डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

हे तो प्रतीतीचे बोलणे, तव स्मरण संतत स्फुरण

आपण याचि देही याचि डोळा पहात आहोत की साने गुरुजींची स्मृती म्हणजे केवळ गहिवर आणणारा विषय नाही. त्यांचे स्मरण म्हणजे एक ऊर्जाकेंद्र आहे. ते कधी बंद पडलेले नाही आणि आता त्यांच्या मृत्यूला तीन तपे होऊन गेली तरी त्याची शक्ती जराही उणावलेली नाही. 

घुमक्कड माणूस महाराष्ट्रात फिरला, गावोगाव गेला आणि प्रत्येक गावातल्या विधायक कामांची ओझरती जरी ओळख त्याला झाली, तरी त्याला साने गुरुजींच्या थोरवीचा काही वेगळाच प्रत्यय येईल. कोठे गुरुजींचे स्मारक म्हणून विद्यालय स्थापन झालेले असेल, कोठे इस्पितळ, कोठे वाचनालय, कोठे सांस्कृतिक केंद्र, कोठे क्रिडांगण आणि यांतले काहीच नसले तर 'साने गुरुजी कथामाला' तरी.

गुरुजींच्या अलौकिक लोकसंग्रहाचा आणि अफाट लोक प्रियतेचा प्रत्यय घेतलेल्या कोणालाही त्यांची थोरवी इतकी स्वयंसिद्ध वाटे की तो पटवून घेण्यासाठी कारणे शोधायची गरजच वाटू नये! विसाव्या शतकात, महाराष्ट्राच्या सकस भूमीत पुष्कळच थोर माणसे होऊन गेली, पण हयातीतच जे पुराकथानचे लोकोत्तर नायक ठरले, अशा थोरांत साने गुरुजींची गणना आहे. महाराष्ट्र हे विधायक कार्यकत्यांचे मोहोळ आहे असे गांधीजी म्हणत, पण ज्यांच्या पावलापासून नवे पंथ फुटले आणि ज्यांची कार्यक्षेत्र ही पिढ्यान् पिढ्यांची उदंड शेती ठरली, अशी माणसे महाराष्ट्रात किती झाली याची उर्वरित भारताला आज जाणीव तरी आहे काय? लो. टिळक, म. फुले, डॉ. आंबेडकर, अण्णासाहेब कर्वे, भाऊराव पाटील, सेनापती आणि सावरकर, या सर्वाची महत्ता कोणीच नाकारू शकणार नाही. हे पुरुष महाराष्ट्राचे आणि पर्यायाने भारताचे शिल्पकारच आहेत. थोर पुरुषांच्या पंक्तीत आपण भेदाभेद करू नये, त्यांतील अधिक उंच शिखरे कोणती, याची चिकित्सा चिवडत बसू नये, हे मला मान्य आहे आणि तरीही राहून राहून वाटते की टिळक, फुले, आंबेडकर आणि साने गुरुजी यांची विशेषता अशी आहे को त्यांची कृती तर प्रेरणादायी होतीच, पण त्यांची स्मृतीही स्फुरणदायी आहे. महाराष्ट्रात यांची संस्थारूप स्मारके किती उभी आहेत याचा कानोसा घेतला तर हे कोणालाही पटेल.

आपण याचि देही याचि डोळा पहात आहोत की साने गुरुजींची स्मृती म्हणजे केवळ गहिवर आणणारा विषय नाही. त्यांचे स्मरण म्हणजे एक ऊर्जाकेंद्र आहे. ते कधी बंद पडलेले नाही आणि आता त्यांच्या मृत्यूला तीन तपे होऊन गेली तरी त्याची शक्ती जराही उणावलेली नाही. 

मला गंमत वाटते ती ही की स्वातंत्र्यपूर्व काळातल्या काँग्रेसचे साने गुरुजी हे केवळ एक पाईक होते. त्यांनीच म्हटल्याप्रमाणे, भारतमातेच्या सुखासाठी सर्वस्व देऊन टाकणारे 'स्वातंत्र्याचे आम्ही शिपाई' अशी भूमिका त्यांनी मनापासून पत्करलेली होती. त्यांनी आपली निष्ठा काँग्रेसला वाहिली होती ती उलट कसलीही अपेक्षा न ठेवता. त्यांनी कोणतेही पद कधी मागितले नाही, घेतले नाही आणि त्यांनी ते घ्यावे असा आग्रहही कोणी धरला नाही. राष्ट्रीय सभेचे खेड्यातील पहिले अधिवेशन खान देशात फैजपूरला झाले. अशा अधिवेशनाचे स्वागताध्यक्षपद घ्यायला गुरुजीशिवाय दुसऱ्या कोणाचे नाव योग्य होते? पण मला असले स्थान द्याल तर मी पळून जाईन, असे निर्धाराने बोलून गुरुजींनी स्वयंसेवक होणेच पसंत केले. तरीही सर्व जाणकारांना हे माहीत आहे को गुरूजी नसते तर फैजपूर अधिवेशनाचा बोजवारा उडाला असता. त्यांच्याविना हजारो शेतकरी तेथे काँग्रेसच्या झेंड्याखाली जमा तरी झाले असते काय? आणि गाड्या भरभरून भाकऱ्या तरी दुसऱ्या कोणी पुरविल्या असत्या? पण काँग्रेसचा संदेश सांगत आणि स्वातंत्र्याचा बीजमंत्र पेरीत या पांडुरंगाने पायपिटी केली, म्हणून हे सारे घडले ना? अखेरपर्यंत हे व्रत गुरुजींनी सोडले नाही.

साहजिकच महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेस कमिटीचे ते कधीही अध्यक्ष, उपध्यक्ष, कार्यवाह, वगैरे झाले नाहीत. त्यांनी निवणुकीत कोणाला तिकिट देऊन (किंवा नाकारून) आपली ताकद दाखविली नाही. मग 'अखिल भारतीय नेतृत्वा’ चा हव्यास तर दूरच राहिला, किबहुना 'अ. भा.’ नेत्यांच्या निकटदेखील उभे राहण्याचा प्रयत्न त्यांनी कधी केला नाही. पूज्यता डोळां न देखावी, स्वकीर्ती कानी नायकावी, हा अमुका ऐसी न व्हावी, सयचि लोका' हे ग्यानबाचे ब्रीद गुरुजीनी छानपैकी सांभाळले होते. आज असे वाटते की आमच्या तरुण वयात ज्यांच्या गळ्यात हारांवर हार पडत होते, ते, सगळे महंत-मठपती 'नामशेष' तरी ठरले आहेत का? ते सारे भूतपूर्व लीडर लोक, ते सारे आमदार-नामदार खासदार-कोठे गेले आता? त्यांची नावे त्या वेळच्या तबारिखांत जरूर लिहिलेली असतील. ती सारी कागदाची भेंडोळी कुठल्या बळदांत दप्तरगुप्त होऊन पडली आहेत, हे त्यांच्या वरची खंडीभर धुळ झटकल्याशिवाय दिसणेही अवघड आहे, उलट पांडुरंग सदाशिव साने नावाचा किडूकमिडुकांत जमा असलेला हा काँग्रेसचा सच्चा शिपाई त्याचे ठाण मात्र जिथे काळ उठवू शकत नाही, तेथे जिवाजी कलमदान्यांचे जथे काय करू शकणार?

या ठेंगण्याठुसक्या काळ्यासावळ्या पांडुरंगाची कोणी मंदिरे बांधू नका, त्याचे पुतळे उभारून कावळचाचिमण्यांचीसोय करू नका आणि भविष्यकाळातल्या म्यूझियममधील भितीवर लावण्यासाठी त्यांची तैलचित्रे रंगवण्याचे श्रमही घेऊ नका. बालकांच्या शिक्षणासाठी जीव टाकणारी शिक्षकमंडळी, दीनदुबळ्यांसाठी आरोग्यसेवा उपलब्ध करून देणारे समाजाचे सच्चे सेवक आणि साहित्य-संस्कृतीचे म्हणजेच माणसातल्या सत्य-शिव-सुंदराचे पूजन करणारे सहृदय, यांनी ठायी ठायी उभ्या केलेल्या संस्था आणि संघटना हीच गुरुजींची खरी स्मारके आहेत. त्याशिवाय त्यांना आपला प्राण वाटणारे सेवा दल आहे, आंतर भारती आहे....आणि त्याचे एक छोटेसे मंदिर, मी लिहितो आहे त्या पोपडे उडालेल्या भितींच्या छोटेखानी साधना कार्यालयातही आहे!
 

Tags: health care for the poor. teachers Vasant Bapat दीनदुबळ्यांसाठी आरोग्यसेवा Speaking of conviction शिक्षकमंडळी वसंत बापट प्रतीतीचे बोलणे weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके