डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

कला हिमतीनं उभी राहिली. स्वावलंबी बनली. नवऱ्याकडून तिनं धुलाईची किमया शिकून घेतली होती. तीच तिला उपयोगी पडणार होती. हे लिखाण मनावर ठसलं होतं, म्हणूनच दोमिएच्या चित्राच्या निमित्ताने त्याची आठवण झाली. हे सगळं आठवत होतं. मात्र तो धडा वा ते शब्दचित्र ज्यात आहे, ते पुस्तक हाताशी नव्हतं. अनेकांकडे विचारणा केल्यावर असा काही निबंध वा शब्दचित्र कुसुमावतीबाईंनी लिहिलं होतं, हे कोणालाच आठवत नव्हतं. एक-दोघांना आठवलं, पण खात्री नव्हती. डॉ.अनंत देशमुखांनी कुसुमावतींवर पीएच.डी. केली आहे, कळल्यावर त्यांच्याशी संपर्क साधण्याचा दोन दिवस प्रयत्न केला, पण संपर्क होऊ शकला नाही. गुगलवर शोध घेतला. मिळण्याची शक्यता कमीच वाटत होती. ॲमेझॉनवर शोधलं. सहज म्हणून बुकगंगाच्या साईटवर गेले. तिथं ‘कलेची किमया’ या शीर्षकाचं पुस्तक होतं. तेच असेल म्हणून मागवलं. ती होती 16 पानांची पुस्तिका.

परवा महेश एलकुंचवारांचा ‘मौनराग’मधील पहिलाच लेख- काळोखाची फुले- वाचत असताना त्यात दोमिए या चित्रकाराच्या ‘बर्डन’ असं शीर्षक असलेल्या चित्राचा उल्लेख होता. दोमिए हा 1808 ते 1879 या कालखंडात होऊन गेलेला फ्रेंच चित्रकार. एलकुंचवार लिहितात ते चित्रकलेतील काही न कळणारालाही हादरवून सोडील असं आहे. गुगलवर चित्र पाहिलं. चित्राचा विषय खूप मोठा वा नावीन्यपूर्ण नाही. चित्र आहे एका धोबिणीचं. सहसा स्त्रीचं चित्र रेखाटताना चित्रकार स्त्री-शरीराची गोलाई दाखवून, तिचं मुसमुसणारं तारुण्य दाखवून लोकांना त्याकडे आकृष्ट करून घेतात. पण दोमिएच्या चित्रातील धोबीण तरुण नाही, ती मध्यमवयीन व खूप स्थूल आहे. चित्रात कमरेवरील धुण्याच्या कपड्यांची टोपली एका हाताने धरून ठेवत व दुसऱ्या हाताने लुटुलुटु चालणाऱ्या मुलाला सांभाळत ती चढणीचा रस्ता चढून जात आहे. मूलही स्थूलत्वाकडे झुकणारे आहे. माध्यान्हीची वेळ व अजून बरीच चढण चढून जायची आहे. तिच्या चेहऱ्यावरचे दुःखही चित्रात स्पष्ट दिसते. (पाऊल थकले, माथ्यावरती जड झाले ओझे... या शांताबाईंच्या गीताची आठवण झाली.) ते चित्र पाहताना फार गलबलल्यासारखं झालं, असं एलकुंचवार लिहितात.

हे सगळं वाचत असताना व गुगलवर ते चित्र पाहत असताना मला अनेक वर्षांपूर्वी कुसुमावतीबाई देशपांड्यांनी लिहिलेल्या ‘कला धोबिणी’ची आठवण झाली. ते वाचल्यावर मलाही तिचं दुःख वाचून असंच काहीसं वाटलं होतं. नंतर कधी तरी शिक्षिका असताना माध्यमिक शाळेच्या पाठ्यपुस्तकातील ‘कला धोबीण’ हा धडाही शिकवलेला आठवला. दोन्ही चित्रे धोबिणीचा व्यवसाय करणाऱ्या स्त्रीची! स्थल कालानुसार त्यांचे पोशाख वेगळे असले तरी संसाराचा गाडा ओढतानाचे व्याप-ताप सारखेच आहेत. त्यातील हर्षविमर्शाचा समंजस स्वीकार दोन्ही स्त्रियांनी केलेला आहे.

कुसुमावतींच्या धोबिणीचे नाव आहे कला. ती ठसकेबाज आहे. तिची नेहमीची नेसूची साडी फाटकी असली तरी परीटघडीची असे, हे तिचं वैशिष्ट्य! (काही लाँड्रीवाले त्यांच्याकडे धुण्यासाठी आलेले कपडे स्वतः वापरतात वा ओळखीच्यांना वापरायला देतात, असं अनेकदा बोललं जातं.) तिचे डोळे धारदार होते. नाकातली तेजस्वी चमकी तिचं तेलंगणी मूळ ठसठशीतपणे सांगत असे. सहा-सात मुलांची आई, पण अंगकाठी शिडशिडीत व चेहरा नाजूक होता. चादरीत गुंडाळून चोळामोळा झालेले धुवायला दिलेले कपडे व कलानं धुऊन इस्तरी करून आणलेले कपडे यात जमीन-अस्मानाचा फरक दिसत असे.

कपड्यांची चाळण करणे, इस्तरी करताना कपडे जाळणे अशा अनेक करामती काही धोबी करत असतात; पण कला धोबीण या गटात बसणारी नव्हती. लेखिका म्हणते, तिच्या हातून कपडे परत घेताना निर्मळतेचा प्रसाद घेतल्यासारखं वाटत असे. एखादा कपडा वा त्यावरचा डाग चांगला धुवायला सांगितला तर ती म्हणे- ‘हाँ बाई, धोबी निकाल देगा। उसको सब मसाला मालूम है’- नवऱ्याबद्दलचा अभिमान तिच्या शब्दाशब्दांतून ठासून भरलेला असे. आपला नवरा किती कुशल धोबी आहे, याचीही जाणीव तिच्या बोलण्यातून तिच्या चेहऱ्यावर ओसंडताना दिसत असे. दर महिन्याचा कपड्यांच्या हिशेबाचा कागद ती घेऊन येत असे. त्यातील काही चूक तिच्या निदर्शनाला आणली, तर डोईवरचा पदर सावरत ती म्हणे, ‘आप जो देंगे वह मैं ले लूँगी, मगर वह बडा रंज करता है।’ लेखिका म्हणते त्याप्रमाणे तिचे बोलणे धूर्तपणाचे असेलही. मात्र त्यातून ती नवऱ्याचा व गिऱ्हाइकाचाही आदर राखत होती. लेखिकेनं तिच्या नवऱ्याला प्रत्यक्ष कधीच पाहिलं नाही. सर्व व्यवहार नेहमी कलाच करत असे.

तिच्या नवऱ्याला दम्याचा त्रास होता. खोकून-खोकून तो बेजार होई. कलेनं अनेक औषधं केली, पण अखेरीस व्हायचं तेच झालं. एके दिवशी सकाळी साखरझोपेत असतानाच कलेचा नव्हे तर तिच्या पोरीचा ‘बाईऽऽ कपडे’ असा आवाज आला. सकाळी-सकाळी झोपमोड केल्याबद्दल मालकीणबाई खेकसल्याच तिच्यावर. पण पोरीच्या तोंडचे शब्द ऐकताच ‘फिर फुरसुत नहीं होगी बाई। मेरा बाप परसो मर गया। उसका तिसरा दिन आज करना है।’ हे ऐकून लेखिका निशःब्द झाली.

कलाचा नवरा म्हणजे जगाच्या दृष्टीनं कोणी महान व्यक्ती नव्हती. त्यामुळं त्याच्या मृत्यूची बातमी सगळ्यांपर्यंत पोचण्याची शक्यताच नव्हती. अशी अनेक माणसं रोज मरत असतात, त्यातलाच हा एक. त्यात बातमी होण्यासारखं काहीच नव्हतं. मात्र तसं असलं तरी कलाचा डोंगराएवढा भरभक्कम आधार कायमचा गेला होता. लेखिकेचं मन व्याकूळ झालं. आता तिला धंदा बंद करावा लागेल आणि आपल्याला नवा धोबी शोधावा लागेल, असं मनात येऊन गेलं. (स्वतःची सोय बघण्याची पांढरपेशी खोड) चार दिवसांनी तिची पोरगी आली कपडे न्यायला. कोण धुईल यावर तिचं उत्तर होतं, ‘हम धो लेंगे, चार दिन मामा भी आया है।’ चार दिवसांनी मुलांचा मामा आपल्या घरी निघून गेला. कोण किती पुरे पडणार? नंतर कला स्वतः मान खाली घालूनच आली. तिची रयाच गेली होती. आणखी दोन घरची धुलाईची कामं मिळावीत, म्हणून तिची खटपट चालली होती. आजारपण व दिवस करण्यात झालेलं कर्ज फेडायला हवं होतं. रेशनकार्डावरचं नवऱ्याचं नाव कमी करायला हवं, याबाबतही ती सजग होती. ते कसं करायचं, ते तिनं विचारुन घेतलं व मुलीचा हात धरून ती निघून गेली. बाप गेला तरी पोरंबाळं उघडी पडली नव्हती. कला हिमतीनं उभी राहिली. स्वावलंबी बनली. नवऱ्याकडून तिनं धुलाईची किमया शिकून घेतली होती. तीच तिला उपयोगी पडणार होती.

हे लिखाण मनावर ठसलं होतं, म्हणूनच दोमिएच्या चित्राच्या निमित्ताने त्याची आठवण झाली. हे सगळं आठवत होतं. मात्र तो धडा वा ते शब्दचित्र ज्यात आहे, ते पुस्तक हाताशी नव्हतं. अनेकांकडे विचारणा केल्यावर असा काही निबंध वा शब्दचित्र कुसुमावतीबाईंनी लिहिलं होतं, हे कोणालाच आठवत नव्हतं. एक-दोघांना आठवलं, पण खात्री नव्हती. डॉ.अनंत देशमुखांनी कुसुमावतींवर पीएच.डी. केली आहे, कळल्यावर त्यांच्याशी संपर्क साधण्याचा दोन दिवस प्रयत्न केला, पण संपर्क होऊ शकला नाही. गुगलवर शोध घेतला. मिळण्याची शक्यता कमीच वाटत होती. ॲमेझॉनवर शोधलं. सहज म्हणून बुकगंगाच्या साईटवर गेले. तिथं ‘कलेची किमया’ या शीर्षकाचं पुस्तक होतं. तेच असेल म्हणून मागवलं. ती होती 16 पानांची पुस्तिका. नॅशनल बुक ट्रस्टनं नवसाक्षर साहित्यमालांतर्गत काढलेली. त्यामुळं भला मोठा टाईप व जवळजवळ प्रत्येक पानावर भलं मोठं चित्र. मूळ पुस्तक वा गोष्ट पुस्तिकेत नमूद केल्याप्रमाणे ‘कला धोबिणीचे वैधव्य’ अशी आहे. पण ती कथा कोणत्या संग्रहात समाविष्ट आहे ते कळलं नाही. त्याचं संक्षिप्तीकरण सुषमा सोनक यांनी केलं आहे. पानावरची चित्रे शशी शेट्ये यांनी चितारलेली आहेत.

एलकुंचवारांच्या लेखातील धोबिणीच्या चित्रामुळं मला कुसुमावतीबाईंनी लिहिलेलं कला धोबिणीचं शब्दचित्र आठवलं. त्या चित्रात व या चित्रात बरीच साम्यस्थळंही आढळली. त्याच लेखात पुढील भागात एलकुंचवारांचा कोणी आप्तेष्ट निधन पावला, त्याबाबत लिहिताना त्यांनी म्हटलं आहे, ‘त्या घरात तीन दिवस असेच गेले. घरावर पारोशी, सुतकी कळा व मरणगंध दाटलेला होता.

कलेचा नवरा गेल्यावर संसाराचा गाडा चालवण्यासाठी तिला उठावंच लागलं. हातावर पोट असणाऱ्या श्रमिकांना उठावंच लागतं. तिला नवऱ्याचा व्यवसाय चालू करावा लागला... ‘अमरत्व’ किंवा ‘वासांसि जीर्णानि यथा विहाय..’ यांसारख्या पांडित्यपूर्ण व पांढरपेशी विचारांचा खल करण्याची जरूर नव्हती. जन्माला आलेला मरणारंच. मागे राहिलेल्यांना दुःख गोंजारत बसता येत नाही. प्रापंचिक जबाबदाऱ्या निभवाव्या लागतात, हेच सत्य त्यातून अधोरेखित होतं. दोन्ही चित्रात प्रापंचिक दुःख ठळकपणं दिसून येतं.

1904 ते 1961 हा कुसुमावतीबाईंचा कालखंड. त्या कालखंडात त्यांनी समीक्षा, विविध प्रकारचं ललित लेखन केलं. साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं. (अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषविणाऱ्या त्या पहिल्या महिला.) आज मात्र फारच थोड्याना त्यांचं लेखन आठवतं. असो. कालाय तस्मै नमः हेच खरं.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके