डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

साधनेची कहाणी आणी पापणीत पाणी

साधनेच्या आदिपर्वात हुकमी लेखक म्हणावे असे एक संपादक साने गुरुजी तेवढे होते. वसंत बापट, सदानंद वर्दे, डॉ. रामकृष्ण बाक्रे,  मा.ग.बुद्धिसागर ही मंडळी स्फुटे लिहून गुरुजींना साहाय्य करीत. दुर्गा भागवत, सदानंद रेगे, मंगेश पाडगावकर अशी मान्यवर मंडळीही लेखन-सहकार्य करीत.

साने गुरुजी म्हणजे अहिंसेचे चिलखत चढवलेला योद्धा. ‘अहिंसा सत्य अस्तेय । ब्रह्मचर्य असंग्रह शरीरश्रम । अस्वाद सर्वत्र मयदर्जन । सर्वधर्मी समानत्व । स्वदेशी स्पर्शभावना ।’ या एकादश व्रतांचा मनोभावे स्वीकार केलेला स्वातंत्र्याचा शिपाई, दोन्ही हातांत पट्टे घेऊन 'मारिता मारिता मरावे' या निश्चयाने अन्यायांशी सतत उढत राहिलेला हा शूर सैनिक. भाषण आणि लेखन या दोन शस्त्रांनी प्राणपणाने गुरुजींनी झुंज घेतली. आपल्या जीवनाचा मार्ग गुरुजींनी पहिल्यापासूनच निश्चित केलेला होता. अमळनेरच्या शाळेत मुलांना शिकवता शिकवता आपल्या विद्यार्थिमित्रांशी ते सतत बोलत राहिले आणि त्यांच्या प्रबोधनासाठी लिहीतही राहिले. मुलांची हस्तलिखित पत्रिका रोज न कंटाळता लिहून काढणारा असा शिक्षक विरळा. पण पुढेही 'विद्यार्थी' या नियतकालिकाच्या माध्यमातून गुरुजी शिकवत राहिले. आधी विद्यार्थ्यांना आणि मग समाजालाही! 

पुढील आयुष्यातही भाषण आणि लेखन या दोन माध्यमांचा त्यांनी सारख्या उत्साहाने अवलंब केला. ‘काँग्रेस’ हे नाव पत्राला देऊन त्यांनी भारतीय राष्ट्रसभेची भूमिका मराठी मुलखाला समजावून सागितली.  त्यानंतर जेव्हा जेव्हा त्यांना तुरुंगवास घडला तेव्हा तेव्हा त्यांनी पुस्तके लिहिण्याचा आणि विनोदांची प्रवचने प्रसृत करण्याचा धडाका चालवला. 9 ऑगस्ट म्हणजे 42च्या बंडाच्या आरंभीच, त्यांची सरकारच्या अनवधानाने तुरुंगातून सुटका झाली. काळाची पावले ओळखून ते लगेचच भूमिगत झाले. आता ते बोलणार कोठे आणि कोणाशी? पण ते बोलत राहिले. चक्रमुद्रित गुप्त पत्रकांतून, बुलेटिन्समधून याही कालखंडात त्यांची कामगिरी धडाडीची 'क्रांतिकारी' हे भूमिगत पत्र चालविले. या कामात त्यांना पुरेपूर सहकार्य लाभले मधु लिमये आणि वसंत बापट यांचे. पुढे भूमिगत आंदोलनाची भूमिका सविस्तर विशद करणारी पुस्तिका प्रसृत करण्याची कल्पना निघाली. एक दिवस काही न खाता न पिता, कोणाशी एक शब्दही न बोलता गुरुजींनी स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले. सारा दिवसभर त्यांचे लेखन सुरू होते. दिवस मावळल्यानंतर त्यांनी रात्रीचा दिवस केला आणि केवळ चोवीस तासांत ‘क्रांतीच्या मार्गावर’ हे पुस्तक एकटाकी पूर्ण केले. 

गुरुजी कसे लिहीत असत त्यांचे दर्शन घेऊन आम्ही धन्य झालो. पण त्यांच्या लिहिण्याचे सुंदर वर्णन केले आहे ते नानासाहेब गोऱ्यांनी. लेखनाचा झपाटा विलक्षण असूनही त्यांचे लिहिणे अतिशय सुंदर असे. नानासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे शिवणटिपणाच्या कामात तरबेज असणारी गृहिणी जशी न थांबता बिनचूक टीप घालीत जाते, तसे गुरुजी लिहीत. तरीही त्यांच्या लेखनात विचारपूर्वकता असायची, शिस्त असायची. घिसाडघाईचे नावही नसायचे, एखाद्या शब्दाची भर वाक्यात नंतर टाकली तर काकपद वापरून सुवाच्य अक्षरांत तो शब्द रेखीवपणे लिहून ठेवीत. इतके विचारपूत पण भावश्रींमंत लेखन करण्यात गुरुजीइतका कुशल लेखक आम्ही पाहिलेला नाही. 

30 जानेवारी 1948 हा भारताच्या आधुनिक इतिहासातला काळा दिवस. त्या दिवशी नथुराम गोडसेच्या अविवेकाने उचल खाल्ली आणि त्यांनी दिल्लीत मोठ्या समुदायाच्या साक्षीने गांधीजींची गोळ्या झाडून हत्या केली. अवघ्या महाराष्ट्राला हादरा बसला. घरदार, जेवणखाण असल्या गोष्टी क्षुल्लक मानून आबालवृद्ध, स्त्रीपुरुष सैरावैरा धावू लागले. असे घृणास्पद कृत्य आपल्या प्रिय महाराष्ट्राच्या कुपुत्राने करावे याचा गुरुजींना जाणवलेला आघात जबरदस्त होता. त्यांनी ताबडतोब उपोषण सुरू केले. त्यानंतर मात्र जडमूढ झालेल्या समाजाला जागृती आणण्याची आवश्यकता मनात जागी होताच त्यांनी ‘कर्तव्य' या पत्रातून अन्य कुणाच्या लेखनसाहाय्याची अपेक्षा न करता, समाजाचे डोके ठिकाणावर आणण्याचा कसून प्रयत्न सुरू केला.

गांधीजींच्या मृत्यूनंतर साऱ्या समाजाला उद्देशून त्यांनी समता, शांतता आणि सर्वधर्म समभाव या त्रिसूत्रीच्या प्रचारासाठी ठाण मांडण्याचा निश्चय केला. ‘आम्हि मांडू निर्भय ठाण, देउ हो प्राण,’ असा दृढ निर्धार त्यांनी प्रकट केला, जे जे काम करायचे ते ते सर्वस्व पणाला लावून करायचे, हा साने गुरुजींचा स्वभाव होता. त्यामुळे ‘आता उठवू सारे राम, आता पेटवु सारे रान’ या अभिनिवेशाने त्यांनी समाजप्रबोधनासाठी आपल्या आयुष्याचा क्षणन्क्षण देण्याचे ठरवले. गांधीजींच्या देहावसानानंतर अवघ्या सात-आठ महिन्यांत ‘साधना’ साप्ताहिकाची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. मूठ-मूठ, पसा-पसा धान्य गोळा करून गावातल्या सर्व भुकेल्यांना जेवू घालण्याचे व्रत घ्यावे तशी त्यांनी साप्ताहिकासाठी मित्रांना शक्य तेवढे पैसे पाठवण्याची विनंती केली. पण पैशासाठीही ते अडून राहिले नव्हते. खरे तर त्यांची पोटतिडीक जाणून त्यांच्या मदतीला प्रथम धावले ते  एस. एम. जोशी आणि अण्णासाहेब सहस्रबुद्धे, पण दोघेही होते दरिद्रनारायणाचे अवतार! आता हजार-दोन हजारांनी काम होण्यासारखे नव्हते. टाइप खरेदी करणे आणि साप्ताहिकाची चार पाने एकदम छापली जातील एवढे छपाईचे मशीनही विकत घेणे जरुरीचे होते. 

अमळनेरच्या शाळेत गुरुजींचा विद्यार्थी असलेला भाल मांजरेकर छोटासा मुद्रणव्यवसाय करीत होता. त्रिभुवन रोडवर त्याचा 'फेमस प्रिंटर्स' हा प्रेस होता. त्याच्या मदतीने गुरुजीनी टाइप खरेदी केला आणि त्याच्या साहाय्याने 23बाय36 या आकाराचे छपाई करणारे 'मिले' मशीनही मिळवले. त्याची किंमत होती 26 हजार रुपये. पैसे हप्त्याने द्यायचे होते. आरंभी 12 ते 15 हजार रुपये द्यायचे आणि नंतर दरमहा हप्ता यायचा, अशा अटी गुरुजींनी कबूल केल्या. मात्र करार गुरुजी आणि भाल मांजरेकर दोघांच्या नावाने झाला होता. हा करार रद्द करून तो गुरुजींच्या एकट्याच्या नावे केला पाहिजे, हे अण्णासाहेबांच्या लक्षात आले. साने गुरुजींच्या सत्कारनिधीत 1 लाख रुपये जसले असता ती सर्व रक्कम अण्णासाहेबांकडे - निधीचे एकमेव विश्वस्त- म्हणून देण्यात आली होती. त्यातून मशीनची किंमत देता येईल, हे अण्णासाहेबांनी मान्य केले. पण साने गुरुजींची मान्यता मोठ्या मिनतवारीनेच मिळवावी लागली. शेवटी प्रथम 10 हजार रुपये वरेरकरांच्या हस्ते देऊन टाकले आणि नंतरचे पैसे त्यांनी तीन-चार महिन्यांत भरणा केले. 

श्रीरंग वरेरकर सेवा दलाचा कार्यकर्ता होता खरा, पण त्याची नोकरी होती मालवणला- ड्रॉइंग मास्तरची. एसेमला म्हणाले, ‘‘अरे तुला सौंदर्यदृष्टी तर आहे ना? मग या प्रेसचा मॅनेजर हो ना?’’ मुद्रणविद्येतले ओ का ठो' ज्ञान नसताना केवळ हिंमत धरून श्रीरंग या गोष्टीला तयार झाला. मुंबईला आर्थर रोडवर एका खपरेल बराकवजा चाळीत साधना प्रेसचा प्रपंच श्रीरंगने उभा केला. साधना साप्ताहिक छापण्यासाठी आणि त्याचे वितरण करण्यासाठी माणसे तरी कोठून मिळणार? एक तर साने गुरुजीचे सहायक होणे ही अवघड गोष्ट आणि शिवाय सगळा खेळ दरिद्रनारायण प्रासादिक नाटकमंडळीचा. पण हळूहळू राष्ट्रवादी सेवा दलातील युवकांनी सुतराम आर्थिक लाभाची अपेक्षा न ठेवता सर्वतोपरी साहाय्य सहकार्य करायला सुरुवात केली. त्यांत श्रीरंगचा भाऊ प्रभाकर, वामन भिडे अशी नोकऱ्या करून ‘लष्करच्या भाकऱ्या’ भाजणारी तरुण मंडळी होती. सेवा दलाचे अनेक निष्ठावंत सैनिकही या कामासाठी आवडीने आर्थर रोडवर येऊ लागले. त्यात अनु वर्दे, दादा नाईक, नारायण फेणाणी, नारायण शेट्ये यांची नावे तर आहेतच; पण आज विशेष उल्लेख केला पाहिजे माधव आंबे याचा. माधव त्या वेळी इंटर कॉमर्सची परीक्षा पहिल्या वर्गात उत्तीर्ण होऊन बी.कॉम.

शेवटच्या वर्षात शिकत होता. त्याचे धाकटे दोन भाऊही शिकत होते. त्याचे वडील काही वर्षांपूर्वी वारले होते आणि घरी आई एकटीच संसाराचा गाडा रेटत होती. यथावकाश त्याने बी.कॉम. ची परीक्षा दिली. खरे तर त्याला नोकरी करणे भागच होते. पण गुरुजी आणि एसेमबद्दलच्या आदरामुळे आणि श्रीरंगच्या स्नेहामुळे तो साधनेत कामासाठी येऊ लागला. त्याच्या गुणवत्तेप्रमाणे पगार त्याला साधना प्रेसमध्ये कुठला मिळणार? पण केवळ 150 रुपये वेतनावर माधव आंबे श्रीरंगच्या बरोबर साधनेत काम करू लागला. त्याचे इंग्रजी चांगले होते आणि त्याला गुजराती भाषाही अवगत होती. आता बाहेरची कामे घेणे शक्य होऊ लागले. हिंमत जव्हेरीमुळे गुजराती कामे मिळू लागली. त्यांतले एक काम होते नचिकेता या गुजराती त्रैमासिकाच्या छपाईचे. आंबे खरे म्हणजे होते - लेखापाल. हिशेबठिशेब ठेवणारे. पण गुजराती आणि इंग्रजी मुद्रितेही ते तपासून देत.. बाहेरची कामे करू लागल्यावर गरज म्हणून एक टेडल मशीन घेणे भाग होते.. परेरकर आणि आंबे यांना मदत करायला येऊन वसंत वडके सर्व प्रकारचे कष्ट उपसू लागले आणि बाकी श्रीमती नसली तरी टीम तर मोठी नामी तयार झाली. पुढे पु.ग.खेर आणि डॉ. मंडलिक यांचेही उत्तम पाठबळ मिळू लागले. 

साधनेची जागा ती केवढी... आर्थर रोड हॉस्पिटलसमोर भाड्याने घेतलेल्या बराकीतल्या दोन खोल्या मिले मशीन, कटिंग मशीन, ट्रेडल आणि टाइपांचे घोडे यांची व्यवस्था केल्यावर एक दोन माणसे जेमतेम बसतील एवढी जागा शिल्लक राहत असे. सगळी अडचण लक्षात घेऊन गो.म.नवाथे हे गुरुजीप्रेमी मित्र मदतीला आले. त्यांनी 200 चौरस फुटांचा लाकडी पोटमाळा बांधून दिला. त्याचा मुख्य उपयोग होता कागदाचा साठा ठेवण्याचा, पण तिथेच एका कोपऱ्यात एक डेस्क ठेवलेले होते. ही होती पहिली संपादकीय कचेरी. तिथे बसून गुरुजी साधनेचा मजकूर लिहीत किंवा प्रुफे तपाशीत.नवाथे यांची काही अपेक्षा नव्हती, पण त्यांनी 'जातीयता नष्ट करा’ ही घोषणा सर्वत्र लावण्याचा छंद घेतला होता. साधना प्रेसने लहानशा पट्ट्यांवर ती घोषणा छापून दिल्यावर ते त्या पट्ट्या ठिकठिकाणी चिकटवीत किंवा सर्वत्र वाटण्याची चिकटवीत किंवा सर्वत्र वाटण्याची व्यवस्था करीत. व्होल्टास कंपनीतले इंजिनिअर आणि अच्युतराव पटवर्धन, अण्णासाहेब सहस्रबुद्धे प्रभृती, भूमिगतांचे आश्रयदाते राईलकर यानी साधना प्रेसच्या सबंध जागेत विजेची कनेक्शने करून दिली. बाँबे फाइन आर्टचे मालक डॉ. घोटे यांनी दोन वर्षे दिवाळी अंकाचे बाइंडिंग करून दिले. एकदोनदा कागदांची जरूरही पुरी केली आणि या सर्वांचा मोबदला काय?.... शून्य. 

आणखी एक वल्ली म्हणजे साधनेचे सतत लळे पुरवणारे डॉ. वसंत अवसरे. वरेरकर, माघब आंबे, वसंत वडके या सगळ्यांशी त्यांची दोस्ती होती. ते जोगेश्वरीजवळ एक जमीनही साधनेसाठी देणार होते. पण ती तजवीज चालू असता गुरुजींचे निधन झाले आणि ते मनोरथ अपुरेच राहिले.  गुरुजींच्या हयातीत त्यांचा एक भलाभक्कम आधार साधनेत खपू लागला. आता मुख्य म्हणजे तो गुरुजींचा संपादकीय सहायक झाला आणि पुढे 25 वर्षे त्याचे नाव साधनेशी एकरूप झाले. समाजाचे अज्ञात आधार उजेडात आणणारा, उपेक्षितांचे अंतरंग ओळखणारा हा साने गुरुजींचा सच्चा धडपडणारा मुलगा म्हणजे यदुनाथ थत्ते. सर्व निरलस सहकाऱ्यांमध्ये सर्वांत महत्त्व वाटते ते साधनेच्या सर्व कामांत सहभागी होणाऱ्या पंधरा-वीस सेवा दल सैनिकांचे.  साधनेच्या अंकाच्या घड्या घालायला हे सैनिकच येत. तेच वेष्टने चिकडवीत, पार्सले बांधीत. ही कामे त्यांनी सतत सात वर्षे केली. इतकी सर्व सेवा करून हे सगळे जण अनामिक राहिले आहेत हे विशेष.

स्वतः गुरुजी काम करीत ते अतिशय शिस्तीत. ते सकाळी नऊ-साडेनऊला आले की संघ्याकाळी पाच-साडेपाचपर्यंत प्रेसवर थांबत. बाहेरगावी जाण्यापूर्वी पुढील अंकाची सर्व तयारी करून जात. कागदाच्या लहान लहान तुकड्यांवर सुवाच्य अक्षरांत ते मजकूर लिहीत. सुंदर अक्षरांतल्या व्यवस्थित कॉप्या कंपोझिटर्स आवडीने कंपोझ करीत. पन्नास पन्नास कॉप्यांत कुठेही खाडाखोड नसायची. गुरुजींचा एक नेम असा होता की प्रत्येक पहिल्या पानावर ते थोर पुरुषावर लेख लिहीत असत. पुढच्या अंकात कोणावर लिहिणार ते आधीच्या अंकात जाहीर करीत. त्यांचा सुंदर लेख रेखाचित्रकार ओक यांच्या चित्रामुळे अधिकच आकर्षक होई. वरेरकरांकडून सूचना मिळाली की त्या व्यक्तीचे फोटो मिळवून त्यावरून ओक दोन-तीन दिवसांत रेखाचित्र करून देत. ठरलेल्या वेळी चित्र आणून देणे ही ओक यांची खासियत म्हटली पाहिजे. एकदा जर्मन महाकवी गटेच्या दोनशेव्या स्मृतिदिनानिमित्त साने गुरुजींना लेख लिहायचा होता. संदर्भासाठी त्यांना एमिल लुहबिगचे पुस्तक पाहिजे होते.

पुस्तक होते युसूफ मेहेरअलींकडे. लोक पुस्तके परत करीत नाहीत म्हणून मेहेरअलींनी लोकांना पुस्तके देणे बंद केले होते. पण साने गुरुजींना पुस्तक हवे आहे म्हटल्यावर त्यांनी दिले. ‘काम झाल्यावर पुस्तक परत कर,’ असे त्यांनी श्रीरंगला बजावले. श्रीरंगने सकाळी साडेअकरा वाजता गुरुजींना पुस्तक नेऊन दिले. ते 250 पानांचे पुस्तक गुरुजींनी कसे वाचले असेल याची कल्पना करावी. पण 16-17 तासांत त्यांचे पुस्तक वाचून झाले. लेखही लिहून झाला. रविवार सकाळपासून काम करून सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता गटेवरच्या लेखाच्या 50 कॉप्या गुरुजींनी कंपोझिटर्सच्या ताब्यात दिल्या. तिथेच माळ्यावर बसून लेखाची प्रुफेही तपासून दिली. मेहेरअलींचे पुस्तक मंगळवारी सकाळी त्यांना परत नेऊन दिले. या सगळ्या झपाट्याचा अचंबा वरेरकरांना तर वाटलाच, पण मेहेरअलींनाही वाटला.

साधनेच्या आदिपर्वात हुकमी लेखक म्हणावे असे एक संपादक साने गुरुजी तेवढे होते. वसंत बापट, सदानंद वर्दे, डॉ. रामकृष्ण बाक्रे,  मा.ग.बुद्धिसागर ही मंडळी स्फुटे लिहून गुरुजींना साहाय्य करीत. दुर्गा भागवत, सदानंद रेगे, मंगेश पाडगावकर अशी मान्यवर मंडळीही लेखन-सहकार्य करीत. पुढे लेकांच्या या यादीत विनोबा, आचार्य जावडेकर, ना. ग. गोरे, प्रभाकर पाध्ये वगैरे थोरांची नावेही येऊ लागली. आवश्यकता वाटल्यास शुद्धलेखनाचे संस्कार करून गुरुजी लेख कंपोझला देत. पण कधी पुन्हा लिहूनही काढीत, आटोपशीर करून देत. साधनेचा अंक वेळेवर तयार झाला नाही असे कधीही घडले नाही. 

साधनेच्या शैशवात तिथे सर्वतोपरी संगोपन करणारी मंडळी आता स्मृतिशेष झाली आहेत. इंडिया प्रिंटिंग वर्क्सचे लिमये आणि बांबर्डेकर, मौजचे विष्णुपंत भागवत यांचा सक्रिय पाठिचा साधनेला मिळत असे. न्यू मनोहर प्रेसचे शिरोडकर, निर्णयसागर फौंड्री, गायकर फौंड्री, स्वस्तिक पेपर मार्ट, जीवनलाल शहा आणि एक्स्प्रेस ब्लॉक मेकर्सचे पंडित या सर्वांनी आप्तभावनेने नेहमीच मदत केली. चित्रकार ओके, एस. वाय. कुलकर्णी, प्रभाकर मोरे, दीनानाथ गोडसे या सर्वांनी विनामोबदला केलेली चित्रसज्जा स्मरणात रहावी अशी होती. साधना प्रेसच्या सुबक छपाईला नावाजून आपल्या पुस्तकांची छपाई 'साधना'कडे सोपवणारे पॉप्युलर प्रकाशन या सर्वांचे ऋण आजही स्मरणात आहे. अनंत हस्ते साहाय्य करणारे 'साधना’वर प्रेम करणारे हे सर्व- यांच्याविषयीची कृतज्ञता कोणत्या शब्दांत करणार? अर्थात त्यांच्याबरोबर अनेक वर्षे साधनेचे काम करणारे कामगारदेखील साधना परिवाराचे सन्मान्य घटक आहेत. 

साधनेचा जन्म कसा झाला, तिचे संगोपन कोणी कोणी केले, याची चित्तरकथा येथे नमूद करताना 'ओठी हासू, डोळां पाणी' अशी स्थिती होते खरी, भूक नाही, तहान नाही, 'श्रमण्यातच विश्रांती, झिजणे उन्हास जयां' अशा सैनिकांच्या आठवणीने पापण्यांच्या कडा ओलावतात. या सर्वांमागे प्रेरक शक्ती होती एक व्यक्ती- साने गुरुजी. त्यांच्या जीवनयज्ञात ते स्वतःच समिधा झाले होते. त्यामुळे तर साने गुरुजींच्या शताब्दीच्या संवत्सरात साधनेच्या अर्धशतकाच्या आठवणी मिसळल्यामुळे 'सोनियाचा दिवस आजि अमृते पाहिला' अशी अवस्था होऊन गेली आहे खरी. आपल्या प्राणांची ज्योत गुरुजींनी आपल्याच हातांनी मालवली. पिंजऱ्यात कोंडलेल्या पक्ष्याचे हाल पाहवत नाहीत म्हणून त्यांनी आपल्या हाताने पिंजऱ्याचे दार उघडून प्राण-पाखरू अनंतात भिरकावून दिले. 

ही कहाणी येथे पुरी मात्र झालेली नाही. यात्रा दीर्घ आहे. वाट बिकट चढणीची आहे. गोत्रपुरुषाची शताब्दी आणि त्याच्या कृतिसत्राची अर्धशताब्दी यांचा मेळ घडवणाऱ्या सुदिन सुवेळी धडपडणारी मुळे क्षणमात्र विसावलेली आहेत. ती यापुढेही जिवात जीव असेतो हरणार नाहीत, हटणार नाहीत. पुढे आणि पुढेच जात राहतील, एवढेच आश्वासन आत पुरे! 
(या कहाणीचे शब्दांकन जरी वसंत बापट यांनी केलेले असले तरी त्याचा आधार आहे श्रीरंग वरेरकरांचा स्मृतिकोश.) 
 

Tags: अज्ञात राष्ट्र सेवा दल सैनिक अण्णासाहेब सहस्रबुद्धे एसेम श्रीरंग वरेरकर योगदान - यदुनाथ थत्ते वाटचाल ‘साधना’ सुरुवात आठवणी unknown solgiers - 'rashtra seva dal' साने गुरुजी जन्मशताब्दी annasaheb saharabuddhe s. m. joshi shrirang varerkar contributon - yadunath thatte journey 'sadhana' beginning memories sane guruji birth centenary weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके