डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

शाश्वत ऊर्जेचा माणूस : वि. रा. जोगळेकर

आजवरच्या अनुभवांचा आणि व्यासंगाचा उपयोग करण्यासाठी त्यांनी लेखनाचा छंद विकसित केला. राजगोपालाचारींनी इंग्रजीत रूपांतरित केलेले रामायण त्यांनी मराठीत आणले. त्या पुस्तकाला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळेच पाठोपाठ महाभारताचीही मराठी आवृत्ती त्यांनी प्रकाशित केली. त्यांच्या अनुभवांचे शब्दांकन म्हणून त्यांची ‘शाश्वत ऊर्जेची शोधयात्रा’ ग्रंथबद्ध झाली. या सर्वच पुस्तकांना बाहेरचा कोणी मोठा प्रकाशक शोधावा लागलाच नाही, पण सुजाण वाचकांनी त्या पुस्तकांचे भरभरून स्वागत केले. लुई फिशर या अमेरिकन पत्रकाराचा ‘महात्मा गांधी : हिज लाईफ ॲण्ड टाइम्स’ हा ग्रंथ त्यांनी अनेकदा वाचला होता. गेल्या सत्तर वर्षांत ते पुस्तक मराठीत आलेले नव्हते, ते विठ्ठलदादांनी भाषांतरित केले. साधना प्रकाशनाने 1 सप्टेंबर 2019 रोजी ते पुस्तक प्रकाशित केले आणि आश्चर्य म्हणजे, एकाच महिन्यात 2 ऑक्टोबर 2019 रोजी त्याची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली. 14 ऑगस्ट 2020 रोजी विठ्ठलदादा यांचे निधन झाले, त्यानिमित्ताने त्यांना वाहिलेली ही आदरांजली.

आज सारे जग ऊर्जा आणि प्रदूषण यांच्याविषयी प्रश्न घेऊन उभे आहे. त्या दोन्ही विषयांवर चर्चा खूप होते, वाद विवादही झडतात; परंतु प्रत्यक्ष भूमीवर पाय रोवून जमेल तितके काम आपल्या आदर्शातून उभे करणारा एक भगीरथ म्हणून विठ्ठलराव जोगळेकर यांच्याकडे आम्ही सारे पाहत होतो. ‘थिंक ग्लोबली, ॲक्ट लोकली’ अशा विचाराने भारलेले विठ्ठलराव आयुष्यभर एका निरलस तत्त्वाने जगले. आजच्या व्यवहारी आणि तडजोडीच्या जगात पुष्कळदा त्यांचे विचार आणि वागणे काहींना एकांगी वाटले असेल, परंतु गांधीविचारांचा हा भक्त त्यांच्याच वागण्यावर श्रद्धा ठेवून असल्यामुळे त्यांच्या मार्गापासून ते तसूभरही ढळले नाहीत.

तासगावच्या एका शेतकरी ब्राह्मण कुटुंबात 1934 मध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांच्या घरात आधुनिक विचार आणि परंपरागत आचार यांचे मनोहारी मिश्रण होते. वडील समर्थभक्त, व्यायाम प्रसारक असल्यामुळे त्यांच्या घरावर आणि सभोवतीच्या सगळ्या गोतावळ्यावर शालीनतेचे व संस्कारांचे वातावरण पसरलेले होते. त्यातच मिश्किली आणि खेळकरपणालाही महत्त्वाचे स्थान होते. त्यामुळे त्या सगळ्याच कुटुंबाला स्वच्छ-शुद्ध व्यवहाराची देणगी पिढीजातच मिळाली असावी. विठ्ठलदादांची कारकीर्द याही संस्कारांनी प्रभावित झालेली होती आणि तो प्रभाव काल-परवापर्यंत त्यांनी सगळ्या घरावर पांघरलेला होता. तासगाव-सांगलीच्या पंचक्रोशीत या जोगळेकर कुटुंबालाच लोकांनी एक श्रद्धास्थान मानले होते. त्या जनश्रद्धेचे सगुण रूप म्हणून विठ्ठलदादा काल-परवापर्यंत घाबरत होते.

इतक्या बाळबोध घरातील उमलता तरुण सांगलीच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून पदवीधर झाला. याच वयात त्यांच्यावर त्यांचे मामा कै.दत्त आपटे यांच्या देशप्रेमाचा, अफाट वाचनाचा आणि जनसंपर्काचा प्रभाव पडला. इंजिनिअर झाल्यावर ते स्वतंत्र भारताच्या उभारणीतील आपला सहभाग देण्याच्या ईर्ष्येने कोयना प्रकल्पावर रुजू झाले. धरणाच्या बांधकामापासून तिथल्या दऱ्या-खोऱ्यांतून आणि अरण्यातून त्यांचा संचार घडला. निसर्गाच्या या आगळ्या अनुभवातून त्यांच्या सुसंस्कृत तारुण्याला नवी उंची मिळाली. त्याचबरोबर धरणाचा जगङ्‌व्याळ प्रकल्प पूर्ण होईपर्यंत या साऱ्या खटाटोपाचा हेतू कोणता, असा एक संभ्रम त्यांच्या मनाला ग्रासू लागला. गांधीजींचा ग्रामीण भारत आणि नेहरूंचा उदयोन्मुख उद्योगी भारत या दोन्ही विचारांचे द्वंद त्यांच्या मनात फिरू लागले. त्याचा निर्णय म्हणून, कोयनेतून निर्माण होणारी विद्युत ऊर्जा उद्याच्या जगापुढे प्रचंड भस्मासुर उभा करणार याचा त्यांना साक्षत्कार झाला. त्यातच कोयनेला 1967 च्या अखेरीस झालेला भूकंप आणि तेथील उद्‌ध्वस्त जीवन त्यांनी डोळ्यादेखत पाहिले. मग गाडी-बंगल्याची सरकारी उच्चपदाची नोकरी सोडून देण्याचा त्यांनी निर्णय घेतला.

सांगलीत येऊन सहकारी उद्योग सुरू करण्यासाठी त्यांना त्यांचे मामा दत्त आपटे आणि त्यांचे प्रेरणास्थान वसंतदादा पाटील यांनी सर्वतोपरी प्रोत्साहन दिले. जुन्या सांगलीतील कारखानदार रघुनाथराव भिडे यांनी शिवसदन सहकारी संस्थेचे अध्यक्षपद घेतले. या साऱ्या टीममध्ये थोर अभियंता वि.ह.केळकर, आवटी, गणपतराव आरवाडे अशी दिग्गज मंडळी काम करत होती. त्यांचे कोयनेपासूनचे कनिष्ठ सहकारी सुरेश आपटे हे जोगळेकरांच्या जोडीला आल्यानंतर या संस्थेने ग्रामीण भागातील गरजा आणि विकास डोळ्यांसमोर ठेवून प्रचंड उत्पादन सुरू केले. शेतकरी आणि शेतमजुरांसाठी छोटी घरकुले, तयार गोठे, पाण्याच्या टाक्या अशी उत्पादने सुरू झाली. त्या काळात पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी उद्योग भरात आलेला होता. त्या माध्यमातून ग्रामीण भागात पोचणे आणि शेतकऱ्यांच्या गरजा भागविणे शक्य झाले. त्यातूनच गोबरगॅस व बायोगॅस संयंत्रे उभारणीचे काम सुरू झाले आणि ऊर्जा क्षेत्रातील नवी दिशा जोगळेकरांच्या संशोधक दृष्टीला मिळाली. यासाठी लागणारा कच्चा माल प्रचंड प्रमाणात उपलब्ध असतो आणि त्यापासून निर्माण होणारी ऊर्जा देशाला स्वयंपूर्ण बनवू शकते, हे त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांना जाणवू लागले. केंद्र सरकारचे अपारंपरिक ऊर्जा खात्याचे सचिव आणि शास्त्रज्ञ कै.महेश्वर दयाळ यांनी श्री.जोगळेकरांना भरपूर वाव दिला आणि सांगलीसारख्या आडवळणी गावात याविषयाच्या संशोधनासाठी प्रचंड प्रयोगशाळा उभी राहिली.

विद्यार्थिदशेपासून कष्ट आणि अभ्यास यांच्या संयोगाने समृद्ध झालेले जोगळेकरांचे जीवन त्यांच्या पंचाहत्तराव्या वर्षी दैनंदिन उद्योगातून निवृत्त झाले. तासगावच्या वडिलार्जित मळ्यात त्यांनी वानप्रस्थ स्वीकारला, पण त्यांच्यातील नैसर्गिक आणि पारंपरिक ऊर्जा अधिकच काम करू लागली. आजवरच्या अनुभवांचा आणि व्यासंगाचा उपयोग करण्यासाठी त्यांनी लेखनाचा छंद विकसित केला. राजगोपालाचारींनी इंग्रजीत रूपांतरित केलेले रामायण त्यांनी मराठीत आणले. त्या पुस्तकाला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळेच पाठोपाठ महाभारताचीही मराठी आवृत्ती त्यांनी प्रकाशित केली. त्यांच्या अनुभवांचे शब्दांकन म्हणून त्यांची ‘शाश्वत ऊर्जेची शोधयात्रा’ ग्रंथबद्ध झाली. या सर्वच पुस्तकांना बाहेरचा कोणी मोठा प्रकाशक शोधावा लागलाच नाही, पण सुजाण वाचकांनी त्या पुस्तकांचे भरभरून स्वागत केले. लुई फिशर या अमेरिकन पत्रकाराचा ‘महात्मा गांधी : हिज लाईफ ॲण्ड टाइम्स’ हा ग्रंथ त्यांनी अनेकदा वाचला होता. जगभरच्या व्यासंगी वाचकांमध्ये हे इंग्रजी पुस्तक विलक्षण लोकप्रिय झालेले होते; पण गेल्या सत्तर वर्षांत ते पुस्तक मराठीत आलेले नव्हते, ते विठ्ठलदादांनी भाषांतरित केले. पुण्याच्या साधना प्रकाशनाने गेल्या 1 सप्टेंबर 2019 रोजी ते 700 पृष्ठांचे पुस्तक प्रकाशित केले आणि आश्चर्य म्हणजे, एकाच महिन्याने 2 ऑक्टोबर 2019 रोजी त्याची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली. गांधींजींवर श्रद्धा असलेला विठ्ठलदादांसारखा हळव्या मनाचा अनुयायी पुण्याच्या प्रकाशन समारंभात त्यांचे मनोगत व्यक्त करताना ओक्साबोक्शी रडला, हे भरगच्च भरलेल्या सभागृहाला नि:शब्द आणि स्तब्ध करून गेले.

गेल्या सुमारे वर्षभरात त्यांनी लेखनाचा तो व्यासंग चालू ठेवला होता, परंतु वयपरत्वे त्यांची लेखणी मनासारखी न धावता ती कुरकुरत होती, असे आम्हा निकटवर्तीयांना जाणवू लागले होते. तरीही त्यांनी आपल्या आयुष्याची काही स्मरणचित्रे नुकतीच लिहिली आहेत. अगदी आदल्या दिवशीपर्यंत त्यांचा फोनवरून आमच्यासारख्या अनेकांशी संवाद चालू राहिला होता आणि तितक्याच नव्या उमेदीने नवे संकल्प चालू राहिले होते. दि.15 ऑगस्टच्या दुपारी त्यांची भेट घेण्यासाठी आम्ही काही जण तासगावला जाण्याचे ठरलेही होते. त्या वेळी सहकार, ऊर्जा, लेखन-प्रकाशन अशा अनेक घरगुती विषयांवर काही विचारमंथन अपेक्षित होते. पण ते सारेच आता जिथल्या तिथे थांबले! आम्हा साऱ्या आप्तस्वकीयांमध्ये ते वयाने, बुद्धीने, मनाने, व्यासंगाने ज्येष्ठ होते. हीच त्यांची भूमिका तासगाव परिसरात होती. त्यामुळे त्या सर्व विश्वाला वडिलधारे माणूस गेल्याचे स्वाभाविक दुःख आहे; त्याचबरोबर त्यांनी दिलेल्या संस्कारांमुळे ते दुःख पाठीवर टाकून समृद्ध जीवनाची वाटचाल हसत-खेळत जगण्याचा मंत्रही अनुसरला पाहिजे, ही जाणीव आहे.

Tags: विठ्ठलदादा जोगळेकर महात्मा गांधी : हिज लाईफ ॲण्ड टाइम्स वसंत बापट वि. रा. जोगळेकर Viththaldada Jogalekar mahatma gandhi : His life and times vasant bapat V. R.Jogalekar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात