डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

पुण्यात भरलेल्या तेहतिसाव्या अ.भा. गुजराती साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून श्री. वसंत बापट यांनी केलेल्या भाषणातील काही उतारे येथे उद्धृत करीत आहोत.

33 व्या गुजराती साहित्य संमेलनाचा सोहळा महाराष्ट्रात आणि तोही पुण्यासारख्या, मराठी भाषेच्या माहेरघरी साजरा होतो आहे. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. या घटनेकडे एक पृथक् घटना म्हणून पाहण्यापेक्षा भारतीय एकात्मतेच्या सिद्धीसाठी होणाऱ्या अनेक महत्त्वाच्या घटनांपैकी एक म्हणून मी पाहतो. यापूर्वी गुजराती साहित्य संमेलने कलकत्ता, दिल्ली, हैद्राबाद, बंगलोर अशा गुजरातबाहेरच्या महानगरांत झालेली आहेत. आता गुजरातच्या महान साहित्य सेवकांचे चरण पुष्पनगरीला लागत आहेत. अशा शुम प्रवृत्तींकडे बघण्याचा काहींचा दृष्टिकोन दूषित असतो आणि त्यामुळे संस्कृति-मिलनाच्या या इष्ट प्रसंगातही त्यांना आक्रमक वृत्तीचा वास येतो. या दुर्दैवी अधू दृष्टीच्या मित्रांना आपण क्षमा करू या. उलट, ज्यांना या खंडप्राय देशातील नाना भाषांचा रास्त अभिमानच वाटतो आणि सरस्वतीच्या सहावीणेवरचे स्वरतरंग ऐकत असताना क्षुद्र मेदांपलीकडे जाऊन जे महान आनंद अनुभवू शकतात, त्यांच्या सोबतीने आपण आपली आनंदयात्रा करू या! गुरुदेव रवीन्द्रनाथांचा आदर्श समोर ठेवून आणि त्यांना अभिवादन करून पूज्य साने गुरुजींनी आंतरभारतीचे स्वप्न देशाला दिले आहे. याच ध्येयाचा मीही एक नम्र उपासक आहे.

आंतरभारती ही संस्था लहान आहे पण आंतरभारती ही कल्पना महान आहे. तिला जन्म साने गुरुजींनी दिला असला, तरी तिचे संगोपन आणि संवर्धन करणारे श्रेष्ठ साहित्यिक आणि विचारवंत भारतात अनेक ठिकाणी आहेत. त्यांच्यापैकी सर्वात अधिक प्रभाव माझ्यावर पडला आहे तो कविश्रेष्ठ उमाशंकर जोशी या गुरुतुल्य महान व्यक्तित्वाचा. अनेक-भाषी मेळाव्यात स्वतःची ओळख करून देण्याचा कार्यक्रम चालू असताना प्रत्येकजण, मी बंगाली साहित्यिक आहे, मी हिंदी उपन्यासकार आहे, मी मराठी कवी आहे, मी कन्नड विमर्शकार आहे- असे सांगत असता केवळ उमाशंकर जोषी यांनी मात्र, 'मी भारतीय लेखक आहे आणि गुजराती भाषेत लिहितो' असा आत्मपरिचय करून दिला. त्याचा माझ्यावर मोठा परिणाम झाला. मी कोण आहे या प्रश्नाचे उत्तर दिवसानुदिवस कठीण होत चालले आहे. एकाच वेळी आपण प्रादेशिक अभिमान आणि राष्ट्राभिमान सांभाळीत असतो. ते आवश्यकही आहे. एक प्रकारे ही दुहेरी निष्ठा आहे. परंतु या दोन लहानमोठ्या वर्तुळांनी एकमेकांना छेद देण्याचे कारण नाही; त्या समकेंद्री ठेवता येतील हा दिलासा मला उमाशंकरभाईच्या सामान्य वाटणाऱ्या असामान्य वाक्याने दिला. गेली 35 वर्षे त्यांच्या प्रेरक स्नेहाचा लाभ मला झालेला आहे. उमाशंकरमाईचा आदर्श मला स्वत:च्या अनेक चुका दुरस्त करण्यासाठी आणि नव्या गोष्टी शिकण्यासाठी उपयोगी पडला. स्वभावातील आर्जव आणि मार्दव अवाधित राबूनही तत्वनिष्ठ माणूस काणखर भूमिका कशी घेऊ शकतो, याचे दर्शनच मी त्यांच्या आचरणात घेतले. आज मी येथे उभा आहे, तोही वडीलकीच्या नात्याने ते आपल्याला निःशब्द आशा करीत आहेत, असे समजूनच!

या क्षणी माझ्या मनात अनेक आठवणी गर्दीने उसळत आहेत. 1951 मध्ये मराठी कुमार साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून मी अहमदाबादला गेलो आणि त्यानंतर सुमारे तीन तपे गुजरातच्या सरस्वतीपुत्रांशी माझा सतत संबंध येतच राहिला. पुष्कळ स्नेहरश्मींनी आपला स्नेह मला दिला. गुजराती कविवर्यासमवेत मी कविमंचांवर उपस्थित राहिलो. बेतालिस विरादरीच्या निमित्ताने गुजरातच्या झुंजार स्वातंत्र्यसैनिकांचा आणि पत्रकारांचा सहवास मला घडला. सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मी वारंवार गुर्जरभूमीवर जातच राहिलो आणि तेथील उदार रसिकतेने हात कधी आखडता घेतला नाही. मुंबई शहरातील मूर्धन्य लेखक-कवी पत्रकार मला, आणि मीही त्यांना मित्र मानतो, उमाशंकरमाईच्या आंतरभारती प्रचीचे एक सुंदर प्रतीक म्हणजे त्यांचा 'गंगोत्री ट्रस्ट.’ जगातील उत्तम कृती गुजराती भाषेत आणणे, हे या ट्रस्टचे एक ध्येय; पण त्याबरोबरच शेजारच्या प्रदेशातील साहित्य गुजरातीमध्ये यावे, यासाठी परिश्रम घ्यावे, हे दुसरे ! त्याला अनुसरून आम्हा मराठी कवींपैकी अनेकांच्या कवितांचे त्यांनी गुजरातीत अनुवाद करवून घेतले आणि ते पुस्तकरूपाने प्रकाशितही केले. त्यांतला मीही एक भाग्यवंत कवी आहे, याचा मला अतिशय आनंद होतो. सणोसरा येथील ज्ञानसत्रातही मी सहभागी होतो. तो अनुभव अविस्मरणीय आहे.

महाराष्ट्र आणि गुजरात या दोन प्रदेशांचे नाते अगदी निकटचे आहे. ऐतिहासिक कारणांमुळे पुरातन काळापासून या दोन प्रदेशांत अतूट नाते आहे. मराठी भाषेला धर्मभाषेचे स्थान देऊन तिचा मोठा गौरव करणारा थोर महानुभाव चक्रधर गुजरातनेच महाराष्ट्राला दिला. त्यानंतरही गेल्या सात शतकांत आचारविचारांची, शब्दांची, फळांची देवाणघेवाण सहजपणे होतच राहिली आहे. वास्तविक गुजराती आणि मराठी या भाषाभगिनी आहेत हे इतके खरे आहे की, परस्परांच्या भाषा आपल्याला न शिकता समजत असतात ! संतांना नव्हत्या का सर्व भाषा समजत 1 गुजरातला नामदेव-तुकोबांची नऱ्हाटभूमी कधीच दूरची वाटली नाही. आधुनिक भारतातही असे आदान प्रदान कळत नकळत चालूच राहिले. परस्परांच्या साहित्याचे अनुवाद समर्थ अनुवादकांनी केले. ज्यांची जन्मशताब्दी महाराष्ट्राने प्रेमादराने साजरी केली, ते महाराष्ट्र शारदेचे लाल राम गणेश गडकरी नवसारीला जन्मले. तोही एक पूर्वजन्मींचा ऋणानुबंधच. त्यांनी आपले पहिले नाटुकले गुजरातीत लिहिले होते! काकासाहेब कालेलकर, तर महाराष्ट्र-गुजरात यांच्या एकतेवरचा सुवर्णकलशच म्हटले पाहिजे. अलीकडे साहित्याच्या आधुनिक पर्वातही कवी, समीक्षक आणि नाटककार या दोन भाषांमधील नाते अधिकाधिक दृढ करीत असतात, याचा प्रत्यय मला मुंबई शहरात तरी पुन्हा पुन्हा येत असतो.

महाराष्ट्रात स्थायिक झालेल्या परंतु मुळात गुजराती भाषिक असलेल्या मित्रांची थोरवी काही वेगळीच आहे. बडोदा-अहमदाबादला वसती आहे तशीच महाराष्ट्रांत रुजून राहिलेल्या गुजराती समाजाची महाराष्ट्रावरची भक्ती उत्कटतेत जराही कमी नाही. खरोखर असे समाज सर्व देशापुढे आदर्श निर्माण करीत असतात. मराठी माझी आई असून गुजराती ही माझी मावशी आहे असे विठ्ठलराव घाटे म्हणत; पण हे समाज त्याच्याही पुढे जातात आणि ज्या भूमीत राहतात तिला आपली आईच मानतात. पूर्वजांनी त्यांना दिलेला वडिलार्जित वारसा त्यांनी टाकून द्यावा अशी अपेक्षा अभद्र आणि अस्वाभाविक ठरेल, पण तो वारसा पूज्य भावाने जपत असतानाच आपण राहतो त्या मातीशी सख्त इमान राखायला ती विसरत नाहीत हा त्यांचा विशेष गुण म्हणावा लागेल. वर्तमान आणि भावी भारतीय समाजाला अशा द्विभाषिक, त्रिमाधिक अथवा बहुभाषिक समाजांची फार मोठी मातब्बरी आहे. असे समाज कधी भौगोलिक तर कधी ऐतिहासिक कारणामुळे निर्माण होतात. आजही कधी राजकीय, कधी औद्योगिक घडामोडीमुळे ते अस्तित्वात येतात. आंतरभारतीच्या उपासकांना आणि समर्थकांना तर अशा समाजांचे महत्त्व फार मोठे वाटते. मुंबई, बडोदा, इंदूर, नागपूर, जवलपूर, दिल्ली, बंगलोर, हैद्राबाद अशी शहरे म्हणजे भाषांची संगमतीथें आहेत. प्रादेशिक अस्मितेला अहंकाराची सूज आली नाही तर बहुभाषिक समाजांविषयी आणि अशा भाषिक संगमतीर्थे असलेल्या केंद्रांविषयी आपल्याला एक वेगळीच आस्था वाटू शकेल. प्रदेशांच्या आणि भाषांच्या नावाने कोणी तळी आणि डबकी निर्माण केली, तर बहुभाषिक समाज आणि भाषासंगमाची तीर्थे हे सर्वाना सांधणारे सेतू म्हणून कामगिरी बजावू शकतील.

सध्याचे युग विलक्षण गतिमान आहे. विशाल भूगोल आता खरोखरच आक्रसला आहे. साहित्यनिर्मितीच्या दृष्टीनेही ही घटना विलक्षण महत्त्वाची आहे. तिथे सुपरिणाम कोणते आणि दुष्परिणाम कोणते, हे आज निश्रयाने सांगता येत नसले तरी एक गोष्ट निश्चित आहे ती ही की लेखकाच्या आणि विशिष्ट समाजाच्याही अस्मितेचा प्रश्न नव्याने उपस्थित होणार आहे. जग एकसंध होत जाते, त्याबरोबर सभ्यता आणि संस्कृती यांची वैशिष्टये मावळतात आणि विश्र्वसंस्कृतीच्या एकाकार स्वरूपाशी साहित्यिक आपले मन आणि स्वतंत्र व्यक्तित्व त्यालाही नकळत मिळवून घेऊ लागतो. दुसऱ्या महायुद्धानंतर जगातील सर्वच मानव-समाजात भय, अनिश्चितता, पोरकेपणा, एकाकीपणा, बहुजनांच्या गर्दीत आपण आपले स्वत्व हरवून बसल्याचे दु:ख, आत्मवैर, अशा भावना प्रबळ झाल्याचे दृश्य साहित्यात आढळते. एकीकडे तंत्र आणि विज्ञान यांच्या रोलरखाली व्यक्तिविशेष नामशेष होऊन एक सबगोळंकार समष्टिसंस्कृती आकार घेत आहे, तर दुसरीकडे व्यक्तीचे मन भांबावलेले आहे, विस्कटलेले आहे, उदध्वस्त झालेले आहे. आज नाटक, कथा, कादंबरी, कविता, या सर्वांचा अंत:स्वर हेच प्रकट करीत असतो-मग त्या साहित्यकृर्तीची भाषा कोणती का असेना. नजीकच्या भविष्यातच प्रादेशिक वैशिष्टयांवर आधारलेले ग्रामीण साहित्य कालबाह्य होण्याची चिन्हे दिसतात. आत्यंतिक व्यक्तिवादाची गतही अशीच लागणार, असे वाटते. व्यक्तिगत सुखदुःखांची कविता, व्यक्ती आणि निसर्ग यांच्या संबंधांतून जन्मलेली 'कॅलिडोस्कोपिक' सौंदर्याची कविता, शुद्ध आत्मलक्ष्यी कविता, गीतरूप घेऊन जन्मलेली कविता, 'रोमॅंटिक' या सदरात ढकलून क्षुद्र ठरविण्यात येत आहे असे आपण आजच पहात आहोत. साहित्यिकांचे चेहरे वैशिष्टये गमावल्यामुळे हरवून जात आहेत आणि साहित्यातील प्रवृत्तीचे ट्रेडमार्क मात्र वाजवीपेक्षा अधिक ठसठशीत होऊ लागले आहेत. साहित्यावर राजकीय 'इझम्स्' किंवा समूहासाठी असलेल्या पंथ-संप्रदाय यांच्या मुद्रा उठवून साहित्यांतले सरस-नीरस ठरविले जाते। 'समूहसंस्कृती’ च्या ब्रासबॅंडच्या कोलाहलात बासरीचे मंजुळ सूर ऐकू येईनासे झाले आहेत आणि कोणी अट्टाहासाने ते ऐकवलेच, तर त्याची संभावना 'प्रतिगामी,' 'सांकेतिक,’ ‘भावविवश', अशी कुत्सितार्थी विशेषणांनी केली जात आहे. देश कोणताही असो, साहित्याची भाषा कोणतीही असो, प्रकार कोणताही असो-हे दृश्य आज सर्वत्र दिसत आहे. त्यामागची कारणे राजकीय, वैचारिक, वैज्ञानिक आणि आर्थिक घडामोडींशी संलग्न आहेत. पण सर्वांचा परिणाम मात्र एकच आहे-व्यक्तीने आपल्या मनाची समिधा समूहाच्या अभिकुंडात टाकून देणे आणि सर्व कोलाहलात आपलाही एक आवाज मिसळल्याचा अनुभव घेणे. माझे भाषण आज गौण, असल्यामुळे या समस्येकडे केवळ अंगुलिनिर्देश करून मी थांबतो. 

उद्घाटक म्हणजे एक प्रकारे केवळ सनईवाला. मुख्य मैफल वेगळीच असते आणि असावी. आपल्याही मुख्य मैफलीत आपण साहित्य आणि संस्कृती यांची रसपूर्ण आणि उपयुक्त चर्चा करणार आहात. आपला निरोप घेण्यापूर्वी माझ्या वतीने, या शहराच्या वतीने आणि महाराष्ट्रशारदेच्या वतीने मी गुजराती साहित्यप्रेमी बांधवांचे मनःपूर्वक स्वागत करतो. नजीकच्या भविष्यात भारतात सर्व भाषाभगिनींच्या प्रेममिलनाची आनंद पर्वणी आपण साजरी करू, अशी आशा व्यक्त करून मी समेचा उपचार म्हणून जाहीर करतो : तेहतिसाव्या गुजराती साहित्य संमेलनाचा शुभारंभ झाला आहे.

Tags: कविश्रेष्ठ उमाशंकर जोशी आंतरभारती महाराष्ट्र 33 व्या गुजराती साहित्य संमेलनाचा सोहळा Kavisrestha Shrestha Umashankar Joshi Antarbharati Maharashtra #33rd Gujarati Sahitya Sammelan Ceremony weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके