डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

या मोर्चाचे नेमके काय आणि कसे घडले, हे सांगणे येथे प्रस्तुत नाही. जवळजवळ यशस्वी होत आलेला तो मोर्चा शेवटी अपयशी ठरला. परंतु या प्रयत्नात वसंत दाते प्रभृती चौघांना वीरमरण आले. वसंत नगरकरची बहादुरी तिहेरी म्हटली पाहिजे. प्रथम मोर्चा संघटित करण्यासाठी त्याने शर्थ केली, मोर्चात आघाडीवर राहून तो शेवटपर्यंत मार्गदर्शन करीत राहिला आणि अंती माघार घेतानाही त्याने वीरासारखी माघार घेतली. आपल्या सहकाऱ्याचे वसंत दातेचे शरीर खांद्यावर टाकून तो चालू लागला, तेव्हा पाठीमागून त्याच्यावर झालेल्या गोळीबारात त्याचे प्राण वाचले. याचे कारण असे की दातेच्या मृतदेहाने बंदुकीच्या गोळ्या झेलल्या... कष्टाने त्याचा देह भूमीवर ठेवून वसंत नगरकर वरंधा घाटातून भोरमार्गे पुण्याकडे निघाला. त्याचा अवतार, त्याच्या कपड्यांवरचे रक्ताचे डाग, त्याची विषण्ण मुद्रा या सगळ्यांमुळे त्याला कोणी थारा देणे किंवा त्याला वाहनातून न्यायला तयार होणे अवघडच होते. पूर्णपणे उद्‌ध्वस्त झालेला नगरकर युक्ती प्रयुक्तीने कसाबसा पुण्यात पोहोचला. 
 

राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्राचा व्यासंगी विद्यार्थी असणारा माझा मित्र वसंत नगरकर महाराष्ट्र राज्याचा इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलिस होतो हा आधुनिक काळातला एक चमत्कारच! पुन्हा तो नुसता पत्रकपंडित नव्हता, एक क्रियाशील कार्यकर्ता आणि सहृदय समाजसेवकही होता हे अधिकच आश्चर्यकारक म्हटले पाहिजे. 9 ऑक्टोबरला कर्करोगाने त्याचा बळी घेतला तेव्हा त्याचे पोलिसांतले सहकारी तर हळहळलेच पण राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक छोटे-मोठे कार्यकर्तेही व्यथित झाले. ही सगळी हळहळ केवळ बडा हपिसर गेला म्हणून नव्हती तर एक उत्कट व्यक्तित्वाचा बुद्धिमान माणूस अस्तंगत झाल्याची होती. व्यक्तिशः मला तर एक जुळा भाऊ गेला असे वाटले आणि त्याला कारणही तसेच आहे. तब्बल अठ्ठावन्न वर्षांच्या प्रदीर्घ खेळीतला माझा तो जोडीदार होता. जोडी फुटली आहे आणि विषण्ण मनाने ‘पिच’च्या दुसऱ्या टोकाला मी उभा आहे.

किती समांतर वाहत गेले आमच्या जीवनाचे प्रवाह! तो वसंत तसा मीही. त्याची आणि माझी आद्याक्षरं एकच- दोघंही व्ही.व्ही.! शाळा आणि कॉलेजातही दोघं एकत्रच शिकलो. एकाच वेळी, एकाच उद्देशाने दोघांनी शिक्षणाकडे पाठ फिरवली. एकाच ध्येयाने पेटलो, भूमिगत झालो, तुरुंगवास भोगला आणि तो संपल्यावर बीए-एमएच्या पायऱ्या चढलो. गंमत म्हणजे दोघांचे गोत्रही एकच! जन्महेतू जनकांप्रमाणे ज्यांनी आमच्या जीवनाला दिशा आणि आकार दिला ते पितृतुल्य गुरूही समान. आमची खेळांची आवड सारखीच. हूड वयात भांडत दुरावत, पुन्हा एकत्र येत, आम्ही परस्परांशी चुरस करीत न करीत वाढलो. सायकलवरून शेकडो मैलांच्या सफरी एकत्रच केल्या. समुद्रात वाहत वाहत दोन ओंडके भेटावे तसा नव्हता हा प्रकार. यदृच्छेहून काही वेगळी नियती असावी!

1930 साली मराठी शाळेत एकत्र आलो तेव्हापासून आजपर्यंत एक दीर्घ चित्रपट माझ्या डोळ्यांपुढून उलगडत जातो. ‘दधीची’ नामक नाटकात तो (गोरागोमटा असल्याने) इंद्र आणि मी (हाडे देणे तेव्हा सोपे असल्याने) दधीची झालो होतो! इंग्रजी पहिली दुसरीत असताना मास्तरांनी आळशीपणाने झोप काढावी आणि आम्हा दोघांकरवी वर्गाच्या उत्तरपत्रिका तपासाव्या! विद्यार्थी म्हणून त्याच्या अंगी माझ्यापेक्षा गुणवत्ता होती. तो हुशार होता, शिस्तीचा आणि नीटनेटका होता. त्याचे अक्षर सुरेख होते आणि लेखनही बिनचूक. त्याचे बरेच विषय माझ्याहून चांगले होते, मुख्यतः (माझ्याशी जन्माचे वैर करणारे) गणित! कॉलेजात पाऊल टाकल्यानंतर आम्ही आपापल्या आवडीचे विषय घेतले आणि वाटा दुभंग झाल्यासारखे वाटू लागले. तरीही एकमेकांपासून फटकून दूर झालो नाही आम्ही. स्पर्धा संपल्यामुळे खेळीमेळी वाढतच गेली.

मोठे खट्टेमीठे दिवस होते ते. खेळाचे तसे अभ्यासाचे, वारंवार प्रेमात पडायचे. कविता वाचताना कविता जगण्याचे. कधी तासन्‌ तास अभ्यासिकेत तर कधी तासन्‌ तास क्रीडांगणावर. सुटीच्या  दिवशी कोणाच्या तरी घरी दिवस दिवस कॅरम बडवत किंवा पत्ते पिसत आम्ही बैठक मारायचे. बी.ए.चे शेवटचे वर्ष आले आणि लढाऊ राजकारणाचे वारे जोराने वाहू लागले. तो कालखंडच मोठा विलक्षण होता. प्रचंड सभा भरत आणि घणाघाती भाषणे होत. अभ्यासमंडळे, वादसभा तेव्हा किती जिवंत असत. आम्ही सावरकरांच्या प्रभावी वक्तृत्वाने मोहून जात असू; पण गांधींच्या साध्या शब्दांत मंत्रशक्ती आहे, असेही मानत असू. कधी हमरीतुमरीवर येऊन वाद घालीत असू. यातूनच काही मित्र आरएसएसमध्ये, तर आम्ही काही जण सेवादलाकडे वळलो. बुद्धिमान वसंता मात्र अभ्यासवर्ग आणि विद्यार्थ्यांची चळवळ यांच्या मार्गाने राष्ट्रीय आंदोलनाकडे झुकला.

डॉ.पु.ग.सहस्रबुद्धे आणि वसंत यांचे मामा-भाच्यांचे नाते होते. पण डॉक्टरांची मते वसंताने निमूटपणे किंवा आंधळेपणाने कधीच स्वीकारली नाहीत. पुढे तर तो राजनीती आणि अर्थशास्त्र यांचा विशेष अभ्यास करायला लागला आणि स्वतःची मते विचारपूर्वक बनवून ती ठामपणे मांडू लागला. ती नेहमी बरोबरच असत असे नाही, पण ठाम असत.

1942 च्या मार्च महिन्यात गांधीजी ‘हरिजन’च्या स्तंभांतून वातावरणाचे तपमान वाढवू लागले. या स्तंभांतून केव्हा तरी नरसिंहच प्रकट होणार, अशी अटकळ आम्ही बांधली. युसुफ मेहरअलींनी मे महिन्याच्या सुटीत युवकांचे एक शिबीर घेतले आणि पुढील आंदोलनात कोणती आव्हाने झेलावी पेलावी लागणार आहेत, याचा खल त्यामध्ये झाला. हिवाळा संपून उन्हाळा आल्याची चाहूल जशी हवेतून तरंगत येणाऱ्या झाडावेलींच्या वासावरूनच लागते, तशी लवकरच येणाऱ्या आंदोलनांतील बदलांची खबर आम्हाला लागली. कोणी कोणाशी स्पष्ट बोलले नाही तरी आपल्या स्वतःच्या ‘करियर’चा क्षुद्र मोह सोडून आपल्याला मोठ्या त्यागाला तयार व्हावे लागणार आहे, याची अंधुक जाणीव का होईना, होऊ लागली होती.

घटना वेगाने घडत गेल्या. 8 ऑगस्ट 1942 चा ‘चले जाव’चा ठराव पास झाला. ‘चले जाव’ हा निर्वाणीचा इशारा इंग्रजांना मिळाला. सगळे प्रथम दर्जाचे आणि बरेचसे दुय्यम तिय्यम दर्जाचे पुढारीही रातोरात अटकेत पडले. पण लोक दबून राहणार नव्हते. लोकांनीच देशभर लढा पेटवला. इंग्रज साम्राज्यशाहीचा धिक्कार करीत हजारो माणसे मिरवणुका काढू लागली. झुंडीने फिरू लागली. ‘करेंगे या मरेंगे’ हा संदेश खेड्यापाड्यांत सर्वत्र पोहोचू लागला. शाळा-कॉलेजांतून विद्यार्थी बाहेर पडू लागले. यांपैकीच काहींनी शिक्षणाला रामराम ठोकून आंदोलनातला आपला वाटा उचलण्याचा निर्धार केला. आमच्या कॉलेजमधूनही मोहन धारिया, मृणालिनी धनेश्वर (आता मृणालिनी देसाई), वसंत दाते, वसंत नगरकर आणि तिसरा वसंत मी असे दहावीसजण राष्ट्रीय आंदोलनात भाग घेण्यासाठी बाहेर पडलो.

आम्ही तिघेही वसंत शाळेपासूनच एकत्र शिकत होतो आणि 1942 मध्ये बी.ए.च्या अंतिम वर्षात दाखल झालो. पुढे नेमके काय करावयाचे, याचा अर्थातच थांगपत्ताही आम्हाला नव्हता. तरी तिघांनीही कॉलेजला रामराम ठोकला. मग कालांतराने भूमिगत नेत्यांच्या गाठीभेटी होऊन आम्ही वेगवेगळ्या कामगिऱ्यांवर रवाना झालो. त्यांत दाते आणि नगरकर यांची कुलाबा (आताचा रायगड) ग्रामीण भागातला उठाव संघटित करण्यासाठी रवानगी झाली. महाडचे नाना पुरोहित यांच्या नेतृत्वाखाली ते दोघे गावन्‌ गाव पिंजून काढू लागले. शेतकऱ्यांचा प्रचंड मोर्चा महाडच्या कचेरीवर आणावा, सरकारी खजिना ताब्यात घ्यावा, पोलिसांना निष्प्रभ करावे आणि सरकारी कार्यालयांवर काँग्रेसचा झेंडा फडकवावा आणि आपण स्वतंत्र आहोत असे जाहीर करावे, असा कसोशीचा प्रयत्न सिद्धीस नेण्यासाठी या तरुणांनी जिवाचे रान केले.

या मोर्चाचे नेमके काय आणि कसे घडले, हे सांगणे येथे प्रस्तुत नाही. जवळजवळ यशस्वी होत आलेला तो मोर्चा शेवटी अपयशी ठरला. परंतु या प्रयत्नात वसंत दाते प्रभृती चौघांना वीरमरण आले. वसंत नगरकरची बहादुरी तिहेरी म्हटली पाहिजे. प्रथम मोर्चा संघटित करण्यासाठी त्याने शर्थ केली, मोर्चात आघाडीवर राहून तो शेवटपर्यंत मार्गदर्शन करीत राहिला आणि अंती माघार घेतानाही त्याने वीरासारखी माघार घेतली. आपल्या सहकाऱ्याचे वसंत दातेचे शरीर खांद्यावर टाकून तो चालू लागला, तेव्हा पाठीमागून त्याच्यावर झालेल्या गोळीबारात त्याचे प्राण वाचले. याचे कारण असे की दातेच्या मृतदेहाने बंदुकीच्या गोळ्या झेलल्या...

कष्टाने त्याचा देह भूमीवर ठेवून वसंत नगरकर वरंधा घाटातून भोरमार्गे पुण्याकडे निघाला. त्याचा अवतार, त्याच्या कपड्यांवरचे रक्ताचे डाग, त्याची विषण्ण मुद्रा या सगळ्यांमुळे त्याला कोणी थारा देणे किंवा त्याला वाहनातून न्यायला तयार होणे अवघडच होते. पूर्णपणे उद्‌ध्वस्त झालेला नगरकर युक्ती प्रयुक्तीने कसाबसा पुण्यात पोहोचला. घर केव्हाच पारखे झाले होते. आता आम्हा सर्वांनाच आंदोलनाला सहानुभूती असणाऱ्या मित्रांकडे लपून छपून राहावे लागत होते. तसा वसंतही राहिला. त्याच्या आणि माझ्या कामाची क्षेत्रे निराळी असल्यामुळे पुढे मला तो आंदोलनकाळात फारसा भेटला नाही. पण मला त्याचा आणि त्याला माझा थांगपत्ता नेहमीच असायचा.

महाडच्या मोर्चानंतर दोन-चार महिन्यांचा काळ लोटला असेल नसेल, एवढ्यात नाशिक भागात आगगाडी रुळावरून पाडण्याच्या मोहिमेवर तो गेला. भूमिगत चळवळीत असलो, तरी तशा चळवळीला आवश्यक असणारे तंत्रज्ञान आम्हापैकी एकालाही नव्हते. साहसाची तयारी, अंतिम त्याग करावा लागला तरी बेहत्तर अशी वृत्ती आणि चिकाटी एवढेच आमचे भांडवल होते. रेल्वेच्या रुळाला एक लोखंडाचा ठोकळा अशा रीतीने बसवायचा की गाडीची चाके त्यामुळे रुळांवरून घसरून गाडी कोलमडेल. अशी योजना करून नगरकर गेला होता. ठरल्याप्रमाणे नलिनी गोळे हिने लोखंडाचा ठोकळा नगरकरला नेऊन दिला. ठरल्याप्रमाणे याने तो जोडला आणि आता ठरल्याप्रमाणे गाडी पडणार, असे समजून तो शेतातल्या एका झाडाखाली थांबला. गाडी आली आणि धडधडत निघून गेली. ठोकळा बहुधा बिडाचा असावा. त्याच्या ठिकऱ्या कशा आणि कोठे उडाल्या ते कोणालाच कळण्यासाखे नव्हते.

अर्थात्‌ त्यामुळे वसंताच्या साहसीपणाला काही कमीपणा येत नाही. त्याच्या लढ्यातील उत्साही सहभागाला जराही उतार पडला नाही. पण एप्रिल 1943 मध्ये बाँबे सेंट्रल स्टेशनसमोर बेलासिस रोडवरही भूमिगतांच्या केंद्रावर मूषक-महालावर पोलिसांनी छापा घातला आणि तेथे शिरुभाऊ लिमये, ना.ग.गोरे, साने गुरुजी प्रभृती मोहोऱ्यांबरोबर वसंतही पोलिसांच्या हातात सापडला. सगळे सोपस्कार यथाक्रम होत गेले. कारावास तर त्यात होताच, पण ‘महाराष्ट्र कटाचा खटला’ म्हणून त्यावेळच्या सरकारने चाळीस आरोपींवर जो खटला भरला, त्यात वसंत नगरकर हाही एक आरोपी होता. मला त्यानंतर चार महिन्यांनी नाशिकला अटक झाली आणि माझेही जे यथाक्रम व्हायचे ते झालेच. महाराष्ट्र कटाच्या खटल्यामुळे मी आणि वसंता दोघेही ‘नंबरकरी’ झालो. एका परीने अलग झालेले मार्गक्रमण पुन्हा एकत्र जुळले.

आंदोलन समाप्त झाले. तुरुंगवास संपला. दोघेही पुन्हा कॉलेजमध्ये दाखल झालो. उरलेल्या तीन वर्षांचा आपापला अभ्यासक्रम संपवून बी.ए., एम.ए.च्या पायऱ्या आम्ही बरोबरच चढलो. भारत स्वतंत्र झाला आणि आम्ही आपापल्या व्यवसायात रमून जायला मोकळे झालो. आता वसंतनेच निर्णय घेतला की, आपण आय.ए.एस. परीक्षेला बसायचे. मी प्राध्यापकी पेशा स्वीकारला. मनात आणील ते करील अशी त्या वसंताची जिद्द असल्याने आय.ए.एस., आय.पी.एस. या दोन्ही विभागांत तो उत्तीर्ण झाला आणि काकासाहेब गाडगीळांच्या सल्ल्यानुसार त्याने आय.पी.एस.मध्ये प्रवेश स्वीकारला. एके काळी पोलिसांच्या हातावर तुरी देत पळणारा वसंत नगरकर आता डी.वाय.एस.पी., डी.एस.पी. या पदांवर आरूढ होणार या कल्पनेनेच मला हसू आले. एकीकडे थोडे वाईटही वाटले. विद्याभ्यासात चमकणारा माणूस गणवेषधारी पोलिस अधिकारी व्हावा हा मला दैवदुर्विलास वाटला! राज्यशास्त्र, अर्थशास्त्र यांच्या अध्ययन अध्यापनात ज्याने लौकिक मिळवावा, त्याला पोलिसी खाक्याची हडेलहप्पी करायला लागणार या विचाराने मी बेचैन झालो. त्यालाही ते कळत नव्हते थोडेच? पण तो तरी काय करू शकत होता? कौटुंबिक जबाबदारीचा डोंगर शिरावर वाहणे त्याला क्रमप्राप्त होते. अनेक धाकटी भावंडे अज्ञान होती. त्यांचे पालकत्व स्वीकारून त्यांच्यासाठी कमाई करणे त्याला आवश्यकच होते.

गेल्या पिढीतली माणसे किती अविचारी असत, याचे दर्शनच वसंताच्या घरात होई. त्याच्या वडिलांचा स्वभाव विक्षिप्त आणि रागीट होता. वाढत्या महागाईत घराण्याला हलाखी येत चालली होती. त्यामुळेही ते कावून गेले होते. तीन मुले पहिल्या पत्नीची. दुसऱ्या पत्नीचा पहिला मुलगा वसंत आणि मग मुला-मुलींची एक पलटणच घरांत निर्माण झाली होती. वडिलांपुढे मुलांनी काय बोलावे? निमूटपणे सर्व अडचणींना संकटांना सामोरे जाण्याशिवाय मुलाच्या हाती काय असणार? एवढा मोठा कुटुंबकबिला मागे ठेवून वडील निवर्तल्यावर तर वसंताला कर्तेपणाने पुढे व्हावेच लागले. माझ्याप्रमाणे त्यालाही प्राध्यापक व्हावेसे वाटत होते, परंतु प्राध्यापकाचा पगार (तेव्हा) एकशे पंचवीस रुपये -उणे एक आणा पावतीच्या तिकिटाचा- एवढा मोठा असल्याने वसंताला त्याचा उपयोग नव्हता. यापेक्षा अधिक मिळवण्याची आणि जी कमाई होईल, ती पूर्वजन्मीचे ऋण देण्यासाठी खर्च करण्याची त्याला फार आवश्यकता होती. म्हणून श्री. वसंत विनायक नगरकर, आय.पी.एस. या नावाने एक नेकीचा पोलिस अधिकारी महाराष्ट्राच्या पोलिस दलात भरती झाला.

प्रतिकूल परिस्थितीतही अनुकूलता कशी निर्माण करावी, याचे उदाहरणच त्याच्या पुढल्या चरित्रात मिळते. पोलिस खात्याची माणसे म्हटली की तिथे मेंदूचे काम नाही, असा आपला गैरसमज असतो. आपल्या कुशाग्र बुद्धीचा विनियोग करून पोलिस खात्यात कशी समाजसेवा करता येते, याचा आदर्शच त्याने निर्माण केला. पण बुद्धीपेक्षाही नजरेत भरायची ती त्याची समाजहिताची कळकळ. पोलिस शिपाईदेखील समाजाचाच एक भाग आहेत असे मानून त्यांच्या हितासाठी त्याने बहुविध उपक्रम सुरू केले. या कामात त्याच्या सहधर्मचारिणीने कुमुदने त्याला फार उत्तम साथ दिली.

वरिष्ठ अधिकारी आपला ‘रिंगमास्टर’ नाही. आपला हितकर्ता आहे, मार्गदर्शक आहे, अशी भावना त्याने निर्माण केली. त्याने अनेक जिल्ह्यांत पोलिस प्रमुख म्हणून काम केले. आणि जाईल तेथे त्याने प्रेमाने माणसे जोडली. राष्ट्रीय आंदोलनात तावून सुलाखून निघालेले त्याचे व्यक्तित्व होते आणि म्हणून त्याची ध्येयनिष्ठा कधीही ढळली नाही. सर्व वाममार्ग आणि भ्रष्टाचार त्याला वर्ज्य होते. इतकेच नव्हे, तर त्यांचा तो कट्टर वैरी होता. रेल्वे प्रशासनातही त्याने चोख सेवा बजावली आणि गुप्तचर विभागातही आपला ठसा उमटवला.

हे सर्व करीत असतानाच भारतातील मुसलमान समाजाच्या प्रश्नांचा त्याने चौफेर आणि सखोल अभ्यास केला. मुसलमानांच्या समस्यांबद्दल त्याला विशेष जाण आहे, याची दखल दिल्लीपर्यंत राज्यकर्त्यांना घ्यावी लागली. पुढे तो दिल्लीलाही अतिशय महत्त्वाच्या पदावर काम करू लागला आणि त्याच्या निःस्वार्थ वृत्तीमुळे तसेच त्याच्या वस्तुनिष्ठ निरीक्षणामुळे त्याने सर्व वर्तुळांत आपला वचक निर्माण केला.

शरद पवारांनी त्याला परत महाराष्ट्रात आणले आणि इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलिस या अत्युच्च स्थानी त्याची नेमणूक केली. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या नेमणुका आणि बदल्या या अनेक वेळा राजकीय दृष्टीने विचार करून केल्या जातात. त्यामुळे नंतर अंतुले सरकारच्या अमदानीत त्याला होमगार्डचा प्रमुख करण्यात आले. तिकडे दिल्लीलाही सत्तांतर झाले होते आणि इंदिराजी पुन्हा पंतप्रधान झाल्या होत्या. त्यांच्याविरुद्ध बनावट पुरावा तयार केल्याचा आरोप ठेवून चौधरी चरणसिंग आणि वसंत नगरकर यांना कोर्टात खेचण्यात आले होते. ज्यांचा खूप भरवसा वाटावा, अशा राजकीय वर्तुळातील मित्रांनी जवळजवळ पाठ फिरवली असताना आणि बलाढ्य शासनाने धाक दाखवला असताना वसंताने अतिशय निडरपणाने, निर्धाराने झुंज दिली आणि इंदिरा सरकारला माघार घ्यावी लागली. इकडे आपली पदावनती करून बुद्धिपुरस्सर आपला अवमान केला, अशी फिर्याद त्याने अंतुले शासनावर केली. याही खटल्यात तो विजयी झाला आणि न्यायालयाकडून त्याने भरपाईचा हुकूम मिळविला. त्याने जरा तोंड वेंगाडले असते तर त्याला नोकरीत अतिरिक्त वाढ करून मिळाली असती. त्याचे वयही चुकून दोन वर्षांनी कमी लागले होते. पण असले काहीही न पत्करता त्याने सन्मानाने निवृत्ती स्वीकारली.

निवृत्तीनंतरही तो स्वस्थ बसला नाही. एक मधु दंडवते वगळता जनता सरकारमध्ये असलेले कोणीही आपल्या पाठीशी उभे राहिले नाही, याची तीव्र चीड त्याच्या मनात होती. वास्तविक त्याचा पिंड पाहता त्याची वाटचाल समाजवाद्यांच्या बरोबरच व्हायला हवी होती. पण वसंताचे राजकीय गणित म्हणा किंवा समाजवादी नेत्यांच्या राजकारणाचा त्याला विश्वास वाटेना म्हणून म्हणा, त्याने शरद पवारांच्या समाजवादी काँग्रेसमध्ये काम करायचे ठरविले. मात्र लवकरच त्याचा भ्रमनिरास झाला. पवारांनी काँग्रेस आयमध्ये प्रवेश करावा, हे त्याला बिलकुल पसंत पडले नाही. आणि तो राजकीय पक्षाचे बंधन तोडून मावळ भागात विधायक कार्याकडे वळला. त्याला कोणत्याही पक्षात कसलेही पद नको होते, हे त्याने पवारांशी हातमिळवणी करतानाही स्पष्ट केले होते. (त्याला ते कोणी दिलेही नसते, ही गोष्ट वेगळी!) नोकरीवर असतानाही आणि निवृत्त झाल्यावरही वाचन, मनन आणि आपल्याला जे पटेल त्याचा हिरीरीने प्रसार करण्याची प्रथा, या गोष्टी त्याने चालूच ठेवल्या. त्याने ‘साधना’, ‘गतिमान’ या साप्ताहिकांतून काही लेखन केले. स्वातंत्र्य-संग्रामासंबंधी काही ग्रंथलेखन केले. त्याची उत्साह शक्ती आणि उमेद, ही कायम असतानाच त्याच्यावर कर्करोगाने घातक हल्ला चढवला.

म्हणजे आता पुन्हा झुंज आली. डॉक्टरांच्या मदतीने जे उपचार शक्य होते, ते त्याने केले. पण मुख्य म्हणजे त्याची उभारी कधी मोडली नाही. या अवस्थेतही तो बागकाम करीत राहिला. वाचन-लेखन त्याने सोडले नाही आणि राष्ट्रीय जीवनाच्या सर्व समस्यांविषयी असणारी कळकळ, मित्रांच्या बैठकीत तो मनापासून व्यक्त करीत राहिला. पहिले ऑपरेशन मुंबईच्या टाटा इस्पितळात झाले, तेव्हा सर्वांप्रमाणे त्यालाही वाटले होते की, आपली व्याधी आता बळावणार नाही आणि तडकाफडकी हे जग आपल्याला सोडावे लागणार नाही. पण काही काळ त्याच्या आयुष्याशी आट्यापाट्या करून, शेवटी त्याची कोंडी करून कर्करोगाने त्याला टिपलेच!

वसंत नगरकर कोणाला कल्पना येणार नाही एवढ्या साधेपणाने राहायचा, कर्तव्यभावनेने त्याने छानछोकी टाकली ती कायमची. त्याला हौस नव्हती, असे नाही. पण ती त्याने निग्रहाने मारली. यात त्याच्या पत्नीचाही वाटा आहे. तुकोबांनी वर्णन केले आहे तसे ‘भ्रतारासी भार्या सांगे गुजगोष्टी; तुम्हांपासी कष्टी जाहले मी’ असे कधीही केले नाही. चांगल्या-चुंगल्या कपड्या दागिन्यांचा तिलाही कधी मोह वाटला नाही. त्यामुळे त्यांचे दांपत्य जीवन एकमेकांना समजून घेत सुखात गेले. वास्तविक तो खूप हट्टी आणि आग्रही होता. शेंडी तुटो की पारंबी, अशी त्याची लहानपणापासून रीत होती. पण आपल्या जीवन मूल्यांविषयी किंवा विचार सरणीविषयी उग्र आग्रह धरणारा वसंत माणसामाणसांच्या संबंधाबाबत किती समजूतदार होता! कुमुदला आध्यात्मिकतेची ओढ असल्याने ती समधर्मी मंडळींसह भजन कीर्तनांत, सत्संगांत सामील झाली, तरी वसंताने तिची वाट न स्वीकारली, न अडवली. असे करायलासुद्धा मला वाटते, एक आध्यात्मिक ताकदच लागते.

भूमिगत चळवळीत साने गुरुजी एका पत्रिकेचे संपादन करीत. तिचे नाव ‘क्रांतिकारी’. त्यात आम्हां तिघांवर त्यांनी ‘तीन वसंत’ म्हणून एक कौतुकाचा लेख लिहिला होता. एक वसंत हुतात्मा झाला; दुसरा कर्तबगार जीवनाचा एक आदर्श निर्माण करून गेला. आता तिसरा उरला आहे मुक्या मनाने शब्दांचे बुडबुडे उधळायला...

----

विशेष नोंद :

वसंत नगरकर (2 नोव्हेंबर 1922 ते 9 ऑक्टोबर 1988) आणि वसंत बापट (25 जुलै 1922 ते 17 सप्टेंबर 2002) हे दोघे घनिष्ट मित्र. बापट यांचे जन्मशताब्दी वर्ष दीड महिन्यांपूर्वी सुरू झाले, तर नगरकर यांचे जन्मशताब्दी वर्ष आणखी दीड महिन्याने सुरू होणार आहे. वसंत बापट यांच्यावरील साधना विशेषांक वाचल्यावर सुधीर आळेकर यांनी वसंत बापट यांच्या एका पूर्वप्रसिद्ध (बहुदा असंग्रहित) लेखाचे कात्रण पाठवले, तो लेख म्हणजेच ‘माझा जुळा भाऊ वसंत नगरकर’. हा लेख इतका अफलातून आहे की, साधनात पुनर्मुद्रित करणे आवश्यक वाटले आणि त्यासाठी निमित्तही लवकरच जुळून आले. या आठवड्यात बापट यांचा मृत्यूदिवस येत आहे, तर आणखी दोन आठवड्यांनी नगरकर यांचा मृत्यूदिवस येत आहे.

मात्र बापट यांनी 33 वर्षांपूर्वी म्हणजे ऑक्टोबर 1988 मध्ये लिहिलेला हा मृत्यूलेख कोणत्या वृत्तपत्रातील आहे व ते वृत्तपत्र कोणत्या तारखेचे आहे, हे त्या कात्रणावरून कळत नाही. सुधीर आळेकर आणि नगरकर यांचे नातलग (चिरंजीव,  कन्या व जावई) यांच्याशी अमेरिकेत संपर्क साधला, पण त्यांनाही ते दोन तपशील माहीत नाहीत. हा लेख वाचणाऱ्या कोणालाही ते तपशील माहीत असतील तर कृपया कळवावेत. यथावकाश हा लेख वसंत बापट किंवा वसंत नगरकर यांच्या नव्या पुस्तकात समाविष्ट होईल तेव्हा तशी नोंद करता येईल, अभ्यासकांची सोय होईल.

संपादक, साधना

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके