डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

…..त्या झुळकीची आम्ही वाट पाहात आहोत

तुमच्यासारख्यांकडे अंगुलिनिर्देश करून आमच्या मुला-लेकरांना आम्ही स्फटिकजळाची तळी दाखवू. ज्यांची प्रज्ञा पिकल्या फळागत झालेली असते त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आम्हाला प्रार्थना करू द्या. रानात एक रेशिमसावरीचे झाड असते. शिशिराच्या वाऱ्यावर त्याचे पान न् पान गळून पडते. पण आतून दाटून आलेली रेशिमपरांची बोंडे मात्र त्याच्या अंगाला बिलगुन असतात. कधी कधी दक्षिणवाऱ्याची अशीही झुळूक सुटते की बोंड न् बोंड उलटे आणि रानावर परांची पखरण होते. त्या झुळुकीची वाट आता आम्ही पाहात आहोत

प्रिय अच्युतराव, 

तुमच्या वयाला पाउणशे वर्षे पुरी झाली. तुम्ही गुणवृद्ध, ज्ञानवृद्ध आणि तपोवृद्ध होताच; पण ते म्हणजे 'वृद्धत्व’ जरसा विना’. या पाच फेब्रुवारीला तुम्ही वयोवृद्धही झालात हे मान्य केलेच पाहिजे. अशावेळी ‘चिरतरुण’ वगैरे म्हणण्याचा प्रघात असतो, पण ते काही खरे नव्हे. तरीही एक गोष्ट तुम्हाला सांगितली तर रागावू नका. ही काही एका आयुष्याची पंचाहत्तरी नव्हे! एका आयुष्यात तुमचे दोन अवतार झालेले आहेत! पहिली पंचेचाळीस वर्षे एक आणि पुढली तीस वर्षे दुसरा.. दोन्ही अच्युतराव एकच का? तुमची पहिली प्रतिमा तुम्हाला आता रुचत नाही. पण जनसामान्याच्या मनातून ती कधीच पुसली गेली नाही, जाणार नाही. ती आहे राष्ट्रीय काँग्रेसच्या मंचावर आला-बोलला जिंकून गेला अशा एका तरुण नेत्याची! तुमचे व्यक्तिमत्व विलोभनीय, बुद्धी तर्कनिष्ठुर आणि वक्तृत्व अमोघ. तुमच्या विरोधी प्रतिपादनाचा प्रभाव गांधीजींच्या मनावर पडला आणि तुम्ही काँग्रेस वर्किंग कमिटीच्या ज्योतिमंडलात प्रवेश केलात. तुमच्या सुप्तगुणांची, बुद्धिमत्तेची मोहिनी हजारो तरुणांवर पडली आणि तुमचा अनेकांनी मत्सरही केला. 1942 च्या अग्रगण्य सेनानीच्या भूमिकेमध्ये तुमच्या सर्व गुणांची कसोटी झाली. भूमिगत आंदोलनात तुमची हिंमत आणि जिद्द सिद्ध झाली. आशा-निराशांच्या चक्रावर्तात तुमचा खंबीरपणा अवळ राहिला.बंडखोरीला तुम्ही दिशा दाखवलीत आणि शेकडो स्वातंत्र्य सैनिकांच्या मनोबुद्धीचे तुम्ही पोषण केलेत.ही तुमची स्मृती पुसली जाणे दुरापास्त आहे. पण तुम्ही मात्र हा सारा खेळ व्यर्थ मानलात एखादा सिद्धार्थ, जनक किंवा भर्तृहरी राजवैभवाकडे पाठ फिरवून विजनात निघून जावा तसे आपल्या तपश्चर्येच्या पुण्याईवर तिलोदक शिंपून तुम्ही निघून गेलात.कुठे गेलात, कुठे राहिलात, अनिकेत वृत्तीने आज इथे तर उद्या तिथे' पढाव कुठे कुठे थाटलेत ते प्रयत्न केला तर क्रमवारीने सांगता येईलही. तीस वर्षांच्या आत्मविलोपी साधनेतही ‘बुडता हे जन न देखवे डोळां’ या कळवळ्याने लोकशिक्षणाची पुरुषार्थी कामे तुम्ही करीत होतात. हे सारे आठवून आठवून नमूद करता येईलही. पण त्यात काही अर्थ नाही.मुख्यतः तुम्ही गेलात ते अंतर्यामाच्या यात्रेला. आपल्या मुखावरचा प्रकाशझोत तुम्हाला नकोसा झाला होताच; पण आपल्या दिठीचा दिवाही बाह्य विश्वाचा शोध घेण्यासाठी न वापरता त्याचे तोंड तुम्ही आतल्या बाजूस वळवलेत. आम्ही ज्याला शोधत राहिलो तो दीपस्तंभ काय शोधत राहिला बरे? जिकडे एकही गलबत झुकण्याचा संभव नाही अशा निर्जन बेटावर तो समाधिस्थ झाला! या तुमच्या निर्णयाबद्दल तुमची निर्भत्सना पुष्कळच झाली. कुणी पळपुटा म्हटले. कुणी पर्यकपंडित म्हणून बोळवण केली. सुखवस्तूंचे बौद्धिक चोचले अशी संभावना कुणी कुणी केली. कोणी हळहळले, कोणी संतापले, कोणी टवाळी केली. कोणी म्हणजे बहुतेकांनी-अनाकलनीय म्हणून सोडून दिले.खरे सांगायचे तर गेल्या वीस वर्षांत तुम्ही काय केलेत, काय साधलेत आणि वैयक्तिक चिंतनातून सामूहिक श्रेयासाठी काय शोधलेत याचा आजमितीस कुणालाही काही पत्ता नाही.कृष्णमूर्तींचे तुम्ही अन्तेवासी आहात आणि तुमचे त्यांचे सत्य शब्दांपलिकडचे आहे. अनुयायित्व आणि शिष्यत्व ही लिगाटे तुम्ही बरे गळ्यात घ्याल! त्यामुळे तुमच्या मनाचा थांग लावण्यासाठी कृष्णमूर्तींना वाट पुशितु जाण्यातही काही अर्थ नाही.स्थूलाकडून सूक्ष्माकडे झिरपत जाणारी बुद्धी आमच्या ओळखीची आहे. सूक्ष्माकडून व्यापकाकडे झेप घेणारी प्रज्ञाही आम्हाला अपरिचित नाही. शक्य आहे. या दोहोंचा समन्वय करण्याची शक्ती तुम्ही शोधत असाल. मायक्रोबपासून अनंताच्या अवकाशापर्यत अविच्छिन्नपणे स्कुरण पावणाऱ्या चैतन्याच्या स्थितिगतीचे अंदाज तुमच्या प्रजेने कवळले असतील. ऊर्जचे असीम क्षेत्र असे विश्व आणि संवेदनेने सीमित केलेली त्यातली जीवस्वरूप बेटे यांच्यामधील नाते तुम्हाला स्पष्ट झाले असेल. पण नेमके काय घडले आहे ते तुम्ही केव्हा आणि कोणाला सांगणार आहात? तुमच्या अखंड चिंतनाचे फलित काय आहे? शोधाचा बोध काय आहे? तुमच्या निष्कर्षांनी माणसाच्या संचितात, उपलब्धीत कोणती भर पडली आहे आहे हे आम्हाला केव्हा समजणार? तुम्ही आम्हा प्रापंचिकांशी संवादच केला नाहीत, पांढऱ्यावर काळे करून मार्गदर्शक खुणाच ठेवल्या नाहीत तर तुमच्या आयुष्याच्या उत्तरायणाचे रहस्य तुमच्या जीवितासह समाप्त होणार आहे का? पॉल गोर्गाने ढाहिटी बेटांवर निर्मिलेल्या कलाकृती जगाच्या सुखासाठी प्रकाशात येऊच नयेत काय? तुम्ही तुमच्या चिंतनात आणि आम्ही आमच्या चिंतेत! याहून वेगळे घडले तर पुन्हा आपल्याला लिप्ताळ्याचा विटाळ झाला असेच तुम्ही मानणार का? खरी गोष्ट अशी आहे की आम्ही एकामागून एक ओढवणाऱ्या अस्मानी सुलतानी संकटांनी कावून गेलेले आहोत. विचारी माणसांना रात्रंदीस युद्धाचा प्रसंग आहे. नित्य नवी आव्हाने आहेत. स्वार्थाच्या निर्लज्ज बाजारात भलतीच तेजी आहे. चारित्र्याची लंगोटी खुंटीला टांगलेली आहे. लोककल्याणाचे मार्ग वाटमाऱ्यांनी रोखलेले आहेत. माणुसकी मावळत चालली आहे. उभे राष्ट्र अधःपाताच्या कड्याच्या टोकाशी काडीचा आधार घेऊन धडपडते आहे. ही अनर्थ परंपरा रोखायला तुम्हीच काय ते समर्थ होतात असला बावळट समज आमचा नाही. तरीही तुमच्या तोलामोलाची माणसे, श्रेष्ठ हेतुसाठी का असेना, या दुर्दैवी समाजाशी फारकत घेतात याचा अतोनात खेद होतो. साहित्य पाहावे तर ते समाजाच्या सुखदुःखांपासून बळ मिळवीत असते. ललित कलेच्या उपासकांनाही आमच्या आशा-निराशा प्रेरणा देतात.सामाजिक शास्त्रे बोलून चालून समाजजीवनाच्या आधारे आकार घेतात. इतकेच काय, शुद्ध गणित आणि विज्ञान यांनाही समाजविन्मुख राहून चालत नाही. तर मग स्वजनांना टाकून विजनात जाण्याची आणि देशकालस्थिति निरपेक्ष चैतन्यशोधात निमग्न होण्याची मिरास चितकांनी तरी भोगावी काय? कदाचित हे प्रश्न गैरलागू असतील. हा आकांत वेडेपणाचा असेल. थव्यामधला एकच पक्षी आणि तोही थव्याचा नायक वेगळ्या उंचीवरून पण सर्वांवेगळा होऊन एकटाच भिरंगतों आहे हे थव्याला सहन होत नाही. त्याच्या कलकलाटात तुम्हाला थव्याकडे खेचण्याची शक्ती नाही; पण म्हणून काय तुम्ही तो अजीबात ऐकणारच नाही? अधिक काय लिहिणे? पण अधिक एवढेच लिहिणे आहे की प्रकृतीला सांभाळा आणि अजूनही या देशात तुमच्यासारखी माणसेही आहेत या जाणिवेचा आनंद जाम्हाला घेऊ द्या.

तुमच्यासारख्यांकडे अंगुलिनिर्देश करून आमच्या मुला-लेकरांना आम्ही स्फटिकजळाची तळी दाखवू. ज्यांची प्रज्ञा पिकल्या फळागत झालेली असते त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आम्हाला प्रार्थना करू द्या. रानात एक रेशिमसावरीचे झाड असते. शिशिराच्या वाऱ्यावर त्याचे पान न् पान गळून पडते. पण आतून दाटून आलेली रेशिमपरांची बोंडे मात्र त्याच्या अंगाला बिलगुन असतात. कधी कधी दक्षिणवाऱ्याची अशीही झुळूक सुटते की बोंड न् बोंड उलटे आणि रानावर परांची पखरण होते. त्या झुळुकीची वाट आता आम्ही पाहात आहोत

तुमचा,

वसंत बापट

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके