तेव्हा उंची, कर्तृत्व असलेल्या एका व्यक्तीचे दीर्घकाळ समर्थ नेतृत्व लाभणे निर्णायक महत्त्वाचे ठरू शकते. गांधींचे नेतृत्व 1920 ते 1942 इतका दीर्घ काळ टिकलेले होते. 

पं.नेहरुंचे पंतप्रधान म्हणून पंधरा वर्षे, सेवा दलाच्या वर्तुळात अशी कोणी व्यक्ती आजच्या घडीला दिसत नाही. दुय्यम तिय्यम क्षमतेच्या कार्यकर्त्यांनी आपल्या मर्यादित क्षमतांचे भान राखून, परस्परांचा विश्वास कमावून एकदिलाने काम करीत. अशा नेतृत्वाच्या उदयाची पूर्वतयारी करण्याचा हा काळ आहे. अशा नेतृत्वाच्या उत्कर्षाला प्रोत्साहक व स्वागतशील वातावरण निर्माण करणे व टिकविणे हे मग आत्ताच्या धुरिणांचे काम ठरते. साने गुरुजी, एस.एम.जोशी व डॉ. राम मनोहर लोहिया यांचा वारसा पुढे नेण्याची प्रतिज्ञा करून त्यांना हे काम करता येईल. मुद्दामच मी गांधी, फुले, आंबेडकर वा मार्क्स यांची नावे घेत नाही. वरील तिघांचा वारसा कोणता याचा, अर्थातच काही पुनर्शोध घ्यावा लागेल. त्यांचे जीवनचरित्र, कार्य व विचार याचा अर्थपूर्ण व भविष्यवेध घेणारा क्रांतिदर्शी समवाय साधावा लागेल. 

नवसामाजाचे ‘दर्शन' समाजाला घडविले पाहिजे 
सेवादलाचे पुनरुत्थान घडावयाचे तर सेवा दलापाशी नवसमाजाचे एक ‘दर्शन’ असायला हवे. जे आजच्या आधुनिक, इहवादी, विकासवादी चित्रापेक्षा मौलिकदृष्ट्या वेगळे असेल. त्याग, समर्पण याची तयारी ठेवणारी निष्ठा वाढावी असे ध्येय या दर्शनामधून प्राप्त होईल. ‘अखंड भारत', ‘हिंदु राष्ट्र', ‘इस्लामी प्रजासत्ताक' ही अशी दर्शने आहेत. ती आज घातक आशयाची आहेत, हे माझेही म्हणणे आहे. पण त्यांना मंगल, विधायक आशय देता येणारच नाही असे मात्र नाही. ‘सर्वोदय-अंत्योदय', ‘साम्ययोगी समाज' हेदेखील एक दर्शन आहे, असे ‘दर्शन' जिथे असते तिथे जीवनाच्या सर्व अंगांच्या भावी मांडणीचे, विकासाचे एक गुणात्मकदृष्ट्या वेगळे चित्र आपल्या डोळ्यांसमोर असते. ‘कम्युनिस्ट मॅनिफेस्टो', ‘हिंद स्वराज्य' या छोटेखानी अंगांचेही सामर्थ्य अशा वैकल्पिक जीवनव्यवस्थेचे दर्शन घडविण्यात साठवलेले आहे. 

असे नवे जीवनदर्शन आपणापाशी नाही, हे मोठे न्यून आपल्या विचारांत, जगण्यात व कार्यपद्धतीत आहे. याचे भानही नसावे असा दाट संशय येतो. 

साने गुरुजींच्या साऱ्या लेखनाला, जगण्याला, व्यक्तित्वाला नवसमाजाविषयीच्या दर्शनाचा स्पर्श होता, या अर्थाने डॉ. लोहिया एक ‘व्हिजनरी' (क्रांतदर्शी कवी) होते. दीर्घकाळपर्यंत महाराष्ट्रातील अनेकानेक समाजवादी कार्यकर्त्यांच्या व पुढाऱ्यांच्या व्यक्तिगत जीवनशैलीत व व्यक्तित्त्वात आदर्शांचे प्रतिबिंब आढळत असे. संख्येने थोडे, सत्तेपासून वंचित, प्रभाव मर्यादित अशी स्थिती असूनही नैतिक-आध्यात्मिक शक्ती म्हणून त्यांचा समाजामध्ये प्रभाव होता. 

हे क्रांतदर्शित्व पुनरपि प्रकट व्हायला हवे आहे.
 

Tags: भाऊसाहेब रानडे राम नगरकर निळू फुले स्मिता पाटील हैदराबाद नरेंद्र दाभोलकर Bhausaheb Ranade Ram Nagarkar Nilu Phule Smita Patil Hyderabad Narendra Dabholkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके